पहिल्या पानावर...
आज रंगीबेरंगीत एक तरी पान लिहावं, असा विचारच करत होते. शाळेत असताना नवी कोरी वही मिळाली की पहिल्या पानाचं कोण अप्रूप वाटायचं! कितीतरी वेळा त्या नव्या वहीचा मस्त वास घ्यायचा, त्या छानशा 'पांढर्या व्हाईट्ट' दिसणार्या कागदावरुन हळूवार हात फिरवायचा. मला सगळ्यात जास्त रस असायचा, तो दर वर्षी नव्या नव्या अशा वह्यांवरच्या चित्रात. अजूनही, ती मोठ्या मोठ्या फुलांची चित्र असायची वहीवर, ती मला आठवताहेत. का कोण जाणे, पण चमकदार कागद येण्याआधीच्या साध्या कागदावरची ती चित्रच मला जास्त आवडायची. वहीतल्या रेघा निळ्या आहेत की गुलाबी? दोन्ही बाजूला समास आहेत का? पान क्र., तारीख असं डाव्या बाजूच्या चौकोनात छापून त्याची जागा निश्चित केली आहे का? अनुक्रमणिका छापील आहे का? प्रत्येक पानावर खालच्या समासात नवनवीन सुविचार आहेत का? मागच्या पुठ्ठ्यावर काय अनमोल माहिती छापली आहे की नुसतंच वेळापत्रकाचं कोष्टक आहे? हे सगळे मुद्दे कित्ती महत्त्वाचे वाटायचे. तेच पुढे रटाळ तासांना वेळ घालवायला फार उपयोगी ठरायचे ना!
पहिल्या पानावरचं अक्षर कसं रेखीव काढलं जायचं अगदी कोरुन कोरुन.. सुरुवात नेहेमीच 'श्री' याच अक्षरानी अर्थात. त्यानंतर काय लिहायचं तर स्वत:चं नाव ! नुकतंच कुठल्यातरी पुढे ढकलत माझ्यापर्यंत आलेल्या इ-पत्रात वाचलं की नविन पेन हातात घेतल्यावर नव्वद टक्के लोक त्या पेननी स्वतःचं नाव लिहीतात. माझ्यामते हे नव्या वहीच्या पहिल्या पानाबाबतही तितकंच खरं असेल. त्यापुढे शाळेचं नाव, इयत्ता, तुकडी इ. इ. फारच मूड असेल आणि वेळ असेल, तर या सगळ्याला एखादी छानशी नक्षीदार चौकट. थोडंफार शेडींग पेन्सिल किंवा पेननी. अर्थात हे सगळं त्याच वेळी झालं नाही, तर मग हे पुढे कुठल्यातरी एखाद्या रटाळ तासाला जरा बरा वेळ घालवायला करता यायचं.
काही काही रटाळ तासांना मग वहीच्या कोपर्यातला छोटा चौकोन वापरुन चित्र काढायची आणि वहीची पान त्या कोपर्यात धरुन सर्रकन सरकवली की ती सगळी चित्र मिळून एक छोटसं चलचित्र बनायचं. प्रत्येक वहीत एका न एका कोपर्यात नारळीची झाडं, समुद्रकिनारा, घर आणि चंद्र हे चित्र काढलंच पाहिजे असा दंडक होता की काय तुमच्या शाळेत? असा कुणालाही प्रश्न पडला असता. तर हे चित्र हवंच. रंगीबेरंगीच्या पहील्या पानाच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. पण हे पहिलं पान जितकं महत्त्वाचं तितकंच शेवटचं पानही महत्त्वाचं हं.. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी...
>>प्रत्येक
>>प्रत्येक वहीत एका न एका कोपर्यात नारळीची झाडं, समुद्रकिनारा, घर आणि चंद्र हे चित्र काढलंच पाहीजे असा दंडक होता की काय तुमच्या शाळेत?
अगदी अगदी. शाळेचा दंडक माहित नाही पण माझ्या वहीचा मात्र तो दंडक होता
आता 'पहिले' पान आखून झालयं. पुढे येउ द्या जोरात!
मीनू
मीनू नॉस्टॅल्जिक केलंस बघ. दिवस वाया घालवलास. पाप लागेल तुला!
कालच भावाशी बोललो होतो, की नवीन वहीच्या वासातल्या आनंदाची सर आता नवीन मर्सिडीज् जरी समजा घेतली, तरी त्या आनंदालाही येणार नाही म्हणून.
वर्षे झाली, अजून तस्साच, कोर्रा आहे अगदी मनात तो वास.
मीनू, अगदी.
मीनू, अगदी. मस्त!
लिहीच.
>>पण हे पहीलं पान जितकं महत्त्वाचं तितकंच शेवटचं पानही महत्त्वाचं हं..
हो, हो.
मीनू अगदी
मीनू अगदी मस्त जमलाय लेख. लेकीच्या शाळेची तयारी करताना मी याच आठवणींमधे बुडून गेले होते.
जाता जाता - पहिले, नवनवीन, माहिती, पाहिजे असं हवंय. ते दुरुस्त करणार का?
मीनू, हळवे
मीनू, हळवे करणारी आठवण करून दिलीस की गं. छान लिहिलेस.
<<इ. इ. फारच
<<इ. इ. फारच मूड असेल आणि वेळ असेल, तर या सगळ्याला एखादी छानशी नक्षीदार चौकट. थोडंफार शेडींग पेन्सिल किंवा पेननी.
---
अगदी अगदी. आम्ही शाईपेनने छोटी जाड रेघ किंवा डॉट देऊन ते नंतर बोटाने फरफटवायचं एक टिपीकल शाळकरी डिझाईन असतं ते करायचो खूपदा ते आठवलं
मस्त लेख.
>>तेच पुढे
>>तेच पुढे रटाळ तासांना वेळ घालवायला फार उपयोगी ठरायचे ना!
अगदि अगदि....
आम्ही अजुन काय करायचो माहितेय.... त्या वहीचा जपानी पंखा करुन त्यावर नाव लिहायच...
पुढुन जेव्हढी वही भरायची नाही तेव्हढी मागुन भरत यायची कवितांच्या ओळी आणि गाण्यांनी...
आणि मी जेंव्हा एलेमेंटरी-इंटर्मिजिएट च्या परीक्षा देत होतो तंव्हा तर प्रत्येक वहीवर ते टिपीकल "डेलिया"च फूल हमखास असायच.
शोनु
शोनु थांकु. दुरुस्ती केली.
सायुरी आम्ही पण काढायचो गं ती प्रसिद्ध नक्षी.. शाई फिसकटवून.
मागची निम्मी पान आणि पुढची निम्मी पानं अर्धी दुमडुवून एक मस्त फुल बनायचं त्या वहीचं. आता माझ्या लेकानं तशी दुमडली तर... ?
लाले.. चावट..
बाकी सर्वांनाच प्रतिक्रीयांबद्दल थांकु.
~~~~~~~~~

~~~~~~~~~
मीनू, अक्षर
मीनू,


अक्षरशः हळवं केलंस....
शाळा सुरू झाल्यावर घेतलेल्या नविन वह्या पुस्तकांच्या वासाशी तुलना कशाशीही होऊ शकणार नाही.
शाळेत आमचा ५ जणींचा गट होता, दरवर्षी आम्ही ठरवायचो, वह्या स्वच्छं ठेवायच्या, लिखाण शुद्ध करायचं, एका धड्यावरचं लिखाण झालं की रेषा मारायची. चिंगूसपणा न करता नविन धड्याची सुरवात नविन पानावरच करायची. पण हा संकल्प अगदी एक महीना ही टिकायचा नाही. रटाळ तासाला आम्ही एकमेकिंच्या हातावर पेनाने नक्षी काढायचो. हात मिळाला नाही की वहीचं शेवटचं पान मग त्यावर कच्च्या बेरजा, वजाबाक्या, स्पेलिंगं, या बरोबरंच.. शाळेतल्या क्रश चं नाव.. ते ही बदामात.
मिनू...
मिनू... जुन्या वह्या जाग्या झाल्या
मस्तच
दक्षिणा
आई शप्पथ!!!
आई शप्पथ!!! पुन्हा शाळेत गेलो बघ.......
मस्तच
मस्तच लिहिलं आहे.. मी पण वह्या खुप घाण करायचो. अर्थात सातवी नंतर माझ्या एक लक्षात आले की शाळेत दोनच वह्या पुरेशा आहेत. एक गणिताला आणि उरलेली बाकी सगळ्याला
ती उरलेली बाकी सगळ्याला वही मग दहावीपर्यंत पुरली 

पुढे इंजिनीअरींगमध्ये एकच १०० पानी वही ४ वर्ष वापरली
>>जपानी
>>जपानी पंखा करुन त्यावर नाव लिहायच...
मी हे पुस्तकावर करायचोच. आणि तस केल की एकदम बॉस वाटायच. की आता पुस्तक कोणि चोरल तरी लगेच कळेल म्हणून.
गणिताचा मात्र सराव म्हणून कधी केला नाही गृहपाठाव्यतिरिक्त. त्यामूळे त्याची पण वही संपायची नाही.
माझ अक्षर भयंकर वाईट. त्यामूळे ते नाव लिहायच काम आई बहीण अस कोणाकडे तरी असायच.
ह्म्म्म, गेले ते दिन गेले !
अर्थात, मला शाळेपेक्षा कॉलेज जास्त आवडल होत. कधी पण बंक करता येत हे स्वातंत्र्य महान वाटायच. आपले आपण राजे !
अभियांत्रिकीला मात्र वहीच केली नव्हती. कधी काळी वर्गात बसलोच तर असावा (लाजेकाजेस्तो) म्हणून १ फूलस्केप कागद न्यायचो ४ घड्या घालून खिशात.
>>१
>>१ फूलस्केप कागद न्यायचो ४ घड्या घालून खिशात>>
सव्यसाची...
तान्या आणि
तान्या आणि सव्या.. झालात का रे इंजिनीअर दोघं.. ?
~~~~~~~~~

~~~~~~~~~
व्वा,
व्वा, छान
पहिलं पान
मलाही कोर्या वहीचा वास आवडायचा पण लिहिण्याच्याबाबतित मात्र .....
अगदी अगदी
अगदी अगदी सव्या.. बर्याचदा तो कागदही नसायचा मग कोणाची तरी वही उचलून समोर ठेवायची..
मिनू छानच लिहिलेयस..
मला जाड पुठ्ठ्याच्या वह्या आवडायच्या नाहित.. ऐंशी पानी वह्या गुंडाळी करून खिशात किंवा शर्टात कोंबायचो म्हणजे हात टपल्या मार, बोरं खा, मारामार्या कर ह्या उद्योगांना मोकळे मिळायचे...
हे सगळे
हे सगळे पोस्टस मी माझ्या आईला वाचायला देणार आहे. तीला वाटते माझा भाऊ फारच वात्रट आहे
त्याने पण पाचवीच्या वह्या दहावीपर्यंत पुरवल्या. पुरवल्या पेक्षा शेवटपर्यंत कोर्याच ठेवल्या
की आता पुस्तक कोणि चोरल तरी लगेच कळेल म्हणून >>> अगदी अगदी
बाकी वर आलेले बहुतेक नमुने आम्ही पण करायचो शाळेत
माझ्या वहीच्या मागच्या पानावर कायम कुत्रा/मांजर ह्यांचे चित्र (?)असायचे. नाहीतर मुरणी घातलेल्या बाईचा चेहरा. का कुणास ठाऊक पण हा चेहरा नेहेमी माझ्या आईच्या नाहीतर ताईच्या चेहेर्यासारखा यायचा.
पाचवीत असतात्ना एकदा वर्गातल्या एका मुलीने लिहिण्यासाठी मागितली म्हणुन मी वहीची दोन पाने फाडुन दिली. तर तिने ती पाने देऊन शाळेबाहेर बसतात त्या खाऊवाल्यांकडुन चिक्की घेतली. आणि निम्मी मला आणुन दिली. मी घरी कळाले तर काय म्हणुन चिक्की खाल्लीच नाही. मोठ्या शाळेत, मोठ्या मुलींबरोबर पहिलेच वर्ष होते. परत अशी बदमाषी नाही करु दिली कुणाला.
मीनुने मस्त आठवणी जागवल्या.
मिनु, मस्त
मिनु,
मस्त लिहील्यात ग आठवणी.
मी नेहमी चांगले अक्षर असणार्या कोणाकडुन तरी वहीच्या पहिल्या पानावर नाव घालुन घ्यायचे. शेवटचे पान मात्र आपले.
मीनु, तुखं
मीनु, तुखं लेखन आणि बाकी सगळ्यांच्या comments वाचून खरंच खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. निखळ आनंद असायचे तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींत .. ती निरागसता परत कधी येणार नाही हेच सगळ्यांत मोठं दु:ख आणि ह्या आठवणी कधीच जायच्या नाहीत मनातून हा सगळ्यांत मोठा आननंद ..
मिनू छान
मिनू छान सुरुवात केलीस रंगिबेरंगी ची.. पहिले पान छान रंगवलेस
सर्वांच्याच जुन्या आठवणी जाग्या केल्यास...
सव्या , टण्या : अगदी अगदी.. अनुमोदक...
ईंजिनिअरिंगला एक वही चार वर्षे पुरुन परत उरली
सव्या, मी, उपास टण्या ह्यासारख्या असंख्य मुलांनी किती राष्ट्रीय संपत्ती वाचवली बघा.. आमचा गौरव झाला पाहिजे त्यासाठी
================
हीच शोकांतिका तुझी माझी
काच शाबूत पण चरे होते
-वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
एस. एम. जोशी हॉल, पुणे
सही लिहिलस
सही लिहिलस मिनू! पण आमच्या शाळेत आठवीपर्यंत वह्या चेकिंग त्याला मार्क्स असले आचरट प्रकार असल्याने ह्या गमती सोडाच उलट वहीच्या कोणत्याही पानावर एक वाकडी रेघ किंवा ठिपका जरी उमटला तरी माझी रडारड चालायची. शेवटच्या दोन वर्षांत मात्र वह्या मनसोक्त रंगल्या पण मागपासून. पुढचं पान उलट कोरं ठेवायचो घरी आईच्या हातात पडल्याच वह्या तर मैत्रिणीची आहे असं ठोकून देता यायला. मधे काही नोट्स नसायच्याच: )))
टण्या,
टण्या, सव्य, मिल्या..

फुलस्केपच्या आधी मी एक शक्कल काढली होती. खिशात बसेल अशी ३ बाय ५ इंचची डायरी. पण थर्मोडायनॅमिक्सच्या मास्तरने एक दिवस त्याच्या हातातलं ते ३-४ किलोचं पुस्तक अन ही २५ ग्रॅमची डायरी- हा विरोधाभास सहन न होऊन ती खिडकीच्या बाहेर भिरकावल्याने नाईलाजाने फुलस्केपची आयडिया वापरायला लागली..
शाळेच्या वह्यांचा वास सुंदर वाटे. कारण आवडणार्या मास्तरांनी शिकविलेलं तिथं लिहायचं असे. इंजि. कॉलेजच्या खवीस नाहीतर जाम कंटाळवाण्या मास्तरांनी शिकविलेलं काय त्या सुंदर वास येणार्या वहीत लिहायचं??
--
मीनू- टण्या, सव्य इंजिनियर झालेच असणार. मी पण झालो. सगळे असेच होतात..
मीनू,
मीनू, डायरेक्ट शाळेत नेऊन बसवलंस..
शाळेत असताना शक्यतो पहिल्या पानावर आजोबाच नाव घालायचे. त्यांच्या सारखे अक्षर आजतागायत काढता आलेले नाही 'य' प्रयन्त करुन झालेत त्यासाठी.. अगदी बोरू वगैरे पण गिरवून झाला...
पण मागची पानं मात्र प्रचंड गिरवली आहेत..
पानाची मधे घडी घालून एका बाजूला पेन्सिलनी चित्र काढुन त्याचे symmetrical फ्री हँड करणे हा एक आवडता उद्योग होता....
तान्या, सव्या, मिल्या, साजिरा तुमचे वाचून मी इंजिनीयर होताना कशाला येवढ्या वह्या वापरल्या असा प्रश्न मला पडला आहे..
अर्थात तेव्हा चॅटींग हा प्रकार जोरात असल्याने.. माझ्या वह्यांची मागची पाने चॅटींग मध्येच भरायची .. अर्थात काही वह्या अजून ही जपून ठेवल्या आहेत.. सुदैवाने काही चांगले गुरुजी असल्याने त्यांच्या notes कधीतरी उपयोगी पडतात अजुनही...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
अरे हो
अरे हो मिल्या, खरच आपण नकळत का होईना, वैश्वीक तपमानवाढीलापण आवर घातला आहे. इतक्या लहान वयात केवढी जाण होती
मीनू, झालो बुवा एकदाचा विंजिणेर, गंगेत घोड न्हाल !
मीनु, मस्त
मीनु, मस्त आठवणी जागवल्यास ग... कित्ती सुंदर दिवस... माझ्या वहीत पहिल्या पानावर नेहमी मी माझ्या मुस्लिम मैत्रिणीकडुन उर्दुमध्ये माझं नाव लिहुन घ्यायचे.
साजिर्या, थर्मोडायनॅमिक्सचा मास्तर >>>> दुबेसर ना?
-प्रिन्सेस...
हिम्स
हिम्स चॅटींग तर अजुनही सुरू असतं office मधे.. meeting सुरू असस्ली की मी आणी माझी मैत्रीण notepadवर लिहुन बोलतो
:फिदीफिदी:
सगळ्यांना
सगळ्यांना प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद..!

~~~~~~~~~
~~~~~~~~~