काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर......

Submitted by adwaitk007 on 29 September, 2011 - 05:12

"अद्व्या मर्दा भूक लागलिये"
"होय रे. आज या प्रोजेक्टच्या नादात वेळ एकदम फास्ट निघून गेला"
"अरे भावांन्नो आणि कोणाला भूक लागलिये काय?"
एकदम सगळे जोरात ओरडले "हो!!!"
"चला मग डबे काढा"
"मी नाय आणला","मी पण नाही","च्यामारी म्या भी नाय आणला आता काय करायचं?"
"अरे मग ३ डब्यात आपण ८ जण कसे भूक भागवणार?"
"चला मग काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर ला जाऊयात"
"हे आणि काय नविन"
"ते नविन नाय, तू नविन आहेस"
"पण ही भानगड नेमकी आहे तरी काय?"
"अरे त्ये एक मिसळपावचं नवं हॉटेल निघालय हायवेवर"
"हायवे??? अबे किती वाजलेत बघ! आज सकाळचा सगळा वेळ या प्रोजेक्टमधे घालवलाय. जरा लेक्चर-बिक्चर पण करूयात की"
"होय! लय सिंसियर डोक्याचा तू. चल लई शाना हाईस. पुढचं लेक्चर त्या धोंडेच हाय. त्यो गडी कवा पण आत घेतोय. लेट ये, अगदी प्रेसेंटी घ्यायच्यावेळी आलासतरी कायपण म्हणत नाही."
"हम्म्म्म. तेपण खरच आहे म्हणा. जाऊयात पण अर्ध्यातासात काहीपण करून परतायचं"
"ए तू गपरे. गाडीची किल्ली मला दे आणि गप माज्यामागं बस"
झालं, एकूण ३ गाड्यांवरून आमची ८ जणांची गॅंग नविन निघालेल्या मिसळपावच्या हॉटेलाकडं मार्गस्थ झाली.

--------------------------------------------------------------------------------

"काकी, ८ मिसळपाव द्या. ए कोण कोण तिखट घेणारे ?"
"मी ट्राय करेन"
"ए बामणा! तुला हे खाऊन माहित नाही. उगाच तिखट घेचिल आनि नंतर बोंब मारत सुटशील"
"ए लई शाना आहेस. गप मला तिखट ऑर्डर कर. तुला दाखवतोच ब्राह्मणांत पण किती दम असतो ते!"
"बर बाबा. मानलं तुला. उगाच शापबिप देचिल. यापर्षी कधी नव ते ऑल क्लियर झालोय, उगाच तुझ्या शापानं काय झालं-बिलं तर माझा बाबा मला पायतानानं मारंल"

काऊंटरवरच्या काकूंसकट हॉटेलातली सगळी लोकं खदखदून हसली. असली टारगट पोरं कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या हॉटेलात अवतरली होती. फायनल इयर असल्याने कदाचित आम्ही आणखीनच टारगट बनलो आहोत.

थोड्या वेळातच गरमा गरम मिसळपाव समोर आली. आधीच भूक लागलेली आणि त्यात हॉटेलात सुटलेल्या खमंग वासाने तोंडाला जबरदस्त पाणी सुटलेलं. मी पहिला घास खाणार तोच माझ लक्ष सगळ्यांकडं गेलं. सगळे लेकाचे मला एकटक पाहात होते.

"काय रे! काय बघताय?"
"काय नाय, तुजी गमजा बघायचिये"

मग लक्षात आलं, च्यामारी आपण तिखट ऑर्डर दिलिये. झालं! आता इज्जत का सवाल था! Happy हळूच एक चमचा मिसळ उचलली आणि तोंडात टाकली. तोंडात आगीची पेटती काडी टाकल्यासारखा जळजळीत चटकाच जणू बसल्यासारखं वाटलं जीभेला. कसतरी करून तोंडावर हसू ठेवून घास गिळला.

"काय काय सायेब? कशी काय वाटली मिसळ?"
"एक ख्ख्ख!ख्ह!ख्हौओ........ पाणी...... द ह्ह्ह्ह्ह!"
जबरी ठसका लागला! सगळे लोळलोळ लोळले हसून. गटागट पाणी प्यालो आणि कसाबसा ठसका शांत केला. आता चॅलेंज स्वीकारलेलं, ते कसं मोडणार? त्यामुळं ती झणझणीत मिसळ एका दमात मटकावली. पहिलेच जीभ भाजल्याने पुन्हा त्रास नाही झाला!

"आयला. ह्यानं संपवली की रे"
"मग! बोललेलो! माझ्याशी पंगा नाय घ्यायचा!"
"बर बाबा! तु जिकलास!"

जवळ जवळ अर्धा-पाऊण तास निघून गेला. दंगा मस्तीत वेळ कधी निघून गेला कळालच नाही. सहज घड्याळाकडं लक्ष गेलं तेव्हा वेळेच भान आलं.

"अरे मुर्खांनो अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळ झालाय. चला आवरा लवकर. संपवा मिसळ आणि चला कॉलेजकडं"
"ए टेन्या! तुझं झालं म्हंजे सगळ्यांच झालं होय? थांब जरा. आणि धोंडे सराची जास्त काळजी नको करू. मी बरोबर सेटिंग करून ठेवलय. काय बोलनार नाही त्यो"
"ते कायपण असो! मी निघालो, यायच असेल तर या."
"ए थांब की मर्दा. आलो आम्हीपण. झालच थांब"
----------------------------------------------------------------------------------------

साधारण धोंडे सरांचा तास संपायला १५ मिनिट बाकी असताना आम्ही कॉलेजवर पोहोचलो. वर्ग शोधण्यापासून सुरवात. दोन-तीन व्यवस्थित सुरू असलेले वर्ग डिस्टर्ब करून फायनली आमचा वर्ग सापडला.

"मे आय कम ईन सर?"
"येस .प्लीज कम इन"
"बग. बोललेलो किनी? आपला मानूस हाय. काय त्रास देनार नाय. निवांत आत घेईल"
"ए! गप चला आत. ऐकले तर आत घेणार नाहीत."

पटकन मागच्या मोकळ्या बेंचवर जाऊन बसलो. बॅक बेंचरच आम्ही. नेहमीचे बेंच ठरलेले.

"आत्ता आलेले सगळे जण उभारा!"
झालं! सगळ्यांची टरकली. काहीतरी लोचा झालाय! सगळे उभारलो.

"कोठे गेला होतात?"
पायात सुतळी बॉंब फोडावा तसा सरांचा हा प्रश्न थाडकनं आमच्यावर आपटला. आमच्या सगळ्यांच्या माना खाली.

"अरे बाळांनो मी तुम्हाला विचारतोय...... कुठे गेला होतात? टेल मी फ्रॅंकली"
परत सगळ्यांच्या माना खाली. काय बोलणार म्हणा!

"कुलकर्णी, कोठे गेला होतात इतका वेळ? मास्तर आपलाच आहे, कधीपण आत घेईल असा जर समज झाला असेल तर तो काढून टाका मनातून. काय कुलकर्णी बरोबर आहे ना? असच वाटलेलं ना?"

"नाही सर! तसं नाही."

"मग कसं? कुठे गेला होतात?टेल मी फ्रॅंकली"

"सर ते आम्ही.......! सर ते प्रोजेक्ट...."

"टेल मी द ट्रुथ. टेल मी फ्रॅंकली"

माझी मान खाली. काय सांगणार? खोट बोलणं सुचेना, खरं बोलण जमेना! आणि आमचे विद्वान मित्र लोक मागून प्रॉंप्टिंग करत होते.

"अद्व्या सांग पोरिंच्या मागं गेलेलो. ख्या ख्या ख्या"
"अरे नाही, ऑफिसात बोलवलेलं म्हणून सांग"
"नायतर सरळ सांग काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला गेल्तो म्हनून"

"ए */?*# न्नो गप बसा. इकडे माझी वाट लागलिये आणि तुम्ही मागून मजा करताय??"
(मी हळूच पुटपुटलो)

"हम्म! बोला कुलकर्णी."
"तो तुझ्यामागे कदम आहे काय? काय तरी बोलतोय तो. हानं कदम तुम्ही सांगा कुठे गेलेलात?"

"सर ते... आमी....."

"बोला पटकन. माझ्याकडं वेळ नाही. असं कोणतं काम तुम्हाला पडलेलं की माझं लेक्चर चुकवून ते पुर्ण करण्यात तुम्ही गुंतला होतात. चला लवकर लवकर बोला. कदम बोला पटकन टेल मी फ्रॅंकली"

"सर आमी सगळे काटा किर्रर्रर्रर्रर्रररररला मिसळपाव खायला गेल्तो"

कदमाच्या या "फ्रॅंकली" उत्तराने आता सरांच्या पायात सुतळी बॉंब फुटल्यासारखी सरांची अवस्था झाली. आपण खुपच सज्जन आहोत अशा इनोसंट चेहर्‍याने कदमाने झटकन उत्तर दिले. सगळा वर्ग खदादा हसायला लागला! मास्तरचं डोकं जाम भडकलं! त्यांनी सरळ डस्टर, पुस्तक घेतलं आणि वर्ग सोडून तावातावाने निघाले. दरवाज्यापाशी गेल्यावर आमच्याकडे बघून म्हणाले,

"पुन्हा जर तुम्ही लोक माझ्या लेक्चरला दिसलात तर मी लेक्चर घेणार नाही"
आणि सर निघून गेले. त्यानंतर जो काय आम्ही दंगा केलाय तो शब्दात सांगणं खरच कठीण आहे. "टेल मी फ्रॅंकली" चा इतका फ्रॅंकली कोणी अर्थ घेईल याची कदाचित सरांनाही अपेक्षा नव्हती.

ते काहीही असो, पण हा दिवस खरच आमच्या कॉलेज लाईफमधला काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर..... दिवस ठरला! Happy

-अद्वैत कुलकर्णी
पुर्वप्रकाशित :
मी अद्वैत:काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर......
marathi corner

गुलमोहर: 
शब्दखुणा: