बनून वादी अन् प्रतिवादी मी माझ्याशी झगडत असतो
मनावेगळे घडता क्रोधे मी माझ्यावर बरसत असतो
पहिले वहिले प्रेम भंगले वैषम्याला दिला न थारा
नभी पाहुनी शुक्रतारका मनास माझ्या रिझवत असतो
घाव दिले हे कुणी मला मी नोंद तयांची कधी न केली
काळासंगे चालत चालत जखमांना मी बुजवत असतो
जीवन झाले माती आता, करून ओले त्या मातीला
मडके पक्के करावया मी गोरा(*) होउन तुडवत असतो
धोपट मार्गी पुरे जाहले जगणे आता फिकेफिकेसे
बंड करूनी तिरप्या मार्गी कधी तरी मी नकळत असतो
खूप ऐकल्या गानमैफिली रागरागिनी, ठुमर्या, टप्पे
मना आवडे फ्यूजन आता ताल धरूनी थिरकत असतो
आज जगी अंधार एवढा दीपस्तंभही कुणीच नाही
आदर्शांचा प्रकाश बघण्या इतिहासाला उकरत असतो
रेशिम धागे, असंख्य गाठी, नात्यांचा हा किचकट गुंता
गोफ जरी अवघड विणलेला जिद्दीने मी उकलत असतो
झोतामध्ये रहावयाची आस अधूरी "निशिकांता"ची
लक्ष वेधण्या, वेशीवरती आज नगारे बडवत असतो
(*) संत गोरा कुंभार
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
झोतामध्ये रहावयाची आस अधूरी
झोतामध्ये रहावयाची आस अधूरी "निशिकांता"ची
लक्ष वेधण्या, वेशीवरती आज नगारे बडवत असतो
व्वाह. सुंदर गजल निशिकांतजी.
बापरे!! एकेक शेर म्हणजे..
बापरे!! एकेक शेर म्हणजे.. खटाखट पडलेले खटके आहेत... जबरदस्त!!
धोपट मार्गी पुरे जाहले जगणे आता फिकेफिकेसे
बंड करूनी तिरप्या मार्गी कधी तरी मी नकळत असतो
इथे 'नकळत' च्या जागी भटकत...कसं वाटेल?
काय जबरी आहे हे काका -
काय जबरी आहे हे काका - अफलातून, सह्ही..........शब्द अपुरे पडताहेत कौतुक करायला........
आज जगी अंधार एवढा दीपस्तंभही
आज जगी अंधार एवढा दीपस्तंभही कुणीच नाही
आदर्शांचा प्रकाश बघण्या इतिहासाला उकरत असतो>>>
व्वा!!
रेशिम धागे, असंख्य गाठी,
रेशिम धागे, असंख्य गाठी, नात्यांचा हा किचकट गुंता
गोफ जरी अवघड विणलेला जिद्दीने मी उकलत असतो
छान!
रेशिम धागे, असंख्य गाठी,
रेशिम धागे, असंख्य गाठी, नात्यांचा हा किचकट गुंता
गोफ जरी अवघड विणलेला जिद्दीने मी उकलत असतो>> डोळे भरले रे.
फ्युजन व नगारे हे शेर आवडले.
फ्युजन व नगारे हे शेर आवडले.
बाकी शेर वृत्तांतासारखे झाले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.