देऊळ - अ‍ॅज अ प्रेक्षक काही निरीक्षणे!

Submitted by फारएण्ड on 11 November, 2011 - 05:57

सुरू झाल्यावर थोड्या वेळातच लक्षात येते की आपण एक मनोरंजक, सहजसुंदर अभिनय असलेला चित्रपट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा म्हणून किंवा सो-सो शॉट्स ना "मराठीच्या मानाने ठीक आहे" वगैरे म्हणत बघावा लागणार नाही Happy अस्सल मराठी वातावरणातील कथा, ते खेडे, त्यातले लोक, त्यांच्या समस्या व्यवस्थित दाखवल्या आहेत. गावातील राजकारण्यापासून ते भोळ्या नायकापर्यंत बहुतेक जण "नॉर्मल" वागतात.

मराठीत असे असणारा हा काही पहिलाच चित्रपट नाही, पण हे सुखद धक्के मराठीत नेहमीच बसत नाहीत, त्यामुळे आपण सरसावून बसतो, पुढे काय दाखवतात या उत्सुकतेने. नाहीतर रात्री साडेदहाच्या शोला "तू झोप, मी जागा आहे" ही चित्रपटाची टॅगलाईन मी बहुधा शब्दशः घेइन अशी भीती मला वाटत होती Happy

दुसरे म्हणजे समोर दिसते तेच कथानक आहे आणि आपल्याला समजते तसेच ते आहे हा दुसरा सुखद धक्का! समोर दिसते ते तिसर्‍याच कशाचे तरी प्रतीक असून आपल्याला घरी गेल्यावर इतर रिव्यू वाचल्यावर समजेल, तोपर्यंत आपली अक्कल आधीच पाजळू नये असला प्रकार होणार नाही, या कल्पनेने बरे वाटते.

चित्रपट मला भरपूर आवडला. खेडे अस्सल वाटते, हायवेपासून लांब असलेले खेडे असेच फक्त झोपड्या असलेले असावे. त्या पिवळ्या टेकड्या वगैरे पुण्याबाहेर थोडे गेले की कोठेही दिसतात. खेड्यातले लोक म्हणून सगळे धोतर टोप्या घालून फिरत आहेत असला प्रकार नाही. सगळे लोक आपण एसटीने जवळपासच्या खेड्यात गेलो तर सहज भेटतील असेच वाटतात. ही पहिली जमेची बाजू.

प्रमुख कलाकारांचा अभिनय ही दुसरी: नाना आहे म्हंटल्यावर मला जरा शंका होती. त्याचे (किमान हिन्दीतील) रोल्स सहसा "सगळे याला माहीत आहे आणि दुसर्‍यांचे काही ऐकणार नाही" प्रकारचे असतात. येथे त्याने त्या भूमिकेनुसार अतिशय चपखल काम केलेले आहे. कसलाही बाह्य बटबटीत पणा न दाखवता बेरकी राजकारणी त्याने मस्त उभा केला आहे. सोनाली कुलकर्णीचा रोलही तितकाच मस्त. 'रिंगा रिंगा' व 'गंध' मधे तिची unflattering वेशभूषा व त्यानुसार नसलेले कॅमेरा अ‍ॅंगल्स या दोन्हीमुळे मला तिचे दोन्हीमधले काम आवडले नव्हते. पण येथे तिचे काम एकदम जमले आहे. नानापेक्षा थोडी लहान वाटते ती पण तेव्हढे दुर्लक्ष करता येते. गिरीश कुलकर्णी चा रोलही मस्त आहे. किशोर कदम चा "लाऊड" रोलही धमाल. डॉ मोहन आगाशे त्या रोलमधे एकदम फिट. त्यामानाने दिलीप प्रभावळकरचा रोलच जरा स्टीरीओटाईप वाटला. त्याने तो अगदी सहज केलेला आहे हे नक्की. बाकी कलाकारांना मी फारसा ओळखत नाही - त्यांची नावे माहीत नाहीत पण बहुतेकांची कामे चांगली झाली आहेत. अशा सेटअप मधे वीणा जामकर मात्र हवी होती, ती खूप अस्सल वाटते खेड्यातील रोल मधे.

गाणीही आवडली. त्या 'दत्त दत्त' गाण्याचे शब्द शोधले पाहिजेत. आयटेम साँग विशेष काही नाही. 'देवा तुला शोधू कुठं' रात्रीच्या भजनाच्या मानाने जरा जोरदार वाटते (टीपिकल शांतरसातील वाटत नाही) पण गाणे चांगले आहे. चित्रपट संपल्यावर तेच डोक्यात राहते.

ते उंबराचे झाड आणि तेथील भाग केन्द्रस्थानी धरून कथा पुढे सरकते तसे तेथे होणारे बदल छान घेतले आहेत. सुरूवातीचा शांतपणा, मग जमा होणारे लोक, थोडीफार बांधकामे, बकालपणा सगळे जबरी.

त्या पोरांची ती टॉम्या, एमड्या वगैरे नावे, बोलताना येणारे माफक इंग्रजी वगैरेही मस्त. मधे बरीच वर्षे चित्रपटातील ग्रामीण भाषा/बोली फ्रीज होऊन गेली होती, गेल्या काही चित्रपटांमधे जरा जास्त खरी वाटते, तशी यातही आहे. दिलीप-गिरीश चा तो संवाद असलेल्या शॉटचे लाईटिंग, तसेच गिरीश दत्ताच्या मूर्तीशी बोलतानाचे लाईटिंग, मागचा चंद्र वगैरे सुरेख आहे.

एक दोन रिव्यूज मधे वीज वगैरे नसतान वेबकॅम कसा असेल असे वाचले - त्या शॉट्पर्यंत गावात वीज, पाणी सगळे आल्याचे दाखवले आहे, त्यामुळे मला त्यात काही चुकीचे वाटले नाही.

आता काही इतर जाणवलेल्या गोष्टी:
ते उंबराचे झाड, नंतरचे देऊळ या गोष्टी व खेडे हे एका फ्रेममधे दाखवले तेव्हा लक्षात येते की ती जागा गावातून कोठूनही दिसेल अशी उंचावर आहे. पण त्या जागेचा संदर्भ असलेल्या कोणत्याही शॉट्समधे लोकांच्या वागण्यातून तसे जाणवत नाही. ज्यांच्या घराजवळ् टेकडी/देऊळ असेल त्यांच्या लक्षात येइल मला काय म्हणायचे आहे - सहज त्याबद्दल बोलताना नैसर्गिकपणे "तेथे वरती" असा निर्देश करणे किंवा हाताने ती दिशा दाखवून त्या दिशेला बघितले जाणे - जरा इंग्लिशमधून लिहायचे झाले तर अशा जागांचा अशा गावांवर एक "towering presence" असतो, तसा जवळच्या, सगळीकडून दिसणार्‍या त्या टेकडीबद्दल ते बोलत आहेत असे त्यांच्या देहबोलीतून अजिबात जाणवत नाही. उदा: सुरूवातीला तो केश्या करडी उंबराच्या झाडापाशी चरायला गेली असेल असे म्हणत तिला शोधायला जातो तेव्हा.

दिलीप प्रभावळकरचे कॅरेक्टर मला आवडले नाही - पण ते तसे दाखवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शकाचे आहे हे कबूल - गावात जे होत आहे त्यावर आपला प्रभाव पाडण्याची संधी असताना एवढे अलिप्त होणारे अण्णा हे कदाचित सध्याच्या शिक्षित शहरीवर्गाचे उदाहरण असेल पण त्यांना निदान काहीतरी करताना दाखवायला हवे होते असे वाटले. तसेच शेवटी केश्याचे पुढे काय झाले ही उत्सुकता तशीच राहिली. ते एक "closure" मिळायला हवे होते. पुन्हा लेखक-दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य आहेच, पण ही "अॅज अ प्रेक्षक" मते Happy

एक दोन ब्लूपर्स म्हणावे की मुद्दाम केलेल शॉट्स कळत नाही - तो शिक्षक पावतीपुस्तके वाटतो वर्गात, तेव्हा फळ्यावर आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक वगैरे असते, येथे काही विरोधाभास दाखवायचा होता का समजले नाही. देवळात मिरवणूक आल्यावर ढोल वाजवायला आसपास एवढी गावे असताना "न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग" चे लोक का आले कोणास ठाऊक Happy तो गिरीश जेव्हा सीना नदी कोठे जाते (त्यातही थोड्या भौगोलिक गोच्या वाटल्या) वगैरे हाताने दिशा दाखवतो तेव्हा पाणी विरूद्ध दिशेला जाताना दिसते (आणखी माहिती दिली तर स्पॉईलर होईल) तो एक ब्लूपर वाटला. तसेच उत्तरार्धात केश्या किंवा अण्णा त्या बांधकामाकडे बघताना दाखवलेत ते त्या "आर्केलॉजीचे" होते की नियोजित हॉस्पिटलचे ते सहज कळत नाही.

पण या क्षुल्लक गोष्टी आहेत. चित्रपट आपल्याला पहिल्यापासून खिळवून ठेवतो आणि इतके निरीक्षण त्यामुळेच केले जाते. पूर्वार्ध थोडा संथ असल्याचे वाचले होते पण तसा मलातरी वाटला नाही.

एकूण जबरदस्त चित्रपट! जरूर पाहा.

विषय: 
Groups audience: 

ह्या बीबीवर अजूनही प्रतिक्रिया नोंदवली तर चालेल ना? काल स्टार प्रवाहवर हा पिक्चर पाहिला. चांगला वाटला. एक प्रश्न होता. चित्रपटाच्या शेवटी नसिरुद्दीन शहा दाखवला आहे. तो देव असतो का करडी गाय माणसाचं रूप घेऊन आलेली असते? कारण त्या गाईच्या पायाला शेवटी जख्म झालेली असते आणि केशाच्या हातून पाणी न घेताच ती जाते. तसंच नसिरुद्दीन शहाच्या पायाला जखम झालेली अस्ते आणि केशाकडून तो पाणी मागून घेतो.

नाना आणि प्रभावळकरांच्या अभिनयाबद्दल फारएन्डाला अनुमोदन. चित्रपट पाहून सिध्दीविनायकाच्या मंदिराचं भक्तिच्या नावाखाली जे केलंय त्याची आठवण झाली. अनेक वर्षांपूर्वी विद्यार्थीदशेत असतना मनात येईल तेव्हा तिथे निवांत जाऊन बसता यायचं. पण नवसाला पावणारा म्हणून ख्याती झाली, सेलेब्रिटी भक्त रात्री अपरात्री अनवाणी चालत यायला लागले आणि देव हरवला. Sad

एक जिव्हाळ्याचा विषय जस्सा आहे तस्सा मांडल्याबद्दल देऊळच्या टीमचे आभार.

भाविंकांची खिल्ली उडवली परंपरेचा अपमान केला ब्रह्मणांना नावे ठेवली की पुरोगामी होता येते हाच नियम आहे सध्याचा.

चुंबक - या चित्रपटात या तीन्हीपैकी काही जाणवले का तुम्हाला? मला तरी नाही.

स्वप्ना - नेकी और पूछपूछ? Happy

स्वप्ना राज +१

मी पण काल पाहिला. शेवट थोडा वेगळा हवा होता. बाकी सगळा विषय अप्रतिम. खरच कोर्टींगच्या काळात आम्ही उगीचच वरळी ते दादर व्हाया सिध्धीविनायक अनेकदा गेलो आहे. तेंव्हा येवढी गर्दी अजीबात नसायची. महालक्ष्मीला पण सध्या काय गर्दी असते.

अत्ता च दिवाळी नंतर तुळजापुर ला जायचा योग आला. हॉरीबल प्रकार.....

अनेक वर्षांपूर्वी विद्यार्थीदशेत असतना मनात येईल तेव्हा तिथे निवांत जाऊन बसता यायचं. पण नवसाला पावणारा म्हणून ख्याती झाली, सेलेब्रिटी भक्त रात्री अपरात्री अनवाणी चालत यायला लागले आणि देव हरवला.>>> स्वप्ना, अगदी मनातलं बोललीस बघ.

काल पाहिला देउळ.
चांगला वाटला. सुरवातीपासुनच गाव मनात बसत गेल.
अचानक आलेल्या पैशाने बदलत चाललेलं गावकर्‍यांच रुप नी अजुन काय काय.
स्वप्ना तु उल्लेख केलेला प्रसंग मलाहि तसाच वाटला. करडीच त्या रुपात येवुन गेली.

बाय द वे, गाव एवढ प्रसिद्ध झाल तर आरोग्य तपासणी केंद्र उभा करायला फार आर्थिक अडचण येवु नये अस वाटल मला तरी. उलट अशा वेळी एखादा आमदार खासदार त्याच्या फंडातुन अशी कां गावासाठी करुन देवुन गाव खिशात घालण्याचा चान्स सोडत नाही.
बाय द वे, ह्या गावाच शुटींग कुठे केलय. असच निरर्थक भटकंती करायला मस्त आहे ठिकाण. Happy

बाय द वे, ह्या गावाच शुटींग कुठे केलय. असच निरर्थक भटकंती करायला मस्त आहे ठिकाण.>>>
पिंपोडे बु. सातारा.

अभिनय, संवाद, सादरिकरण , कॅरॅक्टराय्झेशन उजवं. आयट्म साँगचा योग्य वापर. गाव खुप छोटं आणि कुठे आडभागात तीथे कधी PHC सुद्धा मंजुर होईल का अशी शंका यावी तीथे मोठे हॉस्पिटल ( मॉडेल तरी भारदस्त )मंजुर करुन घ्यायचे प्रयत्न करायचे हे पटत नाही त्यामुळे कथा उत्तम सादरिकरणा नंतर ही भीडत नाही. नसरुद्दिन शहा मोठा अभिनेता मात्र त्याचे शब्दोच्चार खटकतात त्या ऐवजी दुसरा अभिनेता चालला असता.
शेवटी या उजाड गावाच्या आसपास हिरवाई आणि नदी , तरंगणारी POP ची मुर्ती या गोष्टी खटकतात .

परिक्षण आवडले व त्यापेक्षा ही जास्त सर्वांचे संयमित व योग्य असे प्रतिसाद वाचून खरचं स्मित झालो आहे Happy

* साजिरा यांचा प्रतिसाद तर प्रतिसाद कसा असावा याचे चपखल उदाहरण आहे.

सुरेख!

चित्रपटाच्या शेवटी नसिरुद्दीन शहा दाखवला आहे. तो देव असतो का करडी गाय माणसाचं रूप घेऊन आलेली असते? कारण त्या गाईच्या पायाला शेवटी जख्म झालेली असते आणि केशाच्या हातून पाणी न घेताच ती जाते. तसंच नसिरुद्दीन शहाच्या पायाला जखम झालेली अस्ते आणि केशाकडून तो पाणी मागून घेतो. >> माझ्याही मते ते करडीचं मनुष्यरूप होत.... केशाच्या हातून पाणी घ्यायचं राहून गेलं होत तिचं.. म्हणून ती परत येते..

या सिनेमाबाबतची पण एक गंमत झाली. हा बघायचाच असं ठरवून सुद्धा जमले नाही. नंतर टीव्हीवर नासिरूद्दीन शाह त्याला दिसतो तिथून पाहिला होता. यानंतर सिनेमाचे एव्हढे रिव्ह्यूज वाचले, ऐकले पाहिले कि मला स्वतःला सिनेमा पाहिलाय असेच वाटू लागले. आणि पूर्ण बघायची तसदी नाही घेतली तरी चालेल असे वाटले. पण आज प्राईम वर सुरू केला आणि लक्षात आले कि हा जबरा अनुभव मिस केला.

देऊळ चं चित्रीकरण जिथे झाले आहे तो गिरीश कुकलर्णीच्या चित्रपटात हटकून दिसणारा परीसर आहे. कासाचे पठार आणि आजूबाजूचा परीसर आहे हा. वरंधा घाटाच्या अलिकडून ज्या टेकड्या दिसतात तो भाग शेवटी घेतला आहे. सगळेच लोकेशन्स उत्तम आहेत.

नाशिकजवळचा हरीहर ट्रेक जसा सुरूवातीला कमी चढणीचा , नंतर तीव्र चढण आणि सरळ उभी चढण आहे तसा हा चित्रपट आहे. सुरूवातीपासून दत्त दिसले या त्याच्या दवंडीसोबत बिल्ड अप होत असताना , गाव दाखवत जातो, कॅरेक्टर्स उभे करत जातो, त्यांचे आपसातले संबंध उलगडत जातो. हा एव्हढा पसारा नेटका बांधणे हे काम येरागबाळ्याचे नोहे. यानंतर देवळावरून गावात दोन गट पडतात. देवळाच्या माध्यमातून आर्थिक विकास टप्प्यात दिसू लागतो, राजकीय पट बदलले जाऊ लागतात तस तसा चित्रपट वर वर जायला लागतो.

शेवटी मात्र गिरीश कुलकर्णीचा मोनोलॉग , त्याचा एकांताशी संवाद त्याचा साक्षात्कार हे सगळे वेगळ्या पातळीवर घेऊन जाते तिथे मात्र हरीहर शिखराची ८५अंशाची चढण चढल्याचा भास होतो.
कुलकर्णी बंधूंना हॅट्स ऑफ !

वळू , देऊळ , पोस्टकार्ड, श्वास, टिंग्या असे अनेक उत्तम चित्रपट या काळात मराठीत निघाले. दुर्दैवाने सगळेच यशस्वी झाले नाहीत. पण त्यामुळे टेस्ट बदलली. हायवे द सेल्फी असा एक वेगळा प्रयोग पण झाला. हा काळ मराठी प्रेक्षकासाठी अभिमानाचा होता.

देवळासाठी तमाशा भरवला जात असताना त्यातल्या एका प्रमुख कार्यकत्याच्या बायकोला टेंपोमधे घालून शहराला बाळंतपणासाठी नेताना दाखवले आहे. हा विरोधाभास / व्यंग जबरा आहे. तो ठळक केलाय असेही नाही. असे अनेक प्रसंग अगदी ओझरते येत राहतात. सुरूवातीला गावाच्या न झालेल्या विकासाबद्दल असेच काही ओघात आलेले संवाद आहेत. ते विरूनही जातात. त्या पार्श्वभूमीवर देऊळ की हॉस्पिटल हा पेच टाकला आहे. देवळामुळे सुद्धा अर्थकारण बदलते, पण गावातल्या लोकांची टेस्ट बदलली असं अण्णांना वाटतं. तर शहरात (सुरक्षित) राहून गावातल्या लोकांनी शेणामुतात राहून छान छान स्वभावाचे रहावे का असे भाऊ (नाना) उत्तरतात. हा एक तिढा आहे. दोन्हीकडून तो बरोबर वाटतो. कुठेच प्रचारकी न होता अगदी सहजपणे अशा प्रश्नांना चित्रपट स्पर्श करत जातो, पण त्याच्या आहारी जात नाही. शेवटचं मूक भाष्य वगळता चित्रपटात सूचक असे भाष्य कुठेच येत नाही. हे खास वाटते.

हा परिसर कॅमेर्‍यात टिपण्यात सुद्धा उमेश, गिरीश कुलकर्णींच वेगळेपण दिसतं. पश्चात्ताप झालेला गिकु शेवटी एका चढणीवर चढत असतो तेव्हां सह्याद्रीच्या रेषा या चित्रातल्या प्रमाणे आल्या आहेत. पलिकडून येणारी रांग गिकु उभा असतो तिथे या चढणीला टेकते. संधीप्रकाशात या रेषाच चित्रासारख्या जिवंत होतात. हळू हळू कॅमेरा वर येतो तसा या चित्रात खोलीचा समावेश होतो. शेवटी दत्ताच्या मूर्तीमागे चंद्र असणे असेल किंवा नाणेघाटासारखी एक घळईतून जाणारी घाटवाट असेल , कॅमेरा कमालच आहे.

शेवटी ती मूर्ती अन्य दूरच्या गावाला जाऊन तिथे कुणी तरी दत्त आले अशी हाकाटी करते का असे वाटले होते. पण तो मोह टाळला हे विशेष !

भारी लिहिले आहे. प्रतिसाद देखिल तितकेच छान !
आवडता सिनेमा

टीव्हीवर लागला कि प्रत्येक वेळा पाहतो.
समाजाला "सगुण साकार" ईश्वर का लागतो हे हा सिनेमा आरश्या सारखं प्रतिबिंब दाखवून आपल्याला अगतिक करून सोडतो.

भारतीय समाजाला प्रगती करण्यासाठी "मंदिर" च का लागते हा प्रश्न छळत राहतो, अशी शोकांतिका मनात रुंजी घालते !

Pages