तुला पाहता

Submitted by रसप on 20 September, 2011 - 08:02

कुणी मुग्ध बेहोश शुद्धीत यावा, तुला पाहता
कुणी झिंगुनी धुंद हरपेल वाचा, तुला पाहता

कुणी मोजतो चंद्रिकांना नभीच्या जरी रात ना
कुणी स्तब्ध होई जसा खुद्द तारा, तुला पाहता

कुणी गान गाई नसे भान त्याला कुठेही असो
कुणी शब्दवेडा लिही फक्त गजला, तुला पाहता

कुणी 'चंद्र' नामी हरवलाच आहे कसा ठाव ना
कुणी तोडतो त्या गुलाबी गुलाबा, तुला पाहता

कुणी प्रार्थनाही करेना अता जाऊनी देऊळी
कुणी फक्त मागे “हवी 'ही'च मजला”, तुला पाहता

कुणी बोल लावी नशीबास का मी नसे लाघवी
कुणी धन्यता मानतो ह्याच जन्मा, तुला पाहता

कुणी बायकोच्या सवे राहुनी माग काढी तुझा
कुणी बायकोला म्हणे "तू हिडिंबा", तुला पाहता

कुणी ह्या रण्याच्या म्हणे शायरीला "अरे बात क्या!"
कुणी गालिबाने भुलावे रदीफ़ा, तुला पाहता

....रसप....

गुलमोहर: 

कुणी बायकोच्या सवे राहुनी माग काढी तुझा
कुणी बायकोला म्हणे "तू हिडिंबा", तुला पाहता>> Lol

'अशी गोड तू' ची आठवण झाली.

" 'अशी गोड तू' ची आठवण झाली. "

बरोब्बर पकडलंत....!!

नीरजच्या त्या अप्रतिम रचनेस वाचल्यावरच प्रेरणा मिळाली होती. तोच बहर आहे.

धन्यवाद!!

बरोब्बर पकडलंत....!!>>> Happy

नीरजच्या त्या अप्रतिम रचनेस वाचल्यावरच प्रेरणा मिळाली होती. तोच बहर आहे.>>>

Lol (दिवा)

कुणी गान गाई नसे भान त्याला कुठेही असो
कुणी शब्दवेडा लिही फक्त गजला, तुला पाहता

भन्नाट! आवडली गझल. Happy