संस्कृतमौक्तिके- नीतिशतक भाग ५

Submitted by चैतन्य दीक्षित on 19 September, 2011 - 14:19

बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर- पुन्हा एकदा! संस्कृतमौक्तिके- नीतिशतक लेखमालेचा पाचवा भाग.
रोज २ श्लोक लिहीत जाईन म्हणजे मलाही सोयीचं होईल.

आधीचे भाग-
भाग १-
भाग-२
भाग-३
भाग ४

---------------------------------------
दुर्जनपद्धति- दुर्जनांची लक्षणे सांगणारी पद्धति अथवा श्लोकसमूह.

अकरुणत्वमकारणविग्रह: परधनापहृति: परयोषितः | *(पाठभेद- परधने परयोषिति च स्पृहा)
स्वजनबन्धुजनेष्वसहिष्णुता प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनाम् || ४५ || (वृत्त- द्रुतविलंबित)

अर्थ- दुर्जनांकडे सहज असणारे गुण या श्लोकात सांगितले आहेत.
अकरुणत्व- करुणेचा अभाव. अकारणविग्रहः - अकारण भांडणतंटा करणे, परधनाचा अपहार करणे, परस्त्रीकडे कुदृष्टीने बघणे/ परस्त्रीची इच्छा धरणे, सख्ख्यांशी किंवा नातलगांशी असहिष्णूपणे वागणे हे सगळे गुण दुर्जनांकडे स्वाभाविकपणे येतात.

दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालङ्कृतोऽपि सन् |
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः || ४६ || (वृत्त- श्लोक)

अर्थ- दुर्जन माणूस हा कितीही उच्चविद्याविभूषित असला तरीही त्याच्यापासून चार हात लांबच राहावे.
सापाच्या डोक्यावर मणी असल्याने तो कितीही चांगला दिसत/वाटत असला, तरीही तो भयंकरच !!

जाड्यं ह्रीमति गण्यते व्रतरुचौ दम्भ: शुचौ कैतवं
शूरे निर्घृणता मुनौ विमतिता दैन्यं प्रियालापिनि |
तेजस्विन्यवलिप्तता मुखरता वक्तर्यशक्ति: स्थिरे
तत्को नाम गुणो भवेत्स गुणिनां यो दुर्जनैर्नाङ्कित: || ४७|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थ- दुर्जन लोकांना सज्जनांच्या गुणाच्या जागी अवगुणच कसे दिसतात ते या श्लोकात सांगितले आहे.
सज्जनांची नम्रता दुर्जनांच्या लेखी त्यांचे अज्ञान/ आळस ठरतो. सज्जनांच्या ठायी असलेली व्रताची आवड दुर्जनांच्या लेखी दांभिकता ठरते. सज्जनांच्या पावित्र्य राखण्याच्या वृत्तीला दुर्जन लोक 'कपट' असे नांव देतात.
सज्जनांच्या शौर्याला निर्घृणता म्हटले जाते. मुनिजनांना मतिहीन समजले जाते तर एखादा गोड बोलणारा असेल तर तो दीनवाणा आहे असे म्हटले जाते.
सज्जनांच्या तेजस्वितेला 'ग'ची बाधा समजले जाते तर त्यांच्या वक्तृत्वशक्तीला बडबड्या स्वभाव असे मानले जाते. त्यामुळे सज्जनांच्या ठायी असलेला एकही गुण असा नाही की ज्याला दुर्जनांनी नावे ठेवली नाहीत.

लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:
सत्यं चेत्तपसा च किं शुचि मनो यद्यस्ति तीर्थेन किम् |
सौजन्यं यदि किं निजै: स्वमहिमा यद्यस्ति किं मण्डनै:
सद्विद्या यदि किं जनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ||४८ || (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थ-
जर माणसाकडे लोभ असेल तर त्यासारखा दुसरा अवगुण नाही. जर पाशवी वृत्ती/क्रौर्य असेल तर त्यासारखे दुसरे पातक नाही. जर माणूस सत्य बोलणारा असेल तर त्याला वेगळ्या तपाची गरज नाही आणि जर मन पवित्र असेल तर कुठल्याही तीर्थाची(तीर्थस्थानाची)गरज नाही.
जर माणूस सौजन्यपूर्ण वागत असेल तर जगातले सगळेच त्याला नातेवाइकाप्रमाणे असल्याने त्याला वेगळी अशी नातेवाइकांची गरज नाही. जर माणसाला स्वतःच्या कष्टाच्या जोरावर प्रतिष्ठा मिळाली असेल तर त्याला इतर आभूषणांची गरज नाही. जर त्याच्याकडे चांगली विद्या असेल तर त्याला इतरांकडून (पैशाच्या बाबतीत) मदत घेण्याची गरज नाही. आणि अपयश पदरी असेल तर तेच जिवंतपणीच्या मरणासारखे आहे.

(हा श्लोक पूर्णपणे 'दुर्जनपद्धति'मध्ये बसत नाही असे दिसते. कारण यात केवळ दुर्जनांची लक्षणेच सांगितली आहेत असे नाही..

या श्लोकाचा अजून काही पाठभेद मिळतो का ते पाहतोय. जर कुणाला या श्लोकाचा एखादा दुसरा पाठभेद आढळला तर तो कृपया इथे द्यावा ही विनंती.)

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृते:|
प्रभुर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो
नृपाङ्गणगतः खलो मनसि सप्तशल्यानि मे||४८९ || (वृत्त- पृथ्वी)

अर्थ- श्लोककर्त्याच्या मनातील सात शल्यांचा उल्लेख या श्लोकात येतो
दिवसा दिसणारा धूसर चंद्र, जिचे यौवन सरले आहे अशी स्त्री, पाणी आटलेले सरोवर, दिसायला अतिशय सुंदर पण निरक्षर व्यक्ती, धनलोलुप राजा, संकटांनी ग्रस्त असे सज्जन, राजदरबारी (मान मिळणारी) दुष्ट माणसे.

न कश्चिच्चण्डकोपानामात्मीयो नाम भूभुजाम् |
होतारमपि जुह्वन्तं* स्पृष्टो दहति पावकः ||५० || (वृत्त- श्लोक) (पाठभेद- जुह्वानं)

अर्थ- ज्या राजाला अतिशय पराकोटीचा राग येतो, अशा राजासाठी कुणीच जवळचा नसतो.
यासाठी यज्ञाग्नीचे उदाहरण दिले आहे. यज्ञीय अग्नी हा त्यालाच हविर्द्रव्य देणार्‍या होत्याला (त्याचा चुकून हात लागला असता) पोळतो.
होता= हवन करणारा.

मौनान्मूकः प्रवचनपटुर्वातलो जल्पको वा
धृष्ट: पार्श्वे वसति च सदा दूरतश्चाप्रगल्भः |
क्षान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ||५१|| (वृत्त- मंदाक्रांता)

अर्थः सेवकाचं जिणं किती जिकीरीचं असतं ते या श्लोकातून सांगितलं आहे.
जर सेवक कमी बोलणारा/ न बोलणारा असेल तर त्याला मालक 'तू मुका आहेस का रे?' असे म्हणेल.
जर तो बोलण्यात तरबेज असेल तर 'तू फारच बडबड्या आहेस' असे म्हणेल.
जर सेवक मालकाची सेवा करता यावी म्हणून कायम मालकासमोर राहात असेल, तरीही त्याच्यावर 'उद्धटपणा'चा शिक्का बसतो. जर सेवक मालकापासून अंतर राखून असेल तर तो 'अप्रगल्भ' आहे असे समजले जाते. जर सेवक संयमी असेल तर तो 'भित्रा' समजला जातो आणि जर सहनशील नसेल तर त्याला अभिजात मानले जात नाही. अशा प्रकारे, सेवक कसाही वागला, तरीही मालक त्याला नावेच ठेवतो. म्हणूनच सेवाधर्म हा अतिशय बिकट आहे आणि तो योग्यांनाही साध्य होण्यातला नाही.

उद्भासिताखिलखलस्य विशृङ्खलस्य
प्राग्जातविस्मृतनिजाधमकर्मवृत्ते: |
दैवादवाप्तविभवस्य गुणद्विषोऽस्य
नीचस्य गोचरगतै: सुखमास्यते कै: || ५२ || (वृत्त- वसंततिलका)

अर्थ- जगातल्या सगळ्या दुष्टांहूनही दुष्ट असणार्‍या, स्वैराचारी, स्वतःच्या पूर्वीच्या नीच-कृत्यांचा ज्याला विसर पडला आहे अशा, ज्याला नशिबाने (वडिलोपार्जित) पैसा आयता मिळाला आहे अशा आणि जो गुणी लोकांचा तिरस्कार करतो अशा माणसाच्या हाताखाली कोण बरे सुखाने राहू शकेल?

गुलमोहर: 

चैतन्य, मस्त धागा!

शतकत्रयीमधील मला आवडलेलं काही...

प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः
प्रारभ्य चोत्त्मजना न परित्यजन्ति॥

हेच आजच्या प्रतिष्ठित एमबीए कोर्सेसमध्ये शिकवतात, पण इंग्रजीतून!
भर्तृहरि चिरायू होवो!

बरेच दिवसांनी! Happy रोज दोन श्लोक आणि त्यांचे अर्थ लिहायची कल्पना मस्त आहे.
स्वाती म्हणते तशा लिंका द्याल का?

धन्यवाद.
आधीच्या भागांचे दुवे वर दिले आहेत.

बित्तुंबगा-
तो जो प्रारभ्यते.... श्लोक आहे ना... तोच प्रयत्न आहे.
मध्यंतरी थोडा खंड पडला या कामात, पण आता खंड पडू न देता श्लोकांचा अर्थ देण्याचं काम करायचा मानस आहे.

पुनश्च धन्यवाद!
-चैतन्य.

फार सुंदर चैतन्य.

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृते:|
प्रभुर्धनपरायणः सततदुर्गतः सज्जनो
नृपाङ्गणगतः खलो मनसि सप्तशल्यानि मे||४८९ || (वृत्त- पृथ्वी)

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा
पद्मावीण तळे निरक्षर मुखी जरी साजिरा गोजिरा
दात्याला धनलोभ नित्य वसते दारीद्र्य विद्वज्जनी
दुष्टांचा पगडा महिपतीगृही ही सात शल्ये मनी

मराठी अनुवादही सहज आठवला म्हणून दिला. आणखी अशी सुभाषिते असल्यास अवश्य शेअर करा.

हा आणखी एक आठवला.. चु.भू.द्या.घ्या.
''मृगमीनसज्जनानां तृणजलसंतोषविहित वृत्तीं |
लुब्धकधीवरपिशुना : निष्कारणवैरिणो जगति || ''

भावानुवाद-
हरीण मत्स्य आणिक सज्जन| किती सोपे जगण्याचे साधन
गवत पाणी संतोष अन मनी | एवढीच साधीशी मागणी

पारधी कोळी आणिक दुर्जन | एकच यांचेही प्रयोजन
वैर करावे अनुक्रमाने | निष्कारणवैरावर जगणे ||

बेफिकीर यांच्या पोस्टवरून एक दुर्जन आणि सर्प यांच्यातील एक अन्योक्ती आठवली-
'' रे सर्प दुरमपसर्प नैव वह दर्प मात्मनो मनसि|
यल्लीलयैव खिलं भेककुलं कवलयति ||
कुटिलता नैकजिव्हता भोगलुब्धता प्रकृत्या वहसि
हा दुग्धदं तथा पदा स्पृश्यंतं दशसि ||
हे लीलया बेडूककुळाला गिळून टाकण्याचा गर्व वाहणार्‍या सर्पा, दूर हो, तू (दुर्जनांप्रमाणेच ) स्वभावतः वळणावळणांच्या चालीचा (वक्र) , फाटलेल्या जिभेचा (दुतोंड्या) , भोगलोलूप (भोग शब्दावर श्लेष-भोग म्हणजे प्रसादाचे दूधही अन भोगही ),दूध देणार्‍याला व ज्याचा तू पदस्पर्श करतोस त्यालाच दंश करणारा आहेस..