जेव्हा श्रध्दा अंधश्रध्दा बनते

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 15 November, 2011 - 09:32

................ रस्त्यावर शेकडो लोकांची गर्दी. दारू पिऊन तर्र झालेले अंगाला पिवळा रंग लावलेले हातातला आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे,रस्त्यावर धुड्गुस घालणारे पोतराज. काही दारू पिऊन अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिंबाच्या फाट्याने स्वतःला मारून घेत होत्या.. केस मोकळे, कपाळ्भर कुंकू. मध्येच कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून, मुलाला पायावर ठेवून जाताना दिसत होत्या. नारळ, फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग. मुख्य म्हणजे गर्दी होती ती सुशिक्षित लोकांची.

................. आमच्या लहानपणी असं नव्हतं. बोनालु ह्या सणाला हल्ली शाळा कॉलेज बंद असतात. आम्हाला सुट्टी नसायची. फक्त ह्या दिवशी वाजंत्री वाजवत, डोक्यावर दिवा ठेवलेला कलश किंवा रंगीबेरंगी कागदाचे मनोर्‍यासारखे पाळणे, जे देवीला वहायचे असतात ते घेऊन थोड्या थोड्या बायका पोचम्मा नावाच्या देवीच्या छोट्या देवळात जाताना दिसायच्या. दिवसभर हे चालु असायचं. संध्याकाळी छोटी छोटी खेळण्याची दुकानं दिसायची. मुलांना घेऊन लोक तिथे गर्दी करायचे. दुसर्‍या दिवशी 'बलीगंपा' असायचा. 'बलीगंपा' म्हणजे मोठ्या दुरडी मध्ये भोपळा, हळद्कुंकू घालून कालवलेला भात. दुपारी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर पोतराज ती दुरडी डोक्यावर घेऊन देवळाच्या आसपासच्या भागात सगळीकडे तो भात उधळत फिरायचा. दुसरेही काही पोतराज दारू पिऊन उद्दाम होऊन इकडेतिकडे पळायचे. सगळे दारं खिडक्या उघड्या ठेवायचे. कारण तो भात घरांत पडला तर चांगलं असतं अशी लोकांची श्रद्धा. रात्री देवी सजवली जायची. देवीच्या मुखवट्याभोवती फुलं लावून देवळाचा कळस असतो तसे सजवायचे. मग एक परंपरागत म्हातारा माणूस ते डोक्यावर घेऊन प्रत्येकांच्या दारात जायचा. देवी दारात आली म्हणून लोक त्याच्या पायावर पाणी घालून देवीची पुजा करायचे. पायात घुंगरं बांधलेला तो म्हातारा देवीला न धरता तालावर मस्त नाचायचा.

................ आता सगळं तसंच आहे. पण देवळं मोठी झाली आहेत. पोतराज तेच आहेत पण मेकप केलेले. आता शाळाकॉलेजेसना सुट्टी असते. पूर्वी बोनालू हा सण फक्त एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित होता. आता सर्व थरातील माणसे दिसतात. पूर्वी देवळात फक्त समई आणि बाहेर एक विजेचा दिवा असायचा. आता देऊळच नव्हे तर आसपासचा परिसर दिव्याच्या रोषणाईने झगमगत असतो. नवसाचे नारळ आणि पाळणे लावायला देऊळ पुरत नाही.

..................बोनालूच नव्हे तर गणपती, देवीचे नवरात्र असो, एखादे तीर्थक्षेत्र असो, कुठलंही साईबाबांचे, देवीचे. गणपतीचे, मारूतीचे देऊळ असो मशीद असो, चर्च असो. असंख्य संख्येने लोक उपस्थित असतात.हे सगळं बघून प्रश्न पडतो की ही भक्ती, श्रद्धा का इरिशिरी, ते गणपतीउत्सव मोठा करतात मग आम्ही बोनालू का करू नये. ते बत्कम्मा करतात मग आम्ही दांडीया का खेळू नये. हे करत असताना भक्ति पण वाढतीय का? कारण देवाला न मानणारी तरूण पिढी देव देव करताना दिसतीय. सगळ्याच धर्मामध्ये देवाचे प्रस्थ वाढलेलं दिसत आहे.

...............कुठं चाललय जग? उत्क्रांतीकडे? असं म्हणतात की माणूस जेंव्हा अध्यात्माकडे वळतो तेंव्हा तो उत्क्रांतिकडे जात असतो. अंताकडे जात असतो जिथे परमेश्वर असतो. जिथे त्याचा शेवट असतो. पण खर्‍या अर्थाने अध्यात्माकडे वळलेला माणूस विरक्तीकडे वळलेला असतो. त्याचा संसारातला रस हळूहळू कमी होत जातो. परमेश्वराच्या चिंतनात त्याचा वेळ जास्त जातो. इथे श्रद्धा दिसते, भक्ति दिसते पण काही तरी मागण्यापुरती. इथे आलेला प्रत्येक माणूस काहीतरी मागण्यासाठी आलेला दिसतो. कुणाला मूल पाहीजे, कुणाला नौकरी, कुणाला व्यवसायात यश, कुणाला सत्ता, एक ना दोन अनेक मागण्या घेऊन लोक तिथे येतात. देवावर श्रद्धा असणे वाईट नाही. असंही म्हणतात की श्रद्धेने आत्मिक बळ मिळतं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य मनाला शांती मिळण्यासाठी जागा शोधत असतो. आणि जास्तीतजास्त लोक त्यासाठी देवळात जातात. काही लो़कांच्या मते देव ही एक संकल्पना आहे. जगात देवच नाही. त्यांचे खरे मानले तरी. एक प्रचंड शक्ती आहे जिच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. हे तर मानावे लागेल?(देव आहे किंवा नाही हा इथे चर्चेच विषय नाही). त्या शक्तीला परमेश्वर मानून त्याच्यावर श्रद्धा ठेऊन कुणाचं भलं होत असेल तर होऊदे. सगळे प्रयत्न करून परमेश्वर मला नक्की यश देईल अशी श्रद्धा ठेवणं वेगळं. पण काहीच नकरता परमेश्वर करेलच अशी अंधश्रद्धा ठेवल्यावर जर आपले काम नाही झालं तर मात्र श्रद्धळूचा देवावरचा विश्वास तर उडतोच. पण प्रत्येक गोष्टीवरचा त्याचा विश्वास उडतो. तो निराश होतो. सगळं जीवनच त्याचं विस्कळीत होऊन जात.

.................एक गृहस्थ होते. त्यांचा नरसिंहावर खूप श्रद्धा. जे काय होते ते नरसिंहच करतो असा दृढ विश्वास. त्यांच्या घर मालकांना घर विकायचे होते म्हणून त्यांनी या गृहस्थांना घर सोडायला सांगितले. पण हे घर सोडेनात. म्हणून त्यांनी केस केली. तर हे गृह्स्थ म्हणाले," माझा नरसिंह निकाल माझ्यासारखाच लावेल " आणि कोर्टात जाताना खिशात नरसिंहाची मूर्ति घेऊन गेले. पण या गृहस्थाची बाजू खोटी असल्यामुळे नरसिंहाने त्यांच्यासारखा निकाल काही लावला नाही. कोर्टाने रात्रीतून त्यांना बाहेर काढले. नंतर त्यांनी अंथरूण धरले. अशी श्रद्धा काय कामाची. देव आहेच आणि तो काम करणारच असे समजून देवाला प्रत्येक गोष्टीसाठी नवस करणं, काहीच न करता देवावर नुसती श्रद्धा ठेऊन बसून रहाणं हा अतिरेक झाला. लहान मूल आई घरात नाही दिसली की घाबरतं. पण आई दिसली की आई आपल्या पाठीशी आहे म्हणून ते बिनधास्त खेळत त्यातून सगळं शिकत रहातं. आपली श्रद्धा तशीच पाहिजे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे म्हणून सगळी कर्तव्य धैर्याने पार पाडली तर ती श्रद्धा कामाला येते.

.................हे झालं देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीत. पण माणूस फक्त देवावरच श्रद्धा ठेवतो असे नाही तर त्याच्या अनेकांवर श्रद्धा असतात. नेहमी पहाण्यात येणारे लोक म्हणजे आई वडीलांवर श्रद्धा ठेवणारे, साधूवर श्रद्धा ठेवणारे, वास्तुशास्त्रज्ञावर श्रद्धा ठेवणारे, मांत्रिकावर श्रद्धा ठेवणारे, अंगात देव देवी येणार्‍यांच्यावर श्रद्धा ठेवणारे, भविष्यकारावर श्रद्धा ठेवणारे. कितीतरी मोठी यादी होईल. श्रद्धा ठेवणे वाईट नाही पण ती अंध श्रद्धा होते ते वाईट. वास्तुवर श्रद्धा ठेवणारे लोक पहा. सतत घर बदलणं, विकणं किंवा घरात सतत भिंती पाडणं वस्तुंची हलवाहलव करणं यातच गुंतलेले असतात. पैशाचा आणि वेळेचा किती व्यय होतो ह्याकडे लक्षच नसतं. मग पैसा कमी पडला की घर चांगलं नाही. मग ज्योतिष्याकडे जाणार. ज्योतिषी म्हणणार घर बदला. हे चक्र अव्याहत चालु रहातं. ज्योतिष शास्त्रावर नितांत श्रद्धा असणारे लोक मी पहिले आहेत.जे सतत कुठल्या ना कुठल्या ग्रहाला शांत करण्यात मग्न असतात. माझी एक मैत्रिण आहे प्रत्येक काम ती मुहूर्त पाहून करते. अगदी बाहेर जायचं असेल तर राहुकाळ बघते. सतत उपासतापास करत असते. सोन्यासारखा संसार पण सतत घाबरलेली असते. सत्यसाईबाबांची भक्त आहे. पण अंधश्रद्धा बाधली आणि एकुलता एक मुलगा ह्या सगळ्याला कंटाळून वेगळं रहायला लागला. आता पुन्हा असं का झालं म्हणून ज्योतिष्याकडे खेटे घालणं चालु आहे.

..................लोक गुरुमंत्र घेतात. गुरुंवर श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. कारण ते अध्यात्माचा मार्ग दाखवतात. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जायचे सोडून त्यांची सेवा करण्यातच काही लोक मग्न असतात. सतत त्यांच्या अवतीभोवती असणं. घरात म्हातारे आईवडील असतील तर त्यांना औषधपाणी करणार नाहीत पण गुरुंना वस्त्र दान देणं. चांदीसोन्याच्या वस्तु देणं. ( काही जण तर गुरुंचे पाय चेपण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत सेवा करतात). परमेश्वर चिन्तन कमी असते, काही म्हणायला गेले तर पाप पुण्याच्या गोष्टी आपल्यालाच ऐकवतात.

.................. किती बायका मी अशा पहिल्या आहेत की कुठेही कुणी साधू सन्यासी आलेले समजले की ते ठिकाण कितीही दूर असले तरी मिळेल त्या वाहनाने दर्शनाला जातात. आल्यानंतर चेहर्‍यावर एक तृप्तता असते. साधूंच्या दर्शनाने खूप पुण्य मिळते अस त्या दावा करतात. त्यांच असंही म्हणणं असतं की त्यांच्या शरीरातून जे किरण निघतात त्याचा चांगला परिणाम होतो. पण ह्यामुळेच लोक साधू सन्याशांना नको तितक्या मोठ्या पदावर नेऊन बसवतात आणि त्याचा परिणाम आपण समाजावर काय होतो ते पहातो. (सगळेच साधू तसे नसतात).गुरु अध्यात्माचा मार्ग दाखवतात. हळूहळू संसारातून विरक्त व्हायला सांगतात. कांदालसूण ह्यासारखे तामसी पदार्थ हळू हळू सोडायला सांगतात. पण श्रद्धेचा अतिरेक होतो. एक गृहस्थ दूरच्या प्रवासाला निघाले. वाटेत पाणी सुद्धा पीत नव्हते कारण गुरुमंत्र घेतल्यावर बाहेर काही खायचे प्यायचे नाही असे गुरुंनी सांगितले. म्हणून व्ह्यायचा तोच परिणाम झाला. गाडीतच चक्कर येऊन पडले. गुरु काही असे सांगत नाही. ते फक्त असं असं करायचं नाही असं सांगतात. ते हळूहळू कसं कमी करायचं ते आपण ठरवायचं.

...................आमच्या ओळखीचे एक वकील म्हणायचे, "आम्ही खोट्याचे खरं करून पापाचा पैसा मिळवतो. म्हणून आमच्या पैशाला बरकत नसते." आणि सतत मांत्रिक गाठायचे. कुठून तरी ताविज आणायचे, यंत्र आणायचे, नारळ घरात आणून बांधायचे. आम्ही हसून म्हणायचो " अहो तुम्ही वाटेल तितका पैसा खर्च करता हे तोडगे करण्यावर मग घरात पैसा कमी पडणारच" ते हसायचे. कबूलही करायचे. पण थोडे दिवस झाले की पुन्हा कुणीतरी मांत्रिक, किंवा ज्योतिषी गाठायचे.

.................. हे असं वागणारे लोक चांगले शिकलेले, सुशिक्षित, मोठ्या पदावर असलेले आहेत. हे असं वागतांना पाहिले की वाटतं शिक्षण म्हणजे फक्त डिग्र्या का ? ज्या शिक्षणातून खरे खोटे, चांगले वाईट, काहीच समजत नाही ते शिक्षण खरे का?समजून घेऊन श्रद्धा ठेवणे गैर नाही पण श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ नये ह्याची सुशिक्षित लोकांनी तरी काळजी घ्यायला पाहिजे ना. श्रद्धेची अंधश्रद्धा होते तेंव्हा काय होते त्याची ही थोडीशी उदाहरणं आहेत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा खरंच उदाहरणं द्या. मी पण लिहीन.

अश्विनी मस्त प्रतिक्रिया. झोपलेल्यांना जागे करता येते. झोपेचे सोंग करणार्‍यला नाही. सुशिक्षित श्रध्दाळू हे झोपेचे सोंग करणारे आहेत. वह्या तर लोक माझ्याकडेही आणून देतात. पण कारणं सांगून मी नाही म्हणते. तेंव्हा काय ही बाई नास्तिक आहे अशा प्रकारची जळजळीत नजरही मला सहन करावी लागते.

Pages