रत्नागिरी भटकंती : भाग 2

Submitted by डेविल on 23 September, 2011 - 07:49

रत्नागिरी भटकंती : भाग 1

सकाळी पूजेला आलेल्या आजोबांच्या घंटेच्या गजराने जाग आली. घड्याळ बघितले तर ७ वाजले होते. पटापट उठलो आणि फडकेच्या मागीलघरी जाऊन फ्रेश होऊन आलो. त्यांच्याकडेच सकाळचा चहा घेतला. मागच्यादारी असताना पोह्यांचा सुगंध आला होता आणि "फडकेंचे पोहे" हा जोक आम्हाला ट्रेक संपेपर्यंत पुरला.(काहीही ओळख नसताना रहायची, फ्रेश होण्यासाठी तसेच चहाची मदत केली याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे.)

IMG_3664.jpgIMG_3667.jpgIMG_3668.jpg

देवळाच्या मागील बाजूने पूर्णगडला जायची वाट आहे. १०-१५ मिनिटामध्ये गडाच्या दरवाज्यामध्ये पोहोचलो. दोन बुरुज समोर ठेऊन लपलेला दरवाजा.
या बुरुजासामोरच हनुमानाचे मंदिर आहे. दरवाज्य बाजूलाच पहारेकर्यासाठी देवड्या आहेत.

IMG_3671.jpgIMG_3673.jpgIMG_3674.jpgIMG_3676.jpgIMG_3677.jpg

जालावर मिळालेल्या माहितीनुसार मुचकुंदी काडीवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग होत होता. गडाचा पसारा जास्त मोठा नाही आहे. गडाच्या आत पदके अवशेष आहेत, ज्याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. तटबंदी मजबूत आहे. तटबंदीवरून फेरी मारता येते. बुरुजांवरून तोफांचा मारा करण्यासाठी बरीच जागा आहे.
खाडीच्या बाजूला गडाचा दुसरा दरवाजा आहे. मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस तटबंदीमधून हे झाड उगवले आहे. याचा आकार युनिकॉर्न(मराठी शब्द माहिती नाही.) सारखा आहे.

IMG_3677.jpgIMG_3680.jpgIMG_3684.jpgIMG_3686.jpgIMG_3689.jpg

तास-दीड तास फिरून बाहेर पडलो. आणि रत्नागिरीच्या वाटेला लागलो. रत्नदुर्ग पाहून दुपारी जेवायला गणपतीपुळेला जायचा विचार होता. १०:३० झाले होते आणि सकाळपासून काहीही खाल्लेले नव्हते. आमचा विचार रत्नागिरी शहरात जाऊन खाण्याचा होता. पण वाटेमध्ये कोहिनूर समुद्र हॉटेल लागले. विन्याने असहकार पुकारला. नाश्ता केल्याशिवाय पुढे जायला नकार दिला. हॉटेल बघून जाणवले होते कि हे ट्रेकला परवडणारे हॉटेल नाही आहे. इतर वेळी आलो तर जायला हरकत नव्हती. शेवटी विन्याच्या इच्छेला मान देऊन आत प्रवेश केला. बिलपण शेवटी त्यानेच भरले, ट्रेकमध्ये टाकले नाही.
पूर्णगड ते रत्नागिरी प्रवासात आमची मस्ती चालू झाली.

IMG_3703.jpgIMG_3705.jpg

पोटोबा शांत झाल्यावर पुढचा प्रवास चालू केला.
रत्नागिरी शहराच्या जवळच हा किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी फोडून रस्ता बनवला आहे. पूर्वी किल्ल्याचा परिसर बराच मोठा असल्याचे लक्षात येते पण आता तेवढा मोठा राहिला नाही. खाली अल्ट्राटेक कंपनीची जेटी दिसत होती. गाडीरस्ता थेट बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जातो. बालेकिल्ल्यावर भगवती देवीचे सुरेख मंदिर आहे. एक भुयार आहे जे खाली समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाते. सध्या हे भुयार बंद केले आहे. तटावरून समुद्राचा तसेच आतमध्ये शिरलेल्या जेटीचा सुरेख देखावा दिसतो. किल्ल्यावर भटकंती करून परत फिरलो.

IMG_3711.jpgIMG_3720.jpgIMG_3725.jpgIMG_3727.jpgIMG_3729.jpgIMG_3733.jpgIMG_3739.jpg

रत्नदुर्ग वरून परताना रत्नागिरीतील समुद्रजीव म्युझियमला भेट दिली. बरेचसे मासे आणि जीव होते, आता नावे आठवत नाहीत. फक्त काही जीव बघून तोंडाला पाणी सुटले होते.
IMG_3756.jpgIMG_3770.jpg

आरेवारेचा पूल झाल्याने परत फिरून महामार्गावरून गणपतीपुळेला जायची गरज नव्हती. सागरी मार्गाने आम्ही गणपतीपुळेला निघालो. अजून एक हा ट्रेक मार्च मध्ये केला होता. नंतर परत मे मध्ये मित्रांबरोबर कारने आलो तेव्हा या रस्तावर बऱ्याच आमराई आहेत. एका आमराई मधून आम्ही देखील ४ पेट्या घेतल्या होत्या. असो विषयांतर झाले. निसर्गाचा आनंद घेत-घेत जरा उशीरच गणपतीपुळेला पोहोचलो. इथे संकेत आणि अंबिका कधीपासून आमची वाट पाहत होते. समुद्रस्नान करून देवळात दर्शनाला गेलो. प्रदक्षिणा पूर्ण करून पुढचा रस्ता पकडला.

IMG_3772.jpgIMG_3775.jpgIMG_3784.jpgIMG_3786.jpg

जयगडला जाणारा रस्ता समुद्राच्या कडेकडेने जातो. इथून दिसणारे निसर्गाचे रूप वर्णाच्या पलीकडे आहे. एकाबाजूला झाडे , दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये डांबरी रस्ता.
जयगड पोहोचलो तेव्हा 5 वाजत आले होते. आणि विन्याच्या ओरड्यानंतर आमच्या लक्षात आले कि आज भटकंतीच्या नादात कुणीच जेवले नाही आहे. किल्ल्याला जायच्या रस्तावर नाव सार्थ करणारे हॉटेल विसावा होते. विन्याने गाडी दारात थांबवली आणि आपला इरादा स्पष्ट केला. किल्ला समोर असताना जेवायचे मन होत नव्हते आणि थोड्याच वेळात सूर्यास्त देखील होणार म्हणून आमची ओर्डर तिथे विन्याजवळ देऊन किल्ल्यावर निघालो.

IMG_3792.jpgIMG_3793.jpgIMG_3796.jpg

हा किल्ला देखील खाडीच्या मुखावर आहे. गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. ३ बाजूला जमीन आणि १ बाजूला समुद्र. किल्ल्याला १०/१५ फुट खोल खंदक आहे. आतमध्ये बऱ्यापैकी शाबूत असलेले बांधकाम आहे. दरवाज्याच्या बुरुजावर सिमेंटचे बांधकाम देखील आहे, फार पूर्वीचे वाटत नाही. जालावरून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय विश्रामगृह असल्याचे कळते.
बाहेरून तटबंदी फारशी उंच नसली तरी आतमध्ये मोठी जागा आहे. आतमध्ये एक लाईट-हाउस तसेच हनुमानाचे मंदिर आहे.

IMG_3799.jpgIMG_3801.jpgIMG_3802.jpgIMG_3805.jpgIMG_3806.jpgIMG_3807.jpgIMG_3823.jpg

आता पोटातले कावळे स्वस्थ बघायला देत नव्हते. परत फिरलो आणि हॉटेल मध्ये आलो. तिथे येऊन बघतो तर विन्याने हॉटेल मध्ये शिल्लक असलेले ७/८ पैकी ५ मासे एकट्यानेच फस्त केले होते. फक्त चिकन बाकी राहले होते. जे काही शिल्लक मिळाले त्यावर तुटून पडलो. जेवणाची चव बाकी मस्त होती. भरपेट खाणे झाल्यावर बिल मागितले तर ते ८०० च्या खाली आले. आम्हाला नवल वाटले कारण आमचा अंदाज बाराशे दीड हजार होता. (याच आमच्या ग्रुप ने मी सोडून बाकी ७ जणांनी मुरुड च्या पाटील खानावळीमध्ये २५०० चे बिल केले होते.)

IMG_3833.jpgIMG_3835.jpg

बिल भागवल्यावर त्यांनाच हेदवीचा रस्ता विचारला. त्यांनी फिरून रस्त्याने जाण्यापेक्ष्या पुढे गावात जाऊन नावेची चौकशी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुढे गावात जाऊन विचारले तर एक जण तयार झाला यायला. खाडी पार करून पलीकडे आलो आणि हेदवी कडे निघालो. किनाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये चहाची तल्लफ भागवायला थांबलो. हेदवीला समुद्रकिनारी राहण्याचा आमचा विचार होता पण नुकतेच २६/११ झाल्याने पोलीस आणि कोस्टगार्ड राहायला देणार नाहीत असे कळले.

IMG_3854.jpgIMG_3867.jpg

गावामध्ये परतून गावातील एका घराच्या अंगणात रहायची परवानगी मागितली आणि ती मिळाली देखील, पण अंबिका असे उघड्यावर राहायला तयार नव्हती. शेवटी ज्यांच्या अंगणात झोपायची सोय झाली होती त्यांच्याच ओळखीने एक रूम घेतली त्यात संकेत-अंबिका जोडप्याला ढकलले. आमचा मुक्काम आम्ही गच्चीवर हलवला. झोपायचा बंदोबस्त तर झाला होता पण झोप येत नव्हती म्हणून परत किनाऱ्यावर निघालो. तिथे कॅम्प-फायर पेटवून गप्पा मारत बसलो.
IMG_3874.jpgIMG_3875.jpgIMG_3885.jpgIMG_3886.jpg

खूप उशिरा परतलो आणि घोरण्याच्या आवाजात झोपायचा प्रयन्त करू लागलो. आजचा दिवस मस्तच गेला होता. मनासारखी भटकंती आणि खादाडी केली होती. उद्याचा दिवस शेवटचा असणार होता. हेदवी बघून दुपारी परतीचा प्रवास चालू करायचा होता. त्याबद्दल विचार करत कधी झोप लागली ते कळलेच नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

जयगड किल्ल्यावरचे ते सिमेंटचे बांधकाम तिथे MTDC चे रिसॉर्ट सुरु करण्याच्या उद्देशाने बांधले गेले होते म्हणे... त्या लाईट हाऊसच्या शिडीवरुन वर गेल्यावर पण मस्त नजारा दिसतो..

छान प्रवास चालू आहे पण एक गोष्ट खटकली....
रस्त्यावर हेल्मेट न घालता तुमचे जे साहसी प्रयोग चालले होते ते म्हणजे अगदी नो...नो....

बाकी आम्ही हाच प्रवास उलट्या दिशेने केला होता त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

मस्तच रे Happy

पूर्णगडच्या वाटेवरून (भाट्ये,पावस, अडिवरे, नाटे, मार्गे राजापूरला) ४-५ वेळा गेलोय पण गड काही नाही करता आला.

मस्त रे डेविल... Happy
कोकण खुणावतोय ... बघुया कधी मुहुर्त लागतोय ते...

प्रज्ञा१२३, दादाश्री >> धन्यवाद.
इंन्द्रा >> Happy
हिम्सकूल >> नजरा तर खूप मस्त दिसतो. रिसॉर्ट साठी दुसरी जागा बघायचीना सरकारने.
रस्त्यावर हेल्मेट न घालता तुमचे जे साहसी प्रयोग चालले होते ते म्हणजे अगदी नो...नो....>> आशु ते फक्त तेव्हाड्यापुरते होते. नंतर नाही.
जिप्सी , रोमा >> चला जाऊया आपण सर्व मायबोलीकर सागरी किल्ले फिरायला!! उद्यापासून माझी कोंकणवारी चालू होते आहे.

डेविल...
मस्तच चाललीय भटकंती.. हा पण भाग मस्त..
कोहीनूर समुद्र रिसॉर्ट तर आत्ता काही वर्षांपुर्वी झाले. पुर्वी तिथे कड्यावर काहीही नसताना बराच वेळा बसून सन्ध्याकाळचा नजारा अनुभवला आहे...रत्नदुर्ग किल्लातर काय, अनेक वेळा वारी झालीय..

कोहीनूर समुद्र रिसॉर्ट कडून रत्नागिरीकडे येताना लागण्यार्‍या भाटे गावात महाराज्यांच्या आरमारातील शूर मायनाक भंडारीची समाधी आहे...

तसे बघायला गेले तर भटक्यांना रत्नागिरी आणी परीसरात फिरण्यासारखे आणी बघण्यासारखे बरेच काही आहे..एक भटकंती पुरेशी नाही..

गाडीच्या स्टंटसाठी आशुला १०१ % अनुमोदन्....पुन्हा कधी असे स्टंट करू नका ही विनंती ...

पुढचा भाग कधी.....?

करु नका वगैरे ठीक आहे.. पण मला आवडला तो स्टंट ! थोडी उडी मारली असतीस तर अजून सही आला असता फोटो.. Wink Proud तसा पण धडपडला असतास तर डांबरी रोड आहे.. दुखापत व्हायला थोडी ना किनार्‍याची वाळू आहे... Biggrin

बाकी मला आठवतेय मी भटकंती मिस केली होती.. पण बाईकट्रेक पासून दूरच राहतो मी.. Happy