माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा (भाग-६ मानस सरोवर परिक्रमा)

Submitted by अनया on 4 January, 2012 - 09:00

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा (भाग-६ मानस सरोवर परिक्रमा)

ह्या वर्षीच्या जून-जुलै महिन्यात कैलास-मानसची पवित्र यात्रा करण्याचा योग आला. त्या नितांतसुंदर अनुभवाचे मी माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.
ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!
http://www.maayboli.com/node/30416
http://www.maayboli.com/node/30637
http://www.maayboli.com/node/30799
http://www.maayboli.com/node/31261
http://www.maayboli.com/node/31407

दिनांक २६ जून २०११ (दारचेन ते किहू)

पूर्ण बॅचपैकी थोडेच यात्री आदल्या दिवशी अष्टपदला जाऊन आले होते. उरलेले आज जाणार होते. आजचा प्रवास बसने करायचा होता, तोही फक्त दोन तासांचाच. त्यामुळे सकाळी आरामात उठलो. दोन-तीन दिवस घेतलेली औषधे, कैलास परिक्रमा झाल्यामुळे मनावरचा गेलेला ताण आणि कालपासूनची विश्रांती, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मला पुष्कळच हुशारी वाटत होती. गेले तीन-चार दिवस अंघोळीचा पत्ता नव्हता. त्यामुळे आमच्यातले काही लोक फारच अस्वस्थ होते. ‘बिना नहाये – धोये खाना कैसे खाये?’ असे प्रश्न त्यांना पडत होते. आम्ही मराठी लोक मिळून त्यांची ‘महाराष्ट्रमें नहानेकी टॅब्लेट मिलती है, एक गोली खा ली सुबह, तो दिनभर एकदम फ्रेश लगता है ! आपके यहां कैसे नहीं मिलती?’ अशी फिरकी घेत होतो. रोज एखादा तरी बकरा मिळायचाच!

दारचेनला गावात गरम पाण्याच्या (विकतच्या) अंघोळीची सोय आहे. मी आणि नंदिनी ती २० युआनची अंघोळ करून आलो. अंघोळ छान झाली, पण पैसे अगदी शब्दशः पाण्यात गेले! कॅम्पवर पुन्हा सगळे सामानाची उलथापालथ करत बसले होते. आता खरतर सगळ सामान बरोबरच राहणार होत. मानस परिक्रमा संपवून आम्ही तकलाकोटला जाणार होतो. पण सामान उपसणे आणि पुन्हा कोंबणे हा तिथला आवडता उपद्व्याप असतो. ‘लगेज देना है’ किंवा ‘लगेज आ गया’ ह्या आरोळ्या सारख्या ऐकायला येत असतात. प्रत्येकाजवळ भरपूर सामान असूनही, प्रत्येकाचा डोळा दुसऱ्याच्या सामानावर जास्त असायचा!

आमचा नाश्ता उरकल्यावर आम्ही १५ लोक छोट्या बसमध्ये जाऊन बसलो. उरलेले लोक अष्टपद करून मग येणार होते. कैलास यात्रेत घोड्यावरून पडलेल्या तलेरा अंकलची अवस्था अजूनही वाईटच होती. त्यांच्या कंबरेला मार लागला होता. बसच्या दोन-तीन पायऱ्या उतर-चढ करतानासुद्धा त्यांना अक्षरशः ब्रम्हांड आठवत होत. त्यांना वाटत होत की विमानाने ल्हासामार्गे दिल्लीला निघून जायला मिळाल तर उत्तम. नारंग सरांची त्यासाठीची खटपट चालू होती. पण सगळ्या ग्रुपचा व्हिसा एकत्र असल्याने ती शक्यता धूसर होती. नशिबाने आता पुढचे ७-८ दिवस चालायच किंवा घोड्यावर बसायच नव्हत.

खिडकीतून बाहेर बघताना एकामागून एक सुंदर दृश्य दिसत होती. भाजी-पाला व इतर सामान घेण्यासाठी थोडावेळ ‘होरे’ नावाच्या गावात थांबलो. छान रुंद रस्ते, नटून थटून फिरायला तयार असलेल्या दुचाक्या आणि अर्थातच बियरच्या बाटल्यांचा खच.....अस दृश्य होत. ८० फुटांच्या खालचे रस्ते बांधायला बहुधा कायद्याने बंदीच असावी. रस्त्यांची काळजीही घेतली जात होती.

होरे गाव

1-hore.JPGमान वळवून मालकाची वाट पाहणारी बाईक

1-bike.JPG

लगेचच आम्ही मानस सरोवराच्या काठावरच्या ‘किहू’ ह्या कॅम्पला येऊन पोचलो. हा कॅम्प अगदी दृष्ट लागण्यासारख्या जागेवर आहे. अगदी मानस सरोवराच्या काठावर! माझा तर विश्वासच बसत नव्हता. नजरेच्या आवाक्यात न मावणारा, क्षणोक्षणी रंग-रूप बदलणारा तो प्रचंड जलाशय.

1-manas9.jpg

मानस सरोवर म्हणजे पावित्र्याचे दुसरे नाव. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, इथे अंघोळ केलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. ह्या सरोवराची निर्मिती प्रथम ब्रम्हदेवाच्या मनात झाली, नंतर ते पृथ्वीवर अवतरले. म्हणून ह्या सरोवराचे नाव मानस (ज्याची निर्मिती मनात झाली असे) आणि सरोवर (तळे) असे आहे. स्वर्गीय असे राजहंस उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये इथे राहतात. राजहंस हे विद्वत्ता आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जाते.

मानस सरोवरातील पक्षी

1-manas15.jpg1-manas14.JPG

हे सरोवर समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर उंचीवर आहे. जगातले सर्वात उंचीवरचे हे गोड्या पाण्याचे तळे म्हणजे एक नैसर्गिक चमत्कारच आहे. ह्याचा परीघ ८८ कि.मी., खोली अंदाजे ९० मीटर आणि क्षेत्रफळ ३२० कि.मी.वर्ग इतके आहे. ब्रम्हपुत्रा, सिंधू, सतलज आणि कर्नाली ह्या भारत आणि तिबेट समृद्ध करणाऱ्या नद्यांचे उगम इथे होतात.

मानस सरोवराची विविध रूपे

1-manas4.jpg1-manas5.jpg

बौद्ध तसेच जैन धर्मात ह्या सरोवराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये ह्याचे नाव ‘अन्वतप्त’ तर तिबेटी भाषेत ‘माफम युत्सो’ असे आहे. बौद्ध धर्मात असे मानले जाते की राणी मायाला ह्या सरोवराच्या काठावर गौतम बुद्धांची गर्भधारणा झाली. काठावर अनेक बुद्ध मंदिरे आहेत. यात्रींना यज्ञ करण्यासाठी एक चौथरा उभारला आहे. १९४९ ते १९८० सालापर्यंत चीन सरकारने चीनबाहेरच्या लोकांना इथे यायला बंदी घातली होती. १९८२ नंतर ही यात्रा परत सुरू झाली. महात्मा गांधींच्या अस्थींचे इथे विसर्जन करण्यात आले होते.

1-manas3.jpg

आम्ही किहूला पोचलो ती एकादशी होती. पोचलेल्या सगळ्यांनी मानस मध्ये स्नानाचा मुहूर्त साधला. पाणी चांगलच थंड होत. अंगाला मोहरीच तेल लावल की गारठा कमी लागतो, हे ज्ञान मिळवण्यासाठी मानस सरोवरापर्यंत जाव लागल मला!. आम्हाला ‘फार वेळ अंघोळ करू नका. सहन होईल इतकच पाण्यात थांबा’ अस सांगितल होत. ते लक्षात ठेवून मी थोड्या डुबक्या मारल्या. आभाळात ढग होते. पण ढगांचा पडदा जरासा विरळ झाल्यावर कैलासचे अविस्मरणीय असे दर्शन झाले! मी यात्रेला निघाल्यापासूनच्या झालेल्या प्रवासात झालेला त्रास, गैरसोयी, सगळ ओवाळून टाकावा असा हा सर्वोच्च अनुभव होता. आपण मानस सरोवरात स्नान करत असताना समोर कैलासाचे दर्शन होणे, हे दृश्य आणि ती अनुभूती मी ह्या आयुष्यात विसरू शकणार नाही.

अविस्मरणीय कैलास दर्शन

1-manas11.JPG

हात-पाय गार पडायला लागल्याची जाणीव होऊ लागली. मी त्या अलौकिक क्षणाबद्दल कृतज्ञतेने परमेश्वराला हात जोडले आणि डोक्यावरची पापे कमी झाल्याच्या आनंदात कॅम्पवर परत आले!! मानसची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्यासाठी साबण लावायला किंवा कपडे धुवायला बंदी आहे. त्यामुळे आमच्यातला ‘कपडे धुणे’ हा आवडता छंद असलेल्या लोकांना हात चोळत बसाव लागत होत.

त्या दिवशी हिंदू पंचांगाप्रमाणे एकादशी होती. एकादशीच्या दिवशी मानस सरोवराचे स्नान झाल्याने आम्हा १५ लोकांना छटाकभर जास्तीच पुण्य मिळाल! आम्हाला वाटल ती एकादशी म्हणजे, आषाढी (देवशयनी) एकादशी आहे. सगळ्यांना आम्ही ‘महाराष्ट्रामे बडा पिल्ग्रीमेज होता है. सब लोग पंढरपूर जाते है’, इत्यादी इत्यादी माहिती देऊन पकवल. घरी आल्यावर कळल की ती आषाढातली पहिली एकादशी होती. म्हणजे जेव्हा पालख्या पुण्यात असतात ती! असो...

1-manas1.jpg

हा आमचा कॅम्प म्हणजे बुद्ध मंदिराजवळच्या खोल्या होत्या. प्रत्येकाला पलंग आणि ढीगभर पांघरूण अशी भक्कम सोय होती.

पसारा आणि पांघरुणे

1-camp.jpg

ह्या सगळ्यात टॉयलेट पण आवश्यक असतात, ही बाब मात्र तिथले लोक विसरले असावेत. कैलास परिक्रमेत वाईट का होईना पण निदान तोयलेटचा आडोसा तरी होता. इथे मात्र काही नाही. तिबेटमधली अडचण म्हणजे इथे झाडांचाही आडोसा नाही. दिवस लवकर उजाडून उशिरा मावळत होता. हे सगळ कमी म्हणून कॅम्पला लागूनच बांधकाम चालू होत. त्याच्या पहिल्या मजल्यावर उभ राहील की, लांबवरचा आसमंत नजरेत येत होता!! सगळ्या बायकांची प्रचंड कुचंबणा झाली. हा भाग बाजूला ठेवला तरी, पर्यावरणाच्या दृष्टीनेही सगळ्या यात्रींनी नैसर्गिक विधी मानस सरोवराच्या काठावर करणे योग्य वाटत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत नवा कॅम्प तयार होईल. त्यात तरी टॉयलेटची सोय असेल अशी आशा करुया!

यात्रेला निघाल्यापासून मानसमध्ये ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे रात्री ३ ते ५ मध्ये देव अंघोळ करायला येतात, अश्या स्टोऱ्या ऐकत होतो. ह्या स्टोऱ्या सांगणारे लोक ‘हमने अमरनाथमें पाच फडावाले, नागमणीवाले नागराजके एकदम बढिया दर्शन किये थे|’ असही सांगत होते. माझा काही ह्या सगळ्यावर विश्वास नव्हता. पण उत्सुकता नक्कीच होती.

रात्री मरणाची थंडी होती. गरम कपडे घालून, खंडीभर पांघरुणे घेऊन आम्ही झोपलो होतो- नव्हतो, इतक्यात ‘अरे, बाहर चलो, दर्शन हो रहे है|’ असा आरडाओरडा सुरू झाला. सगळे पळत-पळत बाहेर. मानसच्या काठावर आमची बस उभी होती, काही त्यात शिरले, उरलेले आमच्यासारखे लेट-लतीफ अर्धवट बांधून झालेल्या खोल्यांमध्ये.

समोर मिट्ट काळोख होता. चांदण्या सुरेख दिसत होत्या. थोड्याच वेळात उल्का उडताना दिसावी, तस काहीतरी दिसल! मात्र उल्केचा उजेड संपतो. हा उजेड मात्र पाण्यापर्यंत येऊन थांबत होता. असे दोन उजेड थोड अंतर सोडून बराच वेळ स्थीर दिसत होते. ‘ये पेहेरेदार है| अभी भगवान आने शुरू हो जायेगा|’ अशी बातमी आली. मी जवळपास एक तास तिथे थांबले. कमी-जास्त तीव्रतेचे उजेड येत होते, कधी परत आकाशाच्या दिशेनेही जात होते. दुसऱ्या कोणाकडून हे सगळ ऐकल असत, तर मी मुळीच विश्वास ठेवला नसता. पण मी हे स्वतः पाहत होते. देव अंघोळीला येत असतील, हे मला अजूनही पटत नाही. देवांना माणसांच्या भाव-भावना, व्यवहारांशी जोडून मानवी पातळीवर कशाला आणायच हे कळत नाही! असो....काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा विद्युत-चुंबकीय उर्जेचा परिणाम असावा. असेलही. सगळा अनुभव मात्र वेगळाच होता. माझ्या तर्क सुसंगत विचार करणाऱ्या मनाला धक्का देणारा!

त्या थंडीत वरून भिंतीवर मारलेल पाणी डोक्यावर टपकत होत. खुपच काकडायला झाल्यावर मी आणि नंदिनी कॅम्पवर येऊन गुमान झोपून गेलो.

दिनांक २७ जून २०११ (किहू मुक्काम)

कैलास-मानस सरोवराची ही यात्रा अगदी अनादी काळापासून चालू आहे. पूर्वी वानप्रस्थाश्रमानंतर संन्यासाश्रमात ही यात्रा करीत. यात्रेला कुटुंबातील घरचा कोणी निघाला म्हणजे त्याचा शेवटचाच प्रवास असे समजून ती व्यक्ती घरच्यांचा निरोप घेऊन निघत असे. हजारो मैलांची यात्रा पायी करायची, विरळ हवेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ, प्रचंड थंडी असे संपूर्ण वेगळे वातावरण. समजा दहा-पंधरा जण यात्रेला बरोबर निघाले तरी खाणे-पिणे, उबदार कपडे, पैसा-अडका किती दिवस पुरत असेल? यात्रेत रस्ता चुकल्याने कितीजण भरकटत असतील. असे अनेक अडथळे, जीवावरचे प्रसंग पार करून कोणी सुखरूप परत आलाच तर तो त्याचा पुनर्जन्म मानीत आणि लोक,समाज त्याला देवत्व बहाल करीत.

1-manas10.JPG

आता तो काळ राहिला नाही. सगळ जग अगदी हाकेच्या किंवा संगणकाच्या क्लिकच्या अंतरावर आले आहे. कुठलीही माहिती झटकन मिळू शकते. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवरील उपाय, मार्ग आपल्याला आधीच कळतात. ही यात्रा आता भारत सरकारच्या नेटक्या आयोजनामुळे अगदी सुलभ झाली आहे.
तरीदेखील निसर्गापुढे, लहरी हवामानापुढे माणसाचे काही चालत नाही. असे असले तरीदेखील थोडा अडचणीचा प्रसंग आला तरी मनाचे संतुलन बिघडलेली वयाने मोठी, उच्च-विद्याविभूषित, बाहेरच्या जगात खूप मोठ्या पदावर काम करणारी, उद्योग धंदा यशस्वीरित्या करणारी माणसे सहयात्रींच्या चुका काढताना, असभ्य भाषेत बोलताना-वागताना पाहून वाईट वाटायचं.

1-manas13.JPG

आपण एका मोठ्या आणि कठीण यात्रेला आलो आहोत, त्या यात्रेचा अर्धा आणि अत्यंत महत्वाचा प्रवास प्रदेशात. ते किती सुविधा देणार? याचा विचारही काही जण करत नाहीत. इथे संडास-बाथरूम नाही, जेवण वेळेवर नाही, जे जेवण असेल ते अर्धेकच्चे.
दिल्लीला घेतलेल्या एकत्र वस्तूंचे वाटप नीट झाले नाही, जेवण-कमिटीचे लोक काम नीट करत नाहीत अश्या अनेक तक्रारी सुरू झाल्या. आम्हाला अनेक ठिकाणी दिलेल्या माहितीत, चीनमधली परिस्थिती, तिथल्या गैरसोयी, होऊ शकणाऱ्या कुरबुरी, भांडण.. सगळ सांगितल होत. विरळ हवेचा हा एक परिणाम असतो. पण इतक्या दिवसाच्या खेळीमेळीच्या वातावरणात आता थोडा तणाव आला.

1-manas2.jpg

आमच्या समजुतीप्रमाणे मानस परिक्रमेत दोन कॅम्पवर रहायच होत. पण तिथे गेल्यावर कळल की तस नसून ह्या एकाच कॅम्पवर चार दिवस रहायच आहे. १ जुलैला अमावस्या होती. आमच्यातल्या काही मंडळींना अमावस्येपर्यंत तिथेच रहायची इच्छा होती. बाकीच्यांना लवकर तकलाकोटला जायच होत. इथून वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या लोकांमध्ये ठिणग्या उडायला लागल्या.

1-manas9.jpg

एकतर ह्या कॅम्पवर ‘मानस सरोवराकाठी फिरणे’ एवढाच करमणुकीचा कार्यक्रम होता. ते सुद्धा हवा चांगली असेल तरच. आलो त्या दिवशी हवा बरी होती. दुसऱ्या दिवसापासून मात्र पाउस, वारा सुरू झाला. आता काय? खोल्यांमध्ये बसून वेळ जाता जाईना. थंडीमुळे सारखे जड जड गरम कपडे घालावे लागायचे. त्याचा कंटाळा आला होता. मी एक पुस्तक घरून नेल होत. त्याची मागणी खुपच वाढली. मोबाईल चार्गिंग शक्य नाही, त्यामुळे गाणी ऐकणे अशक्य! मोबाईलचा उपयोग फक्त गजराच घड्याळ एवढाच राहिला होता!

दिनांक २८ जून २०११ (किहू मुक्काम)

कालच्यापेक्षा आज हवा जरा बरी होती. आज आमच्यातल्या काही लोकांनी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे ठरवले होते. ते लोक घरून येताना हे सगळ ठरवून आले होते. त्यासाठी लागणार सगळ सामानही ते मोठ्या प्रमाणात घेऊनही आले होते. बॅचमधले बाकी काही लोकसुद्धा त्यांच्याबरोबर श्राद्धविधी करणार होते. ‘ज्या विधींची आपल्याला नीट माहिती नाही, त्या वाटेला जा कशाला?’ असा विचार करून मी काही त्यांच्यात नव्हते.

पूर्वजांचे स्मरण

1-shradh1.jpg1-shradh2.jpg

तो वेळ मानसच्या काठावर असलेल्या बुद्ध मंदिरात जाऊन सत्कारणी लावायचा, अस मी आणि नंदिनीने ठरवून टाकल.

1-mandeer1.JPG

इथल्या बुद्ध मंदिराच्या दारावर एक विशिष्ट चिन्ह होत. ते चिन्ह म्हणजे दोन बाजूंना दोन हरणे आणि मध्ये चक्र, अस असायचं. ह्याचा संबंध गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील प्रथम प्रवचनाशी आहे. बुद्धाच दर्शन आणि वाणी इतकी शांतीपूर्ण असायची, की तिथली हरणेसुद्धा प्रवचन ऐकायला यायची, अशी कथा सांगतात. तीबेटातील ज्या मंदिरांवर हे चिन्ह असेल तिथे काही विशिष्ट ग्रंथ ठेवलेले असतात.

1-mandeer2.JPG1-mandeer3.JPG

बौद्ध धर्मात छत्र, मत्स्य, बंप, पद्म, शंख, श्रीवत्स, ध्वज, धर्मचक्र अशी आठ शुभचिन्हे आहेत. ह्यातले श्रीवत्स हे चिन्ह सगळ्या घरांच्या-दुकानांच्या पडद्यावर असायचं. अतिशय सुंदर अर्थ असलेली ही शुभचिन्ह बघताना छान वाटायचं.

बौद्ध धर्मातील शुभचिन्हे
(छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

1-symb.jpg1-symb2.jpg

बुद्ध मंदिराची जागा फारच सुरेख होती. अगदी मानस सरोवराच्या काठावरच! आत शिरल्यावर प्रार्थनेची चक्र होती. चालताना ती फिरवायची. सगळ्या भिंतींवर बुद्ध जीवनातली चित्र. चित्रातले काही प्रसंग ओळखीचे वाटायचे. आत गाभाऱ्यात मंद आणि शांत प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. काही वेळ तिथे शांत बसून आम्ही बाहेर आलो.

1-mandeer5.JPGदेवनागरीतील सुलेखनाचे भग्न अवशेष

1-sulekhan.JPG

अजून श्राद्ध-विधी चालूच होता. दाराजवळ बसूनच हे विधी चालू होते,त्यामुळे कॅम्पमध्ये जाण शक्य नव्हत. आम्ही मानसच्या काठावर फिरायला निघालो. त्या भटकंतीत मानसच्या पाण्याची क्षणाक्षणाला पालटणारी रूपे, समुद्राला येतात तश्या लाटा, त्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत किनाऱ्यावरील वाळूत अनेक रंगीबेरंगी दगड पाहता आले.

1-manas6.jpg

त्या शांत, पवित्र वातावरणात फिरताना ना थंडीची जाणीव झाली, ना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची ना जवळजवळ १६ हजार फूट उंचीवर असूनही सूर्याच्या दाहाची. सर्व वातावरण अगदी निर्मळ, स्वच्छ, पवित्र वाटत होते. आसमंतात देवत्व पसरल्यासारखे वाटत होते.

1-manas7.jpg

दोन तास फिरून, आभाळात काळे ढग दाटी करायला लागल्यावर, त्या दर्शनाने तृप्त होऊन आम्ही परत आलो. तोवर ह्या मंडळींचं आटोपल होत. सगळे मानस सरोवरात अंघोळ करायला गेले. इथे आल्यापासून सगळ्यांच्या अंधश्रद्धांना उत आला होता. ‘मेडिकलमध्ये नापास झाल्यामुळे येऊ न शकलेल्या नवऱ्याच्या कपड्यांना मानसच्या पाण्यात अंघोळ घालणे’, ‘घरातल्या स्वर्गवासी झालेल्या नातेवाईकांचे फोटो मानसच्या पाण्यात अर्पण करणे’, अस काहीही. कोणालातरी त्या पाण्यात पादुका मिळाल्या! मग तर बघायलाच नको. ‘कोणीतरी आधी पाण्यात सोडल्या असतील, इतक काही आश्चर्यचकीत होण्याची आवश्यकता नाही’ अस सांगून आम्ही काही लोक त्यांना समजवायचा निष्फळ प्रयत्न करत होतो.

1-manas8.jpg

तिथल्या थंडीचा आणि विरळ हवेचा काही जणांना फार त्रास होत होता. तलेरा अंकलना जेवण आणून देणे, हात धरून टॉयलेटला नेणे, अशी मदत सगळे करत होते. पण त्यांना त्रास होतच होता. त्यांना क्ष-किरण तपासणीची आवश्यकता होती. रोज रात्री झोपेत छातीवर दडपण आल्यासारख वाटून, कोणीतरी उठायच. नाकातून रक्त येणे, श्वास घुसमटणे, हे प्रकारही लोकप्रिय होते.

शेवटी नारंग सरांनी संध्याकाळी सगळ्यांची सभा बोलावली. बहुमताने, दुसऱ्या दिवशीच दुपारनंतर तकलाकोटला जायला निघायच अस ठरल. १ तारखेच्या अमावस्येला ज्यांची इच्छा असेल, त्यांनी यायचं, अस ठरल. सगळा महिलावर्ग, उद्या आपली कुचंबणा संपणार, ह्या आनंदात झोपी गेला!!

दिनांक २९ जून २०११ (किहू ते तकलाकोट)

आजचा दिवस गडबडीचा होता. सकाळी सगळे यात्री मिळून यज्ञ करणार होते. मग काही यात्री स्वतः स्वयंपाक करून सगळ्या यात्रींना जेवण देणार होते. दुपारनंतर तकलाकोटला जायला निघायचं होत. दोन दिवस नुसते इथे-तिथे करण्यात घालवल्यावर, आज सगळे उत्साहात दिसत होते.

छायाचित्रणात मग्न यात्री

1-waitin darshan.jpg

सकाळी आम्ही परत एकदा मानस सरोवरात अंघोळ केली. त्या शांतगंभीर, गर्द निळ्या जलाशयाकडे कितीही वेळ बघत राहील, तरी कमीच वाटत होत. निळसर किरमिजी रंगाच्या मानस सरोवरात हलके तरंग उठत होते.

1-manas12.jpg

स्नान झाल्यावर सर्वजण बरोबर आणलेले प्लास्टीकचे कॅन, बाटल्या भरून मानसच्या पवित्र पाण्याने भरून घ्यायला लागले. परत गेल्यावर आपल्या परिचयातील लोक, नातेवाईक सर्वांना हे तीर्थ वाटण्यासाठी घेऊन जातात. इथेही गंमत होती! आमच्यातल्या काही जणांनी चक्क २०-२० लिटरचे कॅन भरून घेतले. शेवटी तावडेजी त्यांना म्हणालेही, ‘अरे, आगेवाले बॅचके लिये थोडा पानी बचाना, नही तो वो लोग इतना दूर आने के बाद उनको सुखा मानस देखना पडेगा!!’

बऱ्याच यात्रींनी यज्ञासाठी नवीन कपडे घातले. इतके दिवस मळक्या, चुरगळलेले कपड्यातले लोक आता चकाचक दिसत होते. यज्ञासाठी तिथे एक मोठा चौथरा बांधून ठेवला आहे. बॅचमधल्या ज्या लोकांना ह्या विधींची माहिती होती, त्यांनी पुढकार घेऊन सगळी तयारी केली. आज पाऊस नव्हता, पण ऊनही नव्हत. यज्ञाचा अग्नी धडधडून पेटला. मंत्रांच्या घोषात आहुती पडायला लागल्या. काही दिवस होत असलेल्या कुरबुरी, भांडण सगळ विसरून आजचे विधी सुरळीत चालू होते.

यज्ञाय. इदं न मम!

1-havan-6.JPG1-havan1.jpg1-havan7.JPG1-havan5.JPG

आज आता ज्या साठी एवढा अट्टाहास केला, तो यात्रेचा महत्त्वाचा भाग संपणार, म्हणून मनाला हुरहूर लागली होती. आता तकलाकोटला तीन दिवस रहायच, तीन तारखेला लीपुलेख पार करून मायभूमीत परत, १० तारखेला घरी पोचणार होतो. पण आजपासून तसा परतीचा प्रवास सुरूच. घरची ओढ तर लागली होती, पण गेले काही महिने पुढे येणाऱ्या ह्या विलक्षण अनुभवांच्या कल्पनेने थरारून गेल होत. आता ही लाट अत्युच्च बिंदूला स्पर्श करत होती. इथून लाटेचा प्रवास अटळपणे खाली-खाली होणार होता!

यज्ञ सुरळीत पार पडला. सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. मी आणि नंदिनी ‘बहेन-बेटी’ गटात मोडत असल्याने, आम्हाला कोणालाही नमस्कार करायला बंदी होती. उत्तरेकडे मुली लक्ष्मीचे रूप मानतात. लग्न होईपर्यंत त्या कोणालाही नमस्कार करत नाहीत. त्या ‘बहु’ गटात गेल्यावर मग मात्र सासरच्या मोठ्यांना नमस्कार करतात.

आज आमच्यातले काही यात्री सगळ्यांना शिरा, भजी, डाळ-भात अस जेवण वाढणार होते. त्यासाठीचा शिधा ते दिल्लीपासून घेऊन आले होते. बऱ्याच दिवसांनी आमच्या सर्वांगसुंदर स्वयंपाक करणाऱ्या नेपाळी स्वैपाक्यापासून सुटका होणार म्हणून सगळे खुशीत होते!

अन्नदाता सुखी भव!

1-food.jpg

सगळ्यांनी आपल सामान आवरून बसवर चढवून टाकल. तलेरा अंकल, डॉ.पिल्ले आणि नारंग सर वेगळ्या गाडीतून पुढे रवाना झाले. सगळ्या कॅम्पभर भाजलेल्या रव्याचा, भज्यांचा खमंग वास सुटला होता. जेवण तयार झाल्यावर सगळ्यांनी अक्षरशः आडवा हात मारला. ज्या यात्रींनी एवढी खटपट केली, त्यांना सगळ्यांनी तृप्त होऊन भरपूर आशीर्वाद दिले.

लगेचच बस निघाल्या. रस्त्यात एका जागी चार दिशांना कैलास पर्वत, मानस सरोवर, राक्षस ताल आणि गुर्लामांधाता पर्वत दिसतो. पण त्या दिवशी ढग असल्याने कैलास दर्शन झाले नाही. इथे सगळ्यांनी भरपूर फोटो काढले. जड मनाने त्या गूढ, पवित्र सौंदर्याचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो.

तिसऱ्या बॅचची स्त्री-शक्ती

1-ladies group.jpg

दोन्ही परिक्रमा, यज्ञ सगळ नीट पार पडल्याने सगळे खुशीत होते. बसमध्ये गाण्याबजावण्याला उत आला. अंताक्षरी खेळताना सगळ्यांनी आपले घसे साफ केले. मजा चालू होती. आमच्या बसचा चीनी चालक आमचे सुरेल आवाज ऐकून त्या रात्री नक्की दचकून उठला असणार!

1-bus2.jpg1-bus1.jpg

अचानक बाहेर सुरेख इंद्रधनुष्य दिसल! ह्या परीक्रमांचा अनुभव तर सुंदरच होता, शेवटही असा सुंदर झाल्याने आम्ही सगळे थरारून गेलेल्या मनस्थितीत तकलाकोटला पोचलो.

1-indr dhanushya.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!!!

<ह्या स्टोऱ्या सांगणारे लोक ‘हमने अमरनाथमें पाच फडावाले, नागमणीवाले नागराजके एकदम बढिया दर्शन किये थे|’ असही सांगत होते>

अमरनाथचं हे तळं एका धबधब्यामुळं तयार होतं. जरा लांबवरून खरोखरीच त्यात एखादा मोठा साप आहे, असं वाटतं. रात्री म्हणे त्याच्या मस्तकावरचे नागमणी चमकतात..रात्री अधूनमधून एकदम असा उजेड पडतोही. पण ते आपल्या सैनिकांनी उंचच उंच पर्वतांवरून मारलेल्या टॉर्चचे झोत असतात. Proud

अनया, हे वर्णन वाचताना सुद्धा अंगावर रोमांच ऊठले. तुम्हा लोकांनी तर हे प्रत्यक्ष अनुभवले! आणि नुसते अनुभवले नाही तर तेवढ्याच समर्थपणे ते आमच्यासमोर ऊभे केले , धन्य तुमची!!!!!!!!!!

छान झालाय हाही भाग. ती देवांची अंघोळ प्रकरण म्हणजे नॉर्दन लाइट सारखं काही असेल का?
इथले संशोधक त्या प्रकाशावर उजेड पाडतील का?

छान झालाय हा भाग... देवांची अंघोळ.... खरच अद्भुत आहे.... सगळा परिसर स्वर्गीय आहे....

भाग्यवान आहात....

सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार! देवांच्या अंघोळीचा तो प्रकार खरच कोड्यात टाकणारा होता. कोणी त्या ‘उजेडावर उजेड’ पाडला, तर बर होईल!

चिनुक्स : मस्त!

अनया,बाकीच्या भागांसारखे हे वर्णनही उत्तम्.सगळेच फोटो सुंदर्.मानससरोवरतून तुला कैलास पर्वताचे दर्शन झाले,खरोखरच तू भाग्यवान आहेस.तो फोटो पण खासच.

तुमची लेखनशैली - केवळ!!!!!!!!
त्या शांत, पवित्र वातावरणात फिरताना ना थंडीची जाणीव झाली, ना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची ना जवळजवळ १६ हजार फूट उंचीवर असूनही सूर्याच्या दाहाची. सर्व वातावरण अगदी निर्मळ, स्वच्छ, पवित्र वाटत होते. आसमंतात देवत्व पसरल्यासारखे वाटत होते.>>>>>>>> हा अनुभव तुमचा लेख वाचतानाही मिळतो हे एक आश्चर्यच म्हणायचे की.......
मनापासून धन्यवाद, शिर सा. दंडवत...

रोमांच, काटा काय काय म्हणुन नाही आले. अप्रतिम. नुसते फोटो आहुन ईतके भारावले, तुम्ही लोक तर प्रत्यक्ष आह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा.
देवांची आंघोळ पण मस्त.
___________/\____________

>>>>देवांच्या अंघोळीचा तो प्रकार खरच कोड्यात टाकणारा होता. कोणी त्या ‘उजेडावर उजेड’ पाडला, तर बर होई>>>><<

अनयाजी,
ह्याबद्दल मी तुनळी वाचलेले बरेच आधी. एका ग्रूपला पण असेच दिवे दिसले होते. शोधते आणी देते तुनळीची लिंक.

आभार! आभार! अजून तीन-चार भाग वाचण्यासाठी तयार राहा. सगळे परतीच वर्णन वाचायला कंटाळतील की काय? अशी भीती वाटते आहे.

दिनेशदा, फोटो द्यायला काही हरकत नाही, पण अजूनही पिकासा लिंक द्यायला जमत नाहीये. त्याव्यतिरिक्त काही मार्ग आहे का?

अनयाताई,

अप्रतिम वर्णन आहे. यात्रा हुबेहूब डोळ्यासमोर उभी राहतेय. देवस्नानाचा अनुभव अद्भुतच आहे. आणि हो, देव हे वायुरूपी (=इलेक्ट्रोमॅग्नेटिक) मानले आहेत. त्यामुळे काही लोकांना वाटलं तसा तो विद्युच्चुंबकीय ऊर्जेचा परिणाम असावा.

आ.न.,
-गा.पै.

Pages