जेव्हा श्रध्दा अंधश्रध्दा बनते

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 15 November, 2011 - 09:32

................ रस्त्यावर शेकडो लोकांची गर्दी. दारू पिऊन तर्र झालेले अंगाला पिवळा रंग लावलेले हातातला आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे,रस्त्यावर धुड्गुस घालणारे पोतराज. काही दारू पिऊन अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिंबाच्या फाट्याने स्वतःला मारून घेत होत्या.. केस मोकळे, कपाळ्भर कुंकू. मध्येच कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून, मुलाला पायावर ठेवून जाताना दिसत होत्या. नारळ, फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग. मुख्य म्हणजे गर्दी होती ती सुशिक्षित लोकांची.

................. आमच्या लहानपणी असं नव्हतं. बोनालु ह्या सणाला हल्ली शाळा कॉलेज बंद असतात. आम्हाला सुट्टी नसायची. फक्त ह्या दिवशी वाजंत्री वाजवत, डोक्यावर दिवा ठेवलेला कलश किंवा रंगीबेरंगी कागदाचे मनोर्‍यासारखे पाळणे, जे देवीला वहायचे असतात ते घेऊन थोड्या थोड्या बायका पोचम्मा नावाच्या देवीच्या छोट्या देवळात जाताना दिसायच्या. दिवसभर हे चालु असायचं. संध्याकाळी छोटी छोटी खेळण्याची दुकानं दिसायची. मुलांना घेऊन लोक तिथे गर्दी करायचे. दुसर्‍या दिवशी 'बलीगंपा' असायचा. 'बलीगंपा' म्हणजे मोठ्या दुरडी मध्ये भोपळा, हळद्कुंकू घालून कालवलेला भात. दुपारी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर पोतराज ती दुरडी डोक्यावर घेऊन देवळाच्या आसपासच्या भागात सगळीकडे तो भात उधळत फिरायचा. दुसरेही काही पोतराज दारू पिऊन उद्दाम होऊन इकडेतिकडे पळायचे. सगळे दारं खिडक्या उघड्या ठेवायचे. कारण तो भात घरांत पडला तर चांगलं असतं अशी लोकांची श्रद्धा. रात्री देवी सजवली जायची. देवीच्या मुखवट्याभोवती फुलं लावून देवळाचा कळस असतो तसे सजवायचे. मग एक परंपरागत म्हातारा माणूस ते डोक्यावर घेऊन प्रत्येकांच्या दारात जायचा. देवी दारात आली म्हणून लोक त्याच्या पायावर पाणी घालून देवीची पुजा करायचे. पायात घुंगरं बांधलेला तो म्हातारा देवीला न धरता तालावर मस्त नाचायचा.

................ आता सगळं तसंच आहे. पण देवळं मोठी झाली आहेत. पोतराज तेच आहेत पण मेकप केलेले. आता शाळाकॉलेजेसना सुट्टी असते. पूर्वी बोनालू हा सण फक्त एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित होता. आता सर्व थरातील माणसे दिसतात. पूर्वी देवळात फक्त समई आणि बाहेर एक विजेचा दिवा असायचा. आता देऊळच नव्हे तर आसपासचा परिसर दिव्याच्या रोषणाईने झगमगत असतो. नवसाचे नारळ आणि पाळणे लावायला देऊळ पुरत नाही.

..................बोनालूच नव्हे तर गणपती, देवीचे नवरात्र असो, एखादे तीर्थक्षेत्र असो, कुठलंही साईबाबांचे, देवीचे. गणपतीचे, मारूतीचे देऊळ असो मशीद असो, चर्च असो. असंख्य संख्येने लोक उपस्थित असतात.हे सगळं बघून प्रश्न पडतो की ही भक्ती, श्रद्धा का इरिशिरी, ते गणपतीउत्सव मोठा करतात मग आम्ही बोनालू का करू नये. ते बत्कम्मा करतात मग आम्ही दांडीया का खेळू नये. हे करत असताना भक्ति पण वाढतीय का? कारण देवाला न मानणारी तरूण पिढी देव देव करताना दिसतीय. सगळ्याच धर्मामध्ये देवाचे प्रस्थ वाढलेलं दिसत आहे.

...............कुठं चाललय जग? उत्क्रांतीकडे? असं म्हणतात की माणूस जेंव्हा अध्यात्माकडे वळतो तेंव्हा तो उत्क्रांतिकडे जात असतो. अंताकडे जात असतो जिथे परमेश्वर असतो. जिथे त्याचा शेवट असतो. पण खर्‍या अर्थाने अध्यात्माकडे वळलेला माणूस विरक्तीकडे वळलेला असतो. त्याचा संसारातला रस हळूहळू कमी होत जातो. परमेश्वराच्या चिंतनात त्याचा वेळ जास्त जातो. इथे श्रद्धा दिसते, भक्ति दिसते पण काही तरी मागण्यापुरती. इथे आलेला प्रत्येक माणूस काहीतरी मागण्यासाठी आलेला दिसतो. कुणाला मूल पाहीजे, कुणाला नौकरी, कुणाला व्यवसायात यश, कुणाला सत्ता, एक ना दोन अनेक मागण्या घेऊन लोक तिथे येतात. देवावर श्रद्धा असणे वाईट नाही. असंही म्हणतात की श्रद्धेने आत्मिक बळ मिळतं. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य मनाला शांती मिळण्यासाठी जागा शोधत असतो. आणि जास्तीतजास्त लोक त्यासाठी देवळात जातात. काही लो़कांच्या मते देव ही एक संकल्पना आहे. जगात देवच नाही. त्यांचे खरे मानले तरी. एक प्रचंड शक्ती आहे जिच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. हे तर मानावे लागेल?(देव आहे किंवा नाही हा इथे चर्चेच विषय नाही). त्या शक्तीला परमेश्वर मानून त्याच्यावर श्रद्धा ठेऊन कुणाचं भलं होत असेल तर होऊदे. सगळे प्रयत्न करून परमेश्वर मला नक्की यश देईल अशी श्रद्धा ठेवणं वेगळं. पण काहीच नकरता परमेश्वर करेलच अशी अंधश्रद्धा ठेवल्यावर जर आपले काम नाही झालं तर मात्र श्रद्धळूचा देवावरचा विश्वास तर उडतोच. पण प्रत्येक गोष्टीवरचा त्याचा विश्वास उडतो. तो निराश होतो. सगळं जीवनच त्याचं विस्कळीत होऊन जात.

.................एक गृहस्थ होते. त्यांचा नरसिंहावर खूप श्रद्धा. जे काय होते ते नरसिंहच करतो असा दृढ विश्वास. त्यांच्या घर मालकांना घर विकायचे होते म्हणून त्यांनी या गृहस्थांना घर सोडायला सांगितले. पण हे घर सोडेनात. म्हणून त्यांनी केस केली. तर हे गृह्स्थ म्हणाले," माझा नरसिंह निकाल माझ्यासारखाच लावेल " आणि कोर्टात जाताना खिशात नरसिंहाची मूर्ति घेऊन गेले. पण या गृहस्थाची बाजू खोटी असल्यामुळे नरसिंहाने त्यांच्यासारखा निकाल काही लावला नाही. कोर्टाने रात्रीतून त्यांना बाहेर काढले. नंतर त्यांनी अंथरूण धरले. अशी श्रद्धा काय कामाची. देव आहेच आणि तो काम करणारच असे समजून देवाला प्रत्येक गोष्टीसाठी नवस करणं, काहीच न करता देवावर नुसती श्रद्धा ठेऊन बसून रहाणं हा अतिरेक झाला. लहान मूल आई घरात नाही दिसली की घाबरतं. पण आई दिसली की आई आपल्या पाठीशी आहे म्हणून ते बिनधास्त खेळत त्यातून सगळं शिकत रहातं. आपली श्रद्धा तशीच पाहिजे. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे म्हणून सगळी कर्तव्य धैर्याने पार पाडली तर ती श्रद्धा कामाला येते.

.................हे झालं देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीत. पण माणूस फक्त देवावरच श्रद्धा ठेवतो असे नाही तर त्याच्या अनेकांवर श्रद्धा असतात. नेहमी पहाण्यात येणारे लोक म्हणजे आई वडीलांवर श्रद्धा ठेवणारे, साधूवर श्रद्धा ठेवणारे, वास्तुशास्त्रज्ञावर श्रद्धा ठेवणारे, मांत्रिकावर श्रद्धा ठेवणारे, अंगात देव देवी येणार्‍यांच्यावर श्रद्धा ठेवणारे, भविष्यकारावर श्रद्धा ठेवणारे. कितीतरी मोठी यादी होईल. श्रद्धा ठेवणे वाईट नाही पण ती अंध श्रद्धा होते ते वाईट. वास्तुवर श्रद्धा ठेवणारे लोक पहा. सतत घर बदलणं, विकणं किंवा घरात सतत भिंती पाडणं वस्तुंची हलवाहलव करणं यातच गुंतलेले असतात. पैशाचा आणि वेळेचा किती व्यय होतो ह्याकडे लक्षच नसतं. मग पैसा कमी पडला की घर चांगलं नाही. मग ज्योतिष्याकडे जाणार. ज्योतिषी म्हणणार घर बदला. हे चक्र अव्याहत चालु रहातं. ज्योतिष शास्त्रावर नितांत श्रद्धा असणारे लोक मी पहिले आहेत.जे सतत कुठल्या ना कुठल्या ग्रहाला शांत करण्यात मग्न असतात. माझी एक मैत्रिण आहे प्रत्येक काम ती मुहूर्त पाहून करते. अगदी बाहेर जायचं असेल तर राहुकाळ बघते. सतत उपासतापास करत असते. सोन्यासारखा संसार पण सतत घाबरलेली असते. सत्यसाईबाबांची भक्त आहे. पण अंधश्रद्धा बाधली आणि एकुलता एक मुलगा ह्या सगळ्याला कंटाळून वेगळं रहायला लागला. आता पुन्हा असं का झालं म्हणून ज्योतिष्याकडे खेटे घालणं चालु आहे.

..................लोक गुरुमंत्र घेतात. गुरुंवर श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. कारण ते अध्यात्माचा मार्ग दाखवतात. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जायचे सोडून त्यांची सेवा करण्यातच काही लोक मग्न असतात. सतत त्यांच्या अवतीभोवती असणं. घरात म्हातारे आईवडील असतील तर त्यांना औषधपाणी करणार नाहीत पण गुरुंना वस्त्र दान देणं. चांदीसोन्याच्या वस्तु देणं. ( काही जण तर गुरुंचे पाय चेपण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत सेवा करतात). परमेश्वर चिन्तन कमी असते, काही म्हणायला गेले तर पाप पुण्याच्या गोष्टी आपल्यालाच ऐकवतात.

.................. किती बायका मी अशा पहिल्या आहेत की कुठेही कुणी साधू सन्यासी आलेले समजले की ते ठिकाण कितीही दूर असले तरी मिळेल त्या वाहनाने दर्शनाला जातात. आल्यानंतर चेहर्‍यावर एक तृप्तता असते. साधूंच्या दर्शनाने खूप पुण्य मिळते अस त्या दावा करतात. त्यांच असंही म्हणणं असतं की त्यांच्या शरीरातून जे किरण निघतात त्याचा चांगला परिणाम होतो. पण ह्यामुळेच लोक साधू सन्याशांना नको तितक्या मोठ्या पदावर नेऊन बसवतात आणि त्याचा परिणाम आपण समाजावर काय होतो ते पहातो. (सगळेच साधू तसे नसतात).गुरु अध्यात्माचा मार्ग दाखवतात. हळूहळू संसारातून विरक्त व्हायला सांगतात. कांदालसूण ह्यासारखे तामसी पदार्थ हळू हळू सोडायला सांगतात. पण श्रद्धेचा अतिरेक होतो. एक गृहस्थ दूरच्या प्रवासाला निघाले. वाटेत पाणी सुद्धा पीत नव्हते कारण गुरुमंत्र घेतल्यावर बाहेर काही खायचे प्यायचे नाही असे गुरुंनी सांगितले. म्हणून व्ह्यायचा तोच परिणाम झाला. गाडीतच चक्कर येऊन पडले. गुरु काही असे सांगत नाही. ते फक्त असं असं करायचं नाही असं सांगतात. ते हळूहळू कसं कमी करायचं ते आपण ठरवायचं.

...................आमच्या ओळखीचे एक वकील म्हणायचे, "आम्ही खोट्याचे खरं करून पापाचा पैसा मिळवतो. म्हणून आमच्या पैशाला बरकत नसते." आणि सतत मांत्रिक गाठायचे. कुठून तरी ताविज आणायचे, यंत्र आणायचे, नारळ घरात आणून बांधायचे. आम्ही हसून म्हणायचो " अहो तुम्ही वाटेल तितका पैसा खर्च करता हे तोडगे करण्यावर मग घरात पैसा कमी पडणारच" ते हसायचे. कबूलही करायचे. पण थोडे दिवस झाले की पुन्हा कुणीतरी मांत्रिक, किंवा ज्योतिषी गाठायचे.

.................. हे असं वागणारे लोक चांगले शिकलेले, सुशिक्षित, मोठ्या पदावर असलेले आहेत. हे असं वागतांना पाहिले की वाटतं शिक्षण म्हणजे फक्त डिग्र्या का ? ज्या शिक्षणातून खरे खोटे, चांगले वाईट, काहीच समजत नाही ते शिक्षण खरे का?समजून घेऊन श्रद्धा ठेवणे गैर नाही पण श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ नये ह्याची सुशिक्षित लोकांनी तरी काळजी घ्यायला पाहिजे ना. श्रद्धेची अंधश्रद्धा होते तेंव्हा काय होते त्याची ही थोडीशी उदाहरणं आहेत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक प्रचंड शक्ती आहे जिच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. >> म्हं... 'प्रचंड' आहे की नाही हे माहीत नाही.., पण 'आहे'. असणारंच. असायलाच हवी होती.

नाही तर कुणी 'अर्ज' केला नसावा स्वत:च्या 'अस्तित्त्वासाठी'... (त्यातही 'अर्ज' करण्यासाठीही आधी आपण असलो पाहीजे...)

लेख छान आहे.... आवडला... Happy

त्यांच असंही म्हणनं असतं की त्यांच्या शरीरातून जे किरण निघतात >>
हे गुरु रेडिओअ‍ॅक्टिव आहेत का Biggrin

माहिती, उदाहरणं इ. मुळे विषयाची मांडणी चांगली झाली आहे.
एका महत्वाच्या विषयाला हात घातलात, हेही बरं केलंत.

माझ्या मते, तार्किक विचार किंवा बुद्धिचा उपयोग न करणारे लोक आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात देवपूजा, कर्मकांड, धार्मिक विधी या क्षेत्रातील/व्यवसायातील मंडळी अंधश्रद्धा जोपायसायला जबाबदार आहेत. अंधश्रद्धा जितकी जास्त, तितका जास्त फायदा कर्मकांड, पूजा इ. व्यवसायातली मंडळींना होत असल्याने त्यांच्याकडून अंधश्रद्धेला विरोध होणं हा अनुभव विरळाच असेल.

खरं तर देव किंवा विश्वाचं नियंत्रण करणारी अज्ञात शक्ती म्हणजे आधार, विश्वास या भावनेपेक्षा भीती, कोप इ.इ. भावना/कल्पना बोकाळल्याने अंधश्रद्धा जोपासाणार्‍यांचं फावतं. मनातला देवाचा अंश जागृत करा, एकमेकात आणि समाजात देवाचं खरं रूप पहा अशा प्रकारची शिकवण या क्षेत्रातील मंडळी देतात का ?
स्वत: तसं आचरण करतात का ? या प्रश्नांची होकारार्थी उत्तरं मिळ्ण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ वाटते.

देवाकडे फक्त मागायचं नसतं तर आपणही देवाला आपल्या शुद्ध आचरणाच्या स्वरूपात काही द्यायचं असतं, ही भावनाच नष्ट झाल्यासारखी वाटते. दानपेटीत टाकलेले पैसे किंवा दक्षिणा ही देवाच्या दृष्टीने क्षुद्र बाब आहे. शुद्ध आणि समाजाभिमुख आचरण हीच खरी दक्षिणा; हे जेव्हा देव, देऊळ याच्याशी संबंधितांकडून जनमानसात ठसवलं जाईल तेव्हाच अंधश्रद्धा दूर होईल.

थोडक्यात, देऊळ आणि भक्त या दोन्ही स्तरांवरून प्रयत्न झाल्यास अंधश्रद्धेचं निर्मूलन होऊ शकेल.

सुरेखा,

त्याचं काय आहे की प्रचलित शिक्षणपद्धतीत अडचणीतून मार्ग कसा काढायचा ते शिकवलं जात नाही. वर हिंदूंना शाळेतून धर्मशिक्षण मिळत नाही.

त्यामुळे देवाच्या कार्यक्रमाला लोटणारी गर्दी ही एक प्रकारची सूज आहे. यात श्रद्धा नाही. आहे ती केवळ भोगेच्छा.

यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण देणे आणि घेणे. यामुळे संकटांशी सामना करीत प्रारब्धावर मात कशी करावी हे आपल्याला कळते.

आ.न.,
-गा.पै.

श्रद्धेने आत्मिक बळ मिळतं.

आत्मिक बळ म्हणजे काय माहित नाही. स्वानुभवावरून असे लक्षात आले की मन स्थिर व्हायला पाहिजे. त्यासाठी रोजच्या कटकटीतून महत्वाचे काय नि त्यावर किती वादावादी, भांडणे करायची याचे भान आले पाहिजे.
स्वतःचे स्वतः मनोरंजन करता येते. देवच पाहिजे असे नाही. पेटी वाजवा, वाचन करा, लेखन करा, गाणी ऐका, फिरायला जा. मनाला उद्योग हवा असेल तर स्टॉक मार्केटचा अभ्यास करा, पैसे मिळवा, त्यात काही वाईट नाही. क्वांटम मेकॅनिक्स, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स शिकायचा प्रयत्न करा!!! त्यातून जो आनंद मिळेल, त्यापुढे क्षुल्लक गोष्टी महत्वाच्या वाटणार नाहीत. इतरांच्या भानगडीत, अगदी मुलांच्या सुद्धा, नाक खुपसण्याची गरज नाही.

आपला आनंद फक्त आपल्यातच आहे. ती विरक्ति नव्हे. त्यातून आयुष्याचा कंटाळा येणार नाही.

देव आहेच आणि तो काम करणारच असे समजून देवाला प्रत्येक गोष्टीसाठी नवस करणं, काहीच न करता देवावर नुसती श्रद्धा ठेऊन बसून रहाणं हा अतिरेक झाला.

ही अत्यंत मोठी चूक आहे. असे खरे तर काही नाही. कारण श्रद्धा हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही असे वाटते. उगाच मी देव मानतो असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नव्हे, श्री साईबाबांना सोन्याचे सिंहासन देणे म्हणजे श्रद्धा नव्हे. तेंव्हा आपल्याला जे हवे त्यासाठी नीट माहिती मिळवून, विचार करून कष्ट करणे हाच एक उत्तम मार्ग आहे. जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. या 'दुसर्‍यात' देव पण येतो.

लेख आवडला. चांगले मुद्दे आहेत.
पूर्वी फारशा प्रमाणात साजरे न केले जाणार्‍या उत्सवांनाही अचानक मोठ्याने गाणी वाजवुन, रोषणाई करुन साजरे करायला लागलेले बघुन मला खरच धक्का बसला होता.

सावली | 15 November, 2011 - 19:50 नवीन
लेख आवडला. चांगले मुद्दे आहेत.
पूर्वी फारशा प्रमाणात साजरे न केले जाणार्‍या उत्सवांनाही अचानक मोठ्याने गाणी वाजवुन, रोषणाई करुन साजरे करायला लागलेले बघुन मला खरच धक्का बसला होता.
फारस काही विषेश नाही. काही माणस स्वतःला मोठ बनवण्यासाठी उत्सवांच स्वरुप मोठ करतात.

लेख आवडला. Happy

लोक गुरुमंत्र घेतात. गुरुंवर श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. कारण ते अध्यात्माचा मार्ग दाखवतात. पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जायचे सोडून त्यांची सेवा करण्यातच काही लोक मग्न असतात. सतत त्यांच्या अवतीभोवती असणं. घरात म्हातारे आईवडील असतील तर त्यांना औषधपाणी करणार नाहीत पण गुरुंना वस्त्र दान देणं. चांदीसोन्याच्या वस्तु देणं. ( काही जण तर गुरुंचे पाय चेपण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत सेवा करतात). >>>>>काही उदाहरणे जवळून पाहिल्याने पूर्ण पटेश Happy

सुंदर लेख आवडला. मला ही जाणवले आहे. देऊळ सिनेमात असेच दाखविले आहे. देवाचे मार्केटिंग केले जात आहे.

चांगला लेख. थोडा हातचे राखून लिहिला आहे, पण आवडला. Happy

एक शंका-
गुरुंवर श्रद्धा ठेवायलाच पाहिजे. कारण ते अध्यात्माचा मार्ग दाखवतात.

तुम्ही गुरू केला आहे का? किंवा तुमचे गुरू कोण?
हा प्रश्न हल्ली सर्रास विचारला जाऊ लागला आहे. जणू काही 'गुरू करणे' हे हिंदू माणसाचे काहीतरी धार्मिक कर्तव्यच आहे, अशा थाटात हा प्रश्न विचारला जातो. अशा प्रश्नाला आपण नकारार्थी उत्तर दिले की विचारणार्‍याच्या नजरेत आपली किंमत एकदम कमी तरी होते किंवा ते आपल्याला त्यांच्या कळपात ओढण्याची फिल्डींग तरी लावायला सुरूवात करतात.
हल्ली हे जे 'गुरू' कल्चर अध्यात्मात रुजते आहे, याची सुरूवात कशी झाली असावी? अध्यात्म ही तर खाजगी बाब आहे, आणि ईश्वराची भक्ती करायला लोकांना आजकाल तिसर्‍या माणसाचे कोचिंग का घ्यावेसे वाटते?
आज आपल्याला सर्व धार्मिक पुस्तके सहज उपलब्ध आहेत, त्यांच्यावरची टीका इ. सुद्धा थोडी शोधाशोध केली तर आरामात मिळू शकतात. म्हणजे अभ्यास-साधनांची कमतरता नाही.
बरं, त्यातून हे गुरू लोक जे काही सांगतात/लिहितात, त्यात काहीही नवा विचार नसतो. बर्‍याचदा फक्त शब्दांचे उलटसुलट खेळ असतात. या शब्दांनी दिपून जाणार्‍या भक्तांना 'म्हणजे काय?' हा साधा प्रश्न विचारला तर त्यांना नीटपणे काहीच सांगता येत नाही.

प्रत्येक गुरू-भक्त पंथात यापैकी काही गोष्टी हमखास दिसतात-
* गुरूच्या नावापुढे काहीतरी आदरणीय पदवी असणे, आणि गुरूला काहीतरी घरगुती टोपणनाव असणे.
* गुरूचा एखादा खास डेडिकेटेड देव असणे- त्याच देवाची भक्ती करण्याचा सल्ला भक्तांना देणे. अन्य दैवतांना त्यापेक्षा कमी लेखणे.
* गुरूचा एखाद्या आडवाटेला आश्रम असणे. तिथे त्या देवाचे मंदिर असणे. भक्तांचा त्याच देवाच्या इतर जनरल मंदिरांपेक्षा या मंदिरावर जास्त भरवसा असणे.
* गुरूची महती गाणारे एखादे नियतकालिक- गुरूसेवा /गुरूवाणी /गुरूपूजा यासारख्या काहीतरी नावाने प्रकाशित होणे. त्यात गुरूंचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो.
* या नियकालिकात 'भक्तांचे अनुभव' टाईप एक सदर असते. यात भक्तांनी आपल्याला आलेल्या काही चमत्कारिक अनुभवांचे यथासांग वर्णन केलेले असते. हे फार मजेदार असते. मी बर्‍याचदा अशा टाईपची पुस्तके केवळ या सदरासाठी वाचतो. Happy
* गुरू बर्‍यापैकी एस्टॅब्लिश्ड असतील तर त्यांची छबी असलेले पेन, घड्याळे, कॅलेंडर्स, पॉकेट साईज डायर्‍या वगैरे मर्चंडायजिंग जोरात असते.
* वरच्या 'खास' देवाशी संबंधित तीन-चार धार्मिक शब्द (श्री/ओम/नमो इत्यादि) जोडून 'गुरूमंत्र' केला जातो. हा मंत्र भक्तमंडळींनी सतत म्हणत राहणे अपेक्षित असते.
* भक्तमंडळी आपल्या गुरूशी जबरदस्त एकनिष्ठ असतात. ही प्रखर निष्ठा अनाकलनीय आणि अनरिझनेबल प्रमाणात असते. (एवढी निष्ठा त्यांची स्वतःवर किंवा प्रत्यक्ष देवावर सुद्धा असत नाही.) यातूनच वर म्हटल्याप्रमाणे गुरूला अंघोळ घालणे, पाय चेपणे- काही वेळा शब्दशः थुंकी झेलण्यापर्यंत आपला आत्मसन्मान गहाण टाकला जातो. (गुरू बिन कऊन दिखाए बाट / सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरूका ध्यास !!) यातला वाईट भाग असा की भक्तांच्या मनात, त्यांचे सोडून अन्य गुरूंच्याबद्दल, इतकेच नाही तर अन्य देवांच्याबद्दलही नकळत एक तुच्छ भाव तयार होतो. हे आपल्याच धर्मातल्या देवांबाबत घडते. परक्या धर्माची तर बातच सोडा !
हे फक्त हिंदू धर्मात घडते असे नाही, पण मी हिंदू असल्याने मला या गोष्टी प्रकर्षाने दिसतात.

हे असं काही लिहिलं म्हणजे पटकन काही लोक 'धर्मविरोधी- हिंदूविरोधी' म्हणत अंगावर येतात. त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की हा आपला हिंदू धर्म नाही. मीसुद्धा आस्तिक, देवावर विश्वास असणारा माणूस आहे. आणि माझ्या धर्माने मला कायम सर्वसमावेशकता शिकवली आहे. आपल्या विरोधी विचारांनाही सन्मान देण्याची शिकवण दिली आहे. हे सर्व गुरूंचे पीक गेल्या पंधरा वर्षातच इतके वाढले आहे. माझा धर्म हजारो वर्ष जुना आहे. मानवाच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत मूलगामी तत्त्वज्ञान दर्शनांमधून मांडणारा, कर्माला भक्तीपेक्षा प्राधान्य देणारा, सहिष्णुता शिकवणारा हिंदूधर्म आणि गुरूची गुलामी करायला लावणारा, लक्ष्मी यंत्र किंवा नजर सुरक्षा कवच विकणारा हिंदूधर्म यांचा काहीच संबंध नाही. खर्‍या हिंदू माणसाने या दुसर्‍या प्रकारच्या हिंदूधर्माला- खरं तर मूळ धर्मात माजलेल्या या तणाला उपटून काढण्यात अजिबातच संकोच करू नये- असे माझे मत आहे.

असो.
मूळ लेखातले अन्य मुद्देही पटले, हे सांगायला नकोच.

<<मनातला देवाचा अंश जागृत करा, एकमेकात आणि समाजात देवाचं खरं रूप पहा अशा प्रकारची शिकवण या क्षेत्रातील मंडळी देतात का ?
स्वत: तसं आचरण करतात का ? या प्रश्नांची होकारार्थी उत्तरं मिळ्ण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ वाटते. >>

<<स्वतःचे स्वतः मनोरंजन करता येते. देवच पाहिजे असे नाही.>> उकाका, झक्कीकाका अत्यंतिक सहमत. Happy

देवाकडे फक्त मागायचं नसतं तर आपणही देवाला आपल्या शुद्ध आचरणाच्या स्वरूपात काही द्यायचं असतं, > मी 'धन्यवाद' म्हणतो जे सध्या 'आहे' त्यासाठी...मंदिरात न जाताही.

ज्ञानेश,

ते आपल्याला त्यांच्या कळपात ओढण्याची फिल्डींग तरी लावायला सुरूवात करतात.>>यात भक्तांनी आपल्याला आलेल्या काही चमत्कारिक अनुभवांचे यथासांग वर्णन केलेले असते. हे फार मजेदार असत>>>> अगदी अगदी... Biggrin

(एवढी निष्ठा त्यांची स्वतःवर किंवा प्रत्यक्ष देवावर सुद्धा असत नाही.) > हेच ते... अतीश्रध्दावंत अंधश्रध्दाळू Rofl

-------
एक मात्र खरे आहे 'गुरु' विना 'ज्ञान' नाही.
मग तो कोणत्याही स्वरुपात असु शकतो.....पुस्तक, ग्रंथ, बाई-माणूस (व्यक्ति), स्वानुभव.

मोह-माया,स्वैराचार्,पाप-पुण्या,गर्व....यांच्या गुलामगीरीतून 'मोक्षाचा' मार्ग दाखवतो.
मी तर म्हणतो एका विशिष्ट स्तरावर 'गुरु' 'देवनामाचा' जाप-विचार करणं ही त्यागायला लावतो.

प्रथम सर्वाना छान प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद देते.

जामोप्याजी. मी हैदराबाद्ची आहे. बोनालु हा सण येथील तेलंगणाच्या लोकांचा महत्वाचा सण आहे. पूर्वी तो
एका विशिष्ट समाजासाठी होता. आता सगळेच करतात. देवीचा उत्सव चालला आहे निदान दर्शन घेऊन यावं असं म्हणून सगळे सामील होतात. (कितीजणांना हेही माहित नसतं की हा सण का करतात)

उल्हासदा तुम्हाला १००% अनुमोदन.
" माझ्या मते, तार्किक विचार किंवा बुद्धिचा उपयोग न करणारे लोक आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात देवपूजा, कर्मकांड, धार्मिक विधी या क्षेत्रातील/व्यवसायातील मंडळी अंधश्रद्धा जोपायसायला जबाबदार आहेत. अंधश्रद्धा जितकी जास्त, तितका जास्त फायदा कर्मकांड, पूजा इ. व्यवसायातली मंडळींना होत असल्याने त्यांच्याकडून अंधश्रद्धेला विरोध होणं हा अनुभव विरळाच असेल." पण उल्हासदा फक्त देवपूजा, कर्मकांड, धार्मिक विधी या क्षेत्रातील/व्यवसायातील मंडळी अंधश्रद्धा जोपायसायला जबाबदार आहेत. असं नाही तर मी वर उदहरणं दिलेली म्हणजे वास्तु, तंत्र मंत्र वगैरे मंडळीही त्यात येतात ना. पण त्यांच्या फायद्याचं ते बघतात. त्यांचा तो व्यवसाय आहे. पण फायदा करून देणारे तरी आपल्यासारखे लोकंच आहेत ना? दारू दुकानात विकायला ठेवली आहे ती घ्यायची की नाही ह्याचा विचार आपणच करायचा असतो ना. तिथे आपण विवेकबुध्दी वापरतोच की नाही.
"देवाविषयी आधार, विश्वास या भावनेपेक्षा भीती, कोप" ........हे खरे आहे.हे नाही केलं तर देव कोपेल, देवी कोपेल
असं म्हणून करणारे कितीतरी लोक मी बघितले आहेत. अशा लोकांना मनातला देवाचा अंश जागृत करा, समाजात देव पहा असे सांगितले तर कसे पटेल. समजावण्याच्या पलिकडचे लोक आहेत हे. आणि अशा प्रकारची शिकवण देणार तरी कोण? त्यासाठी स्वतःला आधी समजले पाहिजे ना. आणि आपल्या सारखे काही
सांगायला गेले तर दिनेशदानी म्हट्ल्याप्रमाणे लोकाना राग येतो. आणि देवपूजा, कर्मकांड हा फार मोठा विषय आहे.

नामणदिवा "हे गुरु रेडिओअ‍ॅक्टिव आहेत का? " तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी ज्यांनी मला हे उत्तर दिलं त्यांनाच विचारून सांगते. Lol Lol

बाकिच्या प्रतिक्रियांवर नंतर लिहीन.

आमच्या गुरुचा मंत्र

ॐ शेखरनाथाय सामर्थ्यदाताय महापुरुषाय चैतन्यदायी हीम क्लीम रीम राजेश्वराय नमो नम:

वरील मंत्र रात्री झोपत एकवीस वेळा आणि सकाळी झोपतून उठयाच्या आधी एकवीस वेळा म्हटल्यावर मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात याबद्दल कुठला वाद नाही.(भले ती कितीही मोठी असेना पूर्ण होणारच. यात स्त्री-पुरुष असा भेद नाही.)
आमचे गुरु रेडिओअ‍ॅक्टिव आहेत.
एक मात्र खरे आहे 'गुरु' विना 'ज्ञान' नाही आणि ज्ञानाविना पैसा नाही.

बोला श्री श्री श्री श्री श्री शेखर महाराज कि जय.

(ता.कः भेटण्यासाठी ४ दिवस आधी परवानगी आवश्यक)

>>ॐ शेखरनाथाय सामर्थ्यदाताय महापुरुषाय चैतन्यदायी हीम क्लीम रीम राजेश्वराय नमो नम:

अबे ओ गुरुजी
च्य्या$#$%# शेख्या!
ते चैतन्यदायी र्‍हीं हवं. हीम नाही =))

गा.पै. धन्यवाद.

"त्याचं काय आहे की प्रचलित शिक्षणपद्धतीत अडचणीतून मार्ग कसा काढायचा ते शिकवलं जात नाही. वर हिंदूंना शाळेतून धर्मशिक्षण मिळत नाही. ".......
हिंदूना शाळेतून धर्मशिक्षण मिळत नाही. हे खरे आहे. पण इतर धर्मात तर मिळते ना. पण त्यांच्यामध्ये सुध्दा वाटेल तेवढ्या अंधश्रध्दा आहेत. एवढं मात्र खरं की प्रचलित शिक्षणपध्दतीत अडचणीतून मार्ग काढायचं शिकवलं तर लोक भलतीकडे वळणार नाहीत. कारण लोक संसारात येणार्‍या अडचणीलाच घाबरतात आणि सैरवैरा धावत सुटतात.

ज्ञानेश तुम्हाला १००% अनुमोदन. मी हातचं राखून लेख लिहिला असे तुम्ही म्हटले आहे. ते खरंच आहे. खूप लिहू शकले असते पण लिहिण्याच्या भरात आपण खूप काही लिहून जातो आणि नेमका एखादा मुद्दा पकडायला संधी मिळते. आणि मग प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया यायला लागतात. वाद सुरु होतो. मूळ विषय बाजूलाच रहतो.
तुमचे पॉइण्ट्स मला आवडले. धन्यवाद.

ही सगळी उदाहरणे 'हिन्दू' (कृपया लेखनशैलीकडे लक्ष द्यावे) धर्मातीलच का आहेत, इतर धर्मातील उदाहरणे द्यायचे धाडस दाखवा, इ.इ.इ. ठणाणा कधी सुरु होणार? Proud

<<या शब्दांनी दिपून जाणार्‍या भक्तांना 'म्हणजे काय?' हा साधा प्रश्न विचारला तर त्यांना नीटपणे काहीच सांगता येत नाही.>>
माझी एक मैत्रिण सतत वहीमधे कसलातरी जप लिहीत असायची. ( हे काम गप्पा मारता मारता सुध्धा होऊ शकते! Happy ) विचारल्यावर तो त्यांच्या गुरुंचा आहे असे कळले. त्यातून तो लाल रंगाच्या पेनाने लिहीला तर जास्त चांगले असे कळले. मी विचारले " जास्त चांगले म्हणजे काय होईल?" ह्यावर तिला धड उत्तर देता आले नाही. कशासाठी लिहितेस? असे विचारल्यावर, 'संकल्प दिलाय गुरुंना, तेवढया वह्या पूर्ण कराव्याच लागतात,' हे उत्तर मिळाले.
मी एक पथ्य मात्र पाळते, ह्या सुशिक्षित श्रध्दाळूंचे कधीही मतपरीवर्तन करायला जात नाही. एका कानाने ऐकून घ्यायचे, दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे!

आपल्याकडे इतके देव-देवता असताना, माणसांची पूजा करायची गरजच का पडते?

Pages