पाताल भैरवी

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 09:58

प्राथमिक माहिती:
उज्जैन नामे एक आटपाट नगर असतं. तिथे एक राजा(प्राण) असतो. तो विसरभोळा असतो. तरी तो राज्य मस्त चालवत असतो. त्याला एक राणी(बिंदू) असते. ती दुसरी असते. पहिली राणी देवाघरी गेलेली असते. तिची मुलगी मोठी होऊन जयाप्रदा झालेली असते. दुसर्‍या राणीला एक भाचा असतो. तो का कोण जाणे, पण आत्येकडे/मावशीकडेच राहत असतो. तिथे त्याचे संगोपन व्यवस्थित झाल्याने तो गुटगुटीत अमजद खान झालेला असतो.

ढ्याण्ण्ण्ण्णण!

सिनेमा सुरू होतो तेव्हा उज्जैनीतल्या वार्षिक विविधगुणदर्शन कार्यक्रमांचा दिवस असतो. तिथे जिंकणार्‍याला राजकुमारीच्या हस्ते बक्षीस दिले जाईल, वगैरे घोषणा होते. मग एक डोक्याला इकडेतिकडे नारळाच्या करवंटीचे तुकडे लावून त्यातून केस डोकावत आहेत, दात किडले आहेत, दाढी वाढलेली आहे, पण व्यायाम भरपूर केला आहे, अशी गुणवैशिष्ट्ये असलेला मानव येतो. तो आल्याआल्या खांब इत्यादी अवाढव्य गोष्टींची लीलया तोडफोड करून राजकुमारीच्या हस्ते बक्षीस स्वीकारायला सज्ज होतो. तेवढ्यात त्याला आव्हान निर्माण होते. जितेंद्र उर्फ रामू हा पटांगणात उडी घेतो. तो दात न किडलेला, डोक्यावर भरपूर केस असलेला, दाढी न वाढलेला पण फारसा व्यायामही न केलेला असा मानव असतो. (यात मानवांबरोबरीने देवी, यक्ष, अप्सरा, राक्षस-कम-भुते अशा सगळ्या प्रजाती असल्याने शक्यतो तीही माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे.) मग ते मनपसंत आयुधे उचलून मारामारी इस्टार्ट करतात. मग कठीण, समतल जमिनीवर फारशी मजा न वाटल्याने उडी मारून, सर्कशीत झुल्यांचे खेळ करणार्‍या लोकांना क्याच करायला खाली जसे जाळे असते तशा जाळ्यावर मारामारी सुरू करतात. मग तिथूनही अशक्य उड्या मारून इकडेतिकडे जातात. पाचेक मिन्टे हा खेळ झाल्यावर रामू कळकट मानवास जाळ्यावर पाडतो जिथे खाली उभा भाला रोवलेला असतो. जाळे हे ताणले जात असल्याने पैलवान येऊन पडताच ते खाली जाते आणि भाला घुसून त्याचे देहावसान होते. राजकुमारी रामू यास बक्षीस देते. तेव्हाच रामूच्या मनात राजकुमारीविषयी प्रेमांकुर फुटतात. मग रामू घरी येतो. त्याच्यासोबत त्याचा दोस्त शक्ती कपूर असतो. (शक्ती कपुराने 'राजाबाबू'मधल्यासारख्या वेडगळ हसण्याची सुरुवात या चित्रपटात केली.) आई दोघांना जेवायला वाढायला जाते आणि इकडे रामू घराच्या मागच्या बाजूला येतो तो तिथे राजकुमारी सख्यांसोबत स्विमिंग करायला आलेली दिसते. यथावकाश आपल्याला कळते की, रामूची आई शाही माळीण असून तिची झोपडी राजवाड्याच्या आवारात ठेवायची परवानगी तिला राजाने उदार मनाने दिली आहे. राजवाड्याचे इंटिरियर हा त्याच्यालेखी नगण्य आयटम असावा. असो. रामू जेवणखाण विसरून राजकन्येचा डॅन्स बघतो. तिच्या सख्या स्विमिंग ट्युबांना सोनेरी चमकी (शाही ट्युबा!) लावून पाण्यात विहरतात.

दुसरी राणी बिंदू ही स्वभावाने मवाळ असते. (कस्काय बिंदूने असला मवाळ रोल केला पाताल भैरवी जाणे!) तिचा भाचा गुटगुटीत 'चंचल'(त्याचे नाव!) मात्र थोडासा व्हिलनटाईप असतो. तो त्याच्या दोन चमच्यांना घेऊन राज्यात लोकांकडून पैसे उकळत फिरताना दिसतो. मग रामू त्याला अडवून धडा शिकवतो आणि राजाकडून शाबासकी मिळवतो. राजाकडून शाबासकीबरोबरच राजकन्या मिळवणे, हे रामूचे ध्येय असते. त्यादृष्टीने तो प्रयत्न करू लागतो. आधी राजकन्येचेही आपल्यावर प्रेम आहे हे कन्फर्म करून घेतो. राजकन्येसाठी शाही उद्यानात शाही फुलांचा शाही झुला केलेला असतो. राजकन्या यायच्या वेळेस रामू तिथे झोपी गेल्याचे नाटक करतो. मग त्याच्या रमणीय, देखण्या चेहर्‍याकडे पाहत राजकन्या एका ठेकेबाज गाण्याचे स्वप्न पाहते. त्यात ती रामूबरोबर नाचते. (नाचाचा ड्रेस हिंदी पिच्चर अप्सरा ष्ट्यांडर्ड!) तिचे रामूवरच प्रेम आहे हे या गाण्यातून आपल्यालाही पक्के कळते.

बाकी वेळेला प्राण विसरभोळा बनून टीपी करत असला तरी 'राजघराणे की इज्जत' हा त्याच्याही दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा! त्यामुळे तो गरीब जावई नाकारतो. मग रामू राजकन्येला भेटायला चोरून येतो. चंचल एरवी न दाखवलेली चतुराई व चपळाई दाखवून त्यास पकडतो. मग राजा त्याला फाशीची शिक्षा ठोठावतो. थोड्या वेळाने अनाकलनीय कारणाने ती क्यान्सलही करतो. आणि एकदमच, कुठलीही पूर्वसूचना न देता, साध्या पद्धतीने सिनेम्यात भट्टारकाची एंट्री होते. 'पाताल भैरवी' लो बजेट असावा किंवा तांत्रिक इंडस्ट्रीत तेव्हा मंदी असावी. कारण त्याच्याकडे एक बाई (हिचे नाव लक्षात नाही) आणि डिगरी (असेच ऐकू आले!) उर्फ सदाजबा/सदाजपा/सदाजवाँ नावाचा एक माणूस एवढे दोनच मोजके विश्वासू सेवक आणि नंतरच्या दृश्यांमध्ये एक चारसहा काळे, शिंगे असलेले राक्षस एवढेच एंप्लॉयी दिसतात. मग तो एक तलवार मागवतो, बाईला संजीवनी तयार ठेवायला सांगतो आणि स्वतःचा हात छाटून, एका देवीला प्रसन्न करून घेतो. देवी बहुधा कुठल्यातरी महत्त्वाच्या कामात टॅम्प्लीज घालून आली असावी. ती बाकी गप्पा न मारता भट्टारकाच्या -
'सगळ्यांत महान देवी कोण जी मनोरथ पूर्ण करते?'
'तिचे स्थान कुठे आहे?'
'तिला प्रसन्न कसे करता येईल?' या प्रश्नांची कमीतकमी शब्दांत उत्तरे देते आणि अदृश्य होते. देवी घाईत असते, त्यामुळे प्रश्न विचारून झाला की, भट्टारक प्रश्नाच्या शेवटी 'बोल मेरी अंबे, बोल जगदंबे' असे म्हणतो. हे तो प्रत्येक प्रश्नाला करतो. हिंदी पिच्चरांमध्ये वॉकीटॉकीवर बोलताना वाक्य संपले की 'ओव्हर' म्हणतात तसेच हे पुराणकालीन! मग नंतर सदाजबाला तो हात हाताच्या जागी धरायला सांगतो आणि सेविकेला संजीवनीचा स्पर्श द्यायला सांगतो. लगेच हात जुळून पूर्ववत! यावरून तो एक महान तांत्रिक आहे हे आपल्याला कळते.

त्याच्या महान तंत्रज्ञानाचा दुसरा नमुना म्हणजे त्याने डेव्हलप केलेली त्याची दुर्बीण! हिच्या क्षमतेला पार नाही. एका गावात बसून दुसर्‍या गावातली मुंगीदेखील दिसू शकते. खेरीज एका जागी उभे राहून तुम्हांला वाटेल ती गोष्ट, अगदी आतली खोलीदेखील या दुर्बिणीने पाहता येते. त्याने तो रामूला पाहतो. कारण पातालभैरवीला बळी दोघांचेच चालणार असतात, एकतर हा मांत्रिक अथवा एखादा हुशार जाँबाज तरूण! म्हणजे आपला रामू!

मग भट्टारक आपल्या साथीदारांसह त्या नगरीत जातो. आपण नेपाळातून आलो आहोत असे सांगतो. (हे ऐकल्यानंतर त्याच्या पुढच्या काव्यमय संवादांना नवर्‍याने 'नेपाळी गझला' असे नाव बहाल केले!) जादूचे प्रयोग दाखवतो. एका संगमरवरी पुतळ्याला बाई बनवतो आणि ती बाई 'एक दुपट्टा, दो दो मवाली' असे शब्द असलेले गाणे म्हणते. प्रेक्षक खूश होतात. मग तो एक भलामोठा मातीचा कप काढतो. (म्हणजे चहा प्यायचा चिनीमातीचा कप नव्हे; जो स्पर्धांमध्ये जिंकतात तो कप!) त्यातून तो लोकांना गिफ्टा द्यायला लागतो. शक्ती कपुराला सोन्याची नाणीच नाणी देतो. मग रामू ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी उर्फ कप उचलून पळून जातो. (इथे जर त्या कपाला हात लागताच रामू उडायला लागून थेट भट्टारकाच्या अड्ड्यावर पोचला असता, तर रोलिंगबाईंनी ट्रायविझार्ड टूर्नामेंटीचा कप पोर्टकी असणे ही कल्पना पाताळभैरवीतून घेतली असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही.) त्याच्यामागोमाग भट्टारक त्याच्याजवळ येऊन पोचतो. (मध्यमवयीन असला तरी स्पीड जबरी!) आणि त्याला भरपूर संपत्ती मिळेल, अशा भूलथापा देऊन पाताळभैरवीच्या स्थानाकडे घेऊन जातो.

तिथे गेल्यावर त्याला पुढे घालून, सगळ्या संकटांना तोंड द्यायला लावत, रस्ता मोकळा करून घेत अखेर देवीच्या मूर्तीसमोर येतो. प्रवासाने रामू मळकट झाल्याने तो त्याला आंघोळीस पाठवतो. तिथे रामूने आंघोळीस सदरा काढल्यावर त्याची झिप असलेली आधुनिक विजार दिसते आणि भारत तेव्हाही किती प्रगत होता, हे आपल्या मनावर ठसते. तिथे तो आंघोळ करत असताना नेमेचि येते ती मगर येते. रामूने तिला मारल्यावर तिथे देवी प्रकट होते. ही दुसरीच देवी, पाताळभैरवी न्हवे! तिला रामू शापमुक्त करतो. ती रामूला तांत्रिकाचा डाव सांगते आणि म्हणते, की युक्तीने तू त्याचाच बळी दे, मग पाताळभैरवी तुझ्यावर प्रसन्न होईल. रामू तसेच करतो आणि पाताळभैरवी त्याला आपली मूर्ती देऊ करते. मूर्ती हातात धरून 'जय पाताल भैरवी' असे म्हटले की तात्काळ ती प्रकट होते आणि 'मानव, बोल क्या इच्छा है तेरी?' हे एवढेच वाक्य इच्छा सांगेस्तोवर म्हणत राहते.

रामू परतून देवीकडून मोठा वाडा बांधवून घेतो आणि महागड्या, ब्रँडेड गिफ्टा देऊन राजकन्येला मागणी घालतो. राजा लग्नाला हिरवा सिग्नल देतो आणि सगळे मनोरंजनाचे रंगारंग कार्यक्रम बघायला रामूच्या वाड्यात येतात. तिथे पुन्हा आधुनिक ठेकेबाज आणि फास्ट डॅन्स असलेले गाणे होते. लग्नाची तारीख नक्की होते.

इकडे भट्टारक परत आला नाही म्हणून सदाजबा त्याच त्या दुर्बिणीने त्याला शोधतो तर तो मरून पडलेला दिसतो. ते ताबडतोब सतत धूर येत असणारी संजीवनी मुळी घेऊन तिकडे जातात आणि भट्टारकाला जिवंत करतात.

चंचलच्या मनात राजकन्येशी लग्न करावे असे असते आणि रामू तिला पटवतो म्हणून हा बारकासा दोर घेऊन आत्महत्या करायला निघतो. तिथे भट्टारक त्याला अडवतो आणि राजवाड्यातून मूर्ती चोरून आण, तुला राजकन्या मिळवून देईन, अशी खोटी आश्वासने देतो. मग चंचल घरचाच माणूस असल्याने आरामात जाऊन, मूर्ती उचलून आणतो. पण जाताजाता तो चुकून 'जय पातालभैरवी' म्हणतो आणि देवी प्रकट होते. ती सारखी 'मानव, बोल क्या इच्छा है तेरी?' असे म्हणायला लागल्याने त्याला इच्छा मागण्यावाचून गत्यंतर राहत नाही. तो राजकन्येला उचलून आणायला सांगतो. इकडे रामू म़ंगळसूत्र घेऊन राजकन्येच्या गळ्याकडे हात नेतो, तो राजकन्या गायब!

एवढे करूनही चंचल बावळट असल्याने भट्टारक त्याच्याकडून मूर्ती हस्तगत करतो आणि राजकन्या आणि चंचलला घेऊन दूर निघून जातो. बिचारा रामू! हनीमूनला जायचे सोडून शक्तीला सोबत घेऊन राजकन्येला शोधत निघतो.

ते रानात थांबतात, झोपतात. सकाळी रामू जागा होतो तो काय? कुणीतरी टाळ्या वाजवून त्याला बोलवते, अंगावर झेंडूच्या पाकळ्याच पाकळ्या उधळल्या जातात. मग डिंपलतै येतात आणि दिलखेचक आयटम साँग पेश करतात. नंतर त्या रामूला लगटू बघतात आणि तो त्यांना झिडकारतो. लगेच त्यांचे रुपांतर यक्षिणीमध्ये होते. त्यांना शाप मिळाल्यामुळे पाताळलोकात यावे लागलेले असते. 'तू एखाद्या पुरुषाशी लगट केल्यावर त्याने तुला झिडकारले तरच तुला मुक्ती मिळेल' अशी अट असते. तर ते काम रामूने केल्याने त्या त्याला मदत करतात. त्या त्याला भट्टारकाच्या अड्ड्याशी पोचायला एक पक्षी देतात. पक्ष्याच्या पाठीवर बसून रामू निघतो.

इकडे भट्टारकाचे दिल राजकन्येवर आलेले. इतके दिवस केवळ तांत्रिक साधनेत घालवल्यानंतर आता त्याला लग्न करायची इच्छा होते. राजकन्या अर्थातच नकार देते. मग संतापलेला भट्टारक मूर्तीकडे रामूला हातपाय बांधून इथे हजर कर, असे मागतो. पक्षी सरळ रेषेत उडत चाललेला आणि पाठीवरचा रामू गायब! तरी पक्षी विचलित न होता सरळ रेषेत उडत निघून जातो. निष्काम कर्मयोगी! इकडे रामू आणि चंचल बंदिवासात अडकतात.

तिकडे शक्ती कपूर जागा होतो तर त्याला यक्षिणी वगैरे सुंदर बायका न भेटता एकच डोळा कपाळात असलेले आणि दुसरे तसलेच विचित्र दिसणारे अशी दोन राक्षस-कम-भुते भेटतात. त्यांनी माणसाला उडायला लावणारे बूट आणि इन्व्हिजिबिलिटी क्लोक आणलेला असतो कुठूनतरी. त्या वस्तू वाटायच्या कशा, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम शक्ती सोडवतो म्हणजेच 'दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ' या कथेतल्या माकडाप्रमाणे दोन्ही गोष्टी घेऊन भट्टारकाच्या अड्ड्याकडे कूच करतो. रामूला भेटून मग ते सगळे (सुधारलेल्या चंचलसकट!) भट्टारकाला मारायचा प्ल्यान करतात.

मग सदाजबाला बेशुद्ध करून शक्ती त्याच्या जागी जातो आणि 'भयंकर' असे नाव असलेल्या राक्षससेवकाशी अंगकाठीत साधर्म्य असल्याने चंचल त्याची जागा घेतो. हे दोघे युक्तीप्रयुक्तीने भट्टारकाकडून त्याची शक्ती कशात आहे ते जाणून घेतात. ती असते त्याच्या दाढीच्या केसांत. (भारतीय सॅमसनच हा!) मग राजकन्येला कशी दाढी आवडतच नै, बाकी तिला तू आवडतोसच, दाढी काढली की ती तुझीच वगैरे सांगून त्याची ती दाढी काढून टाकतात. मग नेहमीप्रमाणे शेवटची फायटिंग होते. उडत्या महालातून रामू भट्टारकाला पाडतो आणि भट्टारक फायनली मरतो.

मग शेवटाला रामू पाताळभैरवीला म्हणतो की, माणसाच्या इच्छेला अंत नाही. तेव्हा ही मूर्ती मला नको. चंचल म्हणतो, आमचा सिनेमा पाहायला जे काही सगळे प्रेक्षक आले असतील त्यांना जाता जाता तू आशीर्वाद दे. हा सिनेमा पाहायला प्रेक्षक आले असतील, हा त्याचा विश्वास पाहून आपण नमतो, शेवटचा संदेश आणि रामूचे तत्त्वज्ञान ऐकून गहिवरतो आणि सिनेमा संपतो.

जय पाताल भैरवी!
(मूर्ती नसल्याने आता देवी प्रकटणार नाही. चिंता नसावी.)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'ओव्हर' म्हणतात तसेच हे पुराणकालीन>>
त्या कपाला हात लागताच रामू उडायला लागून थेट भट्टारकाच्या अड्ड्यावर पोचला असता, तर रोलिंगबाईंनी ट्रायविझार्ड टूर्नामेंटीचा कप पोर्टकी असणे ही कल्पना पाताळभैरवीतून घेतली असे म्हणता आले असते>> Rofl

अनेक वर्षांपूर्वी जितेंद्रच्या (जयाप्रदा किंवा अप्सरा ड्रेस घालणारी कुठलीही साऊथची नटी, शक्ती, कादरखान, बिंदु असे पॅकेज डील) सिनेमांच्या लाटेतला हा चित्रपट. तेव्हा लै भारी वाटला होता पण. Happy

हं..............काल/परवा कधी तरी हा सिनेमा बहुतेक टीव्हीवर लागला होता. कारण अत्यंत चित्तचक्षुचमत्कारिक असे प्रसंग आणि अश्याच चि.च.च. कपड्यातील जितू आणि डिंपू दिसत होते. पण संपूर्ण पहाण्याची हिम्मत नाही झाली.
श्रद्धा ..............!मस्तच!

१९८१ ते १९८७ या काळात जितेंद्र, कादरखान, शक्ती कपूर, जयाप्रदा, श्रीदेवी आणि संगीतकार भप्पी लाहिरी यांना घेऊन पद्मालया स्टुडिओज ने मसालेदार चित्रपटांची फॅक्टरी उघडली होती. पातालभैरवी हा त्याच फॅक्टरीतला माल. तोहफा, मवाली, कामयाब, मकसद हेही फालतू चित्रपट त्याच फॅक्टरीतले.

Biggrin

Lol घेतलेस तर एकदाचे पातालभैरवी बघून लिहिण्याचं.
बाळपणी या चित्रपटाचा प्रचंड पगडा बसला होता. (त्यामुळेच आता रावण आवडत नाही. :फिदी:) जितू हा पृथ्वीतलावरचा सर्वात भारी मानवप्राणी वाटे. देवदेवी, यक्ष-किन्नरे, भुते-राक्षसे या सगळ्यांत वावरूनही सुखरूप. वरून त्यांनाच कामाला लावणे म्हणजे महानच!
कादरखानच्या अवताराची खूप भिती वाटायची.

माझ्या एका मित्राची सासुरवाडी एक्झॅक्टली वसंत टोकीजसमोरील बहुमजली चाळवजा इमारतीत दुसर्‍या की तिसर्‍या मजल्यावर होती/आहे. तिथे खिडकीत आम्ही बसलो की या पाताळभैरवीचे थिएटरवरचे पोस्टर सारखे दिसायचे त्याची आठवण झाली. अर्थात हा प्रकार काही आम्ही पाहिला नाही कारण त्याकाळात जीतेन्द्रचा खूप राग येत असे कारण त्याच्या चित्रपटाचे पेवच फुटले होते त्या काळात आणि हा पद्मालयी फॉर्म्युला एकसारखाच असे.

जबरदस्त ..
पाहिला हा सिनेमा तुनळीवर फायनली

धमाल आहे लेख. Lol

शाळेत असताना अमिताभ बच्चनचे चित्रपट सोडल्यास जितेंद्र श्रीदेवी मालिकेतले चित्रपट आवडले होते. हा पण खूप्प आवडला होता.
राजा राणी, खलनायकांपासून सर्वांनी विनोदाची उचललेली जबाबदारी, दुष्ट जादूगाराचे विनोदी संवाद, ठेक्यावरची गाणी . हा एक चित्रपट मिस झाला होता. तो काही वर्षांनी शिमल्याला एका फुटक्या थेटरात रात्रीचा शो पाहिला.

मस्त केलय परीक्षण. चेहर्‍यावरची माशीही न उडवता मस्त पंचेस दिलेत एकेक. हा सिनेमा लहानपणी आवडलेला होता. अद्भुत रस ओसंडुन वहाणारा सिनेमा म्हणुन लक्षात आहे.

कहर धमाल लेख आहे हा! मी मद्रासी पाताळविजयम बद्दल विचारलं तर लोकांनी हा शोधून दिला मला. आय डोन्ट रिग्रेट.

एकेका गाण्यावर खरंतर एकेक परिक्षण लिहिता येईल. "झूम झूम नाचो झूम झूम, गावो गीत मिलनके" हे गाणं रोज लावून एरोबिक व्यायाम करण्याइतपत जबरी आहे. Lol

Submitted by संकल्प द्रविड on 10 November, 2011 - 10:29 >>

आताच पहिले आणि तुमचे म्हणणे पटले। हा हा हा हा

एका संगमरवरी पुतळ्याला बाई बनवतो आणि ती बाई 'एक दुपट्टा, दो दो मवाली' असे शब्द असलेले गाणे म्हणते. प्रेक्षक खूश होतात. >>>>सिल्क स्मिता आहे का त्यात

Pages