उसळून असा लाव्हा उडतो

Submitted by बेफ़िकीर on 15 December, 2011 - 03:11

उसळून असा लाव्हा उडतो
तिरडीत चराचर डचमळते
तंतू रुतलेले ठिपक्यावर
पाहून पुन्हा नाते जुळते
अवकाश करोडो हाकांनी
भानावर आणे रथघोडे
सारथी निघाला माघारी
म्हणतो अजुनी जगुद्या थोडे

रुणझुणत्या शाळेच्या पोरी
आळसती क्षितिजे किलबिलती
पाणी भरते मुरडत गोरी
गगनाच्या नजरा झिलमिलती
आगाऊ किरणांना सुटते
शालीन धुक्यामधले कोडे
सारथी निघाला माघारी
म्हणतो अजुनी जगुद्या थोडे

हंबरत्या गायी पाझरती
म्हातारी अंगण सारवते
सूर्यापेक्षाही अभिमानी
आधीच कोंबडे आरवते
बंबावर दवभारीत विसण
काकुळतीला जल शिंतोडे
सारथी निघाला माघारी
म्हणतो अजुनी जगुद्या थोडे

कायेवर वाफा पाण्याच्या
धरतीवर उगवे रोप खुळे
भिजलेल्या उर्मट बाण्याच्या
अंगात नष्टता पूर्ण रुळे
सत्याची वेसण जन्माच्या
अर्वाच्य रहस्याला फोडे

सारथी म्हणत नाही आता
जगुद्या अजुनी जगुद्या थोडे

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

कायेवर वाफा पाण्याच्या
धरतीवर उगवे रोप खुळे
भिजलेल्या उर्मट बाण्याच्या
अंगात नष्टता पूर्ण रुळे
सत्याची वेसण जन्माच्या
अर्वाच्य रहस्याला फोडे

सारथी म्हणत नाही आता
जगुद्या अजुनी जगुद्या थोडे>>>>

वावा..

आवडला हा वेगळा ढंग.

पाणी भरते मुरडत गोरी
गगनाच्या नजरा झिलमिलती
>> हिंदी काव्य रचताना ही झाली का?

बाकी बरे लिहीले रे
तो सामना- लिखान अर्धाच सोडला का

उसळून असा लाव्हा उडतो ..बदलून

हे काव्य आम्हांस अत्यंत आवडलेले आहे. परंतुअ परखडपणे आम्हांस असे म्हणावेसे वाटते कि रसग्रहणासाठी आवश्यक अशी सौंदर्यस्थळे शोधतांना प्रयास जाहले. कारणें अशी कि, कवीने वापरलेल्या प्रतिमा अत्यंत रूक्ष भासल्या असे असले तरीही कवीस प्रसववेदना होत असतांना हीच चित्रे मनःपटलासमोर का आली असतील याचा विचार व्हायला हवा असे वाटते. प्रतिमांमधून उभी राहणारी चित्रे आम्हांस काही सांगू पाहत असतांना सारथी कोण असावा याचे जे कोडे पडते ते सुटतांना कवीच्या प्रतिभेस सलाम करावासा वाटत आहे.

आगाऊ किरणांना या ओळींमुळे काही वाचकांना अंतर्मुख व्हावे लागत आहे..

सूर्यास्त, सुर्योदय, आणि मध्यान्हही माझ्या मते वर्णिले आहे. सर्वशक्तिमानही मृत्यूच्या कल्पनेने कसनुसे होतात हेही कविता सांगते. वैयक्तिक मत.
मस्त काव्य.

ही कविता वाचून मला कुसुमाग्रजांची खालील कविता आठवली...

क्षितिजाचे तट फोडित धावे
अश्व सनातन मार्गावरती
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती

रवी शशीचे पराजित पलीते
स्वार तयावर बसला आहे
अश्व न जाणे, स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे

-अभिनव

अफाट !!

कविता एकंदर छान वाटली
नव सॄष्टी रचण्याचा दूष्टीकोन दिसतो आहे
नव रोप अर्थात नविन बालक
प्रसव कळा आल्यवर म्हातारी पोटावरून हात फिरविते (सारविते) नव बालक जन्मवेळ जवळ आल्यावर मग ती सुर्य उगविण्या आधी का असेना जन्माला येते (कोंबड, )
बाकी अजुन रचग्रहण करण्याची आवश्यकता वाटणार नाही.

धन्यवाद !

हे काय बेफिकीर,अशी कविता वाचकांवर सोडून नामानिराळे होणे बरे नाही..अर्थ लावण्याच्या प्रक्रियेची ऐशीतैशी होतेय.उन्मुक्त प्रतिमांमधून मरणावर मात करणारी जीवनेच्छा शेवटी मंदावत गेलेली दिसते आहे.. विनाशाचा लाव्हा, नित्यनैमित्तिक उजाडत्या दिवसातलं सौंदर्य अन तोचतोचपणा सार्‍याच्या पलिकडे.असंच की अजूनच काही! काही असो, संज्ञाप्रवाहाची एक भानगड मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रात वाचली होती थोडीशी ( 'अविद्वानपण' जपण्यासाठी सौंदर्यशास्त्राच्या जास्त खोलात जात नाही ), ती आठवतेय ही कविता वाचताना .

अफाट अफाट अफाट........ शब्द तोकडे पडतील स्तुतीसाठी..... एक महान रचना वाचायला मिळाली आज.... खुप खुप आभार बेफिकिरजी......