सीमोल्लंघन

Submitted by राजेश घासकडवी on 8 October, 2011 - 20:03

सीमोल्लंघन
दसरा!

रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. सीतेला पळवून नेल्यानंतर, तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.

पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह. आणि एका नवीन लढ्याची तयारी सुरू झाली.

रामासाठी युद्ध संपलं, तर पांडवांसाठी सुरू झालं. रामायणात विजयादशमी वादळानंतरची शांतता म्हणून येते. नवीन युगाची नांदी घेऊन येते. महाभारतात ती वादळापूर्वीची शांतता नोंदते. नवीन काहीतरी घडवण्यासाठीच्या अटळ लढ्याची ग्वाही घेऊन येते. इतरही काही समांतर स्थळं आहेत. रामाला त्याची पळवलेली सीता परत मिळाली. पांडवांना नाईलाजाने लपवून ठेवावं लागणारं त्यांचं स्वत्व परत मिळालं. अयोध्येच्या राज्याला राम परत मिळाला, तोही पांडवांच्या स्वत्वासारखा अयोध्येपासून नाईलाजाने दूर गेला होता.

म्हणून दसरा हा नवीन सुरूवातीचा दिवस. आपल्या आयुष्यावर पडलेल्या, स्वतःच घालून घेतलेल्या सीमा ओलांडायचा दिवस. नवीन राज्य घडवण्याचा दिवस. त्यासाठी लढण्याची शस्त्र हाती घेण्याचा दिवस.

अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण कधी कधी ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.

कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.

इंग्लिश म्हण आहे, काही जण थोर म्हणूनच जन्मतात, काही थोरवी प्राप्त करतात तर काहींवर थोरपणा लादला जातो. तसंच सीमोल्लंघनाची गरजेच्या बाबतीतही म्हणता येतं. काही लोक जन्मजात भटके असतात, काही भटकेपणा शिकतात, तर काहींवर ही भटकण्याची गरज लादली जाते. जे काही कारण असेल, त्या कारणासाठी या दसऱ्यानिमित्त सर्वांनाच आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी, कुठच्या ना कुठच्या प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी शुभेच्छा.

(दसरा होऊन काही दिवस झाले याची कल्पना आहे, पण उशीरा का होईना, हे लेखन गोड मानून घ्यावं ही विनंती)

गुलमोहर: 

@ saati - छे छे, माझ्या मध्यमवर्गीय आयुष्याच्या सीमा ओलांडून बॉंडच्या व्हिलनप्रमाणे सर्व जग ताब्यात घेण्याचं माझं स्वप्न आहे. ते हासिल करण्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे. Wink

व्वा! राजेशजी.. !! आपल्या अभ्यासपुर्ण लेखांचा/ प्रतिसादांचा स्वाद इथेही मिळणार... स्वागत. Happy

(दसर्‍याचा हँगोव्हर म्हणावा काय? )
हा हा... अहो हॅंगोव्हर गटारी अमोशेनंतर येतो. दसऱ्याच्या सुमाराला सीतेला दिसलेल्या सुवर्णमृगाप्रमाणे नयनांना सुखावणाऱ्या अतिपवित्र शब्दांच्या आपटपानांची उधळण झाली होती. Wink