प्रवास प्रबंधाचा

Submitted by किंकर on 22 December, 2011 - 00:51

संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर :- भाग एक - प्रवास प्रबंधाचा
मायबोलीवर संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर हा धागा,डॉ. मेरी क्युरी यांच्या जन्म दिनी सुरु झाला,आणि काही दिवसातच सुंदर सुंदर माहितीपूर्ण लेख वाचनात येऊ लागले.मग आपणही काहीतरी लिहावे,अशी सुरसुरी आली. पण प्रत्यक्ष लिखाणास सुरवात करताना,प्रबंध पूर्तीचा अनुभव,एकूण प्रवास यावर लिहावे? का विषयावर लिहावे? यात द्विधा मनस्थिती झाली.मग विचार केला लेख थोडा लांबला तरी दोन्ही अनुभव मांडल्यास उदिष्ट पूर्ती इतकाच त्याच्या प्रवासदेखील रोमांचकारी आहे का? हे मागे वळून पाहत ठरवता येईल.त्यावेळच्या अनुभवांचे कथन मनाला त्या काळात नेवून सोडेल. कदाचित तुम्ही थोडे कंटाळून जाल,पण विषयातील ओघ ठेवण्यासाठी हा थोडा दीर्घ प्रवास.
'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' हि म्हण लागू व्हावी अशी परिस्थिती अभ्यासात कधी नव्हतीच.शालेय जीवनात आम्ही 'बरा' या सर्वसाधारण गटात जन्मलो, वाढलो आणि तिथेच संपलो. यातील आम्ही म्हणजे फक्त मी बर का,वाक्याला वजन यावे म्हणून स्वतःला आदरार्थी संबोधले आहे. जुन्या काळातील अकरावीची १९७५ सालातील अखेरची पिढी.आमचे शालेय शिक्षण आणि ऐतिहासिक अकरावी दोन्ही एकदमच संपले.पुढे काय? करियर करणे म्हणजे अनेक पर्याय निवडीला आहेत,आणि कोठे जावे हा यक्ष प्रश्न आहे ? अशी देखील परीस्थीती नव्हती. कला विज्ञान वाणिज्य या तीन शाखात उच्च शिक्षण सुरु होते आणि फारफारतर मेडीकल,इंजीनियारिग बरोबर ते संपते असे आमचे शिक्षणा संदर्भात भ्रम होते.( आमचे म्हणजे वरील आम्ही प्रमाणेच बर का.)

त्या काळात मार्कांची टक्केवारी ९१.५ ते ९८.९ % अशी शंभरी गाठणारी नसायची त्यामुळे पास, सेकंड क्लास, सेकंड क्लास वुईथ ऑनर्स यात बराच मोठा गट सामावून जात असे.त्यामुळे विज्ञान शाखेचे प्रवेश संपले कि वाणिज्य आणि शेवटी कला असा ठरलेला प्रवास घडत असे. त्यातील विज्ञान शाखेत जायची लायकी असून कला शाखेत यावे लागले तर मग जगण्यासाठी कला कि कलेसाठी जगणे? या वादविवाद स्पर्धेत पदवी पर्यंतची चार वर्षे संपून जात असत.विज्ञान आणि आमचे ( आमचे म्हणजे जावूदे आता सारखा सारखा खुलासा करणार नाही बर का ) फारसे सख्य कधीच नव्हते.

गती,गुरुत्वाकर्षण, तरफ याचे प्राथमिक नियम शिकताना जीव घाबरा होत असे. मग आमचे विज्ञानाचे शिक्षक-" मध्ये टेकू बाजूस जोर भार, त्यास म्हणती तरफेचा पहिला प्रकार" असे काव्यात्मक रचनेतून विज्ञान शिकवत तरीही काळ, काम, वेग याच्या अर्थ तेंव्हाही उलगडला नाही आणि आजही कामात वेग नसेल तर काळाच्या बरोबर धावता येत नाही इतकाच त्याचा समजलेला अर्थ आहे.वर्गात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुरु झाला कि, सफरचंद तेंव्हा न्युटनच्या डोक्यात पडण्या ऐवजी आता मास्तरांच्या डोक्यात पडले तर बरे होईल असे आम्हाला वाटत असे. मग काही समजले नाही तरी तरफेच्या पहिल्या प्रकारातील सी-सॉ प्रमाणे सगळे समजले अशी आमची मन इकडून तिकडे हलत असे. थोडक्यात काय तर विज्ञान शाखेचे दरवाजे आम्हाला बंदच होते.

कला शाखेत जावून मी मराठी, मी मुंबईकर, किंवा मी पुणेकर असा नारा देत शिकावे तर,निदान कोणत्या एखाद्या विषयात पारंगत असेही नाही.पुलंनी म्हटल्या प्रमाणे अगदी मराठी व्याकरणाचे बाबत देखील कर्त्याचे मागे कर्म लागते हा नियम देखील संसारात पडल्यावर उलगडला.म्हणून कला शाखा आमची नाही. मग काय मध्यम मार्ग म्हणून वाणिज्य शाखा निवडली. पुढे इमाने इतबारे पदवी शिक्षण घेतले. वुईथ ऑनर्स बर का आणि मग पुण्यात एका सहकारी बँकेत चिकटलो.
मग लक्षात आले कि या सहकार क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर .. साहेबाला,येईल त्या परिस्थितीला,किंवा कामाला चिकटून राहिले तरच तुमचा टिकाव आहे.आम्ही तिसरा- कामाला वाहून घेण्याचा -पर्याय निवडला. ग्रामीण परिसरातून येत पुण्या सारख्या शहरात नोकरी सुरु केली होती. तेथे विविध प्रकारची माणसे भेटत.काही जण आपले सुंदर व्हिजिटिंग कार्ड काढून देत. त्यावरील पदव्यांची रांग बघून पुढे काही शिकावे अशी उर्मी येत असे. मग प्रथम गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अॅन्ड अकौंटन्सी या लांबलचक नावाचा एक छोटा कोर्स केला. आता आम्ही B.Com. G.D.C .& A .होतो.कधी कधी लोकांना वाटायचे कि बहुदा हि पदवी सी.ए.पेक्षा अवघड दिसते.मग आम्ही मनात म्हणायचो कि, इतरांच्या अज्ञानात देखील सुख असते.

पुढे नोकरीतील गरज आणि नावासमोर डिग्री असावी हि सुप्त इच्छा स्वस्थ बसू देईना.मग प्रथम एम.कॉम नंतर डी.बी.एम.पूर्ण केले. काळ जात होता सर्व यथास्थित सुरु होते. पण लग्न व एक लहान मुल घरी असताना पत्नीने जिद्दीने सी.ए. पूर्ण केले. आणि आता मी पुढे काही शिकावे अशी इच्छा व्यक्त केली. आता काय शिकावे हे ठरत नव्हते. उच्च विद्या विभूषित होण्यासाठी कष्ट असतात इतकेच माहित होते.आपल्या शाखेतील शिक्षणातील सर्वोच्च पदवी घेतल्याची स्वप्नेच पडत. पण ती स्वप्नेच होती. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. टी. चंद्रशेखर, डॉ. मनमोहनसिंग डॉ. स्टीफन हॉकिंग या यादीत आपले नाव असावे असे वाटत राही.तुम्ही म्हणाल इतके असंख्य पी. एचडी. पदवीधारक असताना हीच चार नावे का ? तर त्या मागे काही आठवणी, काही कारणे आहेत. मी माझी डिग्री पूर्ण करताना वेगवेगळ्या कारणास्तव या चार नावांचा संबंध कसा आला ते मी थोडक्यात सांगतो.

माझे शालेय शिक्षण पुण्याबाहेर झाले. तेंव्हा सुट्टीत घरी म्हणजे पुण्यास येणे होत असे.आई त्याकाळी निर्मलाताई राजवाडे यांचे हॉस्पिटल होते तेथे नोकरी करत असे.सन १९७२ साली सुट्टीत घरी आलो असताना एकदा आईने कामावरून घरी येताना बटाटेवडे आणले होते,ते खाल्ले खूप आवडले. मग आईस विचारले कि हे बटाटे वडे कशाचे ? एवढेच का आणलेस? तर आई म्हणाली," सुचले वाटते विचारावे म्हणून? "आणि मग सांगितले कि, ताईंचा जावई खूप शिकून परदेशातून आला आहे,त्यांची मोठ्या पदावर निवड झाली म्हणून घरगुती समारंभ होता,त्याचे हे बटाटे वडे आहेत. असे वडे खायचे असतील तर त्यांच्या सारखे शिका आणि मग खायला मागा". तेंव्हा बटाटेवडे थोडेच म्हणून वाईट वाटले, पण जावई कोण आणि कसला समारंभ याचा शोध नंतर लागला. कारण ताईंचा जावई म्हणजे डॉ. जयंत नारळीकर आणि समारंभाचे कारण होते त्यांनी परदेशातील सर्व आकर्षणे सोडून टाटा मुलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याचे.

पुढे नोकरीत आमच्या बँकेने डॉ.टी. चंद्रशेखर यांचा सन्मान करण्याचे ठरवले.त्यावेळी त्याचे रीतसर निमंत्रण डॉ. टी.चंद्रशेखर यांना देण्याचे काम बँकेच्या वतीने माझ्याकडे होते. ते निमंत्रण देताना, त्यांची नम्रता, करारीपणा, सभ्यता या दुर्लभ गुणांचे जवळून दर्शन झाले.तेंव्हा त्यांना त्यांची पी.एचडी. कशात आहे याची विचारणा केली होती. तेंव्हा 'अर्बन इकॉलॉजी'या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवल्याचे समजले.त्यांचे ठाणे आणि नागपूर येथील गाजलेली कारकीर्द यशस्वी होण्यामागे असणारे कष्ट समजावून घेता आले.

डॉ.मनमोहनसिंग यांचा रिझर्व्ह बँक गव्हर्नर, आंतरराष्ट्रीय नाणे निधी सदस्य आणि आता जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान म्हणून ते आपणास लाभले आहेत, याचा मला एक भारतीय म्हणून सार्थ अभिमान आहे आणि राजकीय मते बाजूला ठेवून तो नेहमीच राहील.आणि तेही बँकिंग क्षेत्रातील आहेत याचा देखील आनंद आहे.
डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे समोर नतमस्तक होण्या पलीकडे आपण काय करू शकतो. जगणे आणि शिकणे या बाबत अनंत आमुची ध्येयासक्ती.... असे ब्रीद घेत जगलेला हा अगम्य माणूस पी. एचडी आहे याचा मला अतोनात आदर वाटतो

अर्थात पी.एचडी. असणे हा समान मुद्दा वगळता या चार जणांच्या जवळपास पोहचण्याची पण आमची लायकी नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे बरे.तर या प्रकारे विविध मानसिक आंदोलने मनात ठेवत अखेर पुढे शिकणे म्हणजे पी.एचडी करणे, यावर मनात शिक्कामोर्तब करून सन २००२ मध्ये प्राथमिक चौकशी पुणे विद्यापीठ येथे केली.
मास्टर्स कॉमर्स मधील आणि प्रबंध बँकिंग अॅण्ड फायनान्स मधील त्यामुळे नोंदणी कोणत्या विभागात यावरून कॉमर्स आणि व्यवस्थापन या विभागांची जुंपली. अखेर त्यात अस्मादिकांचे सहा महिने गेल्यावर त्यांनी बँकेचे ना हरकत पत्र आणण्यास सांगितले.
बँकेस मी -"A study of challenges before Urban Co-operative Banks in the light of Liberalization and Globalization of Banking industry" या विषयात पी.एचडी करू इच्छित असून, त्यासाठी परवानगी मागितली.
मग आमच्या विभागाच्या वरिष्ठांनी मी नक्की काय करणार यावर तीन महिने पी.एचडी केली आणि मला गोपनीयतेचा भंग होईल अशी कोणतीही माहिती न वापरण्याचे अटीवर नोंदणी साठी मान्यता मिळाली.ती तारीख होती ३१ डिसेंबर २००२ . त्यानंतर पुणे विद्यापीठात व्यवस्थापन विभागात बँकिंग अँण्ड फायनान्स क्षेत्रात मी विद्यार्थी म्हणून माझी नोंद केली.
प्रत्यक्ष नोंदणी पूर्ण होवून त्याची अधिकृत सूचना विद्यापीठाकडून मिळेपर्यंत ऑगस्ट २००३ उजाडला. त्या चार सहा महिन्यात प्रबंधाचा साचा कसा असावा,जुने संदर्भ कोणते लागतील, नवीन माहिती कशी संकलित करावी, लिखाणाची सुरवात कोठून करावी या प्राथमिक तयारीत वेळ कधी संपला हे लक्षात हि आले नाही.

कामकाज सुरु होते न होते तोच पुणे सोडावे लागले. पुणे विद्यापीठ, इंडसर्च, वाचनालये हे सर्व नियमित संपर्क अचानक तुटले.पण घर पासून दूर गेल्याने दररोज सायंकाळ आणि रविवार हे वाचन आणि अभ्यास या साठी मला सातत्याने मिळू लागले.अभ्यासात गती आली. संदर्भ शोधणे, पुस्तके मिळवणे व नव नवीन माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करणे यात एक झपाटलेपण आपोआप येत गेले.

पुस्तकांची उपलब्धता हा या प्रकारच्या अभ्यासात सर्वात मोठा अडसर होता. पण एका सायंकाळी हैदराबाद येथील अबिद्स परिसरात फिरत असताना पदपथावर एकाचवेळी दोन अतिशय सुंदर पुस्तके मिळाली. सारस्वत बँक,मुंबई यांनी त्यांच्या बँकेस ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने एक Liberalization in the Financial Sector अशी परिषद घेतली होती त्यात सदर झालेल्या विविध पेपर्सचे संकलन असणारे एक पुस्तक आणि Banking Reforms in India - Managing Change हि ती दोन पुस्तके होत.त्यात हाताळलेले विषय आणि तज्ञांची मते यांनी मला पुढील चार वर्षांच्या अभ्यास काळात मोलाची साथ दिली.
माझे हैदराबाद येथील वास्तव्य दोन वर्षे होते त्याकाळात पुण्यास तीन/चार महिन्यातून एकदा येणे होत असे. मग विद्यापीठ, वाचनालय, काही मुलाखती, विविध बँकांचे अहवाल संकलन अशी कामे आणि गाईड बरोबर चर्चा असे काम चालत असे.

अशाप्रकारे अभ्यास थोड्या आणि काळ अधिक वेगाने पुढे जात होता. माझ्या अभ्यासात नमुना पाहणीसाठी, मी दहा नागरी सहकारी बॅंका नमुना पाहणीसाठी घेवून, त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेने उदारीकरण स्वीकारल्या नंतरच्या काळातील,दहा आर्थिक वर्षांचे प्रकाशित अहवाल घेवून, त्यांचा अभ्यास केला. विविध चोवीस प्रकारची गुणोत्तरे निवडून सदर दहा बँकांचे दहा वर्षांचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद ( P&L A/C and Balance Sheet) यांची मांडणी करून त्या आधारावर अभ्यासाचे निष्कर्ष मांडले आहेत.

या काळात जेंव्हा विविध तज्ञांच्या, ग्राहकांच्या मुलाखती घेतल्या तेंव्हा वैचारिक देवाण घेवाण मला खरोखरच समृद्ध बनवत होती. अशाच एका मुलाखतीत मुलाखतकर्त्याने, मला माझा अभ्यास, त्याचा उद्देश, त्यातून समाजाला होणारा फायदा, या बाबत सविस्तर माहिती विचारली. आणि अखेरीस त्यांनी असे मत मांडले कि, आपण घेत असलेले कष्ट व अभ्यासातून आपण मांडू इच्छित असलेले निष्कर्ष, याचा खराखुरा फायदा आपण ज्यांना याची गरज आहे त्यांच्या पर्यंत, पोहचवू इच्छित असाल तर,आपण आपला प्रबंध मातृभाषेतून सदर केला पाहिजे. कारण तरच त्यांचा फायदा त्या घटकास होईल.

या मुलाखतीनंतर माझे प्रबंधावरील काम अक्षरशः थांबले.मन अंतर्मुख होउन विचार करू लागले,की मी पदवी साठी अभ्यास करतोय, का त्याचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी अभ्यास करतोय? मग या मुद्यावर अन्य काही तज्ञ आणि माझे गाईड यांच्याशी चर्चा केली.माझ्या गाईडनी असा बदल करता येईल पण विद्यापीठ स्तरावर पुन्हा मान्यता घ्यावी लागेल असे सांगितले.शेवटी आतापर्यंत झालेले काम बदलल्याने, जर त्याचा फायदा समाजाला अधिक होणार असेल, तर पुनश्च श्री गणेशा करावा लागला तरी चालेल, पण हे खडतर काम पूर्ण करयचे ठरवले.
आता मी दोन प्रकारे धोका पत्करून कामकाज पुढे नेण्याचे ठरवले. विद्यापीठाकडे परवानगी मागायची आणि प्रत्यक्ष परवानगी हातात पडण्यापूर्वीच प्रबंध मांडणी मराठीतून सुरु करायची. जर परवानगी नाकारली गेली तर माझे मराठीतून केले जाणारे सर्वच काम निरुपयोगी ठरणार होते. अखेर सप्टेंबर २००६ मध्ये मी प्रबंध मराठीतून लिहण्यास मान्यता मागणारा अर्ज दाखल केला.

बँकिंग अॅण्ड फायनान्स क्षेत्रात प्रबंध मराठीतून सादर करण्याची विनंती विद्यापीठास यापूर्वी कोणत्याही विद्यार्थ्याने केलेली नव्हती,त्यामुळे परवानगीचे काम लांबले. आणि या टप्यावर सर्व कामकाज सोडूनच द्यावे असे नैराश्य आले.विषय,लिखाण,नवीन संकल्पना कशातच काम पुढे सरकत नव्हते. त्यावेळी माझे मार्गदर्शक डॉ. कमलाकर देव यांनी मला - How to Research हे Loraine Blaxter, Christina Hughes, Malcolm Tight या लेखक त्रयीने लिहिलेले पुस्तक दिले आणि सांगितले कि मी माझा अभ्यास पूर्णपणे बाजूला ठेवून प्रथम पुस्तक वाचून काढावे आणि नंतरच पुढील अभ्यासास सुरवात करावी. मग मी ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढले.

आज मी प्रामाणिकपणे सांगतो कि,मी माझा प्रबंध हा माझे मार्गदर्शक डॉ. कमलाकर देव आणि त्यांनी दिलेले हे पुस्तक यामुळेच पूर्ण करू शकलो.कारण त्या पुस्तकात पी. एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर अनेक उपयुक्त सूचनां होत्या,त्याच बरोबर एखाद्या टप्यावर नैराश्य आल्यास त्यातून कसे बाहेर पडावे, याची पण माहिती होती.संशोधन सोडून देण्याची आलेली मनस्थिती बदलण्यास -How to Research पुस्तकाने खरच मोलाची साथ दिली.एखाद्या प्रश्नाकडे फेरविचार करून पाहिल्यास अडचणीवर मात करता येते हा मूलमंत्रच त्या पुस्तकातील संदेशातून मिळाला. त्याशिवाय बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना परिस्थितीतील बदल समजावून घेणे हाच सर्वोत्तम उपाय असतो हि शिकवण मला पुढील अभ्यासात लक्ष घालण्यास उपयुक्त ठरली.
अखेर जुलै २००७ मध्ये विद्यापीठाकडून प्रबंध मराठीतून सादर करण्यास मान्यता मिळाली. अनिश्चितता संपली, मळभ दूर झाले. पुढे अक्षरशः झपाटून काम करीत परवानगी नंतर चार महिन्यात नोव्हेंबर २००७ मध्ये प्रबंध मान्यतेसाठी पुणे विद्यापीठास सादर केला.आता ओपन डिफेन्सचा टप्पा सोडून माझे सर्व काम पूर्ण झाले होते. गेल्या पाच वर्षांचा काळ कसा गेला याकडे मागे वळून पहिले तर आज ते सर्वच अदभूत वाटते.

नोंदणी केल्या- पासून ते पदवी मिळेपर्यंत मित्रपरिवार,नातेवाईक,परिचित यांच्या कडून सर्वाधिक दोन प्रकारचे प्रश्न आले. एक कोणत्या विषयात पी.एचडी करताय आणि पुढे याचा काही उपयोग आहे का, पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी नेहमीच फक्त बँकिंग या विषयात करतोय असे सांगत असे.

कारण 'उदारीकरण आणि जागतिकीकरण संदर्भात, नागरी सहकारी बँकांसमोरील आव्हानांचा अभ्यास.' असे उत्तर दिले तर त्यापाठोपाठ विषयाची फोड करून सांगण्याचे काम वाढत असे.पुढे याचा काही उपयोग आहे का ,या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर समोरच्याला जसे हवे तसे देण्याची मला आता सवय झाली होती. म्हणजे विचारणाऱ्याच्या हेतुत खोच असेल तर माझे उत्तर" नाही " असेच असे.पण उत्सुकता, माहिती घेण्याची इच्छा असेल तर मात्र या प्रश्नांचे उत्तर देणे हा एक आनंद सोहळाच असे.

या निमित्ताने मी आजही इतकेच सांगू इच्छितो कि, नोंदणीच्या पहिल्या दिवसापासून पी.एचडी मिळवणे म्हणजे भविष्यातील आर्थिक फायदा असे माझे गणित कधीच नव्हते. मग प्रश्न राहतो यासर्व प्रक्रियेतून मी काय मिळवले? अभ्यास काळात माझी,वरचेवर माझे मार्गदर्शक डॉ.कमलाकर देव आणि त्यांची पत्नी सौ.उर्मिला देव यांचेशी अनेक विषयात चर्चा होत असे. त्यात त्या उभयतांचे नेहमीच सांगणे असे कि, पी.एचडी हि पदवी तुम्ही केलेल्या अभ्यासातील तुमच्या प्रविण्यावर शिक्कामोर्तब करतेच, पण त्यापलीकडे जावून तुम्हाला जीवनातील अडचणी,प्रश्न, यावर उपाय असतात, त्यावर मात करणे आपल्याच हातात असते हा सकारात्मक विचार तुमच्या मनात कायमचा रुजवते. येणाऱ्या प्रश्नाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देते.आज मी काय मिळवले? या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे झाल्यास, मी खात्रीने सांगू शकतो कि ,हे त्यांचे मत मी सतत अनभवू शकतो. हीच आहे माझ्या पदवीची खरी देणगी.

संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर :- भाग दोन - प्रबंधपूर्ती एक अनुभूती

आता यापुढे मी माझा अभ्यासाचा विषय व संशोधन कार्य याची थोडक्यात माहिती देतो.या 'थोडक्यात'च्या मागे असलेला एक किस्सा सांगून मी मुख्य विषयास हात घालतो.मी प्रबंध लिखाण सुरु केले तेंव्हा माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले कि, प्रबंध पाच ते सहा विभागात लिहून काढ.जितके म्हणून सविस्तर मुद्देनिहाय लिहता येईल तितके लिहून सर्व विभाग पूर्ण कर.आणि सर्वात शेवटी पहिला प्रस्तावना हा विभाग लिही.मला त्यावेळी सुरवातीस काही समजले नाही.माझे दोन ते सात विभाग जेंव्हा लिहून झाले तेंव्हा पृष्ठ संख्या जवळजवळ एक हजार पर्यंत पोहचली होती.
ती सर्व पानें माझ्या मार्गदर्शकांनी वाचून काढली आणि त्यावेळी मला सांगितले तुझे लिखाण अतिशय चांगले अभ्यास पूर्ण झाले आहे आता हे एक हजार पानी लिखाण विषयाची संगती (लिंक ) न तोडता १५० पानात पूर्ण कर आणि त्याला दहा पानी प्रस्तावना जोड.
आता संपूर्ण अभ्यासातील सर्वात अवघड कामाचा टप्पा सुरु झाला.माझे एक हजार पानी लिखाण हा माझी ग्रंथ संपदा होती तर मार्गदर्शकांच्या मते ते बाड होते.मी सविस्तर व प्रत्येक मुद्याला न्याय लिखाण केले होते तर त्यांच्या दृष्टीने तो फापट पसारा होता.भारतीय परंपरेत गुरुशिष्य नात्यातून पुढील पिढीला मिळालेले ज्ञान किती उपयुक्त असेल आणि ते मिळवणे किती खडतर असेल याची छोटी झलकच मी या निमित्ताने अनुभवली.

मुळ लिखाणातून विषयाचे सार टिकवून ठेवीत लिखाणाची लांबी कमी करण्याची कलाच त्यांनी मला शिकवली. १००० ते ७०० हा माझा स्वतःचा प्रवास होता, पुढील फेरीत माझ्या गुरुंनी ते सहजपणे ७०० ते ३०० चा टप्पा गाठून दिला. त्यानंतर ३०० वरून १५०वर येताना माझी झालेली दमछाक अजूनही स्मरणात आहे. पण हे काम जेंव्हा त्यांच्या सुचनेबरहुकुम संपवले तेंव्हा मी एक नवा मुद्दा कायमचा शिकलो.तो म्हणजे समोरच्याला विचार बुद्धी असते सर्वच गोष्टी बाळबोध करून सांगण्याची गरज नसते.

आज जेंव्हा मी माझे प्रथम केलेले १००० पानी काम व १५० पानी प्रत्यक्ष सदर केलेला प्रबंध यांची तुलना करतो, तेंव्हा मी स्वतःच अचंबित होतो. पहिल्या लिखाणातून काही वगळून मी विषयाला न्याय देवूच शकणार नाही, हि माझी धारणा गुरूंनी सहज बदलली. त्यांनी केलेल्या उपयुक्त मार्गदर्शनाकडे आज तटस्थ वृतीने पाहिल्यास एखद्या अंतिम निष्कर्षास संस्कारित निकष का म्हणतात यांची जाणीव होते. प्रबंधाचे अंतिम रूप साकारण्यात माझी चिकाटी आहे पण त्यापेक्षा गुरु संस्कार हेच मुख्य कारण आहे. हेच नमूद करून मुख्य विषयाकडे वळतो.

भारतीय बँकिंगचा पसारा खऱ्या अर्थाने सर्वदूर पसरलेला आहे. यामध्ये संख्येने सर्वाधिक व मालमत्तेत दहा टक्क्यांपर्यंत हिस्सा असलेल्या नागरी सहकारी बँका या बँकिंग उद्योग व सहकारी चळवळीचा अभिवाज्य घटक आहेत. या प्रकारच्या नागरी सहकारी बँकेत गेली २५ वर्षे काम करताना विविध ठिकाणी व वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याची संधी मला मिळाली.या क्षेत्रात काम करताना मुल्यांची जपणूक व ग्राहक सेवेला प्राधान्य या समांतर रेषा सांभाळत वाटचाल केल्यास त्यातून संस्थेची प्रगती साधता येते हा अनुभव मिळाला.

वाढते शहरी- करण व खुले आर्थिक धोरण यांनी या प्रकारच्या बँका वाढल्या विस्तारल्या पण त्याचबरोबर अनुत्पादक कर्जे थकबाकी अकार्यक्षम व्यवस्थापन या प्रश्नांना या बँकांना सामोरे जावे लागले त्यातून गेल्या काही वर्षात या बँका वाढून विस्तारून देखील त्यांना गेल्या काही वर्षात अस्तित्वाच्या लढाईतच उतरावे लागले आहे.

या कालावधीत विविध प्रकारची शहरे, खातेदार यांच्याशी सातत्याने संपर्क आला, त्यातून सर्वच प्रकारचे ग्राहक, त्यांच्या अपेक्षा, अडचणी यांची माहिती जवळून घेता आली. पसारा वाढून देखील या बँका ग्राहकांना विश्वास देऊ शकत नाहीत.सेवा देण्याची क्षमता असूनही अत्याधुनिकतेपासून त्या दूर आहेत.त्यामुळे या सर्वच प्रश्नांचा अभ्यास करणे,भविष्यकालीन प्रगती या बँकांनी कशी साधावी, यावरील उपायांचा उहापोह करणे यासाठी मी जागतिकी- करणाचे संदर्भात नागरी सहकारी बँकांसमोरील आव्हानांचा अभ्यास करण्याचे निश्चित केले.प्रत्यक्ष अभ्यास काळात आणि त्यानंतर देखील या बँकांसमोरील आव्हानांचे स्वरूप सातत्याने बदलते व गुंतागुंतीचे होताना दिसून आले.परंतु आभ्यासाला एक निश्चित दिशा राहावी म्हणून दिनांक ३१ मार्च २००५ अखेर दहा प्रातिनिधिक बँकांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रबंध मांडणी करण्याचे निश्चित केले.

प्रबंध संदर्भात आवश्यक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, लेख यांची उपलब्धता करून देण्यामध्ये एन आय बी एम कोंढवा , जयकर ग्रंथालय पुणे विद्यापीठ, इंडसर्च, लॉ कॉलेज रोड पुणे येथील ग्रंथालयाचे ग्रंथपाल व सेवक यांनी खूपच मदत केली.तसेच महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई,सहकार आयुक्त (पुणे) यांचे कार्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (मुंबई) येथील शहर बँक विभागातील सेवक/ अधिकारी यांची मदत झाली. तसेच प्रश्नावली, अनौपचारिक चर्चा, मुलाखती याद्वारे ज्यांनी आपली मदत देऊन विचार मांडून या विषयास गती दिली त्या सर्वांचा सहभाग तितकाच महत्वपूर्ण आहे.

प्रबंध नोंदणी ते प्रत्यक्ष सादरीकरणाच्या सर्वच टप्यांवर प्रत्यक्ष मदत नव्हे तर खरे खुरे मार्ग दर्शन करणारे माझे मार्ग दर्शक डॉ.कमलाकर देव व त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला देव यांच्या सहकार्यानेच मी प्रबंध पुर्तिचा आनंद घेत असल्याने मी त्यांचे औपचारिक आभार मानून ऋणमुक्त होण्याऐवजी सदैव त्यंच्या ऋणातच राहणे पसंत करीन.

भारत हा आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे , विकासाचा वेग चलनवाढ या संदर्भात साकल्याने विचार करण्याची क्षमता असलेला देश आहे.जगातील बहुसंख्य देशात जेष्ठ नागरिकां च्या वाढत्या वयोमानाचा व संख्येचा प्रश्न व तरुणांची घटती संख्या हि समस्या असताना पुढील १० ते १५ वर्षात सन २०२० पर्यंत भारत मात्र जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश असेल, त्याचवेळी सध्याचे २८% शहरी लोकसंख्येचे प्रमाण वाढून ते ४०% पर्यंत पोहचलेले असेल.अर्थात विकसनशील देशात आर्थिक प्रगती साठी जी धोरणे अंमलात आणली जातात त्यांचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे वाढते शहरीकरण. आपल्या देशातही हाच अनुभव आलेला आहे.अस्तित्वात असलेली शहरे वेगाने अवाढव्य होत आहेत तर लहान गावांची वाटचाल शहरांकडे होत आहे.

औद्योगिक आघाडीवर विशेष आर्थिक विभाग (एस इ झेड ) उभारणीचे प्रयत्न शहरीकरणाची गती व परिणाम पूर्णतः बदलतील असे चित्र असताना मोठे उद्योग व उद्योगपती त्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी भारत व जागतिक क्रमवारीतील त्यांच्या श्रीमंतीचे स्थान सर्वांनाच अचंबित करीत आहे.या उद्योग समूहांकडून आपल्या देशातील उद्योगांना पूरक परदेशी व्यवसायही खरेदी केले जात आहेत.
थोडक्यात संपूर्ण जगभर भारतीय उद्योग व उद्योगपती आपला ठसा उमटवू लागले आहेत.मागील तीन दशकात ७% सरासरी असणारा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर आता ९% पर्यंत जावून पोहचला आहे.त्या मध्ये सातत्याने वाढ करण्याचे प्रयत्न होत आहेत.या प्रगती मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा मोठा असून विकासदरात सर्वाधिक सहभाग हा सेवा क्षेत्राचा आहे.याच क्षेत्रातील निर्यात वाढ देशाच्या गंगाजळीत प्रामुख्याने भर घालण्यास उपयुक्त ठरली आहे.गेल्या पंधरा वीस वर्षात होत असलेला हा बदल खरा आहे. पण त्याह बरोबर गरिबीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्याही तितक्याच खऱ्या आहेत.म्हणजेच श्रीमंती वाढत असताना गरिबीही वाढत आहे. त्यामुळे श्रीमंती व गरिबी यांच्या- तील आर्थिक विषमताही वाढत आहे.आणि तीच खऱ्या अर्थाने काळजी करण्याची बाब आहे.

या पार्शभूमीवर आपल्याकडे जागतिकीकरण / उदारीकरण प्रक्रिया राबवली जात आहे.खरेतर हि प्रक्रिया राबवण्या मागे गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील आर्थिक विषमता कमी करावी हा अंतिम उद्देश आहे पण अद्याप त्याला यश आलेले नाही.

सध्याचा विकास शहर व मध्यमवर्गीय केंद्रित होताना दिसत असून खेड्यांकडे व शहरातील वस्त्यांकडे त्याच्यासाठी अद्यापही तरतूद अत्यल्पच होताना दिसत आहे.त्यावर उपाय म्हणून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रमाला मानवी चेहरा देण्याचे प्रयत्न चालू आहेत.
सर्वांना किंवा प्रत्येकाला प्रगतीसाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्यास आर्थिक प्रगतीचा फायदा समाजातील सर्व स्तरातील लोकांना विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मिळेल व त्यातूनच आर्थिक विषमता दूर होईल हा विचार योग्य आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हाती असलेले सर्वात प्रभावी साधन म्हणजे बँकिंग प्रणाली होय.कारण खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अनेकविध रचनात्मक आर्थिक सुधारणा ह्या अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या बँकिंग उद्योग प्रणाली द्वारेच केल्या आहेत.

हि बँकिंग प्रणाली जेवढी आर्थिक दृष्ट्या मजबूत व विस्तारित असेल तेवढी चांगली, कारण मानवी चेहरा असलेल्या आर्थिक सुधारणा चांगल्या प्रकारे राबविता येतात. सुदैवाने आपल्या देशातील बँकिंग प्रणाली आर्थिक दृष्ट्या सुधृढ आहे व पूर्ण विस्तारित व विकसित आहे. यात राष्ट्रीय, सहकारी,खाजगी व परदेशी बँका यांचा समावेश होतो.मानवी चेहऱ्याच्या आर्थिक सुधारणा राबविण्याच्या कार्यक्रमात सामाजिक उत्थापनाचा उदेश आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील व परदेशी बँका या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्या फक्त सरकारी नियम पाळुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याकडेच लक्ष पुरवितात. त्यामुळे या सामाजिक उत्कर्षाच्या कार्यक्रमाची धुरा राष्ट्रीय व सहकारी बँकांना सांभाळावी लागत आहे.

समाज उपयोगी अनेक कार्यक्रम राष्ट्रीयकृत बँका राज्य व केंद्र सरकारच्या वतीने राबवीत आहेत. उदा. रोजगार हमी योजना , शैक्षणिक कर्ज इ. तसेच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक सहाय्य देतात. पण हे सर्व कार्य देशातील आर्थिक घडामोडींचा विचार करून राज्य व केंद्र सरकारच्या आर्थिक व औद्योगिक धोरणानुसार होतात.पण स्थानिक पातळीवर खरे काम होते ते म्हणजे नागरी सहकारी बँकांमार्फत.

वाढत्या औद्योगिककरणाचा व शहरीकरणाचा परिणाम म्हणजे समाजात निर्माण झालेला मध्यमवर्ग होय. हा वर्ग वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ठ्य असलेला मध्यमवर्ग आर्थिक दृष्ट्या जरी दुर्बल असला तरी त्याची खरी गरज आहे ती म्हणजे आजारपण,मुलामुलींची शिक्षणे, लग्नकार्य , यासारख्या गरजा ज्या पूर्णतः वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. त्याची उकल स्थानिक पातळीवर काम करणारी बँकच करू शकते.तसेच छोट्या मोठ्या उद्योगांना व व्यवसायांना स्थानिक पातळीवरून हीच बँक सहकार्य करते. यामुळे आर्थिक विषमता कमी करण्याचे दृष्टीने मदत होते.या दृष्टीने या बँकांना भरतीय अर्थव्यवस्थेत अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणूच या बँका अभ्यासासाठी निवडल्या होत्या.

नागरी सहकारी बँका एक विरोधाभास - सामान्य माणसाच्या गरजा पुरवणारी,त्यांच्या जिव्हाळ्याची व स्थानिक पातळीवर काम करणारी बँक म्हणून नागरी सहकारी बँकांची ओळख सर्वांना आहे.त्यांच्या प्रयत्नातून सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १९९३ अखेर देशात १३११ नागरी सहकारी बॅंका होत्या. डिसेंबर २००३ अखेर या बँकांची संख्या २१०४ पर्यंत पोहोचली.म्हणजेच केवळ दहा वर्षात ८२३ नवीन नागरी सहकारी बॅंका अस्तित्वात आल्या. १९९३ अखेर या सर्व बँकांच्या देशस्तरावरील ठेवी रु.१११०८ कोटी व कर्जे रु. ८७१३ कोटी इतकी होती. डिसेंबर २००३ अखेर त्यामध्ये वाढ होत ठेवी रु.१०३४७८ कोटी व कर्जे रु.६१९३० कोटीपर्यंत पोहोचल्या.या प्रमाणे सरकारी धोरणाचा फायदा घेत या बँकांनी बरची मोठी मजल मारली खऱ्या अर्थाने शहरातील सामान्य माणसाला या बँकांनी आधार दिला. त्याचा जीवनस्तर वाढविला हे खूपच मोठे कार्य आहे.म्हणूनच या बँकांचे भारतीय आर्थ्व्यवास्थेतील स्थैर्य हि अनिवार्य बाब आहे.

परंतु या प्रगती बरोबरच अनेक अशाअनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत, कि ज्यामुळे या बँकांच्या कार्यक्षमतेवर कार्य पद्धतीवर व सर्वात मुख्य म्हणजे प्रवर्तक व संचालक यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १९९३ नंतर नवीन स्थापन झालेल्या ८२३ बँकांपैकी २५५ बॅंका म्हणजेच ३१% बॅंका अल्पावधीत अकार्यक्षम बनल्या. एकूण २१०४ बँकांपैकी १७५ बॅंका दिवाळखोरीत निघाल्या. या सर्वांचा थेट आणि त्वरित परिणाम म्हणजे रिझर्व्ह बंकेनी वाढवलेली बंधने व शक विस्तार धोरणाचे संदर्भात या बँकांनी गमावलेले स्वातंत्र्य होय. जसा शाखा विस्तार थांबला तसे नवीन नागरी सहकारी बँकांना परवानगी जवळजवळ बंदच झाली.

रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आलेच पण त्याच बरोबर सर्वात वाईट गोष्ट घडली ती म्हणजे ठेवीदार व ग्राहकांचा या बँकांवरील विश्वासाला तडा गेला.खरेतर ग्राहकांचा विश्वास हेच या बँकांचे भांडवल आहे.त्यावरच अनिष्ट परिणाम झाले आहेत.यातून या बँकांनी सावरले पाहिजे अन्यथा बँकिंग प्रणालीतील त्यांचे आज असलेले स्थान त्यांना गमवावे लागेल. तसे झाल्यास सामान्य माणसाला त्याच्या अडचणीचे वेळी उपयोगी पडेल अशी संस्था राहणार नाही. त्यामुळे सामाजिक आर्थिक असमतोल वाढत जाईल. आज या बँकांबाबत दिसत असणारा हा विरोधाभास अभ्यासणे याकरिता सखोल अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे.

या विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर नागरी सहकारी बँकांचा अभ्यास करण्याचे ठरविले होते. हा अभ्यास सामाजिक शास्त्र (सोशल सायन्स ) या प्रकारात मोडतो.त्यामुळे काही संस्थांचा पूर्ण अभ्यास करणे,चर्चा सत्रात प्रत्यक्ष सहभाग घेवून तज्ञांची मते ऐकणे,प्रश्नावली पाठवून तज्ञ व्यक्तींची मते समजावून घेणे. प्रत्यक्ष मुलाखती द्वारे मते विचार समजावून घेवून त्यांचा एकत्रित आभास करून प्रबंधाची मांडणी करणे. शेवटी अभ्यासाअंती आलेली आपली मते मांडणे हीच पद्धत वापरावी लागते, आणि त्याचाच वापर प्रबंध पूर्ती साठी केला.तसेच सद्यस्थितीत सर्वाधिक अचूक व अद्ययावत माहिती संकेत स्थळाद्वारे घेताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकारी बँकांचा अभ्यास केला.
संपूर्ण प्रबंधाची मांडणी करताना विषयाची प्रस्तावना, नागरी सहकारी बँकांचा इतिहास,उदारीकरणाचे परिणाम,बँकांसमोरील आव्हाने,नमुना बँकांचा तुलनात्मक अभ्यास, नवीन संधी आणि बँकांच्या कार्यातील उणीवा भरून काढण्याचे उपाय या सात विभागात केली.

सर्व प्रबंध उपयुक्त ठरावा म्हणून त्याला दहा परीशिष्ठ्ये,अठ्ठावीस कोष्टके,चाळीस आलेख जोडले. प्रकरण सात मध्ये विविध उपाय योजना मांडताना व्यवसाय संधी ,बँकेची कार्य पद्धती सुनिश्चित करणे,ठेव संकलन ,कर्जवितरण, ग्राहक सेवा, शाखा विस्तार धोरण,व्यवसाय विस्तार ,व्यवस्थापन धोरण,भांडवल उभारणी, नफा क्षमता,प्रशिक्षण ,संचालक निवड कार्य पद्धती यावर भाष्य करीत शेवटी भविष्य कालीन अभ्यासाठी उपलब्ध संधी कोणत्या यांची माहिती नमूद केली आहे.

यासर्व अभ्यासाचा वापर नागरी सहकारी बँकांनी आत्म परीक्षण आणि नवीन संधी म्हणून केला आणि ग्राहकाचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत एक पाऊल पुढे टाकले तरी प्रबंध संशोधनाची फलश्रुती झाली असे मानता येईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काका.. लेख सार्वजनिक कराल का? म्हणजे सगळ्यांनाच वाचता येईल.. आणि हा विषय पण एकदमच वेगळा आहे... तुमचा प्रबंध PUMBA मध्ये वाचायला उपलब्ध आहे का? असेल तर कॉलेजमधे जाऊन वाचता येईल..

किंकर,
निवांत लेख वाचेन. तेव्हा प्रतिक्रिया देईन. Happy
पण लेख जरा सार्वजनिक करा ना. संपादनाच्या धाग्यावर जा, तिथे खाली ग्रुप असा टॅग दिसेल तो एक्स्पान्ड करा. त्यात सार्वजनिक च्या चेकबॉक्स मधे टिक करा...

वा!
छान ओघवते, मुद्देसूद लिहीले आहे आपण. खूप आवडले.
शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

अंतिम निष्कर्षास संस्कारित निकष का म्हणतात यांची जाणीव होते.>>> वेल सेड!!!

उत्तम लेख आणि माहिती!
तुमचा प्रबंध या सहकारी बँकाना अभ्यासासाठी उपलब्ध आहे का? त्याचा उपयोग केला जावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात का?

किंकर, लेख नंतर पुर्ण वाचून प्रतिसाद देइन. पण तुम्ही परत लिहायला सुरूवात केलीत हे बघून आनंद वाटला.

हिम्सकूल- प्रबंधाची एक प्रत जयकर ग्रंथालय व एक प्रत व्यवस्थापन विभागात ठेवणार म्हणून घेण्यात आली होती. त्यामुळे खरेतर पाहता येईल.
वरदा- अभिप्रायाची वाट पाहत आहे.
आयडू- धन्यवाद.
रैना - भाग एक आताचा बाकी काम प्रबंध सादरीकरणाच्या वेळचेच आहे.अभिप्रायासाठी धन्यवाद.
सई केसकर - मित्र,परिवार यांच्या शुभेच्छा पाठबळ व मार्गदर्शकांनी निभावलेली प्रामाणिक भूमिका यामुळे हे शक्य झाले. आपले मनपूर्वक आभार.
अन्कॅंनी- प्रथम आपले मनपूर्वक आभार. प्रत्यक्ष प्रबंधाचे काम करताना ज्या दहा बँका अभ्यासासाठी निवडल्या होत्या त्यातील काही बँकांनी अभ्यास त्यातील निष्कर्ष व उपाय योजंना याची माहिती घेण्यात रस दाखवला होता. प्रबंध हि विद्यापीठाची मालकी असते. पण विषयाला धरून स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करता येते.पण अद्याप त्या दिशेने प्रयत्न केलेला नाही.
कौशी, बाळू जोशी - धन्यवाद.
प्रज्ञा१२३- लेखावरील प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.

सुंदर लिहिलाय लेख.
संशोधन म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये डोळे बुडवू नाहीतर परीक्षानळ्यांत वेगवेगळी रंगीत द्रव्ये मिसळून होते या सामान्य ज्ञानापेक्षा वेगळेच.
तुम्ही सगळ्यांनी किती कष्ट घेऊन संशोधन केलंय आणि पि एच डी मिळवलीय हे बघून फार बरं वाटलं.
या भागात पैसे फेका आणि डिग्र्या मिळवा असा प्रकार आहे.
माझ्या काही ओळखितल्या लोकांना त्यांच्या पिएच्डिच्या विषयाचा साधा गंधही नाही.
इंग्रजीत पी एच डी केलेलीला साधा वर्डसवर्थ माहिती नाही आणि इतिहासात पीएचडी केलेल्याला आपल्याच भागात कोण राज्यकते होउन गेले ते माहिती नाही.

यासर्व अभ्यासाचा वापर नागरी सहकारी बँकांनी आत्म परीक्षण आणि नवीन संधी म्हणून केला आणि ग्राहकाचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत एक पाऊल पुढे टाकले तरी प्रबंध संशोधनाची फलश्रुती झाली असे मानता येईल

यासाठी शुभेच्छा.(तुम्हाला आणि बँकांनापण)

माझ्याच क्षेत्रातले हे काम असल्याने मन लावून वाचला.
या जिद्दीला सलाम.
या विषयात संशोधक करता येते, याची जाणीवच त्या काळात नव्हती,
आणि असती तरी एवढा अभ्यास करण्याची, चिकाटी नव्हती माझ्यात.
आणि हो मीदेखील त्याच काळातला, म्हणून जास्तच रस घेऊन वाचला
हा प्रवास.
सध्या माझ्या आवडीनिवडी (म्हणजे लुडबुडी) बघता, मी सी.ए. पण आहे,
असे शेवटी सांगावे लागते.

साती-आपल्या सविस्तर व परखड निरीक्षण यावर आधारित अभिप्राय पटला,आपल्या शुभेच्छांसाठी मनपूर्वक धन्यवाद.
शुम्पी - सविस्तर वाचनाकरिता आभारी आहे,
दिनेशदा - स्वतःच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून इतरत्र केलेला हा मुक्त संचार आहे, त्याला लुडबुड नका म्हणू. आणि हो सी.ए. म्हणजे काय ते घरी जेंव्हा अभ्यास सुरु होता तेंव्हा अनुभवलेय. त्यामुळे आपण ठरवलेत तर अजूनही संशोधनाकडे वळू शकाल. अभिप्रायासाठी आभार.

वेगळ्या विषयावरील संशोधन! कष्टेविण फळ नाही हे वाचताना अगदी जाणवत होते. माझी आई अर्थशास्त्रातील असल्यामुळे तिला हा लेख अवश्य वाचायला देणार! धन्यवाद. Happy

अरुंधती कुलकर्णी - अर्थशास्त्र तर बँकिंग पेक्षाही गुंतागुंतीचे असते. त्यामुळे त्यांना हा विषय तर सहजच समजेल. आपले मनपूर्वक आभार,

किंकर,

मराठीतून प्रबंध सादर करण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल आपलं विशेष कौतुक वाटतं.

तसंच विषयही जिव्हाळ्याचा आहे. आपल्या मातीतल्या, आपल्या लोकांच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या विषयात संशोधन करण्याचं एक आंतरिक समाधान असतं. आपल्या लेखावरून आपल्याला ते भरभरून मिळालं असावंसं वाटतं.

पुढील वाटचालीस शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

किंकर, मस्त लिहिलाय लेख.
समाजाचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. Happy

किंकर, आत्ताच मी तुमचा लेख वाचून काढला. फार चिकाटीने तुम्ही पी.एच.डी. केलेत. फार अभ्यासपुर्ण लेख आहे.
संपर्कातून, मेल करतेय.

प्रज्ञा शोभा १२३ - आपण इतका दीर्घ लेख न कंटाळता वाचून प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.अनेकांच्या शुभेच्छा आणि मदत यामुळे प्रबंध पूर्ण होवू शकला.

मृदुला - प्रदीर्घ लेख वाचल्याबद्दल प्रथम धन्यवाद.
नागरी सहकारी बँकांचे कामकाज मराठीतून चालते व त्यांना या अभ्यासाचा काही अंशी उपयोग व्हावा या उद्देशाने प्रबंध मराठीतून सादर केला.

अनेकानेक धन्यवाद हा प्रबंध-प्रवासानुभव इथे लिहिल्याबद्दल.

आजही आपल्या आसपास, ज्ञान संपादनाची विशुध्द आवड असणारी माणसे आहेत हे कळणे किती दिलासादायक असते म्हणून सांगू.

गापैंमुळे आज वाचण्यात आला हा लेख त्यामुळे त्यांचे ही आभार Happy

किन्कर छन अभ्यासपुर्ण लेख.मी पण यातिल बर्‍याचशा अनुभवातुन गेले आहे. तुमचा लेख पाहुन माझे अनुभव लिहावेत अस वाटल.हर्पेन धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

Pages