आणि म्हणे ... आपल्याला माणसं कळतात..! (उत्तरार्ध)

Submitted by मिलन टोपकर on 16 January, 2012 - 11:35

असेच तीन चार महिने गेले. संध्याकाळी सहा-साडेसहाचा सुमार. मी एकटाच ऑफिस मध्ये काहीतरी वाचत बसलो होतो.
"सर, आत येऊ" असे विचारणारा जरासा ओळखीचा आवाज आला.
दारात सोनटक्के आणि त्यांच्या सोबत एक स्त्री, त्यांची बायको, आत येण्याची परवानगी मागत होते.
सोनटक्केंना पाहताच माझा राग उफाळून आला. आणि मग त्या रागामुळेच माझ्या स्वर कुत्सित झाला आणि बोलण्यात खोचकपणा आला असावा.
"या, सोनटक्के, कसे काय आलात? मला वाटले विसरलात. गरज सरो, वैद्य मरो असे ऐकले होते, पण तुम्ही गरज सरो, वकील मरो असेच वागलात"
"तसे नाही साहेब. सॉरी, म्हणजे माझी चूकच झाली. पण काय आहे की ..."
"राहू दे सोनटक्के, असे अनुभव मला नवे नाहीत. उपकार कसे फेडायचे असतात त्याचे प्रत्येकाचे नियम वेगळे असतात हे मला कळते".
"साहेब तुम्ही काहीही बोला, तुम्हाला अधिकार आहे. माझी चूकच तेवढी मोठी आहे. पण माझे ऐकून तरी घ्या..."
"नको सोनटक्के, उगीच माझे तोंड उघडू नका. अकारण माझ्याकडून तुमच्या पत्नीसमोर तुमचा अपमान नको व्हायला".
"मी काही बोलू का साहेब?" सोनटक्केंच्या पत्नीने विचारले.
मी काहीच बोललो नही.
"साहेब आम्हाला मान्य आहे, आमचे चुकलेच. त्याबद्दल ह्यांच्या वतीने मी माफी मागते. पण आज आम्ही का आलो आहोत ते ऐका आणि मग काहीही बोला", वाहिनी म्हणाल्या.
त्यांनी सांगितले त्याचा मतितार्थ असा. निकाल लागल्यावर त्याची प्रत घेऊन सोनटक्के ऑफिसला गेले होते. त्यांना असे वाटले की हा निकाल बघून त्यांना लगेच कामावर घेतले जाईल. फरकाचे पैसे मिळतील. पण आज बघू, उद्या बघू अशी टोलवाटोलवी करून शेवटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात अपील केले होते. त्याची नोटीस घेऊन आता सोनटक्के आले होते. माझी गरज त्यामुळेच पुन्हा निर्माण झाली होती. नाहीतर सोनटक्के कशाला आले असते?
"मला माहीत आहे, तुम्हाला ह्यांचा खूप राग आला आहे. पण खरे सांगते साहेब, आज तुमच्याकडे यायला हे तयारच नव्हते. मला साहेबांकडे जायला तोंडच नाही असे म्हणत होते. पण मी ह्यांना म्हणाले, आपली चूक झाली हे खरे पण, तुम्हीच विचार करा, इतर कुणी वकील असते तर ते अशा वेळी कसे वागले असते? पण ह्या साहेबांनी निकाल लागल्यावर गेले तीन चार महिने तुम्हाला साधा निरोपही पाठवला नाही, पत्र, नोटीस काहीही पाठवली नाही. म्हणून दुसऱ्या कुठल्याही वकिलाकडे न जाता ह्याच वकिलांकडे आपण हे अपिलाचे कागद घेऊन जायला हवे. त्यांना राग येणे साहजिकच आहे, पण तेच तुम्हाला आताही मदत करतील", वाहिनी म्हणाल्या.
"तुमची वकिली करायला वहिनींना आणले आहे का तुम्ही, सोनटक्के? अहो, अगदी माझ्या नकळत, निदान सौजन्य म्हणून तरी तुमच्या निकालाची एखादी प्रत माझ्या घरी, ऑफिसमध्ये ठेवून जायची. तुम्हाला माहीत आहे ही केस मी फक्त वकील म्हणून लढत नव्हतो. तुमची अवस्था आणि परिस्थिती बघून मी एक पैसा देखील न घेता तुमची केस चालवली. त्याचे चांगले पांग फेडलेत", मला माझा राग शेवटी आवरला नाहीच.
सोनटक्के आणि त्यांच्या पत्नीने एकमेकांकडे पाहिले. त्यात थोडे आश्चर्य, थोडे दुःख होते.
मला वाटले मी जरा जास्तच बोललो. पण आता मी माझा अभिनिवेश सोडणार नव्हतो. व्यवहार तर अजिबातच नाही.
"ठीक आहे, मी हे अपील स्वीकारतो. पण माझी आधीच्या केसची फी रु. १००० आणि अपिलाची रु. १५०० देणार असाल तरच". मी ताठरपणे म्हणालो. खरे तर त्या वेळेच्या माझ्या फीच्या मानाने मी जरा जास्तच फी सांगितली होती.
"आता तुमच्या शिवाय आम्हाला कुणाचाच आधार नाही. तुम्ही मागितलेली फी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ, त्यात अनमान करणार नाही. पण साहेब हे ही लक्षात घ्या की अजून ह्यांना नोकरी नाही. डोक्यावर कर्ज आहेच, मुलांचे शिक्षण, इतर देणी, ह्या सगळ्यांमुळे आता लगेच तुम्हाला पैसे देणे आम्हाला शक्य होणार नाही. पण माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही हे कागद ठेवून घ्या, वकीलपत्र घाला. तुमची लहान बहीण म्हणून एवढी मदत कराच". वाहिनी म्हणाल्या. सोनटक्के गप्पच होते.
मला पक्षकारांचे असल्या स्वरूपाचे बोलणे नवीन नव्हते. शिवाय सोनटक्केंवर आता माझा तितकासा विश्वास बसत नव्हता. असे काहीतरी बोलून मला भरीला पाडायचे म्हणूनच ते पत्नीसह भेटायला आले होते असा माझा पक्का समज झाला.
"मागच्या वेळी तुमच्यासाठी शब्द टाकायला कुमार होता. पण त्याने देखील तुमचा निकाल लागल्यावर मला तोंड दाखवलेले नाही. मग आता माझ्या फी ची खात्री द्यायला कोणाला घेऊन येताय?" मी सोनटक्केना विचारले.
"कुणालाही नाही", वाहिनी ताडकन म्हणाल्या, "आमच्यावर कुणाचा आणि आमचा कुणावर विश्वास उरलेला नाही. आणि तुमचाही आमच्यावर विश्वास नसेल तर इतरांमुळे देखील तो ठेवू नका साहेब. पण तुमच्या फीचीच खात्री तुम्हाला हवी असेल तर आमच्याकडून काहीही लिहून घ्या. हे आणि मी डोळे झाकून त्यावर सही करतो".
का कुणास ठाऊक, पण आता मला उगीचच अपराध्यासारखे वाटू लागले. आपण आजपर्यंत पैशाकरता असे वागलेलो नाही, मग आत्ताच का असे वागतो आहे, असा स्वतःलाच प्रश्न पडला. शेवटी मीच जरा नरमाईने घेतले.
"त्याची काही गरज नाही, वाहिनी. पण आज काय बोलला आहात ते लक्षात ठेवा सोनटक्के". मी माघार घेत पण स्वत:चा बाणा जपत बोललो.
सोनटक्केंनी कागदपत्रे ठेवली आणि गेले.
पुढे केसच्या तारखा पडत गेल्या. सोनटक्के पूर्वीसारखेच येऊ लागले. ऑफिसात बसायचे. कोर्टात यायचे. तिथेही पूर्वीसारखेच शांत असायचे.
औद्योगिक न्यायालयात देखील केसीसचे निकाल लागायला वेळच लागायचा. पण सुदैवाने एक-दीड वर्षात सोनटक्केची केस चालली. कामगार न्यायालयाचा निकालच कायम झाला. सोनटक्के पुन्हा जिंकले.
मागचा अनुभव जमेस धरून मीच स्वतः मुद्दामहून निकालाची प्रत मागायचा अर्ज तयार करून सोनटक्केना दिला आणि त्यांना माझ्या समोर सही करायला लावली. आपल्या माघारी निकालाची प्रत घेऊन सोनटक्केनी पसार होऊ नये म्हणून! त्यांच्या ते लक्षात आले. अर्जावर सही करताना सोनटक्के कसेनुसे हसले.
दहा बारा दिवस गेले असतील. मला पुन्हा कोर्टातून कळले, सोनटक्के परस्पर निकालाची प्रत घेऊन गेले.
मला पुन्हा राग आला. सोनटक्के आणि त्यांच्या पत्नीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि सहकारी मित्राने तेच शब्द पुन्हा ऐकवले.
मला एक स्पष्टपणे जाणवले की माणसे ओळखण्यात मी पुन्हा चुकलो.
सोनटक्के वाटलं तेवढे प्रामाणिक, निरलस आणि निष्पाप नव्हते हेही उमजले.
डोळ्यात चमचाभर पाणी आणणे आणि समोरच्याला त्यात बुडवणे थोडेफार अवघड असले तरी अशक्य नसते. बऱ्याच जणांना ते जमते.
सोनटक्केंनी तेच केले आणि मला हातोहात बनवले.
पण मग हे कळते तर वळत का नाही? कुणीही यावे आणि आपल्याला फसवावे, हा आपला मूर्खपणा म्हणायचा की आपले प्राक्तन? आणि असे वागून माणसे काय मिळवतात? क्षणाचा फायदा? पण मग त्या फायद्यामुळे आयुष्यभराचे नुकसान करून घेणे परवडते? माणसे तुटली तरी चालते?
मनात असे असंख्य प्रश्नाचे भोवरे उमटले, उमटत राहिले.
माझा पक्षकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन, नाही म्हटले तरी थोडासा, बदललाच.
आपल्या मनावर ओरखडे उठले की मग त्यांचे परिणाम आपल्या बरोबर इतरांनाही भोगावेच लागतात.
तसे थोडेफार होत गेलेच.
माझ्याकडे नंतर येत गेलेल्या प्रामाणिक पक्षकारांकडे देखील मी संशयाने बघत गेलो. अभावितपणे, पण नाईलाजाने.
....
खूप दिवस, महिने गेले. माझ्या मनातून सोनटक्के प्रकरण मी काढून टाकले. पण विसरलो नाही.
आलेला एक अनुभव म्हणून गाठीशी ठेवून माझे आयुष्य आणि माझा व्यवसाय चालूच राहिले.
....
सन १९९२. दुसऱ्या दिवसापासून कोर्टाला दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती.
ऑफिस ७ दिवस बंद असणार होते. त्यामुळे मी, माझा सहकारी आणि ऑफिस स्टाफ सगळे आवराआवरी करत होतो.
असेच सहा-साडे सहा वाजलेले.
आणि ऑफिसच्या दारात सोनटक्के उभे. बायको आणि दोन्ही मुलांसह.
मला आश्चर्य वाटले. पण त्यांचे सगळ्यांचे चेहरे प्रसन्न, फुललेले होते,
"साहेब आत येऊ? नाही, न विचारता येतोच. साहेब, प्लीज काही बोलू नका. आधी हे पेढे घ्या. खूप दिवसांपूर्वी कबूल केले होते. मुलांनो काकांना नमस्कार करा. साहेब हे माझी मुले. माझ्या पत्नीला तुम्ही ओळखताच" इति सोनटक्के.
"सोनटक्के हे सगळे काय चाललंय?" मी जरासा गडबडून गेलो होतो आणि रागही येत होता.
"साहेब" वाहिनी म्हणाल्या, "आधी हे घ्या आणि मग बोला". वहिनींनी माझ्या हातात एक पाकीट ठेवले.
"हे काय आहे?" मी विचारले.
"हे पैसे आहेत. तुमच्या फीचे" वाहिनी म्हणाल्या.
मी काही बोलायला तोंड उघडण्याआधीच त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"साहेब, प्लीज ऐका. तुम्हाला आठवतंय? ह्यांची नोकरी गेली आणि आमच्यावर आभाळ कोसळले. त्यावेळची परिस्थिती किती बिकट होती ते तर तुम्हाला माहीतच आहे. कर्जाचा डोंगर, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि ह्यांचा असा सरळ स्वभाव. त्या वेळी फक्त तुम्हीच आम्हाला देवासारखे भेटलात. निरपेक्षपणे तुम्ही ह्यांची केस घेतलीत. आमच्यासाठी तुम्ही जे केले, तसे आणि तेवढे करणारे कुणीही भेटले नाही, साहेब. तुम्हाला वाटत असेल की ह्यांचे मित्र मदत करत होते. पण तुमचा विश्वास नाही बसणार, साहेब त्यांच्याकडून मिळालेला प्रत्येक पैसा विषासारखा होता. मी ह्यांना तेव्हा म्हणत होते मी काम बघते, धुणीभांडी करते पण तुमच्या मित्रांची मदत नको. पण ह्यांनी माझे ऐकले नाही. साहेब, महिना १०-१२% व्याजाने उसने पैसे देऊन हे मित्र आम्हाला आर्थिक मदत करत होते. तुमच्या कृपेने केसचा लवकर निकाल लागला. आम्हाला वाटले ह्यांना कामावर घेतले जाईल. पण आमचे दुष्टचक्र कुठले थांबायला? संस्थेने अपील केले. आणि पैसे मिळतील ही आशा दुरावल्याने मित्रांनी पैशाकरता तगादा लावला. दारात पठाणासारखे येऊन बसायचे. ह्यांना, मला, मुलांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले होते साहेब. आम्हाला निदान अपिलापुरती मदत करा म्हणून मी स्वत: त्यांच्या पाया पडले. मुलांना त्यांच्या पायावर घातले. पण त्यांना दया नाही आली. ह्या त्रासामुळे 'आता ही कोर्टबाजी पुरे' असे म्हणून ह्यांनीदेखील अपिलाला विरोध करायचा नाही असे ठरवले. साहेब असे सगळे सोडून, हातपाय गाळून बसलेले चालले असते का? म्हणून मग मी स्वतः ह्यांना घेऊन तुमच्याकडे आले. तुम्ही म्हणालात मी आधीची केस फुकट चालवली. आम्हाला धक्काच बसला. कारण तुम्हाला फी द्यायची म्हणून खूप मोठी रक्कम कुमार आणि मित्रांनी ह्यांच्याकडून मागून घेतली होती. तुम्हाला भेटल्यावर हा खुलासा झाला. पण त्यांच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नव्हता. अपिलाकरता मग तुम्ही सांगाल ती अट आम्हाला मान्य होती. आणि सुदैवाने तुम्ही केस घ्यायला तयार झालात. तुम्ही घेतली नसती तर पुढे काय झाले असते ह्याचा विचारही करवत नाही". वहिनींचा बोलता बोलता गळा भरून आला.
मग सोनटक्के बोलू लागले.
"अपिलाचा निकाल लागला आणि मी, हिच्या सांगण्यावरून, महामंडळाच्या वरिष्ठांना भेटलो. त्यांच्या कानावर सर्व घटना घातल्या. त्यांनी मला कामावर घेता येईल पण निकालाप्रमाणे मिळणारी फरकाची रक्कम मिळाली आहे असे लिहून द्यावे लागेल आणि त्यातली निम्मी रक्कम त्यांना द्यावी लागेल अशी त्यांनी अट घातली. माझा नाईलाज झाला. मी कामावर हजर झालो आणि सगळे मित्र गिधाडासारखे, डोमकावळ्यासारखे जमा झाले. मिळालेले पैसे त्यांना दिले आणि उरलेली रक्कम जमेल तशी देतो असे कबूल करून कसबसे त्यांना थांबवले. पुढे प्रत्येक महिन्याच्या पगारातून ७५-८०% रक्कम त्यांना देऊन उरलेल्या रकमेत आम्ही भागवत राहिलो. उपाशी राहणे परवडले पण ह्या सगळ्या तथाकथित मित्रांची देणी नकोत असे झाले होते. असे मित्र असले की शत्रूंची गरजच नसते साहेब. सगळ्यांची सगळी देणी, कर्ज, अगदी व्याजासकट फेडायला, इतके दिवस, महिने गेले. दोन महिन्यापूर्वी सगळ्या देणेकर्यांची सगळ्या रकमेतली पै आणि पै फेडली. मगच झोपू शकलो. आणि काल मला दिवाळी बोनस मिळाला. मी सगळी रक्कम घरी हिच्या हातात ठेवली. तर मला म्हणाली अजून एक ऋण फेडायचे आहे. ते फेडल्याशिवाय आपल्याला मरायचा देखील अधिकार नाही. साहेब, हेच ते मला मिळालेले बोनसचे पाकीट आहे. ह्यात बोनस म्हणून माझ्या अडीच-तीन महिन्याचा पगार आहे. ह्या रकमेवर फक्त तुमचा अधिकार आहे. ही रक्कम तुम्ही घेतलीत तर आज आमच्या घरी समाधानाची दिवाळी साजरी होईल. मनावरचे इतक्या वर्षाचे ओझे उतरेल. तुमच्या उपकाराचे ओझे आता पेलवत नाही साहेब. मुलांनी माझे असे काही मित्र पाहिले आहेत की त्यांचा माणुसकीवर विश्वासच उरलेला नाही. पण त्यांचा पुन्हा माणुसकीशी परिचय व्हावा म्हणून आज तुमच्याकडे घेऊन आलो आहे" सोनटक्के भावनाविवश होऊन बोलत होते. बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वाहिनी आणि मुले देखील आपले अश्रू आवरू शकत नव्हते.
माझा सहकारी अवाक झाला होता. ऑफिस स्टाफ देखील गप्प होता.
आणि मी? मला कळत नव्हते की हे सगळे काय चाललंय? मी काय ऐकतोय? मला ह्या चार पाच वर्षात एकाच माणसाने एवढे धक्के द्यावेत? माझ्या विचारांना, कल्पनांना, निष्कर्षांना असा सुरुंग लावावा? मला जाणवले, आपण फार लवकर माणसांबद्दल काही मते बनवतो. त्या समोरच्या व्यक्तीला, स्वतःला सिद्ध करायची संधीच देत नाही. आणि मग असेच निष्कर्ष कुणी आपल्याबद्दल देखील काढत असेल तर? आपण कसे आहोत? आणि आपण आपल्याला कसे सिद्ध करू?
आता मी इतक्या सहजपणे म्हणत नाही, "मला माणसे कळतात...!"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर लिहीले आहे. आधीचा भाग वाचल्यापासून उत्सुकता होतीच. मध्यावर असताना शेवटी काहीतरी सुखद धक्का मिळावा असेच वाटत होते. तसे झाल्याने अजून आवडले.

फक्त ते दोन्ही वेळेस तो निकाल न सांगता का घेऊन गेले याचा पूर्ण खुलासा होत नाही.

याचा एखादा २५-३० मिनीटांचा छोटा भाग होऊ शकतो टीव्हीवर, पूर्वी कथासागर वगैरे असायचे तसे. सध्याच्या भुक्कड सिरीयल्स बघण्यापेक्षा या खर्‍या माणसांच्या कथा बघायला कधीही आवडेल.

टोपकर साहेब खुप सुंदर्,भावनाविवश झालो.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

सध्याच्या भुक्कड सिरीयल्स बघण्यापेक्षा या खर्‍या माणसांच्या कथा बघायला कधीही आवडेल. >> १००% अनुमोदन !

खुप छान लिहिलय.. प्रसंग जसेच्या तसे उभे राहिले डोळ्यांसमोर.. खरं आहे तुमचं आपल्याला खुप कळलं आहे एखाद्याबद्दल अस वाटताना आपण अजाण असतो.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
फक्त ते दोन्ही वेळी निकाल परस्पर का घेऊन गेले त्याचा खुलासा होत नाही >>> मला ही तो कधीच झालेला नाही. आणि असे सगळे घडल्यावर तर ह्या बद्दल विचारण्याचे भान नाही राहिले आणि गरजही नाही वाटली.
भुक्कड सिरीयल्सपेक्षा खर्‍या माणसांच्या कथा बघायला आवडतील >>>> सहमत....!
धन्यवाद.

चान्गले लिहीलय! Happy
स्वगतः
अशी वेळ कधी येऊ नये माणसावर, पण जेव्हा येते, तेव्हा हाच गोड गोड गुडीगुडि बोलणारा आजुबाजुचा समाज गिधाडासारखा तुटून पडतो हे देखिल तितकेच कटु सत्य. मात्र त्यातही तुम्ही खम्बीर असलात, तर मार्ग निघत रहातो, कोणतरी चान्गला भेटतो, वा कुणाच्या तरी मनात "चान्गुलपणा" उद्भवतो, अन तेव्हा "देव" असतो, कुठेही असतो, कुणाच्याही रुपात मदत करुन जातो, याची खात्री पटते.
बर्‍याच जणान्ना केवळ शब्द/वर्णने वाचुन हे कळत नाही, स्वानुभवच घ्यायला लागतो. परिस्थितीचे तसे फटकेच बसावे लागतात, मगच देव आठवतो, तोवर तत्कालिक यशाच्या धुन्दित देव/धर्म वगैरे सगळे झूठ, अन भक्तिभाव वगैरे मानसिक कमजोरी असे म्हणणारेच जास्त भेटतात.