वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !

Submitted by Yo.Rocks on 22 November, 2011 - 15:06

भलेभले ट्रेक करायचे होते त्यात वासोटा ट्रेकचे नाव अग्रस्थानी होते.. वासोटा म्हटले की जंगल नि जंगलच आठवते.. आतापर्यंत इतरांच्या लेखात व फोटोंमध्ये पाहिलेला वासोटा प्रत्यक्षात अनुभवण्याची प्रबळ इच्छा होती.. निमित्त ठरले मायबोलीकर सुन्याच्या 'ऑफबीट सह्याद्रीज'ग्रुपबरोबर जाण्याचे.. तेरा जणांचा ग्रुप त्यात सुन्या, मी, रोहीत..एक मावळा (हा माझ्याबरोबर नसतो असे होतच नाही), सुर्यकिरण , प्रणव कवळे आणि समिर रानडे असे हे सहा मायबोलीकर.. Happy

वासोटयाला जाण्यास नेहमीतला मार्ग वापरला जातो तो म्हणजे बामणोळी गावाकडचा.. सातार्‍याहून बामणोळीला सुटणार्‍या एसटी आहेत.. अंतर सुमारे ३५किमी.. एसटीने जायचे तर भाडे प्रत्येकी ३५ रुपये.. सातारा बसस्थानकात पोहोचल्यावर योग्य ती चौकशी करून बामणोळीसाठी एसटी सुटण्याची वेळ विचारुन घ्यावी.. प्रायवेट जीपदेखील मिळू शकते.. सांगताना ८०० रुपये सांगतात.. ५५० -६०० पर्यंत खेचण्याचा जरुर प्रयत्न करावा.. आमचे डिल रु.५५०/- ला झाले होते.. ! पण वेळेचे गणित जमत असल्यास एस्टीचा पर्याय उत्तम... स्वस्त नि मस्त !

सर्वांना 'कास' नावाचे पुष्प पठार आता चांगलेच माहीत झाले आहे.. पण या पठाराला मागे टाकून त्याच रस्त्याने पुढे गेलो असता दुरवर एक विस्तृत जलाशय पसरलेला दिसतो.. त्याच्याच दिशेने पुढे खाली उतरलो की बामणोळी हे सुंदर नि छोटेसे गाव लागते.. अंतर कापण्यास अंदाजे दिडदोन तास लागतात... नोव्हेंबरचा महिना त्यामुळे कास पठारावर साहाजिकच पिवळ्या सोनेरी गवताची चादर पसरलेली.. पण पुढे जेव्हा जलाशय नजरेस पडतो तेव्हा समोरील दृश्य बघून वाटत राहीले पावसाळ्यात काय अदभुत सोहळा रंगत असेल इथे... ! या प्रवासात आजुबाजूच्या दाटझाडीतून डोकावणारा हा जलाशय सारखा लक्ष वेधून घेतो..

या जलाशयाचे नाव शिवसागर.. शिवसागर लेक असे संबोधतात.. ज्याची निर्मिती कोयना धरणामुळे (Koyna Backwater) झाली. या जलाशयाबद्दल काय सांगायचे.. जन्मतःच सौंदर्य घेउन आल्यागत रुप आहे...आणि ह्या रुपाचा आस्वाद घ्यायचा असेल तर काठालगत असलेल्या बामणोळी गाव गाठायलाच हवे.. ! इथे खाण्यापिण्याची सोय सहज होउ शकते... 'चूलीवरचे गरम चिकन' असे लावलेले फलक पोटात भुकेचा खडडा खणायचे काम चोख करतात... तुम्हाला 'वासोटा' ट्रेक करायचा असेल तर इथेच वनखात्याकडून रितसर परावनगी घ्यावी लागते... आता वासोटा ट्रेकचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे 'बामणोळी ते मेट इंदवली' असा बोटीने करावा लागणारा प्रवास ! बोटीचे दर दाखवणारा फलक व तिकीटगृह तिथे काठावर वसलेले आहे.. फक्त वासोटाच काय तर महाबळेश्वरचे तपोला, चकदेव पर्वत इ. ठिकाणी जाण्यासाठी बोट उपलब्ध असतात..

आमचे लक्ष्य वासोटा होते तेव्हा बोटच्या प्रवासाची तिकीटे काढून काठावर जाउ लागलो.. माझी उत्सुकता तर शिगेला पोहोचलेली.. माझ्यासाठी तर या शिवसागर जलाशयातून बोटीने करावा लागणारा प्रवास हाच ट्रेकमधील उच्च आकर्षणबिंदू होता.. खूप ऐकून होतो.. फोटो पाहिले होते.. पण आज प्रत्यक्षात अनुभवणार होतो..

काठावर आलो नि तांबडयाभडक रंगाची काठालगतची सुपिक जमिन डोळ्यात भरली.. नि पलिकडे डोळे गरगर फिरवण्यास भाग पाडणारा तो शिवसागर जलाशय.. नि त्याही पलिकडे दुरवर पसलरेल्या डोंगररांगा... ! तर एकीकडे आपल्याला हव्या त्या ठिकाणी सोडण्यासाठी सज्ज असलेल्या चार - पाच बोट काठावर वाट बघत होत्या..

प्रचि १

या सगळ्या बोट मोटारीवर चालणार्‍या.. १५-२० जणांना सहज घेउन जातील इतक्या ताकदीच्या.. खरेतर कमीतकमी १०-१५ जणांचा ग्रुप झाल्याशिवाय बोट सोडत नाही.. वाट पहायची नसल्यास वा तसे न झाल्यास तेवढे भाडे भरण्याची देण्यास तयारी ठेवावी.. बोटीची सजावट पण नीटनेटकी..

प्रचि २

या बोटीपर्यंत त्या सुपिक जमिनीवरुन चालताना जरा जपूनच.. पाय घसरतोच.. पावसात तर इतपर्यंत चालायचे कष्ट घ्यावे लागत नाही.. पाणीच तुमच्यापर्यंत पोहोचते.. ! आम्ही सगळे आमच्या ठरल्या बोटीत स्थिरावलो.. बोट पाण्यात ढकलण्यात आली.. मोटार सुरु झाली.. नि ज्या क्षणाची वाट बघत होतो ती सुरवात झाली.... !

प्रवास सुरु झाली की बामणोळीची श्रीमंती कशात आहे याचा अनुभव येउ लागला... शिवसागर या जलाशयाचे काठालगतचे पाणी समुद्राच्या लाटांसारखे वार्‍यावर उफाळत होते.. नि याच पाण्यावर तरंगणारी कोवळ्या उनाची किरणे चमकत्या काजव्यांप्रमाणे भासत होती..

प्रचि ३

प्रवासाच्या सुरवातीपासूनच तुम्ही इतके मंत्रमुग्ध होउन जाता की मग इकडे पाहू की तिकडे पाहू असे होउन जाते... बोट जशी काठाला दुरवर सोडू लागली तसतशे या पाणलोट क्षेत्रातील जंगली पहाड डोकावू लागतात... एखाद दुसरी परतरणारी बोट दिसते नि डोळ्यांनीच तिला निरोप दिला जातो....

प्रचि ४

अश्या बोटीतून प्रवास करताना पाण्याशी खेळणे शक्य होत असेल तर हात भिजवण्याचा आनंद जरुर घ्यावा..
प्रचि ५

(प्रणव व रोहीत)

आमची बोट हळूहळू खर्‍या अर्थाने जलाशयाच्या पोटात घुसू लागली..प्रवाहाच्या दोन्ही बाजूला जंगल नि जंगल.. जिथे चाहूल कुणाचीच नाही.. आवाज फक्त बोटीतल्या मोटारीचा... नि पाणी कापताना होणार्‍या खळखळाटाचा.. ! बोट जितकी पुढे सरकत होती तितके पाणी स्तब्ध होत गेलेले.. मग त्या स्तब्ध पाण्यावर पडलेल्या काठालगतच्या झाडांच्या आकृत्या बघण्यात मन केव्हा गुरफुटून जाते कळत नाही....
प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८
i)

- -
ii)

प्रचि ९

याशिवाय आजुबाजूचे डोकावणारे हिरवे पहाड नि त्यांचेही प्रतिबिंब सामावून घेउ शकणारा असा हा शिवसागर जलाशय आपल्या महितीची प्रचिती आणून देतो..... पाण्यावर उडणारे पक्षी बघितले असाल.. पण इथे चक्क भिरभिरणारी फुलपाखरे नजरेस पडतात.. या काठावरून त्या काठावर असे स्थलांतर चालू असते त्यांचे.. इथून पुढे जाताना आपल्या आजुबाजूच्या जंगलात नक्कीच काही तरी दडलय असं सारख वाटत राहते.. तिकडची शांतता लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.. मनात आले थोडा वेळ मोटार बंद करायला सांगूया.. !!! मग तर शांततेची खरी हाक ऐकण्यात किती मजा येइल.. पण ते शक्य नव्हते.. पण डोळ्यांसमोर जे दिसत होते ते पटापट हृदयाचा कुठल्या तरी कप्प्यात नोंदवले जात होते.. जलाशयाचे पाणी टप्प्याटप्प्याला रंग बदलत होते.. कधी कधी ते निळ्याभोर आकाशाचा निळा रंग घेत होते तर कधी आजुबाजूच्या जंगली पहाडांचा हिरवा रंग लावून घेत होते.. कधी ते पहाडांच्या सावलीत विसावलेले दिसत होते.. तर कुठे दुरवर धुक्याच्या धुसर वातावरणात आकाशी रंग घेउन शांततेत तल्लीन झालेले दिसत होते..

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

पण कुठेही पाण्यात गढुळपणा दिसला नाही.. खरच सागराइतकीच महानता या शिवसागर जलाशयात आहे..
फरक इतकाच की इथे कमालीची गुढमय शांतता अनुभवता येते.. आपल्या नजरा सारख्या आजुबाजूच्या
काठावर फिरु लागतात.. वेडया मनाला वाटत राहते आजुबाजूच्या जंगलातून काठावर आलेले कुठले तरी हिंस्त्र जनावर पाणी पिताना दिसेल.. Happy बोटीतल्या मोटारीचा आवाज नसता तर या शांततेच नक्कीच कानाला सुखद धक्का देणारा एक आगळावेगळा आवाज ऐकू येइल हे खात्रीने सांगू शकतो..

अधुनमधून कुठल्यातरी काठावर हालचाल दिसते.. एखाद दुसरी वल्हवणारी छोटी नाव दिसते जी गोरठलेल्या पाण्यावर रेघ मारत पुढे सरकत असते...
प्रचि १३:

इथेपण लोक राहतात याचे कुतूहल वाटते.. पाण्याच्या कमी जास्त होणार्‍या पातळीमुळे काठाकडच्या भागांना आलेला पायरीचा आकार ही एक निसर्गकिमयाच म्हणावी लागेल.. पण दुर्दैवाने तो फोटो घेण्यास असफल ठरलो..

तासभर प्रवास झाला की मग आपण नक्की कशाला इथे आलोय याचे भान आले नि मग नजरा वासोटयाचा डोंगर कुठेय म्हणून शोधू लागल्या... पण याचे दर्शन होणे म्हणजे आधी जलाशायाचे सौंदर्य बघा.. गुढमय शांतता अनुभवा.. आजुबाजूची काठालगतच्या दाटझाडींचे डोंगर बघा.. प्रवाहाबरोबर वळणे घ्या... नि मग शेवटचे वळण घेतले की मी आहे समोरच असे म्हणत दिमाखात उभा असलेला वासोटा आपले दर्शन घडवतो...

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६: प्रवासात आतापर्यंत घेतलेल्या अनुभवांचे मिश्रण या टप्प्यात एकरुप होते नि जे काय समोर दिसते ते डोळे दिपवणारे असे दृश्य... मध्यभागी वासोटा(नविन) व उजव्या बाजूस टेमकाड दिसतेय ते तुळस वृंदावन..

प्रचि १७: वासोटयाहून परतीला जाणारी बोट.. नि तिचे शुभ्र प्रतिबिंब.. !

इथ आल्यावर कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यागत भासते... मघासपासून दुरवर असणारे काठ अगदी जवळ आल्यागत भासतात.. दाटजंगलाचा प्रभाव इथूनच पडायला सुरवात होतो.. आणि अशा अवस्थेतेतच आपली बोट काठाला लागते.. ! इथेच आजुबाजूला चिखलावर बसलेली फुलपाखरांची टोळी स्वागतला सज्ज असतेच..

प्रचि १८

इथूनच मग जंगलमय ट्रेकला सुरवात होते.. !

क्रमशः

गुलमोहर: 

सर्वच प्रचि भन्नाट Happy
प्रतिबिंबाचे तर खासच.
प्रचि १०, १६, १७ विशेष आवडले. Happy
पुढचा भाग लवकर येऊ दे Happy
रच्याकने, रोमा वृतांत लिहिणार होता ना Wink

वा यो........ काय सुंदर वर्णन केलंस मित्रा - सगळं डोळ्यासमोर उभं रहातंय अगदी........
सर्व प्र चि डोळे निववणार्‍या............. तिथले निसर्ग सौंदर्य, नीरव शांतता सगळं आता अनुभवतोय असं वाटतंय........
आजच्या दिवसाची सुरवात अशी फारच बहारदार झाली अगदी......
पुढचे भाग लवकर येउ देत........ खूप उत्सुक आहे.......

आवडले..:)
दिनेशदा.. येथिल तापोळा या परिसराला मिनि काश्मिर असेच म्हणतात..:)
धुक्यात हरवलेला जलाशय आणि त्यात फिरणार्‍या होड्या..

१६ व १७ नं चे फोटो जबरी.

वासोटा म्हणले की मला एकच आठवण येते. जीव वाचल्याची. आम्ही जॅपनीज शिकताना मुलं मुली गेलो होतो वासोट्याला. बॅकवॉटर्सच्या मध्यावर गेल्यावर काही जणांना पोहायची इच्छा झाली. म्हणुन त्यांनी बोटवाल्याला थांबायला सांगुन पटापटा उड्या टाकल्या. मी पण एकदम जोशमधे येऊन उडी टाकली. पोहता येते पण पट्टीचे नाही. माझा विचार होता एक उडी मारायची व थोडे पोहुन लगेच बोट गाठायची. पण हाय रे दैवा!! बोटवाल्याला वाटले सगळे जबरी पोहत आहेत. त्याने बोट थोडी पुढे घेतली. ते बघुनच माझे अवसान गळाले. कसाबसा हात मारत व मित्रांच्या मदतीने पोचलो होतो बोटीवर. आज आठवले तरी शहारा येतो. नको तिथे शहाणपणा करु नये हेच खरे. पण तारुण्यात ते कळले तर ना?

जबरी फोटो आणि वर्णन रे योग्या. Happy

बामणोली गावात काठावर उभा राहुन दिसतो तो जलाशय.आत जाइल तसा प्रचंड असेलच.
धरण आहे कुठे तर कोयनानगरला आणि त्याच बॅकवॉटर प्रचंड पसरलय. Happy

कासला गेल्यावर बामणोलीत जाउन शिवसागरदर्शन करुन आलोय. बोट राइड घ्यायची होती पण तेवढा वेळ शिल्लक नव्हता. Sad
मला तिथल्या बोटवाल्यांची संघटना आवडली आहे.

एक नंबर! वासोट्याच्या किल्ल्याबद्दल ऐकल होतं, पण हा नवीन जलमार्ग म्हणजे पर्वणीच. सगळेच फोटो एकापेक्षा एक आहेत. भन्नाट! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

बॅकवॉटर्सच्या मध्यावर गेल्यावर काही जणांना पोहायची इच्छा झाली. >> कांदापोहे फार मोठी जोखिम होती ही.. शिवसागर जलाशय तब्बल ८० मीटर (२६२ फुट) खोल आहे..

झक्कास आहेत सगळेच प्रचि...
प्रचि ६,१०, ११,१२,१३, १५ शांतता जाणवतेय अगदी. सुंदर...पण असं वाटतय ही शांतता डिस्टर्ब करु नये कुणीच!
पुढचा भाग टाक लवकर!!

अ प्र ति म फोटो यो! त्या एकट्या झाडांचे फोटो फार सुरेख आलेत.
अत्यंत सुंदर विस्तृत जलाशय आहे हा, कितीही वेळ नौकाविहार केला तरी चालेल असा.
तुझ्या लिखाणालाही बहर आला आहे! मस्त वर्णन करत लिहीत आहेस! कीपीटप! Happy

वर्णन आणि प्रची अप्रतीम. खरच खुप सुंदर फोटो आहेत. जंगलाच्या वर्णनाच्या प्रतिक्षेत. लवकर येऊदे.

मस्त अनुभव... Happy
(पण खरंच बोटीतल्या मोटारीचा आवाज तांदळातल्या खड्याप्रमाणे टोचतो.) Sad

पाण्यावर तरंगणारी कोवळ्या उनाची किरणे चमकत्या काजव्यांप्रमाणे भासत होती..>>> खरच खुप मस्त आलेत सर्वच प्रचि. १००/१०० Happy

मिनी काश्मिरच Happy

झक्कासच ! कधीची वाट पहात होतो, यो वसोटा म्हणजे प्रत्येक ट्रेकरच स्वप्नच Happy अन हा ट्रेक करताना येणारा उल्हास , जल्लोश , आनंद जन्मभराची सुगंधी आठवण Happy अ प्र ती म प्र.ची. सुंदर व्रूतांत .
येउदे Happy

सगळ्यांचे धन्यवाद Happy सविस्तर वृत्तांताची जबाबदारी रोहीतकडे Happy
पुढील भाग लौकरच..

शिवसागर जलाशय तब्बल ८० मीटर (२६२ फुट) खोल आहे>> >> सतिश..थँक्स माहितीबद्दल.. केपी, पुन्हा उतरणार का पाण्यात ??

इथे फक्त बोटींग करायची असेल तरी करता येते.. तासभराचे प्रत्येकी रु.७५/- भाडे आहे..

Pages