मतीमंद मुलांच्या शाळेला भेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 November, 2011 - 13:26

मती मंद मुल म्हटल की डोळ्यासमोर येतात ते त्यांचे वेंधळे, वेडेपण, कुणी अगदीच अधू. सर्वसाधारण मुलांपेक्षा वेगळ्या मानसीक विश्वात जगणारी ही मुलं. ही मुल अनाथ किंवा गरीब घराण्यातील असतात असे नाही. दुर्दैवाने हे व्यंग एखाद्या बालकामध्ये येत. कुणाला जन्मापासूनच तर कुणाला घात-पात होऊन. अशा मुलांच्या पालकांना आधार वाटतो तो मतीमंद मुलांच्या शाळेचा. आमच्या उरणमध्ये अशी एक
शाळा आहे ज्या शाळेत उरण शहरातील व आसपासच्या गावातील काही मतीमंद मुले शिक्षणासाठी येतात. त्या शाळेला प्रोत्साहन द्यावे व मुलांना थोडा आनंद द्यावा हया उद्देशाने आम्ही इनरव्हिल ग्रुप ऑफ उरणने अशा शाळेला भेट देण्याचे ठरवीले.

गुरुवार दिनांक २४/११/२०११ रोजी इनरव्हिल क्लब ऑफ उरणने मतीमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. आम्ही तिथे गेलो आणि पहीली त्या शाळेला लागलेली शिस्त आमच्या नजरेस आली. शाळेतील सर्व मुलांनी चप्पल अगदी ओळीत काढून ठेवल्या होत्या.

आत गेल्या गेल्या आम्हाला सगळ्यांनी एकाच गजरात नमस्ते केल. तिथल्या मुख्याध्यापीकांनी आमचे स्वागत करून आम्हाला बसायला खुर्च्या आणून दिल्या. आमच्या काही सदस्या यायच्या होत्या म्हणून आम्ही शिक्षिकांना सांगितल तेंव्हा करमणूक म्हणून मुख्याध्यापीकांनी सगळ्या मुलांची नावे त्यांच्या पत्यासकट विचारून बोलून दाखवली. काही मुलांना बोलता येत नव्हत मग अशा मुलांना शिक्षक
स्वतः पहीला बोलून दाखवायच्या मग ती बोलायची. एक मुलगी तर आम्हाला ठेवलेल्या खुर्चीवर येऊनच बसली. मधूनच ती उठून हंसासारख्या उड्या मारत मुलांमध्ये जाऊन बसायची. ती मुलांमध्ये गेली की सगळी मुले एका बाजूला जायची तिला घाबरून. एक मुलगा इतका मस्ती करत होता की शिक्षकांना त्यानी नाकी नऊ आणल. सतात उड्या मारायचा. खाली बसायला सांगितल की कुणाच्यातरी मांडीवर बसायचा आणि त्याच्या
अंगावर जोरा जोरात उड्या मारायचा. मध्येच स्वतःच्या डोक्यावर मारून घ्यायचा.

त्या मुलांचे निरिक्षण करताना असेही जाणवले की त्या मुलांच्यात एकमेकांबद्दल प्रेमही आहे. एका मुलीला निट उठता येत नाही. त्या मुलीला बाजूची मुलगी उठवत होती. पण बाईंनी तिला रोखले व सांगितले की नाही तिचे तिला प्रयत्न करू दे आणि उठू दे. मोठी मुले लहान मुलांची काळजी घेत होती. एक मुलगा सतत बाहेर जायला बघायचा. तो उठून आमच्या जवळ आला. आमच्या क्लबच्या अध्यक्षा त्याची चौकशी करत
होत्या तेंव्हा त्यांचा इनरव्हिलचा बिल्ला पडताळून पाहण्यासाठी तो ओढत होता.

आमच्या इनरव्हिलच्या सदस्या आल्यावर आम्ही सगळ्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यासाठी उभ्या राहीलो. तेंव्हा तो मुलगा माझ्या खुर्चिवर उभा राहीला आणि मला माझ्या खांद्यावरच येऊन बसला. मला खुप बर वाटल. एका क्षणात त्याने आपलेपणा दाखवला.

इनरव्हिल क्लबची एक पद्धत आहे. प्रथम इनरव्हिल क्लबची सेक्रेटरी प्रार्थना म्हणते. तिच्या मागोमाग सगळ्या सदस्या म्हणतात आणी मग कार्यक्रमाला सुरुवात होते. शाळेतल्या मुख्याध्यापीका बाईंनी मुलांनाही प्रार्थना बोलायला सांगितली. मी सेक्रेटरी ह्या नात्याने इनरव्हिल प्रार्थना बोलायला सुरुवात केली. माझ्या मागोमाग त्या मुलांनी स्पष्ट उच्चारात ती प्रार्थना पुर्ण केली. अर्थात त्यातील काही मुले ज्यांना बोलता येत नाही ते बोलले नसतील पण तसे जाणवलेच नाही.

प्रार्थना म्हटल्यावर मी आमच्या सदस्यांची ओळख करुन दिली व अध्यक्षांनी भाषण केले. आम्हाला ह्यात सगळ्यात जास्त कौतूक शिक्षकांचे वाटले. मुलांची एकूण संख्या ३५ आहे. हजर ३० मुले राहतात. ५ शिक्षक आहेत. एक सर चार शिक्षिका त्यापैकी एक शिक्षिका सुट्टीवर आहे. एक आया आहे. ह्या शाळेला बारा वर्ष पुर्ण झाली. त्या दरम्यात शाळेला तिन जागा बदलाव्या लागल्या. कारण आजुबाजूच्या
लोकांना होणारा मतीमंद मुलांच्या व्यंगाचा त्रास होता.

शिक्षक त्यांना स्वावलंबनाचे धडे देतात. शाळेच्या एका खोलीत खेळाचे सामान आहे. तिथे मुले खेळतात. शाळेच्या पाठी मोकळे मैदान आहे. त्या मैदानावर त्यांचे खेळ घेतात. आता खोल्या वाढवण्याचेही काम चालू आहे. मुलांना घरून ने आण करण्यासाठी शाळेची बस आहे. शाळेला युनिफॉर्मही आहे. ह्यांचे स्नेहसंमेलनही भरते. त्यात मुलांना शिक्षक नाच, गाणी, कवीता शिकवून सादर करून घेतात.

दिवाळीच्या आधी शिक्षक ह्या मुलांकडून स्वावलंबनाचा धडा म्हणून पणत्यांवरची सजावट, रुमाल,पर्स, शोभेच्या वस्तू , कंदील व इतर त्यांना जमतील अशा वस्तू बनवून घेऊन त्यांचे एक दिवसाचे प्रदर्शन ठेवतात.

ह्या शिक्षकांना त्या मुलांवर सतत नजर ठेऊन, त्यांना शिकवून काही मुलांना भरवाव ही लागत.

तिथे आम्हाला तिन वर्ग दिसले तेंव्हा आम्ही शिक्षकांना विचारले की ह्यांची वर्गवारी कशी करता ? वयाप्रमाणे का ? तेंव्हा शिक्षिका म्हणाल्या की त्यांची वर्गवारी त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार होते. कोण किती आकलन करत त्या प्रमाणात आम्ही त्यांना बसवतो.

शाळेला मदत कशी मिळते ह्याबाबत त्यांनी सांगितले की काही स्थानिक व्यक्ती मधून मधून थोडीफार मदत करतात. तर काही बाहेरील व्यक्तींनी काही मुलांना दत्तक घेतले आहे. तसेच त्यांना मदत म्हणून एका पुढार्‍यने पिठाची गिरण दिली आहे. ती गिरण चालवायला त्यातील काही मुलींना शिकवलेही आहे त्याचा उद्देश स्वावलंबन आहे. दळण दळून काही पैशांचा हातभारही लागतो शाळेला.

चर्चा झाल्यावर शिक्षकांनी मुलांना कविता बोलायला सांगितल्या. मुलांनी नर्सरीतल्या कविता म्हटल्या. त्यांना रि़गण करुन बसवून त्यांच्याकडून खेळात फळांची, फुलांची स्वतःच्या गावांची नावे वदवून घेतली. सगळ झाल्यावर आम्ही मुलांना बिस्कीटचे पुडे व फ्रूटी वाटली. कोणीही ते घेण्यासाठी गडबड केली नाही. उलट एखाद्याला मिळाले नसेल तर मॅडम हिला नाही मिळाले म्हणून शेजारची मुले सांगायची. खाऊ मिळाल्यानंतरचा जो बालबोध आनंद इतर मुलांच्या चेहर्‍यावर दिसतो तोच आनंद ह्या मुलांमध्ये दिसला व आम्हाला समाधान मिळाले.

हे सर्व पाहताना ह्या मुलांना सांभाळण्यासाठी खुप संयमाची आवश्यकता आहे हे जाणवले. आपल्या मुलांनी घरात मस्ती केली की आपण चिडतो, वैतागतो. पण हे शिक्षक ३० वेगवेगळ्या बौद्धिक व्यंगाच्या प्रकारांना तोंड देऊन त्यांना भावी आयुष्य जगण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिक्षण देतात. आम्ही मनाने त्या शिक्षकांना नतमस्तक झालो. त्यांच्या कार्याची आम्ही तेथे वाहवा केली.

ती औपचारीकता नसून अगदी मनापासून प्रकट झाली. आमच्या उरण एरीयात इतके चांगले कार्य करतात म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांना भेटवस्तू दिल्या. तसेच भविष्यात काही मदत लागल्यास आम्ही त्याची पुर्तता करण्यास मदत करू अशी ग्वाही दिली.

मुले

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलणार जागू!

(काही करण्यासारखे असेल तर अवश्य आणि कृपया सांगावेत अशी विनंती! कैलासरावांकडे माझ्याशी संपर्क साधण्यासाठीची डिटेल्स आहेत. अर्थात, प्रोअ‍ॅक्टिव्हलीही काहीतरी करावेसे वाटेल. आपण सांगावेत.)

जागोमोहन ह्या नंतर लगेच दोन दिवसांनी आम्ही एका आश्रमशाळेला भेट दिली. त्याचा वृत्तात एक-दोन दिवसांत टाकतेच.

बेफिकिर नक्कीच कळवेन.

इथे ( यु एस) मती-मंद शब्द वापरत नाहीत. special need म्हणतात. ह्याला समानर्थी मराठी शब्द किंवा स्पेशल नीड मुलं म्हटलं तर जास्त बरं.

जागूजी, किती वेळां, किती गोष्टींबद्दल सलाम ठोकायचा तुम्हाला, अगदीं मनापासून !
या मुलांच्या पालकाना तर या शळेतले शिक्षक व कर्मचारी देवदूतच वाटत असावेत.

हे सर्व पाहताना ह्या मुलांना सांभाळण्यासाठी खुप संयमाची आवश्यकता आहे हे जाणवले. आपल्या मुलांनी घरात मस्ती केली की आपण चिडतो, वैतागतो. पण हे शिक्षक ३० वेगवेगळ्या बौद्धिक व्यंगाच्या प्रकारांना तोंड देऊन त्यांना भावी आयुष्य जगण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी शिक्षण देतात. आम्ही मनाने त्या शिक्षकांना नतमस्तक झालो.>>>> आम्हीही नतमस्तक, त्या मुलांच्या आई-वडिलांपुढेही.....
"आम्ही असू लाडके" हा या मुलांवरील चित्रपटही सुरेख आहे......
खूप धन्यवाद जागूतै - अशा मित्रांची ओळख करुन दिल्याबद्दल.......

दिनेशदा, कंसराज, दिपिका, भाऊ तुमच्या सारख्यांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने अशा गोष्टी करण्याची मला संधी मिळते हे मी माझे भाग्य समजते.
आर्च स्पेशल निड उच्चार आवडला.