भूवरी रावणवध झाला !

Submitted by रुणुझुणू on 11 October, 2011 - 15:02

खरंतर हे लिखाण विनोदी कलाकुसर ह्या भागासाठी योग्य आहे. पण असा विभाग नसल्याने इथे टाकत आहे ! Happy

दसर्‍याच्या एक-दोन दिवस आधी पोगो, सीएन वर दशावतार, बालकांड असले अ‍ॅनिमेशन चित्रपट सारखे लागत होते.
सृजनने (लेकाने) विचारलंच, " अरे हे लोक तेच-तेच का दाखवतायेत परत ?"
त्याला विजयादशमीबद्दल सांगितलं. त्या दिवशी सगळीकडे साजरा होणारा रावणवध ऐकताना त्याचे डोळे चमकले.
" आई, आपण पण बनवूया एक रावण. मी राम होतो. मी रावणवध करणार."
दसर्‍याच्या आदल्या दिवशीची फर्माईश.
ऐनवेळी कशाचा रावण बनवावा, हा प्रश्न पडला.
शेवटी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरायच्या ठरलं.
( ह्या पाण्याच्या बाटल्या आम्ही इतक्या प्रकारांत वापरल्या आहेत की आता एकदिवस त्या बाटल्या हात जोडून कळवळून म्हणतील, " अब हमसे सहा नहीं जाता, हमें हमारी हालात पर छोड दो....")

मग पाच लीटरच्या बाटलीचं रावणाचं धड बनवलं. बाटलीच्या खालच्या भागात दोन वर्तुळं कापून त्याच्यात दीड लीटरच्या बाटल्या रावणाचे पाय म्हणून घुसवल्या.

लगेच नवरोबांची कमेंट आलीच, " हाहाहा....तुमचा रावण परेड करायला उभा असल्यासारखा दिसतोय...सावधान पोझिशनमध्ये ! "
" हॅहॅ, असू दे, असूदे." आम्ही असं म्हटलं खरं, पण मुद्दा बरोबर होता.
मग पाय पुन्हा सांध्यातून ओढून काढले.
पुन्हा जरा तिरक्या दिशेत दोन वर्तुळं कापली. पुन्हा अटीतटीने पायांची घुसवाघुसवी. आता रावणाने ' सावधान ' सोडून ' विश्राम ' चा पवित्रा घेतला....एकदम हिरो इष्टाईल Lol

त्याच्या धडावर गुंडाळायला स्किन कलरची आणि धोतरासाठी हिरव्या रंगाची लोकर आणली होती.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडालाही कधी जितक्या मनोभावे धागा गुंडाळला नसेल त्याहून जास्त तन्मयतेने गुंडाळूनही रावण हातभर उघडाच !
शेवटी कंटाळून रावणाला सृजनचा जुना बनियन घातला. धोतर म्हणून माझी जुनी लेगिंग कापून घातली.
बाबांनी हे बघितलं आणि अगदी गंभीरपणे म्हणाले, " आज रात्री तुझ्या स्वप्नात नक्की रावण येणार."
" का ?" मी कापलेल्या लेगिंगची उंची रावणाच्या उंचीला जुळवण्यात मग्न होते.
" नुसता येणार नाही तर आवाज चढवून म्हणणार - कसाही असलो तरी लंकेचा राजा होतो मी ! अशी फाटकीतुटकी वस्त्रे घालताय मला...ही हिंमत ?"
" कुठे फाटलंय ?"
मी रावणाला गरकन फिरवून बघितलं....आणि सगळेच खोखो हसत सुटलो.
इस्त्री करताना अगदी 'नेमक्या' जागी जळल्यामुळेच ती लेगिंग जुन्या कपड्यांच्या खोक्यात जाऊन पडली होती. आणि आज ती रावणाच्या नशिबी आली होती !
शेवटी बाबांना दया येऊन त्यांनी त्याच्या धोतराला सोनेरी लेसचे जरीकाठ लावले. तेवढंच त्याला समाधान !

Ravanvadh10.jpg.JPG

लेकाचा वाढदिवस नुकताच झाला होता. भिंतीवर अजूनपर्यंत लटकणार्‍या निळ्या कागदी पट्ट्या काढल्या आणि रावणाच्या हातांना गुंडाळून टाकल्या.
खेळण्यातल्या ड्रमचं तोंड केलं. त्यावर पांढरं कापड ताणून बसवलं.
( तोंड पांढरं, हात निळे, पोट अबोली रंगाचं....हे असं कसं, असले बालिश प्रश्न विचारायला सक्त मनाई आहे ! )
स्केचपेनने तोंडावर रंगरंगोटी झाली. मग मिशा एवढ्याशा असतात का, भुवया जरा जाड कर, असले फु. सल्ले ऐकत ऐकत एकदाचा मेकप पूर्ण झाला.
दात रंगवायला लाल स्केचपेन घ्यायची बुद्धी का झाली, रावणालाच ठाऊक. पण त्यामुळे तो एकदमच चमत्कारिक दिसायला लागला.:हाहा:

Ravanvadh9.jpg.JPG

एवढं करेपर्यंत खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाल्याने पोटात कथकली चालू झाली होती. जेवणं चालू असताना टीव्हीवर ' एक मंतरलेली रात्र ' हा चित्रपट लागला होता.
रात्री-अपरात्री कॉल्स बघायला जावं लागतं, उगीच कशाला डोक्याला ताप, म्हणून मी असले चित्रपट खरंतर बघत नाही.
पण थोडं कानावर पडत होतं. उत्सुकते पोटी बघायला मान वळत होती.
त्यात एका प्रसंगात श्रीराम लागू त्या झपाटलेल्या बंगल्यात आलेले असताना, अचानक दिवे जातात.
त्यांनी दचकून विचारल्यावर बंगल्यातला नोकर (निळू फुले) निर्विकार आवाजात उत्तर देतो,
" इथे अस्संच होतं सायेब, दिवे येतात - जातात. जातात- येतात. "
......त्या थंड आवाजाला घाबरून मी बाबांना टीव्ही बंद करायला लावला.
खोटं वाटेल, पण मोजून १० - १५ मिनिटे झाली असतील नसतील तेवढ्यात अचानक आमच्या घरातले आणि परिसरातले दिवे ( कधी नव्हे ते ) गेले. आख्ख्या बेटावर काळाबुडुख अंधार !
तेवढ्यात नवरोबा अगदी थंड आवाजात म्हणाले, " असंच होतं सायेब. दिवे येतात-जातात. जातात-येतात." Angry
आधीच अंधारात चाचपडणं चाललं होतं, त्यातून हे वाक्य.
( स्वगत : कुठून उद्योग केला आणि ह्याला मराठी शिकवलं ?)
दहा मिनिटात दिवे आले. तोवर आमचं थोडं घाबरून आणि भरपूर खिदळून झालं होतं.
कोपर्‍यात ठेवलेल्या रावणाकडे बाबांचं लक्ष गेलं आणि ते पुन्हा एकदा गंभीरपणे म्हणाले, " ह्याच्या तोंडावर टॉवेल टाकून ठेवू या रे. झोपेत जाग आली आणि ह्याचं तोंड दिसलं तर माझी वाट लागेल."
तात्या विंचू, झपाटलेला, पछाडलेला....नको त्या वेळी नको ते आठवायला लागलं !
शेवटी खरंच त्याचं तोंड टॉवेलने झाकून आम्ही ( एकदाचे ) झोपलो.

दुसर्‍या दिवशीच्या सकाळच्या धावपळीत लेकाची भुणभुण चाललीच होती, " निला कलर आणलायेस ना ? आज मला राम बनवायचंय."
" हो रे बाबा " म्हणून आम्ही आपापल्या रूटीनसाठी सटकलो. आता दिवसभराच्या धावपळीत राम-रावण काही आठवलं नसतं.
पण मला खात्री आहे, पिल्लूच्या डोक्यात मात्र प्रत्येक क्षण तोच विचार चालू असणार...निरागस वय, भोळ्या कल्पना....

चार-साडेचारला घरी आले तर लेक सगळी जय्यत तयारी करून बसला होता. धनुष्य, बाण, भाता....
पण नेमके तेव्हाच एसी सर्विसिंग करायला लोक आले. त्यांच्यासमोर आम्ही असले उद्योग केले असते तर दुसर्‍या दिवशी नक्कीच पोलिस चौकशीसाठी घरी आले असते !
" कधी जाणार हे लोक ?" " अजून का जात नाहीयेत ?" लेकाचं भजन पूर्णवेळ चालूच होतं.
शेवटी एकदाचे ते गेले.
वॉटर कलर्सचा आधीचा असफल अनुभव असल्याने ह्यावेळी खाण्याचा निळा रंग ( फूड कलर ) वापरायचा ठरलं.
अगदीच गरजेपुरती चड्डी लेकाच्या अंगावर ठेवून रंगरंगोटी चालू झाली.
तो अगदी काटेकोरपणे लक्ष ठेवून रंग लावून घेत होता. जरा कुठे लावायचा राहिला तर म्हणायचा, " इथे लाव. माझा ब्राऊन कलर दिसला तर रावण ओळखेल की मी खरा राम नाही."
डोळ्यांच्या आजूबाजूला रंगवताना तर माझी पुरती रस्सीखेच.
नवरा मागून भुणभुण करत होता, " नीट गं. डोळा सांभाळ....स्स्स...पुरे...इतक्या जवळ कशाला लावतेस....डोळ्यात जाईल."
आणि मी थांबले की लेक पळत-पळत जाऊन आरशात बघून येई आणि म्हणे, " आई....इथे राहिलंय बघ. निल्या तोंडावर असे ब्राऊन डोळे भुतासारखे दिसतात."
त्याला अगदी काखेतही निळा रंग लावायचा होता. कारण काय तर भात्यातून बाण काढताना रावणाला दिसेल. Lol
बरं, तिथे रंग लावताना गुदगुल्या होतात म्हणून खिदळणं सुद्धा थांबवता येत नव्हतं !

तळहातांना लाल रंग लावला. का तर म्हणे रामाचे तळहात गुलाबी असतात !

रंगवून झाल्यावर आरशात बघत म्हणाला, " आई, मी रामासारखा नाही दिसत गं. जेक सुलीसारखा दिसतोय...."
असलं कठोर वाक्य ऐकून माझ्यातल्या कलाकाराला किती यातना झाल्या, हे कसं सांगू ?

( पुढचा फोटो आपापल्या जबाबदारीवर बघावा. नाजूक हृदयाच्या व्यक्तींना गंभीर त्रास होऊ शकतो...)

ravanvadh1.jpg.JPG

पण कटु असलं तरी सत्य होतं ते...
" पुढच्यावेळी आपण जरा फिक्का रंग लावू हं. आत्ता राहू दे." मी म्हटलं.
" म्हणजे...हे सगळं प्रकरण अजून एकदा करायचा प्लॅन आहे तुमचा....श्रीकांता कमलकांता अस्सं कस्सं झालं ..."
हे कोण बोललं असेल, हे सांगायची गरजच नाही !
श्रीकांताचं गाणं मला आणि सृजनला उद्देशून अनेकदा म्हटलं जातं घरात.
पण कलेच्या संवर्धनासाठी आम्ही असल्या टोमण्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो !

रंगवलेल्या रामाने खोटे केस लावले. गळ्यात मोत्यांच्या माळाबिळा, बाजूबंद....
आम्ही म्हटलो, " ए ढोप्या, राम वनवासात असताना त्याच्याकडे दागिने नव्हते काही. रुद्राक्षाच्या माळा घालायचा तो."
" ओक्के, मग मला पण रुद्राक्षांच्या माळाच द्या."
अरे देवा, आता आली का पंचाईत ? इथे कुठून आणायच्या रुद्राक्षांच्या माळा ?
" कृष्ण घालितो लोळण..." सारखी आमची अवस्था व्हायच्या आतच आम्ही सारवासारव केली, " हां, बहुतेक त्याच्याकडे होत्या बरं का. पेटीत ठेवल्या होत्या सांभाळून."

पितांबर , धनुष्य, बाणाचा भाता ( आणि त्यात एकच बाण...कारण बाकीचे सगळे घराच्या मोहोंजदडोमध्ये लपलेले ), आदल्या दिवशी रावणाला बक्षिस दिलेला आणि ' आता मला पाहिजे ' म्हणून काढून घेतलेला मुकुट.....
"मारू का गं रावण ?"
" अरे थांब थांब, रावणाच्या हातात एखादी तलवार तरी देतो बनवून." बाबा म्हणाले.
मग बाबांनी कार्डबोर्डची तलवार कापून तिला सोनेरी कागद लावून रावणाला इनाम दिली.

असे सजले लंकापती....

Ravanvadh6.jpg.JPG

युद्धाच्या आधी राम-रावणाची सदिच्छा-भेट झाली.

Ravanvadh2.jpg.JPG

आणि मग आतुरतेने वाट पाहिलेलं ते राम-रावण युद्ध झालं....
मोजून ५ मिनिटांत रावण कोसळला आणि मग त्याच्या छातीवर पाय ठेवून राम मोठ्ठ्याने म्हणाला,
" भूवरी रावणवध झाला ! "

Ravanvadh8.jpg.JPG

५ मिनिटाच्या युद्धासाठी आदल्या दिवसापासून केलेला विनोदी खटाटोप आठवून आम्हाला हसू येत होतं.
' राम ' मात्र जाम खुष होता.

Ravanvadh3.jpg.JPG

खांद्यावरचा बाणांचा भाता काढता-काढता तो म्हणाला,
" आई, तू म्हणालीस की दसर्‍याच्या दिवशी देवीने महिषासुर राक्षसाला पण मारलं होतं. मग आपल्याला एक महिषासुर पण बनवायला लागेल ना...."

......हे ऐकून मी व्याकुळ चेहर्‍याने " नहीं..." म्हणत कपाळाला हात लावला......आणि....माझी अवस्था बघून बाबा आणि नवरोबा खोखो हसायला लागले.

' राम ' मात्र मिस्किलपणे गालात हसत उभा होता !!

srujan.jpg

गुलमोहर: 

रुणूझुणू, भारीच. Lol राम मेकप करून एकदम सही दिसतोय.
आता पुढच्या वर्षी रावण आणि महिषासुर दोन्ही बनवणार का? Proud

Lol भारी लिहिलयस

उत्साही पोराची मेहनती आई Happy

खुप्पच गोड दिसतयात राम आणि रावण पण Happy

हे लिखाण क्रमशः / भाग १ आहे ना? Wink आता भाग २ महिषासुराचा वध Proud

अरे, मस्तच. पोराच्या हट्टासाठी एवढा खटाटोप, धन्य आहेस तु.
पण खरेच, जबरी. Happy

रावणाचे एक्स्प्रेशन्स चांगलेच अग्रेसिव्ह दिसतायेत. Proud
कोण म्हणतं राम राहीलाच नाही. असे हट्टी राम आहेतच कि अजून. मस्तच.

कशला गं बाई गोड राम. Happy
रामाच्या आईला मात्र शि. सा . नं.

मृ, शुम्पी, प्रज्ञा, कविता- +१

छान झाला रावन वध

आम्हीही असे उधोग केलेत.
त्यात रॉकेट फटाके भरत असु, मग रावण पेटला ती रॉकेट कुठनही सुसाट निघायची, मग एकच कल्लोळ व्हायचा. मजा यायची.

मस्तच. एवढ्या संयमाने केलंस हे नशिब. मी असते तर कदाचित "मला वेळ नाही" असं म्हणून गप्प बसवलं असतं. Happy

आई, मी रामासारखा नाही दिसत गं. जेक सुलीसारखा दिसतोय....">>> Lol

ए कशला गोडुला दिशतोय राम! आणि रावण पण मस्त झालाय...

रुणू, तुझ्या पेशन्स व खटपटीला सलाम! लिहिलं पण छान आहेस Happy

रावणवध एकदम भारीच आहे. तो बाटलीचा रावण एवढा गोड आणि गरीबबिचारा वाटतोय की त्याला उगाचच मारलं असं वाटावं इतके पापभिरू भाव आहेत त्याच्या चेहर्‍यावर.
आणि राम तर काय वर्णावा........ त्या सतयुगातल्या रामाने म्हणे मला चंद्र हवा असा हट्ट धरला होता, या कलियुगातल्या रामाने चक्क रावण हवा असाच हट्ट धरला आणि कौसल्यामातेने तो पुरा ही केला..... Lol
धन्य ते मायलेक, आणि त्यांना साथ देणारे नवरोबा आणि बाबा. Happy
आता 'भूवरी महिषासुरवध जाहला!' ची वाट आतुरतेने बघत आहोत.

आई, मी रामासारखा नाही दिसत गं. जेक सुलीसारखा दिसतोय....">>>>>>> Biggrin

एक मंतरलेली रात्रचा एपिसोड तर भन्नाटच... मस्त, आवडलं.

हे सगळं प्रकरणच अशक्य गोड झालंय Happy पाच मिनिटांसाठी केवढा खटाटोप केलास गं तुझं काम सांभाळून, खरंच कौतुक आहे !

अप्रतिम !!
रावणाच्या पुतळ्याला खाली पडून त्यावर रामाचा पाय..तरीपण तो विश्राम मुद्रेत Lol
लेख फार आवडला...

Pages