मिठाई

Submitted by pulasti on 19 August, 2008 - 23:13

विचार आला पुन्हा जुना तो, जुनी धिटाई तशीच आहे
"बघा झटकले!" अशी आमची जुनी बढाई तशीच आहे!

जरी पुढारी हसून सांगे - "जवळजवळ संपलीच समजा! "
घरात दारात पोचलेली सुरू लढाई तशीच आहे

अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे

"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे
"किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे

कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...

गुलमोहर: 

तिसरा सोडून इतर सर्व आवडले.... शेवटचे २ तर खासच.

    ***
    We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

    >>अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
    अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे

    सुरेख!

    >>कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
    अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...

    वाह!

    प्रत्येक शेरातल्या एवढ्या सुंदर वेगवेगळ्या छटा कश्या जमतात हो तुम्हाला?

    किती सहज, पुलस्ति! तिसरा अगदी टँजम्ट वाटतोय... बाकीचे मस्तचं. शेवटचा तर खास.

    अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
    अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे

    क्या बात है, पुलस्ति!! बढिया!!

    ते 'भिकार पोरे' जरासे खटकते आहे!! 'भिकार' ह्या शब्दाचा प्रचलित अर्थ बहुदा त्याला कारणीभूत असावा. (भिकार सिनेमा इ.)

    शेवटच्या शेरात 'बिलगून' चे प्रयोजन समजते आहे... पण 'विटेवर बिलगून' हे थोडे वेगळेच वाटते आहे.

    एकंदरीत गझल छान हे ओघाने आलेच Happy
    आभिनंदन!!

    नचिकेत, "भिकार" ऐवजी चपखल दुसरं काही सुचलं नाही. "विटेवर" बिलगून - माझा लिहितानाही हाच गोंधळ झाला होता! "विटेला बिलगून" असा पर्याय आहे, पण मग ते "उभी" शी नीट सांगड घालत नाही. अमुकला बिलगून तमूकवर उभी आहे - आणि अमुक आणि तमुक दोन्ही वीट आहे; अशी ती तांत्रिक गडबड झालीय. बघ, तुला काही सुचलं तर कळव.
    धन्यवाद!

    पुलस्ती मस्तच वेगळे काफिये आहेत ...

    नचिकेतशी पूर्ण सहमत...

    भिकार आणि बिलगणे मला पण खटकले... पण पर्याय आत्ता तरी सुचत नाहीये काही..
    भिकार च्या जागी 'गरीब' बसेल पण त्याला 'भिकारी' ची सर नाही

    निळाई शेर वाचायला मस्त आहे पण मला पूर्ण कळला नाही Sad माझा बुद्धिदोष

    सावळी निळाई म्हणजे कृष्ण का?

      ================
      हीच शोकांतिका तुझी माझी
      काच शाबूत पण चरे होते

        -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
        प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
        एस. एम. जोशी हॉल, पुणे

        "भिकार पोरे" ऐवजी "मुले भिकारी" चालेल का? बिलगून चा विचार करतोच आहे...

        'मुले भिकारी' चांगली सुचना नचिकेत पण परत 'पोरे' ची सर 'मुले' ला नाही...
        पुलस्तीलाच ठरवू दे...

          ================
          हीच शोकांतिका तुझी माझी
          काच शाबूत पण चरे होते

            -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
            प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
            एस. एम. जोशी हॉल, पुणे

            मिल्या म्हणतोय तसं, पोरे आणि भिकारीपण हे दोन्ही आलं पाहिजे...
            नचिकेत, मिल्या - तुम्ही दोघे इतका मनापासून प्रयत्न करताय.. खरच खूप धन्यवाद!!

            मिल्या, निळाईबद्दल - कृष्णाचा संदर्भ नाहिये (तसंही माझं कृष्णाशी फारसं पटत नाही.. पण तो मुद्दा अलाहिदा :). बघ अजून जरा विचार करून...

            नभातली सावळी निळाईबद्दल.... थेंब पाडणारे काळे ढग दिसतात आणिक दोन-चार थेंबुटे पडतातही, पण अजून काळे ढग इतकेही दाटून आले नाहीयेत की आकाश काळे दिसेल... थोड्या ढगांमुळे सावळेपणा आलाय खरा, पण अजूनही आकाशाचे निळेपण दिसतच आहे... अंतर्बाह्य चिंब भिजवणारा मुसळधार पाऊस येत नाहीच, तोसुद्धा 'येतो येतो' म्हणून आल्याचा देखावा करतो...
            असा अर्थ लावल्यावर मला हा शेर इतर शेरांसोबत चालणारा वाटला. चू.भू.द्या.घ्या.

              ***
              Skating away on the thin ice of the new day...

              "आई शप्पथ" शेर आहेत... Happy

              किती वेगळ्या छटा!!!!

              वाह पुलस्ति....
              बढिया...

              प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!

              सावळी निळाई
              फार आवडला हा शब्दप्रयोग!

              >>"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे
              "किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे
              पार भिडला हा शेर!

              सर्व द्वीपदी आवडल्या. वेगवेगवेगळ्या छटा आहेत. हीच तर ग़ज़ल या काव्य प्रकाराची खासियत आहे! व्वा!! Happy

              कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
              अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...

              _/\_

              असे करून पाहिले
              कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
              तिलाच बिलगून त्या विटेवर उभी विठाई तशीच आहे...