ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल

Submitted by नरेंद्र गोळे on 22 December, 2011 - 05:07

किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्‍या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्‍यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते.

१. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन
२. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन
३. गतीशील उपकरणाद्वारे किरणोत्साराचे मापन
४. शीतलक आणि द्रव व घन अपशिष्ट पदार्थांतील किरणोत्साराचे मापन
५. वातावरणात प्रसृत होणार्‍या किरणोत्साराचे मापन

निरनिराळ्या किरणोत्सारांच्या मापनांसाठी निरनिराळी उपकरणे वापरली जातात. किरणोत्साराच्या उपस्थितीचा शोध लावण्यासाठी मूलक-कक्ष आणि प्रमाणशीर (आनुपाती) गणक वापरतात. व्यक्तीगत मात्रामापनासाठी चित्रफित, औष्णिक-प्रतिदीप्ती (थर्मोल्युमिनिसेंट) आणि किरणोत्सारी-प्रकाश-औष्णिक- प्रतिदीप्ती (रेडिओ-फोटो-थर्मोल्युमिनिसेंट) पदार्थांचा वापर करतात. किरणोत्साराचे क्षेत्रीय मापन आणि अन्य देखभाल करण्यासाठी गायगर-मुल्लर तसेच प्रस्फुरण प्रदर्शकांचा वापर करतात.

अणुभट्टीच्या आसपास अथवा किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस आपल्याजवळ मात्रामापक (डोसीमीटर) बाळगणे आवश्यक असते. मात्रामापकाद्वारा ह्या गोष्टीचा पत्ता लागतो की त्या व्यक्तीने, विशिष्ट काळात (एक वर्ष, एक महिना, दोन सप्ताह अथवा त्याहूनही कमी) किती मात्रा प्राप्त केलेली आहे. देखभालीत पूर्वी दोन प्रकारच्या मापकांचा उपयोग होत असे.

१. चित्रफीत (फोटोग्राफीक फिल्म) अथवा फितबक्कल (फिल्म बॅज)
२. खिशात ठेवण्याचा छोटा मूलककक्ष.

फितबक्कल काही काळ वापरल्यावर ती फित विकसित करून तिच्यातील काळेपणाच्या घनत्वाच्या आधारावर त्या काळात तिने प्राप्त केलेल्या अवशोषित किरणोत्सार मात्रेचे अंकन केले जाते. खिशातील मूलककक्षात, कोणत्याही वेळी डोळ्यांनी पाहून, प्राप्त मात्रा समजून घेता येते. बहुधा खिशातील मूलककक्ष उच्च किरणोत्सार क्षेत्रात काम करत असता वापरला जातो, कारण कमी वेळात जास्त मात्रा मिळाल्यास ते लगेच कळते आणि ती व्यक्ती सतर्क होते व आपली मात्रा निर्धारित मात्रेच्या मर्यादेत राखू शकते. वर्तमानात, फितबक्कल मात्रामापकाऐवजी औष्णिक-प्रतिदीप्ती मात्रामापकाचा (थर्मो-ल्युमिनिसेंट डोसीमीटर) वापर होत आहे. याव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये किरणोत्सारी-प्रकाश-प्रतिदीप्ती (रेडिओ-फोटो-थर्मोल्युमिनिसेंट) मात्रामापकाचाही वापर होत आहे.

प्रारण संरक्षणाबाबतची मानके निर्धारित करणार्‍या संस्था

प्रारण-सुरक्षा-उपस्कर

नरेंद्र गोळे, narendra.v.gole@gmail.com
http://urjasval.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users