****तून ****कडे

Submitted by UlhasBhide on 18 December, 2011 - 00:52

****तून ****कडे

शीर्षक वाचून उत्सुकतेने, उत्कंठेने क्लिक केलं असाल ना ?
पण ’तसला’ काहीही विषय नाहीये. कसं आहे ना, ‘संदिग्धतेतून सूचकतेकडे’ असं सरळ शीर्षक दिलं असतं, तर आला असतात का हे वाचायला ? नाही ना ! म्हणूनच शीर्षकातही ठेवली थोडीशी संदिग्धता….. Proud

तर, हे आहे ’कविता विभागात’ दिसणार्‍या संदिग्ध प्रतिसादांबद्दल. (मायबोलीवर माझा वावर विशेषकरून कविता विभागात असतो त्यामुळे हे विशेषत्वाने त्या विभागातल्या प्रतिसादांबद्दल)
कवितेवर येणारे काही प्रतिसाद कवितेबद्दल स्पष्टपणे चांगलं/वाईट मतप्रदर्शन करणारे असतात. पण काही प्रतिसाद मात्र विचार करायला भाग पाडणारे संदिग्ध असे असतात. या संदिग्ध प्रतिसादातून नक्की काय सूचित केलं जातं हे सांगणं कठीणच. तरीदेखील संदिग्धतेतून सूचकतेकडे जाण्याचा हा थोडासा प्रयत्न.

(१) फक्त एक स्मायली ….. हा असा Happy
हा प्रतिसाद बर्‍याचदा बुचकळ्यात टाकणारा वाटतो. कविता आवडली म्हणून या स्मायलीद्वारे आनंद व्यक्त केला जातोय की प्रतिसादक कवितेला/कवीला हसतोय ??

असा प्रतिसाद बघितला की डोळ्यासमोर एक दृश्य येतं --
भक्ताने एखादी बिकट समस्या ’बाबा’/’महाराजा’ ना विचारलेय. भक्त काकुळतीने हात जोडून उत्तराच्या प्रतीक्षेत. समाधिस्थ ’बाबा’ अर्धोन्मीलित नेत्राने भक्ताकडे बघून गूढ स्मित करतात .....
काय अर्थ समजायचा त्या भक्ताने ? "संकट दूर होईल" की ...... "तूच संकटापासून कायमचा दूर होशील ?"

(२) कवितेतल्या दोन-चार ओळी लिहून त्यापुढे "मस्त", "छान", यासारखे शब्द
नक्की काय समजायचं ? फक्त त्या ओळीच प्रतिसादकाला आवडल्येत, की संपूर्ण कविता ?

(३) नुसतंच "वा !" किंवा "वा वा !" (पुढे/मागे काहीच शब्द नाहीत)
कविता खूपच आवडली म्हणून वाहवा करणारी ही दाद आहे, की हा “वा !” उपहासगर्भ आहे ?
की डोळे वटारून "वाssss !" म्हटल्यासारखं आहे ?

(४) "!" "!!" "!!!"
ही नुसती उद्गारचिन्हं म्हणजे नक्की काय म्हणायचंय ? असं तर नाही ना.... चिन्हं दिल्येत, उद्गार काय ते तुम्ही
समजून घ्या. (बर्‍याच दिवसांत अशा टाइपचे प्रतिसाद दिसले नाहीत.)

(५) "हं" "ह्म्म" "ह्म्म्म"
’स्मित’ वाला स्मायली किंवा उद्गगारचिन्हं यापलिकडची गूढता, अगम्यता .... नक्की काय ?

(६) "."
काय म्हणायचं असावं बरं ?
"कविता इतकी मनाला भिडली की शब्दच खुंटले" की
"आता पूर्णविराम दे कविता लेखनाला" ???
हा प्रतिसाद अगदी विरळा दिसला आहे.
(कुणा एका माबोकराकडे या प्रतिसादाचे कॉपीराइट्स आहे असं ऐकिवात आहे.)

(७) "वाचली"
हा प्रतिसाद देखील विरळाच दिसतो. आणि ते फार चांगलंच आहे म्हणा !
कारण यावरून हे कळत नाही की प्रतिसादकाला, "मी कविता वाचली" असं म्हणायचंय की "माझ्या कठोर प्रतिक्रीयेपासून कविता वाचली" असं सुचवायचंय ?

(८) कवितेबद्दल फारसे उद्गार न काढता
दुसर्‍याच एखाद्या कवितेच्या ओळी उद्धृत करणे.
कविता अशी असावी हे तर सुचवायचं नसतं ना प्रतिसादकाला ?

(९) कवितेबद्दल कुठलंच मत न देता,
"यावरून मला माझी कविता आठवली" असं म्हणून स्वत:च्या कवितेची लिंक देणे.

(१०) "अगदी तुझ्या नेहमीच्या स्टाइलमध्ये"
म्हणजे "मला तुझी स्टाइल आवडते" म्हणायचंय ? की "त्याच त्याच स्टाइलमध्ये न लिहिता आता वेगळं काहीतरी लिही" हे सुचवायचंय ?

(११) अधून मधून काही वेगळ्याच ढंगातल्या कवितांना एकाच दिवसात भरभरून प्रतिसाद येतात.... अगदी उत्स्फूर्त्पणे. बहुतेक प्रतिसाद टीकात्मक/खिल्ली उडविणारे असतात. अशाच एका कवितेवर आलेला एक फारच बुचकळ्यात टाकणारा प्रतिसाद मला आठवतोय .... "अभिजात काव्य". अजूनही त्या प्रतिसादाचा गर्भितार्थ मला कळलेला नाही.

(१२) हृदयद्रावक अशा विषयावरच्या कवितेवर Sad हा प्रतिसाद
प्रतिसादक, "कविता हृदयस्पर्शी आहे" म्हणतोय की
"अरेरे ! कशाला वाचली ही कविता मी" असा भाव ?

(१३) दुर्लक्ष / अनुल्लेख
कविता/लेखन सहज समोर दिसत असून देखील तिच्यावर अजिबात प्रतिसाद न देणे. हा देखील एक प्रकारचा प्रतिसाद असू शकतो का ? असेलही .....

असो ......
रसिकांबद्दल मनापासून आदर बाळगून, त्यांनी दिलेल्या प्रतिसादांचा नीट अभ्यास करणं मला तरी अत्यावश्यक वाटतं. स्वत:च्या लेखनातले गुण-दोष समजायला, त्यात सुधारणा करायला रसिकाचा प्रतिसाद महत्वाचा हातभार लावू शकतो. रसिकाचा प्रतिसाद, अभिप्राय, दाद यामुळेच तर एखाद्या लिखाणाला/रचनेला कलेचा दर्जा प्राप्त होतो असं माझं वैयक्तिक मत आहे.

प्रतिसाद हा प्रांजळ अभिप्राय असावा ही जरी लिहिणार्‍याची अपेक्षा असली तरी प्रतिसाद कसे असावेत ही रसिकांची इच्छा, मर्जी.
लेखन करणार्‍याकडे लेखनाचे प्रताधिकार असतील, पण मताधिकार मात्र रसिकांचा.

प्रतिसाद नि:संदिग्ध असोत किंवा संदिग्ध, ते बरंच काही सांगून जातात.
संदिग्धतेतून सूचकतेकडे कसं पोचायचं हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा आणि विचारक्षमतेचा भाग.
.... उल्हास भिडे (१८-१२-२०११)

आता या लेखनाला कशा स्वरूपाचे प्रतिसाद येतील बरं ..... Uhoh

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल 'तशाही मी कविता कमी वाचतो पण अमुक अमुक अमुक अमुक.... ' असला प्रतिसाद देण्याची
फॅशन आलेली दिसते.
फारच छान चर्चेचा विषय आलेला आहे.

(१) फक्त एक स्मायली ….. हा असा

 • Happy कविता आवडली हे लिहीण्यापेक्षा हा स्मायली देणे अधिक सोपे वाटत असावे. सारखे सारखे आवडल्याचे लिहूनही कंटाळा येऊ शकतो. म्हणून असावं हे.
 • किंवा "वाचली बाबा कविता, टळ आता" असंही म्हणायचं असतं काही जणांना.

(२) कवितेतल्या दोन-चार ओळी लिहून त्यापुढे "मस्त", "छान", यासारखे शब्द
नक्की काय समजायचं ? फक्त त्या ओळीच प्रतिसादकाला आवडल्येत, की संपूर्ण कविता ?

 • वरचं उत्तरातली पहिली ओळ इथेही लागू.
 • शिवाय सविस्तर प्रतिसाद लिहायला वेळ असतोच असे नाही.
 • कविता वाचल्यावर आवडल्यास असे प्रतिसाद दिले जातात. आमच्यासारखे (स्वत:ला सामान्य समजणारे ) वाचक सुंदर रसग्रहण करु शकतीलच असं नाही. मग खरंच कविता आवडली तर काय लिहीत बसायचं सुचत नाही...म्हणून हे स्मायली.

(३) नुसतंच "वा !" किंवा "वा वा !" (पुढे/मागे काहीच शब्द नाहीत)
कविता खूपच आवडली म्हणून वाहवा करणारी ही दाद आहे, की हा “वा !” उपहासगर्भ आहे ?
की डोळे वटारून "वाssss !" म्हटल्यासारखं आहे ?

वरचं उत्तर इथे लागू होतं.

(४) "!" "!!" "!!!"
ही नुसती उद्गारचिन्हं म्हणजे नक्की काय म्हणायचंय ? असं तर नाही ना.... चिन्हं दिल्येत, उद्गार काय ते तुम्ही
समजून घ्या. (बर्‍याच दिवसांत अशा टाइपचे प्रतिसाद दिसले नाहीत.)

हे मात्र गूढ/अनाकलनीय/अचाट असं आहे. छान आणि उपहासगर्भ असे दोन्ही अर्थ ध्वनित होतात.

(५) "हं" "ह्म्म" "ह्म्म्म"
’स्मित’ वाला स्मायली किंवा उद्गगारचिन्हं यापलिकडची गूढता, अगम्यता .... नक्की काय ?

 • यातही छान आणि उपहासगर्भ असे दोन्ही अर्थ ध्वनित होतात.
 • आणखी एक अर्थ म्हणजे कविता समजली किंवा त्यामागची प्रेरणा लक्षात आली असे सांगणे.

(६) "."
काय म्हणायचं असावं बरं ?
"कविता इतकी मनाला भिडली की शब्दच खुंटले" की
"आता पूर्णविराम दे कविता लेखनाला" ???
हा प्रतिसाद अगदी विरळा दिसला आहे.
(कुणा एका माबोकराकडे या प्रतिसादाचे कॉपीराइट्स आहे असं ऐकिवात आहे.)

दिला बाबा प्रतिसाद असा अर्थ लागतो यातून.

(७) "वाचली"
हा प्रतिसाद देखील विरळाच दिसतो. आणि ते फार चांगलंच आहे म्हणा !
कारण यावरून हे कळत नाही की प्रतिसादकाला, "मी कविता वाचली" असं म्हणायचंय की "माझ्या कठोर प्रतिक्रीयेपासून कविता वाचली" असं सुचवायचंय ?

वाचली बाबा (एकदाची) हा घे प्रतिसाद असा अर्थ लागतोय यातून.

(८) कवितेबद्दल फारसे उद्गार न काढता
दुसर्‍याच एखाद्या कवितेच्या ओळी उद्धृत करणे.
कविता अशी असावी हे तर सुचवायचं नसतं ना प्रतिसादकाला ?

सहमत.

(९) कवितेबद्दल कुठलंच मत न देता,
"यावरून मला माझी कविता आठवली" असं म्हणून स्वत:च्या कवितेची लिंक देणे.

स्वतःच्या कवितेची रिक्षा फिरवणे.

(१०) "अगदी तुझ्या नेहमीच्या स्टाइलमध्ये"
म्हणजे "मला तुझी स्टाइल आवडते" म्हणायचंय ? की "त्याच त्याच स्टाइलमध्ये न लिहिता आता वेगळं काहीतरी लिही" हे सुचवायचंय ?

नाही. यातून तोच अर्थ लागतो. म्हणजे वाचकाला कवीची/लेखकाची शैली आवडते. "तसंच लिहीत जा" असं सांगण्याचा हेतू असू शकतो.

(११) अधून मधून काही वेगळ्याच ढंगातल्या कवितांना एकाच दिवसात भरभरून प्रतिसाद येतात.... अगदी उत्स्फूर्त्पणे. बहुतेक प्रतिसाद टीकात्मक/खिल्ली उडविणारे असतात. अशाच एका कवितेवर आलेला एक फारच बुचकळ्यात टाकणारा प्रतिसाद मला आठवतोय .... "अभिजात काव्य". अजूनही त्या प्रतिसादाचा गर्भितार्थ मला कळलेला नाही.

Proud

(१२) हृदयद्रावक अशा विषयावरच्या कवितेवर हा प्रतिसाद
प्रतिसादक, "कविता हृदयस्पर्शी आहे" म्हणतोय की
"अरेरे ! कशाला वाचली ही कविता मी" असा भाव ?

कविता वाचून भा.पो. म्हणजेच वाचकही दु:खी झाल्याचे कळवणे.

(१३) दुर्लक्ष / अनुल्लेख
कविता/लेखन सहज समोर दिसत असून देखील तिच्यावर अजिबात प्रतिसाद न देणे. हा देखील एक प्रकारचा प्रतिसाद असू शकतो का ? असेलही .....

 • सगळ्याच लेखनावर प्रतिसाद देणे शक्य नसणे.
 • वाचूनही अनुल्लेख करणे
 • लेखन प्रतिसाद देण्याच्याही दर्जाचे नसणे
 • लेखक/कवी आपल्या कंपूतला नसणे

काका, लेखकांची एक सवय शिसारी आणणारी असू शकते. काही लोकांना लेखनात सढळ हस्ताने स्मायली वापरण्याची सवय असते. म्हणजे टीव्हीवरच्या तथाकथित विनोदी मालिकांमधे कृत्रिम हसू पेरले जाते त्यासारखे. आपला लेख विनोदी असल्याचे किंवा आपल्याला विनोदबुद्धी असल्याचे दाखवण्यासाठी लेखनात (काही लेखनाला लेख म्हणणं जीवावर येतं) वैताग येईल इतके स्मायली दिले जातात. जिथे लेखन करणार्‍याला वाचकांनी आपल्या वाक्यांवर हसावं असं वाटतं तिथे एक किंवा अनेक स्मायली टाकण्यात येतात. अशा लेखनावर काय प्रतिसाद द्यावा सुचत नाही. बरं तिथे नकारात्मक प्रतिसाद दिला तर तो खेळकरपणे घेतला जात नाही. त्यावर इतरत्र हिणकस चर्चा होतात आणि तो नकारात्मक प्रतिसाद देणार्‍या वाचकांचीच अक्कल काढली जाते. म्हणून अशा लेखनावर प्रतिसाद द्यावासाच वाटत नाही.

मी आणि कविता.....३६ चा आकडा..शाळेतल्या लहान पना पासुन...मला ती कळत नाही..आणि ती मला समजुन घेत नाही...

उकाका, प्रतिसादांमागची मानसिकता! बापरे.... बराच विचार केला आहे.
काका,
मला तरी असं वाटतं वाचायला रोज इतकं काही असतं, की वाचलं एवढं कळविण्यापुरते काही सांकेतिक प्रतिसाद असावेत हे Biggrin

चालू द्या! >>>
देवकाका, ही प्रतिसादाची कॅटेगरी वाद-विवादांसाठी आहे ना? इथे कशाला? उकाका, ही पण आता अ‍ॅड करा! Proud

उकाका, फारच मज्जा आली, प्रतिसादाचे प्रकार वाचतांना. मंदारचे स्पष्टीकरणही योग्य.

(७) "वाचली"
हा प्रतिसाद देखील विरळाच दिसतो. आणि ते फार चांगलंच आहे म्हणा !
कारण यावरून हे कळत नाही की प्रतिसादकाला, "मी कविता वाचली" असं म्हणायचंय की "माझ्या कठोर प्रतिक्रीयेपासून कविता वाचली" असं सुचवायचंय ? >>> Biggrin हे एकदम भारी!

काही कवी ललितालाच कविता म्हणतात ( मला दोन्ही वेगवेगळ्या वाटतात अन आवडतात ही वेगवेगळ्याच... एक से भले दो Wink )
तेव्हा अश्या कवितांच्ची खिल्ली उडवायला जाम मजा येते . इथे मला माझी एक कविता(?) आठवली ...लिन्क देत आहे Biggrin

रसिकांबद्दल मनापासून आदर बाळगून, त्यांनी दिलेल्या प्रतिसादांचा नीट अभ्यास करणं मला तरी अत्यावश्यक वाटतं. स्वत:च्या लेखनातले गुण-दोष समजायला, त्यात सुधारणा करायला रसिकाचा प्रतिसाद महत्वाचा हातभार लावू शकतो. रसिकाचा प्रतिसाद, अभिप्राय, दाद यामुळेच तर एखाद्या लिखाणाला/रचनेला कलेचा दर्जा प्राप्त होतो असं माझं वैयक्तिक मत आहे.>>>>> असा विचार करुन अभिप्राय देणारा विरळाच..
१] सामान्यतः कविता या प्रकाराकडे येणारा रसिकवर्ग कमीच.
२] आपल्या अभिप्रायाने कवी दुखावला तर जाणार नाही ना - या शंकेमुळे संदिग्ध अभिप्राय येत असावेत.
३] आपल्या मित्राचीच कविता आहे ना, चला देउन टाकू काही तरी प्रतिसाद
अशा अनेक मनोवृत्तीतून तुम्ही म्हणता तसे प्रतिसाद येत असावेत.
तुम्ही जे लिहिले आहे ते अगदी मार्मिक - मिशिकलपणे पण काही सुचवतही - कोण कसे घेईल कोण सांगू शकेल ?

माझ्या दृष्टीने अर्थ सांगतो,

(१) फक्त एक स्मायली ….. हा असा Happy

वाचायला लावली असेल आणि आवडली नसेल तर झक मारत हा प्रतिसाद देतो

(२) कवितेतल्या दोन-चार ओळी लिहून त्यापुढे "मस्त", "छान", यासारखे शब्द

नेमके तेवढेच आवडले

(३) नुसतंच "वा !" किंवा "वा वा !" (पुढे/मागे काहीच शब्द नाहीत)

अतिशय आवडली, स्पीचलेस सारखी भावना

(४) "!" "!!" "!!!"

हा प्रतिसाद मी देत नाही

(५) "हं" "ह्म्म" "ह्म्म्म"

म्हणणे पटले परंतू रचना पद्य म्हणून भावली नाही

(६) "."

(७) "वाचली"

(८)

(९)

(१०)

(११)

(१२)

हे प्रतिसाद मी देतच नाही

(१३) दुर्लक्ष / अनुल्लेख

ह्यासाठी एक सेपरेट लेख लिहावा लागेल

असो, प्रतिसादावरून काहीही ठरवू नये. इच्छा असल्यास ज्यांना कविता जास्त समजते असे आपल्याला वाटते त्यांच्याशी प्रत्यक्ष अथवा विरोपाद्वारे सविस्तर बोलावे. आणि तेव्हा त्याच माणसाला आपल्यापेक्षा जास्त कळते हे कधीही विसरू नये कारण तो काही सांगायला लागला की मग कधी कधी आपल्याला आपला इगो आठवतो आणि मग जे शिकायचे असते ते आपण शिकू शकत नाही.

भिडे सर
तुमचे आडनाव भिडे असले तरी कोणाच्याही बऱ्या वाईट प्रतिसादाची भीड न बाळगता लिहीत राहावे हेच श्रेयस्कर असे मला वाटते..
लहान असूनही आपणास सांगत आहे असे वाटून घेउ नयी ही विनंती .................

अहो प्रतिसादांचे काय घेऊन बसलात, मला तर मूळ कविताच कळत नाही.

तर मी १३ नं चा प्रतिसाद देतो. त्याचा अर्थ मला काही कळले नाही. पण माझी काही तक्रार नाही. तुम्हाला लिहायचे ते लिहीत रहा.

छान लेख आहे.
बहुतेक कविता माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे असतात कारण त्यातून कवीला जे कांही सांगायचे आहे ते साध्या सोप्या शब्दांम्धून [भा रा तांबे, नारायण सुर्वे, वींदा यांच्यासारखे कवी वगळता] येत नाही. ज्या कविता थोड्या कळतात असे वाटते न वाटते तोवर त्या गूढ होत जातात.
त्यामुळे कोणी रसग्रहण करून एखादी श्रेष्ठ कविता समजाऊन सांगितली तरच मला तिचा पूर्ण आनंद घेता येतो.
यात कवीचा दोष नसून काव्य समजण्यात आपण कमी पडतो असेच मी मानतो.

धाग्यातून एक अतिशय महत्वाचा मुद्दा वर आलेला आहे. खरे तर स्वतंत्र लेखाचीच त्या मुद्याची पात्रता आहे.

कविता संदिग्ध का असावी?

संदिग्ध असणे नसणे हे सापेक्ष आहे असे मान्य करूनही सोपे लिहिणे शक्य असते हे का विसरले जाते?

या पातळीची चीरफाड सुरू केली तर लोकांना आवडेल का?

प्रशासक अश्या प्रकारच्या टिपण्ण्यांना प्रतिबंध घालतील इतपत वाद होतील का?

अनेक कविता वाचून असे वाटते की सरळ छान लिहिता आले असते की? उगाच का असे काहीबाही लिहायचे? आणि जे बिकट, अवघड असे काहीतरी असते त्याला 'आपण उच्च अभिरुचीचे रसिक आहोत' हे दाखवण्यासाठी सुंदर म्हंटले जाते का?

मुद्दा फार महत्वाचा आहे. पण या संकेतस्थळावर तो लावून धरायचा म्हणजे बहुतेकांचा रोष पत्करावा लागणार. त्यालाही जुमानण्याचे कारण नाही. पण पूर्वग्रह न ठेवता म्हणणे ऐकले जाईल की नाही याचीच शाश्वती नाही वाटत. मग उगाच त्याला कंपूबाजी, कळपाई अशी नांवे मिळणार, त्यापेक्षा राहूदेत, अशी आपली एक सोयीस्कर भूमिका घेतली जाते शेवटी!

उल्हास भिडेंचे अभिनंदन!

कळावे

गं स

कविता संदिग्ध का असावी? >> कविता स्वांतसुखाय असते म्हटल्यावर संदिग्धतेचा प्रश्नच कुठे उद्भवतो ?

भिडेकाका 'लेख/कविता ह्यांच्याशी काहिही संबंध नसलेली प्रतिक्रिया' प्रतिक्रियेचा हा प्रकार राहूनच गेला Happy

Lol
खुसखुशीत लेख आहे.
१३ हा अनुक्रमांक हल्ली १२ (अ) असा दिला जातो. मी १३ क्र. चा अनुल्लेख केला. Proud