झोपी गेलेला जागा झाला...! हर्बेरिअम- निर्माता- सुनील बर्वे

Submitted by बागेश्री on 21 November, 2011 - 07:15

कलत्या उन्हांना आपलं नाजूक मनगट हलवत निरोप देणारी, आपलं गुलाबी हसू ओठांवर खेळवणारी, सबंध पुण्याला आपल्या गार कुशीत घेणारी थंडी अवतरत असतांना पाहिलं सुबक प्रस्तूत, निर्माता सुनील बर्वे चे "हर्बेरिअम सिरिजचे" शेवटचे पान... एक मस्त मार्मिक नाटक... झोपी गेलेला जागा झाला!

लिमिटेड २५ प्रयोग, असा टॅग धारण करून ह्या सिरीजमधे ५ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले
त्यातील सूर्याची पिल्ले, हमिदाबाईची कोठी सुपरहिट दाद मिळवून गेले, असं ऐकिवात होतं!

ह्या सिरिजमधील एकही नाटक न बघायला मिळाल्याने मन जरा खट्टू झालं होतं!

सुट्ट्या लॅप्स होऊ नयेत म्हणून मस्त १० दिवसांची सुट्टी टाकली, मी आणि नवरोबांनी! आणि त्याच काही दिवसांसाठी सासू सासर्‍यांनाही बोलावून घेतलं ठाण्याच्या घरी! त्यांनाही जरा हवाबदल म्हणून.. त्यांना पुन्हा पुण्याला सोडण्यासाठी गेलो, आत्ता गेल्या शनिवारी... स्वतःची गाडी असल्याने छान ब्रेक घेत प्रवास केला.. ब्रेक्फस्ट ब्रेक, चहा ब्रेक वगैरे!

सकाळी साधारण ११ वाजता पुण्याला पोहोचलो... घरात चांगलीच थंडी जाणवत होती.. पहिले घरात घालायच्या सपाता चढवल्यावर कुठे बरं वाटलं... येता येताच लिटरभर दुध घरी घेऊनच आलो होतो... त्यामुळे गॅसचा नॉब सुरू हताच, "बागेश्री, मस्त अद्रक घालून चहा कर, तुझ्या स्टाईलचा" अशी हवीहवीशी डिमांड आलीच बाबांची (सासरेबुवा)!!

चहा होईपर्यंत हे तिघेही फ्रेश होऊन पटापटा डायनिंग टेबलवर येऊन बसले... वाफळता चहा पितांना 'आपला प्रवास कित्ती मस्त झाला- ठाण्या-पुण्याच्या हवेतील बदल' वगैरे चर्चा झाली.. आणि मागोमाग, आज श्रावण घेवड्याची भाजी, ठेचा, कढी असा बेत व्हावाच, अशी बाबांनी इच्छा व्यक्त करताच, नवरोबा मला टाळी देत-"बागेश्री, बाजरीची भाकरी राव!!" असे म्हणताच मी तयारीला उठलेच!!

आई-बाबा अगदी १.३० च्या ठोक्याला लंच करतात हे चांगलं ठाऊक असल्याने मी आणि आई ठरलेल्या बेतास न्याय द्यायला सज्ज झालो!!

जेवणे आटोपून झाक-पाक करून, 'आता जरा पडते' अशी घोषणा माझी तर 'मी आलोच जरा मित्रांना भेटून, कट्ट्यावर जमलेत सारे' अशी नवरोबांची! सोबतच आईंची सूचना, 'अरे, सगळ्यांसोबत आईसक्रीम मात्र खाऊ नकोस रे, घसा धरतो तुझा'- हे ऐकून हुंकार भरून तो पसार!

माझा डोळा लागतो न लागतो तोच, "बागेश्री, ए बागेश्री" च्या हाका...
आले खोलीबाहेर धावत तर बाबांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून अगदी, "अगं आपल्या घराजवळच्या यशवंत नाट्यगृहात ते सुनील बर्वेचं नाटक आहे, शेवटचं आहे 'हर्बेरिअमचं'.. आम्ही बाकी चारही पाहिलेत हेच राहिलंय, तू पण घोकत होतीस ना... जायचं?"

"ऑफ्कोर्स बाबा!!" मी डोळे चोळत..

फोन वरून तिकीट बुकींग ट्राय केलं तेव्हा "काय, हाऊस फुल्ल आहे?" बाबांचा पडत्या आवाजातला प्रश्न!
पण त्या तिकीट बुकींगवाल्या भल्या माणसाने सुचवलं प्रत्यक्षात जाऊन पहा, कुणी कॅन्सल केलं तर तुम्हांला बुकींग मिळेल!!

अगदी तरुणाला लाजवेल ह्या उत्साहात बाबा निघालेही, "अहो बाबा, तुम्ही पडा, मी आणते तिकीट्स"
..."छे, तिकीट खिडकीवर तू नाही जायचंस, आलोच मी, तुझा फोन मात्र जवळ ठेव"

मोजून आठव्या मिनीटाला फोन... "तुला माहितीये, इथे एक माणूस आलाय, त्याला टिकीटे रद्द करायची आहेत आणि ती ४ आहेत... फक्त रो मात्र मागचा आहे R..!!"
"बाबा, तुमच्या विलपॉवर ला मानलं खरंच, अहो बाल्कनीही चालली असती, R तर सहीच..."
त्यांनी अगदी नियमाने ति़किट खिडकीवर व्यवहार पूर्ण करून तिकिटे आणलीच!

मग काय...!

कधी एकदा ५ वाजतील आणि नाटक पहायला जाऊ असं झालेलं!

४ चा चहा झाला की, आम्ही मंडळी तयारीला लागलो, 'नाट्यगृह नंतर गार वाटायला लागतं' अशी सासूबाईंची सूचना येताच, आम्ही उबदार कपडे घालून निघायला तयार!

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा परिसर माणसांनी फुलून आला होता... गाडी पार्किंगला चांगली जागा मिळाली जरा लवकर आल्यामुळे... तिथे पोहोचताच 'ड्रीम्स तू रिअ‍ॅलिटी' च्या मुलांनी गुलाबाचं टवटवीत फुल देऊन फुल देऊन प्रेक्षकांचे स्वागत केले!

हर्बेरिअम..!!
काय सुंदर नाव दिलंय सुनील बर्वेने ह्या सिरिजला.. वनस्पतीशास्त्रातील ही टर्मिनोलॉजी अगदीच समर्पक वापरलीये! वाळलेल्या पानांची यथासांग- सुसंगत- शिस्तबद्ध रचना... किंवा आपण डायरीच्या पानावर एखाद्या झाडाचं/ रोपट्याचं पान चिकटवून बाजूला त्याबद्दल माहिती लिहीतो, कित्येक वर्षांनंतर ते पान पाहिलं की आठवणी मनात गंधाळतात- अगदी तसंच- गतकालीन गाजलेली नाटकं - विस्मृतीत गेलेली पुनश्च प्रेक्षकांसमोर आणायची- नव्या पिढीला तो गंध 'नव्याने' अनुभवायला द्यायचा!!

झोपी गेलेला जागा झाला...!
श्री बबन प्रभूं लिखीत हे नाट्य सादर झालं १९५८ साली आणि नाटकातला नवीन 'फार्स' प्रकार जनमानसात लोकप्रिय झाला!

दैनंदिन जीवनला बळी पडलेला सामान्य माणूस आपल्या बर्‍याच इच्छा/ रुपं दडपून टाकतो आणि एकमार्गी जगणे अंगिकारतो- संमोहनाच्या प्रयोगामुळे घडणारे चमत्कार- एखाद्यात दडलेला दुसरा चेहरा- त्यामुळे येणार्‍या अडचणी आणि त्या अडचणींवर केली जाणारी मात... हे ह्या नाटकाचं सार!

जमेची बाजू म्हणजे- अभिनय- आणि उत्कृष्ट कलाकार!!

भरत जाधव (दिनू) एक बँकेतला कॅशिअर, दैनंदिन जीवनाला, बँकेच्या कामाला वैतागून जातो, दिल-ए-जलाल (विजू खोटे) च्या संमोहनाच्या प्रयोगाला..!
संमोहनाचे प्रयोग बघायला आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणावरतरी आपला प्रयोग करून दाखवायचा म्हणून दिल-ए-जलाल एकाला उचलतो आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून निघतो तो आपला दिनू!!
दिनू मधील एक सुप्त रूप जागं होतं "कॅसानोवा"च.. थोडक्यात स्त्री-लंपट..

झालं....
दिनू परततो त्याच्या घरी घरी मात्र संमोहनाचे झटके/ दौरे त्याला पडत राहतात!
तो तसा अत्यंत सभ्य-नाकासमोर सरळ चालणारा-एक्पत्नीत्त्वाचे व्रत घेतलेला- सामान्य माणूस! पण;
तो झटका आला की ह्याच्यातला कॅसानोवा जागृत होणार- त्यातून उलगडत जातात अनेकानेक गोष्टी- फुलत जातं नाट्य!

दिनूच्या सोबतीला त्याचा भाऊ- सुनील बर्वे उर्फ- विनू... नंबर एक उडाणटप्पू व्यक्ती!!
आठवले नावाचे महान विसरभोळे डॉक्टर, दिनूवर उपचार करायला आलेले..
दिनूची बायको- संपदा कुलकर्णी- अत्यंत संयमी आणि गोंडस अभिव्यक्ती साकारलीये तिने!

नंतरचे अनेक कॅरेक्टर्स, बँक मॅनेजर, विनूची प्रेयसी- चिमणी आणि लक्षात राहतो तो- संतोष पवार उर्फ सीआयडी सामंत... प्रचंड विनोदी व्यक्तिरेखा - ज्या पद्धतीने त्याने रंगमंच वापरला- अफलातून प्रकार.. (आताही आठवलं तर हसायला येत आहे)

आणि नमूद केलेच पाहिजे,
"रत्ना"- भार्गवी चिरमुले! ह्या घरातली मोलकरीणीची भुमिका सशक्तपणे साकारणारी, घराच्या मालकावर- दिनुशेठवर मनातल्या मनात लट्टू अस्णारी आणि दिनूतला कॅसानोवा जागा झाला की प्रचंड खूष होणारी!!

मस्तीभरे तीन धम्माल अंक!!

मला भरत जाधवचा अभिनय नेहमी "एकसारखा- फारसा व्हर्सटाईल नसलेला" असच वाटत आलय परंतू त्याचा हा लाईव्ह परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्याच्यातील कलाकाराला मनापासून दाद आपसूक दिल्या गेली!!

विजू खोटेंच्या निव्वळ रुबाबदार चालण्याणे- त्यांच्या रंगमंचावरील सहजतेनेच संमोहन व्हावे एव्हढी त्या दिग्गज कलाकाराची ताकद!!

एकूणच काय तर नाटकाची भट्टी.... टॉक्क!! म स्त!!

घरी परतल्यावर रात्री, हॉलमधे निवांत बसून, पाहून आलेल्या ह्या नाटकाचे एक- एक डायलॉग मारत पुन्हःपुन्हा हसायला खुप्पच धम्मल आली!!

बाबांमुळे एक फार चांगल्या दर्ज्याची कलाकृती पहायला- अनुभवायला मिळाली... हर्बेरिअमचं हे पान कायम माझ्या मनात दरवळत राहिल...!! Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !! बागे सर्व चित्र डोळयासमोर उभे राहिले.....छान लिहयलेस अगदी :)....लकी आहेस एवढे छान नाटक बघायला मिळाले....आम्ही ह्या गोष्टी खुप मिस करतो Sad

वा: बागुली, मस्त जमलंय गं ! चला याही क्षेत्रात तुझं यशस्वी पदार्पण. Wish, तुला उरलेल्या ४ मधली अजुनही काही बघायला मिळाली असती. Happy लिव संपतानाचा शेवटचा दिवस सार्थकी लागला तर. भरत जाधव बद्दलचं माझंही मत असंच बदललं - सही रे सही ( लेटेस्ट)- पाहिल्यावर. नाटक मला अजिबात आवडलं नाही, पण 'भजा'च्या एंट्रीला नाटक जिवंत होत होतं. खरंच चांगलं काम करतात ते.

मस्त लिहिलंयस गं Happy नक्कीच बघणार. सूर्याची पिल्ले, हमिदाबाईची कोठी ह्यापैकी काहीही बघायला मिळालं नाही. आता हे नाटक चुकवणार नाही.

आयुष्याची खूप पानं अशा सोनेरी क्षणांनी भरत रहातात..
पण बरेच नकोसे दु:खच जास्त व्यक्त करतात. .
सुख शेअर करणं हेही किती आनंदायी असू शकतं याचा नवा अनुभव आला वाचताना..
त्या नाटकाबद्दल जास्त लिहण्यापेक्षा तू कुटूंबाबद्दल जास्त लिहलस आणि म्हणूनच हे लिखाण आवडलं. ..
आपल्या माणसांच्या सहवासात कोणताही क्षण असाच आनंद ओसंडणारा असतो...मग ते नाटक असो वा सिनेमा वा अजून काही..किंवा ते बरे असो वा वाईट...

पु.ले.शु!!! Happy

सहज आणि प्रामाणिक लिहिलंय. आवडलं Happy
मला ह्या मालिकेतलं 'सूर्याची पिल्लं' बघायचं होतं पण नाही जमलं. ह्या वर्षीच्या माहेरच्या दिवाळी अंकात सुनील बर्व्यांनी ह्या उपक्रमाबद्दल अतिशय सुंदर अनुभवकथन केलं आहे.

झोपी गेलेला जागा झाला...या नाटकावरुन पहीली मराठी प्रायोजित मालिका दुरदर्शनवर सादर केली गेली होती. तिची आठवण झाली..:)

मस्त लिहिलय....मी पण त्याच प्रयोगाला आले होते...

"मला पंधरा वर्षाची रजा मिळेल का रे ? हा भरत चा सगळ्यात आवडलेला डायलॉग :-ड

स्मिता Lol
मला तो "टिक्-टॉक, टिक टॉक" सीन पण प्रचंड आवडला, घड्याळाच्या तालावर पळणारे आपण, सकाळची एनर्जी आणि दिवस संपवताना (पार संपत) आलेली एनर्जी निव्वळ अ‍ॅक्टिंगने भरत जाधवने धम्मालच दाखवली Happy

प्रतिसादासाठी आभार मित्र मैत्रिणिंनो!

मी हर्बेरियमची सूर्याची पिल्ले आणि हमिदाबाईची कोठी पाहिलं. खूप आवडले होते दोन्ही प्रयोग. 'लहानपण देगा देवा' पहायचं नव्हतं तर 'आंधळं दळतंय' मनात असून जमलं नाही. 'झोपी गेलेला' मात्र आवर्जून पाहिलं. एकदम धम्माल प्रयोग. मलाही भरत जाधव फारसा आवडत नाही. पण ह्यात त्याने सही काम केलंय. सतिश पुळेकर, भार्गवी चिरमुले, सुनिल बर्वे ह्यांचीही कामं आवडली. सीआयडी झालेले संतोष पवार तर अफलातून. त्यांचं ते 'टुर्रर्र' आठवलं की अजून हसायला येतं. सुनिल बर्वेने पुढल्या वर्षीही अशीच नाटकं आणायला हवीत.

छान नाटक आहे.
शिवाजी मंदिर, दादरला पहिल्याच प्रयोग पाहिला. दिनांक ०५.११.२०११
पण नाटकाच्या पहिल्या अंकात फार काही मजा आली नाही, पण पुढिल दोन अंक छान आहेत. भार्गवी चिरमुले, सुनिल बर्वे, भरत जाधव याची कामं आवडली.
भार्गवी चिरमुले तर झक्कास.

"सही रे.." आणि "झोपी गेलेला..." पाहिल्यावर असं वाटलं की भरत जाधव साहेबांनी आपली एनर्जी फालतु चित्रपटात वाया न घालवता फक्त नाटकेच करावीत....
सही रे सही पाहुन मी भरत जाधव ची फॅन झाले होते..पण "गलगले निघाले" नावाचा अत्यंत वाईट सिनेमा पाहुन फार चिडचिड झाली होती...
असो...
कदाचित पैशांसाठी कलाकारांना पण कॉम्प्रमाईज करावे लागत असेल....

स्वप्ना, तेच तर म्हणालेय वर, संतोष पवार ने पोट दुखेपर्यंत हसवलय.. ते "टूर्र्र्र्र्र्र्र्र" विचित्र विनोदी होतं!! Lol
हो खरेच, भरत जाधवांबद्दल मतपरिवर्न होण्यासाठी असा लाईव्ह परफॉर्मन्स्च पहावा... आणि पुळेकर साहेबांनी साकारलेले विसरभोळे, डॉ. आठवले- तुफ्फान! Wink