संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर - भाग १- Experimental Condensed Matter Physics

Submitted by चारुलता on 7 November, 2011 - 07:33

खरतर हा धागा सुरू करायला आजच्या इतका चांगला दिवस कोणता असु शकेल ! Happy
आज पदार्थ विज्ञान आणि रसायन शास्त्र या विषयात अभुतपुर्व कामगिरी करण्यार्‍या डॉ. मेरी क्युरी चा जन्मदिन. तिच्या प्रयोगांनी या दोन्ही विषयातील तत्कालीन संशोधनाला एक नवी दिशा दिली. तिचे नाव हे अनेक अर्थानी मैलाचा दगड आहे. तिचा हा प्रवास सोपा सहज नक्कीच नाही. अनेक अडचणी, अयशस्वी प्रयोग आणि त्यामुळे येणारे नैराश्य या सर्वांवर मात करुन नोबेल मिळवणारी ती पहिले स्त्री सशोधक म्हणुन खूप काही शिकवते. हॅट्स ऑफ टु मेरी !

माय्बोलीवर देखिल अनेक सदस्य आज वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. कार्यक्षेत्र, त्याtतील संशोधन म्हणजे नेमकं काय, त्यातील आव्हाने, अडचणी, निष्कर्श, याविषयी माहिती संकलीत करायला आजपासुन सुरुवात करुयात. Happy

या मालिकेतील भाग एक- माझे क्षेत्र - Experimental Physics

विषयः- पदार्थविज्ञान, स्पेशल- . solid state physics,
संशोधनः - condensed matter physics, quantum physics.

क्षेत्राची ओळखः- पदार्थविज्ञान या शब्दातच त्याचा अर्थ सामावलाय. पदार्थाचे विज्ञान. Happy आपल्याकडे या विषयाचा खूप बाऊ केला जातो. खरतर सायकल चालवण्या इतकाच हा विषय सोपा आहे. सायकल एकदा चालवायला आली की आली. मग कोणत्या रस्त्यावरुन कशी हाकायची हे आपोआपच कळतं. तसच आहे फिजीक्सच. एकदा फिजीक्स चालवायला जमल की डोक आपोआप तसाच विचार करायला लागत. मग तो एक मस्त मुडच होतो. उ.दा. कार १०० च्या ताशी स्पीड चाल्वत असाल तर पुढच्या गाडीत आणि आपल्यात किती अंतर असाव जेणेकरुन आपल्याला अचानक ब्रेक लावावा लागला तर धडक होणार नाही? किंवा मायक्रोवेव मध्ये डब्याचे झाकण बंद करुन गरम करायला का ठेऊ नये? असे प्रश्न पडायला लागले की उत्तर शोधायला लागतो तिच फिजीक्स शिकण्याची पहिली पायरी. Happy फिजीक्स म्हणजे भौतिक , physical जगाच्या हालचालींची कारणमिमांसा.

त्यातही अबेक विषय आहेत. उ.दा. mathematical physics, spectroscopy, material sciences, solid state physics etc.. ही प्रत्येक शाखा त्या त्या विषयाचा विषेश अभ्यास करते पण तरिही त्या एकमेकांशी निगडीत आहेत. उ.दा. Solid state physics आणि spectroscopy. एखाद्या घन पदार्थावर प्रकाशाचा काय परिणाम होईल हे माहित असण्यासाठी त्या पदार्थाची संरचना तसेच त्या प्रकाशाचा प्रकार दोन्हीची माहिती हवी. सोने या धातुमधुन कोणत्या प्रकाशाचे किती प्रमाणात transmission होईल यासाठी सोन्याची रचना आणि त्या किरणांची wavelength दोन्ही माहिती लागते.

यात माझे specialization आहे solid state physics-condensed matter physics. यात या नावतच सगळ काही आलं. पदार्थांची संरचना, त्यातही इलेक्ट्रोन्स इन्टरॅक्शन आणि त्या अनुशंघाने बदलणारे पदार्थाचे गुणधर्भ असं या शाखेच वर्णन करता येईल. आता condensed matter physics त्याचाच एक भाग म्हणता येईल. फिजीक्सचे प्रचलित नियम वापरुन पदार्थाच्या स्थितीचा अभ्यास. आता प्रश्न येतो प्रचलित नियत म्हणजे काय? इथे सुरु होतो खेळ नव्या आणि जुन्यांचा. अर्थात classical physics and quantum physics.

क्लासिकल फिजीक्स म्हणजेच बरचसं न्युटनच्या नियमानुसार चालणारं फिजीक्स. जेंव्हा एखादी गोष्टीचा प्रभाव त्याच्या भव्य आकारमानामुळे असतो तेंव्हा हेच नियम वापरात येतात. उ.दा. वाहने. आता आपण जेंव्हा पदार्थाचा इलेक्टॉनिक लेवलवर विचार करतो तेंव्हा जुने आणि नवे दोन्ही नियम वापरायचे असतात.

आता जरा नव्याची ओळख करुन घेऊया. quantum physics म्हणजे पुन्ज भौतिकी. यानुसार प्रत्येक गोष्ट ही पुन्ज किंवा पॅकेट्स्च्या स्वरुपात असते. उ.दा.प्रकाश. क्लासिकल फिजिक्स च्या नियमांप्रमाणे प्रकाश हा एक सलग आहे तर क्वांटम फिजीक्स म्हणते कि तो पॅकेट्च्या स्वरुपात आहे.या नविन नियमाप्रमाणे सगळेच अनिश्चित किंवा uncertain आहे. उ.दा. एका ठिकाणाहुन निघालेले अमुक एक पॅकेट अमुक या ठिकाणी अमुक इतक्या वेळात पोहोचेल आणि पोहोचल्यानंतरही त्याचे तेच गुणधर्म असतील जे सुरुवातीला होते, हे कुणीच निश्चित सांगु शकत नाही. पण त्याची अनिश्चितता किती असेल हे सांगता येईल. आहे ना गमंत !

मग प्रश्न असा पडतो, हे आपल्याला डोळ्यांनी का दिसत नाही? डोळ्यांनी तर आपल्याला केवळ न्युटननच्या नियमाप्रमाणेच चालणारे जग दिसते. अगदी खर आहे. कारण हे सुक्ष्मातीसुक्ष्म बदल इलेमेंटरी पातळीवर होतात. त्यांचा एकमेकांवर होणारा दृश्य प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला न्युटनचेच नियम लाववे लागतात.
पण इलेक्ट्रॉनिक पातळीवर मात्र क्वांटम नियमच वापरावे लागतात. कारण अश्या सुक्ष्म पातळीवर एकेमाकांचे इन्टेरॅक्शन ग्रुहीत धरावे लागते.

हुश्श..... जरा जास्तच तेल झाले ना नमनाला. Wink

आता माझ्या रिसर्च कडे वळते. आता ज्या सुक्ष्म लेवलवर आपण आहोत तिथे पदार्थाचे अ‍ॅज अ मास गुणधर्म न बघता, त्यातील इलेक्ट्रॉन्स चे गुणधर्म पहायचे आहेत. इलेक्ट्रॉन्स च्या अनेक गुणधर्मापैकी एक गुणधर्म म्हणजे स्पिन. स्पिन अप किंवा स्पिन डाऊन. आपला एका अक्षावर दोन्ही बाजुनी फिरु शकणारा भोवरा जणु. आता हा भोवरा आपल्या अक्षाभोवती तर फिरतोच आहे शिवाय एक गोल चक्कर सुध्दा मारु शकतो. त्याच्या या गुणामुळे त्याला चुंबकीय शक्ती सुध्दा आहे. हे त्याच ढोबळ गुणधर्म मानुयात. आता याच गुण्धर्मांचा आपल्याला उपयोग करायचा आहे.

हा इलेक्ट्रोन वापरुन आपल्याला कप्युटर मेमरी तयार करायची आहे. अश्या प्रकारे मेमरी तयार केल्यास संगणक कित्येक पटीने जलद होतील आणि आकारदेखिल लहान होइल. sounds interesting. पण यात सगळ्यात मोठे आव्हान आहे या इलेक्ट्रोनची स्थिती कायम ठेवणे. इलेक्ट्रोनचा रीलॅक्सेशन टाईम वाढवणे गरजेचे आहे. या इलेक्ट्रोनचे स्थिती एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी जाताना कायम रहायला हवी पण तसे होत नाही. कारण क्लासिकल फिजीक्स मध्ये आजुबाजुचे, बाकिच्या इलेक्ट्रॉन्सचे इन्टरॅक्शन गृहीत धरले नाही. या अडथळ्यामुळे इलेक्ट्रोनची स्थिती, त्याचे स्पिन बदलेल. थोडक्यात इलेक्ट्रोन इनफॉर्मेशन इस लॉस्ट.

यावर उपाय म्हणजे अश्या एका स्थितीला जाणे जेथे आजुबाजुचे वातावरणाबरोबर स्कॅटरींग होणार नाही. गर्दीतुन वाट काढुन ट्रेन पकड्यासारखी स्थिती आहे ही. आता जर गर्दीच गोठवली तर? सुरुवतीला ज्याना त्या ट्रेन ने जायचे नाही त्याना प्लॅटफॉर्म वरुन बाजुला केले आणि इतराना एका शिस्तीत उभे केले तर ट्रेन पकडणे सोपे होइल.... दॅट्स इट. आपल्याला गर्दीच गोठ्वायची आहे. आणि आहेत त्या इलेक्टोन्स न शिस्त लावायची आहे. या साठी लिक्विड नायट्रोजन (७७ K--१९६°C; -३२१°F) आणि लिक्विड हेलिअम (४.२ K-−२६९ °C, −४५२ °F) चा वापर करायचा आहे. या दोन्हीचा वापर करुन आपली सिस्टीम ०.०२ K,( -२७३°c, -460°F) किंवा त्याही पेक्षा थंड करायची आहे आणि या साठी डायल्युशन रेफ्रिजरटर चा वापर करायचा आहे. हाच माझ्या संशोधनाचा मुख्य भाग आहे. स्कॅटरिंग न होता इलेक्ट्रोन पाथ जास्तीत जास्त वाढवणे हा यातील उद्देश आहे. त्यासाठी बाकी अडथळे दूर करुन रिलॅक्सेशन टाईम वाढवणे या यातील मुख्य पायर्‍या आहेत.

आज अनेक ठिकाणी यावर संशोधन होत आहे. quantum dot. quantum wires, quantum point contacts nanowires, nanotubes अश्या वेगवेगळ्या samples मध्ये प्रयोग होत आहेत. या साठी " Two dimensional electron system " चा उपयोग केला जातो. यामध्ये इले़क्ट्रोन्स ची हालचाल दोनच दिशांमध्ये निश्चित केली जाते. हा सँपल तयार करण्याचा बेस आहे. एक वर्किन्ग डिवाइस तयार करुन त्यावर प्रयोग करुन sensible results मिळवण्याचा प्रवास खूप आव्हानात्मक तर आहेच. कारण कोणत्याही पायरीवरची एक साधीशी चूक पुन्हा शुन्यावर घेऊन येते. मग पुन्हा पहिल्यापासुन सुरुवात. यासाठी जी sample तयार करायचे असते त्याची डायमेन्शनच जास्तीत जास्त १ मिमी x १ मिमी असते. यावर नॅनोलिथोग्राफिक टेक्निक वापरुन हे फॅब्रिकेशन केल जाते. Minimum measurable feature size is few nm.

एक पुर्ण क्वांटम कप्युटर, वर्किंग क्युबिट तयार करायला अनेक वर्षे लागतील हे खरे असले तरी या क्षेत्रातील प्रत्येक संशोधन महत्वाचे आहे. उ.दा single electron transistor. अधिकाधिक क्षमतेचे सोलार सेल्स.

या प्रवासा दरम्यान अनेक नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सहनशक्ती वाढली. Lol कारण सगळ्या पायर्‍या बरोबर करुनही तुम्हाला हवा तो रिज्ल्ट मिळेलच हेच अनसर्टन, यातल्या क्वाटंम च्या नियमाप्रमाणेच. तसेच नविन जॉइन झालेल्या लोकाना देण्यासाठी फंडे मिळाले. उ.दा. जे काय रिजल्ट्स नशिबात असतील ते पी.एच.डी च्या शेवटच्या वर्षातच मिळतात. तोपर्यंत फक्त वाट बघायची. Lol

केलेल्या कामावर पेपर लिहीणे, कॉन्फरन्स मध्ये सादर करणे हे देखिल महत्वाचे. आणि म्हणुनच तुमचे रिजल्ट्स जगासमोर मांडताना हे लक्षात घ्यायच आहे कि इथे मॅनिप्युलेशन किंवा फ्रॉड ला अजिबात वाव नाही. बोललेला, लिहीलेला प्रत्येक शब्द जपुन वापरणे महत्वाचे आहे. जर माहित नसेल तर देन लर्न टु से "आय डोंट नो". बाकीच्या क्षेत्रांप्रमाणेच इथे स्पर्धा आहेच. आपले काम अचूक करणे हे कौशल्य देखिल शिकावे लागतेच.

अर्थात संशोधन क्षेत्र म्हणजे आदर्श, छान छान, सगळं गुडीगुडी हे मात्र खरे नाही. त्याचेही लूप होल्स आहेतच आणि त्याचा फायदा घेणारेही आहेतच. त्याबद्दल लिहीते लवकरच.

********************************************************************************************************

रैनाने उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन पुढे;-

पी.एच.डी करावे असे का वाटले? -- माझ्यापुरतं बोलायच झाल तर साधारण अकरावीत असताना वेगळं काहीतरी करायच हे डोक्यात बसल होत. त्यामुळे बारावी नंतर सरळ बी.एस्सी. ला प्रवेश. त्यावेळी बर्‍याच जणासाठी हा धक्का होता. खुद्द माझ्या आईवडिलासाठीही. Happy आईची खूप इच्छा होती की मी मेडिकल ला जावे. पण कधी कुणी फोर्स नाही केले. आता विचार केला तर वाटते की हा असा निर्णय मी आत्ता घेऊ शकले असते का?

बी. एस्सी मध्ये फिजीक्स स्पेशल आणि त्यानंतर एम.एस्सी इन फिजिक्स. मग एम टेक. एम टेक नंतर जर्मनी ला आलो. त्यावेळी मी नोकरी सुरु केली होती. पण नाही रमु शकले. मग जी.आर. ई आणि यु. एस. ला अ‍ॅड्मिशन. पण माझ्या प्रोफ. ना त्याचवेळी युरोप मध्ये पोझिशन मिळाली. मग मी बॅक टु युरोप. गृप ची सुरुवातच माझ्या पासुन होती त्यामुळे अर्थातच लॅब इन्स्ट्रुमेंट्स ऑर्डर करणया पासुन सुरुवात होती. त्या संपुर्ण प्रोसेस चा अनुभव मिळाला.

इथे बर्‍याच युनि. मध्ये पी.एच.डी साठी स्कॉलरशीप मिळते. बॅचलर आणि मास्टर्स च्या विद्यार्थ्याचे क्लासेस घेणे हा ही तुमच्या कामाचाच भाग असतो. त्यामुळे आर्थिक बाजुची काळजी नसते. अर्थात स्विस मधील सर्व युनि. मध्ये नियम असा आहे की तुमचे काम जर समाधानकारक नसेल तर प्रोफ. तुम्हाला कधीही फायर करु शकतात. माझ्याच ग्रुप मध्ये माझ्या समोरच तीन जण असे होते. Sad .त्यशिवाय काँट्रॅक्ट दरवर्षी रीनीव्यु होते. त्यामुळे थोडेफार टेन्शन असायचेच. या तिघामध्ये माझी एक खूप चांगली मैत्रीण होती. Sad

लॅब सेट अप करण्यापासुन सुरुवात केल्यामुळे बराच मशिन हँडलींग चा अनुभव मिळाला. घरातील नादुरुस्त उपकरणे, गळके नळ, इले़क्ट्रिचची छोटी मोठी कामे सध्या घरातल्या घरातच होतात. Proud या सर्व कामांदरम्यान आपण स्त्री म्हणजे काहीतरी वेगळे जाणीव कधी झाली नाही किंवा करुन देखिल दिली नाही. यावरुन एक गंमत आठवली. दुसर्‍या एका गृप मध्ये एक भारतीय मुलगा नुकताच जॉइन झाला होता. मी हेलिअम गॅस बॉटल वर्क शॉप मध्ये रीफिल साठी नेत होते. हे काम पंधरा दिवसातुन एक्दा तरी करावे लागे. मी नेहमीप्रमाणेच सिलींडर घेऊन जात होते. तेवढ्यात शेजारुन निघालेल्या या मुलाने विचारले, " दिदी, कुछ मदत करू?" त्याच्या प्रश्नाची गंमत वाटली. माझ्या नात्यातीलच एका मुलीने म्हटले, "लडकिया कार वॉश जैसी कामे नही करती" तेंव्हा पुन्हा एकदा जाणवल, हा फरकच मेंदुतून पुसला गेलाय. हे माझ्याच बाबतीत आहे अस नाही, पण बरोबरच्या इतर स्त्रियांचे काहीसे असेच आहे.

बरेच दिवस रिजल्ट्स न मिळाल्याने प्रचंड नैराश्य यायचे. रोज नविन दिवस मावळायचा तो याच प्रश्नाने की मी आज काय केलं. बरेचदा उत्तर मिळायच, नाही, काहीच नाही. एक बॅड पॅच येऊन गेला. त्यातुन मिळालेला धडा खूप मोलाचा वाटतो. फक्त नैराश्य मिळाल असं मात्र नाही म्हणता येणार. पण हा देखिल मला या प्रोसेसचाच भाग वाटतो. You cant create a new world for yourself. Happy

या क्षेत्रातच रहायचय का याच उत्तर मी ठामप्णे नाही सांगु शकत. का तेही माहित नाही. सध्या गॅप घेऊन या प्रश्नावरच विचार सुरु आहे. Happy

या क्षेत्रातदेखिल लॉबी हा प्रकार थोड्या फार फरकाने आहेच. पण त्याला पर्याय नाही. एक मात्र आहे की
चुकीची माहिती लिहुन, किंवा चुकीच्या रिजल्टस वापरून कुणीही या क्षेत्रात राहू शकत नाही. यातील फ्रॉडचा पाठपुरावा केला तर त्या व्यक्तीची डिग्री काढून घेतली जाते. अश्याच माझ्या क्षेत्रातील केस बद्दल लिहीते आहे. यातीलच दुसरा एक प्रकार म्हणजे आपल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रोफ. ला चुकीची माहिती देऊन किंवा माहिती लपवुन डॉक्टरेट मिळवणे. खरतर असे प्रकार सहसा होत नाहीत. कारण हाय रँक विद्यापीठाकडुन तुमच्या आधीच्या विद्यापीठाचे सर्व डीटेल्स तपासले जातात. तुमची शेवटची डीग्री कोणती? कोणत्या विद्यापीठाने दिली? ती डीग्री आमच्या विद्यापीठाच्या तुम्ही प्रवेश घेतलेल्या डीपार्ट्मधील मास्टर्स्च्या equivalent आहे का? तसेच तुमचे मास्टर्सच्या दरम्यान कोणकोणते विषय होते? तुम्ही ज्या विषयात पी .एच.डी करणार आहात तो विषय तुम्ही पुर्वी मास्टर्स ला अभ्यासला आहे का? जर त्यात काही चूकीचे आढळल्यास तुमचा प्रवेश रद्द केला जातो. माझ्याच गृप मध्ये एकाचा प्रवेश रद्द झाला होता या कारणामुळे. पण युरोपमधील सगळी विद्यापीठ असे करतात असे नाही, हे समजले तेंव्हा मात्र धक्का बसला होता.. अश्यवेळी केवळ जर्मन डिप्लोम आणि भारतीय डिप्लोमा या नामसाधर्म्यचा फायदा घेऊन एखादी व्यक्ती डॉक्टरेट मिळवते तेंव्हा वाईट निश्चितच वाटत. जर्मनी आणि जर्मन भाषीक देशांमध्ये मास्टर्स कोर्ससाठी "डिप्लोम " असा शब्द आहे. याचाच फायदा घेऊन डॉक्टरेट मिळवणारी व्यक्ती समोर आली की चीड येतेच. अर्थात हा या धाग्याचा विषय नाही. मात्र त्या एका मुलीमुळे तिथे प्रवेश घेतलेल्या जेन्युईन लोकांवर देखिल संशयाची सुई फिरते. Sad इथे कुठेतरी एथिक्सचा विचार करावा.

माझ्यासाठी तरी ही साडे चार वर्षे एखाद्या personality development course सारखी होती. डॉक्टरेट म्हणजे फार काही ग्रेट केलयं अस मला तरी वाटत नाही. पी.एच.डी मुळे मला जगातलं फार कळायला लागल असही नाही. पण स्वतःमध्येच झालेले सकारात्मक बदल पाहिले.

*********************************************************************************************************

सगळी माहिती एकाच ठिकाणी रहावी म्हणुन खाली विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे इथेच लिहीते. Happy

१) सुनीधीचे प्रश्न- अजुन थोडे सविस्तर कळेल का? म्हणजे, ते गोठवले कसे, मेमरीत गोठवलेले राहिले कसे? तिथे ते पोचले कसे?

आपल्याला माहित आहेच कि इलेक्ट्रोन्स हे प्रत्येक वस्तुचे building elements आहेत. त्यांची संरचना, परस्परातील इंटरॅक्शन्स त्या त्या पदार्थाचे गुणधर्म ठरवतात. उ.दा. मेटल, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर इत्यादी. या एलेमेंटरी चार्ज च्या गुणधर्माचा वापर करुनच पुर्ण इलेक्ट्रोनिक इंडस्ट्री उभी आहे. मेटल, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर हे तीन प्रकार त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रोन्सच्या संख्येवरुन केले आहेत.मेटल मध्ये सर्वात जास्त आणि इन्सुलेटर मध्ये सर्वात कमी आणि या दोहोंच्य मध्ये सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर इन्ड्स्ट्री मध्ये अर्थातच सेमीकंडक्टर्स चाच प्रामुख्यने वापर होतो, कारण यामधील इलेक्ट्रोन्स ना कंट्रोल करणे सोपे आहे.

अश्या एखाद्या सेमीकंडक्टर ला डोप करुन त्याची कंडक्टीवीटी वाढवली जाते. पण ती नेहमीच मेटल पेक्षा कमी असते. त्याचाच वापर करुन एक अशी सिस्टीम तयार केली जाते ज्यामध्ये इलेक्ट्रोन्स केवळ दोन दिशानाच फिरु शकतो. अश्या सिस्टीमला "Two dimensional electron gas (2DEG) " असे म्हणतात. म्हणजेच x-, y- z- या प्रतलात इलेक्टोन्स केवळ x आणि y या दोन दिशानांच जाऊ शकतो. हा या प्रयोगांचा बेस म्हणता येईल. असे 2DEG, अति उच्च निर्वात जागी तयार केले जातात.

अशी सिस्टीम वेगवेगळ्या एलेमेंट्स मध्ये तयार केली जाते. उ.दा. कार्बन, सिलीकॉन, गॅलिअम. या बेस वर नॅनोफब्रिकेशन करुन सँपल्स तयार केले जातात. अश्या सिस्टीम मध्ये इलेक्ट्रोन्स हे त्या सिस्टीम पासुन किंवा त्यातील इतर इलेक्टोन्स पासुन मात्र वेगळे होऊ शकत नाहीत, निदान अजुनतरी. म्हणुन उच्च निर्वात जागी अतिथंड केले जातात ज्यामुळे इतरांशी असलेले त्यांचे इन्टेरॅक्शन गोठले जाईल आणि हे स्पेशल इलेक्ट्रोन्स आपल्याला नीट कन्ट्रोल करता येतील. ही गोठवण्याची क्रिया डायलुशन रेफिजरेटर नामक उपकरणामध्ये केली जाते. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिल्ड मध्ये त्यांच्यावर प्रयोग केले जातात.

अर्थात ही गोठवलेली स्थिती केवळ त्या उपक्रणामध्ये असे पर्यंतच आहे. रूम टेम्परेचर ला आल्यानंतर पुन्हा आधीचेच गुणधर्म या सॅंपल मधे येतात कारण हा फक्त भौतिक बदल आहे. यावर उपाय शोधण्यासाठी देखिल अनेक प्रयोग सुरु आहेत.

२) सावलीचे प्रश्नः- सॉलिड स्टेट मेमरी आणि अशा प्रकारची मेमरी मधे काय फरक आहे.
-इलेक्ट्रॉनची स्थिती कायम ठेवण्यासाठी जे वातावरण तयार करावे लागते ते वर उल्लेखलेल्या "quantum dot. quantum wires" या संशोधनात कसे ठेवतात?

सॉलिड स्टेट मेमरी किंवा अस म्हणुया की आत्ता वापरले जणारे बिट्स आणि क्युबीट्स यामध्ये महत्वाचा फरक असेल तो क्षमता आणि स्पीड चा. सध्या इलेक्ट्रोन्स च्या गुणधर्माचा वापर करुन तयार केलेले ट्रान्सिस्टर्स वापरले जातत. अश्या बल्क इलेक्ट्रोन्स ऐवजी जर केवळ एका इलेक्ट्रोन चा वापर केला तर निश्चितच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त क्षमतेचा आणि जलद ट्रांजीस्टर मिळेल.

उ.दा. एक क्वांटम डॉट हा single electron transistor" म्हणुन काम करतो. क्वांटम डॉट म्हणजे नॅनोगेट्स च्या मदतीने तयार केलेले इलेक्टोन्सचे बेट. या एका बेटाचा आकार जास्तीत जास्त १० नॅनोमीटर आहे. आता फक्त एक इलेक्ट्रोन्स चे हे बेट तयार केले तर त्याचा आकार कितीतरी पटीने कमी होईल आणि त्या बरोबरच त्याची क्षमता आणि स्पीड कित्येक पटीने वाढेल.

या प्रयोगांमध्ये इलेक्ट्रोन्स चे तपमान लिक्विड नायट्रोजन आणि आणि लिक्वीड हेलिअम चा वापर करुन, डायल्युशन रेफीजरेटर मध्ये , अति उच्च निर्वात कंडीशनमध्ये कायम मध्ये ठेवतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारू, मस्तच. मला तीनतीनदा वाचायला लागलं तेव्हा कुठे समजलं. Happy

हा उप्क्रम आवडला. थोड्या मोठ्या प्रमाणावर करू या.

हे असं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून आपण एक ई-बूक तयार करू शकतो. करीअरच्या वेगळ्या वाटा म्हणून. मेडिकल ईंजिनीअरिंग च्या त्याच त्याच रिंगणात फिरणार्‍या मुलीना यातून प्रेरणा मिळेल.

ज्यांचे नवरे पी एच डी केलेले आहेत त्यानी अवश्य लिहायला सांगा. संयुक्ता बाहेरचे जे सदस्य अशाच पद्धतीने उच्च शिक्षित आहे त्याना संयुक्तातर्फे संपर्क साधून आपण लिहायला सांगू.

अजून एक विनंती, या सर्व शिक्षणप्रवासाच्या दरम्यान थोडाफार आर्थिक बाजूने पण लिहा. कारण, परदेशी शिक्षण म्हणजे स्कॉलरशिप अथवा एज्युकेशन लोन इतकंच माहित आहे. त्या दृष्टीने कशी तयारी केली गेली. (तुमच्याकडून्/तुमच्या पालकांकडून) ते समजून घ्यायला आवडेल.

कुणाला लिहिणं कठीण वाटत असेल आणि मदत हवी असेल तर शब्दांकन करायला माझी तयारी आहे.

चारुलता,

तुला योग्य वाटले तर प्लीज खालील माहिती देशील?

-तुला जर्मन शिकावे लागले का गं?
-मला मुळात देशातील एम. एस. सी च्याच अभ्यासक्रमाबाबत फारशी माहिती नाही. एम.एस.सी मध्ये -साधारण कसा अभ्यासक्रम असतो? किती विषय वगैरे ? थोडं सांगशील का?
- एम. एस. सी केल्यानंतर एमटेक का करावे लागते? काही फरक असतो का?
-किती मुलं होती तुमच्यासोबत. तुझे बॅचमेटस सध्या काय करतायेत ?

BSc, MSc,MTech, PhD - अगागागागा. मला अर्धशिक्षीत असल्यासारखं वाटतय Wink

लाजो, तूही लिही ना.

आपण असे करुया का? या महिन्यात सगळ्यांनी चारूलताला प्रश्न विचारा. पुढिल महिन्यात वरदाचा लेख आल्यानंतर वरदाला. मग पुढे.. चालेल?

BSc, MSc,MTech, PhD - अगागागागा. मला अर्धशिक्षीत असल्यासारखं वाटतय <<<
अर्धशिक्षित.. मला तर एरवीच बिगारी पास वाटत असतं Happy

मी लिहेन पण पुढच्या वर्षी Happy

सध्या कामात बिझी आहे आणि डिसेंबर -जॅन मधे भारतात Happy तिथुन परत आले की लिहेन नक्की Happy

चारूलता, छान लिहिलयं. गेली २ वर्ष मी पण पीएच डी करावी का असा विचार करते अधूनमधून. पण उगीच सुखाचं आयुष्य कशाला लोटायच दु:खात म्हणून परत सोडूनही देते तो विचार. नवर्‍याने पीएच्डी केलेली असल्याने त्यासाठी लागणार्‍या डेडिकेशन, चिकाटी ई. ई ची मला कल्पना आहे.
तू लिहिलेलं वाचून पुन्हा त्या विचाराने उचल खाल्ली आहे.

माझा पुतण्या वॉशिंग्टन युनिव मध्ये पीएचडी गाइड आहे. काय विषय माहीत नाही. बघून लिहीते.
कोणास त्या विषयात गाइड लागल्यास.

उच्च शिक्षणामुळे विचार प्रक्रियेत, जीवना कडे बघण्याच्या अ‍ॅटीट्यूड मध्ये काय फरक आला. स्ट्रेन्ग्थन्ड,
एम्पॉवर्ड वाट्ते का त्या बद्दलही लिहा. आम्हास मार्गदर्शन होईल. Happy

माझा मास्टर्स बाय रीसर्च अजून चालू असल्याने मला पुढच्यावर्षी पर्यंत वेळ द्या. Proud

विषय - मेडिकल ईंफोर्मॅटिक्स .
माध्यम - जर्मन Happy ( जर्मन भाषा मातृभाषेइतकी चांगली असल्याची परीक्षा पास झाल्याशिवाय ह्या कोर्सला अ‍ॅड्मिशन मिळत नाही . सर्व सबमिशन्स आणि थेसिस जर्मन मधूनच लिहिते आहे Happy )

बाकी बायांनो , तुम्ही लिहा . मला सध्या स्फूर्तीदायक विचारांची गरज आहे Happy .

धन्यवाद पुन्हा एकदा.:) मला आज अगदी सयुंक्ता सेलेब्रीटी असल्यासारख वाटतयं. Proud Happy

नविन मुद्दे आता नव्या पोस्ट मध्ये लिहीते आहे. Happy

संपदा, लाजो, वरदा तुम्हीही लिहा ग लवकर.
नंदिनी, चांगली आहे कल्पना. मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम केल्यास खूप वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती एका ठिकाणी मिळेल.
धागा सार्वजनिक करायला काही हरकत नाही. पण मला वाटते कि माहितीचे संकलन करून मग करावा. सार्वजनिक केला तर मी वरची हेडर वरची पोस्ट बदलते आणि मग शिर्षक पण बदलते. एखादे चांगले शिर्षक सुचते आहे का?

खर तर वाचू का नको वाचू अशा संभ्रमात वाचायला सुरवात केली आणि पूर्णपणे त्यात गुंगून गेले. सुरवातीपासून शेवट पर्यंत. याचा संपूर्ण श्रेय चारुलता तुलाच आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तू हा विषय हाताळला आहेस. रैना आणि लाजोने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर पण द्या ग बायांनो Happy

वाचते आहे. पीएचडी माबोकरणींना सलाम... बॅचलर पर्यंत पोहचतांनाच थकवा आला.

चारुलता खूप सोप्या भाषेत लिहिले आहेस. लिहि ग... नंदिनीन्मे सांगितले ते पण मुद्दे लिहा.

मस्त धागा.. one of the best!

खर तर वाचू का नको वाचू अशा संभ्रमात वाचायला सुरवात केली आणि पूर्णपणे त्यात गुंगून गेले. सुरवातीपासून शेवट पर्यंत. याचा संपूर्ण श्रेय चारुलता तुलाच आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तू हा विषय हाताळला आहेस.>>>>> अगदी अगदी. Happy

इथे विचारलेल्या काही प्रश्नांसाठी माझ्या कुवती नुसार माहिती देते.
यात जाणकारानी भर घालावी. Happy

१) बी.एससी, एम.एससी, एम.टेक ची प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रम
बारावी सायन्स नंतर बॅचलर ऑफ सायन्स, बी.एससी.चा प्रवेश हे सगळ्याना माहिती आहेच. आपल्याकडे इन्जिनीअरिंग आणि मेडिकल हेच नेहमी महत्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे बी.एससी म्हणजे ज्याला या दोन ठिकाणी अ‍ॅड्मिशन मिळत नाही त्यांची सोय असे नेहमीच बोलले जाते. पण तुम्ही स्वतः फोकस्ड असाल तर जस्ट गो फॉर इट. Happy

बारावीला साधारण मॅथ्स आणि बायो हे दोन्ही गृप आहेत असे गृहित धरले. बी.एस.स्सी साठी विषय निवडताना तुम्हला ज्या विषयात तिसर्‍या वर्षी स्पेशलायझेशन करायचे आहे तो विषय बी.एस.स्सी च्या पहिल्या वर्षाच्या निवडलेल्या विषयांमध्ये असावा. आणि त्याला पुरक इतर विषय.

त्यामुळे माझे पहील्या वर्षीचे विषय होते, फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स.
यात फिजीक्स जर तिसर्‍या वर्षी घ्यायचे असेल तर पहिल्या वर्षापासुनच मॅथ्स असणे आवश्यक आहे. मॅथ्स शिवाय फिजिक्स शिकणे निरर्थक आहे.

दुसर्‍या वर्षी यातील एक विषय ड्रॉप करायचा असतो. मी स्टॅटिस्टिक्स ड्रॉप केला. पहिल्या वर्षी या विषयांची तशी ओळखच झालेली असते. दुसर्‍या वर्षात आणखी थोडे डिटेल्स शिकवले जातात. त्या त्या विषयातील वेगवेगळ्या शाखांची ओळख होते. फिजीक्स मध्ये असाल तर दुसर्‍या वर्षात ऑप्टिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, सेमीकंडक्टर फिजिक्स् इत्यादी. तिसर्‍या वर्षी अर्थातच फीजीक्स स्पेशल. यात फिजीक्स च्य मुख्य शाखांचाच आधीच्या वर्षापेक्षा जास्त सखोल अभ्यासक्रम असतो.

या तीनही वर्षात त्या त्या विषयांचे प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे तो विषय समजण्यास सोपा जातो.

बी.एस्सी फीजिक्स नंतर एम.एससी साठी प्रवेश परिक्षा असते.यात क्वलिफाय झाल्यांतरच एम.एससी ला प्रवेश घेता येतो. प्रश्न केवळ ऑब्जेक्टिव स्वरुपाचे असतात. तुम्ही देशातल्या कुठल्याही विद्यापिठाची प्रवेश परिक्षा देऊ शकता. त्या त्या विद्यापीठाच्या वकुबा प्रमाणे परिक्षेची पातळी असते. बर्‍याच संशोधन संस्थांमध्ये इन्टेग्रेटेड एम.एससी साठी प्रवेश परिक्षा होते. याबद्दल सविस्तर नंतर येईलच.

मास्टर्स मध्ये पहिल्या वर्षी वेगवेगळे विषय आणि दुसर्‍या वर्षी पुन्हा स्पेशलायझेशन असते. इथे जवळ जवळ सर्व विद्यापीठांमध्ये सेमिस्टर सिस्टीम असते. पहिल्या वर्षात, दोन्ही सेमीस्टर मध्ये वेगवेगळ्या शाखांची ओळख झालेली असतेच. आपल्या आवडीनुसार दुसर्‍या वर्षीसाठी विषय निवडायचा असतो. माझे स्पेशलायझेशन सॉलिड स्टेट फिजीक्स होते. तिसर्‍या आणि चौथ्या सेमिस्टर मध्ये फक्त या विषयावरच भर असतो. चौथ्या सेमिस्टरचा प्रोजेक्ट या विषयाशी संबधीत विद्यापीठ किंवा इंडस्ट्री कुठेही करता येतो. सर्वात शेवटी या प्रोजेक्ट वर थेसिस सबमिशन आणि डिफेन्स असतो. लेखी आणि दिलेल्या विषयाचे प्रेजेंटेशन असे परिक्षेचे स्वरुप असते. इथे लेखी परिक्षात तुम्हला विषय कितपत समजलाय यावर भर दिलेला असतो. शिकलेल्या विषयाचे प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन्स यावर प्रश्न असतात.

मास्टर्स नंतर तुम्ही पी.एच.डी ला प्रवेश घ्यायला पात्र होता.

पी.एच.डी प्रवेश प्रक्रियेबद्दल बघुया.

वर मी इन्टेग्रेटेड एम.एस.सी बद्दल लिहीले आहे. हा अभ्यसक्रम साधारण पाच वर्शांचा असतो.दोन वर्षे मास्टर्स साठी आणि पुढे तीन रीसर्च, ज्यावर पुढे पी .एच.डी मिळु शकते. भारतात मोठमोठ्या नावाजलेल्या संस्थांमध्ये हा कोर्स आहे.

एम.एस.सी झाल्यानंतर बरेच जण एम.टेक ला प्रवेश घेतात. आतापर्यंत आपण या विषयाचा सायन्स या दृष्टीकोणातुन अभ्यास केल आता त्यालाच तंत्रज्ञानाची जोड मिळते. आय.आय.टी मध्ये एम.टेक ला प्रवेश घेण्यासाठी गेट (G.A.T.E, Graduate Aptitude Test in Engineering) क्वालिफाय करावे लागते. यातही सेमीस्टर पद्धत आहे. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट, थेसिस आणि डिफेन्स. एम.टेक केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येतो.

भारतात एम.एससी किंवा एम.टेक नंतर पी.एच.डी ला चांगल्या विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नेट-जेआरएफ (National Eligibility Test (NET) Junior Research Fellowship (JRF)) क्वलिफाय करावे लागते. जेआरएफ असेल तर फेलोशिप मिळते, त्यामुळे आर्थिक बाजुची काळजी नसते. जर जेआरएफ नसेल तर आपला खर्च स्वत:च करावा लागतो. पण सेल्फ पेड पी.एच.डी. सध्या तरी खूप कमी केली आहे असे ऐकले.

भारताबाहेर......
१) यु.एस. - अमेरिकेतील जवळ जवळ सगळ्याच विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी G.R.E (Graduate Record Examinations) general, subject अशा दोन्ही परिक्षा क्वालिफाय कराव्या लागतात. तसेच (T.O.E.F.L.) ही इंग्लिश भाषेकरता क्वालिफाय करावी लागते.
आपला एक रीसर्च साठी योग्य असा बायो डेटा तयार कारावा लागतो. तो तुम्हाला ज्या प्रोफ. कडे काम करायला आवडेल त्याना पाठवायचा किंवा प्रत्येक युनि. च्या अ‍ॅड्मिशन प्रोसेस मध्ये द्यायचा. प्रोफ. ची निवड ही तुम्हच्या विषयाच्या आवडीवर आणि प्रोफ. च्या रिसर्च अ‍ॅक्टिविटीवर करायची. इथे माझ्या अनुभवाप्रमाणे तरी आधी एम.एस. क्रेडिटस पुर्ण करुन मग पी.एच.डी सुरु करता येते. बर्‍याच यु.नि मध्ये टीचींग असिस्टंट शिप मिळते. किंवा कँपस जॉब करुन खर्च भागवता येतो.

२) युरोप- विशेष करुन जर्मनी आणि स्विस मधील अ‍ॅड्मिशन प्रोसेस बद्दल मला खात्रीने सांगता येईल. भारतातून अप्लाय केल्याची प्रोसेस आधी सांगते. प्रत्येक युनि. च्या वेबसाईट्वर त्या युनि. मधील डिपार्ट्मेंट ची माहिती असते. प्रत्येक प्रोफ. च्या रीसर्च बद्दल संक्षिप्त माहिती मिळते. तुम्ही इ मेल पाठवुन आपला सी.व्ही,., लेटर ऑफ मोटीवेशन पाठवू शकता. इथे जी आर ई असेल तर प्लस पोईंट आहेच. पण तरिही पर्सनल ईंटरविव्यु घेतला जातो. मग प्रोफ. च्या गृप बरोबर डिस्कशन वैगेरे. मग प्रोफ. आपल्या गृप मेंबर्स बरोबर चर्चा करुन तुम्हाला निर्णय कळवतात. इथे कॅम्पस किंवा ऑफ कॅम्पस जॉब चा पर्याय नाही. पी .एच.डी साठी बहुतेक चांगल्या युनि. मध्ये स्कॉलरशिप मिळते.

यु.एस. किंवा युरोप मधील युनि. मध्ये प्रवेश मिळाल्याचे पत्र असेल तर विजा प्रक्रिया सोपी असते.

इथल्या कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसाठी एजंट्स नसतात. हे सगळे स्वतः माहिती काढुनच करायचे असते. किंवा विशेष लोन काढण्याची गरज सहसा पडत नाही. सुरुवातीला खर्च करण्यासाठी डिपार्ट्मेंट मधुन तुमचा पहिल्या महिण्याचा पगार आगाऊ दिला जातो इथे पोहोचल्यावर.

गाइड/सुपर वाईजर निवडने हे तुमचे तुम्हीच पहायचे असते. तुमचे मास्टर्स चे गाईड या बाबतीत नक्की मदत करु शकतील, पण खात्री नाही. मी आणि माझ्या नवर्‍याने हे काम स्वतः च केले होते. मी इथे आधी वर्क कॉन्ट्रॅक्ट वर आले आणि नंतर पी.एच.डी सुरु केली.

पुर्वी काही जर्मन विद्यापीठांमध्ये पी.एच.डी थेसिस जर्मन भाषेतुन लिहावा लागे. आता मात्र सगळी कडे इंग्लिश मधुन लिहीता येतो. त्यामुळे आम्हा दोघानाही जर्मन शिकणे अनिवार्य नव्हते. पण गृप मेम्बर्स बरोबर मिक्स अप होण्यासाठी गरजेचे आहेच. इथे प्रत्येक यु.नि साठी बीगीनर लेवल पासुन क्लासेस आहेत जे शक्यतो संध्याकाळी असतात.

माझ्या बरोबर जे एम.टेक साठी होते त्यातील बरेच जण आज पी.एच.डी करुन संशोधनात कार्यरत आहेत. किंवा इन्डस्ट्री मध्ये R and D मध्ये आहेत.

कसल्या ब्राइट, हुशार मुली आहेत संयुक्तामधे!!

चारुलता, चांगली माहिती दिलीत.

>>>>इथे माझ्या अनुभवाप्रमाणे तरी आधी एम.एस. क्रेडिटस पुर्ण करुन मग पी.एच.डी सुरु करता येते. बर्‍याच यु.नि मध्ये टीचींग असिस्टंट शिप मिळते. किंवा कँपस जॉब करुन खर्च भागवता येतो.

तसंच चांगल्या रेकमेंडेशन्स, उत्तम जीआरइ स्कोअर यांमुळे ट्यूशन वेवर मिळू शकतं. एका क्रेडीतचे अमेरिकेत (इनस्टेट) $३००-४००च्या वर भरावे लागतात. असे ३६ क्रेडिट्स करायचे तर मिळालेली ट्यूशन्फी न भरण्याची सूट अत्यंत उपयोगी ठरते.

बाय द वे, चारुलता, तुमच्या वरच्या पोस्टीत TOFEL चं TOEFL करणार का? (Test Of English as a Foreign Language आणि GRE Graduate Record Examination)

थॅक्स, मृ. बदल केला आहे. लिहीण्याच्या ओघात बर्‍याच टायपो झाल्या आहेत.
नविन माहिती बद्दल आभार. Happy

खूप खूप धन्यवाद चारूलता. तू हे इतके बैजवार लिहीले नसते तर मला कळले नसते. आभारी आहे. Happy
कोणत्याही टीनेज मुलांना आणि त्यांच्या पालकांना उपयोगी पडेल.

अशी माहिती मायबोलीवरच्या सगळ्याच पी एच डी झालेल्या आणि होऊ घातलेल्या लोकांकडून वाचायला प्रचंड आवडेल..

आश्चिग, चिनूक्स.. ह्यांना पण लिहायला लावा....

प्रत्येक डॉकचा वेगळा बाफ केल्यास जास्त चांगले होईल.. एकाच बाफ वर नंतर शोधाशोध करताना मारामारी होणार हे नक्की...

आणि सगळी माहिती मुख्य बाफ वर लिहून वेगवेगळे मुद्दे योग्य ठिकाणी बोल्ड केल्यास फारच उत्तम... बळच सूचना देतोय पण कदाचित सगळ्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरतील...
(संयुक्ता बाहेरची पहिलीच पोस्ट बहुतेक)

चारुलता.. das ist sehr interessant.. Ich möchte mehr über dieses lesen.

एक्दम मस्त... Happy

पी.एच.डी केमिकल इंजि. आता भारतात परत आलोय... हळुहळु लिहुन अप्डेट करेन....

कुणाला लिहिणं कठीण वाटत असेल आणि मदत हवी असेल तर शब्दांकन करायला माझी तयारी आहे.>>>> प्लिज...

चारुलता, hats off to you.
खूप छान माहिती. मलापण मास्टर्स केल्याचे दिवस आठवले. कधी कधी PHD चा विचार येतो पण बाकी गोष्टीमुळे जमेल की नाहि शंका.

मी तर माझ्या आवडत्या १० त सेव केले आहे.

ग्रेट. मृदुला सारख्या टेक्नीकल प्रोफेशनल्सनी सुद्धा लिहावे (तो ही रिसर्चचाच भाग आहे).

चारुलताने लिहिल्याप्रमाणे भौतिकशास्त्रही कठीण नसते. ती भिती मनातुन काढणे आवश्यक आहे. पालकांनी पण मुली-मुलांना ह्या 'वेगळ्या' वाटा निवडण्यापासुन परावृत्त करायला नको (जमल्यास प्रोत्साहनच द्यायला हवे).

चारुलताने सांगीतला आहे तो BSc चा प्रकार Honors चा. नागपुर मधे तिन्ही वर्षी तिन्ही विषय असतात उदा. (Phy/Maths/Electronics) थोडे स्टॅटिस्टीक्स गणीतातच मिसळले जाते.

'एका महिन्यात एक' हा चांगला उपक्रम होईल. मागे महाराष्ट्रातील अवकाशविज्ञानसंबंधीत संस्थांबद्दल एक लेख लिहीला होता. त्याचा दुवा नंतर कधीतरी.

छान माहितीचा धागा चारुलता यांनी सुरु केला आहे. सार्वजनिक झाल्याने वाचनाचे भाग्य लाभले.

माझ्यासाठी तरी ही साडे चार वर्षे एखाद्या personality development course सारखी होती.
----- अत्यंत महत्वाचा विचार आहेत.

Pages