निराळा योगी चे प्रकाशन...

Submitted by अ. अ. जोशी on 16 December, 2011 - 12:02

दिनांक 4 डिसेंबर 2011 रोजी भरत नाट्य मंदिरात सुचेतानंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या जीवनावर आधारीत 'निराळा योगी...' या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे चे संचालक श्री. एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. गुंजवणे येथील श्री. गुलाबराव रसाळ, सरपंच श्री. लिम्हण आणि भागवतांबरोबर काम केलेले श्री. सादू पवार व विंझर गावचे रायरीकर मंचावर उपस्थित होते.मी आणि भागवतांची कन्या म्हणजेच माझी आजी श्रीमती गंगूताई लेले आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साधारण ३ वर्षे माहिती जमा करून हे कादंबरी तयार झाली.

एका निराळ्या योग्यासाठी असलेल्या कार्यक्रमाची सुरूवात नेहमीच्या प्रकाशन समारंभांपेक्षा निराळी आणि अतिशय रमणीय झाली. निलिमा नृत्यालयाच्या सौ. निलिमा हिरवे यांनी आपल्या विद्यार्थिनीच्या साथीत मुंडकोपनिषदातील 'ये अरण्ये तपश्रद्धे..' या श्लोकापासून सुरूवात करून मी भागवतांवर लिहिलेल्या काही ओळी, तसेच भागवतांनी लिहिलेल्या काही ओळी यावर नयनरम्य कथ्थकनृत्य सादर करीत महर्षी व्यासांच्या 'न च कश्चित शृणोति माम' या श्लोकावर संपविले.

त्यानंतर भागवतांच्या जीवनावरील एका प्रसंगाचे वाचन झाले. भागवतांनी सर्वोदय क्षेत्रात चालू केलेल्या 'रामभेट यात्रेचा' प्रसंग नमूद करून त्यावरही एक उत्कृष्ठ लोकनृत्य निलिमा नृत्यालयाच्या बारामतीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. नृत्यासाठी पराग हिरवे(तबला), पराग जोशी(साईड ह्रिदम), निलेश देशपांडे(बासरी), सौ. शुभदा आठवले(संवादिनी) आणि गौरी करंबेळकर(गायन) यांनी साथ केली. रामभेट यात्रेचे गीत संपल्यावर मान्यवर मंचावर आले. कै. भागवतांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन झाले.

श्रीमती गंगूताई लेले यांनी आप्पासाहेबांच्या जीवनातील भावपूर्ण प्रसंग सांगून आप्पासाहेबांच्या सर्वसमावेशक वृतीबद्दल सांगितले.

श्री. एस.जी. चव्हाण यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशिक्षण केंद्रामागे भागवतांचा केवढा महत्वाचा वाटा होता याची उदाहरणे दिली.

डॉ. न. म. जोशी यांनी आपल्या आकर्षक वक्तृत्व शैलीत या कादंबरीचे कौतुक करीत, 'ही कादंबरी अनेकांना मार्गदर्शक ठरू शकेल. विशेषत: नगरसेवकांसाठी भागवतांचे हे चरित्र पाठ्यपुस्तक ठरावे असे आहे.' असे नमूद केले. कादंबरीतील भागवतांच्या लहानपणचा एक प्रसंग सांगत,' आवश्यकतेपेक्षा जास्त न मागणारे एस.आर. भागवत, हे खरोखरीच योगी होते आणि निराळा योगी हे नाव त्यांना सार्थ ठरू शकते' असे नमूद केले.

डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी चरित्रात्मक कादंबरीबद्दल माहिती सांगून, 'कादंबरीची सुरूवात एका झाडूवालीच्या प्रसंगाने करून भागवतांची व्यथा समजू शकते.' असे सांगितले. ते पुढे म्हणाले, 'कादंबरीचा शेवट भागवतांच्या प्रायोपवेशनाने झाला आहे. त्यामुळे हा योगी निराळा आहे असे समजते.'

शेवटी भागवतांच्या जीवनातील सर थॉमस गे यांच्याबरोबरच्या प्रसंगाचे वाचन होऊन, भागवतांच्या जीवनावर आधारीत गीताबरोबर पडद्यावर दृकश्राव्य माध्यमातून भागवतांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ते पाहताना अनेक श्रोत्यांना आपले अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा महाजन यांनी केले. प्रसंग वाचन सौ. सुजाता कर्वे, कु. पूनम भागवत आणि कु. जुई लेले यांनी केले.

गुलमोहर: 

चांगला कार्यक्रम झाला, रंगला होता. मला अधिक भावलेल्या गोष्टी:

१. न म जोशींचे भाषण अतिशय सुंदर झाले व रंगले. न म जोशींनी अप्पासाहेब भागवतांवर आधी स्वतःही एक पुस्तक लिहिलेले होते. त्यामुळे त्यांना या चरित्रात्मक कादंबरीबाबत अधिक जिव्हाळा होताच, पण त्यांच्या भाषणात असेही दिसून आले की अप्पासाहेब भागवतांसारखी माणसेच आता राहिलेली नाहीत.

२. द भि कुलकर्णींच्या भाषणात त्यांनी मांडलेला एक मुद्दा आवडला. तो म्हणजे अजय जोशी हे चरित्र लेखक किंवा कथा विस्तारक नसून या पुस्तकातील अनेक बारकाव्यांचा अभ्यास करून व तपशील देऊन ते नुसते थांबलेले नाहीत तर त्या सर्व बाबींना त्यांनी कथासूत्राने जोडलेले आहे. या अर्थाने ते मूळ कादंबरीकारच आहेत व त्यांनी स्वतःकडे गेतलेली कथाविस्तारकाची भूमिका हा विनय म्हंटला पाहिजे.

३. कार्यक्रमाची वेळ व नियोजनही फार आवडले. एक तर रविवारी सकाळीच कार्यक्रम असल्यामुळे सुट्टीची संध्याकाळ सर्वांना उपलब्ध झालीच. त्याशिवाय कार्यक्रम सरळ व सुटसुटीत होता. ज्यांना सभागृहातील व्यासपीठावर आमंत्रित केलेले होते ते सर्व लोक तेथे असण्यास अत्यंत पात्र होते. अजय जोशींच्या वृद्ध आजी कशा बोलतील हे मला अजिबात माहीत नव्हते. पण त्यांच्या वक्तृत्वातील प्रवाहीपणा, साधेपणा व संदेश फार फार आवडले.

किंचित कमी आवडलेली बाब इतकीच की नृत्य व आप्पासाहेब भागवत यांच्या चरित्राबाबतचा कार्यक्रम यांची सांगड मला तरी घालता आली नाही.

दुर्दैवाने मला पुस्तक तेव्हा मिळालेले नसले तरी ते लवकरच मिळेल.

अजय जोशी यांनी या लेखनासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचा उल्लेख केल्याशिवाय प्रतिसाद संपवणे अन्याय्य ठरेल.

अजय यांनी केसरी व इतर काही वर्तमानपत्राच्या वाचनालयात अक्षरशः कित्येक तास घालवून सर्व माहिती मिळवली. कित्येक जुन्या खोडांना भेटून त्यांनी सत्यासत्यता पडताळल्यावर तपशील कादंबरीत समाविष्ट केला. आम्ही चहाच्या टपरीवर भेटायचो तेव्हा अजय जोशी त्यांच्या प्रयत्नांच्या मालिकेबद्दल व अडचणींबद्दल भरभरून बोलत असायचे. एका स्मृतीमधून निघून गेलेल्या योग्याबद्दल अशी माहिती मिळवणे हे कार्य त्यांनी एखाद्या पूजेप्रमाणेच मानलेले होते हे दिसून येत होते.

मला स्पष्टपणेही दोन गोष्टी बोलाव्याश्या वाटत आहेत. आम्ही दोघे जुने व चांगले मित्र असल्याने, हा प्रतिसाद अजय यांनी वाचला तरी त्यांचा काही गैरसमज होणार नाही ही खात्री आहे.

१. आप्पासाहेब भागवत हे अजय जोशींचे पणजोबा असल्याने अशी चरित्रात्मक कादंबरी लिहून व स्वतःच प्रकाशितही करून त्यांची थोरवी जगासमोर आणणे हे काही मशरूम टीकाकारांना स्वार्थी व स्वतःचेच महत्व वाढवण्याची कामगिरी वाटू शकेल. या कादंबरीच्या वितरणाबाबत अत्यंत अलिप्त राहणे हे जवळपास अशक्य असले तरीही ते अजय जोशी यांच्यातील लेखक, गझलकार व कवी यांच्यासाठी पूरक आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

२. गेल्या काही महिन्यात मायबोलीवर किंवा कोणत्याच संकेतस्थळावर अजय जोशी यांचे साहित्य वाचायची सम्धी रसिकांना मिळालेली नाही. या सर्व कालावधीत ते या कादंबरीच्या कामात गुंतलेले होते. तरीही वेळ काढून, व्यक्त होण्याची मुभा असलेल्या स्थळांवर विचार प्रकाशित करणे हे त्यांनी करायला हवे होते असे वाटते. असो! आता वाचायला मिळेलच म्हणा!

एकंदर त्यांच्यातील नि:स्वार्थी चरित्रलेखक, कवी - गझलकार व अभ्यासू कथालेखकास व अर्थातच हासर्‍या माणसास पुढील कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा!

-'भूषण कटककर'!

भूषण,
प्रथम सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

** वेळ काढून, व्यक्त होण्याची मुभा असलेल्या स्थळांवर विचार प्रकाशित करणे हे त्यांनी करायला हवे होते असे वाटते
वेळ अजिबातच नव्हता असे नाही. मात्र एका भूमिकेतून कादंबरी लिहीत असल्याने दुसर्‍या भूमिकेत जाऊन काही लिहिणे हे मला या कादंबरीसाठी योग्य वाटले नाही. गेल्या ६ महिन्यात मी माझ्या नातेवाईकांकडेही गेलो नाही. कारण आप्पासाहेब पूर्णपणे समजून घेऊनच मला लिहायचे होते. ऐन दिवाळीतही रोज १० तास मी या कादंबरीवर काम केले.

** नृत्याबद्दल...
नृत्य आणि आप्पासाहेब यांचा संबंध नाही. मात्र ज्या गीतांवर किंवा श्लोकांवर नृत्य केले गेले त्यांचा संबंध आहे. महत्वाचे म्हणजे आप्पासाहेबांचे चरित्र ऐकल्यावर नृत्यकारांनी येण्याजाण्याच्या खर्चा शिवाय कशाचीही मागणी केली नाही. नृत्य इतर अनेकांना आवडलेही. आणि त्यामुळेच कार्यक्रमात वेगळी गंमत आली असेही काहींना वाटले. तर तुम्ही म्हणता तसेही काहींना वाटले.
मात्र, मला हवा तसाच कार्यक्रम मी करणार होतो. आणि केलाही. तरी मला पाहिजे होता त्याच्या केवळ ५०%च झाला. इतर काही गोष्टींच्या नियोजनासाठी वेळ मिळू शकला नाही. असो.

फोटोंचा फाईल साईज मोठा झाल्याने जोडू शकलो नाही.
आता लवकरच पुन्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद.
अजय