मायबोली ४ चित्रपटांची माध्यम प्रायोजक

Submitted by Admin-team on 26 October, 2011 - 03:02

मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला ’देऊळ’ हा पहिला चित्रपट ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. अशाच काही दर्जेदार चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व मायबोलीनं ’देऊळ’नंतर स्वीकारलं आहे. दिवाळीच्या या शुभमुहुर्तावर या चित्रपटांच्या माध्यम प्रायोजकत्वाची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे.

paulwaat-350x250.jpg’स्टेट ऒफ द आर्ट फिल्म्स’ या संस्थेची निर्मिती असलेला ’पाऊलवाट’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे, ज्योती चांदेकर, किशोर कदम, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, हृषीकेश जोशी यांच्या अभिनयानं नटलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आदित्य इंगळे यांनी. मायबोलीकर वैभव जोशी यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. ही गाणी नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाशी, चित्रपटाशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञ-कलाकारांशी ओळख मायबोलीवर तुम्हांला येत्या काही दिवसांत करून घेता येईल.

’देऊळ’ आणि ’पाऊलवाट’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या काही चित्रपटांचं चित्रीकरण वेगात सुरू असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

bmda.jpgसुमित्रा भावे- सुनील सुकथनकर यांच्या ’विचित्र चित्र’ची निर्मिती असलेला व त्यांनीच दिग्दर्शित केलेला ’भारत माझा देश आहे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विक्रम गोखले, दीपा लागू, उत्तरा बावकर, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे आणि किशोर कदम यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

samhita_1.jpgसुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनीच दिग्दर्शित केलेला ’संहिता’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष यांच्या भूमिका या चित्रपटात असून शैलेंद्र बर्वे यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. आरती अंकलीकर टिकेकर यांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत.

’मसाला’ हा उमेश व गिरीश कुलकर्णी यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट आहे. प्रख्यात रंगकर्मी संदेश कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॊ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, हृषीकेश जोशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. सुनील सुकथनकर यांनी लिहिलेली गाणी आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटक्षेत्रात दर्जेदार चित्रनिर्मितीनं वेग पकडला आहे. अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत, नवे विषय हाताळले जात आहेत. मायबोली आणि मायबोलीकर या चित्रपटांशी संबंधित तंत्रज्ञांच्या, कलाकारांच्या उत्कृष्ट चित्रनिर्मिती करण्याच्या प्रयत्नांत सहभागी आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. मायबोलीशी संबंधित असलेल्या या चित्रपटांचं तुम्ही जोरदार स्वागत कराल, ही खात्री आहे.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन. 'पाऊलवाट' शी संबधीत आपले लाडके वैभव जोशी आहेत हे वाचून मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटला. खरोखर हे सगळं अभिमानास्पदच आहे. मायबोलीची हि वाटचाल सदा अखंडित राहो हिच सदिच्छा.

चित्रपट इथल्या माहितीवरुनच दर्जेदार वाटताहेत. मायबोली ने वेगवेगळ्या क्षेत्रात अशीच आगेकूच करावी, हि सदिच्छा.

१२ जानेवारी, २०१२पासून पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतो आहे. या महोत्सवात मराठी स्पर्धाविभागात सात मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. या सात चित्रपटांमध्ये 'देऊळ', 'हा भारत माझा' आणि 'जन गण मन' या मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या तीन चित्रपटांचा समावेश आहे.

हे तिन्ही चित्रपट महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.

जन गण मन - १४ जानेवारी, २०१२, सिटीप्राइड कोथरुड (स्क्रीन नं. २), संध्याकाळी ५.३० वाजता
देऊळ - १३ जानेवारी, २०१२, सिटीप्राइड कोथरुड (स्क्रीन नं. २), दुपारी १.४५ वाजता
हा भारत माझा - १५ जानेवारी, २०१२, सिटीप्राइड कोथरुड (स्क्रीन नं. २), संध्याकाळी ५.१५ वाजता

या तीन मुख्य खेळांव्यतिरिक्त हेच चित्रपट अजून एकदा महोत्सवात इतर दिवशी दाखवले जातील.

या सातही चित्रपटांशी संबंधित सर्व तंत्रज्ञ - कलाकारांचं हार्दिक अभिनंदन Happy

आत्ताच काही वेळापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा निकाल जाहीर झाला.

मराठी विभागात मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांना जवळ जवळ सर्व बक्षिसे मिळालेली आहेत.

निकाल खालीलप्रमाणे:
१. सर्वोत्कृष्ट चित्रपट - हा भारत माझा
२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - उमेश विनायक कुलकर्णी - देऊळ
३. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - उत्तरा बावकर - हा भारत माझा
४. सर्वोत्कृष्ट बालकलाकार - चिन्मय संत - जन गण मन
५. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - सुधीर व्यंकट्टी रेड्डी - देऊळ

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

Pages