नशीब भाग - ७१

Submitted by विनायक.रानडे on 7 January, 2012 - 22:02

२००४ मोठ्या मुलाला एक सकाळचे काम मिळाले होते. धाकट्याला कॉल सेंटरचे काम मिळाले होते त्यामुळे ६००० घराचे भाडे व घर खर्च फारसे त्रासदायक भासत नव्हते. मुलांचे रात्री अपरात्री घरात येणे जाणे त्यामुळे सगळे वातावरण बिघडलेले होते. ह्या सगळ्याचा परिणाम घरात अशांतता जाणवत होती. कॉल सेंटरचे कधी रात्रीचे ९ वाजता तर कधी पहाटे ३ वाजता काम मुलाला झेपत नव्हते. त्यामुळे दिवसभर तो झोपेत असायचा. एका सुटीच्या दिवशी सकाळी ११ वाजता मित्रा कडे जातो म्हणून घरातून निघाला तासाभरात मोठ्या मुलाला त्याचा फोन आला म्हणून मोठा घरातून बाहेर गेला. अर्ध्या तासाने घाबरेला मोठा मुलगा घरात आला. धाकट्याच्या दुचाकीला अपघात झाला असून त्याला इमारतीच्या पार्किंगमध्ये खाली आणले आहे. त्याला लगेच दवाखान्यात नेणे आवश्यक होते. शेजार्‍याने जवळच अपघाता करता नोबेल नावाचा दवाखाना असल्याचे सांगितले. मी मुलाला रिक्शांतून घेऊन गेलो.

दवाखान्यात भली मोठी दाढी असलेली पण किरकोळ बांध्याची एक व्यक्ती समोर आली. ते डॉ. मुख्तार अहमद होते. स्वच्छ मराठीतून आमच्याशी बोलले लगेच मुलाला एक्सरे करता घेऊन गेले सगळे काम स्वत:च करत होते. जवळ कोणीच मदती करता नव्हते. तीन मजली इमारतीत कोणाचाच वावर दिसत नव्हता. थोड्या वेळात मुलांच्या मित्रांचा ताफा, मामा-मामी जमले, आम्हाला धीर द्यायला मंडळी जमली होती. डॉक्टर बाहेर आले "मुलाच्या छातीच्या तीन बरगड्या तुटल्या आहेत, एक बरगडी हृदयाला टोचते आहे त्यामुळे आतल्या आत रक्तस्त्राव होत आहे, तो थांबवण्या करता त्याची हालचाल थांबवणे आवश्यक आहे, ४८ तास धोक्याचे आहेत. मुलाला इथे ठेवायचे असेल तर लगेच पलंग आणि खोली तयार करतो, दुसरी कडे न्यायचे असेल तर सांगा मी व्यवस्था करतो." माझे पैशाचे हिशोब सुरू झाले. पण मित्रांनी पाच हजार लगेच जमा केले. आमचे नशीब बघा, वेळ न गमावता मी त्याच डॉक्टरला जे शक्य आहे ते करायला सांगितले.

वेळ दुपारचे दोन वाजलेले होते. मुलाला झोपेचे इंजेक्शन देऊन पलंगा वर झोपवले होते. डॉक्टर अत्यंत शांत होते. जाड व रुंद बॅंडेड पट्टी छातीच्या मध्या पासून डावीकडून ते पाठीच्या उजव्या भागा पर्यंत घट्ट बसवली व तशा बर्‍याच पट्ट्या चढवल्या होत्या. मुलाच्या छातीची हालचाल थांबवली व त्याला सलाइन लावून त्यातून त्याला आवश्यक आहार पुरेल अशी व्यवस्था केली होती. रक्त दाब, ऑक्सिजन व हृदयाचे ठोके मापन हे सगळे चालू केले होते. डॉक्टर दर तासाला येऊन तपासून जात होते. मी रात्री मुला बरोबर राहणार होतो. मुलगा केव्हातरी मध्येच जागा होत होता. " बाबा माझा हात धरना, मला एकटा सोडू नकोस, मला खूप भिती वाटते आहे, बाबा माझी काही चूक नव्हती," मी त्याला गप्प राहा सांगत होतो, "चूक काय, कोणाची, कशी हे आपण दोन दिवसांनी बोलू आता फक्त मी लवकर बरा होईन असे सारखे बोल किंवा मनात फक्त तेवढेच चालू ठेव, बघ ते डॉक्टर दर तासाला तुला तपासून जात आहेत, शांत झोप."

मी आवाजाने घाबरून झोपेतून जागा झालो. मुलाने पाण्याच्या ग्लासला हात लावल्याने तो खाली पडला होता. त्याला चमच्याने पाणी दिले. थोड्या वेळात त्याला पुन्हा झोप लागली होती. पाहाटे चार वाजले होते. माझी झोप उडाली होती. मी काल पासून घडलेल्या घटना क्रमाचा विचार करत होतो. मोठ्या मुलाने अपघात कसा झाला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता. "धाकटा त्याच्या पलसर दुचाकीवर एकटाच होता. रस्त्यावर देखील एकटाच होता. मागच्या चाकातून आवाज आल्याने काय झाले ते बघण्या करता त्याने उजव्या बाजूला मान वळवली होती. तेवढ्यात रस्त्यावर पावसाने जमलेली बारीक वाळू व माती मुळे मागचे चाक सरकले, तोल गेला तो सावरेस्तोवर दुचाकी दुतर्फा असलेल्या कठड्याला जाऊन धडकली हा फेकला गेला व कठड्याला लागून असलेल्या ठेंगण्या भिंती वर जाऊन नेमका छाती वर आदळला. डोक्याला हेल्मेट असून काही उपयोग झाला नाही. थोडे उभे राहण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. दुसर्‍या बाजूने जाणारे काही थांबले, त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. पण एकाने प्रथमोपचार म्हणून त्याची छाती दोन तीन वेळा दाबली. नेमके त्याच वेळेला एका डॉक्टरीण बाईने माझा मुलगा छातीत दुखते आहे म्हणून ओरडत असताना ते ऐकले बघितले, तिने गाडी थांबवून हात धरून सगळ्यांना बाजूला केले होते व धाकट्याच्या मोबाईलने मोठ्याला कळवले होते." काय योगायोग, काय ही माणसे, काय हे प्रसंग? माझे मलाच काही सुचत नव्हते.

डॉक्टर पहाटेचा नमाज वाचून नुकतेच खाली आले होते, मला धीर देत त्यांनी विषय बदलला. " काळजी करू नका, मला खात्री आहे, वेळेवर उपचार सुरू झाल्याने धोका कमी झाला आहे, अजून २४ तास धीर धरा. तुम्ही कामाला कुठे आहात? दोन्ही मुले कामाला कुठे आहेत. मी व बायको आखाती देशात होतो. अशा अपघातांचा मला १५ वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे यू आर इन सेफ हॅन्ड, तिथे तर अपघाताने हातपाय, डोके फुटलेले, रक्त बंबाळ रुग्ण दिवस रात्र येत होते त्यांना आम्ही पुन्हा व्यवस्थित चालते बोलते केले होते. तुमच्या मुलाचे भाग्य चांगले आहे त्याला तसले काहीच झालेले नाही. रक्तस्त्रावाचा धोका होता तो आता कमी होतो आहे. काळजी करू नका."

मुलाला सहा दिवस रात्र दवाखान्यात ठेवले होते. डॉक्टर रोज एक्सरेने तपास घेत होते. रक्त दाब, ऑक्सिजन व हृदयाचे ठोके सगळे नियमित झाल्या वर घरी नेण्यास परवानगी मिळाली. ह्या सगळ्याचा खर्च फक्त ६,५०० झाला होता. प्रत्येकाला हा खर्च ऐकून आश्चर्य वाटले होते. अशा कामाला नावाजलेल्या (कू प्रसिध्द म्हणावेच लागेल) दवाखान्यात ३० ते ३५ हजार खर्च द्यावा लागला असता असेच सगळ्यांचे मत होते. त्या दवाखान्यातील सहा दिवसाच्या वास्तव्यात रोज मोजून १० रुग्ण येत होते. पण पैसे देताना डॉक्टर बरोबर चार शब्द कौतुकाचे न बोलता भांडून जात होते. इतका प्रेमळ डॉक्टर व उपचाराचा योग्य पैसा देताना लोकांना त्रास कशाचा होता हे मला कळले नाही. असते एखाद्याचे नशीब!

धाकटा मुलगा दोन महिने घरात निजून होता, त्रास कमी होण्यास चार महिने लागले. पण त्यानंतर त्याचे छोटे अपघात बरेच घडले, खरचटण्या पेक्षा जास्त काही घडले नव्हते. दुचाकी दुरुस्तीचा खर्च मात्र कमी होत नव्हता.

१ फेब्रुअरी २०११ पासून मी नवीन भाड्याच्या जागेत आलो. दोन फेब्रुअरीला अमावस्या होती त्या दिवशी समोर सुरू असलेल्या बांधकामाच्या एका इमारतीत एक अपघात झाला त्यात दोन कामगार ११ व्या मजल्या वरून मशीन सकट खाली विटांवर पडले व जागीच ठार झाले. तो अपघात का झाला त्याचे हे चित्रण ८ फेब्रुअरीला मी करू शकलो.

शांती पूजा

चित्रणात दिसणारी शांती पुजा अपघात झाल्या नंतर घडते आहे. त्याच वेळेला इमारतीच्या दुसर्‍या भागात असुरक्षित कामाच्या पद्धतीने काम केल्याने अपघात कसे घडतात हे सहज समजू शकेल. चित्रणात दिसतो तसा सुरक्षा पट्टा मोजक्याच कामगारांना दिलेले आहेत. डोक्या वर टोपी वापरण्याचा नियमांचे उल्लंघन दिसते आहे. सामान ने आण करणारी ती बादली वर जाताना कशी फिरत जाते व भिंतीला अडकत जाते हे दिसते आहे. जिथे अपघात झाला तिथे दुसर्‍या मजल्या वर ति बादली त्या दिवशी अशीच अडकली होती. ह्या बादलीला छोटी दोरी आहे ती पूर्ण लांबीची ठेवून खालच्या माणसाला बादलीचे फिरणे थांबवता येईल. तसेच वर बादलीतले सामान काढणारे जर मोठा लांब आकडा वापरून त्या बादलीला ओढण्याचे काम केले तर किती सुरक्षित होईल. ह्या वर नजर ठेवणारे अभियंता कुठे आहेत? असुरक्षित काम करण्याची सवय असेल तर अशा ह्या शांती पूजा निरर्थक ठरणार.

गुलमोहर: 
शब्दखुणा: