देऊळ - शेवटचा हात फिरता तर...

Submitted by अवल on 16 November, 2011 - 04:21

देऊळ! खुप दिवसांची वाट पाहून आवर्जून देऊळ पहायला गेले. खुप कष्ट घेऊन, खुप मनापासून, खुप विचार करून केलेला हा चित्रपट ! सर्वांनी केलेली सुरेख कामं! सुरेख छायाचित्रण ! सुरेल संगीत ! अतिशय कल्पकपणे अन अतिशय प्रभावीपणे येणारी गाणी, त्यांचे शब्द ! प्रसिद्धी साठी केलेले, आवर्जून उल्लेखावे असे प्रयत्न ! खरं तर अगदी प्रत्येक गोष्टीचे कौतुक करावे असाच हा चित्रपट "देऊळ" !

चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमनेच ताबा घेतला. किती सुंदर रेतीचित्रं ! अन किती सफाईदार ! अन नंतर
एका मागून एक येत जाणारी लँडस्केप्स अन त्यातून दिसत जाणारे गाव, गावकरी, त्यांचे जीवन....उलगडत जाणारी कथा, त्यातले नाट्य, सगळेच खुप जिवंत अन रसरशीत ! मूळ कथा, कलाकारांची कामे, छायाचित्रण ( रात्रींचे सुरेख चित्रण!), सगळेच खुप छान !

पण तरीही "तरीही काही उणे..." असे जाणवत राहिले. अगदी परीपूर्ण होता होता राहून गेले काही तरी. माझी आजी नेहमी म्हणायची कोणतेही काम शेवटचा हात फिरवल्याशिवाय नाहीच पूर्ण होत. तसे शेवटचा हात फिरणे राहूनच गेले की काय ? असे सतत वाटत राहिले.

खरं तर सुरुवातीला रेतीचित्रांबद्दल लिहिले ते एका अर्थाने चांगले पण दुसर्‍या अर्थाने अगदी त्रासदायक. कारण त्या अप्रतिम सुंदर रेतीचित्रांनी चित्रपटातल्या सगळ्यांची नावंही अतिशय सफाईने पुसली गेली. सामान्य प्रेक्षक त्या रेतीचित्रात इतका गुंगून जातो की सगळी नावे डोळ्यासमोरून फक्त सरकत जातात. इथे जर संपादनात प्रत्येक नावाच्या वेळेस रेतीचित्रांना पॉज केले असते तर ? हे शेवटचा हात फिरता तर शक्य होते.

रात्रीचे चित्रण सुरेखच पण तेव्हा घडणार्‍या घटना गावाच्या पार्श्वभूमीवर खटकतात. केश्याच्या मैत्रिणीचे रात्री अगदी उघड्यावर त्याच्या पांघरुणात घुसणे ,गावातील वातावरणात अगदी अशक्य वाटते, अर्थात ही माझ्या वयाचीही प्रतिक्रिया असेल. पण हे दोन प्रसंग आणि सागरगोट्यांचा प्रसंग मला जरा सवंग प्रसिद्धीसाठी वाटले, बरं त्याचा संपूर्ण चित्रपटाशी तसा कोणताच प्रत्यक्ष संबंधही नाही, अन त्या कृतींनी तो-तो प्रसंग जास्ती खुलतही नाही. संपादनात याचा विचार व्हायला हवा होता का ?

एकूण गावाचा आलेख पाहता गावाजवळची टेकडी अन त्यावरचे झाड खरे तर प्रॉमिनंट ! पण त्याचा तसा उल्लेख गावकर्‍यांच्या बोलण्यात दिसला नाही. खरे तर गावाकडे "देवळी", "पार", "विहीर" अशा "व्यक्तिरेखां" चे उल्लेख खुप सहज बोलण्यात येत असतात. तसे हे झाड, किमान ती टेकडी असायला हवी होती.

बर्‍याचदा ( मला किमान तीनदा तरी जाणवले) एक शॉट संपून दुसरा सुरू होतानाचे ट्रान्झिशन ठक्ककन झाले. प्रामुख्याने लाईट नियंत्रीत व्हायला हवा होता. हे शेवटचा हात फिरता तर सहज शक्य होते.

शेवट जरा जास्तच रेंगाळला वाटला.

हे सर्व लिहिताना माझा उद्देश कोणाला केवळ नावं ठेवण्याचा नाही, जर कोणी दुखावले गेले तर इथेच मी माफी मागते. पण खरच मला मनापासून वाटलं, की थोडक्यासाठी एक चांगली कलाकृती होता होता राहिली. कधी या चित्रपटाची फिल्म/डिव्हिडी मिळाली तर खरच यात काही पोस्ट प्रॉडक्शनचे बदल करून पाहीन मी. यात अजूनही काही तपशील असतील, त्या त्या वेळच्या अडचणी असतील, काही आर्थिक प्रश्न ही असतील, अनेक गोष्टी असतील याची मला जाणीव आहे. चित्रपट काढणे अन तो प्रसारीत करणे हे येरा-गबाळ्याचे काम नव्हे याची पूर्ण जाणीव मला आहे. पण तरीही मनाला वाटायचे राहात नाही की, शेवटचा हात फिरता तर...

( चित्रपटाची संपूर्ण गोष्ट कळू नये म्हणून काही मजकूर संपादित...)

विषय: 
Groups audience: 

अवल, छान लिहीले आहे.

घडणार्‍या घटना गावाच्या पार्श्वभूमीवर खटकतात. >>> याच्याशी सहमत. मलाही जाणवले होते, पण लिहायचे विसरलो. एकूणच स्त्री-पुरूष सलगी (तू लिहीलेला प्रसंग, केश्या आजारी असताना त्या स्त्रिया येउन बसणे, केश्याने सोनालीचा हात हातात घेउन बोलणे वगैरे) गावात अशी होत असेल असे वाटत नाही.

तो चंद्र पार्श्वभूमीवर असतानाचा शॉट अतिशय सुरेख आहे. सागरगोट्याचा प्रसंग मला खटकला नाही. नाना-सोनाली असे एरव्ही खेळत असतात असे दाखवायचे असावे, जे दुसर्‍या एका प्रसंगातही आहे. पहिल्या शॉट नंतर नाना ज्या पद्धतीने केश्याला "झोपलो नव्हतो" हे वारंवार सांगतो ते धमाल जमून गेले आहे. मराठी/हिन्दीत असे विनोद फार कमी दिसतात. खूप हसलो. एकूणच नानाचा खूप वेगळा रोल वाटतो, एकदम आवडले काम त्याचे.

नदीच्या प्रवाहाबद्दल - येथे केश्या जी दिशा दाखवतो, पाणी त्याच्या उलटे वाहात असते असेच म्हणायचे आहे ना?

केश्याच्या मैत्रिणीचे रात्री अगदी उघड्यावर त्याच्या पांघरुणात घुसणे ,गावातील वातावरणात अगदी अशक्य वाटते,<<
उलटं हे गावातच शक्य आहे हे मा वै म Happy

अवल, चांगलं लिहिलं आहेस.

मला वाटतं..

पिंक्या केशाच्या अंथरुणात शिरते, अंगलटीला येते त्याबद्दल केशा नाराजी दाखवतोच की २ दा. अशी लग्न ठरल्यावर किंवा प्रेम जुळल्यावर लगेच अंगचटीला जाणारी कॅरेक्टर्स रियल लाईफमध्येही दिसतात. तिथे गाव किंवा शहर असण्याचा संबंध नाही.

केशा सोनालीशी अगदी निर्हेतुक मोकळेपणाने वागत असतो. तो माजघरात ती लाडू वळत असताना तिथे बसून लाडूही खाताना दाखवलाय. त्याचं आणि किंबहुना तिचंही मन शुद्ध दिसून येतं. त्या दोघांचं नातं वेगळं आहे. दत्तदर्शन झाल्याच्या दुर्मिळ अशा सात्विक आनंदात तो तिथे तिला शोधत येतो आणि तिला ती बातमी देण्याच्या नादात आनंदाच्या भरात तिचा हात धरतो.

तसंच, त्या गावात टिपिकल धोतरं, मुंडासं बांधणारे गावकरी नाहीत. आता खूपश्या गावांमध्ये असेच आधुनिक कपडे घालणारे गावकरी, प्रिंटेड साड्या नेसणार्‍या बायका दिसतात. वेश बदलला तसं त्यांची गप्पा मारण्याची जागा 'पार' ही न रहाता कुठलीशी टपरी झाली. पाऊसपाणीवालं गाव नसल्याने कोरडे ठक्क माळ, डोंगर दिसतात. कदाचित पाण्याचे झरेही नसल्याने विहिरही नसेल.

साजिरा बदल केला Happy
नी Happy
अश्विनी, अगं पण तो दाखवत असलेली दिशा उलटी आहे ना Happy देव जरी झाला तरी तो उलटा कसा वाहणार ? म्हणजे देव म्हणून ते शक्य असेल हो, पण मला जरा खटकलं Happy
पण एकूणात मला काय म्हणायचय हे पॉझिटिव्हली घेतलत , सर्वांना धन्यवाद !

देव जरी झाला तरी तो उलटा कसा वाहणार ?>>>>>

**स्पॉयलर**
.
.
त्या प्रसंगातून केशा प्रवाहाच्या उलट जातोय असं सूचित केलं नसेल का? Happy
.
.
**स्पॉयलर समाप्त**

मंजूही अशी द्यायची असते होय स्पॉयलर वॉर्निंग? :अडाणी बाहुली:

देव जरी झाला तरी तो उलटा कसा वाहणार ?>>>>>

**स्पॉयलर**
.
.
मुर्ती म्हणजे देव नाही ना?
.
.
**स्पॉयलर समाप्त**

**स्पॉयलर**
.
.
मुर्ती म्हणजे देव नाही ना?
.
.
**स्पॉयलर समाप्त**
>>>

ओ ताईनु, आम्ही मुर्तीतच देव पहाणारी माणसं. Proud

मलाही ते प्रवाहाविरुद्ध मुर्ती सोडणं खटकलं. काही सुचवायचं आहे का दिग्दर्शकाला त्यातुन??

अगं तेच तर मी लिहिलं होतं आधी काय सुच्वायचं असेल ते. पण नंतर काढून टाकलं.
मंजूने तिला काय वाटलं ते दिलंय बघ.
आता तूही विचार कर असं का दाखवलं असेल त्यावर. आपापला भावार्थ शोधा.