घरी फ्रिज नसेल तर

Submitted by तनू on 20 September, 2011 - 01:42

घरी फ्रिज नसेल तर स्वयंपाकाची कोणती पूर्वतयारी करता येते? म्हणजे डब्यासाठी कणीक मळुन ठेवणे, भाजी कापुन ठेवणे हे आद्ल्या दिवशी केले तर चालेल का? कडधान्य असतील तर आद्ल्या दिवशी शिजवुन ठेवणे? खराब तर नाहि ना होनार?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवंतिका, मी वर्षभर हा प्रयोग घरी करुन बघितला होता. सध्या मला ताज्या भाज्या अगदी ऑफिसमधून घरी आल्यानंतरही मिळू शकतात. त्यामूळे घरी भाजी आणून ठेवायची गरज नव्हती.

पण बाकिच्या तयारीसाठी हवामानाचा विचार करावा लागेल. उष्ण हवामान असेल तर कणीक आंबू शकते. अर्थात तशा आंबलेल्या कणकेच्या चपात्या चांगल्या होतात. (बुरशी आलेली नसावी.)

भाज्या नूसत्या कापण्यापेक्षा शिजवून ठेवल्या तर चांगल्या. अगदी रात्री झोपताना त्या शिजवाव्यात. गरम भांड्यातच झाकून ठेवाव्यात. सकाळी फोडणी, मसाला वगैरे द्यावे. शक्यतो रात्री शिजवताना कांदा, खोबरे वापरू नये. चिंच वापरली तर छानच. चिंचेमूळे पदार्थ खराब होत नाही. व्हिनीगर चालत असेल तर ते वापरावे. त्यानेही पदार्थ खराब होत नाही. बटाटे वगैरे उकडून ठेवता येतील. कडधान्यही शिजवून ठेवता येते. पण हे दोन्ही दुसर्‍या दिवशी वापरावे.
रात्री उरलेल्या भाज्याही, नीट गरम करुन ठेवाव्यात. बाहेर ठेवलेला पदार्थ खाण्यापुर्वी नीट बघून घ्यावा. बुरशी वगैरे आली नाही ना ते बघावे. वास घेऊन बघावा. पातळ भाज्याना आंबल्यामूळे कधीकधी तार येते. तिही नसल्याची खात्री करावी.

वर दिनेशदांनी उत्तम माहिती दिली आहेच.
माझेही दोन पैसे

फ्रिज शिवाय टिकणारे पदार्थ
बाजारतले लोणी - आठवडाभर राहावे (जास्तही!)
अंडी - २ आठवडे (खरे तर माहिनाभर राहतात!)
भोपळा (लाल) - २ महिनेही राहतो (हवा कोरडी हवी)
कांदे - बटाटे - महिनाभर रहावेत.
साधा भोपळा - १ आठवडा
कोबी - १ आठवडा
फ्लॉवर - १ आठवडा (३ दिवसांनी हलकेच पाणी शिंपावे)
टोमॅटो - १ आठवडा (कसेबसे!)
पालेभाज्या - १ किंवा २ दिवस
दूध - रोज २ वेळा तापवून ठेवा

शिजवलेले पदार्थ - पक्क्या झाकणाच्या भांड्यात बनवावेत. हवे तेव्हढे खाऊन झाल्यावर परत उकळी आणावी आणि झाकण ठेवावे. पण ते झाकण नंतर जेंव्हा खायचे असेल (दुसर्‍या दिवशी) तेव्हाच काढावे. पदार्थ चांगले राहतात!

शिवाय माठात किंवा माठाखाली पदार्थ जास्त टिकतात.

काही काळा पुर्वी आपण फिजशिवाय रहात होतो हे ही मला विसरायला झाले आहे. आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद!

घरी फ्रीज बंद पडला तर आई दुध, भाज्या वैगरे व्यवथित गरम करुन थंड पाण्यात ठेवुन द्ययची. ते व्यवस्थित रहातात हा अनुभव आहे. कणिक, बटट्याची भाजी वै. गरमीत आंबु शकते.

माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीच्या घरी ठरवून फ्रिज नाहीये. ती सिंधुदुर्गातल्या छोट्या गावात राहते त्यामुळे शहरापेक्षा तिथले अनुभव वेगळे असणार. पण तिच्याशी बोलून काही टिप्स इथे टाकता आल्या तर देईन.

माझ्या ताईकडे सुद्धा अगदी मागच्या दिवाळीपर्यंत फ्रिज नव्हता..
भाज्या अगदीच जास्ती प्रमाणात आणायच्या असतील आणि फ्रिजशिवाय टिकवायच्या असतील तर..
कोथिंबिर, मेथी वगैरे खुडुन वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवायच्या आणि करण्या अगोदर १५ मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवायच्या.. जुड्याच्या जुड्या सुद्धा टिकवता येतील, तरट/पोत्याचं कापड भिजवून त्यात सगळं गुंडाळुन ठेवायचं. हा उपाय रस्त्यावरचे भाजीवाले सुद्धा करतात. आमट्या भाज्या मात्रं उकळून घ्यायच्या.. पोळ्यांचं भांडं पाण्यात ठेवायचं. मुख्य म्हणजे भाजी किंवा आमटीचा चमचा एकमेकांसाठी वापरायचा नाही.

माझ्याकडे फ्रिज नाही, शिवाय मी पूर्वी "थन्ड" मानल्यागेलेल्या पण सध्या प्रचण्ड उष्ण व कोरडी हवा असलेल्या पुण्यात रहातो. सबब, आम्ही (म्हणजे मोस्टली लिम्बीच :P)
(वर दिनेशदा/निनादनी लिहिले त्यात थोडी भर घालत...)
१) पालेभाजी रात्रीच निवडून ठेवतो, जर पालेभाजी जास्तच ओली/पाणी मारलेली असेल, दिवस पावसाळी असतील, तर पसरवुन ठेवतो. विशिष्ट फळभाज्या रात्रीच चिरुन घट्ट ओल्या भिजवलेल्या फडक्यात ठेवल्या तरी चालतात, मात्र वान्गी पाण्यात ठेवावी लागतात, तर बटाटे मात्र तसे ठेऊ नयेत, वेळीच चिरुन घ्यावेत. मिरची, कोथिम्बिर बारीक चिरुन ठेवलेली चालते, मात्र ओलसर पणा नको. आम्ही बरेचदा नुस्त्या मिरचीचा खरडा करुन ठेवतो.
२) कणीक शक्यतो वेळच्यावेळीच भिजवतो पण बर्‍याचदा दोन वेळची/जादाची शिल्लक कणीक राहिली, त्यातही उन्हाळ्यात, तर ती अन्गाबरोबर घट्ट बसेल अशा भान्ड्यात न ठेवता मोठ्या भान्ड्यात्/पातेल्यात/तसराळ्यात ठेऊन, वर ताटली ठेऊन, भान्ड्याला ओले कापड गुन्डाळून ठेवतो. जशीच्या तशी रहाते.
३) लोणी शक्यतो शिल्लक रहात नाहीच, पण वेळ नसल्याने कढवायचे राहिले तर पुर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार बुडून तरन्गत राहिल इतक्या गार पाण्यात-अशा भान्ड्यात ठेऊन देतो.
४) कडधान्याच्या बाबतीत, जर घरच्याघरी मोड आणले असतील, वा मोडाची विकतची आणली असतील, तर केवळ ओल्या घट्ट पिळलेल्या फडक्यात गुन्डाळून ठेवले तरी भागते, मुद्दामहुन शिजवुन मात्र ठेवत नाही. मात्र वरण्/कडधान्ये/भाज्या इत्यादी जास्तीचे शिजवल्या गेल्या असतील तर ते तसेच कुकरमधे ठेऊन झाकण लावुन ठेवतो, १२ तास पर्यन्त व्यवस्थित रहाते, त्याहुन जास्त वेळ ठेवणे झाल्यास पुन्हा वाफ देऊन गरम करुन ठेवतो.
५) ताक शिल्लक राहिल्यास त्यात जास्त पाणी घालुन ठेवायचे, सकाळी वरील पाणी काढून टाकायचे, उरलेले ताक जास्त आम्बट लागत नाही, वासही येत नाही.

खरंच की पुर्वी फ्रीज नसायचा. मी कल्पनाच करु शकत नाही कारण मी तर जन्मल्यापासुन पाहिलाच आहे. त्याशिवाय अवघड असेल. अगदीच चालवु शकणार नाही असं नाही, पण पसारा खुप होत असेल नक्कीच. पोत्यात गुंडाळलेल्या भाज्या, वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या पुरचुंड्या, पाण्यात तरंगणारी विविध अन्नपदार्थांची भांडी.... खुपच मेसी झालं किचन. आणि वेस्टेज ( आंबणे, नासणे, बुरशी येणे, शिळी भाजी सुकणे इ ) जरा जास्त असणार. शिवाय रोजच्या रोज दूध, दही, भाज्या आणायला जवळ मार्केट असेल तर ठीक, पण नसेल तर जास्तीचा पेट्रोलचा खर्च.

फ्रीज का नको? याला काही कारणं आहेत का? जशी TV साठी मी लिस्ट देवु शकते. म्हणजे पर्यावरण किंवा जीवनसत्वांचा र्‍हास किंवा मग काही वैयक्तिक तत्व. मला माहित करुन घ्यायची उत्सुकता आहे.

>>>> अर्थात तशा आंबलेल्या कणकेच्या चपात्या चांगल्या होतात. (बुरशी आलेली नसावी.) हे नवीन कळले. <<<
अरे मस्तच लागतात! मात्र फार आम्बलेले नको. खाओगे तो जानोगे

वयाच्या ७-८ व्या वर्षी आला फ्रिज घरात. तोवर मातीच्या तसराळ्यात किंवा पाण्याच्या माठाखाली ताज्या भाज्या (शिजवलेल्या नव्हे), दही, दूध, साय असं ठेवायची आई. अन्न उरण्याचा प्रश्नच नव्हता.

ताक शिल्लक राहिल्यास त्यात जास्त पाणी घालुन ठेवायचे, सकाळी वरील पाणी काढून टाकायचे, उरलेले ताक जास्त आम्बट लागत नाही, वासही येत नाही.>> हे नविनच कळाले. भारीये.

अजुन एका ठिकाणी मि १ वेगळीच पद्धत पाहिली होती.

मोठा माठ (रांजण) जमिनीत ३/४ पुरुन ठेवायचा, आणि त्यात सगल्या भाज्या ठेवायच्या, माठ ठेवलेल्या जागेच्या बाजुने जमिनीत पाणी ओतायचे. भाज्या अगदी ताज्या राहतात.

सर्वाना प्रतिसादा साठी धन्यवाद.

@मनिमाऊ फ्रीज नको आहे अस नाहि, आमच्या घरि फ्रीज आहे, पण आता ८-९ महिन्यांसाठी आम्हि दुसरिकडे राहणार आहोत, नंतर परत इथेच यायच आहे. मग तेव्हा २ फ्रीज काय करायचे म्हनुन आता ८-९ महिने फ्रीजशिवाय राहायचे आहे. म्हणुन मि इथे टिप्स विचारल्या.

>>>> अर्थात तशा आंबलेल्या कणकेच्या चपात्या चांगल्या होतात. (बुरशी आलेली नसावी.) हे नवीन कळले. <<<

आंबट लागत नाहि का?

आमच्याकडे जाळीच कपाट होतं. त्यात वरच्या खान्यात दुध ठेवल जायचं. (रात्रीच्या धारेचं गवळ्याकडून यायच ते रात्री, दुसर्‍या दिवशी सकाळी साय ढकलून तापवायचं पुन्हा दुपारी चहाच्या वेळी तापवायच. उरले तर रात्री विरजले जायचे. ) मधल्या खान्यात दही, ताक अन खालच्या खाण्यात पोळ्यांचा डबा. सकाळची उरलेली भाजी आजी माठाजवळ पाण्यात ठेवायची. भाज्या/फळे रोजच्यारोज आणले जायचे. रात्री जेवण झाल की उरलेले भात्-भाजी-वरण-पोळी (जे काय असेल ते ताजताजच) घरापासून ५ मि. अंतरावर कलावतीबाई रहात (कामवाली) त्यांना लगेच जाऊन देण्यात येई. ताकाच वर लिहील्याप्रमाणेच करण्यात येत असे. Happy लोणी कढवूनच ठेवण्यात येत असे. कणीक त्या दोघींनी कधी ठेवलेली पाहिली नाही. पालेभाज्या निवडून ओल्या फडक्यात गुंडाळून माठाजवळ ठेवल्या जायच्या. फळभाज्या अश्याच फडताळाच्या वर टोपल्यात. बाजुच्या टोपल्यात केळी, बोरं, पेरू इ. इ. ऊस बाजुला उभा करून.(जेव्हा मिळत असे तेव्हा) ( सफरचंदे तर घरात कोणी आजारी असल तर सठीसामाशी यायची Happy ) सिताफळे गोणपाटात गुंडाळून पलंगाखाली. दिवाळीच्या सुट्टीत रोज सकाळी किती पिकली ते पाहून खायचा कार्यक्रम . कलिंगड चिरलं की पंख्याखाली गार करून खायचं.

अवंतिका, अगं मी फक्त उत्सुकता म्हणुन विचारलं. खरंच. Happy

आणि नंतर माझ्या लक्षात आलं कि मी माझं घर डोळ्यापुढे ठेवुन लिहित होते. माझ्याकडे अमेरिकन स्टाइल ओपन किचन आहे. म्हणजे लिविंग, डायनिंग, किचन सगळं एकत्रच. आलेल्या पाहुण्यांना सोफ्यावर बसुन किचन पुर्ण दिसतं त्यामुळे ते सदोदित स्वच्छ आणि टिपटॉप असावं लागतं. मग मी माझ्या दृष्टिकोनातुनच लिहित बसले. दुसरी गोष्ट मी डिफेन्स एरियात रहाते, मग जरा काहीही नसेल घरी तर गाडी काढुन विकत आणायला जावं लागतं, मग सगळं एकत्र आणुन स्टोअर करणं जास्त सोयीचं असतं.

चिऊ, तिने मागितली म्हणुन काही पण सजेशन देते का गं? Wink Light 1

आता काय तिने फ्लॅटमधल्या किचनला खड्डा करुन खालच्या मजल्यावरच्या लोकांकडे रांजण पुरायचा का? Happy

आमच्याकडे पण होतं ३ कप्प्यांचं पत्र्याचं जाळीचं कपाट. वरती दुध, मधे दुपारच्या भाज्या, खाली दुसर्या दिवशी करण्याच्या भाज्या असं ठेवायचो.

<<अर्थात तशा आंबलेल्या कणकेच्या चपात्या चांगल्या होतात. (बुरशी आलेली नसावी.) हे नवीन कळले. <<<

हीहीही... अशा आंबलेल्या कणकेत गुळाचं पाणी घालुन त्याचे गोल गोल 'गुलगुले' तळायचे.. हे माझ्या जावेनं मला 'काटकसर' शिकवतांना सांगितलं होतं. Proud

आता काय तिने फ्लॅटमधल्या किचनला खड्डा करुन खालच्या मजल्यावरच्या लोकांकडे रांजण पुरायचा का?>> आणी त्याला थंड करयला मग खालच्या लोकाना पाणी मारायला सांगायला हवे नै.. Proud

तस नाही ग.. मला संदर्भाने आठवल ते मी सांगितल..

आता काय तिने फ्लॅटमधल्या किचनला खड्डा करुन खालच्या मजल्यावरच्या लोकांकडे रांजण पुरायचा का? >>
यावर मोठी कुंडी / पसरट तोंडाच मातीच भांड आणुन त्यात त्यापेक्षा छोट्या साईझच मातीच भांड ठेउन मग बाजुने माती भरता येते. रोज त्या मातीत थोड थोड पाणी घालायच.

जाळीच कपाट फारच नॉस्टॅल्जिक. भाजी, दूध एक वेळेस जमेल पण नॉन व्हेज राख्णे अवघड जाईल. तुम्ही
पॅकेज्ड मीट, सॉसेजेस, सलामी, चिकन कट्लेट, नगेट्स इत्यादी स्टोअर नाही करत का? एक बारका का होइना फ्रिज जरूर घ्या. आठ नऊ महिन्याचा प्रश्न आहे. एल जीचा मिनी फ्रिज मिळतो. परत बर्फ, बीअर इत्यादी चे काय?
कोक पेप्सी ज्युसेस, तसेच, उरलेले अन्न, क्रीम, टोमॅटो प्युरी, एखादे सब सँडविच इत्यादीचे काय होईल. कापलेली फळे, फ्रोजन मटार, दही हे कुठे ठेवणार? तुमच्या बेबीसाठी आणलेले आइसक्रीम चॉकोलेट्स कुठे राहील.
मी फ्रिज मध्ये कॉस्मेटिक्स पण ठेवते एका साइड्च्या कप्प्यात. तसेच डोळ्यावर लावायचा आय पॅड पण. गाअर आयपॅड लावून पडून राहिले कि फार आराम मिळ्तो. माझे मत फ्रिज घेण्याला आहे.

नॉनव्हेज अन फ्रोजन फुड, शीतपेये, विकतच्या प्युर्‍या-बि-या लागत नसतील तरी आइसक्रीम चॉकोलेट्स साठी एखादा छोटा फ्रीज घ्यावा. आमची बेबी तर नेलपेंट्स पण ठेवते फ्रिजमधे. Happy

आमच्याकडे पण होतं ३ कप्प्यांचं पत्र्याचं जाळीचं कपाट.>>>> हम्म. दूध दुभत्याचं कपाट म्हणत त्याला.

ते तर आहेच शिवाय गार पाणी? घरी आल्यावर फ्रिज मधल्या गार पाण्याची बाटली तोंडाला लावायची सवय आजकाल असते. बर्फ, आल्या लसनची पेस्ट, सँड्वीच स्प्रेड, मायो ची बाटली, अंडी मसाला पेस्ट, फ्लेवर्स?

कपाट मस्ट! (निदान ग्राऊण्ड्फ्लोअरवर तरी). माझ्याकडे होत, पण कुणाला तरी दिल, आता दुध तसच उघड्यावर ओट्यावर असत, अन मान्जर शिरू नये म्हणून येताजाता स्वयम्पाकघराचा दरवाजा ओढुन घ्यावा लागतो, तरी रात्री ते मान्जुरड ढुशा देऊन दरवाजा उघडून दुधावर डल्ला मारतच कधीकधी, तर मग पातेल्यावर भलीमोठी जड कढई पालथी घालुन ठेवावी लागते.
आमच्या इकडे मान्जरे खूप आहेत. माझ्या सुमोच्या डॅश बोर्डच्या आत तिने पिल्ले ठेवली होती, आता लिन्टेलवर हलवली आहेत!
मामे, तुझ्या फ्रिज मधे इतके सगळे अस्ते? मग कधि येऊ हैद्राबादला? Proud

शिंकाळ्याचा वापर अजून कोणीच कसा लिहिला नाही? शिंकाळ्यात कांदा-बटाट्याची शिंकाळेवजा टोपली, त्यातच अनेकदा आले-लसूण ठेवलेले पाहिले आहे. शिवाय भोपळा, वेली भाज्या शिंकाळ्यावर टांगून ठेवलेली असायची स्वयंपाकघरात. पांढर्‍या कांद्यांची लड वगैरे. केळीचे घड टांगलेलेच असत की पूर्वी!

परातीत गार पाणी घालून त्यात शिजवलेले अन्न असलेली पातेली/ भांडी झाकून ठेवली तर सकाळचे अन्न सायंकाळपर्यंत बाहेर आरामात टिकू शकते. माठाच्या तळाशी / रिकाम्या माठाला गार - ओले फडके लावून त्यात भाज्या, पदार्थ ठेवल्यास टिकू शकतात.

फ्रिजाशिवाय गोष्टी साठवून ठेवताना अधिक काळजी घ्यावी लागते. वरच्या पोस्टींत तशी उदाहरणे आली आहेत. उदा. दूध दोन वेळा तापवून ठेवणे, वगैरे. आपल्याला उपलब्ध असणारा दिवसातला वेळ आणि करायच्या गोष्टी याचा पूर्ण विचार करून फ्रिजाशिवाय काम चालवायचं अथवा एखादा छोटा फ्रीज तात्पुरता घ्यायचा, याबद्दलचा निर्णय घेणं उत्तम. गरज संपल्यावर तो फ्रीज विकून टाकता येतो. रोजची जॉबची धावपळ असेल आणि आधीपासून फ्रीज वापरायची सवय असेल तर ती एकदम सोडून नवीन पद्धतीने सगळ्या गोष्टी मेन्टेन करायचा जास्तीचा ताण नाही का येणार?

मागे 'इनिव्हेटिव्ह इन्डिया' किंवा तत्सम आर्टिकल आले होते.ज्यात एका राजस्थानी कुम्भाराने विना-वीज भारतिय फ्रिज (खरं तर शितकपाटच) बनव्ले आणि साधारण काही शे रुपयांत बाजारात आणले.
कल्पना साधीच आहे. मातीचे कपाट बनवायचे.वरचा भाग हा माठासारखा आणि खालच्या भागात नाशिवंत वस्तू ठेवायच्या. वरच्या माठासार्ख्या भागात पिण्याचे पाणि ठेवल्याने ते गार होतेच पण त्यामुळे खालच्या अंतर्भागातले तापमान २-३ अंशाने कमी होऊन तिथेही पदर्थ टिकतात.
(याच आर्टिकलमध्ये ३ ईडियट मध्ये वापरलेल्या हॉवरींग स्पाय कॅमचा उल्लेख होता. मुम्बई आय आय टी तल्या विद्यार्थ्यांनी ते बनविले असून त्यांना भारतीय लषकराकडून त्याबद्दल ओर्डर्स मिळालेल्या आहेत)

मी पोस्ट ऑफिसमधे छोट्या फ्रीजची जहिरात पाहिली होती. फ्रीज बणावणार्‍या कंपनीचे आणि भारतीय डाक विभागाचे जहिरातीसाठी काहीतरी अ‍ॅगरीमेंट झाले आहे. कुठल्याही पोस्ट ऑफिसमधे याची माहिती मिळु शकेल.

मी पोस्ट ऑफिसमधे छोट्या फ्रीजची जहिरात पाहिली होती. फ्रीज बणावणार्‍या कंपनीचे आणि भारतीय डाक विभागाचे जहिरातीसाठी काहीतरी अ‍ॅगरीमेंट झाले आहे. कुठल्याही पोस्ट ऑफिसमधे याची माहिती मिळु शकेल.>> ओह छान. त्या मुळे ते काही सवलतिच्या दरात वगैरे मिळणार आहे काय??

फ्रिजाशिवाय गोष्टी साठवून ठेवताना अधिक काळजी घ्यावी लागते. वरच्या पोस्टींत तशी उदाहरणे आली आहेत. उदा. दूध दोन वेळा तापवून ठेवणे, वगैरे. >>> हो आणि हे सगळ करायला घरात एक माणूस लागतं. दोघं नोकरीला जात असतील तर दुपारी दुध कोण तापवणार? अर्थात सकाळीच संपवून जाता येईल. अन भाजीपाला जवळपास मिळत असेल अन फ्रीजची सवय नसेल तर चांगलच आहे म्हणा.
माझ्या ताईच्या घरी २ वर्षापूर्वी इंजक्शन्स ठेवायला म्हणून फ्रीज घेण्यात आला. Happy टीव्ही तर अजूनही नाही. मस्त ना? Happy
येस अरूंधती शिंकाळ असायचच. कांदा-लसणीचं. आमचे ते तारेचे होते म्हणून बटाटे खालीच टोपल्यात ठेवण्यात येत.
आमच्याकडे अजूनही फ्रीजचा खूपच मर्यादित वापर आहे. दुध,साय, दही. भाज्या ३-४ वर नाही. अन फळे. फ्रोजन फुड मला आवडत्/परवडत नाही. जे ज्या सीझनमधे असते ते आम्ही खातो. शीतपेये, थंड पाणी पीत नाही. आलेलसूण पेस्टला ३/४ दिवसात फ्रीजमधे वास येतो.
माझ्या नातेवाईकांकडे तर काय काय भरलय नुस्त फ्रिजात.. रवा, मैदा, मसाले सुध्दा ठेवतेत. Happy
अर्थात रवा भाजायला वेळ नसेल मिळत. मला सकाळी उशिरा जायचे असते म्हणून मी सकाळीच भाजी चिरू शकते (कणीक मळण्याचे काम दुस-याला दिल्याने तो वेळ वाचतो)
आदल्या दिवशी भाजी चिरली तर जीवनसत्त्वांचा -हास होतो म्हणतात ना? पण वेळ नसेल तर काय करणार ना.

आमच्याकडे अजूनही फ्रीजचा खूपच मर्यादित वापर आहे. दुध,साय, दही. भाज्या ३-४ वर नाही. अन फळे. फ्रोजन फुड मला आवडत्/परवडत नाही. जे ज्या सीझनमधे असते ते आम्ही खातो. शीतपेये, थंड पाणी पीत नाही. आलेलसूण पेस्टला ३/४ दिवसात फ्रीजमधे वास येतो.>>>>>>>>>. +१

अवंतिका, मिनी फ्रिज साधारणपणे तीन ते चार हजारापर्यंत बसतो. तसेच, गरज संपल्यानंतर त्याच दुकानदाराकडे तो एकक्सेंज करता येइल का? याची चौकशी करा. किंवा जिथे दुसरीकडे जाणार आहात तिथे फर्निश्ड फ्लॅट शोधा, जेणेकरून फ्लॅटमधला फ्रीज तुम्हाला वापरता येइल.

आमच्याकडे अजूनही फ्रीजचा खूपच मर्यादित वापर आहे. दुध, दही. भाज्या ३-४ वर नाही. फ्रोजन फुड मला आवडत् नाही. जे ज्या सीझनमधे असते ते आम्ही खातो. शीतपेये, थंड पाणी पीत नाही. आलेलसूण पेस्टला ३/४ दिवसात फ्रीजमधे वास येतो. + १

मला तर सफरचंद फ्रीज मध्ये ठेवल्यावर दुधाला त्याचा वास लागतो असा अनुभव आहे. त्यामुळे फळे सुद्धा बाहेरच. आमच्या फ्रीज मध्ये २-३ भाज्या, दुध, दही, १ दिवसाची कणीक, काही सरबते.. बास.

काय काय भरलय नुस्त फ्रिजात.. रवा, मैदा, मसाले सुध्दा ठेवतेत<<<
रवा मैद्या सारख्या पदार्थांमधे मुंबई सारख्या दमट हवेत कीड होण्याची शक्यता खूप असते. घाट ओलांडून पुण्यात जा. तिथली हवा बर्यापैकी कोरडी आहे मुंबई पेक्षा. शक्यतो पदार्थ खराब होत नाहीत. त्यामुळे रवा मैदा मसाल्याचे पदार्थ ड्रायफ्रूट्स वगैरे तर मी आईला नेहेमीच फ्रीज मधे ठेवताना पाहिलंय.असे काही पदार्थ कमी कमी म्हणजे किती कमी विकत आणणार? आणी बाहेर ठेवून आळ्या आणी कीड लागण्यापेक्षा फ्रीज मधे ठेवणे कधीही चांगले. शेवटी प्रत्येक ठिकाणच्या हवामानावर खूप गोष्टी अवलंबून असतात.

अगदी अगदी प्राडी...
पुण्यात सुद्धा आईकडे रवा फ्रीजरमधेच असायचा. तसेच रोज न लागणारे मसाले त्याचा वास जाऊ नये आणि खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमधे. इथे मुंबईत मी पण ड्रायफ्रूटस फ्रीजमधेच ठेवते.