पत्रकारदिनाच्या शुभेच्छा!

Submitted by ठमादेवी on 6 January, 2012 - 06:53

परवा साधना साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाट यांनी विचारलं... तू बारा वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारिता केलीस, सगळ्यात जास्त कुठे काम करायला आवडलं?

मी दोन मिनिटं विचारात पडले... एकतर लोकांना प्रश्न विचारायची सवय असलेल्या आम्हाला दुसर्‍यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सवय नाही आणि असा प्रश्न मला कधीच कुणीच विचारला नाही... काय उत्तर द्यावं ते कळेना.. मग उत्तर दिलं.. मला पेपरपेक्षा काही माणसांबरोबर काम करायला खूप मजा आली. ते बॉस म्हणून तर चांगले होतेच पण माणूस म्हणूनही उत्तम होते. नवनवीन प्रयोग करण्यात त्यांना खूप मजा यायची. आहे बाबा पत्रकार म्हणून फक्त बातमी आणली आणि लेख पाडला की आता चाललो घरी असं कधी त्यांनी केलं नाही. पत्रकार म्हणून संजय रानडे )हे माझे पहिले बॉस), संजीव लाटकर, विनायक परब, शेखर देशमुख, संदीप आचार्य, दिनेश गुणे,अभिजीत ताम्हणे, निशांत सरवणकर यांच्याकडे बघत बघत पत्रकारिता शिकले. बातमी कशी करायची, फॉलो अप कसा घ्यायचा, लोकांशी काय- कसं बोललं म्हणजे बातमी मिळते, बातमीमागची बातमी म्हणजे काय, बिटवीन द लाइन्स कशा वाचायच्या हे सगळं शिकले. म्हणजे, माझ्या ओळखीत एक अधिकारी होता.. त्याला फोन केल्यावर, काय, कसं काय- असं विचारलं की त्याच्याकडे दोन उत्तरं असायची
१. आनंद आहे.
२. आनंदीआनंद...

त्याने पहिलं उत्तर दिलं की समजायचं की सगळं आलबेल आहे. पण दुसरं उत्तर असलं की समजायचं काहीतरी बातमी नक्की आहे. मग त्याचा पाठपुरावा करायचा. तो काहीतरी मोघम बोलणार. त्या मोघमवर आपण खोदकाम करायचं आणि मग बातमी हातात लागायची ती बेस्ट असायची.

राज्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांची ती ऐतिहासिक भेट मला आजही आठवते. २००३ मध्ये टीएमए पै फाउंडेशनच्या आणि इस्लामिया अ‍ॅकॅडमीच्या खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने प्रोफेशनल कोर्सेसच्या खासगी संस्थांना आपली वेगळी चूल मांडून फी घ्यायची परवानगी दिली. त्यावेळी मोठा संघर्ष उभा राहिला होता. तो विषय करत असताना कुलपती म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारायला आणि मुलाखत घ्यायला मी राज्यपालांना भेटले होते. त्यांनी सगळे संस्थाचालक चोर आहेत असं विधान केल्यावर माझ्यातला पत्रकार सुखावला. सनसनाटी बातमी मिळाल्याच्या आनंदात मी परतले. पण त्याआधी त्यांनी माझ्या हातात- हा ऑर्डिनन्स आम्ही उद्या काढतो आहोत असं सांगून एक कागद दिला होता तो साफ विसरले. तो लॉकरमध्ये ठेवला. मग त्यादिवशी ही मुलाखत पहिल्याच पानावर मास्टहेडच्या बाजूला लागली. दुसर्‍या दिवशी खासगी संस्थाचालकांनी पत्रकार परिषद घेऊन त्या बातमीवर आक्षेप घेतला आणि मला झोडून काढलं. नंतरचे दोन दिवस मी हवेतच होते. दोनेक दिवसांनी विद्यापीठातून मला माझ्या सोर्सचा फोन आला. अगं राज्यपालांनी ऑर्डिनन्स काढलाय पीएचडीचा. मी चरकले. म्हतलं, तो पडलाय माझ्याकडे. मला त्यांनी तो काढायच्या एक दिवस आधी दिला होता.
सोर्स म्हणाला, अगं मूर्ख अजून बातमी का केली नाहीस?
मी म्हटलं, तो वाचला नाहीये. वाचू निवांत म्हणून ठेवला होता....
सुटी होती त्या दिवशी. उठले, ऑफिस गाठलं आणि बातमी दिली- पीएचडीसाठी सीईटी... तीही गाजली चांगलीच.

नंतरचं जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या एका प्राध्यापकावर खोटी राळ उडवणारं अण्णा हजारेंच्या खोट्या सहीचं पत्र छापून ओढवलेलं प्रकरणही आठवतं तसंच. अण्णांची सही खरी-खोटी कसं कळणार? मग एक दिवस अण्णांच्या लेटरहेडवर आलेली बातमी पाहिली. सही ताडली. ती खोटी असल्याचं स्पष्ट झालं. अण्णांशी बोलून शहानिशा करून घेतली. बातमीही छापली. त्याचं पुढे काही झालं नाही. पण ज्याच्यावर राळ उडवली होती तो माणूस माझा खूप चांगला सोर्स झाला. वाईटातून चांगलं होतं ते असं.

आजच्या दिवशी चिल्ड्रेन एड सोसायटीत होणार्‍या घोटाळ्यांबद्दल केलेली मालिका आणि त्यानिमित्ताने मिळालेला पुरस्कारही आठवतो.

पत्रकाराच्या आयुष्यात बातमी लिहायला शिकल्यावर नंतरचा टप्पा असतो तो आजूबाजूचं राजकारण समजून घेण्याचा. हा टप्पा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तुमच्या बातम्या कशा छाटतात, अनेकदा त्या छाटण्याची कारणं वेगळी असतात, आमची लोकांशी असलेली मैत्री, बाकी राजकारणातला सत्तासंघर्ष, राज्यात, देशात, आपल्या शहरात असलेली राजकीय गणितं, हे सगळं शिकावंच लागतं. ते जमलं की माणूस खर्‍या अर्थानं पत्रकार होतो.. कारण अगदी सत्ताकेंद्रात नाही तर सत्ताकेंद्राच्या अगदी जवळ असलेला आणि तिथे प्रभाव पाडू शकेल असा माणूस पत्रकारच असतो. पत्रकारितेतल्या पुरूषांची गणितं वेगळी असतात तशी स्त्रियांचीही. पण त्यांच्यासमोर असलेले प्रश्न वेगळे असतात. अगदी लग्न ठरवण्यापासून ते पुढे मूल झाल्यावरचे प्रश्न त्यांच्यापुढे असतात. पण त्यातूनही मार्ग काढत त्या पुढे जात असतात. पुरुषांच्या आयुष्यातही हा टप्पा येतोच. पत्रकार आहे म्हणून मुली द्यायला नकार देणारे, त्यांच्या कामाच्या वेळांशी जुळवून घेणं न जमणारे मुलींचे पालक, मुली अशा अनेक गोष्टींमधून मार्ग काढत हा प्रवास सुरू राहतो..

असो... प्रत्येक पत्रकाराचं आयुष्य अशा कडूगोड घटनांनी भरलेलं आहे. अर्थात समाजाच्या सत्ताधीश आणि सत्ताहीन, शासन ते सामान्य माणूस, अतिश्रीमंत आणि गरीब या दोन्ही विरोधी घटकांशी एकाच वेळी समतोल ठेवून जुळवून घेत योग्य तेच सांगण्याचा आणि त्यासाठी खूप मेहनत घेण्याची तयारी असलेल्या पत्रकारांच्या कार्याचं कौतुक करण्याचा हा दिवस.

पत्रकारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्रकारीतेविषयीची ओढ जुनीच. आजही कोणी विचारलं मला कि तुला ह्या प्रिंटींग टेक्नॉलॉजीच्या व्यवसायात येण्यापुर्वी कुठलं क्षेत्र निवडलं असतं तर मी 'निर्भिड पत्रकारीता' हेच उत्तर दिलं असतं. मी पत्रकार झालो नाही म्हणून काय झालं. वाचकांचा पत्रव्यवहारामधून वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा समाचार घ्यायला आजही आवडंत. मी बर्‍याचदा ऐकलंय कि पत्रकारीता म्हणजे फारच संवेदनशील. उगाच कशाला नसत्या भानगडींच्या वाटी जायचं. खरंतर स्वच्छ, स्वतंत्र लोकशाही आणि मदमस्त राजकारण्यांमधे हे पत्रकार आणि मिडीयाच एक मोठ अस्त्र आहे. पण शेवटी काय अणुबॉंब खिशात बाळगणं हे जरी अभिमानानं छाती फुगवून सांगता येत असलं तरी चड्डीच्या खिशात आपण जे बाळगतोय ते काय आहे आणि त्यांने काय काय होईल हे कळल्यावर मग? असोत, पारदर्शक पत्रकारीत हेच एखाद्या पत्रकाराचं एकमेव ऐम असायला हवं. पण आजकाल पेड न्युज वगेरेबद्दल आपण वाचतोच. सध्या त्याचं लोण कमी आहे पण एकदा का ते पसरलं आणि बळकट झालं तर काय?

तुम्ही एक दिर्घ अनुभव असलेल्या पत्रकार आहात म्हणून एक सुचवतो आहे. शक्य असल्यास जरूर प्रयत्न करा. सध्याच्या निवडणूक आयोगाच्या संबंधीत असलेल्या 'नीला सत्यनारायण' यांच्याशी बातचीत करता आली तर जरूर करा आणि ती इथे किंवा कुठेही प्रकाशित करता आली तर जरूर करा. त्यांनी सार्वत्रिक निवडणूकींमधे बर्‍याच अमुलाग्र बदलांची कल्पना सुचवली आहे. त्या ठाणे सारख्या शहराच्या अतिरीक्त आयुक्त सुद्धा होत्या. त्यांची 'रात्र वणव्याची' हि कादंबरी, एक पुर्ण एक अपुर्ण, सत्य-कथा, आणि 'एक दिवस जंगलातला' हि पुस्तके आजही तितक्याच ताकदीची आहेत.

पत्रकार दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

ठमादेवी, पत्र्कारदिनाच्या (उशीराने) तुम्हालापण खूप शुभेच्छा. माझे बॉस दिलीप चावरे होते. त्यांच्याकडून अजूनही कायम काहीनाकाही शिकायला मिळतच असतं. दिनेश गूणेसोबत थोडेच दिवस काम केले होते. (मी पत्रकारिता सोडून काही कारणामुळे पी आर मधे आले, पण तरी अजून आयुष्यात कधीतरी परत जर्नालिझमकडे वळेन असे वाटतय) अर्थात त्या तीन वर्षामधे भरपूर काही शिकायला अनुभवायला आणी समजून घ्यायला मिळालं.

आभारी आहे सर्वांची... रायबा... अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आपल्या हातात जे आहे ते तर नक्की करताच येईल...

शैलजा, अगो, वत्सला... मी अनुभव लिहायला बसले तर अनेक गोष्टींची उजळणी होईल हे खरंय. पण प्रयत्न करते...

नंदिनी, दिलीप चावरेंबद्दल मी ऐकलं आहे फार. पण काम करण्याची संधी मिळाली नाही कधी. दिनेश गुणे इज ऑल्वेज अ गुड बॉस... Happy

दिनेश गुणे मायबोलीवर झुलेलाल नावाने लिहितात. हल्ली बर्‍ञाच दिवसात लिहिलेले नाही. ते तुला रोज भेटत असतील तर त्याना लिहायला जरूर सांग, त्यांचे काही लेख अत्यंत वाचनीय होते.

प्रहारमधे वैभव वझे स्पोर्ट्स बघतात ना?

नंदिनी, वैभवने प्रहार सोडलं. तो आता सकाळमध्ये आहे.

दिनेश गुणे मला बरेच दिवसांत भेटले नाहीत. सध्या त्यांनी लोकसत्ता पुन्हा जॉइन केलंय. सांगते नक्की..

आभार महागुरू, सायो..