जिथे खूप करता येते रोम / ते दोन दिवसांकरता होम (भाग १)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

सप्टेंबरमध्ये रम्य सोरेंटोत आठवडाभराची 'मीटींग' करुन (आणि अर्थातच भरपूर कॉफी पिऊन, लिमोनचेल्लो आस्वादून, रिकोटा-पेर केक सारखा खास स्थानिक पदार्थ रिचवून) परतीच्या वाकड्या मार्गावर असलेल्या रोममध्ये शनिवारी मध्यरात्री पोहोचलो. टर्मिनीसारखे प्रगल्भ, कल्पक पण तितकेच उपयोगी नाव असलेल्या स्थानकावर नेपल्सहून निघालेली माझी आगगाडी (अर्थात इलेक्ट्रिक) पोहोचणार याची कल्पना असल्याने, जवळचेच एक साधे हॉटेल निवडले होते. तसेही बहुतांश वेळ बाहेरच घालवायचा असतो. नेहमीच्या साहसी (अशा बाबतीत तरी) स्वभावाप्रमाणे स्मरलेल्या नकाशाप्रमाणे स्वारी १५ दिवसांची बॅग ओढत निघाली. शहर लख्ख जागे होते. नवे शहर, नवे नियम प्रमाणे मला हवा असलेला पत्ता सापडेना. मग जवळच्या एका महागड्या हॉटेलात शिरलो. तिथल्या इसमाने माझ्या हॉटेलवाल्याला फोन लावला, तो तिथे आला आणि १० मिनिटात मी माझ्या खोलीत नकाशे पसरुन दुसऱ्या दिवसाची तयारी सुरु केली होती. कितीही पूर्वतयारी केली (असे वाटले) तरी बेरात्री नकाशे बाहेर येतातच. आपल्या कल्पनेतील नवे गाव व खोलीपर्यंत पोचता-पोचता मिळालेली झलक नव्या खुणा देऊन जाते. त्यांचा पाठलाग अनिवार्य असतो.

दुसऱ्या दिवशी फोरमला जायचे असे निश्चित करुन त्या भागाचा थोडा अभ्यास करुन झाला. मेट्रोचे जाळे चांगले असले तरी प्रेक्षणीय स्थळांची घनताही बरीच असल्याने दिवसभर पायी भटकायचे आणि शेवटी गाडी पकडायची असे ठरविले. सकाळी रमत-गमत (म्हणजे फोटो काढत) फोरमकडे कूच केले.

रोमचा इतिहास सुरस आहे. रोम्युलसने या शहराची स्थापना ३००० वर्षांपूर्वी केली (ठिकाय, २७००, पण इतक्या पुरातन गोष्टीत शे-दोनशेनी काय फरक पडायचा?). त्याचे आणि रेमसचे जन्मदाते म्हणे मंगळ (मार्स भगवान) आणि व्हेस्टल राजकुमारी र्हिया. एका कोल्हिणीने यांना वाढवले. नंतर रोम्युलसने रेमसला मारुन स्वत:चा राज्याभिषेक केला. कोल्हीणीबरोबर या दोघांच्या छोट्या-मोठ्या प्रतिकृती सर्वत्र उपलब्ध असतात. ही आहे फोरमजवळील.

जवळच १०० फूट उंचीचा (खरे तर तो ३० मी. उंच आहे, पण १०० कसे मेट्रीक वाटते) त्रजनचा स्तंभ आहे (Colonna Traiana). दुसर्‍या शतकातील डेचियन (Dacian) युद्धांमधे विजयी झालेल्या रोमन सम्राट त्रजनच्या विजयगाथा या स्तंभावरील सर्पिलाकृती कोरीवकामाने अमर केल्या आहेत.

आसपास आणखीही अनेक स्तंभ आहेत. काही कारागिरी असलेले, तर काही नुसतेच अवशेष. भव्यता बहुदा रोमनांची कमजोरी होती.

आधीच्या भव्यतेत भूमिती होती.

तसे त्यांचे वंशज नसलेले आजचे इटालियनपण त्यांची री ओढू पाहतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला (१८८५-१९११) बनलेले व्हिक्टर इम्यॅनुअल स्मारक बोजड आहे.

पण त्यावर चढा मात्र जरुर, (लिफ्ट आहे). वरुन फोरमची झलक दिसते,

दूरवर कोलेसियम दिसते,

आणि जिकडे-तिकडे अगणित घुमट (गिरिजाघरांचे).

(क्रमश:)

भाग २
भाग ३
-----------
(मुशोकरता वरदा व आणखी एका अज्ञात (तुम्हाला) सदस्याला धन्यवाद).

वरदा: मदत करा, चुका दाखवा - शिकायची तयारी नेहमीच असते
मनीष, जरुर. वर्णन टाकता आले तर तेही कर.
नंदिनी, कल्पना नाही
शैलजा, प्रयत्न तोच असेल (२०१२ चा निश्चय म्हणु का? :-)) पहिल्या भागाला तीन महिने लागले ...
चिमुरी, धन्यवाद.