एकाच नभावर

Submitted by अज्ञात on 17 August, 2008 - 05:23

एकाच नभावर किती आकृती
नश्वर पाउलखुणा स्मृती
मन वेडे अभिजात कळ्या
प्राजक्तफुले फुलतात किती

कुणी कुणाचे व्हावे आपले
अगणित सगुणांच्या जाती
असंख्य कवचे संभ्रम अवघे
मूळ स्त्रोत जातात सती

हरवुन जाते माणुसपण
सारेच भेद जगण्याभवती
रोप एकटे फुलू नये
ही काय ऋणांची नवती

कठिण सत्य एकांत खरा
पण सयी तयाच्या सवती
हवे चिरंतन बधिर विवर
निर्मळ प्रांजळ अनुप्रीती

..................अज्ञात
नाशिक

गुलमोहर: 

अज्ञात तुमच्या कविता खरच खूप खोल अर्थ घेऊन येतात आणि त्याबरोबर अर्थांची वलयही.

माणसाच्या जन्माबरोबर जन्माला आलेल्या नात्यांनी मनावर घातलेला सडा... इथपर्यंत माझं डोकं चाललं. त्यापुढे फक्तं अर्थांची वलयं आहेत... पण हे काही खरं नाही. काठाकाठानेच चालल्यासारखं वाटतय.
तुम्ही "भाष्य" कराल या कवितेवर?

हो बाबा अज्ञात... रसग्रहण केलेस तर बर होइल!

हाय अज्ञात..
कविता सुंदर आहे पण नीट कळत नाहिइय.. खरेच दाद ने म्हटल्या प्रंआणे.. भाष्य केलेस तर बरे होईल..
शेवटचे कडवे छान आहे पण्त्यातील शेवटच्या ओळितील लिन्क नाही कळत...

दाद, स्वरूप आणि चेतना,
आशा आहे की हे मी लिहिलेलं समर्पक असेल कारण याच मनस्थितीतून हे फूल उमललं आहे. हे अजूनही विस्तारानं उलगडता येईल ज्याचं त्याला आपापल्या अनुभूतीनुसार. पण काय म्हणायचं आहे हे समजण्यापुरतं एवढं पुरेल............

एकाच नभावर किती आकृती
नश्वर पाउलखुणा स्मृती
मन वेडे अभिजात कळ्या
प्राजक्तफुले फुलतात किती

एकाच नभावर दर क्षणाला; पुन्हा कधीही न दिसणार्‍या विविध आकृती तयार होत असतात (नश्वर पाउलखुणा स्मृती). वेड्या मनावरही अशाच मोहक पण क्षणभंगूर कळ्या सतत उमलत असतात(प्रजक्तफुले फुलतात किती).
***************

कुणी कुणाचे व्हावे आपले
अगणित सगुणांच्या जाती
असंख्य कवचे संभ्रम अवघे
मूळ स्त्रोत जातात सती

जगात एकमेकांचे होण्यासाठी अनेक नाती उपलब्ध आहेत मात्र ती बहुतांशी व्यवहारिक संबंधांची भ्रामक कवचे असून त्यात आत्मियतेचा प्रेमाचा मूळ स्त्रोतच लुप्त झालेला दिसतो.
*********************
हरवुन जाते माणुसपण
सारेच भेद जगण्याभवती
रोप एकटे फुलू नये
ही काय ऋणांची नवती

प्रत्येक जण जगण्याच्या धडपडीत आपलं माणुसपण हरवून बसतो. अशातच दुसर्‍याला (स्वार्थापोटी) जगू न देणारी नवीन वृत्तीही जन्माला येत असावी.
****************
कठिण सत्य एकांत खरा
पण सयी तयाच्या सवती
हवे चिरंतन बधिर विवर
निर्मळ प्रांजळ अनुप्रीती

हे एक कटु सत्य आहे की अगदी एकांत मिळाला तरी तिथे आठवणी पिच्छा सोडत नाहीत. अशा वेळी हवी असते एक निव्वळ, निर्मळ-निखळ-प्रांजळ अनुप्रीतीने भारलेली चिरंजीव शांत अलिप्त अवस्था(हवे चिरंतन बधिर विवर)

.........................अज्ञात

सुंदर, अतीव सुंदर, अज्ञात. लिहीत रहालच.... हे ही सांगणे नलगे.

तुमच्या कविता मेंदुला कामाला लावतात हे मी मागे म्हटलचं होतं. तुमच्या सुरेख भाष्यानंतर पुढे काय बोलणार ? थोडाफार जवळपास पोहोचलो होतो. हेच खुप माझ्यासाठी. आपल्या नव्या भरारीच्या प्रतिक्षेत.

दाद आणि कौतुक,
तुमचं समाधान झाल्यामुळे मी फार कांही दुर्बोध लिहीत नसल्याची पावती मिळाली. माझ्या "भाष्यामुळे"(गद्य विचारांमुळे), कवितेचं वळण आणि वाचण्याची ठेवण उमजून अर्थ समजणं सोपं झालं असावं. आपल्या तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असाच लोभ असू द्या.
.........................अज्ञात

अप्रतिम...
खरच... आता अगदी मस्त उमजली अन अजुनच आवडली...
तुमचे गद्य ही सुंदर शब्दात...