कॅब्रे-डान्सर फिओना

Submitted by आशयगुणे on 23 October, 2011 - 06:05

सामान्यांची अमेरिका बघायची असेल तर विद्यापीठाबाहेरचे जग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ही अमेरिका सिनेमातील कृत्रिम अमेरिकेपेक्षा खूप वेगळी आणि अर्थात वस्तुस्थिती दर्शवणारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर डॉलर्सचे देईन. अमेरिकन माणूस हा डॉलर्स उडवीत जगत असतो असे आपण सिनेमात बघतो. पण वस्तुस्थिती काय आहे हे इथला सामान्य माणूस दाखवून जातो. ह्याच डॉलरच्या मागे अमेरिकन माणसाला कसे झगडायला लागते व एकदा ते मिळाले की ते टिकवणे ही कसरत तो कसा करतो हेच त्यातून दिसून येते! एकदा हे समजू लागले की मग अमेरिकन अर्थव्यवस्था सामान्यांना कशी लुबाडते हे कळायला लागते. आणि मग दिसू लागते अमेरिकन गरीबी! आणि ह्या गरिबीतून, झगडण्यातून निर्माण होणारे अमेरिकन स्वभाव आणि डॉलर्स कमावण्याची साधने!
अमेरिकेत विद्यार्थी दशेत असताना मी एका 'मॉटेल' मध्ये काम करत होतो. त्या मॉटेल मध्ये मला वरील सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारची माणसं भेटली. त्या अनेक व्यक्तींमध्ये जर सर्वात कुणाचे आयुष्य मनाला छेद देऊन गेले असेल तर ते फिओना चे! मॉटेलच्या मागे एक 'कॅब्रे' होता! फिओना ह्या कॅब्रे मध्ये नृत्य करायची. अजूनही करत असेल कदाचित.
मी मॉटेलमध्ये काम शिकत असताना प्रथम तिला पाहिले. तेव्हा ही मागच्या कॅब्रे मध्ये 'कॅब्रे-डान्सर' आहे हे कळले. त्या दिवशी मी आणि मला काम शिकवणारा माझा मित्र एकमेकांकडे बघून हसल्याचे तेवढे स्मरते! पण फिओना ने हे असे हसणे, चेहऱ्यावर ते कृत्रिम स्मित ठेवून कसे काय पचवले आणि आताही पचवत असेल, हे मला त्यानंतर तिच्याशी अनेकवेळेला झालेल्या बोलण्यामुळे समजले. आणि परिस्थिती ही माणसाला घडवण्यात सर्वस्वी कशी जवाबदार असते हे पटवूनही दिले!
त्यानंतर तिचे दर्शन एखाद्या महिन्याने झाले. तेव्हा मला काम येऊ लागले होते आणि मी मॉटेलमध्ये रात्रपाळी करू लागलो होतो. फिओना बरोबर तिचा 'बॉयफ्रेंड' होता. आपल्या ओठांचा विस्तार जवळ जवळ कानापर्यंत नेत तिने स्मितहास्य (?) केले आणि मला म्हणाली, " एक 'सिंगल बेड' रूम दे. मी इकडे येत असते....तू नवीन दिसतो आहेस." ती हे सांगताना तिचा बॉयफ्रेंड तिच्या केसांशी खेळू लागला आणि तिच्या गळ्याचे चुंबन घेऊ लागला. हे सारे माझ्या डोळ्यापुढे घडत असताना मी 'पाहून-न पाहिल्यासारखे' केले आणि तिने मागितलेली खोली तिला देऊन टाकली. आणि नंतर एक अजागळ वाक्य त्या दोघांकडे फेकले. " उद्या नाश्त्याला भेटूया!" हे माझे वाक्य ऐकून दोघे जोर-जोरात हसू लागले. असे हसण्याचे कारण काही तासांनी मला समजले. पहाटे तिचा बॉयफ्रेंड मला खोलीची चावी द्यायला आला आणि संपूर्ण दंतदर्शन व्हावे असे हास्य करीत तो जातो आहे हे मला सांगितले! आणि झाला प्रकार माझ्या ध्यानात आला. नाश्त्यापर्यंत थांबणे हा उद्देशच नव्हता त्यांचा! आणि ४ च्या सुमारास फिओना आली. " राहायला दिल्याबद्दल धन्यवाद! मला ह्याची 'कंपनी' आवडली. ह्याने मला जास्त त्रास दिला नाही.....मागे ज्याच्याबरोबर आले होते त्याने खूप त्रास दिला मला! गुड बाय .....सी यु नेक्स्ट टाईम", डोळा मारीत फिओना निघून गेली. हे सारं मला सांगायची काय गरज होती, हा विचार करीत सकाळी मी घरी गेलो.
त्यांनतर काही आठवड्यांनी फिओना एका व्यक्तीबरोबर मॉटेलमध्ये आली. रात्र काढायला आलेल्या व्यक्तींना नाश्त्याबद्दल विचारायचे नाही हे आता मी चांगलेच जाणून होतो! ही व्यक्ती मात्र पन्नाशीतली अगदी सहज वाटत होती. " तो तूच होतास काय रे...मगाशी मी फोन केला होता तेव्हा मला reservation ला नाही म्हणणारा!"
तो तगडा माणूस माझ्यासमोर गुरगुरला. झालं असं होतं की ह्याने खोली बुक करण्यासाठी फोन केला होता आणि आमच्या मैनेजरने आम्हाला तसं करायला परवानगी दिली नव्हती. शेवटी फिओनाने मध्यस्थी केली आणि म्हणाली, " हा आपलाच माणूस आहे, एरिक....ह्याने मागच्या वेळेस मला स्वस्तात खोली दिली होती.मला खात्री आहे हा आपल्याला आतासुद्धा मदत करेल." आणि दोन पुरुषांमध्ये स्थापन झालेलं शीतयुद्ध एका सुंदर स्त्रीने थांबवले! नंतर फिओना मला स्वतः येऊन म्हणाली, " आय एम सॉरी....पण एरिक जरा तापट डोक्याचा आहे. त्याला सर्व काही लवकर हवं असतं...आणि जेव्हापासून त्याची नोकरी गेली आहे तेव्हापासून तो जास्तच चिडतो. त्याची नोकरी एका आशियाई माणसाने घेतली म्हणून त्याला तुझा जास्त राग आला असेल!" मी आशियाई आहे हे तिला माहिती असूनसुद्धा ती मला हे सगळं सांगत होती. आणि मागे झाले तसेच ह्या वेळेला देखील झाले. पहाटे एरिक येऊन मला खोलीची चावी देऊन गेला. चेहऱ्यावर हास्य अर्थात नव्हतेच! आणि मग तक्रारीचा सूर लावत फिओना आली. " आय हेट एरिक! सारखा छळत होता मला....अजिबात झोपू दिले नाही रात्रभर! त्रास दिला फार. मी अजिबात येणार नाही त्याच्याबरोबर इकडे.....जरी त्याने मला १००० डॉलर्स दिले तरीसुद्धा! " सकाळचे ६ वाजले होते. मला तिची दया आली आणि मी तिला कपभर कॉफी पिऊन जा असा सल्ला दिला. " नो हनी, मला झोपेची गरज आहे.....मी घरी जाऊन झोपते....आज रात्री परत कामाला यायचे आहेच....झोप असणं गरजेचं आहे!" मागच्या कॅब्रेकडे बोट दाखवत, किंचित तोंड वाकडं करीत फिओना निघून गेली!
आश्चर्य ह्याच गोष्टीचे होते की ही बाई मला सर्वकाही सांगत का होती? तिला मी ह्याच्याआधी फक्त एकदाच भेटलो होतो. पण मॉटेलमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या कारकुनावर एवढा विश्वास? का तिला सतत कुणाला तरी काहीतरी सांगावेसे वाटत असेल? अमेरिकन एकटेपणाचा अंदाज घेत मला दुसरा पर्याय जास्त बरोबर वाटला!
मात्र मी कॉफी विचारलेल्या त्या दिवसानंतर फिओना माझ्याशी अधिक बोलू लागली. येता-जाता गप्पा मारू लागली. तिच्या कॅब्रे मध्ये इतर मुली कश्या आहेत ह्याबाबतीत सांगू लागली. सर्वांना सोडून लोकं हिलाच कसे निवडतात आणि इतर मुली हिच्यावर कश्या जळतात ह्या कथा देखील मी ऐकल्या! शेवटी ही मुलगीच ना! तुमची नोकरी कुठलीही असली तरी देवाने घडवलेल्या ह्या मुलभूत गोष्टी माणसात असतातच! 'thanksgiving ' ला खूप शॉपिंग कर असा ही सल्ला तिने नंतर मला दिला....नंतर नाताळच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या!
नंतर एक असा काही किस्सा झाला की आमच्या बोलण्यात थोड्या दिवसांसाठी खंड पडला! एका फेब्रुवारी महिन्याच्या रात्री फिओना मॉटेलमध्ये राहायला आली. ह्यावेळेला मात्र ती एकटी होती. पण सारखी कुणाचीतरी वाट बघत होती. अस्वस्थ वाटत होती. शेवटी मीच होऊन विचारले, " तू कुणाची तरी वाट बघते आहेस का?" " हो", ती म्हणाली. " त्याने मला सांगितले तुला आज दुप्पट डॉलर्स देईन म्हणून आणि आज तो आलाच नाही. तो जर आलाच नाही तर रूम चे डॉलर्स मला एकटीला भरावे लागतील आणि सारे डॉलर्स माझे स्वतःचे खर्च होतील! मग उद्या मला जास्त काम करावे लागेल!" कुणीतरी तिला डॉलर्स चे आमिष दाखवून फसवले होते. " थोडावेळ थांब ना, तो नक्की येईल", मी उगीचच समजुतीचा सूर लावला! " मला तू ह्या गोष्टीसाठी आवडतोस....तू खरच खूप स्वीट आहेस", ती म्हणाली! आता मी समजूत काढतो म्हणून ती एवढी खुश झाली होती आणि अमेरिकेत 'आय लाईक यु" म्हणायची पद्धत आहे.....नाहीतर एखादी मुलगी एका नुकत्याच अमेरिकेत आलेल्या भारतीय तरुणाला असं म्हणाली असती तर त्याची स्वारी आकाशात पोचली देखील असती!
नंतर त्याच रात्री ३ वाजता तिचा खोलीतून फोन आला. " मी कुणावर विश्वास ठेवणार नाही. मी माझी कमाई आज फुकट घालवली आहे. ह्यापुढे मी अजिबात एकटी येणार नाही राहायला.....मला उद्या सकाळी ५.३० चा ' wake - up call ' दे!" दुप्पट डॉलर्स मिळण्याच्या आशेने आलेल्या फिओनाला तिच्या त्यादिवशीच्या बॉयफ्रेंड ने फसवले होते आणि ती तिची कमाई खोलीचे भाडे देण्यात आता वाया घालवणार होती! मी त्यानंतर माझी मॉटेल मधली ठरलेली कामं केली आणि बरोबर ५.३० ला नाश्ता मांडायला सुरुवात केली! तेवढ्यात एक गोड आवाज माझ्या कानी पडला, " गुड मोर्निंग हनी!" आणि वळून पाहतो तर काय!

फिओना नाश्त्याची चौकशी करायला उभी होती....परंतु तिच्या अंगावर फक्त एक टॉवेल होता! ही बाई अंघोळकरून तशीच मला खाली विचारायला आली होती! मला काय बोलायचे काहीच सुचेना. पण हिचे रडगाणे सुरूच होते! "मी काल रात्री पासून काहीच नाही खाल्लं! त्याची वाट बघत बसले ना! मला डॉलर्सची खूप गरज आहे....म्हणून मी त्याचे ऐकले आणि मला दुप्पट डॉलर्स मिळतील ह्या आशेने इकडे राहायला आले. मी आता कुणावर विश्वास ठेवणार नाही!" साहजिकच अस्वस्थतेच्या स्थितीत ती स्वतः ची वेशभूषा देखील विसरली होती! त्यादिवशी नाश्ता करून ती निघून गेली, परंतु माझ्या मनातून ती एकदम उतरली!
माझ्यासाठी ती आता एक लाज नसलेली बाई होती. इतर मुलांसारखेच माझेसुद्धा विचार सुरु झाले! आमचं असं आहे.....कॅब्रे मध्ये नग्न स्त्रीला आम्ही न लाजता बघू, परंतु तीच स्त्री बाहेर कुठे अशी दिसली की तिला नाव ठेवून मोकळे होतो आम्ही! नंतर फिओना माझ्याशी बोलायला यायची....पण मी एक-दोन शब्दात उत्तरं देऊन संभाषण टाळायचो! आणि अचानक एके दिवशी( रात्री) एक असा प्रसंग घडला की फिओना ने मला तिची सगळी कहाणी सांगितली.....आणि मी देखील ती मन लावून ऐकली!

त्या रात्री लोकांची वर्दळ अगदी कमी होती. मी देखील वेळ मारण्यासाठी फेसबुकचा वापर करीत होतो. आणि वाद्यसंगीत लावून ऐकत बसलो होतो. संतूर हे वाद्य होते! रात्रीच्या त्या प्रहरी शिवकुमार शर्मांचा 'राग मालकंस' मॉटेलमध्ये वेगळाच रंग भरत होता! " किती छान संगीत आहे हे.....मला ऐकायला खूप छान वाटते आहे", बघतो तर समोर फिओना उभी! मी पण संगीत हा विषय निघाल्यामुळे खुललो आणि हे संगीत कुठलं आहे, हे वाद्य कुठलं आहे.....हे माझं ठरलेलं भाषण सुरु केलं! Wink
" खूप छान आहे रे! मी हे कधीच ऐकलं नव्हतं! तुला माहिती आहे? मी माझ्या शाळेत गायचे!" तिने हे असे सांगणे अनपेक्षित होते! पण असं सांगून ती एकदम ५ सेकंद थांबली. मी लगेच संगीत हा विषय सुरु झाल्यामुळे विषयाच्या गाडीची driving seat घेतली! "काय गायचीस तू? कुणाचे संगीत तू ऐकतेस?"
" मी शाळेत एका 'choir ' मध्ये गायचे! आणि मला herbie hannock ला ऐकायला आवडते. पण काय सांगू....ह्या नोकरीमुळे वेळच नाही मिळत!" तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती! " पण मला शाळेबद्दल बोललेलं आवडत नाही! ते माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होते", ती अगदी निर्विकारपणाने म्हणाली. मी आश्चर्याने विचारले. " असं का?" आणि त्यानंतर जवळ जवळ ३० सेकंद स्तब्धता पसरली. बाहेरच्या highway वरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज स्पष्टपणे त्या रात्रीच्या प्रहरी ऐकू येत होता! आणि फिओनाची कळी खुलली आणि ती बोलू लागली.
" यु नो....तुमच्यासारखे माझे आयुष्य नव्हते. माझ्या आई-वडिलांचे एकमेकांशी पटायचे नाही! आई तिच्या बॉयफ्रेंड बरोबर राहायची आणि मी बाबांबरोबर. माझ्या शाळेत माझ्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडील यायचे....केवळ माझेच यायचे नाहीत. त्यांच्या बरोबर बाहेर जेवायला जाता आलं नाही कधी.....आणि मी चांगलं गायले की मला शाबासकी पण कधी मिळायची नाही! I hate my parents for this !"
" माझ्याघरी मी आणि माझे बाबाच राहायचो. आई कधी कधी मला भेटायला यायची, पण जर तिच्या बॉयफ्रेंड ने परवानगी दिली तरच. बाबा माझ्याशी कधीतरीच बोलायचे....नन्तर नंतर त्यांच्या गर्लफ्रेंड्स घरी येऊ लागल्या. मला माझ्याच घरी कुणाशी बोलता यायचं नाही....मी माझ्याच घरी एकटी होते. " फिओना आता बांध फोडून बोलत होती आणि मी शांतपणाने ऐकत होतो. " माझे बाबा एका सिमेंट कारखान्यात कारकून होते आणि ते त्यांचा पगार ह्या बायकांवर उडवायचे. त्या बायकांना हे एवढे डॉलर्स मिळताना मी बघायचे आणि तेव्हा मला वाटले.....ह्या पेश्यात जास्त कमावता येतं. आणि मी कॅब्रे डान्सर होयचे ठरवले. पण तीच तर चूक केली मी! मला वाटलं पुरुष हे मनापासून डॉलर्स देतात.....पण नाही....त्या हरामखोरांना फक्त तुमचा फायदा घ्यायचा असतो.....हे मला आत्ता समजायला लागलंय....पण आता उशीर झाला आहे!

तेवढ्यात मॉटेल मध्ये राहणरी एक बाई मला काही प्रश्न विचारायला म्हणून आली. आणि परत जाता जाता तिने एका विशिष्ट नजरेने फिओनाकडे पहिले. फिओनाने देखील ' अश्या छप्पन नजरा रोज झेलते' अश्या थाटात तिच्याकडे पहिले. आणि परत सगळं संगण सुरु केलं! " माझ्या बाबांमुळे मी ह्या पेश्यात उतरले. त्यांना डॉलर्स उडवताना बघितले होते ना मी! " मी तिचे बोलणे तोडून मध्येच विचारले, " पण एका नृत्याचे तुम्ही २० डॉलर्स घेताच ना? मिळतात की तुम्हाला डॉलर्स!"
" मी पण असाच विचार केलं होता. माझ्या मैत्रिणीने शाळेत सांगितले होते....दिवसाला ५ नृत्य केली की १०० डॉलर्स मिळतात. पण तसं नाही ना! आम्ही आमच्या मालकाला आठवड्याभरात एक विशेष रक्कम देतो. मला ४०० डॉलर्स आठवड्याचे द्यावे लागतात त्याचे stage वापरण्यासाठी. त्यावर जर काही आम्हाला मिळाले तर ते आमचे. आणि त्याच्याखाली कमाई जाऊ लागली....आणि असं दोन वेळेला झालं की आमची हकालपट्टी होते! आमच्यामुळे सर्वात आधी डॉलर्स त्यांना मिळतात....आम्हाला नाही..!" ह्याचा अर्थ त्यांना 'पगार' हा प्रकारच नव्ह्ता! फिओनाला जर आठवड्याला ५०० डॉलर मिळाले, तर त्यातले १०० फक्त तिचे. वरचे ४०० जाणार क्लब ला! " जर क्लब चांगल्या परिसरात असेल तर ते तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्तदेखील घेईल, पण हे असं सगळय क्लब्स मध्ये असतं", ती पुढे सांगू लागली.
"आम्ही सगळ्या क्लब्समध्ये lap dance हवा आहे का असे विचारात फिरतो....कारण त्याचे आम्हाला २० डॉलर्स मिळतात....pole dance केलं तर फक्त १ डॉलर च्या नोटा आमच्यावर उधळल्या जातात. आम्हाला आठवड्याच्या सुरुवातीलाच ४०० डॉलर्स जमवायचे असतात....मग नंतर आम्हाला कमाई स्वतःसाठी करता येते." मला लगेच माझ्या मित्राची आठवण आली. त्याच्याकडे कॅब्रे-डान्सर 'lap dance ' हवा आहे का असे विचारात आली होती. त्याला स्वतःच्या चांगल्या दिसण्यावर जणू खात्रीच पटली होती! पण त्याचे मूळ कारण आत्ता काळात होते....डॉलर्स जमवायचे हे कारण! " पण जर तुमच्या क्लब मध्ये कमी लोकं आली तर? आणि तुम्हाला ४०० डॉलर्स साठवायला जमलाच नाही तर?" मी प्रश्न केला.
" तर आम्ही मॉटेलमध्ये येतो. ती आमची कमाई असते", चेहऱ्यावरची रेषही न हलू देता ती म्हणाली. डॉलर्स कमावण्यासाठी ही धडपड आता माझ्या लक्षात येत होती. क्लब जेवढे डॉलर्स कमावतात आणि डान्सर्स जेवढे कमावतात ह्यात खूप तफावत आहे......अमेरिकन भांडवलशाही पद्धतीचे ( capitalism ) उत्तम उदाहरण आहे हे!
" आणि मग शेवटी तुमच्याकडे काही डॉलर्स उरतात का? महिन्या अखेरीस काही शिल्लक राहते का?" प्रश्नावरून राष्ट्रीयत्व ओळखता आले असते तर मी भारतीय आहे हे तिने लगेच ओळखले असते! Wink

" काहीच उरत नाही रे महिन्याचा अखेर! अर्ध्याहून जास्त डॉलर्स माझे घरभाडे भरण्यात जातात. त्यानंतर वीज बिल आहे, इंटरनेट चे भाडे आणि जेवण- खाण! पण सर्वात जास्त डॉलर्स जातात ते 'make up ' चे समान घेण्यात! आम्ही नाचताना नग्न होतो....आणि त्यामुळे आम्हाला साऱ्या शरीराला सजवावे लागते.....सारखे ताजे-तवाने दिसावे लागते....त्वचेची काळजी घ्यावी लागते...ह्यात बराच खर्च होतो!" ती हे फार सहजतेने सांगत होती. आणि मी त्या रात्री हे सारे व्यवस्थित ऐकले. ती सांगत होती त्यात तत्थ्य देखील होते. शेवटी काय, डॉलर्स खात्यात जमा होणे आणि ते खात्यातून बाहेर जाणे ह्याच चक्रात तिचे आयुष्य कोरलेले होते!
कॅब्रे मध्ये गेल्यावर तिथल्या ह्या मुली समोर बसलेल्या लोकांकडे त्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने एका विशिष्ट नजरेने पाहतात. समोर बसलेल्या पुरुषांना ती नजर फक्त दिसते. त्या नजरेखाली दडलेली परिस्थिती मात्र कुणालाच दिसत नाही. ती परिस्थिती त्या रात्री मला फिओनाने तिच्या शब्दात सांगितली. ह्या साऱ्या अनुभवात तिचे एकटेपण समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. त्यादिवशी सुद्धा ती टॉवेल लावून खाली आली, त्यात तिची हताशा दिसत होती....डॉलर्सची जमवा-जमाव करतानाचे कष्ट होते आणि एकूण तिच्या त्या नोकरीमुळे आलेली थोडी 'धिटाई' सुद्धा होती! फक्त त्या रात्री माझ्यात तिला समजून घेण्याची ताकद नव्हती. तिची ही कथा ऐकल्यावर मात्र हे सारे विसरून माणूस म्हणून तिच्यासाठी एक 'सहानुभूती' निर्माण झाली एवढे खरे!

- आशय गुणे

गुलमोहर: 

लेखन आवडले पण

>>क्लब जेवढे डॉलर्स कमावतात आणि डान्सर्स जेवढे कमावतात ह्यात खूप तफावत आहे......अमेरिकन भांडवलशाही पद्धतीचे ( capitalism ) उत्तम उदाहरण आहे हे!>>

याच्यात अमेरिकन भांडवलशाहीचा काय दोष? क्लब चालवणार्‍या मालकाला जागेचे लिज, इतर स्टाफचा पगार आणि इतर बरेच खर्च असतात. इअरली ऑपरेटिंग एक्सपेन्स अर्धा मिलियन ! आता येवढे भांडवल गुंतवायचे ते फायद्यासाठीच ना! आणि डान्सर्स ना टिप्स मिळतात की! वाईट परिस्थितीतले लोक म्हणजे १२-१४ तास कष्ट करायची तयारी आहे पण वाईट इकॉनॉमीमूळे प्रयत्न करुनही ज्यांना कामच मिळत नाहिये...:(

भारतीय मानसिकतेचा विचार केला तर अशप्रकारच्या धंद्यातून केलेल्या कमाईत वाटा मागणे आपल्याकडे निषिद्ध समजले जाते. अमेरिकेत तसे समजले जात नाही. आपल्याकडे काही लोक असतात अशा लाचार स्त्रीच्या कमाईवर जगणारे, पण त्यांना समाजात प्रतिष्ठा नाही.

लिखाण थेट केल्यामुळं ते भिडलं. प्रांजळपणा जाणवला आणि एक चांगला लेख वाचल्याचं समाधान. अमेरिकेत अशी हलकी कामं करणा-या लोकांविषयी वाचायला आवडेल...... याच दिशेने लिखाण केल्यास अनिल अवचटांच्या अंधाराचे जग या पुस्तकासारखी एखादी निर्मित तुमच्याकडून होईल असं वाटलं..

>>अमेरिकन माणूस हा डॉलर्स उडवीत जगत असतो असे आपण सिनेमात बघतो.
>>अमेरिकन अर्थव्यवस्था सामान्यांना कशी लुबाडते

हे ही मला कळले नाही. अनुभव म्हणून लिहायला ठीक आहे पण त्यातून अनुमान काढताना गफलत होते आहे.

>>परंतु तिच्या अंगावर फक्त एक टॉवेल होता!
हे तुम्हाला नक्की कसे माहीत? Happy

.

डिस्कव्हरीवर या विषयावरची एक डॉक्युमेंटरी पाहीली होती. तुमचे म्हणणे पटते.
एक मुलगी तर सायकोलॉजीची डीग्री असुनही केवळ पैसे मिळवायला म्हणुन अशी डान्सर झालेली दाखवली. पोट माणसाला काय करायला लावेल काही सांगता येत नाही.

लेखनशैली चांगली पण यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थाचा संबंध कळला नाही... अमेरिकेतील मोटेल्स म्हणजे भारतातील खासगी गेस्ट हाऊसेस... दोनच प्रकाराची गिर्‍हाईकं येतात... ज्यांना चांगल्या हॉटेलमध्ये राहायची ऐपत नसते किंवा रात्रीची मज्जा मारायची असते... सगळीकडे असं घडतं... 'सहानुभूती' वाटण्यापेक्षा तू तिला समजावून दुसरी नोकरी शोधायला मदत केली पाहिजे होती...

@ राजु७६, तुम्ही समजता तसे मोटेल्स असतात पण प्रमाण बरेच कमी...म्हणजे क्वालिटीच्या दृष्टीने.
बाकी मोटेल्सही छान असतात. रात्रीची मज्जा मारायला हाटेलंही काही कमी नाहीत नै का? बरेच मोटेल्स भारतीयांच्या मालकीचे पाहीले आहेत. असो.

<<कॅब्रे मध्ये गेल्यावर तिथल्या ह्या मुली समोर बसलेल्या लोकांकडे त्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने एका विशिष्ट नजरेने पाहतात. समोर बसलेल्या पुरुषांना ती नजर फक्त दिसते. त्या नजरेखाली दडलेली परिस्थिती मात्र कुणालाच दिसत नाही.>> वस्तुस्थिती.
छान लिहितोस आशय..... पण विषयच असा आहे की अंतःकरणात कालवाकालव झाली.. काय काय भोगावे लागेल माणसाला सांगता येत नाही....

आपणा सर्वांना धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया नक्कीच मोलाच्या आहेत....माझ्या पुढील लेखनासाठी! Happy तुमच्या प्रश्नांची उत्तरे खाली देतो आहे....हल्ली कामामुळे जास्त वेळ इंटरनेट वर बसता येत नाही! म्हणून उत्तरं द्यायला हा उशीर! Sad

डॉ.कैलास गायकवाड :
हो...हा माझा खरा अनुभव आहे. अमेरिकेत शिकत असताना मी अनेक वल्लींना भेटलो....त्यातले काही आपल्या सर्वांसमोर पेश करायचा प्रयत्न करणार आहे. ह्याच्या पुढे मी अमेरिकेत 'आजी-आजोबा' कसे राहतात ह्यावर लिहिणार आहे! Happy
स्वाती२ :
संबंध आहे ....पण indirect आहे....साऱ्या 'system ' मध्ये बदल होण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी Micheal Moore ह्यांची ' capitalism - a love story ' ही 'documentary ' पहा! Happy
अन्कॅनी :
वरील documentary पहा! मला काय म्हणायचे आहे ते आपल्याला लक्षात येईल! Happy
बाळू जोशी.:
धन्यवाद! मी त्यांचा direct नातेवाईक नाही! पण मुंबईत राहत असल्यामुळे ओळख आहे! Happy

खूप छान लिहिलंय! लिखाणातला प्रामाणिकपणा आवडला. लिहित रहा. तुम्ही लिहिलेली इतर व्यक्तीचित्रदेखील आवडली.

डॉक्युमेंटरी बघितलेय. पण या कथेत फिओनाने झटपट पैसे कमवायचे म्हणून एक लाईफस्टाईल स्वतःहून स्विकारली आहे. मला तरी भांडवलशाही तिचा कुठे गैरेफायदा घेताना दिसली नाही. क्लब ओनरही स्मॉल बिझनेस चालवणारे तुमच्या आमच्या सारखे लोकं असतात. त्यांनाही बॅन्केच्या लोनचा हप्ता असतो. तेव्हा उगाच ओढून ताणून अमेरिकन भांडवलशाहीला यात आणु नका. उद्या तुमचा स्वत:चा नाईटक्लब असता तर तुम्हीही आधी पैशाचा भरणा करायला सांगितला असता.

कॅब्रे हा शब्द अमेरिकेत असाच वापरतात? स्वातीताई म्हणते तसं नाईटक्लब किंवा मग पुढे जाऊन स्ट्रिपक्लब म्हणत असावेत असं वाटतं.
कॅब्रे हा शब्द आपल्याकडे (हिंदी सिनेमांमुळे) फारच बदनाम अर्थाने वापरला जातो. त्याअर्थाने अमेरिकेत हा शब्द वापरला जात नाही. कॅबेरे ही मुळात युरोपमधलं प्रकरण आहे. साधारण १९२०-१९३० या दोन दशकांमधे युरोपमधे कॅबेरेची लाट होती. नाइटक्लब्जमधे थोडंफार मनोरंजन, नाटक, नृत्ये असं सगळं मिळून जे असे त्यांना कॅबेरे म्हणलं जाई. नृत्यात, नाटकात थोडाफार चावट भाग असला तरी आणि त्यात नाचणार्‍या मुलींना वाईट, धंदेवाली आणि त्या कामाला कमी लायकीचं काम असलं काहीही समजलं जात नसे.
याच प्रकाराला अमेरिकन समांतर म्हणजे वॉडव्हिले, म्युझिक हॉल इत्यादी.

स्ट्रिपक्लब*. कॅब्रे नाही. शिवाय कथानायिका ही एस्कॉर्ट म्हणून पण काम करते. किती तरी मुली परिस्थितीने लुबाडल्यामुळे नाही तर जास्त पैसे मिळत असल्यामुळे ह्या धंद्यात येतात. शिवाय सगळ्याच तशा मुली कॉलगर्ल नसतात हे ही आलेच. शिवाय टॅक्स नाही, त्यामुळे काळा पैसा मार्केट वगैरे वगैरे, परिस्थितीचा संबंध फार कमी. एझी मनी इज द गेम.

*भारतीय वाचकांसाठी - स्ट्रिपक्लब म्हणजे जिथे मुली कपडे काढून आपल्या अंगावर डान्स करतात. काही न्युड तर काही टॉपलेस हे प्रकार. अमेरिकेत अशा क्लब्सना जंटलमन क्लब हे नाव आहे.

स्वाती२ - सहमत. हा अमेरिकन कल्चरचा अविभाज्य भाग आहे. सर्व लिगल! प्रॉपर बिझनेस.

आणि म्हणूनच ...

गुणे माहिती पूर्ण द्या की राव. कॅब्रे प्रकार आता भारताही आहे की नाही हे माहित नाही. (अर्थात जाणकार सांगू शकतीलच म्हणा). कॅब्रे आणि काम एस्कॉर्टचे असे वाचून एकदम थोडे बाळबोध वाटले. डायरेक्ट लिहा म्हणजे माहिती असणार्‍यांना अडखळायला होणार नाही.

>>ह्याच्या पुढे मी अमेरिकेत 'आजी-आजोबा' कसे राहतात ह्यावर लिहिणार आहे

इथे एक झक्की म्हणून आजोबा आहेत त्यांना विचारुन लिहा. Happy

A strip club is an adult entertainment venue in which striptease or other erotic or exotic dance is regularly performed. Strip clubs typically adopt a nightclub or bar style, but can also adopt a theatre or cabaret-style - विकीपेडिया
.
आमच्या मोटेल च्या मागे जो होता तोः 'cabre style ' होता! आणि तिथे वरील सांगितल्याप्रमाणे प्रकार चालायचे! असो, मी माहिती पूर्ण अजून कसली द्यायला हवी आहे? कृपया स्पष्ट करा.....मी ती अवश्य देईन!
आणि केदार, इतर मुली काहीही करू देत.....माझा अनुभव हा 'फिओना' ह्या मुलीशी संबंधित आहे! ती कुठल्या परिस्थितीत ह्या धंद्यात आली हे माझे सांगणे आहे! उगीच विषयांतर करू नका!

कॅबेरे (Cabaret) स्टाइल म्हणजे काय? हिंदी सिनेमात दाखवायचे तसं का? कारण तसा कॅबेरे नसतो जगात. ते फक्त आपल्या 'दि ग्रेट बॉलिवूड'चे ब्रेन चाइल्ड आहे. जो असायचा त्याप्रकारच्या कॅबेरे मधे नाचणार्‍या मुलींना कसल्याही नजरा बिजरा सहन करायची गरज नव्हती.
तसंही अमेरिकेत कुणाला स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नजरा बिजरा सहन कराव्या लागणं हेच मुळात अचाट आणि अतर्क्य आहे.

>>> माझा अनुभव हा 'फिओना' ह्या मुलीशी संबंधित आहे! ती कुठल्या परिस्थितीत ह्या धंद्यात आली हे माझे सांगणे आहे! <<<
मग तेवढ्यापुरताच ठेवा ना. कशाला सगळ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि इतर अनेक गोष्टींवर घसरताय?

थोडंसं विषयांतर होतंय, पण लिहितो.

>>> . कॅब्रे प्रकार आता भारताही आहे की नाही हे माहित नाही.

पूर्वी (म्हणजे १९८० पूर्वी) पुण्यात बाजीराव रस्त्यावरील जवाहर हॉटेल (आता ह्या जागेवर सणस प्लाझा उभा आहे व समोर आचार्य अत्रे सभागृह आहे) व शंकरशेट रस्त्यावरील सेव्हन लव्हज् हॉटेल (हे हॉटेल अजूनही उभे आहे) कॅब्रे डान्स चालायचे म्हणे. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील एक आरोपी मुनव्वर शाह याने, "येस, आय अ‍ॅम गिल्टी" या नावाने आत्मचरित्र लिहिले होते. त्यात त्याने, तो जवाहर हॉटेलमध्ये काम करत असताना त्याचे तिथल्या एका कॅब्रे डान्सरशी संबंध आले होते, असे लिहिले आहे.

खरेखोटे खुदा जाने!

छान लिहीलेय.

कधीकधी वाटतं असे व्यवसाय स्विकारलेल्यांना त्याबद्दल विशेष काही वाटत नसावं. पण त्याचबरोबर आपल्या रक्ताचं कुणी त्या जागी असतं तर काय... असा प्रश्न अस्वस्थ करतो.

मला अमेरिकेतली माहीती नाही. पण जगण्याची स्पर्धा जिथे तीव्र आहे तिथे फारसे ऑप्शन राहत नाहीत असं वाटतं. आणि अमेरिका कितीही फ्री सोसायटी असली तरी कॅब्रे( कि कॅब्रेट), स्ट्रिप्टीज सारख्या व्यवसायांना तिथे प्रतिष्ठा असेल असं वाटत नाही. बाकि ओबामा जाने

Pages