पुन्हा एकदा लोकपाल...

Submitted by योग on 22 December, 2011 - 03:52

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9796864.cms

लोकपाल व एकंदरीत अण्णांच्या आंदोलनाबद्दल लिहीलेला हा वरील लेख चार महिने जुना झाला खरा पण येत्या ३ दिवसात होवू घातलेल्या घटनांच्या अनुशंगाने पुनः एकदा या लेखातील लिहीलेले मूळ मुद्दे आजही लागू आहेत का याबद्दल शंका आहे.

लोकपाल म्हणजे जादूची कांडी नसेल हे निश्चीत, किमान छडी तरी असावी अशी अपेक्षा आहे. पण छडी ज्याच्या हातात द्यायची तो लायक मास्तर सापडेल का? आरक्षणाच्या राजकारणामूळे छडीपेक्षा मास्तराच्या निवडणूकीचे महत्व जास्त वाढत आहे. एकीकडे ते तर दुसरीकडे नेमके लोकपाल म्हणजे सर्व अधिकार, स्वायत्तता, शक्तीशाली असा कोतवाल बनवला तर तो आपल्याच मुळावर ऊठेल का ही देखिल भिती आहे. घाशीराम कोतवाल ला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली हा एक विचीत्र योगायोगच म्हणायला हवा! (http://www.maayboli.com/node/31277)

मूळ मुद्दा एव्हडाच आहे की विश्वासार्हता संपली की बाप व मुलगा देखिल एकमेकास शत्रू वाटू लागतात. मुळात मनुष्याचे वर्तन नैतीक व जबाबदारीचे असेल तर कुणाच्याही डोक्यावर कुठलाही अधिकचा बाप, मास्तर वा साहेब बसवावा लागत नाही, आणि तसे केले तरी त्याही लोकांच्या डोक्यावर अजून एक साहेब बसवावाच लागतो. हे चक्र नक्की कुठल्या पायरीवर व कुणाच्या पायाशी येवून थांबते? तुमच्या आमच्या, राष्ट्र प्रमुखाच्या, संसदेच्या, का कुठल्या अज्ञात अदृष्य शक्तीच्या?- शेवटी मेल्यावर "वरती" सर्व जाब द्यावेच लागतात यातील "वरती" हेही सांकेतीक अर्थाने आहे का व्यावहारीक?

थोडक्यात लोकपाल आवश्यक असले तरी ज्या प्रकारे त्याचे बारसे होवू घातले आहे त्यावरून आपण मूळ रोगावर ऊपाय करणार आहोत का लक्षणांवर याबाबत अजून तरी अनिश्चीतता आहे. कदाचित शॉर्ट टर्म म्हणजे जसे पेशंट ला आयसियू मध्ये दखल केल्यावर, थोडक्यात पेशंट ला जगवायचा, तर आवश्यक त्या सर्व शस्त्रक्रीया व जहाल औषधे दिली जातात तसेच या घडीला लोकपाल हे कोतवाली स्वरूपाचे औषध वा शस्त्रक्रीया योग्य असले तरी एकदा पेशंट वाचला की मग जसे लाँग टर्म रिकव्हरी व सुधारणा, पथ्य पाणी यावर भर दिला जातो तसेच भविष्यातही लोकपाल च्या धाकाखाली मूळ विचारधारणा व क्रीयाशीलता यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पावले ऊचलणे अधिक आवश्यक ठरेल.

आजच्या घडीला लोकपाल औषध थोडे जास्त कडू व शक्तीशाली (एक्स्ट्रॉ स्ट्रॉंग) स्वरूपात असेल तर स्विकारायला हरकत नाही कारण ज्या भ्रष्टाचाराच्या रोगावर औषध म्हणून लोकपाल आणले जात आहे त्या भ्रष्टाचाराच्या वेताळाने आजही सामान्य माणसाच्या मानगूटीवर १०० नाही १००० प्रश्ण ऊभे केले आहेत. ज्याची ऊत्तरे शोधता शोधता आपसूकच मेंदूची अनेक शकले होत असतात, वेताळ मात्र संपत नाही. विक्रमाचे वंशज चांदोबा बरोबरच गायब झाले. तेव्हा तूर्तास ही शस्त्रक्रीया अधिक लांबवणे पेशंट च्या जीवाला धोक्याचे आहे असे वाटते.

परवा मुलाखतीत भारतातील अतीशय मान्यवर व नावाजलेले निवृत्त सर न्यायाधीश वर्मा यांनी या सर्वावर एका वाक्यात ऊत्तर दिले, (वर्मावर बोट ठेवले): self regulation is the best regulation. वस्तूस्थिती मात्र अशी आहे की आमच्या सर्वांमध्ये असलेल्या रेग्युलेटर च्या बटणाची कळ मोडली आहे. ज्यांनी तुरुंगात असायला हवे ते बाहेर आहेत व ज्यांना न्याय हवा आहे त्यांना "जेल भरो" चा मार्ग अवलंबावा लागत आहे! विरोधाभास हा आपल्या दैनंदीन आयुष्यात कायम आहे. लोकपाल हा एक आशेचा किरण आहे, त्याच्या ऊदयापर्यंत रात्री पहारा ठेवणे हेच आपले कर्तव्य ठरते.

थोडे हलके: Doesn't matter how many times a married man changes his job, He ends up with the same boss at home! (विवाहीत पुरूषाने कितीही नोकर्‍या बदलल्या (न चा छ केला तरी) तरी घरात डोक्यावर "तोच" बॉस कायम असतो) Happy असे वाक्य अलिकडे वाचनात आले. तेही ज्या हॉटेल मध्ये आम्ही सहकुटुंब जेवायला जातो तिथे टेबलावर हे असले एक दोन वाक्याचे "चुटके" लिहीलेला कागद असतो, खास त्यांच्या हॉटेल च्या ब्रँडींग चा भाग म्हणे. त्या कागदावर तिथला वेटर ऑर्डर आणून ठेवेपर्यंत अशा काही चुटक्यांचे चटके झालेले असतात आणि मी निमूट फुंकर घालून पोट भरतो. तरिही आम्ही एकत्र त्याच हॉटेलात जातो- याला म्हणतात अमर प्रेम!
तेव्हा सर्व विवाहीत पुरूषांना घरच्या लोकपाल ची सवय आहे असे गृहीत धरले तर लोकांनी निवडून दिलेल्या विवाहीत लोकप्रतिनिधींनी लोकपाल चा एव्हडा बाऊ करायची गरज नाही.. हळू हळू सवय होईलच! Happy

गुलमोहर: 

उदय टेक इट लाईतली. भाड म्हजे मोबदला/दलाली.. सभ्य शब्द आहे तो. भाडेकरू शब्द त्यापासून आला आहे. भाडोत्री वगैरे.

राज्यसभेत सरकारी लोकपाल किती गटांगळ्या खाणार कुणास ठाऊक? संसदेत झोडता आलं नाही म्हणून राज्यसभेच्या आखाड्यात वाट पाहतायेत सगळी मंडळी. Proud

अण्णांच्या टिमने जरा आवरतं घेतलं पाहिजे. ट्वीट करून आणि वक्तव्य करून आंदोलनाची दिशा भरकटतेय. वादळ येणार असेल तर हि वादळापुर्वीची शांतता असंच म्हणावं लागेल.

आता टिम आण्णा युपीए घटकपक्षांविरूद्ध प्रचार करणार आहे म्हणे? त्याने काय होणार आहे? परत कुठेतरी एका पक्षाचं पारडं जड होणार आणि लोकपालचा मुळ मुद्दा जैसे थे.

लोकपाल बिलाच्या संदर्भात राष्ट्रपतींकडून निर्णय लगेच होतो पण अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीच्या फाईल्स अजूनही लटकलेल्याच.

लोकांना बदल हवाय.. रिव्हॉल्यूशन हवंय.. याचा अर्थ पक्षबदल नकोय.. थेट सिस्टम मधेच बदल हवायं.

आण्णा लोकपाल मधले काही मुद्दे आत्ता विसंगत किंवा इम्प्लिमेन्टेशनसाठी योग्य वाटत नसले तरीही भ्रष्टाचारावर जरब ठेवण्यासाठी पुरेसे आहेत हे समजतयं म्हणूनच त्या मुद्द्यावर एकमताने सहमती होत नाहीये ना.

देवमाश्यासाठी गळ तळाशी पोहचला होता पण दुर्दैवानं कासवं गळाला लागलं .. असंच म्हणावं लागेल. Sad

भ्रष्टाचाराचं मूळ कशात आहे हा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरं येतील.
---- हे सर्वात महत्वाचे आहे... माणसाची मला अजुन हवे अशी हाव वाढलेली आहे. स्वयंनियंत्रण राहिलेले नाही. कायदे आहेत, पण ते वापरले जात नाही.

उदय कायदे आहेत ना? मग ते वापरलेही जातील. कायद्यातून एखाद्या घडलेल्या गुन्ह्याला आणि संभाव्य गुन्ह्यांना जरब बसवण्यासाठीच्या विशेष तरतुदी, कठोर शिक्षा हव्यात.

भ्रष्टाचाराने गुणवत्ता नाकारली जाते आणि शेवटी महागाईच वाढते हे लोकांना समजुन चुकले आहे. पण यामुळे कोणी व्यक्तिगतपणे लाच देणे अथवा घेणे सोडत नाही. भ्रष्टाचारावर उपाय म्हणजे भ्रष्टाचार करताच येणार नाही अशी व्यवस्था बनवणे. जास्तीतजास्त सरकारी कामांचे computerization करून भ्रष्टाचारास आळ घालता येईल. यात ग्यानबाची मेख अशी कि संसदेत कायदा करणारे खासदार स्वताचेच खायचे मार्ग स्वताच बंद कसे करतील?

माहितीच्या अधिकारामुळे सरकारी व्यवहारांची पारदर्शकता वाढते. सुब्राम्ह्ण्यम स्वामी यांनी याच अधिकाराचा उपयोग करून २G भ्रष्टाचार उघडकीस आणला. आता महाविद्यालयीन शिक्षणामध्ये law हा विषय समाविष्ट करण्याची गरज आहे. त्यामध्ये नागरिकांचे हक्क व जवाबदार्या, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे इत्यादी गोष्टीचा समावेश करावा. शाळेतला नागरिकशास्त्र हा विषय २५ मार्काचा optional होऊन बसला आहे.

आता महाविद्यालयीन शिक्षणामध्ये law हा विषय समाविष्ट करण्याची गरज आहे. त्यामध्ये नागरिकांचे हक्क व जवाबदार्या, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे इत्यादी गोष्टीचा समावेश करावा>>>>

आपल्या भावना समजू शकतो.पण प्रत्येक गोष्ट अभ्यासक्रमात समाविष्ट करणे शक्य नसते. भावनिक प्रतिक्रिया म्हणून आपण म्हणत असतो. उदा. वाहतुकीचे नियम अभ्यास्क्रमात ठेवा. मूल्यशिक्षण ठेवा. काहीतर धार्मिक शिक्षणही ! मग तर जीवनाला स्पर्श करणार्‍या प्रत्येक विषयाला अभ्यासक्रमात कसे स्थान देता येईल.?
त्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करताना अशी असते की एसएससीच्या पातळीपर्यन्त जगात वावरण्यासाठी पुरेसे सामन्य ज्ञान येईल तसेच इच्छित विषयातत्याला स्वयं अध्ययन करता येईल या पातळीपर्यन्त त्याला पोचवले जाते.प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे मर्यादित असतात. थ्री 'आर' म्हणजे रीडिंग , रायटिंग आणि अ'रि'थमॅटिक . हल्ली त्यात परिसराचे ज्ञान वगैरे आले आहे.

आपण म्हणता तसे नागरिकशास्त्राचे जुजबी ज्ञान (२५ मार्क ऑप्शनल) वगैरे उचितच आहे. पण बघा किती लोकांनी उत्सुकतेपोटी राज्यघटना वाचली नन्तर? सुशिक्षीत समाजापैकी (कायदा शाखेचे सोडून) ९५ टक्के लोकांनी राज्यघटना वाचलेली नसते.(आमाला गरजच काय)वाहन बाळगणार्‍या निदान ६० टक्के लोकानी वाहतुकीचे नियम वाचलेले नसावेत्.मग आता हे सगळे अभ्यासक्रमात घालायचे का?

मूळ शिक्षण मासा देत नाही गळ देते. (द्यावे...)
या सन्दर्भात मंगला गोडबोले यानी एका लेखात त्यांचे व्यवसायाचे अनुभव सांगताना त्यांच्या एका सिनियर सहकार्‍यांनी जो सल्ल दिला होता तो उच्चाशिक्षीत लोकाना जो सल्ला दिलाआहे तो महान आहे. मूळ संदर्भ लगेच हाताशी नसल्याने टाकता येत नाही.

मी महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल बोलतोय. वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क मिळतो. त्याच्या १-२ वर्ष आधी नागरिकाचे हक्क व जवाबदार्याचे ज्ञान मिळणे महत्वाचे आहे. RTI आणि IPC याचे महत्व या वयात कळू शकेल.
शाळेतल्या वयात नागरिकशास्त्राचे महत्व फक्त पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय इतकेच राहिले आहे.
मंगला गोडबोलेचा संदर्भ जमल्यास टाका.

हो ना. तुम्हाला लिहावाचायला शिकवले आणि संदर्भ शोधण्याची दृष्टी दिली की जीवनोपयोगी गोष्टींची माहिती तुम्ही उत्सुकतेने स्वतःच शोधली पाहिजे.

ससुनचे एक अधिकारी भेतले होते, त्याम्च्या मते लोक्पाल आला कि महराष्ट्रातला भ्रष्टाचार नक्की मिटणार, कारण सरळ आहे, आत्तचे ६व्या वेतन आयोगामुळे महारष्ट्राची बहुतांशी रक्कम पगार आणि पेंशनवर,आणि प्रशासकिय maintainnance वर(जसे की सरकारी इमारती,निवासस्थाने,गाड्या इत्यादी इत्यादी) खर्च होते.विकासकामांवर जे काही उरले सुरले खर्च होतात ते लोकपाल यंत्रणेचा पगार देण्यात जातील्.नवीन विकासकामेच नाहीत तर त्यात होणारा भ्रष्टाचारच नाही.विनोदाचा भाग सोडला तर एकीकडे नोकरशाही कमी करुन प्रशासकीय efficicency वाढवण्यावर भर द्यायचा सोडुन नवीन नोकरशाही निर्माण करुन आपण आपले आर्थिक कंबरडे मोडुन घेतोय, कुणा एका हट्टी team anna साठी.
आपल्यासाठी स्वस्त दवाखाने,रस्ते,पाण्याच्या टाक्या बांधायचा पैसा केजरीवाल आणि बेदी मंडळींना(मॅगसेसे विजेते ना हे) पगार वाटण्यात खर्च करण्यात कसला आलाय शहाणपणा?

.विनोदाचा भाग सोडला तर एकीकडे नोकरशाही कमी करुन प्रशासकीय efficicency वाढवण्यावर भर द्यायचा सोडुन नवीन नोकरशाही निर्माण करुन आपण आपले आर्थिक कंबरडे मोडुन घेतोय, कुणा एका हट्टी team anna साठी.
----- भ्रष्टाचारामधे गिळंकृत झालेले व्यावहारांचे आकडे (१७६ लाख कोटी, किंवा ५० हजार कोटी) बघितले तर लोकपाल किंवा नोकरांचे पगार खुप लहान वाटतात.

भ्रष्टाचार या आजाराची लक्षणे डोळ्याने दिसत आहे पण त्यावर जालिम असा इलाज सुचत नाही अशी स्थिती आहे. भ्रष्टाचार आटोक्यात आणायला तिव्र इच्छाशक्ती (राजकीय तसेच जनतेच्या पातळीवर) आवश्यक आहे, नुसते कायदे करुन उपयोग नाही असे मला वाटते.

३ जुलै २०१३:

असे काही बाफ वा लेख "आजच्या वस्तूस्थितीच्या" अंगाने पुन्हा वाचल्यावर गमतीशीर गोष्टी समोर येतात, मूळ मुद्दा बाजूला राहिलेला असतो हे वेगळे सांगणे न लगे Happy

१. टीम अण्णा बरखास्त झाली.
२. अण्णा जवळ जवळ अज्ञातवासात आहेत.
३. केजरीवालांनी शेवटी नविन पक्ष काढलाच. सिस्टीम मध्ये बदल घडवून आणायचा तर 'मंचावर' नाही तर सत्तेच्या 'खुर्चीवर'च बसावे लागते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
४. दरम्यान पंतप्रधानांनी २ वेळा कॅबिनेट मध्ये बदल केले.
५. राजा, कलमाडी, कानीमोही, ई. सर्व लोक्स 'बाहेर' आले, संजूबाबा सारखे काही 'आत' गेले.
५. लोकपाल हा शब्द देखिल गायब झाला आहे.

Pages