स्वप्न

Submitted by आनंदयात्री on 14 December, 2011 - 01:23

तुझं पहिल्यापासून असंच!

स्वप्नांची पेरणी करत करत
वाट चालायचा तुझा स्वभाव!
पण स्वप्नं रुजून वर आली की
ती खुडून ओंजळीत घ्यायला तू
तिथे नसणारच!
तू पुढच्या वळणाच्याही पुढे पसार!
आणि यांचा उपभोग घेणारे नेहमी वेगळेच असणार!
बरं, याला तुझा नि:स्वार्थीपणा म्हणावं तर तसंही नाही!
तुझा हेतू फक्त पेरणीचाच - फळाची आशा तुला नाहीच!
उमलून आलेली तुझीच स्वप्नं
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...
आणि एक दिवस पुन्हा मातीमोल होऊन जायची..

तुला असा स्वप्नांचा फक्त प्रवासच करायचा होता,
हे उशीरा कळलं..

आता वाटतं, मी तुझं स्वप्न झालो नसतो,
तर फार फार बरं होतं!
'हे स्वप्न फार वेगळं आहे,
हे एकवेळ पुन्हा मातीत मिसळेल,
पण दुसर्‍या कुणाच्या हवाली होणार नाही'
असं येणारे जाणारे म्हणायचे ते खरंच होतं!

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/12/blog-post_14.html)

गुलमोहर: 

तुझा हेतू फक्त पेरणीचाच - फळाची आशा तुला नाहीच!
उमलून आलेली तुझीच स्वप्नं
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...
आणि एक दिवस पुन्हा मातीमोल होऊन जायची..
>>>> खासच

रचना आवडली Happy

ये ब्बात!!
सुंदर मांडणी, शब्दातला सहजपणा खासच!
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...>> हा वापर अतिच आवडलाय!
जियो Happy

सुंदर लिहीलं आहेस आंद्या. खूप आवडलं.
>>तुला असा स्वप्नांचा फक्त प्रवासच करायचाय
हे उशीरा कळलं..
जबरदस्त!!

आनंद, क्या बात ! सुरेखच.

मला या ओळी विशेषच आवडल्या.

<<<स्वप्नांची पेरणी करत करत
वाट चालायचा तुझा स्वभाव!
पण स्वप्नं रुजून वर आली की
ती खुडून ओंजळीत घ्यायला तू
तिथे नसणारच!>>>>

'हे स्वप्न फार वेगळं आहे,
हे एकवेळ पुन्हा मातीत मिसळेल,
पण दुसर्‍या कुणाच्या हवाली होणार नाही'>> हे खुप आवडल..

ह्याला मुक्तक म्हणतात ना?
चांगल जमुन आलय!
एकवेळ पुन्हा मातीत मिसळेल,
पण दुसर्‍या कुणाच्या हवाली होणार नाही' >>
आवडलं

'हे स्वप्न फार वेगळं आहे,
हे एकवेळ पुन्हा मातीत मिसळेल,
पण दुसर्‍या कुणाच्या हवाली होणार नाही'
>>>>>>>>>>>>>>

सुंदर..!!!

उमलून आलेली तुझीच स्वप्नं
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...
आणि एक दिवस पुन्हा मातीमोल होऊन जायची.. >>>>
.... छान

सर्व मित्रमैत्रिणींचे आभार! Happy

इन्द्रधनु, संध्या - हो.. हे थोडंसं ललितही आहे आणि कविताही! पण स्फुट, मुक्तक अशी कॅटॅगरी नाही म्हणून ललितमध्ये टाकलं...

यात्र्या कवितेतलं बाकी कळंत नाही पण शब्द आणि रचना आवडली

हेही महत्त्वाचं आहे!! Happy