छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग ... !

Submitted by सेनापती... on 14 December, 2011 - 03:05

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल

गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे जसे कुठल्याही राजाकडे मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती हे बलाचे ३ प्रकार असणे आवश्यक असते तसेच कुठल्याही राजा आणि राज्याची ४ बलास्थाने असतात. कोश(खजिना), सैन्य(लश्कर), दुर्ग आणि सुह्रदय(अरिमित्र). ह्यातील प्रभुशक्ती मधल्या एका म्हणजेच 'कोश' या बलस्थानाबद्दल आपण गेल्या भागात थोड़ी माहिती घेतली. प्रभुशक्ती मधल्या 'सैन्य' या दुसऱ्या बलस्थानाचा वापर करून राजांनी कोश-संचय कसा केला हे सुद्धा पाहिले. छत्रपति शिवरायांनी शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले 'संपूर्ण राज्याचे सार'. आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ.

राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते. 'सह्याद्री' हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'. जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड, कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.

स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!!

'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' आणि 'गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले' या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण." प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य कोश-संचय नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. अश्या दुर्गम दुर्गांचे शासन सुद्धा परम उग्र होते.

राजाभिषेकानंतर श्री शिवछत्रपति महाराजांनी प्रधानमंडळ कानून जाबता यामध्ये कलम १२ गडांबद्दल लिहिले होते. ते अशाप्रकारे,"किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें."

१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता."

तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."

छत्रपति शिवरायांनी कोश-संचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले. तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. 'सह्याद्री'च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले. मराठ्यांची युद्धपद्धती नेमकी काय होती? त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती? या संबंधाने 'सैन्य या तिसऱ्या बलस्थानाबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.
.
.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था

संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती,

पुढे संभाजीराजांनी दुर्गप्रशस्ती नावाचा एक ग्रंथही रचला. त्याची मुळे शिवाजीमहाराजांच्या दुर्गबलसंवर्धनात दिसून येतात.

चू.भू.दे.घे.

आ.न.,
-गा.पै.

छान माहिती. महाराजांच्या या दूरदृष्टीची फळे पुढेही खूप काळपर्यंत, म्हणजे इंग्रजांनी बहुतेक किल्ले तोफा लावून पाडेपर्यंत दिसून आली. जिंजीच्या किल्ल्याने राजारामाचं रक्षण केलं तर गोव्यातल्या मर्दनगडाच्या मदतीने पोर्तुगीजांना पायबंद घालणं मराठ्याना शक्य झालं. दुर्गांच्या आश्रयाने मराठे परत परत उचल खातात हे लक्षात आल्यामुळे इंग्रज आणि पोर्तुगीजानी बहुतेक किल्ले पाडून टाकले, जेणेकरून कोणी "दुसरा शिवाजी' तयार होऊ नये!