मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३

---------------------------------------------------------------
तर मंडळी या बसा घटकाभर! बघा आमच्या शिदोरीच्या गठुळ्यात काय काय जमलंय ते.
पण गठुळं खोलायच्या आधीच एक 'वैधानिक इशारा' आणि 'आमचे हात वर' (डिस्क्लेमर)
जगभरातले चित्रपट हे वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेले, वेगवेगळ्या मानसिकतेबद्दल सांगणारे असतात. आपल्या अतिप्रचंड भयंकर महान आणि पुरातन संस्कृतीमधे बसणारे असतीलच असं नाही (म्हणजे काय कुणास ठाऊक). आपल्यापेक्षा वेगळं म्हणजे मानसिक आजारी नव्हे हे शिकण्यासाठी या शिदोरीचा वापर केल्यास आनंद होईल. न केल्यास केवळ तुमचाच तोटा. आवडलेले चित्रपट आवडल्याबद्दल आणि नावडलेले नावडल्याबद्दल कुठल्याही कोर्टात आम्ही उभे तर रहाणारच नाही पण त्या अनुषंगाने तुमची महान संस्कृती, आमची आजारी मानसिकता अश्या सगळ्या चर्चेला आत्तापासूनच उत्तमरित्या फाट्यावर मारण्यात आलेलं आहे.

तर असो!!
गठुळं खोलेंगे.... गठुळं खोल!!
गठुळ्यात बटवे, पुरचुंड्या, पुड्या. हा बटवा सगळ्यात रत्नजडीत. आधी बघू त्यात काय आहे..
ये देखो... ये तो 'मामि' मधली बेस्ट फिल्म छे!
'माय लिटल प्रिन्सेस' - सतत गायबच असलेली हॅना परत येते आणि अचानक फोटोग्राफर बनते. आपल्या १० वर्षाच्या मुलीला व्हियोलेताला आपल्या फोटोग्राफीसाठी मॉडेल बनवते. पापभीरू, साध्या असलेल्या पणजीकडे राहणार्‍या व्हियोलेताला आपल्या आईचं रंगीबेरंगी जग, त्यातली मजा, आपण आईसाठी महत्वाच्या आहोत हे वाटणं हे सगळं खेचून घेतं. एरॉटिक आर्टच्या जगात या फोटोंमुळे हॅनाचं नाव होतं. व्हियोलेता पण सुरूवातीला सगळा ड्रेसिंग अप, ग्लॅमर आणि स्टारडम एंजॉय करत असते. दोघींच्यातलं आई-मुलगी + फोटोग्राफर-मॉडेल हे नातं इव्हॉल्व्ह होत असतं. पण हळूहळो व्हियोलेताला हे सगळं नको व्हायला लागतं. अशातच हॅनाला चाइल्ड अ‍ॅब्युज बद्दल दोषी धरलं जातं इत्यादी. हॅना चुकतेय हे आपल्याला कळत असलं तरी ते हॅनाला समजतच नसतं. ती केवळ कलेच्या पॅशनपायी सगळं करत असते. मुलीवर तिचं प्रेम नाही आणि मुलीला छळायचं हा तिचा हेतू नक्की नसतो पण घसरण कधी सुरू झाली हे तिला कळलेलं नसतं. आपल्याला हॅनाचा राग येतो पण कीव पण येत रहाते अश्या विचित्र तणावांच्यातून हा चित्रपट जातो. एक क्षणभरही आपल्याला पडद्यापासून नजर, कान, मेंदू हलवू न देणारा असा अप्रतिम फ्रेंच चित्रपट. दिग्दर्शिका आहे इव्हा आयनेस्को. इव्हाने ११ वर्षाच्या वयात रोमन पोलान्स्कीच्या 'द टेनन्ट' मधून बाल-अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. दिग्दर्शक म्हणून ही तिची पहिली फिचर फिल्म. पण चित्रपटावरची दिग्दर्शक म्हणून पकड आणि सफाई बघून ही पहिली फिल्म आहे असं अजिबातच वाटत नाही.
व्हियोलेता झालेल्या छोट्या अभिनेत्रीने जे काही केलेय ते थक्क करणारे आहे. ते तिच्याकडून करून घेणे हे दिग्दर्शिकेने कसे जमवले असेल याची मला प्रचंड उत्सुकता आहे. या छोट्या अभिनेत्रीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत या रोलसाठी. 'मामि' मधे सुद्धा.
याच चित्रपटाच्या स्क्रिनिंगमधे २-३ वेळेला प्रोजेक्शनिस्टने प्रचंड माती खाल्ली. पुढचं रीळच जोडलं नाही (प्लॅटरवर असून हे कसं काय जमवलं हे मला माहित नाही पण पडदा पांढरा स्वच्छ दिसू लागला काही काळ. नुसताच प्रोजेक्टरचा आवाज.. ), एकदा खाली डोकं वर पाय रीळ जोडलं होतं असं काय काय आणि हे सगळं असूनही एकालाही निघून जावेसे वाटले नाही इतकं या चित्रपटाने सगळ्यांना पकडून ठेवलं होतं.

हा पुढचा घास 'हजारो विदूषकांचा'!
अ थाउजंड फूल्स ( मिल क्रेटिनोज) - १५ वेगवेगळ्या कथांना एकत्र घेऊन बांधलेला हा स्पेनमधला स्पॅनिश गुच्छ. सगळ्या कथांना विनोदाचा डूब दिलेली असली तरी त्यांचा गाभा धो धो हसवणार्‍या विनोदाचा नाही. विनोदाचा वापर करून दु:ख, वेदना, म्हातारपण, मृत्यू, प्रेम या गोष्टींवर चुरचुरीत भाष्य आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेकदा येतो तो माणसाचा माणूस म्हणूनच करू शकेल असा मूर्खपणा.
पंधरा कथांमधल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे जणू काही मनोरंजन करायला ठेवलेले विदूषक (फूल्स) म्हणून तेच चित्रपटाचं नाव. स्पॅनिश दिग्दर्शक व्हेन्चुरा पोन्स याने अतिशय ब्रिलियंटली केलेली हि फिल्म. नक्की बघावी अशी.

या पुढे आता. इथे अजून विचित्र काहीतरी दिसतंय..
मायकेल - कान, मॉस्को, टॉरान्टो अश्या महत्वाच्या फेस्टिव्हल्समधून यावर्षी नावाजला गेलेला हा मार्कस श्लाइन्झर या दिग्दर्शकाचा ऑस्ट्रियन चित्रपट. मायकेल नावाचा एक दिसायला साधासरळ, चार लोकांसारखं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच आयुष्य असलेला, एकटा रहाणारा, थोडासा बावळटच वाटावा असा पिडोफाइल. एरवी त्याच्याकडे बघून त्याच्या या बाजूची कुणाला शंकाही येणार नाही. त्याने व्होल्फगांग नावाच्या एका १० वर्षाच्या मुलाला आपल्या घाणेरड्या शौकासाठी आपल्या घराच्या बेसमेंटमधे कोंडून ठेवलेय. या मुलाचा बाहेरच्या जगाशी संपर्क येऊ देत नाही. त्याला खाऊ, खेळणी तिथेच आणून देतो. दिवसभर मायकेल ऑफिसला असेल, अचानक बाहेरगावी गेला असेल तर अन्नाचा साठा बेसमेंटमधे करून ठेवलेला आहे. याच मुलाच्याबरोबर मायकेल ख्रिसमस पण साजरा करतो. घरी ट्री आणून इत्यादी. तेवढ्यापुरता त्याला वरती घरात येऊ देतो. पण बाकी बेसमेंटमधेच. बेसमेंटचं दार बाहेरून कुलूपबंद त्यामुळे घरी कोणी आलं तरी कोणाला सुतराम कल्पना येणार नाही की इथे कोणी आहे. मुलगा त्याच्या पातळीवर प्रोटेस्ट करतोच पण आईवडिलांनी शिस्त लावायला तुला माझ्याकडे पाठवलाय त्यामुळे मी म्हणेन ते तुला ऐकलं पाहिजे ही थाप त्या मुलाला असहाय्य करते. पुढे काय होते? त्याची सुटका होते का? मायकेलला शिक्षा मिळते का हे मी इथे सांगत नाही. दिग्दर्शकीय हाताळणी तशी प्लेन सिंपल नॅरेटिव्हची आहे. अधूनमधून बारीकश्या विनोदांचा वापरही आहे. आपण त्यावर हसतो आणि दुसर्‍याच क्षणाला कशावर हसलो आपण असं होतं. या सरळसोट नॅरेटिव्हमुळेच हा चित्रपट जास्त अंगावर येतो.

आता हे रत्नं बघा.
इव्हन द रेन - इश्यार बोलेन (Iciar Bollain) या दिग्दर्शिकेचा स्पेन-फ्रान्स-मेक्सिको अश्या तिन्ही देशांची एकत्रित निर्मिती असलेला स्पॅनिश भाषेतील हा चित्रपट. चित्रपटात चित्रपट अशी रचना तुम्हाला पूर्णवेळ खेचून धरते. कोलंबसाने अमेरिका शोधून पादाक्रांत केली या ऐतिहासिक कथेला धरून कोलंबसाचे जुलमीपण आणि स्थानिक लोकांची वाताहात यासंदर्भात चित्रपट करण्यासाठी सबॅस्टियन हा दिग्दर्शक, निर्माता कोस्टा आणि इतर क्रू बरोबर बोलिव्हिया मधे येतो. बोलिव्हियाच लोकेशन म्हणून निवडण्याचं कारण केवळ 'स्वस्त पडेल' हेच असतं. बोलिव्हियामधे २००० साली पाण्यावरून जो उठाव झाला त्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. कोलंबसाने सोनं मिळवण्यासाठी स्थानिक माणसे, स्थानिक निसर्ग यांच्यावर जुलमी सत्ता प्रस्थापित करणे आणि अमेरिकन/ युरोपियन कंपन्यांनी स्थानिकांच्या हक्काच्या पाण्यापासून त्यांना वंचित करणे अश्या दोन गोष्टी समांतरपणे घडताना आपल्याला दिसतात. ज्यातली एक ५०० वर्षांपूर्वी घडून गेलेली आहे आणि चित्रिकरणाच्या निमित्ताने आपल्याला दिसतेय तर एक आपल्यासमोर खरोखर घडत रहाते. म्हणलं तर भडक आणि म्हणलं तर तश्या नाजूक अश्या विषयावर अश्या प्रकारे इतक्या सुंदररित्या फिल्म करणं आणि कुठेही प्रचारकी कंटाळवाणी न होऊ देता आपला मुद्दा प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे महाकठीण आव्हान या दिग्दर्शिकेने लीलया पेललेले आहे. मी अजून ४-५ वेळा तरी ही फिल्म बघायच्या विचारात आहे. तुम्ही पण बघा.

आता हा तुटका आरसा घ्या. हा कधी खोटं बोलत नाही.
मिरर नेव्हर लाइज - कमला अंडिनी या इंडोनेशियन दिग्दर्शिकेची हि पहिली फिचर फिल्म. आजवर मी तरी एकही इंडोनेशियन चित्रपट पाह्यलेला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. इंडोनेशियन बेटांच्या समूहातल्या एका छोट्या बेटावर समुद्राला लागून तरंगणार्‍या घरांच्या वस्तीत राहणार्‍या पाकिस या १२ वर्षाच्या मुलीची ही कथा. ही सगळी वस्ती मासेमारी करणारे किंवा समुद्रातून विविध वस्तू आणून विकणार्‍यांची वस्ती आहे. पाकिसचे वडील मासेमारी करायला गेलेले असताना दुर्घटनेत गेलेत पण पाकीसचा विश्वास आहे ते हरवलेत. पाकिसच्या आईलाही खरी गोष्ट माहितीये पण ती पाकिसच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये. त्यामुळेच ती बाजो जमातीच्या प्रथेप्रमाणे चेहर्‍यावर सफेद रंगाचा लेप लावून आहे. पाकिसकडे तिच्या वडिलांनी दिलेला एक आरसा आहे ज्यावर मंत्र टाकला असता ते असतील तर तिला दिसतील असा तिचा (तिच्या जमातीचा) विश्वास आहे. पाकिस आणि तिचा बेस्ट फ्रेंड लुमो यांचं शाळा, समुद्रात भटकणे, आईला मदत करणे, आईची बोलणी खाणे असं आयुष्य चालू असतंच दरम्यान जाकार्ताहून एक डॉल्फिन्सचा अभ्यास करणारा तुडो त्यांच्या घरात भाड्याने रहायला येतो. मग तुडो आणि मुलांची मैत्री, पाकिसला तुडोवर वाटणारा अधिकार, तुडो आणि पाकिसच्या आईमधे उमलू पहाणारे नाते यातून प्रवास करत शेवटी लुमोच्या वडिलांचा समुद्रात अपघाती मृत्यू, त्याचदरम्यान पाकिसच्या वडिलांच्या बोटीचे मिळालेले तुकडे आणि पाकिसला वडिलांचा मृत्यू मान्य करायला लागणं या ठिकाणी हा चित्रपट संपतो. अतिशय सुंदर असं निसर्गाचं दर्शन, वेगळ्याच प्रकारच्या जमातीच्या आयुष्याचं चित्रण ज्यात कुठेही माहिती सांगण्याचा सूर नाही, या दोन्ही पार्श्वभूमीवरची साधेपणाने सांगितलेली एक सुंदर गोष्ट अश्यामुळे हा चित्रपट आरश्यावर पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखा चकचकत रहातो आणि आवडतो.

आता हे चित्र मिश्र संस्कृतींमधलं
लकी - हा पंजाबी चित्रपट नाही. झुलू, इंग्लिश आणि हिंदी अश्या तिन्ही भाषेत असलेला हा दक्षिण आफ्रिकेतला चित्रपट आहे. याचा दिग्दर्शक अवि लुथरा हा भारतीय वंशाचा ब्रिटीश माणूस आहे.
जगात एकटा उरलेला १० वर्षाचा झुलू मुलगा लकी आणि अल्बम्समधल्या फोटोंसकट एकटी उरलेली एक भारतीय आजीबाई पद्मा यांच्यातल्या शब्दांच्या पलिकडल्या नात्याची ही कहाणी. शब्दांच्या पलिकडले नाते अशासाठी की लकीला झुलू भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही आणि पद्माआजींना झुलू येत नाही. लकीने शाळेत गेलं पाहिजे अशी त्याच्या आईची शेवटची इच्छा आहे. लकीचा मामा एकदम ऐय्याश आणि बेकार माणूस आहे. लकीला शाळेत जायचंय. 'काळा' म्हणून लकीला कशालाही हात लावू न देणारी पद्माआजी त्याने शाळेत जावं यासाठी आपले आयुष्यभर जमवलेले दागदागिने विकून पैसा उभा करण्यापर्यंत पोचते हा प्रवास बघण्यासारखा आहे. या प्रवासात आपण जास्त गुंतून रहातो ते लकी आणि पद्मा साकार करणार्‍यांच्या अभिनयामुळे. पद्माची व्यक्तिरेखा करणार्‍या बी. जयश्री या कन्नड नाट्यकर्मी आणि आता राज्यसभा सदस्यही आहेत. त्यांची ३-४ नाटके मी पुण्यात काही महोत्सवांच्यात पाह्यली होती. आणि भाषा कुठेही समजत नसूनही मी भारले गेले होते. तेव्हापासून त्यांची मी पंखी आहे. त्यांना या चित्रपटात पडद्यावर बघणं हा एक अप्रतिम अनुभव होता.

आता ही रत्नजडीत बटव्यातली शेवटची वस्तू
टॉमबॉय - फ्रेंच सिनेमा. सेलिन सायमा ही स्त्री दिग्दर्शिका. १० वर्षाची एक मुलगी हा कथेचा केंद्रबिंदू. अतिशय सरळपणाने कथा जाते. १० वर्षाच्या लॉरे या मुलीला आपण मुलगी आहोत हे आवडत नसतं तिला मुलगाच व्हायचं असतं. सगळं कुटुंब नवीन घरात रहायला जातं आणि नवीन ठिकाणी मित्रमैत्रिणी जोडले जाताना लॉरे स्वतःची ओळख मिकेल नावाचा मुलगा अशी करून देते. बारीक केस, मुलांसारखे कपडे आणि अजून आकारात न आलेलं शरीर यामुळे ती थाप पचते. मग थाप टिकवायला आपल्या बालबुद्धीने लॉरे काय काय करते आणि अखेरीस खरं उघडकीला आल्यावर काय होतं अशी सगळी ही फिल्म. कुठेही गिमिकल हाताळणी न करता सहजपणे सांगितलेलं नॅरेटिव्ह आणि कुणावरच, कशावरच दोषारोपण न करता पुढे नेलेली कथा यामुळे ही फिल्म अक्षरशः अडोरेबल बनते. इतका अवघड विषय इतक्या सहजपणे आणि संवेदनशीलपणे हाताळल्यामुळे आपल्या मनात घर करून रहातो.

असा हा रत्नजडीत बटवा. कंटाळा आला नसेल तर गाठोड्यातल्या बाकी पुड्या-पुरचुंड्या पुढच्या भागात सोडूया. नाहीतर इथेच थांबूया. काय म्हणता?
क्रमशः लिहू की समाप्त?

विषय: 
प्रकार: 

मायकेल आणि मिरर नेव्हर लाइज वाचून जाम आवडलेत. बघूया, सिनेमा पहायची संधी मिळते का? Happy

क्रमश: लिहिणे, पण भरभर लिहिणे.

समाप्त काय्ये??? लिही अजून.

माझा एक मित्र ईव्हन द रेनचे कोडकौतुक इतके गात बसला की शेवटी त्याला मला डीव्हीडी तरी आणून दे असं सांगितलं. Sad

हल्ली सिनेमे प्रोजेक्शनवर चालवायचे दिवस गेलेत त्यामुळे मल्टीप्लेक्समधे "रीळावरचे सिनेमा" म्हणजे विसाव्या शतकातली गोष्ट असंच मानतात.

बी. जयश्रीच्या अभिनयाबद्दल वादच नाही. त्यामुळे तो चित्रपट पहायची फार इच्छा आहे.

हल्ली सिनेमे प्रोजेक्शनवर चालवायचे दिवस गेलेत त्यामुळे मल्टीप्लेक्समधे "रीळावरचे सिनेमा" म्हणजे विसाव्या शतकातली गोष्ट असंच मानतात. <<<
अजूनही प्रोजेक्टर्सच असतात की. मल्टिप्लेक्सेसमधे सुद्धा फिल्मच(प्रिंटच) असते. अजूनही डिजिटली प्रोजेक्ट करणे, हार्ड डिस्क/ सॅटेलाइट प्रोजेक्टर्स हे अजूनही तेवढे बोकाळलेले नाहीये. केवळ पूर्वी जे १-२, ३-४ असं अल्टरनेट प्रकरण असायचं ज्यात रिळं काढा घाला करायला लागायची. ते न करता सगळी रिळं आधीच जोडून एका प्लॅटरवर सगळी प्रिंट घेतलेली असते. त्यामुळेच रीळ न जोडता कसं काय सोडून दिलेलं होतं ते कळलं नाही मला.

इतक्या थोडक्यात चित्रपटाची कथा व त्यातलीं सौंदर्यस्थळं नेमकीं व रसिकतेने सांगणं याबद्दल मानलं तुम्हाला. 'अ थाउजंड फूल्स ( मिल क्रेटिनोज)' बद्दलही खास कुतूहल वाटलं ; १५ कथा एकत्र घेऊन सिनेमा !!! सत्यजित यानी फक्त दोन कथा घेऊन 'कापुरुष, महापुरुष ' काढला पण रसायन नव्हतं जमवतां आलं त्यानाही !!
धन्यवाद.

मस्त लिहिते आहेस. या निमित्तानं कितीतरी चित्रपटांची ओळख होते आहे. यातले बरेचसे बघायला मिळवता येतील, नेटफ्लिक्सवर शोधायला हवं.

लिहीत रहा.

बाजो नावाची जमात आहे हे पाहून धन्य झालो... ! बाकी लेखाची कल्पना छान आणि लेखही. पन हे चित्रपट पामराना कुठे मिळणार? टॉरेन्टवर सविनय कायदेभंगाची चळवळ करायला लागणार...:(

BAJO असं स्पेलिंग आहे. Baujo असंही स्पेलिंग मिळालंय. उच्चार वेगळा असू शकतो. मला तरी माहित नाही.

एखाददोन वगळता वरचे चित्रपट पहावेसे वाटतायत. मुलं हा केंद्रबिंदू दिसतायत बर्‍याच चित्रपटांत.
आणखी ओळख करुन दे. चांगले असतील ते आवर्जून बघायला आवडतील.

नी, माझ्या माहितीनुसार सिनेमॅक्स "डिजिटल प्रोजेक्टरवर" चालणारे थेटर आहे. Happy आणि जरी नसलं तरी रीळाची चूक् म्हणजे महानच म्हणायला हवं.

मामि च्या रेग्युलेशन्सनुसार ३५ मिमि प्रिंट चालते. आणि बरेच रिळांचे डबे रोजचे रोज वाहून नेताना आम्ही बघत होतो.

क्या बात है. नी चांगलंच भारी भक्कम गठूडं आहे तुझं. माय लिटल प्रिन्सेस मधल्या मुलीनं अवघ्या दहा वर्षाच्या वयात जो अभिनय केला आहे तो खरोखर थक्क करणारा आहे. मायकेल, Thousand fools and Even Rains पाहण्याची उत्स्कूता वाढवलीस. 'मिरर नेव्हर लाईज' हा चित्रपट सुद्धा मस्तच असणार.

सगळेच चित्रपट मस्त आहेत. तरीच एवढ्या रांगा आणि एवढा पेशन्स ठेऊन लोकांनी हे सिनेमे पाहिलेत. अश्या सिनेमांची निर्मिती आपल्याही भाषेत व्हायला हवी. अश्या सिनेमातून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

बाकीच्या पुरचुंड्या तुझ्या स्टाईलमधेच उघड.

Even rains मधे हिस्टॉरीकल अ‍ॅटमॉस्फिअर बघताना सॉल्लीड धम्माल येत असेल नाही. मुळात व्यावसायिक चित्रपटांमधे वा बड्या बॅनर्सच्या चित्रपटांमधे लोकांना चुटकीसरशी काय हवं तेच दिलं जातं असं मला वाटतं. पण अश्या प्रादेशिक आणि छोट्या बॅनर्सच्या चित्रपटांमधे कमालीची स्टोरीलाईन, अभिनय आणि त्याची उत्तम मांडणी हे थक्क करणारं असतं. अश्या, चित्रपट महोत्सवांना नक्कीच हजेरी लावायला हवी. आता गोव्या मधे होतोय ना IFFI फिल्म फेस्टीवल?

Pages