तहसीलदाराने वाचविले...

Submitted by rkjumle on 19 October, 2011 - 03:34

मी इतर लोकांबरोबर तहसील कोर्टाच्या आवारात कडूनिंबाच्या झाडाखाली पुकार्‍याची वाट पाहत बसलो होतो. बर्‍याच वेळाने चपरश्याने दरवाज्याच्या जवळ येउन आमच्या नावांचा पुकारा केला. आम्ही सर्वजन आंतमध्ये गेलो.
तहसिलदार साहेब समोर खुर्चीत टेबलाजवळ बसले होते. त्यांच्या बाजूला एक बाबू बसला होता. त्याच्या समोर टेबलवर टाईपिंग मशिन ठेवली होती.
आम्ही सर्वजन आंत एका रांगेमध्ये उभे राहिलो. तहसिलदार साहेबांनी आम्हा सर्वांना निरखून पाहिले
‘तूझे नांव कायरे ?‘ माझ्याकडे डोळे रोखून विचारले.
‘रामराव.’
‘पुर्ण नांव सांग.’
रामराव कोंडुजी जुमळे.’
‘काय करतो?’
‘शिकत आहे’
‘कोणत्या वर्गात?’
‘बी.कॉम पार्ट टु ला.’
‘तु पण या भांडणात होता काय?’
`नाही साहेब. भांडण सोडवत होतो.’
‘भांडण सोडवत होता... म्हणजे नेमकं काय करीत होता?’
‘त्यादिवशी दोन्ही बाजूने दगडफेक चालू होती. माझा मोठा भाऊ... गांवचा सरपंच... तो मध्ये ऊभा राहून दोन्ही बाजूच्या लोकांना समजावीत होता. मी अलीकडे माझ्या मामाच्या घराजवळ ऊभा होतो. तेव्हा सुखदेव हा कुर्‍हाड घेऊन पळत येत असल्याचे मी पाहिले. तो जवळ आल्याबरोबर मी त्याला अडविले. त्याच्याजवळची कुर्‍हाड हिसकाऊन घेऊन माझ्या मामाच्या आवारात फेकली. बस इतकेच साहेब...’
‘हो साहेब... हा माझा लहान भाऊ…. मी गांवचा सरपंच आहे. तो भांडणात नव्हता. तो कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला विनाकारण या भांडणात गोवण्यात आले साहेब...’ शामरावदादाने काकुळतीने स्पष्टीकरण दिले.
‘अस्सं काय?’
तहसिलदार साहेबांनी इतरांकडे नजर वळवून गरजले. ‘कोणी टाकले या पोराचे नांव?’
कोणी बोलत नव्हते. सर्वच चिडीचूप झाले होते.
‘काढून टाका याचं नांव... तुम्हाले काही कळते की नाही? मुर्ख आहात कां तुम्ही? तो कॉलेजमध्ये शिकत आहे. तुमच्या या भांडणामूळे त्याचं जर रेकॉर्ड खराब झालं तर पुढे त्याला नोकरी मिळणार नाही. याचा तुम्ही थोडासाही विचार केलेला दिसत नाही. अरे तुमच्या गांवातील एका मुलाला नोकरी लागली तर गांवच्या लोकांना आनंद व्हायला पाहिजे. पण तुम्ही तर त्याच्या मार्गात काटे पेरायला लागले. हे बरोबर आहे कां?’
सर्वजन त्यांचे ते विखारी बोलणे ऎकून खजील झाले होते. ‘एकाची करणी व सर्वाला भरणी’ असं म्हणतात ते खरं आहे. ’भांडणात वाळल्याबरोबर ओलंही जळतं’ अशी माझी गत झाली होती.
दोन्ही पार्ट्यामध्ये त्या तहसिलदाराच्या वयापेक्षा जास्त वय असलेले लोकं होते. त्यांच्या इज्जतीचा पार चेंदामेंदा झाला होता. माझे नांव त्या भांडणात विनाकारण गोवल्यामुळे सपशेल तोंडघशी पडल्याचे भाव त्यांच्या मलूल पडलेल्या चेहर्‍यावरुन दिसत होते.
‘जा... अर्जनविसकडून तसा अर्ज लिहून आण व त्यावर ज्यांनी तुझ्या नांवाचा रिपोर्ट केला आहे, त्यांच्या सह्या घेऊन मला दे.’
मी अर्जनविसकडून तसा अर्ज लिहून आणून व सह्या घेऊन त्यांच्या टेबलवर ठेवला.
‘जा आता. यापुढे तुला कोर्टात यायची गरज नाही. तुला नोकरी करायची आहे ना?’
‘हो साहेब.’
‘मग एक लक्षात ठेव... यापुढे तू भांडणाच्या वाटेला जात नको जाऊ. त्यामुळे तुला नोकरी लागण्यासाठी अडचन येईल. चांगला अभ्यास कर व मोठ्या हुद्याची नोकरी मिळव. माझ्या शुभेच्छा आहेत तुला!’
‘हो साहेब.’ मी खुषीतच बाहेर पडलो.
खरोखरच माझं धूसर होणारं भविष्य त्यांनी वाचविलं म्हणून मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले. असेही सहृदय अधिकारी लोकं प्रशासनात असतात याची जाणीव मला त्यावेळी झाली! खरंच आहे... प्रत्येक अपघात व घटनेनंतर काही ना काही तरी शिकायला मिळतेच.
तेव्हापासून मी भांडणाच्या थोड्याशाही धगीपासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्‍न करत आलो आहे. कारण त्यावेळी तहसिलदाराचं ते वाक्य मला नेहमी आठवायचे, “तुमच्या या भांडणामूळे त्याचं जर रेकॉर्ड खराब झालं तर पुढे त्याला नोकरी मिळणार नाही.”
तरीही मी एका बिकट प्रसंगात सापडलो होतोच! संध्याकाळ होत आली होती. पाखरांची किलबील बंद होत चालली होती. गाई-ढोर जंगलात चरुन गांवात येत होते. वावरात कामावर गेलेले बाया माणसांची घरी येण्याची वेळ झाली होती. त्यावेळी सहजच मी आवाराच्या कवाडाजवळ बाहेर पाहत ऊभा होतो.
मी नेहमीच विरंगुळा म्हणून या कवाडाजवळच्या खालच्या चौकटीवर एक पाय ठेवून व वरच्या चौकटीला हात धरुन थांबत होतो. बाहेरुन रस्त्याने जाणार्‍या येणार्‍याना पाहत राहण्यात उत्कंठा वाटावची. त्यात माझं मन रमत असे.
त्यावेळी कोणीतरी रस्त्याने जाता जाता एखाद्यावेळेस मला विचारायचा, ‘कधी आला रामराव?’
‘थोडावेळ झाला.’ असं मी त्यांना सांगायचा.
त्यावेळी सुरेभानकाका माझ्या समोरुन घामाघूम होवून पळत गेला. त्याच्या मागोमाग किसनदादा हातात दगड घेवून धावत आला.
ते दृष्य पाहून माझ्यात काय विरश्री संचारली कुणास ठावूक! मी त्याचा हात पकडून त्याच्या हातातला दगड झटका देवून खाली पाडला. एखाद्या शिकार्‍याच्या हातून शिकार निसटून गेली म्हणजे तो शिकारी कसा बावरतो. तशीच अवस्था त्याची झाल्याची मला जाणवली. तो रागाने लालबूद झाला होता. माझ्यावर डोळे रोखून माझे मनगट त्याने करकचून धरले.
किसना चांगला धडधाकड व तरुण होता. व्यायामाने त्याचं शरीर कसलेलं होतं. त्याचे मनगट पिळदार होते. तो स्वत:ला मोठा बॉडी बिल्डर समजत होता. तो वाघासारखा रुबाब दाखयायचा. तो कधी खुषीत असला की आम्हाला वाघाचे चित्र काढून दाखवायचा. तो खरंच दिवाळीच्या दिवशी वाघ बणायचा. तो आपल्या उघड्याबंब शरिरावर पट्टेदार, ढाण्या वाघासारखा रंग, मिशा व शेपटी लावून नाचायचा. तेव्हा त्याचा हा वाघाचा खेळ आम्ही मजेत पाहत राहत होतो.
तसा तो मला फार मानायचा. त्याच्या दृष्टीने मी गांवात एकटाच मोठं शिक्षण घेत असल्यामुळे तो माझं कौतूक करायचा. तो बाबाचा नातेवाईक पण होता.
पण आता त्याचं मला वेगळच ते रौद्र रुप पाहायला मिळालं.
‘तु माझा हात कां धरलास?’ असे मला त्याने दरडावून विचारले.
त्याला काय बोलावे ते काही माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. मी पार गांगरुन गेलो होतो. ‘हेल्याच्या टकरीत वावराचा चुराडा व्हावा’ तशी माझी गत होते की काय असं वाटायला लागलं होतं. आता माझी खैर नाही. विनाकारण त्याचा हात धरला, असे वाटू लागले. मला दरदरुन घाम फुटला.
पुन्हा माझ्या अंगात विरश्री संचारली. सर्व शक्ती एकवटली. त्याच्या हाताला असा काही हिसका मारला की त्यामुळे माझा हात अलगद त्याच्या हातातून सुटून गेला. तसाच मी आंतमध्ये पळ काढला व आवाराचे कवाड आतून धाडकन लावून घेतले. बर्‍याच वेळ पर्यंत मी धापा टाकत घरात बसलो होतो.
गांवात काहिना काही भांडण-तंटा अधुनमधून सुरु राहत असे. काही लोकांना त्याशिवाय करमत नव्हते की काय? कोण जाणे?
थोडं काही बोलता बोलता बाचाबाची झाली, तोंडातोंडी झाली किवा हमरीतुमरी झाली की तंटा-बखेडा कधी उभा होईल त्याचा काही नेम नसे. मग दात-ओठ खात, ओटे खोचून, ‘चाल ये बे ऽऽ, तुह्या बहिन-मायची तं... जास्तच अंगात आली कारे... तुही जिरवु कारे?’ अशी तोंडाची चक्की सुरु करुन एकमेकांवर तुटून पडण्याचा नाटकी आवेग दाखवत असत. त्यांच्या मधात कुणी भांडण सोडवायला पडलं तर त्यांना आणखीच जोर चढल्याचं नाटक वटवित असत. कधी कधी ते भांडण तेथेच विरुन जायचं. एखाद्यावेळेस मात्र खरोखरंच भाडणाला रंग चढत असे. मग काही विचारुच नका! जे हातात सापडेल मग तो दगड-गोटा असो की कुपाटा-कुंपणाची एखादी बल्ली असो, ते घेऊन दुय्यम सामना सुरु होत असे.
अशामुळे आमच्या गांवला ‘भानगोडं’ गांव म्हणून ओळखल्या जात असे. गांवामध्ये दगड-गोट्याची काही कमतरता नव्हती. हात लावाल तेथे दगड-गोटे मिळत असत.
ज्या दिवशी गांवात भांडण झालं होतं, तो दिवाळीचा दिवस होता. त्या दिवशी सगळीकडे उत्साहाचा माहोल होता.
नुकताच गायक्याचा लवाजमा घरी येऊन गेला होता. वहिनीने त्याच्या गायीची पुजा केली. गाईच्या चारही पायावर पाणी टाकले. तिला खायला पुरणपोळीचा घास दिला. गायक्याला सुपात आणलेली ज्वारीचे व पैशाचे दान त्याच्या झोळीत टाकले.
सूर्य डोक्यावरुन थोडा बाजूला कलला होता. आम्ही जेवायला बसलो. रोज ना खायला मिळणारा भात त्या दिवशी होता. ऎरवी आमच्या रोजच्या जेवणात भाकर असायची. गव्हाची पोळी किवा भात हे आम्हाला सणासुदिला किवा रविवारच्या हप्‍त्याच्या बाजाराच्या दिवशी खायला मिळत असे.
त्या दिवशी जेवणात पुरणपोळी होती. सोबत तळलेल्या भज्याचा खमंग वास येत होता. पुरणपोळी व त्यावरील साजुक तू्पाचा वास नाकात घुमला होता. सोबत कढीचा फुरका होता. असा तो जेवणाचा मस्तपैकी बेत होता. सोबत चकल्या, करंज्या, अनारसे असे कितीतरी पदार्थ होते. दिवाळीच्या दिवशी घरोघरी असाच गोडधोड जेवणाचा आस्वाद लोक घेत असतात.
आम्ही नुकतेच जेवायला बसलो होतो. बाहेर कल्ला ऎकू लागला. बाहेर काहीतरी भांडण सुरु झाले असावे याचा तो संकेत होता. नेमकं गांवामध्ये कोणत्यातरी सणासुदिलाच भांडण उभं राहत असे.
‘भांडण पेटलं वाटते. मी जावून पाहतो. तुम्ही कोणी बाहेर येऊ नका. रामराव, तू बाहेर येऊ नको. भाडणात ते लोकं दगडं मारतात.’ दादा म्हणाला.
दादा भरल्या ताटावरून तसाच उठला.
आई म्हणाली, ‘अरे शामराव...जाऊ नको. त्यांच्या भांडणात पडू नको. पहिले जेवून घे. मग जा.’
‘भांडण सुरु झाले आहे. कुणाचा मुडदा पडेल काही सांगता येत नाही... मग निस्तारायला मोठा त्रास होतो.’
दादा गांवचा , असल्यामुळे त्याला राहवले नाही.
दादा बाहेर गेल्यामुळे आम्हालाही काळजी वाटायला लागली. म्हणून आम्ही पण जेवण अर्धवट टाकून बाहेर मामाच्या घराजवळ आलो.
मामाच्या घरापासून दशरथमामाच्या घराजवळून पुढे वाडीकडे पांदन जाते. त्या रस्त्यावर दोन्ही बाजुने गोटमार चालू होती. अलीकडे गोविंदामामाच्या घराजवळून रामधन गटाचे लोकं दगड फेकत होते. तर पलीकडून दशरथमामाच्या घराजवळून श्रावण गटाचे लोक इकडे दगडं फेकत होते. एकमेकांना आई-बहीणीवर शिव्या देत होते. दोन्ही बाजुने जोरात धुमचक्री चालू होती. जणूकाही दोन राज्याच्या सैनिकामध्ये लढाई सुरु आहे की काय असाच तो माहोल वाटत होता.
मध्ये सुरेभानच्या घराजवळ दादा उभा होता. तो हातवारे करुन दगडं मारु नका असे ओरडून ओरडून सांगत होता. त्याला दगड लागतील म्हणून आम्ही खूप घाबरलो होतो.
तेवढ्यातच सुखदेव हातात कुर्‍हाड घेऊन पळत येत असल्याचे मी पाहिले. तो माझ्याच वयाचा होता. गांवातला तो माझा दोस्तच होता. तो जवळ आल्याबरोबर मी त्याला अडविले व त्याच्याजवळची कुर्‍हाड हिसकाऊन घेऊन माझ्या मामाच्या आवारात फेकून दिली.
थोडयावेळाने जस जसा अंधार पडत चालला तस तसा दोन्ही बाजुची गोटमार थोडी मंदावत चालली होती.
शेवटी भांडण शमल्यावर दोन्ही बाजुच्या लोकांनी एकमेकांची तक्रार पोलिस पाटलाकडे केली. त्याचा रिपोर्ट घेऊन यवतमाळच्या पोलिसठाण्यात गेले. पोलिसांनी दोन्हीही पार्ट्यावर कलम १०७ नुसार गुन्हा नोंदवीला.
मी त्या दिवशी घरी आलो होतो. दुपारचे तिनक वाजले असतील. मी अभ्यास करीत होतो एक लभानाचा मुलगा घरी आला.. त्याने मला केशव पाटीलाने बोलाविले म्हणून निरोप दिला. केशव पाटील हा बंजारी समाजाचा होता. तांड्यात त्याचा वाडा होता.
मी त्याच्या मागे मागे पाटीलाच्या वाड्यात गेलो. तेथे बाहेर अंगणात दोरीच्या बाजेवर एक खाकी वर्दीतला पोलिस बसून होता. दोरी बांधलेली काठी व पिशवी त्याच्या बाजूला बाजेवर पडलेली होती.
‘तुच कारे रामराव.’ तो पोलिस मला म्हणाला.
मी मान हालवली.
‘तुझ्या नांवाने कोर्टाचा समन्स आहे. तू भांडणात होता ना? म्हणून तुला कोर्टात हजर राहायचे आहे.’ असे म्हणून त्याने दुसर्‍या एका कागदावर माझी सही घेऊन तो समन्सचा कागद मला दिला.
‘बाकीच्या लोकांना आधीच समन्स बजावले होते, तुच राहिला होता.’ पाटील मला म्हणाला. मी गांवात नसल्यांमुळे दुसर्‍यांदा पोलीसाला समन्स घेवून माझ्यासाठी यावे लागले होते.
मी घरी जायला वळलो. तेव्हा तो पोलिस मला म्हणाला, ‘अरे थांब, एक काम कर. मला एक दारुची शिशी आणून दे.’
दारु आणि पोलिस असं हे विसंगत सुत्र पाहून मी अचंबित झालो. मी कुतूहलाने त्याच्याकडे ‘आ’ वासून थोडावेळ पाहातच राहिलो.
मनात म्हटले, ‘ पोलिसदादा तुम्ही पण?’
पाटीलाने माझी संभ्रमीत अवस्था पाहून म्हणाला, ‘काका आहे ना घरी?’ माझ्या बाबाला तो काका म्हणायचा.
’हो’ मी म्हणालो.
‘त्याला सांग. तो देईल आणून.’
मी घरी आलो. बाबा भजे बनवीत होता. तो भजे बनवून वाघाडीच्या धरणावर काम करणार्‍या लोकांसाठी विकायला घेऊन जात असे.
‘मला कोर्टाचा समन्स आला आहे. पोलीसाने मला दारुची शिशी आणायला सांगितली. मी काय करु?’ मी बाबाला सांगितले,
‘त्याने पैसे दिले नसेलच. फुकटात पाहिजे असते लेकांना...हरमखोर कुठले...!’ बाबाने त्याला एक शिवी हासडली.
त्याचा हात भिजवलेल्या भज्याच्या चुणाने भरलेला होता. भरल्या हाताने तो कुठे जाऊ शकत नव्हता. म्हणून मलाच सुखदेवच्या घरी जा व त्याला सांग, ’बाबाने दारुची शिशी मागितली म्हणून. तो देईल तुला’ असं म्हणाला.
सुखदेवकाकाचं नांव घेतल्याबरोबर मला ती काळिज पिळवटून टाकणारी गोष्ट आठवली. मी त्यावेळी यवतमाळला शिकत होतो. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मी गांवला घरीच राहत होतो.
मिरगाची चाहूल लागण्यापुर्वीच कास्तकारांनी वावराच्या अंतरमशागतीचे बहुतेक कामे आटोपते घेतले होते. पेरणीचे सारी कामे जवळपास उरकण्याची धांदल उडाली होती. पावसाचे टपोरे थेंब उन्हाने तप्त झालेल्या मातीला सुखावून टाकल्यावर कुठे कुठे इवली इवली रोपटे डौलाने उभी राहीले होते. काळ्या मातीतून कोवळी कोवळी रोपे तरारुन वर आले होते. अशावेळी खेड्यामध्ये सहसा दिवसा कोणी घरी राहत असलेले दिसत नाहीत. शेतीच्या कामासाठी ते दिवसभर वावरात राहत असतात. मग गांवातले लहान लहान पोरं बेवारस सारखे कुठेतरी भटकत असलेले दिसतात. अशी ती परिस्थिती त्यावेळी गांवात होती.
सुखदेवकाकाला सहा-सात वर्षे वयाचे प्रकाश व सिध्दार्थ असे दोन हारोपाठी मुले होते. सुखदेव हा माझी मामे बहिण चित्राबाई हिचा सख्खा मामा होता.
त्यादिवशी दिवस बुडाला तरीही सुखदेवकाकाचे हे दोघेही मुले घरी आले नव्हते. म्हणून सारा गांव चिंतेत पडला होता. हातात कंदिल व बॅटर्‍या घेवून काही माणसं त्यांना शोधण्यासाठी गांवाच्या भोवताल असलेल्या पांदनीने व वावरात जाणार्‍या रस्त्याने फिरत होते व त्या दोन्हीही पोरांना ’प्रकाशऽऽ सिध्दार्थऽऽ” असे ओरडून लोकं जोरजोराने हांका मारत होते. आम्ही पण काही पोरं सोबत त्यांच्या मागे मागे काही दूर पर्यंत जावून परत आलो होतो.
त्या रात्री त्या दोघाही पोरांचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी मात्र नानाची बायको वावरात चालली होती. त्याचं एक पांढरी गांवाकडे जाणार्‍या रस्त्याने नाल्याच्या पलीकडे बदाडात एक डूंग होतं. त्यात पुर्ण वावरभर धान पेरला होता. धानाचे सुईसारखे कोंब जमिनीतून वर उगवून आले होते. त्यात एक विहिरा होता. त्या विहिर्‍यावर हात पुरत पाणी होतं. त्यातील पिण्यासाठी घागरीत पाणी घेवून ती पलीकडील वावरात जाणार होती.
ती त्या विहिर्‍याजवळ गेली आणि ते दृष्य पाहून ती जोराने किंचाळली. तिला त्या दोन्हीही मुलांचे निर्जिव देह पाण्यावर तरंगत असलेली दिसली.
ती तशीच घाईघाईने भितीने बावरलेल्या अवस्थेत गांवात आली. रस्त्यात भेटेल त्याला ही बातमी सांगत सुटली. वार्‍यासारखी ही बातमी गांवात पसरली. सारा गांव ते पाहायला लोटला. मी पण धावत पळत गेलो.
ते दृष्य मन हेलावणारे होते. दोघांही भावांचे शव एकमेकांच्या हातात हात घालून उबडे पाण्यावर पडले होते. त्यांचे कान कुरतडलेले होते. बहुतेक खेकड्याने खाल्ले असावे. पाण्यात बाजूला पळसाच्या पानाचे डोणे पडले होते. कोणी म्हणत यांना चकव्याने विहिर्‍यात ढकलले असावे तर कुणी म्हणायचे ते पाणी प्यायल्या गेले असावे व घसरले असावे. अशाप्रकारे नाना तर्‍हेचे तर्कवितर्क पाहणारे लोकं करीत होते.
यवतमाळवरुन पोलिस येईपर्यंत ते दोघेही त्याच अवस्थेत विहिरीत पडलेले होते. ते पाहून सारा गांव हळहळला होता. पोलिस आल्यावर पंचनामा करुन त्यांची प्रेते बाहेर काढली. एका बैलगाडीत नाल्याजवळ असलेल्या कडुनिंबाचे डहाळ्या तोडून टाकण्याचे काम आम्ही पोरं करीत होतो. नंतर दोन्हीही प्रेते गाडीत टाकून यवतमाळला चिरफाड करण्यासाठी घेवून गेलेत. तेथेच दोन्हीही प्रेते स्मशानात गाडून लोकं घरी परत आलेत.
दोन पोरांचे असे मरण पाहून आई बापाला काय वाटले असेल, कल्पनाही करवत नाही! नंतर असे कळले की त्या दोन्ही पोरांसोबत माझा मामे भाऊ मनोशोधन व माझ्या मावस बहिणीचा मुलगा नाना पण होता. हे पोरं भद्या लभानाच्या वावरात जांभळं खायला गेले होते. आम्हीही पोरं असेच त्याच्या वावरात जांभळं खायला जात होतो. झाडावर चढून जांभळं तोडत होतो. तुळशीरामदादाच्या वावराजवळ पलिकडे त्याचं वावर होतं. आम्हीही लहान असतांना या पोरांसारखे मोठे हिंडगोडे होतो.
मनोशोधन सांगत होता की, "आम्ही जांभळं खावून बैलगाडीच्या रस्त्याने नानाच्या वावरापर्यंत आलो. आम्हाला तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी पळसाचे डोणे घेवून या विहिर्‍यावर आलो. सिध्दार्थ डोणा घेवून वाकून पाणी घ्यायला गेला. तसाच तो घसरला व विहिर्‍यात पडला. तो दादाऽ दादाऽऽ म्हणून ओरडत होता व पाण्यात गटांगळ्या खात होता. म्हणून त्याचा मोठा भाऊ प्रकाश ह्याने वाकून त्याचा हात धरल्याबरोबर तोही पाण्यात पडला. दोघेही बुडायला लागले. ते पाहून आम्ही पार घाबरलो व तेथून पळ काढला. पण ही गोष्ट त्यादिवशी कुणालाही सांगायची हिम्मत झाली नाही."
ते दृष्य डोळा भरुन पाहिल्यामुळे त्या रात्री मला झोप आली नाही. डोळे मिटले की तेच दृष्य माझ्या डोळ्याच्या चक्षूसमोर उभं राहायचं. रात्रीला लघविला किंवा कोणत्या कामासाठी बाहेर पडायला भिती वाटायची. कित्येक दिवसपर्य़ंत त्या दृष्याची भयानता काही केल्या डोळ्यासमोरुन दूर होत नव्हती. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही.
याच आठवणीच्या तंद्रिमध्ये असतांना मी सुखदेवकाकाच्या घरी पोहोचलो. तो घरीच बसला होता. तो त्यावेळी दारु विकण्याचा धंदा करीत होता. त्याच्या घरी कोणीतरी दारु पिणारा गिर्‍हाईक बसला होता. मी त्याला म्हटले की, ‘बाबाने दारुची शिशी मागितली.’
तो त्याच्या घराजवळील शेणखाताच्या उकंड्यावर गेला. त्यात एका कोपर्‍यात हात टाकून हिरव्या रंगाची मोठी काचेची शिशी बाहेर काढली. शिशीला पळसाच्या पानाचे बुच लावले होते. त्याला चिकटलेलं शेणखत हाताने पुसत माझ्याकडे दिली. मी ती शिशी घेऊन पाटलाच्या घरी गेलो. तो पोलिस माझीच वाट पाहत होता. त्याने माझ्या हातातली शिशी घेतली.
`तारखेवर हजर राहशील.’ पोलिस मला म्हणाला.
मी ‘हो’ म्हणालो व घरी आलो.
समन्समध्ये दिलेल्या तारखेला मी तहसील कोर्टात हजर झालो.

गुलमोहर: 

बापरे.. काय दुर्देवी मृत्यू दोन्ही बालकांचे Sad
तुमच्या लिखाणाने एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते. लिहीत रहा. पु.ले.शु. Happy