संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर - सई केसकर - बायोफ्युएल्स

Submitted by सई केसकर on 19 November, 2011 - 21:04

प्रथम, ही संधी मला दिल्याबद्दल माबोकरांचे मन:पूर्वक आभार. मला माझ्या संशोधनाच्या विषयापेक्षा मी संशोधन क्षेत्रात कशी आले आणि का आले या प्रश्नांची उत्तरं जास्त महत्वाची वाटतात. काही ठिकाणी माझ्या प्रवासाचं वेगळेपण दाखवण्यासाठी मला पठडी सोडून न जाणार्‍या लोकांची मतं सादर करावीशी वाटतात. त्यात त्यांना हिणवायचा उद्देश अजिबात नाही. धोपट मार्ग सोडून चालण्यानी नेहमीच भलं होतं असं मला अजिबात वाटत नाही. पण माझ्या प्रवासानी मला, कधी कधी आखून दिलेला रस्ता सोडल्यानी आपण कधीही कल्पना करू शकणार नाही असे सुंदर अनुभवही येऊ शकतात, याची जाणीव करून दिली.

माझा जन्म झाला तेव्हा माझी आई तिच्या पी.एच.डीच्या शेवटच्या टप्प्यात होती. तिला मूल होणार आहे हे जेव्हा तिला कळलं तेव्हा सगळ्यात आधी तिला चिंता वाटली ती तिच्या पी.एच.डीच्या भवितव्याची. तिचे गाईड जमदग्नींचा अवतार. न आवडलेले पेपर ते लोकांच्या तोंडावर फेकून द्यायला सुद्धा कमी करायचे नाहीत. त्यामुळे प्रयोगशाळेतल्या कामात कुठल्याही प्रकारची सूट आईला कधीच मिळणार नाही याची तिला खात्री होती. आठव्या महिन्यापर्यंत आई रोज चालत प्रयोगशाळेत जायची. आणि शेवटच्या एका महिन्यात तिनी थिसीस लिहायला सुरुवात केली. एवढ्या काळात तिला आलेल्या अडचणी अनंत होत्या. गाईडशी मतभेद, पुन्हा पुन्हा करावे लागणारे प्रयोग, अंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पाठवायचे पेपर (पेपर लिहून पाठवणे आज आहे तितके तेव्हा सोपे नव्हते), घरच्या लोकांची काळजी या सगळ्याला सामोरी जात तिची पी.एच.डी झाली. माझा जन्म झाला त्यादिवशी मात्र आईचे गाईड तिच्यासाठी गरम शिरा आणि तिचा नुकता प्रसिद्ध झालेला पेपर घेऊन तिला दवाखान्यात बघायला आले. कदाचित तोच माझ्या पी.एच.डीचा शुभशकून असावा. साधारण बारा वर्षं वसंतदादा साखर संशोधन केंद्रात नोकरी केल्यानंतर आईनी तिचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला. तेव्हा मी तेरा वर्षांची होते. आईबरोबर कारखान्यात जाणे हा माझ्यासाठी रोजच्या आयुष्यातला एक अतिशय नियमित घडणारा भाग होता. कधी अजिंक्यतारा, कधी किसन अहिर, कधी वारणानगर असे अनेक कारखाने मी लहानपणी बघितले. आईला तेव्हा खूप काम असायचं. त्यात माझी काळजी नको म्हणून ती मलादेखील घेऊन जायची. मग थोडी मोठी झाल्यावर यु.व्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून सोपी उत्तरं काढून देणे, त्यासाठी लागणारी केमिकल बनवणे अशी कामं मी करू लागले. आणि आई मला त्याचे पैसे द्यायची. त्यामुळे सुट्टीत मी नेहमी आईकडे काम करायचे. यात प्रयोगशाळेतली भांडी घासण्यापासून सुरुवात झाली.

अभ्यासात मात्र मी कधीच हुशार नव्हते. पोटापाण्यापुरते मार्कं मला नेहमी मिळायचे. पण वर्गात पहिली येणारी, गणितात हुशार वगैरे मी कधीच नव्हते. गणिताची मला खूप लहानपणापासून भीती होती. आणि माझी टक्केवारी ८५ च्या आसपास ठेवायला नेहमी भाषा कारणीभूत असायच्या. माझ्या मैत्रिणींच्या गटात माझ्या एकटीच्याच बाबतीत इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी हे विषय टक्केवारी वर न्यायला मदत करायचे. त्यामुळे बारावीपर्यंत मला असा जबरदस्त न्यूनगंड वगैरे कधीच आला नाही. बारावीत मात्र माझी पुरती वाट लागली. इतकी की त्यानंतर कुठेही पचका झाला की त्याला "बारावी झाली" असा वाक्प्रचार आम्ही बहाल केला. निकाल लागल्यानंतर काही दिवस मी रोज सकाळी, "आपला निकाल हे आपल्याला पडलेलं वाईट स्वप्न असू देत" अशी वेडी आशा करत उठायचे. त्या काही दिवसात माझ्या शाळेतल्या मैत्रिणी माझ्या घरी सांत्वनाला आल्या. मी सायन्स सोडून आर्ट्स किंवा कॉमर्सला जावं असे सल्ले त्यांनी (आणि त्यांच्या आयांनी) मला दिले. बीएस्सीला प्रवेश घेऊन मी बरेच दिवस कॉलेजलाच गेले नाही. आई रोज येऊन मला "आज कॉलेजला गेलीस का?" असं शांतपणे विचारायची. मीसुद्धा "नाही" असं शांत उत्तर द्यायचे. त्या काही दिवसांमध्ये आपलं आयुष्य आता संपलं आहे, भविष्याची सगळी उज्वल दारं आपल्याला बंद झालीयेत असं मला उगीचच वाटायचं. रोज रडून रडून माझे डोळे कायम सुजलेले असायचे. आणि यात माझ्या घरच्यांचा काहीच वाटा नव्हता. आई मला कधीच मी अमुकच शिकलं पाहिजे किंवा तमुकच केलं पाहिजे असा आग्रह करायची नाही. मला कमी मार्कं मिळाले याचं सर्वात जास्त दु:ख फक्त मलाच झालं होतं. आणि आई बाबांना मात्र फक्त मला झालेल्या दु:खाचं दु:ख व्हायचं. शेवटी कुणीतरी, "इंजीनियरिंगचा फॉर्म तरी घेऊन ठेव" असं म्हणून मला एक दिवस ओढून बाहेर काढलं. कसाबसा मला सिंहगड कॉलेजमध्ये केमिकल इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. तो मिळाल्यावर मी वर्षं संपताना वाय.डी (इअर डाउन) होईन असंही भाकीत काही लोकांनी केलं होतं. आणि त्यात काहीच चुकीचं नव्हतं. माझे बारावीचे मार्कं बघता मी इंजीनियरिंग मध्ये गटांगळ्या खाणार हे साधं त्रैराशिक होतं. आणि पहिल्या वर्षी गणिताच्या पेपरच्या आधी मला तीव्र चिंतेचा झटका आला. इतका की आदल्या दिवशी भीतीने मला चक्कर आली. त्या दिवशी आईनी मला ताकीद दिली, "तू आता नापास झाली नाहीस तर मी तुला घरातच घेणार नाही. तुझ्या आयुष्याला नापास होण्याची नितांत गरज आहे. आत्ता तू नापास झाली नाहीस तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस." तिच्या या सल्ल्याला मान देऊन मी पहिली ए.टी.के.टी घेतली. ती मिळाल्यावर मात्र प्रत्येक वर्षी माझा निकाल बरा होत होत फायनलपर्यंत कौतुकास्पद झाला. पण ती चार वर्षंदेखील कायम तणावात गेली. त्यातला सगळ्यात मोठा ताण, "आपल्याला हे जमलं नाही तर आपण स्वत:ला कधीच आवडणार नाही" हा होता. मला खरं तर मी इंजीनियर बनून काय करणार होते याची काहीच कल्पना नव्हती. आईला मदत करायची, तिची कंपनी चालवायची या ढोबळ हेतूनी मी ती शाखा निवडली होती. पण कुणी, "तुला काय, सगळं आयतं आहे. तुझी आई एखादा श्रीमंत मुलगा पण बघेल", असं म्हणालं की खूप राग यायचा. कित्येक वेळा मला कमी मार्कं मिळाले की सांत्वनात "तरी तू नशीबवान आहेस तुला आयता धंदा आहे" अशी वाक्य मैत्रिणींचे आई-बाबा टाकायचे. पण धंदा कधीच आयता नसतो हे मला तेव्हा त्यांना सांगता आलं नाही. त्यात माझ्या आईचा व्यवसाय तर अगदीच सोपा नव्हता.

इंजीनयरिंग झाल्यावर माझ्या वर्गातली बरीच मुलं अमेरिकेला शिकायला गेली. तिथेही आमची बोंब होती. एखाद्या अमेरिकन युनीव्हरसीटीने बी.ई.नंतर हसत हसत प्रवेश द्यावा असं माझ्या रेस्युमेवर काहीच नव्हतं. आणि आईनी मला निक्षून, "आता मी तुझ्या शिक्षणाचा खर्च करणार नाही. स्कॉलरशिप नसेल तर उच्च शिक्षण नको" असं सांगितलं होतं. त्यामुळे विना शिष्यवृत्ती कुठे जायचा प्रश्नच नव्हता. माझ्या काही मित्र मैत्रिणींच्या पालकांनी त्यांचा सुरुवातीचा खर्च केला. खरं सांगायचं तर तेव्हा मला थोडं वाईट वाटलं. पण आईचं म्हणणं बरोबर आहे याची मला पूर्ण कल्पना होती. मी बी.ई. नंतर सहा महिने पुण्यात एन.सी.एलमध्ये बिनपगारी काम केलं. ते चार महिने खर्‍या अर्थानी माझ्या आयुष्याला नवं वळण देणारे होते. तसं महान काम असं मी काहीच केलं नाही. पण प्रयोगशाळेतल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकताना मला खूप समाधान मिळू लागलं. आणि अभ्यास आणि मार्कं यांचे बागुलबुवा दूर झाल्यावर माझ्यातल्या इतर चांगल्या सवयींचा परिचय माझा मलाच होऊ लागला. मी वक्तशीर आहे आणि त्याचा मला खूप उपयोग होतो ही माझी मला पटलेली पहिली ओळख. आता हा गुण एखाद्या हार्वर्डमध्ये प्रवेश मिळालेल्या मुलासमोर तितकासा टिकणार नाही हे कबूल. पण आयुष्यात आपण एखादी गोष्ट छान करू शकतो हा आत्मविश्वास त्या काळी माझ्यासाठी फार महत्वाचा होता. तसंच, मला क्रोमॅटोग्राफीत रस आहे असं माझ्या लक्षात आलं. तिथली छोटी छोटी कामं मला मिळू लागली आणि मशीनवर जे काय दिसतंय ते काय बरं असेल? अशा सध्या कुतूहलाने मी त्या विषयाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. सहा महिन्यांनी मी आईच्या ऑफिसमध्ये क्रोमॅटोग्राफी विभागात असिस्टंट म्हणून जॉईन झाले. पगाराचं ठरवताना, "इथल्या असिस्टंटना मिळतो तितकाच देणार" अशी शांत सूचना देण्यात आली. आणि वर "येण्या जाण्याचा खर्च नाही" हे पण घातलं.

त्या वेळी भारतात पेप्सी आणि कोकाकोला विरुद्ध खूप मोठं स्टिंग ऑपरेशन झालं होतं. शीतपेयांमध्ये कीटनाशकांचे अंश सापडले म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येत होता. त्या परिस्थितीत या दोन्ही कंपन्या आईकडे आल्या. त्यांना नक्की ही कीटनाशक कुठून येतायत हे शोधून काढायचं होतं. कीटनाशकांची लाईफ सायकल असते. पिकावर फवारणी केली की पावसाच्या पाण्याबरोबर कीटनाशाकांचा जमिनीत निचरा होतो. त्यातून जमिनीतल्या पाण्यात त्यांचे अंश सापडतात. तसंच उसावर मारलेल्या कीटनाशकांचे अंश साखरेत मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याला जवाबदार कोण? तर याचं खरं उत्तर म्हणजे भारतात किती कीटनाशक वापरावं याचे नियम स्पष्ट नव्हते आणि शेतकर्‍यांना याबद्दल नीट माहिती देण्यात आली नव्हती. त्या वर्षी उसाला लोकरी मावा या किडीची चांगलीच लागण झाली होती. आणि घाबरलेल्या शेतकर्‍यांनी जमतील ती सगळी कीटनाशकं त्यांच्या पिकावर फवारली. याचा शोध घ्यायच्या गटात आईनी माझी नेमणूक केली. मग महाराष्ट्रातले पाच कारखाने निवडून तिथल्या पाण्याचा, उसाच्या रसाचा, रसापासून साखर होईपर्यंत मिळणार्‍या प्रत्येक प्रोसेस इंटरमिडीएटचा जीसी/ एम एस या क्रोमॅटोग्राफी पद्धतीने आम्ही अभ्यास केला. हा अभ्यास करताना मला शाळा कॉलेजमध्ये कधीच न मिळालेलं शिक्षण मिळालं. एखाद्या गोष्टीचं कसून निरीक्षण करणं आणि त्याचा शेवटपर्यंत चिकाटीने पाठपुरावा करणं, ते ही एखाद्या मोठ्या कंपनीसाठी, हे सगळंच खूप जबाबदारीचं काम होतं. हे करताना पुन्हा एकदा मला शॉप फ्लोरवर लागणार्‍या माझ्यातील गुणांचा परिचय झाला. आणि त्यात मला माझ्या आईचे आभार मानावेसे वाटतात. मला कारखान्यात सॅम्पल गोळा करायला पाठवण्यामागे तिचा खूप चांगला उद्देश होता. आणि त्यादरम्यान मला जे कष्ट पडले, ते माझ्या पुढे खूप कामी आले. कारखान्यातल्या उकाड्यात काम करून संध्याकाळी जशी झोप लागायची तशी नंतर कायम लागावी असा निश्चय मी तेव्हाच केला. मला बारावीनंतर जे महान दु:ख झालं होतं, ते या कामानंतर अगदीच फडतूस वाटू लागलं. आणि तिथूनच माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली.

या सगळ्या अभ्यासावर मी आणि आईनी एक पेपर लिहिला. जो आईनी ब्राझीलमधल्या एका कॉनफरन्समध्ये सादर केला. तिथे माझ्या पी.एच.डीचे गाईड हजर होते. त्यांनी हे काम कुणी केलं? असं माझ्या आईला विचारल्यावर तिनी माझं नाव सांगितलं. आणि त्यांनी तिथेच तिला माझ्या पी.एच.डीची ऑफर दिली!
मी बरेच दिवस काय करावं हा विचार करण्यात घालवले. तोवर लेसच्या (माझ्या गाईडच्या) दोन-तीन इमेल्स येऊन गेल्या. शेवटी त्याला माझा रेस्युमे आणि माझ्या कामाची माहिती मी पाठवली. दोन महिन्यांनी मला स्कॉलरशिप मिळाल्याचं पत्र आलं. ही संधी मला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार होती. पुन्हा पठडीबाज लोकांनी "ऑस्ट्रेलियातल्या पी.एच.डीची किंमत यु.एसच्या मानानी कमी" असं मत व्यक्त केलं. पण हातात आलेली संधी मला सोडायची नव्हती आणि एव्हाना मला संशोधन करायचय हे माझं मत पक्कं झालं होतं. म्हणून मी लोकांची उलट-सुलट मतं न ऐकता सरळ ब्रिस्बनची वाट धरली. यात अर्थात आई-बाबांचा मला प्रचंड आधार होता.

माझी पी.एच.डी उसाच्या बगॅसपासून इथनॉल तयार करण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यावर आधारित आहे. उसाच्या बगॅसमध्ये साधारण ५०% सेल्युलोज असतं. इथनॉल ज्यापासून बनतं त्या साखरेची म्हणजे ग्लुकोजची (सहा कार्बनपासून बनलेली साखर) सेल्युलोज ही लांब साखळी आहे. अशा साखळ्यांना पॉलीमर म्हणतात. पृथ्वीवर सापडणा-या जैविक पॉलीमर्समध्ये सेल्युलोज हे सर्वात जास्त प्रमाणात आढळतं. कारण सगळ्याच वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात सेल्युलोज असतं. पण तरीदेखील त्यापासून इंधन (इथेनॉल) तयार करणं महामुश्कील आहे कारण निसर्गानी या ग्लुकोजच्या साखळ्या एखाद्या सोनाराच्या कलाकारीने आणि एखाद्या लोहाराच्या शक्तीने गुंफल्या आहेत. प्रत्येक साखळीतले काही हायड्रोजन दुसर्‍या साखळीतल्या काही हायड्रोजनचे हात घट्ट धरून असतात. तसंच, एकाच साखळीमधले हायड्रोजनही आपापल्या बंधूंना आलिंगन देऊन उभे असतात. या सगळ्यामुळे या साखळ्या तोडायला प्रचंड उर्जा लागते. सेल्युलोजचं विघटन ग्लुकोजमध्ये दोन मार्गांनी होऊ शकतं. पहिला मार्ग म्हणजे एखाद्या तीव्र अॅसिडने त्यावर हल्ला करणे. यासाठी हाय प्रेशरची गरज असते. तसंच अॅसिड वापरणे हे प्रोसेससाठी फार महाग ठरते. कारण सगळी मशिनरी अॅसिड सहन करू शकणार्‍या धातूपासून बनवावी लागते. दुसरा मार्ग म्हणजे सेल्युलेज एन्झाइम वापरून त्याचं विघटन करणे. पण हे करायला नैसर्गिक सेल्युलोजला थोडं अशक्त बनवावं लागतं. त्या प्रक्रियेला प्रिट्रीटमेंट असं नाव आहे. केमिकल प्रिट्रीटमेंटचे खूप प्रकार आहेत. उदा. अॅसिड, अल्कली, आयॉनिक लिक्विड, हायड्रोथर्मल इत्यादी. ही पायरी झाली की अशक्त सेल्युलोजला एनझाइमच्या स्वाधीन केलं जातं, जिथे त्याचं ग्लुकोजमध्ये विघटन होतं. मग या ग्लुकोजचं यीस्ट वापरून इथेनॉलमध्ये रुपांतर केलं जातं.

अर्थात, वनस्पती फक्त सेल्युलोजपासून बनलेल्या नसतात. त्यात साधारण २०-२५% हेमिसेल्युलोज (पाच कार्बनपासून बनलेली साखर) आणि २०-२५% लिग्निन (फिनॉलिक पॉलीमर) असतं.
सध्या अमेरिकेमध्ये मक्यापासून इथेनॉल बनवण्यात येते. याची टेक्नोलॉजी प्रस्थापित करायला सोपी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हे इथेनॉल स्टार्चपासून बनवलं जातं. स्टार्चदेखील ग्लुकोजपासून बनलेले आहे. मग स्टार्च आणि सेल्युलोज मध्ये फरक काय? तर तो म्हणजे स्टार्चमध्ये सेल्युलोजसारखे किचकट हायड्रोजन बॉण्ड नसतात. स्टार्च गरम पाण्यात विरघळतं, त्यामुळे त्याचं ग्लुकोजमध्ये विघटन करणं जास्त सोपं आहे. ब्राझीलमध्ये उसाच्या रसापासून, म्हणजेच ग्लुकोज पासून बनलेलं सुक्रोज वापरून, इथेनॉल बनवतात. मग लगेच पुढचा प्रश्न हा येतो की सेल्युलोजपासून (बगॅसपासून) इथेनॉल बनवायचा उपद्व्याप का करताय मग तुम्ही? तर याचं उत्तर असं की स्टार्च किंवा सुक्रोज ज्या ज्या वनस्पतींमधून घेता येईल, त्या सगळ्या वनस्पती (उदा. ऊस, मका, बटाटा, शुगर बीट, कसावा, ज्वारी) वेगवेगळ्या देशांत अन्न म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे जर जगाची इंधनाची भूक भागवायची असेल तर अन्न आणि इंधन या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध काम करू लागतील. ज्या देशांमध्ये मांसाहार कमी केला जातो, त्या देशांत ही लढाई अधिकच प्रकर्षाने जाणवेल. आणि सुपीक शेतजमीन इंधनासाठी वापरायची की अन्नासाठी हा यक्षप्रश्न जगापुढे उभा राहील. या धर्तीवर करोडो टनावारी वाया जाणारं (शेत कचरा, बगॅस, पालापाचोळा) सेल्युलोज, इथेनॉल आणि पेट्रोल मधील ही दरी भरून काढण्यासाठी आकर्षक मानलं जातं.

माझी पी.एच.डी मुख्यत: लिग्निन आणि सेल्युलोजच्या केमिस्ट्रीचा अभ्यासावर आधारित होती. आयॉनिक लिक्विड्स (आयएल्स) वापरून बायोमासमधील घटक (सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन) एकमेकांपासून विभक्त करता येतात. आयएल्स म्हणजे साध्या भाषेत रूम टेम्परेचर आणि प्रेशरला द्रवरूपात रहणारं मीठ. या द्रव्यांचा फायदा असा की प्रेशर व्हेसल न वापरता यांना २०० डिग्री सेल्सियसपर्यंत तापवता येते. आणि यांचा इनर्ट सॉलव्हन्ट म्हणून वापर करता येतो. काही आयएल्स सेल्युलोजमधले हायड्रोजन बॉण्ड अशक्त बनवायला मदत करतात. आणि काही आयएल्स बायोमासमधील फक्त लिग्निन विरघळवायला मदत करतात. माझ्या अभ्यासात मी आयएल्स हे फक्त बायोमासचा अभ्यास करायचं माध्यम म्हणून वापरलं, पण आयएल्सना प्रिट्रीटमेंटसाठी वापरणारे बरेच ग्रुप अस्तित्वात आहेत. "लिग्निन" हा पदार्थ गेली कित्येक वर्षं संशोधकांना चकवत आला आहे. अजुनही या पदार्थाचं निश्चित स्वरुप रेखाटण्यात शास्त्रज्ञांना यश आलं नाहीये. पण लिग्निनला प्लास्टिकमध्ये मिसळून थोड्या प्रमाणात बायोडीग्रेडेबल प्लास्टिक बनवता येऊ शकते. तसंच लिग्निनचं विघटन करून सध्या जी केमिकल्स पेट्रोलीयम पासून बनतात तीदेखील बनवता येऊ शकतील. सेल्युलोजपासून इंधन आणि लिग्निन आणि हेमिसेल्युलोजपासून प्लॅटफॉर्म केमिकल बनवली तर शेत कचर्‍यातले सगळे घटक नेटके वापरता येतील. सध्या जसं क्रूड तेलापासून अगदी प्लास्टिकपासून पेट्रोलपर्यंत केमिकल बनवता येतात, ज्याला पेट्रोलियम रीफायनरी म्हणतात, तसंच बायोमासपासून बनणार्‍या केमिकल प्रोसेसिंगला बायोरीफायनरी असं नाव दिलं गेलं आहे. माझं पुढील सगळं काम या क्षेत्रात आहे.

पी.एच.डी संपायच्या वेळेस मी नोकर्‍या शोधायचं ठरवलं. मला नोकरी मिळेल की नाही याची मला चिंता होती. पण मी ठरवलं होतं की पहिल्या दहा ठिकाणून नकार आल्यानंतर मी दु:ख वगैरे करणार. तोपर्यंत मी काहीही विचार न करता माझा रेस्युमे सगळीकडे पाठवत राहणार. आणि असं ठरवलंच आहे म्हणून मी माझ्या विषयातील पाच दिग्गज शास्त्रज्ञांना माझा रेस्युमे पाठवायचं ठरवलं. त्यात पहिलं नाव अमेरिकेतील प्रोफेसर ब्रूस डेल यांचं होतं. माझ्या पी.एच.डीच्या प्रवासात ज्यांची मतं मला सगळ्यात वास्तववादी वाटली होती त्यापैकी ते एक होते. अगदी साध्या भाषेत मी त्यांना पत्र लिहिलं. त्यांचं उत्तर वगैरे येणार ही अपेक्षाच नव्हती, त्यामुळे मी कुठलीही भीड न ठेवता छान पत्र लिहिलं. आणि झोपले. सकाळी पाच वाजता थिसीस लिहायला उठले तर मेलबॉक्समध्ये डेलसाहेबांचं नाव दिसलं! पाच मिनट मी नुसतीच ती न उघडलेली मेल बघण्यात घालवली. उघडल्यावर त्यात इंटरव्यूचं आमंत्रण दिसलं! दोन आठवड्यांनी माझ्या रात्री बारा वाजता त्यांचा मला लॅबमध्ये फोन आला. एक तास गप्पा मारल्यावर मला "यु आर हायर्ड" असा कुठलाही आढेवेढे न घेता जाहीर केलेला निर्णय त्यांनी ऐकवला. या प्रसंगाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. पहिली गोष्ट मी शिकले ती म्हणजे, आपली लायकी काय आहे, याचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. आणि दुसरी म्हणजे, माझ्याकडे हरण्यासारखं काही नाहीच मुळी या वृत्तीने, खुल्या दिलाने, मन लावून केलेल्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात. मला नोकरी मिळण्यामागे मला माझ्या हुशारी/लायकीपेक्षा जास्त मोठा भाग माझ्या नशीबवान असण्याचा वाटतो. आणि देवानी मला अशा प्रकारे संधी दिल्याबद्दल मी त्याचे रोज आभार मानते.

मला नेहमी लोक मी खूप शूर आहे असं सांगतात. पण माझं प्रत्येक विमान धावपट्टी सोडून हवेत जाताना माझ्या पोटात नेहमी एक भीतीचा गोळा येतो. धाडस म्हणजे भीतीचा अभाव नक्कीच नाही. धाडस म्हणजे तो पोटात आलेला भीतीचा गोळा जाईपर्यंत धरलेला धीर. आपलं पुढे काय होणार, याची सगळ्यांना वाटते तितकीच काळजी मलादेखील वाटते. पण त्या चिंतेच्या हातात हात घालून आयुष्य जिथे नेईल तिथे जाण्यात एक समाधान आहे. आणि संशोधनामुळे मला जे आणि जसं जग बघायला मिळालं आहे त्यासमोर कुठलाही आखून दिलेला नकाशा फिका आहे. कुणाचाही संशोधनाचा प्रवास बघितला की मला ग्रेसची एक कविता आठवते.
ती इथे देऊन मी माझा लेख संपवते. यातील "दु:ख वैभवाची संपन्नता" हे तीन शब्द मला फार फार आवडतात. आत्मशोधाच्या वाटेवर जाणार्‍या प्रत्येक संशोधकाला, त्याच्या हृदयातील हे दु:खवैभव संपन्न करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

आत्मशोधाच्या आंधळ्या वाटेवर चाचपडत जाणार्‍या
प्रत्येक वाटसरूला कुठेना कुठे भेटणारा सहयात्री -- सिद्धार्थ
बुद्धाच्या सिद्धीपेक्षाही मला त्याचे सिद्धार्थपण जास्त मोलाचे वाटते
तसे त्यांनी फारसे दु:ख पाहिले भोगले नव्हतेच
पण एवढ्याश्या दु:खाच्या दर्शनानेही त्याचे राजवंशी अस्तित्व उध्वस्त झाले
हा उध्वस्तपणा झेलतानाच्या सर्व व्यथा ओंजळीत घेऊन तो तडक निघाला
व्यथेला ईश्वरी करुणेची परिमाणे देण्यासाठी उरी फुटून निघाला
अनुभवाचे पंख कापून दु:खाला मानवतावादाची शिस्त लावण्याची त्याने घाई केली नाही
ज्याने आयुष्यभर कुठल्याही प्रस्थापित मूल्यांचे दडपण मानले नाही;
आणि निर्माणक्षम अस्तित्वाची जडणघडण होत असताना या प्रक्रियेला कुठल्याही तडजोडीच्या वेठीस धरले नाही
तो सिद्धार्थ!
त्याचे व्यासपीठ होऊ शकत नाही, करू नये.
व्यासपीठे बेमालूमपणे माणसांची विटंबना करीत राहतात
अनुभवांच्या तोडमोडीला भिऊन, तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय
मग प्रेषितांच्या व्याथासुत्रांचे काय?
शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजाची दुनिया घटकाभर स्तब्ध होत असेल
पण ती हादरून जात नाही.
मंत्रांमागचे प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात
पठडीबाज गुरूंच्या अश्रायानी मार्ग तर सापडत नाहीच, उलट दिशाभूल होत राहते
अशी दिशाभूल नाकारणे वा स्वीकारणे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न!
पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत, आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाही
ही दु:खवैभवाची संपन्नता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान लिहिलंय.
आयएल्स (IL) फार महागडी असतात ना? त्यामुळे आयएल्स हे द्रव्य वापरून रोजच्या जीवनात वापर्ण्यायुक्त बायोफुएल बनवणे कितपत संभाव्य आहे?

सई ,
ग्रेस माझे आवडते रचनाकार आहेत. त्यामुळे पी. एचडी. लेखाची सांगता करताना घेतलेली "दुखः वैभवाची संपन्नता" आपल्यात आलेली वैचारिक प्रगल्भतेची जाणीव आपोआप अधोरेखीत करते.
डिग्री इतकाच अभ्यासाचा आपल्याला प्रवास किती संपन्न करतो याची साक्ष आपल्या लेखातून मिळते आहे. खूपच आवडला लेख.

छानच लिहीलय Happy
किम्बहुना "कर्मयोगाचे झालेले आकलन" मांडलय असे वाटले मला!

(बायदिवे, सई म्हणजे यस्जीरोड बीबी उघडणारी सई का? ....
लिम्ब्या, नाही. प्रोफाईल बघत जा की रे प्रश्न विचारायच्या आधी, [येड्चापच्चेस] Proud )

सई खरंच छान लिहीलय . प्रामाणिक लिखाणाला प्रामाणिक दाद.
<<पहिली गोष्ट मी शिकले ती म्हणजे, आपली लायकी काय आहे, याचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. आणि दुसरी म्हणजे, माझ्याकडे हरण्यासारखं काही नाहीच मुळी या वृत्तीने, खुल्या दिलाने, मन लावून केलेल्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात>> मनापासुन आवडलं
खरच शब्दच नाहीत आता जास्त लिहायला

सई, फार छान लिहिलय.
संशोधनातील फोटो नक्कीच आवडतील पहायला.

सई, खूप प्रामाणिक लिहिलं आहेस.
सगळा प्रवास डो़ळ्यासमोर उभा राहिला. तुझ्या आईला तर हॅटस ऑफ.
<< माझी मुलगी सई होऊ शकली तर मला आवडेलच, पण त्याहुन जास्त मी (आम्ही) सईची आई (बाबा)होऊ शकलो तर फार छान वाटेल.>> रैना, +१.

नेहमीप्रमाणेच प्रांजळ मनापासूनचे लेखन Happy

लिखाण अत्यंत सोप्या भाषेत असल्याने संशोधनाबाबतीतले परिच्छेदही वाचायला मजा आली.

क्रोमॅटोग्राफी मलाही खूप आवडत असे.

कारण निसर्गानी या ग्लुकोजच्या साखळ्या एखाद्या सोनाराच्या कलाकारीने आणि एखाद्या लोहाराच्या शक्तीने गुंफल्या आहेत. प्रत्येक साखळीतले काही हायड्रोजन दुसर्‍या साखळीतल्या काही हायड्रोजनचे हात घट्ट धरून असतात. तसंच, एकाच साखळीमधले हायड्रोजनही आपापल्या बंधूंना आलिंगन देऊन उभे असतात. >>> स्ट्रक्चरल फॉर्म्युले डोळ्यासमोर उभे राहिले.

केमिस्ट्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही पुढे काहीच दिवे लावले नाहीत ते सोडून द्या Wink

तुझ्या लेखाची वाटच पहात होते. खूप मस्त लिहीले आहेस, हे वेगळे सांगायला नको. स्वतः च्या घडण्याचा अनुभव असचं म्हणता येईल. Happy
रैनाच्या कमेंटला सुपरलाईक.:)

खूप छान लिहिल आहेस सई!! <<मी वक्तशीर आहे आणि त्याचा मला खूप उपयोग होतो ही माझी मला पटलेली पहिली ओळख.>> खरंय आपल्यातले बरेच गुण आपल्याला स्वत:लाच माहित नसतात. Happy
तुला आठवतं की नाही माहित नाही, मी पण सिंहगड कॉलेजमध्येच होते. आपण ओळ्खतो एकमेकींना!!!

पहिली गोष्ट मी शिकले ती म्हणजे, आपली लायकी काय आहे, याचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. >>> परफेक्ट! हे सर्वात जास्त आवडलं. 'आपलं मत चुकीचं असू शकतं' यासाठी आगाऊला अनुमोदन.

छान लिहिलं, आणि माहिती दिली आहेस. Happy

सई काय जबरदस्त लिहिलायस लेख माहिताय? खरंतर शिर्षक वाचून मला वाटलं होतं की या लेखात प्रचंड काहीतरी अगम्य असणार, जे आपल्या डोक्यावरून जाणार. पण तसं काही एक झालं नाही. तुझी मेहनत, मन:स्थिती, तुझं काम सगळं यथायोग्य शब्दात वर्णन केलयस. हॅट्स ऑफ्फ टू यू! फारच स्फुर्तीदायक आहे. Happy

तुला तुझ्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा!

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
काही टेक्निकल प्रश्न होते
१. बायोफ्युएल्स कितपत ग्रीन आहेत
--एखाद्या इन्धनाचा "ग्रीननेस" त्याच्या कारबन बॅलन्सवरून ठरतो. म्हणजे इन्धनाच्या जन्मापासून मॄत्यूपर्यंत त्याला किती कार्बन लागतो त्यावरून. इथे बायोफ्युएल्स पेट्रोलपेक्षा बर्‍याच अंशी सरस आहेत. पण ही गणितं लोक आपापल्या पद्ध्तीने मांडतात. त्यामुळे खूप गोंधळ झालेत. पण सर्वात ग्रीन प्रोसेस कोणता हे अजून निश्चितपणे कळू शकलं नाही.
२. किफायतशीर बायोफ्युएल्स
यात एथेनॉलला पेट्रोलच्या जोडीला आणायला बायोमास मधील इतर घटकांना चांगली किम्मत मिळाली पाहिजे. जसं की सध्या लिग्निन जाळण्यात येतं. पण जर त्यापासून उपयुक्त केमिकल बनवता आली तर एथेनॉलची किम्मत कमी करता येईल.
३. आयॉनिक लिक्विड्स
यापासून प्रोसेस बनवता येणं अत्ता तरी अशक्य आहे. कारण ही द्रव्य खूप महागडी असतात. आणि ९९.९९% रीकव्हरी (रीसायकलसाठी) नसेल तर तोटा होईल. Happy जाणकारांना हा जोक कळेलच. Happy

ता.क. आत्ता बायोमास उपयुक्त आयएल्स मोस्टली जर्मनीत (ब.ए.एस.एफ) मध्ये बनतात. ती जेव्हा मेड इन चायना होतील तेव्हा कदचित एक हलकासा आशेचा किरण दिसेल. Happy

सई,तुझा शैक्षणीक प्रवास खूप छान लिहीला आहेस्.जिद्द असली की काहीही साध्य करता येते. तुझ्या
पुढील रिसर्चसाठी शुभेच्छा.

--एखाद्या इन्धनाचा "ग्रीननेस" त्याच्या कारबन बॅलन्सवरून ठरतो. म्हणजे इन्धनाच्या जन्मापासून मॄत्यूपर्यंत त्याला किती कार्बन लागतो>>> हे जरा अजुन स्पष्ट करुन सां गाल क प्लिज....?

सई, खुप छान लिहीलं आहेस! नेहमीप्रमाणेच खुप आवडलं!
आईच्या लिखाणाची वाट बघतेय!
बाबांनी पण किती छान प्रतिक्रिया दिलीय!

खूप छान गं सई!!
तुला आणि तुझ्या घरच्यांना सलाम! जिद्दी आहेस. मानलं!

तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

माझी मुलगी सई होऊ शकली तर मला आवडेलच, पण त्याहुन जास्त मी (आम्ही) सईची आई (बाबा)होऊ शकलो तर फार छान वाटेल>>> +१. आवडलं. मस्त साधं सोपं सुटसुटीत लिहिलय.

>>>> पहिली गोष्ट मी शिकले ती म्हणजे, आपली लायकी काय आहे, याचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. आणि दुसरी म्हणजे, माझ्याकडे हरण्यासारखं काही नाहीच मुळी या वृत्तीने, खुल्या दिलाने, मन लावून केलेल्या गोष्टी खूप आनंद देऊन जात>>>><<<

हे मस्तच!

आणि हो एकदा नापास झाल्यावर कळते की "पानी कितना खोल है". Happy हे एक फेमस वाक्य झालेले आम्ही नापास झालो तेव्हा.
नापासाची भिती वगैरे कुठच्या कुठे पळून जाते मग. अर्थात ते समजून मग एक निश्चित मार्ग धरला तर...

कित्येक गोष्टींचा आपण उगाच बाउ करत असतो...

सई काय अप्रतिम लिहिलं आहेस!
आपली लायकी काय आहे, याचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. आणि दुसरी म्हणजे, माझ्याकडे हरण्यासारखं काही नाहीच मुळी या वृत्तीने, खुल्या दिलाने, मन लावून केलेल्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात>>
मला ही वाक्ये अतिशय महत्वाची वाटतात.
तुझ्या लिखाणातला प्रामाणिकपणा खूप भावला.तुझ्याबरोबरच तुझ्या आई-वडिलांचे देखिल कौतुक वाटते.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

Pages