समटाईम्स इन एप्रिल - चित्रपट

Submitted by दिनेश. on 19 October, 2011 - 07:36

शहरात वांशिक दंगली उसळल्या आहेत. त्यातल्या त्यात मुलींच्या शाळेत ते लोक येणार नाहीत अशी आशा
असल्याने काहि पालक मुलींना शाळेतच थांबायला सांगतात. पण ते शाळेतही येतात, शस्त्रे परजत, दरवाज्याबाहेर त्यांचा नाच सुरु होतो. शाळेतली भेदरलेली शिक्षिका सगळ्या मुलींना एका खोलीत एकत्र करते. चर्चचा फ़ादर तिला सांगतो, त्यांना जे हवेय ते कर. पण ती ऐकत नाही.

ती मुलींना समजावते, ते तूमच्याकडे आयडेंटींटी कार्ड मागतील. मग दोन गट केले जातील. थोडावेळ शांतता, मग दोन चार मुली पुढे येतात आणि म्हणतात, मी पुढे व्हायला तयार आहेत, मग सगळ्याजणी म्हणतात, आपण सगळ्या बहिणी आहोत, जे काय व्हायचे ते सगळ्यांचेच होईल.

दरवाजा फ़ोडून ते येतात. मुलींना खडसावतात ज्या आमच्यापैकी आहेत त्यांनी या बाजूला व्हा. एकही मुलगी पुढे येत नाही. तो परत परत तेच सांगतो, सर्व मुली ठामपणे नजरेला नजर देत उभ्या राहतात. शिक्षिका म्हणते, अरे या तूझ्या मुलीसारख्याच आहेत. तो तिला बंदुकीच्या दस्त्याने मारतो, म्हणतो माझी मुलगी झुरळ नाही.

शिक्षिका कळवळून खाली कोसळते. सर्व मुली तिच्याभोवती कडे करतात. आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार होतो. कुणात अजून धुगधुगी राहिली असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, ते कोयते परजत येतात. काही वेळाने त्या शिक्षिकेला शुद्ध येते, तिच्यावर अनेक मृतदेहांचा खच पडलेला असतो, पण आणखी एक मुलगी जिवंत असते, प्रत्येक चेहरा ती कुरवाळते, आणखी एका मुलीचा श्वास चाललेला असतो, तिला पाठिवर घेऊन त्या दोघी लपत छपत बाहेर पडतात. दाट पिकात असलेल्या एका शेतकर्‍याच्या घरात त्यांना आश्रय मिळतो, पण ती स्त्री त्यांना, तिचा नवरा यायच्या आत बाहेर पडा असे सांगते. त्या तश्याच ठेचकाळत एका दलदलीत, आडोश्याला लपून राहतात. आजूबाजूला अनेक मृतदेह असतात. असे काही दिवस त्या काढतात, पण त्या काळातही ती शिक्षिका काहिबाही शिकवत राहते.

====

फ़क्त गोर्‍या लोकांना सुरक्षितपणे बाहेर न्यायची जबाबदारी यू एन घेते. त्या नुसार त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था केली जाते. अनेक आफ़्रिकन त्यांना सोबत न्यायची विनंती करतात. त्यांना अर्थातच गाडीत चढता येत नाही.
त्यापैकी एका काळ्या माणसाकडे मोडकी गाडी असते. तो गाडी घेऊन त्या ताफ्याच्या मागे निघतो. अनेक्जण त्याच्याही गाडीत घुसतात. अर्थातच ती गाडी अडवली जाते. थोडावेळ वातावरणात ताण.
त्यापैकी एक काळा माणूस एका गोर्‍या अधिकार्‍याला ओळखत असतो. तो अडवणार्‍या लोकांना सांगतो, आम्ही पण त्याच ताफ्यात आहोत. दोस्ता हो नारे. हो म्हण.
गोरा माणूस नजर न मिळवता सांगतो नाही. फक्त पांढ-या गाड्याच आमच्या ताफ्यात आहेत. मग खाली मान घालून सांगतो, दोस्ता मला माफ कर. मला तसेच आदेश आहेत.

===

यु एन मधली एक अधिकारी आपल्या परीने हे सगळे थांबवायचा प्रयत्न करते. बंडखोरांच्या नेत्यालाच थेट फ़ोन करुन धमकावते. तो म्हणतो तूम्ही कशाला याल इथे ? आमच्याकडे ना पेट्रोल ना निसर्गसौंदर्य.
त्या काळात जहाल प्रचार करणा-या रेडिओ प्रसारणावर बंदी आणावी किंवा ते सिग्नल जॅम करावे यासाठी पण ती प्रयत्न करते, तर तिला फ़्रिडम ऑफ प्रेस, फ़्रिडम ऑफ स्पीच वरती डोस दिला जातो. या दरम्यान टीव्हीवर जिनोसाइड या शब्दाची नेमकी व्याख्या काय करता येईल आणि तिथे जे होतेय त्याला जिनोसाईड म्हणता येईल का त्यावर खल चाललेला असतो.
कुठलेही सहकार्य आणि मदत मिळत नसतानादेखील ती नेटाने प्रयत्न करत राहते, तो हिंसाचार थांबवण्यात तिला यश येते, पण तोपर्यंत किमान ८ लाख लोकांचा बळी गेलेला असतो. तिचे कौतूक केले जाते, पण तिला मात्र आपण तो हिंसाचार वेळीच थांबवू शकलो नाही, याची खंत वाटत असते. केवळ ते आफ़्रिकन होते म्हणून आपण उदासिन आहोत का ? असे ती एका सहकार्‍याला विचारते. तो म्हणतो आपण केवळ नोकरशहा आहोत, राजकीय नेते नाही.
===

आपल्यावर झालेल्या सामुहिक बलात्काराबद्दल साक्ष देणारी एक काळी स्त्री, तिचे कोरडे डोळे आणि ज्यूरीतील सदस्यांच्या चेहर्‍यावरचे आगतिक भाव.

==

शेवटी पडद्यावर दिसणारी आकडेवारी. इतके लाख मेले. इतके आरोपी, इतक्यांना शिक्षा, पण ज्यांना शक्य असून ज्यांनी ते रोखले नाही, त्यांच्यावर मात्र कुठलाच आरोप नाही
===

हे सर्व प्रसंग आहेत समटाईम्स ईन एप्रिल या एच बी ओ ने तयार केलेल्या चित्रपटातील. विषय आहे १९९४ साली झालेल्या रवांडा मधल्या दंगली. याच विषयावर हॉटेल रवांडा असा चित्रपट आला होता आणि तोही तितकाच परिणामकारक होता. दोन्ही सत्यघटनांवर आधारीत आहेत आणि कौतूकास्पदरित्या, हिंसाचाराचे थेट चित्रण दोन्ही चित्रपटात टाळले आहे. पण तरिही दोन्ही चित्रपट अक्षरश: अंगावर येतात.

तुलनाच करायची तर मी समटाईम्सला झुकते माप देईन, कारण हॉटेल रवांडा मधला बराचसा भाग, नायकाचे बुद्धीचातुर्य दाखवतो तसे इथे नाही. इथली माणसे अगदी खरिखुरी वाटतात. अभिनय म्हणता येणार नाही, इतके सगळे सच्चे वाटते.
या चित्रपटाला तशी कथाही आहे, पण त्यापेक्षा एकंदर विषयच खुप अंगावर येतो. दिग्दर्शकाची विषयाबद्दलची आत्मीयता, प्रत्येक शॉटमधे जाणवते.

===

आफ़्रिकेतील टोळ्या हे प्रकरण आपल्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे, पण या चित्रपटातून एक नवीनच बाब समोर आली. या टोळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृति एकच होती, पण वसाहत करणार्‍या युरोपियन देशांनी त्यांच्यामधे हेतूत: दुहीचे विष कालवले. आपण समजतो तसे ते वैर पारंपारिक नाही.आज ते विष इतके खोलवर भिनलेय कि या लोकांचे पूर्ण आयूष्यच त्याने व्यापलेय.

माझ्या एका गुजराथी मित्रांने एका आफ़्रिकन बाईबरोबर सहजीवन सुरु केले. हि गोष्ट मी कौतूकाने माझ्या एका सहकारी मूलीला सांगितली. तिचा पहिला प्रश्न होता, व्हॉट ट्राईब इज शी ?

पुर्वी त्यांना चेहरेपट्टीवरुन टोळी समजायची पण आता विदेशी संकराने चेहरेपट्टी हा निकष तेवढा महत्वाचा
उरला नाही. कुणीही नवीन व्यक्ती कामावर रुजू झाली कि ओळख करुन घेताना, आधीचे लोक आडनाव सांगायला भाग पडतात आणि ते सांगताच त्यांच्या चेह-यावरचे भाव झरकन बदलतात.

१९९४ सालच्या रवांडातील दंगलीबाबत मला जरा जास्तच वाटते कारण त्या काळात मी केनयातच होतो.
त्याकाळातल्या मर्यादीत संपर्कसाधनातूनही त्या बातम्या आमच्यापर्यंत येतच होत्या आणि स्थानिक लोकांच्या त्यावरच्या थंड प्रतिक्रियाही समोर येतच होत्या.

आणि शेवटी मला जाणत्या वयात आल्यापासून छळत असणारा सवाल. काहिही वैयक्तीक कारण नसताना,
दुसरी व्यक्ती केवळ दुसर्‍या एका गटातली आहे, हे कारण तिच्या जीवावर उठण्यासाठी पुरेसे होते ?
कुणी केले हे गट ? निसर्गाने तरी या मुशी, चेहरेपट्ट्या वेगवेगळ्या का घडवल्या ? प्रश्न सुटत नाहीत पण
माझ्यावर मात्र शिक्के मारले जातात.

गुलमोहर: 

छान.

छान लिहिले आहेत दिनेशदा. हॉटेल रवांडा अत्यंत आवडला होता.आता समटाईम्स पण नक्की बघणार.छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एम्बी, तसा जूना आहे हा (२००५ सालचा). त्यामूळे लायब्ररीत सहज मिळेल.
दिगदर्शक अगदी फोकस्ड असला आणि आपल्या कथेशी प्रामाणिक असला तर त्याला अजिबात, गल्लाभरु दृष्ये टाकावी लागत नाहीत, हे प्रकर्षाने जाणवते.
सामुहिक बलात्कार केवळ साक्षीतून आणि ज्यूरींच्या क्लोजप्स मधून कळतो. पण अक्षरशः अंगावर काटा आणतो तो प्रकार.