अद्वैत

Submitted by वैवकु on 27 November, 2011 - 04:05

इश्क म्हणजे काय आणी
हुंदका अन धुंद गाणी

का कधी त्या दो दिलांची
वेगळी असते कहाणी

आसवांना हाक देते
ही वफाई दीनवाणी

आज ही त्या दिनकराची
वाट पाही फूलराणी

शोधली मी या तळाशी
ती जुनी स्वप्ने पुराणी

हाय का मग याद आली
ती सखी माझी दिवाणी

कृष्णवेडी होइ मीरा
राधिका ठरली शहाणी

भेटले अद्वैत आता
मीच माझा चक्रपाणी

गुलमोहर: 

कृष्णवेडी होई मीरा>>>> यात वृत्त चुकले. 'होइ' हे बरोबर होईल! (म्हणजे मनोरमा वृत्त अभिप्रेत असल्यास)

गझलेची मूळ भाषा मराठी आहे की उर्दू ते सांगा, मग गझल कशी वाटली तेही सांगतो

इश्क म्हणजे काय आणी
हुंदका अन धुंद गाणी>>>>>

प्रीत म्हणजे काय आणी
हुंदकाअन धुंद गाणी

का कधी त्या दो दिलांची
वेगळी असते कहाणी

दोन हृदयांची कधी त्या
वेगळी असते कहाणी ?

आसवांना हाक देते
ही वफाई दीनवाणी

आसवांना हाक देते
एक निष्ठा दीनवाणी

वरील शेरांत असे बदल करता येतील.

छोट्या बहरातला चांगला प्रयत्न...मात्र मला मतला वगळता इतर गजल तितकिशी आवडली नाही.

सर्व प्रतीसादाकांचे आभार
डॉक, बेफि ,प्राजू आपल्या सूचना अत्यावश्यक अशाच आहेत
थोडी माझी बाजू मांडतो ...... कृपया प्रतिसाद द्यावा .......
गझलेत मराठी शब्दाऐवजी मी बर्याचवेळा उर्दू-हिंदी शब्द योजतो याची मीमांसा मीही बर्याचवेळा केली आणि काही करणे मला जाणवली
१) मी शिक्षण(गुलबर्गा कर्नाटक) आणि नोकरी संदर्भात(बडोदा, सूरत; गुजरात)...बाहेर राहिलो जवळजवळ १० वर्षे; मग माझ्या सोबत नेहमी यूपी-बिहारी लोकांचा संबंध रोज दिवसभर हिंदीत बोलायचो साधारण त्याचवेळी मी कविता करू लागलो, हिंदीतही कविता केल्या, एक वेळ अशी आली की मी एकान्तातही हिंदीत विचार करीत असे त्यामुळे मराठीत लिहिताना जे उर्दू शब्द सुचतात ते अगदी आतून! आपसूकच!!
२) अशावेळी आपण काहीतरी असहज/कृत्रिम करतोय अशी जाणीव होत नाही.
३) ईव्हन कधीतरी जेव्हा मी अशा जाणीवेतून उर्दू शब्दाला पर्यायी शब्द शोधतो तेव्हा भावनेशी अप्रामाणिक झाल्याचा फील येतो.
४) माझ्या माहितीनुसार मराठीत अनेक उर्दू पार्सी कन्नड संस्कृत शब्द आधीपासून वावरतायत....ते रूढही झालेत .का कोणास ठावूक पण मला या सत्याचा जरा आधार वाटतो.मग अस्सल एतद्देशीय मराठी शब्द न वापरल्याची अपराधी भावना दूर होऊ लागते.(मला मिळालेली ही "पळवाट" आहे)
५) गझल मुळात उर्दू पार्सी, तिला मराठीत आणताना आपण काही उर्दू पार्सी हिंदी शब्द उदा;गझल,काफिया, रदीफ, जमीन, वजन, तखल्लुस यांसारखे "तत्सम' असे ग्राह्य धरू शकत नाही का........ कधी कधी मला वाटते; उदा: इश्क, जिंदगी,दिल, याद, हाय, यार असे काही खास म्हणता येतील असे शब्द तत्सम स्वरूपात जो रोम्यांटिक फील देतात तसा मराठी पर्यायी शब्द देत नाहीत (मलातरी).......
६) मला कधी असेही वाटते की माझी मराठी कविता पूर्ण मराठीत असावी ,मी प्रयत्नही करतो आहे...हळू हळू जमवीन.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असूद्यात!!! .

कळावे
आपला -वैभव वसंतराव कुलकर्णी

कलेला भाषेच्या मर्यादा नसतात, समाजाच्या रुढींच्या मर्यादा नसतात, अवकाशाच्याही मर्यादा नसतात. जे विश्वातच नाही (असे माणसाला वाटेल) तेही कलेत असू शकते.

भाषा ही एखाद्या गटाची, भौगोलिक प्रांताची मक्तेदारी नाही.

भाषा स्थलांतरीत होताना अनेक शब्द मिसळत गेले. मराठी तमाशा लावणी यात ईश्क हा शब्द सहज योजला गेलेला आहे. महाराजांच्या युद्धप्रणालीला गनिमी कावा म्हंटले जाते त्यातील गनिमी हा शब्द (म्हणजे गनीम हा शब्द) मराठी नाहीच.

त्यामुळे विविध भाषेतील शब्द एखाद्या साहित्यीक कलाकृतीत असणे हे समर्थनीय असो नसो, शक्य मात्र आहेच.

एखादा लेखक जर मिश्र भाषा बोलल्या जाणार्‍या प्रांतात मोठा झाला असेल तर त्याची बोली भाषा ही अशी मिश्र असू शकते व त्याच्यादृष्टीने कलाकृतीत ती भाषा येणे यात काही गैरही नसते.

ही वरील सर्व मते पटण्यासारखी व 'रिझनेबल' आहेत.

मात्र चर्चेत असलेल्या 'अद्वैत'या रचनेबाबत ही सर्व मते लागू करण्याआधी रचनेची स्वभावप्रकृती जाणून घेणे महत्वाचे ठरेल. गुलबर्गा येथे निवासास असलेल्याने गझल रचली असता त्यात उर्दू शब्दांचा अंतर्भाव होईल हे वरवर पटण्यासारखे मत या विशिष्ट रचनेला का लागू करू नये हे नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.

या रचनेत ईश्क ऐवजी प्रेम, दिलांची ऐवजी मनांची हे समवृत्तीय पर्याय उपलब्ध आहेत.

तसेच, याद ऐवजी स्मृती हा भिन्नवृत्तातील पर्याय शब्दरहना बदलून वापरता येईल.

आम्ही वर दिलेले पर्यायी शब्द हे दुर्मीळरीत्या वापरात असणारे तर मुळीच नाहीत शिवाय दोन पर्याय तर समवृत्तीयही आहेत. हे पर्याय बोली मराठीत वापरले जातात व रोज वापरले जातात. तुझ्या मनात काय आहे ते तर सांग, त्यांना हल्ली कुटुंबाबद्दल फारस प्रेम वाटत नाही अशा अनेक वाक्यात हे शब्द सर्रास व योग्यपणे वापरले जातात. हे शब्द न आठवण्याजोगेही नाहीत व सीमाभागात राहिल्यामुळे माहीतच नसतील असेही नाहीत. ते योजल्यामुळे अवघडलेपणही येणार नाही आणि आशयाला धक्काही बसणार नाही.

असे असताना केवळ गझल उर्दू फार्सीतून येथे आली व आपण सीमाभागात वावरलो आहोत या बाबी समर्थनार्थ घेऊन सहसा बोली / लेखी / प्रमाण मराठीत न वापरले जाणारे शब्द योजणे हे अयोग्य ठरावे.

जसे कलेला भाषेच्या मर्यादा नसतात तसेच कलेला एक स्वतःची भाषाही असते. दगडाच्या शिल्पातील सैनिकाला प्लॅस्टिकची टोपी घातलेली दिसत नाही. गझलेला एक स्वतःची भाषाही आहे, जी सहज असायला हवी, बहुसंख्यांना सहज वाटायला हवी.

एवढे बोलून थांबलो असतो, पण आपल एकंदर लेखन बघून पुढचाही मुद्दा लिहितो.

शेवटी कोण कोणाला जाब विचारू शकणार? परंतु या प्रांतात 'मी बदल घडवणारच' अशी भूमिका सुरुवातीपासून घेण्याइतपत खणखणीत आशयाचे काव्य आधी रचले जायला हवे.

कळावे.

गंभीर समीक्षक

गं.स.: आपले नाव गंभीर समीक्षक असले तरी आपली समीक्षा गंभीरपणे घेतली जात नाही हे अतापार्यान्ताच्या आपल्या माबोवरील अस्तित्वावरून आम्हास पटले आहे ..म्हणून आम्हीही ती गंभीरपणे घेत नाही आहोत ..तरी कृपया राग मानू नये
आपण आमच्या काव्याची दाखल घेत आहात हे पाहून सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.......आपला ऋणी -वैभव वसंतराव कुलकर्णी

परंतु या प्रांतात 'मी बदल घडवणारच' अशी भूमिका सुरुवातीपासून घेण्याइतपत खणखणीत आशयाचे काव्य आधी रचले जायला हवे. > ते रचले गेले आहे. हे तुम्हाला माहीतच आहे असे मी मानुन घेतो म्हणजे आहेच मानुन. त्या नंतर तुमचा जन्म.

या रचने बद्द्ल...

ही रचना ना इथली आहे न तिथली.

अवांतर नावाचा प्रतिसाद प्रथम दिला म्हणून राग मानुन घेउ नये कृपया.

धन्यवाद!!