आणि म्हणे ... आपल्याला माणसं कळतात..!

Submitted by मिलन टोपकर on 1 January, 2012 - 10:09

आपल्याला भेटलेल्या, भेटत असलेल्या अनेक व्यक्तींबद्दल आपली काही मते तयार होतात. ही मते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, बोलण्यावरून आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या वागणुकीवरून तयार होतात.
मग त्यांना आपण मित्र, शत्रू किंवा चांगला, बरा, वाईट माणूस म्हणून आपल्या मनाच्या ज्या त्या कप्प्यात बंदिस्त करून टाकतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीशी आपल्या प्रतिसादाच्या, वागण्याच्या पद्धती ठरवून टाकतो.
पण आयुष्य इतके, सरळ, सहज सोपे कुठे असते? कारण अचानक ... आपल्या मतांना, कल्पनांना छेद देऊन ती व्यक्ती अशी काही वागते की आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊन जातो.
हे अचंबित, आश्चर्यचकित होणे कधी आनंददायी तर कधी दु:खदायकही असू शकते.
पण दोन्ही अर्थांनी आपल्या कल्पनांना, मतांना हादरा बसलेला असतो, हे मात्र नक्की.
आणि आपल्याला पटते की आपले त्या व्यक्तीबद्दलचे अंदाज, अडाखे चुकीचे होते.
आपल्या मनाचा तळ ढवळून काढणारा, आपली त्या व्यक्तीबद्दल किंवा आयुष्यातल्या मूल्यांबद्दलची मते बदलायला लावणारा किंवा बदलणारा असा तो मर्मस्पर्शी प्रसंग असतो.
आपल्याला जाणवते की, "... आपल्याला माणसं कळतात" ही आपली समजूत चुकीची होती किंवा निदान फारशी बरोबर नव्ह्ती.आपल्या प्रत्येकाला असा अनुभव आलेला असेलच. किंबहुना असे अनुभव रोजच्या रोज आपल्याला येतच असतात.
मला आलेला हा असाच एक अनुभव.
.........
मी सन १९८२ मध्ये कोल्हापूरला एक ज्युनिअर वकील म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यावेळी मी फक्त कामगार न्यायालय आणि नंतर औद्योगिक न्यायालयात काम करायचो. त्या सुमारास एका केसमुळे माझी कुमार नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याच्या भावाचे काम माझे वरिष्ठ वकील श्री. पाटील ह्यांच्याकडे होते.
पुढे सन १९८५ मध्ये मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आणि साधारणपणे जानेवारी १९८६ च्या सुमारास हा कुमार माझ्याकडे सोनटक्के नावाच्या माणसाची केस घेऊन आला. हे सोनटक्के त्याचे मित्र.
सोनटक्के ४७-४८ वर्ष वयाचे होते आणि एका महामंडळात नोकरीला होते. महामंडळाने त्यांना केवळ सात-आठ महिन्यांच्या विनापरवानगी गैरहजेरी करता, कोणतीही संधी न देता, चौकशी न करता नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ केले होते आणि ते ही जवळ जवळ २४-२५ वर्षांच्या त्यांच्या निष्कलंक सेवेचा विचार न करता.
प्रथमदर्शनीच सोनटक्के मला मवाळ, गरीब, पापभीरू, सोशिक वाटले. आमच्या चर्चेच्या वेळी, त्यांचीच केस असून देखील, खूप शांत होते आणि माझ्या ऑफिस मध्ये खाली मान घालून बसले होते. त्यांची माहिती मला कुमारच देत होता. कदाचित बडतर्फीचा धक्का सोनटक्के ह्यांना जास्त वर्मी लागला असावा असे मला वाटले, आणि तसे असेल तर ते साहजिकच होते.
केसची माहिती घेता घेता मला त्यांची वैयक्तिक माहिती देखील कळत गेली. त्यांची पत्नी नोकरी करत नव्हती आणि त्यांना दोन मुले होती, जी शिकत होती.
कुमार म्हणाला, "सोनटक्केला ह्या सगळ्याचा खूप मानसिक धक्का बसला आहे. त्याला कमी केल्याचे फक्त त्याच्या पत्नीला माहीत आहे. मुलांना ते अजून कळू दिलेले नाही. शेजारी-पाजारी तर त्या बद्दल अनभिज्ञच आहेत. त्याला ह्यातून बाहेर काढणे एक मित्र म्हणून माझे कर्तव्य आहे. तसेही मी आणि इतर दोनचार मित्र सोनटक्केच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही ह्याची केस घ्या. तुमची जी काही फी असेल ती आम्ही देऊ. पण त्याला न्याय मिळवून द्या आणि तो ही,शक्य तितक्या लवकरात लवकर".
ह्या सगळ्या चर्चेत सोनटक्केंचे गप्प-गप्प असणे, शांत बसणे,मला थोडेसे विचित्र वाटत होते. पण मग, संधी मिळाल्यावर बोलू असा विचार करून मी, कागदपत्रे ठेवून घेऊन त्यांना दोन दिवसांनी यायला सांगितले.
दोन दिवसांनी सोनटक्के आले. एकटेच. मी कागदपत्रे त्यांच्या सहीसाठी तयार ठेवली होती. त्यांनी सही केली. मला किती पैसे द्यायचे ते विचारले.
मी म्हटले, "पैसे तुम्ही देणार आहात का?"
सोनटक्के म्हणाले, "नाही कुमारच देईल, पण किती द्यायचे?".
"तुम्ही नका काळजी करू. पैशाचे कुमार आणि मी बघून घेऊ. तुम्ही आता पुढच्या आठवड्यात या. जमले तर कोर्टाची नोटीस आपणच संस्थेला लागू करू, म्हणजे वेळ वाचेल", मी समजावणीच्या सुरात म्हटले.
सोनटक्केंनी मान डोलवली.
दोन चार दिवसांनी कुमार आला. केसचे काय झाले आणि फी किती द्यायची हे विचारायला.
"सोनटक्के जरा जास्तच हताश वाटतात. म्हणजे त्यांच्याकडे अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्दही दिसत नाही. तुम्ही मित्रांनीच त्यांना घोड्यावर बसवल्यासारखे वाटतंय". मी न राहून माझ्या मनात आलेले विचार त्याला बोलून दाखवले.
"तसे नाही. पण सोनटक्के खूप संवेदनशील आणि सोशिक आहे. त्याची बायको, म्हणजे आमची वहिनी देखील तशीच. तुम्हाला विश्वास नाही बसणार, बडतर्फ केल्यापासून मुलांना काय, पै पाहुण्यात, शेजारीपाजारी कुणालाच कळू नये म्हणून आजही वहिनी त्याला सकाळी डबा करून देतात आणि हा ऑफिसच्या वेळेला घरातून निघतो. लांब कुठल्यातरी बागेत जातो आणि दिवसभर वेळ काढतो. भूक लागलीच तर डबा खातो आणि ऑफिस सुटायच्या वेळेला घरी परत येतो", कुमार म्हणाला.
मला ह्या प्रकाराचे नाही म्हटरा, तरी आश्र्चर्यच वाटले. काहीसे वाईटही वाटले.
"सोनटक्केची आर्थिक परिस्थिती देखील फारशी चांगली नाही. आधी त्याचे वडील गेले. तो धक्का त्याच्या आईला सोसला नाहरा,त्यांनी हाय खाल्ली. गेले रा,त्यांनीत्या खूपच आजारी होती. त्यांच्या औषध-उपचारात त्याने अपार पैसा खर्च केला पण उपयोग नाही झाला. सोनटक्केला बडतर्फ करायच्या फक्त ८ दिवस आधी त्याची आई गेली. त्यांचे दिवसही पूर्ण झाले नव्हते तेव्हा ही बडतर्फीची नोटीस सोनटक्केला घरीच मिळाली". कुमार सांगत होता.
"पण मग त्यांनी ऑफिसला का कळवले नव्हते? रीतसर रजा का घेतली नव्हती? अरे, ऑफिसचे नियम पाळून देखील सोनटक्केंना आईची सेवा नसती का करता आली?", मी म्हणालो.
"बरोबर आहे. पण आता त्याला असले काही समजवायला गेलो तर काही न बोलता नुसता घुम्यासारखा बसतो". कुमार सांगत होता.
"आज त्याच्याकडे साठवलेले पैसे नाहीतच पण डोक्यावर जवळजवळ रु. ५०,००० चे कर्ज आहे. आणि नोकरी गेलेली. तसेही आम्ही मित्रही काही श्रीमंत नाही. पण सोनटक्के आणि त्याचा कुटुंबाकडे पाहवत नाही म्हणून आम्ही चार-सहा मित्रांनी आळीपाळीने दरमहा २०० रुपये काढून त्याला द्यायचे ठरवले आहे. शक्य तेवढी मदत करायची म्हणून ..". कुमार म्हणाला.
मला नाही म्हटले तरी हे सगळे ऐकून सोनटक्केंबद्दल कणव दाटून आली आणि तरीही कुमार सारखे काही मित्र त्याला लाभलेत ह्याचा आनंदही झाला.
माझ्यापरीने मी देखील सोनटक्केंना मदत करायचे ठरवले.
"कुमार, ह्या केसची मला काहीही फी देऊ नकोस. फक्त खर्च झालेले १५०-२०० रुपये दे. तुम्ही सगळे सोनटक्केंकरता एवढे करताय त्याला माझाही हातभार लागू दे". मी कुमारला मनापासून बोललो. कुमारला देखील बरे वाटलेले दिसले.
पुढे सोनटक्के तारखेला येत गेले. सकाळी वेळेवरच यायचे, ऑफिस मध्ये शांत बसायचे. 'कोर्टात चला', म्हटले की निघायचे. कोर्टात देखील एका जागी बसून रहायचे.
त्यावेळी कामगार न्यायालयातल्या केसीस चालून संपायला ४-५ वर्षे लागायचीच.
पण सोनटक्केंची अवस्था आणि कुमारचा तगादा ह्यामुळे मी शक्य तेवढ्या जवळच्या तारखा घेऊन केस संपवत आणली.
कायदेशीरदृष्ट्या तशी खूप सोपी केस होती. त्यामुळे वेळ न काढता, अगदी साक्षी पुराव्याची देखील गरज न भासावी आशा तऱ्हेने आणि केवळ कागदपत्रे आणि वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे ह्यावरच मी ती चालवली आणि दीड-दोन वर्षातच संपवली.
कामगार न्यायालयाचा निकाल लागला. सोनटक्केंना महामंडळाने त्वरित कामावर घ्यावे, नोकरीमध्ये सलगता द्यावी आणि मधल्या काळातला सर्व पगार द्यावा असा भरघोस निकाल लागला.
निकालाच्या दिवशी सोनटक्के कोर्टात होते. न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर सोनटक्केंनी माझे हात हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेले मला स्पष्ट दिसले. मला देखील आपल्या हातून खूप काहीतरी चांगले घडल्याची जाणीव झाली. कर्तव्यपूर्ती आणि मानसिक आनंद अशी संमिश्र भावना माझ्या मनात आली. मी सोनटक्केंना पेढे मागितले आणि तीन-चार दिवसांनी येऊन निकालाची प्रत घेऊन जायला सांगितले.
संध्याकाळी ऑफिसमध्ये कुमार आला. त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला. त्याने पुन्हा "फी किती देऊ" अशी पृच्छा केली.
मी तृप्त होतो. मी त्याला मनापासून "ह्या केसची फी घेणार नाही", असे म्हटल्याची आठवण करून दिली..
"तुमचे ऋण कधीच फिटणार नाही. सोनटक्केच काय, आम्ही मित्र देखील ते विसरणार नाही", असे म्हणून कुमार गेला.
त्या नंतर जवळजवळ १०-१२ दिवस गेले. मी कोर्टात निकालाच्या सहीशिक्क्याची नक्कल मागणीचा अर्ज द्यायला गेलो.
आणि सोनटक्के स्वतःच निकालाची प्रत ४-५ दिवसांपूर्वीच घेऊन गेल्याचे रजिस्ट्रारने सांगितल्यावर, पूर्णपणे चक्रावलोच. मला धक्का बसला.
मला अंधारात ठेवून, काहीही न कळवता सोनटक्केनी असे काही केल्याचा संतापही आला. मी कुमारला निरोप पाठवला पण नंतर १५-२० दिवस तो ही नाही आला.
माझा सहकारी वकील चिडवण्याच्या सुरात, "तुम्हाला असेच लोक फसवतात" असे बोलू लागला.
माझा विश्वासच बसत नव्हता. कुणी माझा असा "मामा" करावा ह्याचे मला आश्चर्य वाटले आणि स्वत:चाच रागही आला.
डोळ्यासमोर सोनटक्के यायचे आणि त्यांचे ते शांत बसणे, उदास असणे ह्यावर मनात प्रश्नचिन्ह उभे रहायचे.
ते सगळे त्यांचे ढोंग होते का? असे वाटू लागायचे.
मनात आले की आता कुमार तरी कसा येईल? सोनटक्केंचे वागणे त्यालाही समजले असेल आणि ते न आवडल्याने, आपण आता वकिलांना तोंड कसे दाखवायचे असे त्याला वाटत असावे.
एकूण मला खूप मनस्ताप झाला होता हे नक्की....
(अपूर्ण)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाऊद्याहो. एकदा माणुसकी दाखवायची ठरवली की समोर गाढव असला तरी पाणी पाजायचं. आणि त्याने उठून लाथा घातल्या की विठ्ठलाने आशिर्वाद दिला म्हणून धन्य धन्य चेहर्‍याने रिकामी घागर घेऊन घरी जायचे.

आपण दाखवलेली माणूसकी खरोखर कौतुकास्पद आहे. कारण अश्या व्यवसायात अशी माणूसकी फार क्वचितच पहायला मिळते. पण कदाचित हे सगळं लिहून पुर्ण झाल्यावर आणि ते वाचल्यावर निसंशःय मनानं माणूसकी दाखवण्याच्या प्रयत्नालाही कुठेतरी नवं वळंण मिळेल. अर्थात ते विरुद्धही असेल. असोत.. हे फक्त पहिल्या भागावरून मत मांडलंय. कदाचित या पुढिल भागात संपुर्ण चित्रही वेगळं असू शकेल.

कदाचित, हबानं लिहिल्याप्रमाणं विठ्ठलाचा आशिर्वाद किंवा खरोखरचं विठ्ठ्लही भेटतील.