आतली गोष्ट!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मैत्रिणीची मुलगी, वय वर्ष चौदा. अचानक पोक काढायला लागली. थोडी दडपणात वागायला लागली. विचारल्यावर समजलं तिच्या आजूबाजूच्या मुली तिला हसतात तिच्या गोलाकारांवरून. तू फारच मोठी दिसतेस म्हणतात. हसणार्‍या सगळ्या अगदी बारीक चणीच्या. तेराचौदा वयाला मुलगा म्हणून खपून जातील अश्या. मैत्रिणीने मुलीला समजावलं की या मुलींकडे जे नाहीये ते तुझ्याकडे आहे. पुढे जाऊन याच मुली खटपट करतील आपले आकार योग्य बनवण्यासाठी. वय वर्ष चौदा खुश झालं. समजूत पटली पण बाईपणाच्या एका विचित्र चढाओढीत मुलगी कायमची अडकली.

मला आठवले माझे ज्युनियर कॉलेजचे दिवस. एनसीसीचा ड्रेस फक्त मलाच चांगला बसतो असं म्हणणारी अशीच उफाड्याची असलेली मैत्रिण. तो ड्रेस घालून आपलं रूप आरशात बघत ‘आपण पुरेशी मुलगी वाटत नाही’ असं सत्रांदा मनात येऊन खट्टू होणार्‍या आम्ही. ‘आम्ही आपापल्या वडिलांच्या वळणावर गेलोय’ असे केविलवाणे विनोद करणार्‍या आम्ही.

हे कसंतरी मागे टाकून आपलं आयुष्य घडवायला घेतलं. बरंच पुढे आल्यावरही या मापांच्या चढाओढीने या ना त्या पद्धतीने पाठपुरावा केलाच. कापडचोपड आणि त्याच्या इतिहासाबद्दल शिकताना बरीच अंजनं डोळ्यात घातली गेली.

नुकतीच इकडच्या तिकडच्या संस्थळावर ‘ब्राज्वलन’ हा शब्द व त्याविषयी ‘उद्बोधक’ चर्चा वाचली. चर्चेचा एकंदर सूर स्त्रियांची आणि स्त्रीवादाची हेटाळणी, स्त्रीमुक्ती या संकल्पनेची उडवलेली खिल्ली असा होता. मुद्दा अंतर्वस्त्राचा आणि त्यातही स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा त्यामुळे चर्चेमधे जोडीला स्त्रीशरीराची एक वस्तू या पातळीवर केलेली आचरट आणि आंबटशौकीन वर्णनेही होती. हे नवीन नाही. कधीही कुठेही ‘ब्राज्वलन’(ब्रा-बर्निंग बाय फेमिनिस्टस) या घटनेसंदर्भाने वेगळे काही ऐकू येत नाही.

एखादी वस्तू अंगावर असणे वा नसणे यामुळे चळवळ होत नाही असे म्हणणारे एखादी वस्तू अंगावर असण्यानेच स्त्रीच्या चारित्र्याची ग्वाही मिळते हे मात्र छातीठोकपणे म्हणतात. हे गमतीशीर जरूर आहे पण यात नवल वाटण्यासारखं काही नाही. लाज, इभ्रत, प्रतिष्ठा या केवळ बाईनेच जपायच्या गोष्टी असताना ते सगळं वेशीवर टांगून आपलं एक अंतर्वस्त्र या बाया जाळतात म्हणजे त्यांची डोकीच फिरली असली पाहिजेत असं सहजपणे समजणारा समाज अजून जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे.

१९६८ च्या मे महिन्यात अटलांटिक सिटी मधे होत असलेल्या मिस अमेरिका पॅजन्टच्या वेळेस अमेरिकेतील काही बायांनी एकत्र येऊन आपल्या ब्रेसियर्स जाळल्या ही ती घटना. ही घटना मोठ्या प्रमाणात वगैरे काही घडली नाही. ब्यूटी पॅजन्ट म्हणजे बाईला एक सुंदर वस्तू म्हणून पुरूषांच्या मान्यतेसाठी प्रदर्शनाला उभी करणे असा विचार धरून या स्पर्धेला विरोध म्हणून निदर्शने केली गेली. या निदर्शनांचा एक भाग म्हणून ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ असं नाव दिलेल्या एका कचर्‍याच्या डब्यामधे ब्रेसियर्स, गर्डल्स, खोट्या पापण्या, प्लेबॉयची मासिके, उंच टांचाची पादत्राणे असं सगळं जाळलं जाणार होतं. बायांनी खरोखर ब्रेसियर्स जाळल्या का आणि किती बायका यात सामील झाल्या याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. या निदर्शनांचं नेतृत्व जिच्याकडे होतं त्या रॉबिन मॉर्गनच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीच जाळलं गेलं नाही. घोषणा, फलक आणि मोर्चा यांच्यातूनच केवळ विरोध जाहीर केला गेला. त्यामुळे मॉर्गन बाईंच्या म्हणण्याप्रमाणे जाळण्याची घटना ही संपूर्णपणे प्रतिकात्मक होती. परंतु काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे या दरम्यान बंद केले हे मात्र निश्चित. अर्थात ब्रेसियर्स जाळणे या कृतीमधे नाट्यमयता जास्त असल्याने स्त्रीवादविरोधी लोकांनी ह्या कृतीचं भरपूर भांडवल केलं स्त्रीवादाची चेष्टा करण्यासाठी. माध्यमांनी यातून ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट (ब्रेसियर जाळणारे स्त्रीवादी) असा एक वाक्प्रचार कुत्सितपणाच्या फोडणीसकट रूढ केला. गैरसोयीच्या स्त्रीवादाला टोकाचा, अतिरेकी स्त्रीवाद म्हणण्यासाठी हा शब्द वापरला गेला, रूळला. स्त्रीवादी बायका म्हणजे ब्रेसियर्स न घालणार्‍या, हातापायावरचे केस न काढलेल्या आणि लेस्बियन अशी एक व्याख्या प्रचलित केली गेली. या व्याख्येचे पडसाद म्हणून अजून अजून सौंदर्यप्रसाधने वापरत आणि सौंदर्याच्या ठराविक संकल्पनांनाच जोपासत अनेक बायकांनी अर्थातच आम्ही ‘त्यातल्या’ नाही हे सांगण्याची पराकाष्ठा केली.

मात्र प्रतिकात्मक का होईना पण या घटनेने काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे बंद केले आणि त्यातून कुठेतरी सौंदर्य म्हणजे ठराविक आकार, ठराविकच उभार अश्या कल्पना मोडायला सुरूवात झाली. अंतर्वस्त्रांच्या खपावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागताच अंतर्वस्त्रे डिझाइन करणार्‍यांनी सर्वसामान्य बायांना उपयोगी होतील अश्या ब्रेसियर्स डिझाइन करायला सुरूवात केली. इथून अंतर्वस्त्रातून शरीराचा अनैसर्गिक आकार घडवणे या पद्धतीला मोठ्या प्रमाणात खीळ नक्कीच बसली. यातूनच जास्तीत जास्त नैसर्गिक आकार आणि आधार देणार्‍या ब्रेसियर्सचा जन्म झाला. अंतर्वस्त्रांमुळे होणारा शरीराचा छळ या घटनेनंतर काही प्रमाणात कमी होत गेला. हा या घटनेनंतर आत्तापर्यंतचा म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा इतिहास.

पण असं आव्हान का केलं गेलं असेल? काही बायांनी ब्रेसियर्स घालणं बंदच का केलं असेल?

जेव्हापासून माणूस कपडे घालू लागला त्यानंतर लवकरच अंतर्वस्त्रे जन्माला आली. मुळात शरीराच्या नाजूक भागांचं रक्षण, हवामानापासून बचाव अश्या महत्वाच्या उद्देशांपोटी अंतर्वस्त्रे निर्माण झाली. त्यांचे आकार, स्वरूप अर्थातच आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. हल्लीची ब्रेसियर हे मुळातलं पाश्चात्य जगातून भारतात आलेलं प्रकरण आहे. त्यामुळे अर्थातच पाश्चात्य जगातल्या अंतर्वस्त्राच्या प्रवासाविषयी आपण आधी समजून घेतलं पाहिजे.

काळाच्या ओघात अंतर्वस्त्रांच्या मूळ उद्देशांपेक्षाही शरीराला विशिष्ठ आकार देणे, बसण्याउठण्यात विशिष्ठ ढब निर्माण करणे, घाम व इतर स्त्रावांपासून बाहेरच्या कपड्यांचा बचाव करणे यासाठी या काही अंतर्वस्त्राचा वापर होऊ लागला. शरीराच्या छाती, कंबर, पोट या भागांना योग्य त्या आकारउकारातच ठेवणारे जे वस्त्र होते त्याला कॉर्सेट असे म्हणले जाई.

हे कॉर्सेट म्हणजे मुळात कंबर आवळून ती कमी करणारे आणि छाती पूर्ण सपाट करण्यासाठी किंवा छातीला जास्त उभार देण्यासाठी वापरले जाणारे वस्त्र. विविध प्राचीन संस्कृतींमधे अश्या प्रकारचे वस्त्र वापरले गेल्याचे संदर्भ मिळालेले आहेत. परंतु इ.स. १३०० -१४०० दरम्यान कॉर्सेट किंवा कॉर्प्स सर्रास वापरायला सुरूवात झालेली दिसते. कॉर्सेट हा शब्द अठराव्या शतकानंतर अस्तित्वात आला. तोवर कॉर्प्स, स्टे, बॉडिस असे शब्दच वापरले जात. हा कपडा कापडांचे अनेक थर एकमेकाला जोडून आणि जिथे गरज आहे तिथे कडकपणासाठी इतर वस्तूंचा वापर करून विशिष्ठ आकारात बनवलेला असतो. हे प्रकरण समजून घ्यायचं तर एका ठराविक आकारात बनवललेला पिंजरा आणि पिंजर्‍याच्या पट्ट्या खुपू नयेत म्हणून त्यावरून चढवलेले कापडाचे अनेक थर अशी कल्पना करावी लागेल.

01-ELIZABETHAN.jpg
पुनरूत्थानाच्या (रेनेसान्स) सुरवातीच्या काळामधे कंबर अगदी बारीक, छाती पुढून पूर्णपणे सपाट, शरीराचा वरचा भाग इंग्रजी व्हि आकाराचा दिसेल असा निमुळता आणि उंच असा आकार शरीराला असणे हे योग्य, सुंदर, सभ्य इत्यादी मानले जायचे त्यामुळे अर्थातच कॉर्सेटरूपी पिंजरा त्या आकाराचा असायचा. मग पुढे पुढे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात तर कंबर अजूनच निमुळती होत गेली आणि धडाची उंची वाढत गेली. याच काळात संपूर्णपणे लोखंडी पट्ट्या असलेल्या आणि बिजागर्‍यांवरील स्क्रू फिरवून घट्ट करायच्या कॉर्सेट ही होत्या. पहिल्या एलिझाबेथ राणीने या कॉर्सेटबद्दल ‘मला पिंजर्‍यात ठेवल्यासारखे वाटतेय’ असे उदगार काढले आहेत.

02-A-BARO&ROCO.jpg02-B-ROMANTIC&VICTO.jpg
नंतरच्या काळात धडाची उंची कमी झाली, छातीची गोलाई सूचक पातळीवर दिसणं गरजेचं ठरू लागलं आणि कॉर्सेटचे आकार तसे तसे बदलत गेले. लोखंडी पट्ट्यांच्याऐवजी प्राण्यांची हाडे, लाकडाच्या पट्ट्या, स्टीलच्या पट्ट्या, बांबूच्या पट्ट्या अश्या गोष्टींचा वापर होऊ लागला. चित्र क्रमांक २ मधील तिन्ही कॉर्सेटमधे आकार साधारण सारखा दिसत असला तरी वापरल्या जाणार्‍या वस्तू, त्यांची बेतण्या-शिवण्याची पद्धत, कॉर्सेटशिवाय शरीराला आकार देणारी इतर अंतर्वस्त्रे यांच्यामधेही या काळामधे बदल होत गेला. ‘गॉन विथ द विंड’ या चित्रपटाची नायिका पूर्वी अठरा इंच असलेली कंबर आता बाळंतपणानंतर कॉर्सेट घट्ट आवळूनही वीस इंच झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करते हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. ही गोष्ट रोमॅन्टीक काळातीलच.

03-MONOBOSOM.jpg
नंतर बेल इपॉक(१८९५-१९१४) काळामधील कॉर्सेटमधे अति आवळून लहान, म्हणजे सोळा ते अठरा इंच केलेली कंबर नक्कीच होती. परत पुढच्या बाजूला छातीचा खालचा भाग आणि पोट अतिशय सपाट करण्याची योजना होतीच. तसेच ही कॉर्सेट नितंबांच्यावरूनही येत असे. स्त्रियांना केवळ श्वास नीट घेता यावा म्हणून स्तनांचा भाग हा फक्त बाहेरच्या दोन्ही बाजूंनी आधार दिलेला असे. यामुळे दोन स्तनांचा आकार वेगळा न दिसता एकत्रच दिसे. म्हणून या कॉर्सेटला मोनोबुझम असे नाव आहे. बाजूने बघितल्यास शरीराचा आकार इंग्रजी एस या अक्षराच्या आकाराचा किंवा कबुतरासारखाही दिसे. यामुळे या प्रकारच्या आकाराला पिजनबुझम असेही म्हणले जाई. कॉर्सेट नितंबांच्यावरून असल्याने साधे भराभरा चालणेही शक्य नसे.

04-corset-damage.jpg
आकारामधे बदल घडलेले असले तरी एक गोष्ट अगदी कायम होती की तथाकथित योग्य आकारामधे शरीर येण्यासाठी लहानपणापासूनच मुलींचे शरीर या कॉर्सेट/ स्टे/ कॉर्प्स प्रकारात बांधले जाई. हे नुसतं वाचत जाताना कदाचित यातलं क्रौर्य जाणवणार नाही. पण मुलीच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून किंवा अगदी जन्मल्यापासूनही एका ठराविक आकाराच्या पिंजर्‍यामधे / पट्ट्यामधे शरीर घट्ट आवळून बांधून ठेवलं जात असे ज्यायोगे शरीर त्याच आकारात वाढत असे. या अश्या पिंजर्‍यामुळे पाठीचा कणा काही प्रमाणात कमकुवत होत असे. बरगड्यांची वाढ खुरटत असे किंवा खालच्या बरगड्या आतल्या बाजूला वळत असत. शरीराच्या आतले इतर अवयव वाढीसाठी योग्य जागा न मिळाल्याने इकडे तिकडे सरकून अयोग्य पद्धतीने वाढत. त्यामुळे जेवण खूपच कमी असे. पचनाच्याही समस्या निर्माण होत. त्यामुळे अर्थातच शरीराला योग्य पोषण मिळत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था व प्रजननसंस्था मुळातूनच कमकुवत रहात आणि सर्वांगीण आरोग्यही धोक्यात येत असे. परत शरीरावर हा असा पिंजरा बांधून फिरणे काही कमी कटकटीचे नव्हते. जरासुद्धा वाकणे, बसणे या पिंजर्‍यामुळे शक्य नसे.

05-A-FARTH&PANNIE.jpg05-B-CRINO&BUSTLE.jpg
केवळ कॉर्सेट हा एकच पिंजरा नव्हे तर त्याबरोबर मोठ्या धातूच्या रिंगा लावलेला स्कर्ट घातला जाई. याचे नाव फार्दिंगेल. हा पण अजून एक वेगळा पिंजरा जो कमरेवर बांधलेला असे ज्यामुळे स्कर्ट हा कायमच फुललेला दिसत असे. फार्दिंगेलची फॅशन लयाला गेली तेव्हा पॅनिए नावाचा छोटा पिंजरा नितंबांचा आकार वाढवण्यासाठी कमरेवर बांधणे सुरू झाले. मग बसल नावाचा प्रकार आला. या स्कर्टशी संबंधित वस्तूंनी शरीरावर हानीकारक परिणाम केले नाहीत तरी साध्या साध्या हालचालीही आखडून ठेवल्या. सगळी वेशभूषा पूर्ण झाल्यावर बसणे सुद्धा शक्य नसे.

कपड्यांच्या आतून हे असे विविध प्रकारचे पिंजरे अंगावर वागवण्याला आळा बसला पहिल्या महायुद्धाच्या चाहुलीने. बेल इपॉकच्या शेवटच्या काळातच युरोप अमेरिकेतील स्त्रियांनी काही प्रमाणात कचेर्‍यांमधे नोकर्‍या करायला सुरूवात केली होती. माणसे कमी पडायला लागल्यावर युद्धकाळात स्त्रियांनाही सैन्यात भरती करून घेतले जाऊ लागले होते. कचेर्या, युद्धक्षेत्र किंवा सैन्याच्या कचेर्‍या या ठिकाणी काम करताना घोळदार कपडे आणि आतून पिंजरा याची अर्थातच अडचण होऊ लागली आणि कॉर्सेट इतिहासजमा झाली. त्याऐवजी बस्ट (छातीवर बांधायचा टक्स घातलेला पट्टा) आणि गर्डल(कंबर बांधून ठेवणारे वस्त्र) अशी दोन वेगळी वस्त्रे निर्माण झाली. बस्ट या वस्त्रातूनच छातीला आधार देणारे एक वस्त्र जन्माला आले. १९०७ मधील व्होग मासिकामधे या वस्त्राची पहिली नोंद आढळते. या वस्त्राचे नाव ब्रेसियर. ज्याचा मूळ फ्रेंच भाषेतील अर्थ आधार असा होतो.
06-vogue-bra.jpg

त्यानंतर १९६० पर्यंत या अंतर्वस्त्रांमधे अपेक्षित आकार, वापरले जाणारे कापड, बेतण्या-शिवण्याचे प्रकार यामधे अनेक बदल होत गेले. यातले बरेचसे बदल हे सौंदर्याच्या ठराविक कल्पनांपायी होते. शरीराचा छळ कमी झाला असला तरी ठराविक माप-आकार-उभार यांचा आग्रह या काळापर्यंतही संपला नव्हता.
07-sweatergirl.jpg

पण पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंततरी इतके भयंकर परिणाम होत असताना बायका कॉर्सेट आणि इतर सगळा साज का वागवत असत अंगावर? अगदी साधी सोपी कारणं आहेत याची. वरती जे काळानुरूप बदल आपण बघितले ते बदल घडण्यामागे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सौंदर्याच्या व सभ्यतेच्या बदलत्या कल्पना. पण मुळात स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे ह्याबद्दल असणारा पुरूषी आग्रह आणि स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात आणि उभारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. अमुक मापाची-आकाराची व उभाराची स्त्री ही सभ्य, सुशील आणि आदरणीय बाकीच्या वाईट चालीच्या किंवा कमी प्रतीच्या किंवा निम्नस्तरीय इत्यादी असं वर्गीकरण केलं गेलं. मग ते ते माप-आकार-उभार मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. अगदी शरीराचे हाल सोसूनही केले गेले. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.

चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं, अजून कुठेतरी मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं हे ही सौंदर्याच्या कल्पनांपायी स्त्रीच्या शरीराचे हाल या प्रकारात मोडणारं. त्याचं अवास्तव महत्व आणि उदात्तीकरण यात जगभरात कुठेही कणभरही फरक नाहीच.

१९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ माप-आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य, आदरणीय स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्य आणि सभ्यतेच्या मापांपेक्षा निसर्गाने घडवलेले आकार तसेच राहू देणं आणि अंगावरच्या कपड्यामधे आराम वाटणं, सर्व हालचाली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे अश्या भावनेतून अनेकींनी ब्रेसियर्सचा वापर बंद केला.

हे समजून घेतल्यावर मला तरी या घटनेकडे टोकाचा व अतिरेकी स्त्रीवाद म्हणून बघता येत नाही. स्त्रीकडे प्रथम एक माणूस म्हणून बघण्याच्या प्रवासातला हा स्त्रीच्या शरीराशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा टप्पा मला वाटतो. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला मात्र जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, अनोरेक्सियाने अगदी लहान वयात मृत्यूमुखी पडलेल्या पोरी, फॅड डाएट किंवा महिन्याभरात २०-२५किलो वजन कमी करून देणार्‍या तथाकथित आहारतज्ञांच्याकडची गर्दी, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मेडियाने केलेले नको इतके कौतुक, सर्व जाहिरातींमधून, दृश्य माध्यमांमधून दिसणारी अतिशय सडपातळ अशी स्त्रीची प्रतिमा, हॉलिवूडमधील अमुक एक नटीने बाळंतपणानंतर दोन महिन्यात वजन उतरवले याबद्दल तपशीलांसकट वाचायला मिळणारी कहाणी या सगळ्या गोष्टी सध्या माझ्या आजूबाजूला मला दिसत वा ऐकू येत रहातात.

बाईने कुठल्याही परिस्थितीत सुंदर असायला हवं आणि सुंदर बाई म्हणजे अमुक एक माप, रंग इत्यादी ह्यात काहीच बदल झालेला दिसत नाही. बायांच्या मनातही. ‘अमुक एक’ चे तपशील बदलत रहातात फक्त. तरीही १९६० च्या दशकातल्या घटनेने बर्‍याच मोठ्या प्रमाणात सामान्य बायांचे हाल कमी केले हे नाकारता येणार नाहीच.

बाकी ब्रा-बर्निंग संदर्भाने चेष्टा, आंबटशौकीन वर्णनं होतच रहाणार. तुम्ही करायची का नाही हे तुमच्या माणूसपणाच्या पातळीवर अवलंबून. नाही का?

- नीरजा पटवर्धन

विषय: 
प्रकार: 

नी.. अगं केव्हढा माहितीपूर्ण लेख लिहिलास.. धन्स इकडे टाकलास हा लेख्.नाहीतर मला कधीच मराठी मॅग्स वाचायला मिळत नाहीत ....

खुप छान! बर आहे या सगळ्या भानगडी माझ्या नशीबी नाही आल्या. तरीही या गोष्टीतुन आज स्त्रीला जावे लागत नाही असे नाही. आजही शोभेच्या बाहुल्यांना नोकरीत व बढतीत या तंत्रांचा फ़ायदा होतोच. आजच इन्डीयन एक्स्प्रेस मधे लेख वाचला 'मिनी स्कर्ट घाला आणि यशस्वी व्हा.' कन्सल्टन्ट म्हणुन मी जेव्हा इनटरव्यूजला जाते तेव्हाही हे लक्षात येते की स्त्रीला काय येते त्यापेक्षा ती कशी दिसते याला प्राधान्य दिल्या जाते. पर्सनालिटी या नावा खाली असले भेदभाव सर्रास केले जातात.

उत्तम लेख नीरजा. खूप नवीन माहिती मिळाली. गॉन विथ द विंड मधला १८ इंची कंबरेचा उल्लेख --- किती हाल भोगले असतील त्या बायकांनी. Sad

नी, खूप अभ्यासपूर्ण लेख ! बरीच नवीन माहिती कळाली. धन्यवाद. Happy
त्या कॉर्सेटवाल्या स्त्रियांचं खरंच वाईट वाटतं.

नी, लेख छान आणि माहितीपूर्ण .. Happy

भारतीय स्त्रीया ह्या एका बाबतीत नशीबवान असल्या तरी ईतर बर्‍याच बाबतीत कमनशीबी नक्कीच (सनातन रुढी परंपरा, प्रथा लक्षात घेता) ..

युद्धाचा ह्या सगळ्या बदलातला रोल खरंच इंटेरेस्टींग आहे ..

लेख आवडला. या लेखाचे दोन ठळक भाग आहेत. एक म्हणजे विशिष्ट वर्गातील स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणातल्या बदलाचा आढावा. हा भाग चित्रांमुळे खूपच माहितीपूर्ण व वाचनीय झाला आहे. आपल्या लेखनाइतकीच चित्रकलाही उत्तम आहे हे सांगितल्याशिवाय रहावत नाही.

दुसरा भाग विवेचनाचा आहे. तो भाग दुर्दैवाने तितका आवडला नाही. सुरूवात मी तुमच्या प्रेरणेपासून करतो.

नुकतीच इकडच्या तिकडच्या संस्थळावर ‘ब्राज्वलन’ हा शब्द व त्याविषयी ‘उद्बोधक’ चर्चा वाचली. चर्चेचा एकंदर सूर स्त्रियांची आणि स्त्रीवादाची हेटाळणी, स्त्रीमुक्ती या संकल्पनेची उडवलेली खिल्ली असा होता.

इथे त्या लेखाचा दुवा दिला असतात तर बरं झालं असतं. मीच तो लेख लिहिलेला आहे. तो आधारित होता नगरीनिरंजन या आयडीने लिहिलेल्या या लेखावर. माझ्या लेखातला मथितार्थ तुम्हाला समजला नाही हे दुर्दैव. थोडक्यात 'एकेकाळी स्त्रीमुक्तीवाद तळागाळातल्या स्त्रियांच्या खऱ्या प्रश्नांचा विचार करत होता. आता त्याची जागा फेसबुक वापरणाऱ्या मुक्त स्त्रियांनी आपल्या ब्राचा रंग जाहीर करण्याइतपतच थिल्लर राहिला आहे का? जगभर होणारा स्त्रियांचा छळ, शोषण, अत्याचार हे काही प्रिव्हिलेज्ड स्त्रियांनी फेसबुकावर आपल्या ब्राविषयी वात्रटपणे बोलल्यामुळे संपणार आहे का?' हा प्रश्न विचारण्यासाठी लिहिला होता. त्यांनी जो वात्रटपणा वापरला होता त्याच वात्रटपणाच्या स्वरात मी त्यांची चेष्टा केली होती. ज्यांची बंधनं आधीच बहुतांशी तुटलेली आहेत त्यांनी आपल्या बंधनांना मढवून टाकलं हे दाखवायचं होतं.

बाकी तुम्ही जे 'त्याकाळी कॉर्सेट वापरलं जात होतं' वगैरे वगैरे म्हटलं आहे ते नेमकं किती आणि कुठच्या स्त्रिया वापरत होत्या? राजघराण्यातल्या किंवा अतिश्रीमंत, हाय सोसायटीतल्या स्त्रिया. त्या समाजात 'आमच्या स्त्रियांना वाकण्याची गरज पडत नाही' हे सांगणं म्हणजे स्टेटस सिंबल असायचं. चीनमध्ये उच्चवर्गातले पुरुष करंगळीचं नख काही इंच वाढवायचे. त्यामागेही 'मला माझा हात वापरण्याची गरज पडत नाही' हे स्टेटमेंट असायचं. तुम्ही गॉन विथ द विंडचं उदाहरण दिलं आहे. ती ज्या समाजात रहायची त्यात प्रत्येकाकडे अनेक गुलाम, नोकर असायचे. स्कार्लेटच्या प्रियकराची इस्टेट इतकी मोठी असते की निव्वळ घराच्या आवारातच रस्त्याच्या बाजूला बारा ओकची प्रचंड झाडं असतात. मळ्यांमध्ये काम करणारे शेकडो मजूर गुलाम वगैरे वेगळेच. स्कार्लेटचं कॉर्सेट आवळणारी मॅमी कॉर्सेट घालायची का? स्कार्लेटला तिचं उच्चभ्रू आयुष्य कॉर्सेट घालून जगता यावं यासाठी जी पंच्याण्णव टक्के जनता शेतात, कारखान्यांत, खाणींत, गोठ्यांत राबायची त्यांचं काय? त्यांच्या बायका कॉर्सेट घालायच्या का?

माझा मुद्दा असा आहे की निव्वळ प्रिव्हिलेज्ड फ्यू अशा उच्चभ्रू दोन पाच टक्के स्त्रियांच्या उदाहरणावरून समाजाबाबत सर्वसाधारणीकरण करणं चुकीचं वाटतं. स्त्रीमुक्तीवाद्यांनी तळागाळातल्या स्त्रियांना विसरून आपल्याच वर्तुळातल्या छोट्याशा अन्यायांचा बाऊ करायला सुरूवात केली तर ती चळवळ एलिटिस्ट व भोंगळ होईल. अशी गंभीर स्वरूपाची टीका करणाऱ्या सर्वांनाच एमसीपी म्हटलं तर ते उत्तर न देण्याचं उत्तम रॅशनलायझेशन होईल.

अंतर्वस्त्रांच्या खपावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागताच अंतर्वस्त्रे डिझाइन करणार्‍यांनी सर्वसामान्य बायांना उपयोगी होतील अश्या ब्रेसियर्स डिझाइन करायला सुरूवात केली.

यावर विश्वास ठेवायला जड जातं. स्त्रीमुक्ती चळवळीत सामील होणाऱ्यांची संख्या किती? त्यातल्या खरोखर ब्रा न वापरणाऱ्यांची संख्या किती? काही संदर्भ मिळाले तर बरं होईल.

तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला मात्र जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, अनोरेक्सियाने अगदी लहान वयात मृत्यूमुखी पडलेल्या पोरी, फॅड डाएट किंवा महिन्याभरात २०-२५किलो वजन कमी करून देणार्‍या....

बादवे, सौंदर्याच्या नव्हे, पण पुरुष कसा पुरुषी हवा, या समाजाच्या कल्पनेत बसण्यासाठी बहुतांश पुरुष किती मेहेनत घेतात हे तुम्हाला माहीत आहे का? किती तरुण मुलं आपण त्या प्रतिमेला पुरून उरत नाही म्हणून आत्महत्या करतात हे माहीत आहे का? समाजाच्या पुरुषाच्या लिंगविषयक भूमिकेच्या अपेक्षाही लोखंडी कॉर्सेटइतक्याच जाचक असतात.

खरं तर स्त्री व पुरुष असं द्वैत ठेवून कोण कोणावर अन्याय करतो हे पहाण्यापेक्षा कुठच्याही व्यक्तीवरती तिच्या वा त्याच्या लिंगामुळे समाज किती जाचक बंधनं घालतो हे पहाणं अधिक रास्त ठरेल. स्त्रियांची पुरुषांपासून मुक्ती यापेक्षा व्यक्तीची लिंगभूमिकानिष्ठ सामाजिक अपेक्षांपासून मुक्ती हे ध्येय अधिक उच्च वाटतं.

असो, तर सांगायचा मुद्दा काय की खूप माहितीपूर्ण असल्याने लेख आवडला. मात्र लेखातला अभिनिवेषपूर्वक ताठा वैचारिक कॉर्सेटमध्ये घातल्याप्रमाणे आलेला आहे.

राजेश, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार.
१. तुमचा लेख - लेखाचा मतितार्थ मला कळलाच नाही हे जरा जास्त होतंय. ब्राज्वलन हा शब्द घेऊन आंबटशौकीन चर्चा तिथे झाली नाही असे नाही. बाकी त्या संकेतस्थळावरच्या बर्‍याच जणांची केवळ आंबटशौकीन गप्पांची खास आवड याबद्दल मी इथे बोलणार नाही.
२. केवळ अतिश्रीमंत आणि हाय सोसायटीमधल्या स्त्रियांच्या नशिबी हे नव्हतं. पेझण्टस पण यात होत्याच. त्याचे प्रकार थोडे वेगळे होते इतकंच. पण कॉर्सेटमधे जखडले जाणे, पेझण्ट वर्गातून वरच्या वर्गाकडे जाण्यासाठी हे जखडून घेणे स्वीकारणे हे सगळे अस्तित्वात होतेच. समाजातील महत्वाचा म्हणून जो वर्ग मानला जातो त्या वर्गाचे तंतोतंत अनुकरण इतर वर्गांकडून केले जाते हे सत्य इतिहासात पुन्हा पुन्हा दिसून येते. हे सर्व तपशीलात एका लेखात येणे शक्य नाही हे तुम्हाला कळावे. बाकी मी नुसते 'त्या काळी' असे इतके मोघम म्हणाले नाहीये हे परत नीट वाचल्यास लक्षात येईल.
३.>>>> माझा मुद्दा असा आहे की निव्वळ प्रिव्हिलेज्ड फ्यू अशा उच्चभ्रू दोन पाच टक्के स्त्रियांच्या उदाहरणावरून समाजाबाबत सर्वसाधारणीकरण करणं चुकीचं वाटतं. स्त्रीमुक्तीवाद्यांनी तळागाळातल्या स्त्रियांना विसरून आपल्याच वर्तुळातल्या छोट्याशा अन्यायांचा बाऊ करायला सुरूवात केली तर ती चळवळ एलिटिस्ट व भोंगळ होईल. अशी गंभीर स्वरूपाची टीका करणाऱ्या सर्वांनाच एमसीपी म्हटलं तर ते उत्तर न देण्याचं उत्तम रॅशनलायझेशन होईल. <<<<<
कृपया कॉश्च्युम हिस्टरीचा अभ्यास करा (काही पुस्तके, काही म्युझियम्स, काही कॉश्च्युम हिस्टरी शिकवणारे तज्ञ आणि हवं तर आंतरजालावर सापडणारे संदर्भ - ही सर्व यादी मी देऊ शकते पण यादी दिल्यावर तुम्ही तेवढा सगळा अभ्यास करणार का? केवळ आंतरजालावरच्या संदर्भांवर अवलंबून न राहता?) आणि मग दोन पाच टक्के, छोटेसे अन्याय, भोंगळ इत्यादी विशेषणे लावा.
४. विश्वास ठेवायला जड जात असल्यास थोडेसे गुगल करा. मी दिलेल्या संदर्भांवरही तुमचा विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे.
५. >>>>> पण पुरुष कसा पुरुषी हवा, या समाजाच्या कल्पनेत बसण्यासाठी बहुतांश पुरुष किती मेहेनत घेतात हे तुम्हाला माहीत आहे का? किती तरुण मुलं आपण त्या प्रतिमेला पुरून उरत नाही म्हणून आत्महत्या करतात हे माहीत आहे का? समाजाच्या पुरुषाच्या लिंगविषयक भूमिकेच्या अपेक्षाही लोखंडी कॉर्सेटइतक्याच जाचक असतात.<<<<<
माझ्या लेखात या गोष्टींचा संदर्भ आलेला नाही म्हणजे मी हे सगळं नाकारते हे गृहित आहे का? किंवा हे सगळं आहे म्हणून वरती मांडलेला त्रास समर्थनीय आणि महत्व न देण्याजोगा आहे का? हे मुद्दे लेखातल्या विषयाशी संलग्न मला वाटले नाहीत म्हणून मी मांडले नाहीत. तर ती मुभा मला असता कामा नये का?
६. स्त्रियांची पुरुषांपासून मुक्ती <<<< हा लेखाचा गाभा आहे असे तुम्हाला वाटत असल्यास माझा लेखच तुम्हाला समजला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण लेख न समजण्याचे खापर इतरांच्या बुद्धीवर न फोडता मी माझ्या लेखनक्षमतेवरच फोडेन.

नीधप,

बाकी ब्रा-बर्निंग संदर्भाने चेष्टा, आंबटशौकीन वर्णनं होतच रहाणार. तुम्ही करायची का नाही हे तुमच्या माणूसपणाच्या पातळीवर अवलंबून. नाही का?

तुम्ही माझ्या माणूसपणावर शंका घेतलीत म्हणून हा सर्व उत्तरं देण्याचा खटाटोप करावा लागतो आहे.

बाकी त्या संकेतस्थळावरच्या बर्‍याच जणांची केवळ आंबटशौकीन गप्पांची खास आवड याबद्दल मी इथे बोलणार नाही.

या वाक्याची खरंच गरज नव्हती. अशी घाऊक हेटाळणी करू नये.

स्त्रियांवर अन्याय होत आला आहे व होतो आहे हे मी नाकारत नाही. माझ्या मूळ लेखात 'आजचा रंग जांभळा' असे फेसबुकावर वात्रट स्टेटस उरोजकर्काच्या आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या नावाखाली देणाऱ्यांची तितक्याच वात्रटपणे चेष्टा होती. पण ती स्त्रीमुक्तीवादाची नव्हती. जो वर्ग असे स्टेटस टाकण्याइतका पुढे गेलेला असतो तो वर्ग साठ सालच्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या दृष्टीने जवळपास पूर्ण मुक्त असतो. त्यांनी केलेला वात्रटपणा हा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती, आणि त्याच्या विरुद्ध वात्रटपणा म्हणजे स्त्रीत्वावर अन्याय हा कांगावा स्त्रीमुक्तीवाद्यांना शोभत नाही. यु शुड टेक इट लाइक अ मॅन, मॅम!

पेझण्टस पण यात होत्याच.

संदर्भ द्या. माझ्या माहितीप्रमाणे पेझण्ट्समधल्या बहुतांश स्त्रिया पेझण्ट्सच राहिल्या. त्यातल्या जेमतेम एखाद दोन टक्क्यांना ही वरच्या वर्गात जाण्याची 'सुसंधी' होती. त्यांनी तुम्ही म्हणता तशी कॉर्सेट्स स्वीकारली असतीलही. पण इतर कॉमनर्स - ज्यांचं आयुष्य रांधा, वाढा, उष्टी काढा, कपडे धुवा, पाच सहा बाळंतपणं करा, मुलांना वाढवा अशा घरकामांत जायचं त्या स्त्रिया अठरा इंची कंबरेचं कॉर्सेट्स घालून वावरायच्या यावर विश्वास बसत नाही. त्या जे काही वापरत असतील ते पुरुषांच्या अंडरवेअरसारखंच फॉर्मपेक्षा फंक्षनवर भर देणारं असणार असा माझा अंदाज आहे.

ही सर्व यादी मी देऊ शकते पण यादी दिल्यावर तुम्ही तेवढा सगळा अभ्यास करणार का?

जरूर करेन. पण अशी संदर्भ देण्याची भीती कशाला दाखवता, देऊनच टाका.

मी दिलेल्या संदर्भांवरही तुमचा विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे.

कृपया अशी त्राग्याची भूमिका घेऊ नका. असा विश्वास कमवण्याइतकं मी काही केलेलं नाही. मी माझ्या लेखनामागची भूमिका स्पष्ट केली व तुम्हाला काही प्रश्न केले. माझ्या बहुतेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं द्यायचं टाळलेलं आहे हेही माझ्या लक्षात आल्यावाचून राहिलेलं नाही.

स्त्रियांची पुरुषांपासून मुक्ती <<<< हा लेखाचा गाभा आहे असे तुम्हाला वाटत असल्यास...
माझ्या लेखाचा गाभा मी दोन चार वाक्यांत सांगितला, तसा तुमच्या लेखाचाही सांगावा ही विनंती.

नीरजा लेख आवडला. अशा प्रकारांची माहिती थोडीफार होती पण त्याची विस्तृत, रेखाचित्रांच्या साहाय्याने दिलेली माहिती अस्वस्थ करुन गेली.
आपल्याकडे स्त्रियांना कपड्यांच्या बाबतीत इतकी जाचक बंधने नव्हती पण रुढी,रिवाज, उपासतापासांनी शरिराला होणारा त्रास त्याची भरपाई करण्याएवढाच तीव्र होता. शिवाय प्रतिष्ठेच्या नावाखाली जड, अवघड दागिन्यांच्या ओझ्याखाली उच्चभ्रू घरातल्या स्त्रिया शब्दशः 'वाकून' जात होत्या. इतर राज्यांमधे घुंगट,पडदा वगैरे प्रथा तर आजही चालूच आहेत. पूर्वी त्यांचे प्रमाण जास्त वाईट असू शकेल.

राजेश घासकडवी यांच्या पोस्ट्स वेगळ्या अंगानी विचार करायला लावणार्‍या आहेत. मात्र सामान्य, कष्टकरी वर्गातल्या स्त्रियांना रोजच्या जगण्याच्या धबडग्यात उच्चभ्रू स्त्रियांसारखे पेहेराव करता येणे कोणत्याही दृष्टीने शक्य नसले तरी मनात तशी सूप्त इच्छा त्या नक्कीच बाळगून असणार. असे पोषाख प्रकृतीला अपायकारक त्यामुळे आपण वापरायचे नाहीत अशी काही दृष्टी त्यामागे निश्चितच नसल्याने त्यांच्यापैकी काहींना जर वरच्या वर्गात वावरायची संधी मिळाली तर त्यांनीही असेच पोषाख वापरले असते. त्या अपायकारक पोषाख करत नव्हत्या ते 'बाय चॉइस' नक्कीच नव्हते. त्यामुळे हा ट्रेन्ड काही मोजक्या श्रीमंत स्त्रियांमधेच असला तरी त्याचा धोका सगळ्याच स्त्रीवर्गासाठी होता असं वाटतं.
आत्ताच्या काळातल्या स्त्रिया अधिक चांगलं, वेलग्रूम्ड दिसण्यासाठी हानीकारक कॉस्मेटिक सर्जरीजच्या, फॅड डायेट्सच्या ट्रेन्डला झपाट्याने बळी पडत आहेत. त्याची सुरुवात सेलेब्रिटीज, हाय सोसायटीतल्या स्त्रियांपासून झालेली असली तरी किती झपाट्याने हा ट्रेन्ड मध्यमवर्गातही झिरपला आहे हे आपण सर्व अनुभवतो आहेच. पुरुषी मानसिकता या सार्‍यासाठी आजही किती जबाबदार आहे माहीत नाही, पण या स्त्रियांना असं वागण्याची सक्ती निदान आज तरी कोणताच समाज करु शकत नाही तरी या हे सगळं करतात ते काय मिळवायला खरंच अनेकदा कळत नाही. स्त्रियांनी स्वतःच या दुष्टचक्राचा भेद करायला हवा आहे असं मात्र प्रामाणिकपणे वाटतं.

तुम्ही माझ्या माणूसपणावर शंका घेतलीत म्हणून हा सर्व उत्तरं देण्याचा खटाटोप करावा लागतो आहे.<<
माझ्या लेखात तुमचं नाव कुठेही मी लिहिलेलं नाही. उगाच नसते आरोप करू नका.
ज्याला चेष्टा कराविशी वाटत असेल त्याच्या माणूसपणावर शंका घेण्यासारखं मला निश्चित वाटतं. तुम्हाला चेष्टा कराविशी वाटत नसेल तर ते तुमच्यासाठी नाही हे समजायला अवघड नाही.
या असल्या वैयक्तिक वादावादीत मला इंटरेस्ट नाही.

मी जे जे लिहिलेलं आहे वरती लेखामधे त्या त्या गोष्टींसाठी माझ्याकडे संदर्भ आहेत आणि हा विषय तीन सेमिस्टर्स अत्यंत तपशीलात जाऊन मी शिकलेली आहे. हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. हा विषय मी काही ठिकाणी शिकवते सुद्धा. पण तुमचा 'तुम्ही खोटं बोलताय. नसेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा.' अश्या प्रकारचा सूर मला अजिबात पटलेला नाही. तो बदलेल तेव्हाच सगळे संदर्भ मिळतील.

माझ्या बहुतेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं द्यायचं टाळलेलं आहे हेही माझ्या लक्षात आल्यावाचून राहिलेलं नाही. <<<
उत्तरं द्यावीत इतक्या महत्वाचा आणि लेखाशी संबंधित कुठलाही प्रश्न तुमच्या पोस्टमधे मला दिसलेलाच नाही.

बाकी तुमच्या लेखाचा गाभा इथे सांगण्याचा संबंध काय हेही मला कळलेलं नाही. आणि मी लेख लिहून झाल्यावर परत मीच लेखाचा गाभा इथे लिहावा अशी ऑर्डर तुम्ही सोडावी, मी ती पाळावी याचे कणभरही लॉजिक मला दिसत नाहीये.

माझ्यासाठी तुमच्याशी चर्चा इथेच संपली. टाळणे, पळ काढणे किंवा अजून काही तुम्हाला म्हणायचे असल्यास जरूर म्हणा.

भारतीय स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना पेहरावात कॉर्सेट घालावा लागत नसला तरी त्यांचे होणारे लैंगिक शोषण (वर्णव्यवस्थेच्या तथाकथित उतरंडीच्या सुरवातीच्या पायर्‍यांवर असलेल्या गरीब स्त्रियांचे तर विचारायलाच नको) मरेमरेस्तोवर करावे लागणारे काम, कुठेही कशाही परिस्थितीत बाळंत व्हावे लागणे, कुपोषण, पोट घट्ट रहावे म्हणुन कमरेला घट्ट बांधणे, चटके बसणार्‍या पाण्याने बाळंतिणीला अंघोळ घालणे, पोरांचे लेंढार, रोग, चुलखंडापाशी गेलेला जन्म, विधवा, परित्यक्ता स्त्रियांचे तर अपरिमीत हाल वगैरे इतर चिक्कार अनिष्ट प्रथा होत्याच होत्या.
आणि हो लांब केस, नाकातली नथनी, घूंघट .. काढु तेवढ्या चिक्कार गोष्टी निघतील.

तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.>>> हेच खरं. छळाच्या स्तरांमध्ये आणि प्रकारांमध्ये तेवढे वैविध्य. Happy

शर्मिला- अनुमोदन. फॅशनच्या आहारी जाणार्‍या स्त्रियांबाबत .....

भारतीय स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना पेहरावात कॉर्सेट घालावा लागत नसला तरी >>>

येथून पुढचा उतारा विषय दुसरीकडे नेणारा आहे असे मत!

माझ्यासाठी तुमच्याशी चर्चा इथेच संपली.

उत्तरं न देता चर्चा संपवण्याचा खाक्या आवडला.

पण माझ्याकडे आहेत काही दुवे.
या साइटवर शंभरएक वर्षांपूर्वीच्या पेझण्ट्सचे फोटो आहेत. त्यात काही स्त्रियाही आहेत. किती जणींनी आपला फॉर्म पुरुषांनी ठरवल्याप्रमाणे कपडे केलेले आहेत सांगा.

या साईटवर एकंदरीत पेझण्ट्सच्या आयुष्याच्या खडतरपणाविषयी दिलेलं आहे. असं कष्टप्रद आयुष्य जगणाऱ्यांना मिरवण्यासाठी कॉर्सेट्स घालता येत असतील का, तुम्हीच विचार करून सांगा.

पॉल गॉगांने काढलेलं पेझण्ट्सचं पेंटिंग इथे आहे

या लिंकवर पेझण्ट्सचे फोटो, पेंटिंग्ज आहेत.

या सर्व चित्रांत शोधूनही अवरग्लास फिगर सापडत नाही. त्या स्त्रियांचे कपडे बहुतांशी कामाला उपयुक्त, थंडीपासून बचाव करायला उपयुक्त असेच वाटतात.

नक्की कुठच्या स्त्रिया कॉर्सेट्स वापरत असा साधा प्रश्न विचारला आहे. तुम्ही शिक्षिका असल्याने अजून उत्तराची अपेक्षा ठेवलेली आहे.

अभ्यासपूर्ण लेख आवडला. Happy चित्रांमूळे जास्त बोचला. मुलीला पण परिक्षा झाली की वाचायला देणार.

मरेमरेस्तोवर करावे लागणारे काम, कुठेही कशाही परिस्थितीत बाळंत व्हावे लागणे, कुपोषण, पोट घट्ट रहावे म्हणुन कमरेला घट्ट बांधणे, चटके बसणार्‍या पाण्याने बाळंतिणीला अंघोळ घालणे, पोरांचे लेंढार, रोग, चुलखंडापाशी गेलेला जन्म, विधवा, परित्यक्ता स्त्रियांचे तर अपरिमीत हाल वगैरे इतर चिक्कार अनिष्ट प्रथा होत्याच होत्या.
आणि हो लांब केस, नाकातली नथनी, घूंघट .. काढु तेवढ्या चिक्कार गोष्टी निघतील. >>> रैना अजूनही वरच्या ब-याच गोष्टी दुर्देवाने आहेत अस दु:खाने म्हणावे लागतेय. Sad नाकातल्या नथनीवरून एक गोष्ट आठवली. जिचा पती जास्त कमावतो तो त्यातल्या सोन्यात भर घालत रहातो. तिला पेलवेनाशी होते मग ती नथनी. Sad घुंघट तर आजच्या तारखेला पण गुजरात्-राजस्थानात सर्रास पहायला मिळतात.

राजेश तुझा तो लेख तेव्हाही अवमानकारक वाटला नव्हता आणि आज पुनर्वाचनातही त्यात अवमानजनक असं काहीही दिसत नाही. मी तेव्हाही तो लेख वाचून हसले होते, आजही हसले.

ब्रा-ज्वलन असो कुपोषणाने मरणार्‍या फॅशन मॉडेल्स समाजातल्या एका विशिष्ट वर्गातल्या, मर्यादित प्रमाणात का होईना, ही समस्या आहे. ज्या वर्गात ही समस्या आहे त्यांचं अनुकरण समाजात मोठ्या प्रमाणावर होतं. करता येणं काही परिस्थितीमुळे शक्य नसेल तरी मनातून तसं असावं अशी आकांक्षा असते. ब्राह्मणांच्या घरांत होणारे विधवांचे हाल एकेकाळी फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते, पण तथाकथित उच्चभ्रूंचे अनुकरण यातून ते इतर जातींमधेही पोहोचले. आजच्या काळात सुंदर दिसण्यासाठी (उदा: गोरा किंवा ब्राऊन रंग वा झिरो किंवा भरीव आकार) सर्व क्षेत्रातल्या अनेक स्त्रिया, अगदी ज्यांना बुद्धीजीवी म्हणता येईल, त्याही प्रयत्नशील असणं यातून हा प्रश्न फक्त फक्त विशिष्ट वर्गातल्या स्त्रियांपुरताच मर्यादित आहे असं वाटत नाही.
शर्मिला फडके यांचा प्रतिसाद आवडला.

स्त्रियांना, मुलींना आपलं शरीर आकर्षक वाटावं म्हणून प्रोटीन सप्लिमेंट्स घेणारा एक पीएच.डी. विद्यार्थी माझा ऑफिसमेट होता. व्यायामशाळेमधे जाऊन शरीर 'कमावणारे' अनेक त्याच ध्येयाने 'प्रेरीत' असतात.

नीरजाच्या लेखातून याची एक बाजू मांडलेली आहे; दुसरी बाजू, पुरूषांनी शरीराचे हाल करणं, मुळातलं lean शरीर beefy बनवण्याचा प्रयत्न करणं ही पण तीच बाजू, फक्त काहीशी दुर्लक्षिलेली आणि विरोधी समजली गेलेलीही.

आज घातलेल्या ब्रेसियरचा रंग थोबाडपुस्तकावर बोंबलत सांगणे, पर्स कुठे ठेवलेली असते हे लिहीणे वा किती आठवडे कसले डोहाळे लागले आहेत यामुळे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस (कसा होतो हे माहित नाही.) करणे यात मूलभूत फरक वाटतो. अर्थात nothing is sacred यावर विश्वास असल्यामुळे (इथेही थोडा विरोधाभास दिसतो) ब्राज्वलन असो वा थोबाडपुस्तकावरचे टँट्रम्स, टवाळी करण्यासाठी मला काहीच वर्ज्य वाटत नाही.

असा माझ्यासारखा विचार सर्वांनीच करावा असा हट्ट नाही. मला जी टवाळी हसण्यावर सोडून द्यावी असं वाटलं त्यामधून प्रेरणा घेऊन नीरजाने अभ्यासपूर्ण लेख लिहावा हे मला आवडलं. वादावादीमधून सर्वांचाच फायदा होईल असं नाही.

तुझ्या मूळ लेखातल्या (आणि इतरांच्या, इतरही काही लेखांतल्या) द्व्यर्थी संवादांबद्दल मी (आणि माझ्यासारख्या इतर टवाळांनीही) तक्रार करणं म्हणजे पर्यावरणवादी व्यक्तींनी भर उन्हाळ्यात ड्रायरमधे कपडे वाळवण्यासारखं झालं.

माहितीपुर्ण लेख. आवडला.

इकडचे तिकडचे लेख वाचले. ह्या लेखांतील त्या लेखाबद्दलची मते पटली नाहीत. त्या लेखात टवाळी नक्कीच होती. किंबुहना त्या लेखाचे प्रयोजनच खुसखुशीत शैलीत दुसरी बाजु दाखवण्याचे असावे असे वाटले.

राजेशच्या पोस्ट मुद्देसुद.

कृपया मी हा लेख लिहिण्याचे कारण कुठलेतरी एक लिखाण हे नाही हे समजून घ्यावे. त्या लिखाणाचे एवढे महत्व माझ्या दृष्टीने नाहीच आणि ह्या लेखाच्या मागची प्रेरणा/ ट्रिगर असे कुठलेही श्रेय त्या लिखाणाने/ लेखनकर्त्याने घेऊ नये. लेख लिहिणार्‍याची आणि मित्रमंडळींची तशी समजूत झाली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. कदाचित त्यांच्या लेखाच्या प्रसिद्धीसाठी त्यांना असे करण्याची गरज असावी.

मुळात माझ्या लेखामधे कुठेही कुठल्याही ठराविक लेखाबद्दल वा व्यक्तीबद्दल लिहिलेले नाही तेव्हा मी माझ्या लेखात त्या लेखाबद्दलच मते मांडली आहेत असा निष्कर्ष काढणे हेच संपूर्ण निरर्थक आहे.
तेवढाच मूर्ख उद्देश माझ्या लेखाचा असता तर तो त्याच संकेतस्थळावर लिहिला असता. एका महत्वाच्या मासिकामधे दिला नसता आणि मी दिला असता तरी त्यांनी तो घेतला नसता.

फेसबुकवरचे स्टेटस मेसेजेस इत्यादी उगाच चर्चेत घुसडले गेलेले मुद्दे आहेत. त्या गोष्टींचा या लेखाशी कणभरही संबंध नाही.

नी, सुरेख लेख, आगळीवेगळी माहिती. इलस्ट्रेशन्सही फारच छान.

या कॉर्सॅटबद्दल तिडीक आली ती टायटॅनिक सिनेमात रोझची आई रोझचं कॉर्सेट आवळून आवळून बांधते त्या प्रसंगात.

कृपया मी हा लेख लिहिण्याचे कारण कुठलेतरी एक लिखाण हे नाही हे समजून घ्यावे. त्या लिखाणाचे एवढे महत्व माझ्या दृष्टीने नाहीच आणि ह्या लेखाच्या मागची प्रेरणा/ ट्रिगर असे कुठलेही श्रेय त्या लिखाणाने/ लेखनकर्त्याने घेऊ नये. लेख लिहिणार्‍याची आणि मित्रमंडळींची तशी समजूत झाली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. कदाचित त्यांच्या लेखाच्या प्रसिद्धीसाठी त्यांना असे करण्याची गरज असावी.

असं तुम्ही लिहिता खरं. पण माझ्या मिसळपावच्या खरडवहीत तुम्ही हे लिहिलेलं आहे.
----
नीधप
Tue, 01/03/2011 - 14:07
तुमच्या एका लेखावरून/ प्रतिक्रियांवरून तिरमिरून जाऊन एक लेख लिहिलाय. लिहिता लिहिता तो अभ्यासयुक्तच झाला. तर तो लेख या महिन्याच्या मार्चमधे माहेर या मासिकात छापून आलाय. जमल्यास बघावा.
----

आणखी काय बोलू? माझे काही गैरसमज झाले असतील तर त्यासाठी पुरेसं सबळ कारण तुम्हीच पुरवलेलं आहे.

Pages