महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

Submitted by मुरारी on 25 September, 2011 - 01:30

कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले......
कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं.
गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली
अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता.
कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो.
MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो. फक्कड चहा वगेरे झाला , आमचं अजिंठ्याला जायचं planning होतं, मग "मामा" म्हणाले कि आधी लांबची ठिकाण करून या
(आम्हाला "अंबाजोगाई" ला जायचं होतं), आम्हाला काय.. कुठेतरी जायचं तर होतंच .
फ्रेश होऊन ९ ची अहमदपूर ला जाणार "स्पेशल" गाडी पकडली . जादा गाडी असल्याने रिकामीच होती. आरामात बसलो. आमचा अंदाज होतं ३ ४ तासात पोहोचू , तर मास्तरांनी बॉम्ब टाकला ३ वाजतील.
(बापरे ९ ते ३ , सहा तास? ) काय करणार "आलिया भोगासी" (औरंगाबाद-अंबाजोगाई अंतर २५० km आहे).
एकदाचे ३.१५ ला आम्ही पोहोचलो, सकाळ पासून फक्त "पोह्यावर " होतो. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,गेल्या गेल्या सिताफलांचे ढीग दिसले, मग काय त्याच्यावरच ताव मारला ,
एवढी गोड सीताफळं कधीच खाल्ली नवती....
आम्हाला दुसऱ्यादिवशी सकाळी "अभिषेक" करायचा होता , म्हणून मग आजच्या उरलेल्या वेळात "परळी वैजनाथ" ला जाण्याचं ठरलं. रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते...
एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, पोहोचे पर्यंत अंधार पडलेला होता. पटापट जाऊन दर्शन घेतलं.
सुदैवाने गर्दी अजिबात नव्हती, छान दर्शन झालं. थोडावेळ थांबलो आणि लगेच निघालो

(वैजनाथाच देऊळ)

परत तोच रस्ता .. आता तर भयाण अंधार होता साथीला ..आम्ही सोडलो तर कोणीही चिटपाखरू नव्हतं आजूबाजूला, मधून मधून एखादं वाहन जायचं ... पण मला ती शांतता पण खूप भिडली होती... वेगळंच वाटत होतं.
एकदाचे पोहोचलो कसेतरी.. दिवसभराचे उपाशी. आता तरी काहीतरी खायला मिळेल या आशेवर होतो . भक्त निवासात गेलो तर ९.१५ पासून जेवण मिळेल असे उत्तर आले आणि आता तर फक्त ८ वाजले होते , एवढं वेळ थांबणे कोणाच्यानेच शक्य नव्हते
मग परत बाहेर आलो, हॉटेल नावाचा प्रकार तिथे दिसतंच नव्हता. एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
भाज्यांमध्ये एवढं तेल होतं कि भाजीत तेल घातलंय कि तेलात भाजी,तेच कळत नव्हतं. कसेबसे दोन घास गिळून बाहेर पडलो. तरी आल्यावर झोप कधी लागली ते कळलंच नाही.दुसऱ्या दिवशी आंघोळ वगेरे करून जिच्यासाठी आलोय तिचं दर्शन घेतलं "योगेश्वरी"..................
अतिशय पुरातन पण अतिशय सुंदर असं "हेमाडपंथी शैलीचं मंदिर".
(देवळात फोटो काढायची परवानगी नाही , म्हणून आंतरजालावरून साभार )

देवीची मुद्रा बघून भवताल विसरायला होतं.....
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बक्ये गौरी , नारायणी नमोस्तुते"
हेच भाव दाटून येतात.बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची "कुलस्वामिनी " आहे ही. मला तिच्या चरणांशी बसून अभिषेक करण्याचा योग आला. देवीची मूर्ती सुद्धा "करारी", डोळे ऊर्ध्व दिशेकडे रोखलेले .
अभिषेक झाल्यावर नेवेद्य. पण तो १२ वाजता असतो, मग मधल्या वेळात आसपास च्या परिसरात भटकायला निघालो.
पहिलं ठिकाण कवी मुकुंदराजांची समाधी - एका डोंगरातल अतिशय रमणीय ठिकाण , इथे म्हणे मोर दिसतात. आम्हाला पण एक दिसला पण तो खूप लांब होता.समोरची दरी सुद्धा रमणीय दिसत होती.

बाकी पावसाची रिप रिप सुरु असल्याने वातावरण अतिशय "प्रसन्न" झालं होत.
त्यानंतर "योगेश्वरी" देवीचं मूळ मंदिर बघितलं.

तिथून पुढे एक "शिवाचं" प्राचीन देऊळ, इतर भग्नावशेष आणि दासोपंतांची समाधी पाहिली

धर्मशाळा

जागोजागी असे हत्ती दिसत होते..... आता सगळे भग्न झालेत पण .....

त्यातल्या त्यात माझी फोटूग्राफी

हे बघून रत्नाकर मतकरी यांच्या "गहिऱ्या पाण्याची " आठवण झाली

काही भग्नावशेष आणि तुटलेली दीपमाळा

मधेच मेंढ्यांचा कळप दिसला .. मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.

नुकताच पावसाळा संपलेला असल्याने.... रानफुलांचा जणू उत्सव त्या डोंगरावर फुललेला होता.....
त्यातल्याच काहींना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.... कॅमेरा अतिशय सामान्य असल्याने विशेष काही टिपू शकलो नाहीये...

निळाई

त्यातच वेगळी "शेड" सुद्धा .. निसर्गाची कमाल आहे

या फुलांपेक्षा लहान फुलं मी आजवर कुठेही पाहिलेली नाहीत........

हे सगळं बघेपर्यंत १२ वाजत आलेले होते, देवीच्या नेवेद्याची वेळ झालेली होती....
परतलो , जेवलो, देवीच दर्शन घेऊन ते रूप डोळ्यात साठवत.......
औरंगाबादेकडे निघालो.......

पुढच्या भागात दौलताबाद दर्शन

क्रमश:

गुलमोहर: 

@प्रसन्न अ
>>>मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.<<<

फोटो टाकले नाहीत कि दिसत नाहीत?
बाकी लिखाण चांगले आहे.

मलाही फक्त देवीचाच फोटो दिसतोय. बाकीचे पण बघायचेच आहेत. परत लोड करुन बघता का?
धन्यवाद.

आई योगेश्वरीची अख्यायिकाही थोडक्यात इथे द्यायला जमली तर द्या.

परत जावस वाटतंय >> Happy आहेच तसं
मेवाड नावाचं हॉटेल होतं बस स्टँड जवळ.. तिथे जेवण छान मिळायच बर्याच वर्षापूर्वी.

मला वारंवार औरंगाबादला जावे लागते , पण मी मस्साजोगचे पोहे अवॉइड करतो , काय की मला
नाही आवडले . सॉरी. तेच तेच नेहमी गरम करुन देतात म्हणुन की काय कळत नाही.
प्रसन्न , आंबेजोगाई / परळी फेरफटका फोटोसहीत वर्णन आवडले.

>>>मला वारंवार औरंगाबादला जावे लागते , पण मी मस्साजोगचे पोहे अवॉइड करतो , काय की मला
नाही आवडले . सॉरी. तेच तेच नेहमी गरम करुन देतात म्हणुन की काय कळत नाही.
प्रसन्न , आंबेजोगाई / परळी फेरफटका फोटोसहीत वर्णन आवडले.<<<

अगदी माझा पण हाच अनुभव आहे..

प्रसन्न, नमस्कार,
आंबेजोगाईला जायला आता मुंबै-लातुर गाडीनं रात्रि कल्याणहुन जाता येत. लातुर-आंबेजोगाई पिकअप आणी ड्रोप गाडीची सोयही होते. तिथे कृष्णाई नावाच होटेल आहे . जवळच नागनाथ-परळीलावैजनाथ ही करत येतील.
मी माग्च्या वेळेला परळीआंबेजोगाई केल्यं येत्या नवरात्रात नागनाथ करणार आहोत.
फोटो छान दिसतायेत..
अश्वे हे मुळ देउळ आहे ... पुजेच्या मुर्तीचा फोटो आणी देवळात फोटो काढायला मनाई आहे .

मस्साजोगच्या पोह्यांची चव निव्वळ अप्रतिम.....अनुमोदन.

मी मार्केटिंग करत असतांना ह्या सर्व भागात फिरलो आहे. काहिसा रखरखीत, कडाक्याचे ऊन असणारा हा भाग आहे. लालभडक रस्सा हे ईथल्या भाज्यांचे वैशिष्ट्य.

अंबेजोगाई मध्ये पाकिटमारांपासून खुप सावध राहावे, पाकिटमारांचा जाम सुळसूळाट आहे, मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, एकाला पकडून दिला होता, नंतर काय झाले माहित नाही.

दोन - तीन मातब्बर नेत्यांचा हा जिल्हा ऊदा. गोपीनाथ मुंडे (परळी वैजनाथ), प्रमोद महाजन (अंबेजोगाई), शेजारी विलासराव देशमुख (लातुर)

चान्गले लिहीलय! Happy
मला पण फोटू नै दिसतेत Sad
मी नुकताच ५ ऑगस्टच्या दरम्यान, सकाळी निगडीहून पुणे उदगीर यस्टीने अम्बेजोगाईला जाऊन, देवळासमोरील धर्मशाळेत आयत्या वेळेस व्यवस्था लावुन तिथुन परळीवैजनाथला जाऊन परत आलो व रात्री धर्मशाळेमधे उत्कृष्ट जेवण (केवळ ४० रुपये) जेवलो, दुसरे दिवशी पहाटे पुन्हा देवीचे दर्शन घेऊन, तिथे तन्त्रोक्त देवीसूक्त व सप्तशती सार वाचून निघालो ते तुळजापुर गाठले, तिथे दोन्/तिन तास दर्शनबारीत, एखाद तास इतर असे धरुन मग लिम्बी कोल्हापुरला गेली, तिचे एका दिवसात तिन देवीन्चे दर्शनाचा योग होता.! मी मात्र रजा नसल्याने परत फिरलो , यष्टीचा ४ दिवसान्चा पास ६०० रुपयात मिळतो, त्याने फिरलो! मजा आली.
वरील लेख वाचल्यावर हे सगळे आठवले Happy

मस्साजोगच्या पोह्यांची चव निव्वळ अप्रतिम....
परत जावस वाटतं.>>....पहिल्या सारखे मिळत नाहित चव खुप खराब झाली आहे.

एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्ह>>......पुन्यातहि बकवास जेवण मिळते आणी तिथेहि फक्त कुठे ते माहित पाहिजे..

बाकि फोटु मस्त आहेत.....
हत्तीखाना पाहिला नाहि का?

वृत्तांत व फोटो दोन्ही खूप छान.
या वेगळ्याच पण अतिसुंदर फुलांचे फोटो पाहून मन अगदी प्रफुल्लित झाले.

फोटो अतिशय सुंदर. प्रसन्न वाटले बघून.

डोंबिवलीहून गाडी करून अंबेजोगाईला जायचे ठरवतोय, साधारण किती वेळ लागेल? सकाळी ८-९ वाजता निघाल्यावर कधी पोचता येईल, मुक्काम अंबेजोगाई येथे करणार आहोत तर जाऊ त्याच दिवशी संध्याकाळी प्रथम परळी-वैजनाथ करता येईल का?

सकाळी ९ वाजेपर्यंत डोंबिवलीहून निघून परळी वैजनाथ संध्याकाळी करून रात्री अंबेजोगाई येथे येता येईल का? मग दुसऱ्या दिवशी अंबेजोगाई करून दुपारी निघून रात्रीपर्यंत डोंबिवलीला परत येता येईल का? कृपया मार्गदर्शन करा.

@अन्जु : हल्ली अंबेजोगाई ला जायला ट्रेन चा उत्कृष्ट पर्याय आहे , लातूर गाडी ने लातूर ला उतरायचे आणि तिथून अंबाजोगाई , परळी

http://indiarailinfo.com/train/mumbai-cst-latur-superfast-express-22107-...

कल्याण - अंबेजोगाई साधारण ४०० किमी अंतर आहे
रात्री गाडीत बसल कि सकाळी पोचतो, त्यादिवशी दर्शन घेऊन तिथून रात्री गाडी पकडायची दुसर्या दिवशी कल्याण .

स्वतःची गाडी करूनही जाऊ शकतो
वाया पुणे .
१२ तास लागतील

धन्यवाद प्रसन्न. ट्रेनचा पर्याय नक्कीच चांगला आहे पण आमच्याबरोबर जेष्ठ नागरिक असल्याने स्पेशल गाडी करून जाणार आहोत, १२ तास लागले तर परळी वैजनाथ त्याच दिवशी नाही करता येणार बहुतेक.

Pages