मेंढीताई मेंढीताई

Submitted by विदेश on 28 November, 2011 - 23:41

मेंढीताई मेंढीताई
अंगभर लोकर, मज्जा बाई -
थंडी जोरात वाजली तरी
तुला ऐकू येतच नाही ?

बेडूकराव बेडूकराव
का ओरडता डराव डराव ?
येत नाही झोप तुम्हाला -
बाळावर का चिडता राव !

मनीमाऊ मनीमाऊ
म्याऊ म्याऊ बंद करा,
उंदीर दिसत नाही तोवर-
तुम्ही जरा मौन धरा !

भूभूदादा भूभूदादा
येता जाता तुम्ही भुंकता -
चोर चोरी करतानाच
तुम्ही नेमके कसे पेंगता ?

बगळोपंत बगळोपंत
दिसतो तुमचा एकच पाय -
तलावातल्या माशांनी
खाल्ला का हो दुसरा पाय ?

गुलमोहर: