जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग २)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग १

Piazza del Campidoglio कडे जाणारा Cordonata (घोडे व गाढवं पण चढू शकतील अशा उताराप्रमाणे बनविलेल्या पायऱ्या). पंचम चार्ल्सच्या भेटीच्या सन्मानार्थ हा पियाज्झा बनविला गेला. मायकेलअॅंजेलोने याच्या रचनेत अनेक भौमितीक प्रमाणांचा वापर केला आहे. कॅस्टर आणि पोलक्स कॉरडोनाटाच्या दोहोबाजूला दिसताहेत.

पियाज्झाच्या एका अंगाला आहेत Aracoeli संगमरवरी पायऱ्या. १३४८ मधे प्लेग संपल्याच्या निमित्ताने या बनविल्या गेल्या.

या पायऱ्या आपल्याला नेतात Aracoeli च्या संत मारिआ गिरिजाघरात. निदान चौदाशे वर्ष जुन्या असलेल्या या चर्चच्या जागी एकेकाळी जुनोचे मंदिर होते. साध्याश्या विटेरी भिंतीमागे लपला आहे एक खजिना. सिएनाच्या संत बर्नार्डिनोच्या आयुष्यावरील पंधराव्या शतकातील अनेक फ्रेस्को येथे आहेत. पूर्ण चर्च सुंदर आहेच, पण खासकरुन छत अतिशय अलंकृत आहे.

वरील सर्व जागा कॅपिटोलाईन हिल वर स्थित आहेत. तेथून मी रोमन फोरमकडे प्रयाण केले. फोरममधे जातांना अॉडिओ गाईड जरुर घ्या, अनेक बारकावे त्यामुळे कळतील.

व्हेस्टा ही अग्निदेवता. तिचे गोलाकृती मंदिर निर्विवादपणे रोममधील सर्वात महत्वाचे. याच्या एका छोट्या भागाची पुनर्बांधणी केली गेली आहे.

शेजारी आहे तिच्या पुजारी कुमारिकांचे वसतीगृह. रोममधील साल (खरेतर शतक म्हणायला हवे) निश्चित झालेल्या जागांपैकी सर्वात पुरातन अवशेष येथे आढळतात - ख्रिस्तपूर्व आठवे शतक.

या कुमारिकांचे मुख्य काम म्हणजे व्हेस्टाच्या मंदिरातील ज्योत सतत तेवत ठेवणे. ही ज्योत जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत राज्य सुरक्षित राहील असा लोकांचा विश्वास होता. ज्योत विझली तर मात्र …

थोडीफार देवदासींसारखी वाटू शकणारी ही प्रथा काही महत्वाच्या बाबतीत वेगळी होती. समाजात आणि सर्व कार्यक्रमांमधे त्यांना मानाचे स्थान असे व पुरेसा पैसा मिळे. ६-१० वयोगटात असतांना उच्च घराण्यांमधून त्यांची निवड होई. त्यांचे कुमारिकाव्रत भंगल्याचे निदर्शनास आल्यास मात्र त्यांना जिवंत पुरले जाई. ३० वर्षांनंतर त्या सेवानिवृत्त होऊन इतर स्त्रियांसारखे जिवन व्यतीत करायची त्यांना परवानगी असे, पण प्रत्यक्षात क्वचितच तसे कोणी करे. त्यांच्यापैकी काहींचे पुतळे येथे पहायला मिळतात. त्यांच्या राहण्याची जागा गुलाबांच्या झाडांनी व कुमुदांनी भरलेल्या हौदांनी सुशोभीत केलेली होती.

थोड्या अंतरावर आहे शनिमहाराजांच्या मंदिराचे ७-८ भव्य स्तंभ. त्यांच्या पायथ्याशी दिसत असलेल्या लोकांवरुन त्यांच्या महाकाय आकाराची कल्पना येते.

त्या शेजारी दिसताहेत ते स्तंभ कॉर्निथीयन प्रकाराचे आहेत. जवळच असलेल्या कॅस्टर आणि पोलक्सच्या मंदिरातही असेच स्तंभ वापरले आहेत. स्तंभांच्या तीन मुख्य ग्रीक स्थापथ्य प्रकारांपैकी हा एक. या स्तंभांचे शीर्ष (capital) उर्वरित स्तंभाच्या एक पंचमांश आकाराचे आणि अलंकृत असते (क्लोज-अप पहा). त्यावरील abacus शीर्षाचे छत्र अजूनच फुलवणारे असू शकते. सिकंदराबरोबर ही घाटणी गांधारमार्गे भारतात पोहोचली. पाचव्या शतकापर्यंत या रचनेचे भारतीयकरण करुन बौद्ध स्थापत्यात वापरल्याचे आढळते.

(क्रमशः)

भाग ३

विषय: 

धन्यवाद. जागा सोडली आहे आता.

हिम्सकूल, अजुनही स्लो आहेत का? माझ्या सर्वर वर असल्याने असेल कदाचीत.