तुम्हांला भेटलेले गावातील नमुने

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 October, 2011 - 00:16

गाव! गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात अनेक प्रतिमा. नदी. डोंगर. नदीकाठचं देऊळ. कुठे गावातला मारुतीचा पार. पारावर रंगलेल्या गावकर्‍यांच्या गप्पा. रंगवून सांगितलेले अनेक प्रसंग. आणि या प्रसंगांतून डोकावणारी गावातली माणसं. भोळी, बेरकी, इरसाल, मासलेवाईक, नमुनेदार! द. मा. मिरासदारांच्या नाना चेंगट किंवा बाबू पैलवानासारखी. पु.लं.च्या अंतू बर्व्यासारखी. पण ही झाली आपल्या नमुनेदार वागण्यानं, बोलण्यानं आठवणींत रुतून बसलेली काल्पनिक माणसं! तरी खरीखुरी, आपल्या आसपासची वाटणारी.

इथे तुम्हांला लिहायचंय तुम्हांला भेटलेल्या गावातल्या अशाच खर्‍याखुर्‍या, नमुनेदार माणसांविषयी. करा तर मग सुरुवात!

विषय: 
Groups audience: 

नाय बोवा, आय घालण्याइतपत वास्तव किस्से नैत
ठॉऑऑऑ Rofl
लिम्ब्या पडलो खुर्चीतुन हसताना. Lol

खुळखुळा.

लिंब्या मेल्या वात्रटचैस.

मी शुद्ध पुणेरी. पण आमच्या सासरी सांगलीस फार काय काय नमुने भेटत असत. चुलत सासरे स्वतःच एक.
बजाज चेतक गाड्या, मोटरसायकलींचे सर्विसिन्ग इत्यादी करणार. घरी येऊन रम, चारमिनार सिगरेट आणि काकूच्या हातचे चमचमित सामिष जेवणार. गाडीचा ब्रेक आणि चाकाचे चार नट नक्की चेक करा म्हणून पोरांना बजावित कारण नैतर गिर्‍हाइक परत येणारच नाही. घरी बंदुकीचा व्यापार त्यामुळे त्या ब्यादी संभाळत. रात्रीच्या कातर अंधारात शिळेवर जुनी गाणी वाजविणे ही आवड. गाणी कसली तर तीर खाके जायेंगे रात ने क्या क्या गम दिखाये असली. दुकानात कायम गाड्यांची कामे करत करत काहीतरी किस्से शेअर करत बसणार. जुन्या ब्रिटिश बाइक्स, माधवनगरचे घर, जुन्या शिकारी हे आवड्ते विषय. त्यांच्या पत्रावर गॅरेज मध्ये हाताखाली काम केलेल्या मुलांना बजाज आटोत नोकरी मिळायची असे ऐकले आहे. पैशाची चणचण मोठा परिवार पण कायम हसत मुख.

अजून एक लिहीणारे. काकांचेच मित्र वसंतराव. Happy पण जरावेळाने. काम कोण करेल माझा काका!

>>कातर अंधारात शिळेवर जुनी गाणी वाजविणे ही आवड
आधी कळेना की दगडावर गाणी कशी वाजवित असतील, मग कळाला खरा अर्थ Happy
>>काम कोण करेल माझा काका Lol

मामी Happy अजून पन्नास वर्षांनी तुमची नात याच बाफावर तुमच्याबद्दल लिहिल हे नक्की Proud

आजोबा आणि आज्यांचे कितीतरी किस्से, गंमती. एकदा पाहुण्यांची पंगत बसली. आजी वाढायला. तेव्हा खाली जमिनीवरच स्वयंपाक, आणि स्वयंपाकघरातच रांगेत पंगत. आजोबा अर्थातच रांगेत पहिले, म्हणजे जवळजवळ चुलीजवळ. मामीने केलेल्या गरम भाकरी आजी सर्वांच्या पानात वाढत होती. आजोबांना उडदाचे पापड फार आवडत. शेजारीच बसलेल्या आजोबांच्या पानाजवळ आजीने भाजलेला पापड सरकवला. आजोबा जेवत राहिले, पण पापड शेवटपर्यंत तसाच. हात धुतल्यावर आजीने विचारलं, 'हे काय, पापड का नाही खाल्ला?'

पापडाकडे तिरकं बघत आजोबा उद्गारले, 'मला टाकला होता होय तो. मला वाटलं आपल्या कुत्र्याला..!'

(आयमायवरून शिव्या आजोबांच्या तोंडातून सहजच बाहेर पडत. पण घरात पाहुणे होते. प्रत्येक गोष्टीत आयची गरज नसते, हे त्यांना कळलं असावं.)

मा़झ्या पण आजीचे किस्से भरपुर. आमच्या मामाचं घर समुद्राच्या समोर. तिकडे कोळी लोकांच्या बोटी किनार्‍याला लागल्या की अगदी ताजे मासे वगैरे तिथल्या तिथे विकत घेता येतात. एके दिवशी आम्ही ओटीवर बसलेलो असताना कोणीतरी बोट आल्याचं सांगितलं. आई-मावश्या आणि आम्ही पोरं सगळी समुद्राकडे पळालो.
दोन-तीन कोळणी टोपल्यात मच्छी लावत होत्या. एकीकडे मोठी मोठी ताजी पांढरी कोळंबी होती. भाव विचारल्यावर म्हणे "शंभर रुपये पाव!"
सगळे घरी निघालो परत. वाटेत माझी मामे बहीण म्हणाली, "आता आजी विचारेल, 'काय मच्छी आली होती?' मग आपण सांगु 'कोळंबी होती. पण शंभर रुपये पाव म्हणाली.' मग ती म्हणेल,' बाप रे! कोण होती कोळीण? ' 'मिलिंदची आई सांगितल्यावर बोलेल.." हो...ती महागडीच हाय!" सगळे थोडे हसलो आणी घरी आलो.
आजी ओट्यावरच होती. "काय गं काय नाय मिळालं?"
माझी आई, " काय नव्हतं. कोळंबी होती एकीकडे. बोलते शंभर रुपये पाव. कशाला घ्यायची ती. कोणाला पुरणार आहे?"
आजी "बाप रे!" अर्ध्या मिनीटाचा पॉज. मग माझ्या मामेबहिणीला: " कोण होती कोळीण?"
"मिलिंदची आई" इती माझी मा ब.
आजी: "हो..ती महागडीच हाय!"
सगळ्यांची हहपुवा झाली आणि आजीला काहीच कळलं नाही आम्ही का हसतोय ते Happy

बहुतेक हा किस्सा 'हाबाडा' या प्रकारासाठी मराठवाड्यातील वृत्तपत्र जगतात प्रसिद्ध असलेल्या बाबुराव आडसकरांच्या व‍डीलांचा आहे.
जुन्या काळात एकदा ते जालन्याला चित्रपट पहायला गेले. मोठा फेटा, धोतर, उपरणे असा त्यांचा पेहराव. त्यांना टॉकीजच्या दरवाजाववर अडवले गेले. त्यांनी चिडून गोंधळ घालायला सुरुवात केली... तुम्ही काय समजता काय आम्हाला? मनात आणलं तर इथल्या इथे ही टॉकीज ‍विकत घेऊन टाकेन.. इत्यादी...इत्यादी... गर्दी जमल्याने टॉकीजचा मालक पण तिथे आला.. तो म्हणे दम असेल तर घेऊनच दाखवा ही टॉकीज विकत... आडसकरांचे वडील म्हणाले चल सांग किती किंमत द्यायची ते..
टॉकीजच्या मालकाने किंमत सांगितली. तेवढे पैसे घेऊन यायला सांगितले...आडसकरांचे वडील म्हणाले - अरे हॅट! मी कशाला कुठे जाऊ...एवढ्‍या दमड्या तर मी माझ्या फेट्यात बाळगतो... त्यांनी तिथेच फेटा काढला आणि सांगितलेली किंमत मोजली व टॉकीज विकत घेतली.. त्या टॉकीजची यंत्रे आमच्या तालुक्याच्या गावी आणली गेली...

हा आमच्या पणजोबांचा किस्सा. घरात ऐकलेला.
सुगीचे दिवस होते. खळ्यावरुन धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या बैलगाड्या वाड्यात आणून रिचवल्या जात होत्या.
वाड्यातील सगळ्या खोल्या धान्याच्या पोत्यांनी भरल्या. पणजोबांनी खोती** दिलेल्‍या लोकांना वरच्या माडीत पोते नेऊन टाकायला सांगितले. खोती घेतलेल्यांपैकी एक डांबरट गडी हळूच बोलला -
'किती उंच हाये ही माडी.. या बामणाला काय लागतंय माडीत पोती नेऊन टाका म्हणायला.. स्वत: टाकुन दाखव म्हणावं.. '
ते पणजोबांनी ऐकले. ते त्या गड्याला काही बोलले नाहीत. त्यांनी बाहेर जाऊन बारा पायल्यांचे पोते स्वत:च्या पाठीवर घेतले आणि दण दण पावले टाकीत माडीवर नेऊन टाकले. सगळे पहात राहिले.
खाली आल्यानंतर त्यांनी पायातलं खेटर काढुन त्या गड्‍याच्या थोबाडात मारलं..
आणि म्हणे -
'टाक आता वर नेऊन पोते.. '
** खोती देणे - सुगीच्या दिवसात ज्वारी, बाजरी काढायला माणसे लावणे. त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात आधीच बोली करुन धान्य दिले जाते.

आमच्या राहत्या इमारतीच्या लिफ्टसाठी सुरूवातीला लिफ्टमन ठेवले होते. गावाकडून शहरात नोकरीच्या शोधात आलेली तरुण मुलं असायची ती. पगार काही फार नव्हता. पण कामही जास्त नसायचे. टेरेसच्या वरच्या मजल्यावर लिफ्टरूम होती, तिथेच हे लिफ्टमन रात्री पथारी पसरायचे. तिथे शेजारी आडोशात जेवण बनवायचे. तर सुरूवातीची एक-दोन मुले जास्त चांगल्या पगाराची नोकरी लागल्यावर लिफ्टमनची नोकरी सोडून गेली. आता त्यांच्या जागी बहाद्दूर नावाचा गुरखा लिफ्टमन कामावर रूजू झाला. पक्का गावाकडचा. ठेंगणा, मिचमिच्या डोळ्यांचा, चपट्या नाकाचा, सानुनासिक बोलणारा असा हा बहाद्दूर.... कामाला थोडा मंदगती होता, आणि सुरूवातीला तो काय बोलतोय हे आम्हाला कळायचे नाही आणि आम्ही काय म्हणतोय ते त्याला कळायचे नाही. हळूहळू आम्हाला एकमेकांची बोली, उच्चार कळू लागले. इमारतीतली बडी प्रस्थ कोण आहेत याचा त्याने लगेच छडा लावला होता. ती माणसं येता-जाता त्यांना तो ''शलाम शाब'' करायचा. तत्परतेने त्यांच्यासाठी लिफ्टचे दार उघडणे-बंद करणे, त्यांच्या गाडीवर फडके मारणे, त्यांची किरकोळ कामे करणे वगैरे करायचा. पण बाकी लोकांना कधी तो आपल्या जागेवर, म्हणजे लिफ्टमधील स्टुलावर बसलेला दिसला नाही. कोणी विचारले, तक्रार केली की भोळ्या चेहर्‍याने म्हणायचा, ''शाब, खाणा बणा रहा था |'' किंवा ''शाब, खाणा खा रहा था |''

दिवसा-रात्री कधीही तो जागेवर नसला की शेवटी आम्हीच त्याचा हा डायलॉग स्वतःशी बोलू लागलो.
मजेची गोष्ट अशी होती की खरोखरी त्याला डाळ / भाजी - भात करायला सकाळ - संध्याकाळ दोन दोन तास लागायचे. नक्की काय करायचा कोणास ठाऊक! आणि हो, जुन्या हिंदी पिक्चर्सची गाणी त्याची अतिशय लाडकी. कानाशी छोटा ट्रान्झिस्टर लावून खुशीत गाणी ऐकायचा.... मूड छान असेल की शीळ वाजवायचा. रविवारी त्याला सुट्टी असायची. मग त्या दिवशी त्याची रंगीबेरंगी नेपाळी टोपी, जाकिट घालून बाहेर जायचा.

एरवी कधी कोठे जाताना / येताना दिसला की इमारतीतील पोरं त्याला मुद्दाम हटकायची, विचारायची, ''बहाद्दूर, कहाँ जा रहे हो?'' त्यावर त्याचे ठराविक उत्तर, ''खाणा बणाणे जा रहा हूँ'' किंवा ''खाणा खाणे जा रहा हूँ''!! त्याच्या या ''खाण्या''मुळे नंतर त्याने दुसरी नोकरी धरली तरी तो आमच्या सर्वांच्याच चांगला लक्षात राहिला.

गावाकडच्या एका चांगल्या माणसावर (बाबल्या) कोर्टात केस चालली होती. गावातला एक वयस्कर (गण्या) हा केसमधे विरोधी पक्षाचा साक्षीदार होता. कधी भेटला की नेहमी कोर्टातल्या केसबद्दल बोलायचा.
एकदा प्रतिपक्षाच्या वकिलाने त्याला चांगलाच कचाट्यात पकडला. तर हा माणूस मला म्हणतो,
'त्या बाबल्याचो वकील मात्र थर्डकला.....स'. फक्त त्याचे अविर्भाव असे होते की वकिल किती ग्रेट आहे. त्याला वाटायचं की फस्टपेक्षा सेकंडक्लास चांगला, आणि थर्डक्लास म्हणजे सर्वात चांगला... Happy

आजोळी आमचे काका (मावशीचा नवरा) पाहुणे आले म्हणून मामांनी कोंबडी वगैरेचा बेत केला. काकांना थोडीतरी घेतल्याशिवाय मस्त जेवल्यागत वाटत नाही. मामांनी एक क्वार्टर आणली, पण आजीच्या धाकामुळे घरात पिणं शक्य नव्हतं. मग शाळेच्या मागे अंधारात गपचुप खेळ आटोपायचा साल्या-मेहुण्यांचा बेत ठरला.

मामा जरा तर्‍हेवाईकच होते आमचे. कपडे घालून बाहेर कुठे चाललात, असं आजीने विचारू नये, म्हणून नाईटपॅंट-बनियनवरच पण खांद्यावर टॉवेल टाकून मेहुण्यांना खुणावून चपला घालून बाहेर पडले. बाहेर पडताना ओसरीतल्या पलंगाखाली लपवलेली बाटली टॉवेलखाली लपवली. (नाईटपँटला खिसा नसावा).

कोंबडी अशीच कोरडी खावी लागतेय का काय या चिंतेने ग्रासलेल्या काकांना प्रचंड आनंद झाला. ते चटकन पलंगावरून उठले आणि मामांसोबत जायला निघाले.

पायर्‍या उतरताना मात्र मामांचा जरा गोंधळ झाला. टॉवेल खांद्यावरून सरकला, आणि तो सावरायच्या नादात बाटली दगडी पायरीवर पडून खळकन फुटली. आजीला कळतेय की काय, या भितीने कावरेबावरे झालेल्या मामांनी पायाने त्या काचा कशाबशा एका जागी गोळा केल्या, आणि अबाऊट टर्न करून घरात जाऊन पलंगावर बसून राहिले.

बिचारे काका तोवर उत्साहाने पायर्‍या उतरून अंगणात गेले होते. बाटली पडलेली पाहून काकांचाही चेहरा पडला. त्यांनी घाईघाईने विचारलं, 'आता?'
मामांनी तत्परतेने उत्तर दिलं, 'आता काय? जेवायचं! चला घरात!!'

काकांनी सैरभैर अवस्थेत कसंबसं जेवण केलं. दुसर्‍या दिवसापासून सार्‍या नातेवाईकांत जाहिरात सुरू केली- 'मी आता जन्मात जाणार नाही त्याच्याकडे जेवायला. माझा 'असा' पाहुणचार केला त्याने!'

नंतर काही वर्षांनी काका-मामा एकमेकांचे व्याही झाले. आजही ती गोष्ट सांगताना ते तस्साच पोपट झाल्यागत चेहरा करून सांगतात, आणि आम्ही हसून हसून वेडे होतो.

Pages