फरिश्ते

Submitted by फारएण्ड on 27 November, 2011 - 11:30

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.

मग दोन रोलर स्केट आकाशातून खाली पडतात. नंतर हवेतून तरंगत विनोद खन्ना व धर्मेन्द्र येतात. न्यूटनचे नियम या चित्रपटाला मान्य नाहीत याची पहिली चुणूक येथे मिळते. वास्तविक त्यांची वये बघून त्यापेक्षा वृद्धाश्रमातून निघालेले पण आता कोठून आलो ते आठवत नसलेले अशी एन्ट्री दाखवली असती तर जास्त योग्य वाटली असती. येथे "थोडेसे फरिश्ते, थोडेसे शैतान, होते है सब इन्सान, हम भी है" हे टायटल सॉंग येते. त्याचा अर्थ असा की आम्ही इतरांसारखेच आहोत. पण जर हे इतरांसारखेच आहेत (किमान कपड्यांचे रंग सोडून) तर त्यात शेकडो लोकांनी हात हलवण्याएवढे, जीपमधून रंगीबेरंगी फुगे घेऊन नाचण्याएवढे व टू-व्हीलर्स झिग-झॅग चालवण्याएवढे काय आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.

आता दणादण अन्यायनिवारण चालू होते. काही वाईट लोक मुलींना कमी कपड्यात अश्लील नाच करायला लावत असतात. त्यांना मारून मग धर्मेन्द्र त्याहीपेक्षा कमी कपड्यात त्याच मुलींबरोबर नाचतो. त्यावेळेस त्या व्हिलन्सच्या तोंडावर "मग आम्ही वेगळे काय करायला सांगत होतो?" असे भाव आपल्याला क्लिअरली जाणवतात. मग एका हॉटेलात जाउन दारू वगैरे पीत बसतात. तेथे विनोद खन्ना एका मुलीबरोबर टेबलामागे गाय, दूध वगैरे वर अत्यंत आचरट आणि तेवढेच न-विनोदी डॉयलॉग मारतो. ते डॉयलॉग्स इतके भंगार आहेत की त्याबद्दल येथे त्याच्या आणखी तीन-चार पिक्चर्स चे रिव्यू करावे लागतील Happy

तेथून ते रोलर स्केटिंग करत रस्त्यावरून जात असताना एका मोठ्या लोहचुंबकाने त्यांना ओढून रजनीकांत (पोलिस इन्स्पेक्टर) त्यांना पकडतो. रजनीकांत कडे Selective Magnetism ही सुविधा असलेले एक लोहचुंबक असते. त्याचा वापर करून आजूबाजूला असलेल्या असंख्य धातूच्या गोष्टींमधून समोर स्क्रीन वर आपल्याला दिसणारी व त्यातही फक्त त्याच्या मनात असणारी गोष्ट त्याला ओढता येउ शकते. तसेच या चुंबकाने लांबची सायकल आपोआप हवेत वरखाली करता येते. (पण लोहचुंबकाने फक्त धातूच्या गोष्टी ओढता येतात हा नियम रजनीकांतने पाळला हेच खूप झाले नाही का? )

मग त्यांना कोणीतरी येउन सांगते की घरी तुमची बहना तुमची वाट बघत आहे. ती बहुधा स्वप्ना नावाची हीरॉइन. ती यांची मुलगी सुद्धा शोभणार नाही असे लक्षात आल्याने सावत्र का मानलेली बहीण दाखवली आहे. त्याच दिवशी रक्षाबंधन असते त्यामुळे लगेच गाणे बिणे होते. विनोद खन्ना त्यात गिटार वाजवतो. आता
"सबसे सुंदर सबसे प्यारा भाई बहन का प्यार है"
या गाण्याला कोणती अशी चाल लावणे शक्य आहे की ज्यात गिटार वाजवता येइल असा आपल्याला प्रश्न पडतो. हे म्हणजे लेक चालली सासरला मधे बॅगपाईप वाजवता येइल असे गाणे ठेवा सांगण्यासारखे झाले. पण पुढच्याच कडव्यांत ते दोघे एकदा लग्नातील बँडवाल्यांच्या आणि एकदा कथक सारखे काहीतरी नृत्य वाल्या पोशाखात दाखवले, त्यामुळे त्याचा एकूण गाण्याशी काही संबंध नाही हे लक्षात आले.

ईलेक्ट्रॉनिक्स मधे विरूद्ध चार्ज असलेल्या आयन्स प्रमाणे चित्रपटात एकमेकांशी संबंध नसलेले मुख्य कलाकार फार काळ तसे राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वप्ना आणि रजनीकांत चे लग्न होते. मग रजनीकांत तिकडे त्या संस्थानात जातो (अरे हो! ते सुरूवातीला संस्थान, सदाशिव अमरापूरकर वगैरे होते नाही का? आता आपल्याला आठवते). हा बरोबर एकही पोलिस न घेता तेथे झेंडा लावायला एकटाच जातो. मग संचलनात एखाद्या राज्याचा असतो तसा आणि हंसासारख्या गोंडस पक्ष्याचे डिझाईन केलेल्या एका अवाढव्य रथात बसून सदाशिव अमरापूरकर तेथे येतो. असा रथ कोठेही पटकन जायला सोयीचा असावा बहुधा, विशेषतः तेथील अरूंद गल्लीबोळातून.

येथे मात्र ही फिल्म जरा हटके आहे. कारण एवढ्या कारकीर्दीत चित्रपटात मरायची नामुष्की रजनीवर क्वचित आली असावी (गिरफ्तार हा अजून एक. पण तेथे मरताना एक सिगरेट ओढून तो आपले रजनीकांतपण सिद्ध करतो). येथे असंख्य मशीनगन्स ("एक एक मे सौ सौ गोलिया" वाली) आणि इतर अनेक शस्त्रास्त्रे, बॉम्ब वगैरे खाउन सुद्धा तो जिवंतच असतो. मला वाटले शेवटी सदाशिव अमरापूरकर ला एखाद्या ऋषीकडून साता समुद्रापलीकडे असलेल्या एखाद्या पोपटात त्याचा जीव आहे वगैरे माहिती काढण्यासाठी तप बिप करावे लागते की काय, पण तो मरतो ते फक्त एक सळईसारखे काहीतरी खुपसल्याने. ही जर क्रिकेट मॅच असती तर कॉमेंटेटर म्हंटला असता "It's a soft dismissal"!

मध्यंतरी जयाप्रदा-१ लाही बॉब क्रेश्टो व इतरांनी मारलेले असते. धरमचे तिच्यावर प्रेम असते. त्यामुळे तो रागाने मोटरसायकल घेऊन बॉब क्रेश्टो जेथे पोहत असतो (रंगीत पेये पिणारे व्हिलन्स, बिकिनी-कन्या ई) तेथे मोटरसायकलसकट उडी मारून जातो. तेव्हा त्याच्या समोरचे लोक दचकतात. नंतर हेल्मेटमधून सावकाश उजवीकडे बघतो. मग तिकडचे दचकतात. तोपर्यंत नाही. आता धरम स्लो मोशनमधे बॉब क्रेश्टो च्या मागे लागतो. म्हणजे हा सीन स्लो मोशनमधे नाही, धरम प्रत्यक्षात तेवढाच स्लो पळतो. मग पळणारी व तिचा पाठलाग करणारी व्यक्ती कोठेही जाऊ शकतात हा नियम कथेला मान्य नसल्याने दहा पंधरा मिनीटे बीचवरून पळाल्यावर ते जेथे पोहोचतात तेथे पोलिस व विनोद खन्नाही लगेच बरोबर येतात.

बॅक फ्रॉम फ्लॅशबॅक...

इकडे स्वप्नाच्या लग्नानंतर तिच्या विरहाने दु:खी झालेला धर्मेन्द्र इकडे तिकडे बघत असताना त्याला एक बिगुल दिसते. समोर बिगुल दिसले की ते वाजवायलाच पाहिजे म्हणून तो छतावर जाऊन ते वाजवत बसतो. बहिणीच्या विरहातून बाहेर येण्यासाठी विनोद व धरम दोघांनी कोठेतरी काम करावे असे ठरते. आता कोठेतरी काम करण्याचे ठरवल्यावर दोन वयोवृद्ध लोकांना काम शोधायला योग्य जागा म्हणून ते एका डान्स बार मधे जातात. तेथून त्यांना जयाप्रदा-२ कडे नेण्यात येते. तिची हेअरस्टाईल वेगळी असल्याने पहिल्या जयाप्रदाशी तिचा संबंध नाही हे सिद्ध होते. ७-८ वेगवेगळ्या रंगांचे पडदे बाजूला होऊन तिची एन्ट्री होते. तिच्या कडे एक लेझर किरण सारखे काहीतरी सोडून समोरच्या व्यक्तीला तिच्या निगेटिव्ह मधे बदलू शकणारे काहीतरी अस्त्र असते.

या दोघांना रजनीकांत च्या खुनाचा बदला घ्यायचा असतो व जयाप्रदा-२ ला मूळ पोलिसांच्या जागी त्या संस्थानात कोणीतरी तोतये न्यायचे असतात. म्हणून मग या दोघांना त्या संस्थानात नेण्यात येते.
हा राजा फावल्या वेळात स्मगलिंगही करत असतो. जगातील "ब्लॅक टॉवर ग्रूप" नावाच्या एका मोठ्या गँगची मीटिंग त्याच्या अड्ड्यावर असते. जयाप्रदा-२ ही त्याच्याच गँग मधली असते.

पण हे तेथे पोहोचायच्या आधी तोंडात चिरूट धरलेला व ओव्हरकोट, बूट्स वगैरे घातलेला एक गूढ मिस्टरी मॅन त्यांच्याशी बोलतो. त्या खेड्यात आपण उठून दिसू नये म्हणून कुलभूषण खरबंदाने हा ड्रेस घातला असावा. तो बहुधा पोलिस असतो व तो ही यांना सदाशिव अमरापूरकर ला पकडण्याची कामगिरी सोपवतो. म्हणजे डबल एजण्ट सारखे काहीतरी. यांचे चेहरे बघितले तर एक काम सुद्धा झेपेल का अशी शंका येते.
त्यांना तेथे पोहोचवण्यात गॉव की गोरी श्रीदेवी मदत करते. तिला रस्त्यांची एवढी माहिती असते की ती विनोद खन्नाचा पाठलाग करताना एकाच सीनमधे टेकडीवरून उतरताना लाँग शॉट मधे विनोद च्या उजवीकडून व क्लोजअपमधे आल्यावर त्याच्या डावीकडून येउ शकते.

तर त्या ब्लॅक टॉवर ग्रूप च्या मीटिंग च्या वेळेस सगळ्यांना पकडावे अशी योजना असते. क्लायमॅक्स मधे बराच गोंधळ होतो आणि शेवटी सदाशिव अमरापूरकर मरतो. अंगावर पेट्रोल ओतलेले असताना आपल्या अंगावर फेकलेली मशाल उलटा डाईव्ह मारून पायांनी पुन्हा हवेत उंच उडवून दुसरीकडेच ती जाऊन पडेल अशी फेकण्याचे कौशल्य असल्याने धरम व विनोद बाजी जिंकतात. मात्र एक गोळी घातली, हीरो/व्हिलन मेला असे यात होतच नाही. उदा: सदाशिव अमरापूरकर ने धरम वर सोडलेले चार दैत्य असे मरतातः
१. पाठीत रॉकेट खुपसल्याने
२. धरम ने फायर हायड्रंट उघडून तोंडावर तो स्प्रे मारल्याने.
३. अंगावर एक प्रचंड रॉकेटसारखे काहीतरी पडल्याने, व त्यावर नंतर धर्मेन्द्र बसल्याने.
४. विनोद ने डोक्यात टीव्ही घातल्याने. व तो नंतर स्विच ऑन केल्याने.

या चित्रपटात धर्मेन्द्र व जयाप्रदाचे एकमेकांवर किती प्रेम असते हे दर्शवणारे हे गाणे (हे अ. आणि अ. गाण्यात आधीच लिहीले होते पण येथेही देत आहे)

"मै जट यमला पगला दीवाना...." हीमॅनजींनी पहिल्यांदा गायले होते प्राचीन काळी आणि नाचले तेव्हा ठीक होते. पण येथे त्यांना पुन्हा तेच गाणे नव्या रूपात व कमी कपड्यात करायला लावले आहे. सुरूवातीलाच डोक्याला रिबीन सारखे काहीतरी लावलेली जयाप्रदा दिसते. तिला या गाण्यात उचलायचे आहे ही कहानी की माँग ऐकून जंजीर सारखे बर्‍याच हीरोंनी नकार दिल्यावर धर्मेंद्र कडे हा रोल आला असावा. भडक गुलाबी स्कर्ट किंवा त्याला जे काही म्हणतात ते घालून ती नाचते आहे. धर्मेंद्र ची चड्डी पाहून फ्रेन्ड्स मधल्या चॅन्डलर प्रमाणे can your pant be any shorter? असे म्हणावेसे वाटते. शर्ट फुल व पॅण्ट हाफ म्हणजे त्याच्या ड्रेस डिझायनरच्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असावी हे नक्की. मग पाजी एकदा एक बाजूचे व नंतर दुसर्‍या बाजूचे हात पाय हवेत उडवून नृत्य करतात. मग दोघे एकत्र लोळण घेतात. येथे जयाप्रदाला धरणी पोटात घेइल असे वाटते. लाजून, किंवा मग धरम च्या वजनाने नक्कीच.
नंतर दोघे 'दिल' आणि 'राजा' मधल्या झाडापाशी येतात. पुढच्या कडव्यात धर्मेंद्र व्यायाम करतो आणि जयाप्रदाही शाळेच्या गॅदरिंग मधला डान्स करते.

या गाण्याची मूळ लिन्क यूट्यूब वर आता उपलब्ध नाही पण त्याची चुणूक तुम्हाला येथे मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=JujOCJvmGrQ

बाकी गाण्यांबद्दल आपल्याला आता निर्माण झालेली जबरदस्त उत्सुकता ताणण्यासाठी त्यांच्या ओळी पाहा: "अपना है राज फिर काहे का राजा/राजा का हमने बजा दिया बाजा" (उर्फ "संगीत संस्थान खालसा"), "तेरे बिना जग लगता है सूना/शादी से पहले मुझे नही छूना". वगैरे वगैरे. त्यांचे वर्णन माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. ती गाणी आपणच आपल्या जबाबदारीवर बघावीत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम फनी ! Lol

हा चित्रपट किती रुपायांमधे पूर्ण झाला असेल? आणि त्यातले किती परत मिळाले असतील?
सीडी/डीव्हीडी आणायला हवी >>>>>

फारएण्ड, पाहिलं किती लोकांनी ह्या सिनेमाची सीडी आणुन तो बघायची तयारी दाखवली आहे? हा सगळा तुमच्या reviewचा परिणाम. मला तर शंका आहे कि तुम्हाला प्रोड्युसरने याच कामगिरीवर नेमेलेलं नाही नं. Wink तेव्हा जेवढे पैसे नसतील मिळाले तेवढे तुमचा review वाचल्यावर मिळवणार तो. Happy

>>हा सगळा तुमच्या reviewचा परिणाम. मला तर शंका आहे कि तुम्हाला प्रोड्युसरने याच कामगिरीवर नेमेलेलं नाही नं.

मने पॉइंट टू बी नोटेड Lol

हे भगवान... Lol असेच अ.अ. चित्रपट पाहात र्‍हावा अन परीक्षणे लिहीत र्‍हावा. Happy

वन्स मोर Proud

>> "अपना है राज फिर काहे का राजा/राजा का हमने बजा दिया बाजा"
>> "तेरे बिना जग लगता है सूना/शादी से पहले मुझे नही छूना".
Lol

लै भारी राव !
खुप पुर्वी अर्धाच पाहीला होता हा सिनेमा. (माझी सहनशक्ती खुप कमजोर आहे Wink )

<<<रजनीकांत कडे Selective Magnetism ही सुविधा असलेले एक लोहचुंबक असते. त्याचा वापर करून आजूबाजूला असलेल्या असंख्य धातूच्या गोष्टींमधून समोर स्क्रीन वर आपल्याला दिसणारी व त्यातही फक्त त्याच्या मनात असणारी गोष्ट त्याला ओढता येउ शकते. तसेच या चुंबकाने लांबची सायकल आपोआप हवेत वरखाली करता येते. (पण लोहचुंबकाने फक्त धातूच्या गोष्टी ओढता येतात हा नियम रजनीकांतने पाळला हेच खूप झाले नाही का? )>>>>

रजनी रॉक्स Lol

अमेझिंग!! मला पहिले २-३ पॅरा वाचल्यावर असे वाटले की स्केरी मुव्ही सारखे वेगवेगळ्या चित्रपटातील कथा,आचरटपणा एकत्र करून spoof लिहीले आहेस की काय! पण सर्च केले तर खरंच असा अतर्क्य मुव्ही आहे ! Proud

ते गाणं मात्र आठवले!! किती तरी दिवस मी हसले होते तुझे ते परिक्षण वाचत गाणं बघून!! Rofl

Lol आता धरम आणि अमरापूरकरशी तार जुळली आहे, तर लगे हाथ ऐलान-ए-जंग वर हात साफ कर. रंगीबेरंगी भडक कपडे नि पट्टे घालून 'नाऽऽग हूं मै. काऽऽला नाग. सामने आ जाय तो अपने बाऽऽप को भी डस लूं..' म्हणणारा अमरापूरकर शाळेत असताना सर्वशक्तीमान वाटायचा.

Rofl
बहुतेक एकदा मला चॅनल सर्फ करताना हा सिनेमा दिसलेला. हंसाचा रथ वरुन लक्षात आलं. पण त्यावेळी सिनेमा इतका भारी असेल याची माहिती नव्हती म्हणून मिसला.. Sad कितनी बडी भूल हो गयी मुझसे...
Rofl
लई भारी लिहिलय..

फारेंडा,लई भारी. असे मनोरंजनात्मक सिनेमे हल्ली जरा कमीच बनतात् पण तरी द्रोणा एकदा बघून घे. Happy मला त्यात अभिषेक जया बच्चन आणि प्रियांका होती या खेरीज काहीही आठवत नाहिये.

ओ फारेण्ड साहेब.

तो हेमा मालिनी आणि तोंड झाकतेला मनोज कुमार !!
त्यांचा एक पिच्चर आहे की. क्रांती. तो बघायचे करा की. आणि मग लिवाचे करा की! Proud

की एक स्पर्धा भरवायची?? तो पिक्चर बघून परिक्षण लिहायचे. आणि जो जिंकेल त्याला मनोज कुमारचे क्लोज-अप पोस्टर बक्षिस!!! Wink ??????

http://en.wikipedia.org/wiki/Kranti

Lol फारेंडा, कमाल लिहीलेस!! लोहचुंबक, रस्त्यांची माहीती, गिटार, बिगुल, टीव्ही स्विच ऑन.. अररा! Lol

Pages