हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? (तरही)

Submitted by राजेश घासकडवी on 12 October, 2011 - 00:02

जखमेस तेल मागू कितिदा जगास अजुनी?
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी?

हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू
क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी?

ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी!

उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का?
उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!

ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आवडली

छान. Happy

छान छान !
माझ्या वाचनातली ही तुमची पहिलीच गझल. त्यामुळे 'सुस्वागतम' म्हणतो. Happy

आधीसुद्धा गझल लिहिल्या असतील तर वाचायला आवडेल.

अरे वा!! घासकडवी साहेब.. आपले स्वागत!
गझल आवडली. आनंदयात्री म्हणतात त्याप्रमाणे मतला अजून थोडा चांगला करता आला असता.

गुर्जी, मस्तच झालीय तरही.
मतला जरा बदला. आरम घास हा शब्द खूपच ओढून ताणून वाटतोय (किमान मला तरी)

तुम्ही या अगोदर गझली लिहिल्यात का? (अरे,मग या शिष्येने कशा वाचल्या नाहीत ? )

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद. माझी तशी ही दुसरी गजल, पण पहिली एखादा शेर सोडला तर नीट जमलेली नव्हती.

बऱ्याच जणांनी मतला बदला असं सांगितलं, तेही पटलं. कारण आराम-घास हा शब्दप्रयोग ओढून ताणून आलेला मलाही वाटत होता. तो लिहिताना मर्ढेकरांचा 'विश्रांती-स्तन कुठे घ्यायचा' ही ओळ होती. पण बदललेला मतला आवडेल अशी आशा आहे.

बदललेला मतला छान आहे.
मला असं वाटलं की. मतल्याच्या पहिल्या ओळीशी दुसर्‍या ओळीचा संदर्भ लागत नाहीये..!
असो..