संस्कृतमौक्तिके- नीतिशतक भाग-४

Submitted by चैतन्य दीक्षित on 20 April, 2011 - 12:11

बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर-
संस्कृतमौक्तिके- नीतिशतक भाग ३ व त्या आधीच्या भागांचे दुवे येथे पाहा.

भाग ४- अर्थपद्धति
(नीतिशतकातला एक महत्वाचा भाग. धनविषयक विचार, परखडपणे मांडले आहेत भर्तृहरीने. व्यावहारिकपणाबद्दलचे हे विचार क्वचित टोकाचे वाटू शकतात, पण भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक होणे चांगले असेही पटते.)

जातिर्यातु रसातलं गुणगणस्तस्याप्यधो गच्छतु
शीलं शैलतटात्पतत्वभिजनः सन्दह्यतां वह्निना |
शौर्ये वैरिणि वज्रमाशु निपतत्वर्थोऽस्तु न: केवलं
येनैकेन विना गुणास्तृणलवप्राया समस्ता इमे || ३४|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थः जात,वंश इत्यादींना समाजात जे महत्व असते, असे सगळे रसातळात जावो.
(रसातळ- ७ पाताळांपैकी एक) , ज्या गुणांचे जगात कौतुक होते, असे सगळे गुण तर त्याच्याही खाली, म्हणजे रसातळाच्याही खाली जावोत. ज्या चारित्र्याबद्दल सदैव जागरूक रहायला सांगितलं जातं असं शील/चारित्र्य पर्वतमाथ्यावरून खाली पडो. ज्यांना आपले म्हणतो, ज्यांचा आधार असतो, असे नातलग आणि मित्र वगैरे सगळे आगीत जळोत. शौर्य नावाच्या गुणावर वज्राघात होवो आणि हे सगळं जाऊनसुद्धा माझ्याकडे/आमच्याकडे काय उरो? तर पैसा. कारण, बाकीचे सगळे असतील आणि पैसा नसेल तर सगळं काही (सगळे गुण) कस्पटासमान आहेत.

तानीन्द्रियाणि सकलानि तदेव कर्म
सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव |
अर्थोष्मणा विरहितः पुरुषः स एव
त्वन्यः क्षणेन भवतीति विचित्रमेतत् || ३५ || (वृत्त- वसंततिलका)

अर्थः पैसा नसला की आत्ता आत्तापर्यंत आपला ओळखीचा वाटणारा माणूसही बदलतो असं या श्लोकात सांगितलं आहे.
एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणजे त्याचा चेहरा/हात-पाय इ. त्या व्यक्तीचं शरीर, त्या व्यक्तीची कामं, त्या व्यक्तीची बुद्धी आणि त्याचे बोलणे या गोष्टी आपण विचारात घेतो. तर या सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा जरी असल्या, म्हणजे तोच चेहरा, तीच कामं, तीच अप्रतिहत बुद्धी, तेच बोलणं- हे सगळं जरी तेच असलं,
तरीही जर त्या व्यक्तीकडे पैसा नसेल (शब्दशः पैशाची ऊब नसेल) तर तीच व्यक्ती अगदी क्षणात आपल्याला वेगळी वाटते. (थोडक्यात- सधन मित्राला त्याचा अगदी जुना परिचयाचा मित्र जरी असला, तरी तो जर निर्धन असेल तर मात्र त्याची ओळखच बदलते.)

यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः
स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः |
स एव वक्ता स च दर्शनीयः
सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते ||३६ || (वृत्त- उपजाति)

अर्थः हा नीतिशतकातला अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. त्यातही 'सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते' ही ओळ जास्त प्रसिद्ध!
शब्दशः अर्थ- ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याच्याजवळ सगळे गुण आहेत. यातला उपहास बोलका आहे, सर्वकालीन आहे. कुलीनतेची सर्वमान्य व्याख्या काय असावी?
ज्याच्याकडे पैसा तो कुलीन- अशी सरसकट एकच व्याख्या करायची, की झालं काम. (उपहास जबरदस्त आहे यात) मग तोच पैसेवाला- पंडित, बहुश्रुत, गुणांची पारख असलेला, वक्ता, दर्शनीयही तोच. समाजात, पैसा असलेल्यांकडे नसलेले गुण कसे उपजतच त्यांच्यात आहेत असे सांगणारी अनेक मंडळी असतात. किंबहुना,कुणीही न सांगताच ते सगळ्यांना मान्य होते असे भर्तृहरीला सांगायचे असावे. त्यामुळे हे सगळे गुण आले कुठून? तर त्याच्याकडे असलेल्या धनामुळे. म्हणजेच थोडक्यात सगळ्या गुणांनी सोन्याचा (पक्षी धनाचा) आश्रय घेतल्यासारखी परिस्थिती.

दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यति यति: सङ्गात्सुतो लालनात्
विप्रोऽनध्ययनात्कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात् |
ह्रीर्मद्यादनवेक्षणादपि कृषि: स्नेहः प्रवासाश्रयात्
मैत्री चाप्रणयात्समृद्धिरनयात्त्यागात्प्रमादाद्धनम् ||३७|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थः कशाकशाचा नाश कशाकशाने होतो हे या श्लोकात सांगितले आहे.
राजाचा नाश वाईट मंत्रणेमुळे (म्हणजे सल्लागार मंडळाच्या वाईट सल्ल्यांमुळे) होतो. संन्यस्त व्यक्तीचा नाश संगामुळे होतो (संन्याशांचे अनेक नियम असतात, जे लोकांमध्ये राहिल्यास पाळणे शक्य होत नाही). मुलाचा नाश (पक्षी- वाईट सवयी लागणे इ.) अतिलाड केल्याने होतो. ब्राह्मणाचा विनाश अनध्ययनामुळे होतो.
(चातुर्वर्ण्य पद्धतीत विप्रवर्गाची नियोजित कर्मे ४- यजन, याजन, अध्ययन, अध्यापन.) त्यातले अध्ययन न केल्यास, म्हणजे विद्याभ्यास न केल्यास ब्राह्मणाचा विनाश होतो. जर कुपुत्र जन्माला आला तर संपूर्ण कुलाचा नाश होतो. वाईट माणसाच्या संगतीमुळे चारित्र्याचा नाश होतो.
मद्यामुळे लज्जेचा (जनलज्जेचा) नाश होतो, नीट लक्ष न देण्यामुळे शेतीचा नाश होतो, कायम प्रवासात (एकमेकांपासून लांब) असल्याने दोन व्यक्तींमधले प्रेम नष्ट होते. प्रेमाच्या अभावी मैत्री नाश पावते, अनीतीने वागल्यास समृद्धीचा नाश होतो आणि त्याग केल्याने किंवा माज केल्याने धनाचा नाश होतो.

दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य |
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ||३८|| (वृत्त- आर्या)


अर्थः
हा एक सोपा अर्थ असलेला श्लोक आहे. पैसा संपण्याचे तीन मार्ग- दान, उपभोग आणि नाश.
जो पैसा दानही करत नाही आणि त्याचा उपभोगही घेत नाही, त्याचा पैसा नाश पावतो.

मणि: शाणोल्लीढः समरविजयी हेतिनिहतो
मदक्षीणो नागः शरदि सरिता: श्यानपुलिना: |
कलाशेषश्चन्द्रः सुरतमृदिता बालवनिता
तनिम्ना शोभन्ते गलितविभवाश्चार्थिषु नरा: || ३९ || (वृत्त- शिखरिणी)

अर्थः कशाकशाला/कुणाकुणाला कमीपणामुळे शोभा येते (कमीपणा किंवा- स्वत:कडचे काही तरी गेल्यानंतर) ते या श्लोकात सांगितले आहे.
एखादा मणी/रत्न जे पैलू पाडण्यासाठी घासले जाते, त्या घासण्यामुळे तो मणी झिजतो खरा, पण त्यामुळेच तो शोभतो. एखादा वीर, जो की समरांगणी विजयी झाला आहे, तो त्याच्या शरीरावरच्या तलवारीच्या (हेति-तलवार) घावांमुळे शोभतो. नाग= हत्ती ज्याचा मद (हत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा द्रवपदार्थ) कमी झाला आहे तो शोभून दिसतो. शरद ऋतूमध्ये नद्या त्यांच्या सुकलेल्या/आटलेल्या किनार्‍यांमुळे शोभून दिसतात.
एकच कला शिल्लक राहिलेला चंद्र, म्हणजेच चंद्राची कोर शोभून दिसते, रतिप्रसंगामुळे थकलेली तरुण विवाहित स्त्री.
आणि या सर्वांखालोखाल शोभून दिसतात ते म्हणजे असे लोक की ज्यांनी याचकांना दान देऊन आपले वैभव (पक्षी) धन पणाला लावले आहे.

परिक्षीणः कश्चित्स्पृहयति यवानां प्रसृतये
स पश्चात्स्म्पूर्णो गणयति धरित्रीं तृणसमाम् |
अतश्चानेकान्ता गुरुलघुतयार्थेषु धनिनाम्
अवस्था वस्तूनि प्रथयति च सङ्कोचयति च || ४० || (वृत्त- शिखरिणी)

अर्थः
धनिक लोकांची समृद्धीबद्दलची मते निश्चित नसतात. ते एखाद्या परिस्थितीचं समृद्धीच्या दृष्टीनं मूल्यमापन करताना- त्या परिस्थितीला कधी समृद्ध म्हणतात तर कधी त्याच परिस्थितीला 'अ'समृद्ध म्हणतात !
उदाहरण म्हणून एका गरीब माणसाचं उदाहरण दिलं आहे. त्याचं दारिद्र्य इतकं आहे की त्याला फक्त एक मूठभर धान्य मिळालं तरी पुरे असं तो म्हणतो. पण तोच जेव्हा नंतर श्रीमंत होतो, तेव्हा मात्र आख्ख्या पृथ्वीला कस्पटासमान लेखतो.

राजन्दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेतां
तेनाद्य वत्समिव लोकमिमं पुषाण |
तस्मिंश्च सम्यगनिशं परिपोष्यमाणे
नानाफलै: फलति कल्पलतेव भूमि: || ४१ || (वृत्त- वसंततिलका)

अर्थः हा श्लोक अर्थपद्धतीमध्ये का आलाय हे कळत नाही. पण अर्थ-
हे राजा, जर तुला या पृथ्वीरूपी धेनूचं दोहन करायचं असेल (थोडक्यात तुला शेती इ. मधून उत्तम उत्पन्न हवं असेल तर) तर सर्वात आधी तुझ्या प्रजेचं व्यवस्थित पालन कर. (हे राजे लोकांच्या काळातलं वर्णन आहे, म्हणजे
बर्‍याच लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा असला पाहिजे.) जर तू त्यांचं योग्य रीतीनं पालन केलंस, म्हणजे त्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्यास, त्यांच्यावरची संकटं दूर केलीस, तर ही भूमी एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे बहरून येईल आणि तुला इष्ट फळ मिळेल.
(आजच्या राज्यकर्त्यांनी हे पाहिलं पाहिजे असं खूप वाटतं... पण...... !!!)

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च
हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या |
नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च
वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा || ४२|| (वृत्त- वसंततिलका)

अर्थः हाही श्लोक प्रक्षिप्त (म्हणजे नंतर आलेला, दुसर्‍याच कुणी तरी घुसवलेला) वाटतो.
पण त्याचा अर्थ आणि त्यातलं निरीक्षण अफाट आहे.
राजाची नीती/वागणं हे वारांगनेसारखं अनेक प्रकारचं आणि तितकं अनिश्चित असतं.
वारांगना- आत्ता सत्य बोलते, तर दुसर्‍या क्षणी खोटं, आत्ता खूप निर्दयी बोलत असेल, तर पुढच्या क्षणी खूप प्रेमळ बोलते, आत्ता ती हिंस्र असते तर दुसर्‍या क्षणी दयाळूही, कधी ती अति-पैसा पैसा करते तर कधी दानी असते, या क्षणी ती खूप पैसा खर्च करत असेल तर पुढच्या क्षणी ती अति-कंजुषपणा करते.
एकाच वारांगनेची ही जशी अनेक रूपे असतात, तसंच राजाचं वागणंही अनेक प्रकारचं असतं.

यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद्वा धनं
तत्प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ च नातोधिकम् |
तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा मा कृथा:
कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ||४३|| (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थः दुसर्‍या लोकांना मिळणार्‍या पैशाबद्दल हेवा वाटण्याचं कारण नाही, हे सांगण्यासाठीचा हा श्लोक आहे. श्लोककर्ता अशा (दुसर्‍याच्या पैशाबद्दल हेवा वाटणार्‍या) माणसाला म्हणतो-
विधात्याने जितकं धन तुझ्या कपाळी लिहिलंय, ते कमी असो वा जास्त, तेवढं धन तुला अगदी वाळवंटातही मिळेल, किंवा अगदी एखाद्या पर्वतशिखरावरही मिळेल, पण त्यापेक्षा जास्त धन मिळणार नाही.
त्यामुळे तू, ज्यांच्याकडे पैसे (तुझ्यापेक्षा जास्त) आहेत त्यांच्याबद्दल असूया बाळगू नकोस.
तांब्या विहिरीत बुडवला काय किंवा समुद्रात बुडवला काय, त्यात मावेल इतकंच पाणी तांब्यात शिरतं.

रे रे चातक, सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा: |
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा:
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः || ४४ || (वृत्त- शार्दूलविक्रीडित)

अर्थ: कुणाकडे मागावं हे कळलं पाहिजे, हे सांगण्यासाठी चातकाचं उदाहरण दिलं आहे.
श्लोककर्ता चातकाला म्हणतो, हे चातका, माझं बोलणं नीट ऐक,
आकाशात अनेक मेघ आहेत, पण सगळेच काही सारखे नसतात. त्यातले काही पाऊस पाडून पृथ्वीला भिजवतात आणि काही फक्त गर्जना करतात. त्यामुळे जो मेघ दिसेल त्याच्यापुढे उगाच दीनवाणी याचना करू नकोस.

- नीतिशतक भाग ४ समाप्त -

गुलमोहर: 

यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद्वा धनं
तत्प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ च नातोधिकम् |
तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा मा कृथा:
कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् ||४३||

>>>> माझा अत्यंत आवडता श्लोक !!

ज्योति, शैलजा, प्रगो, उमेश,

धन्यवाद !
संस्कृतभाषा शक्य त्या मार्गे आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
धर्मो रक्षति रक्षितः असं म्हणतात तसंच भाषा रक्षति रक्षिता असं म्हणायला हरकत नसावी.

-चैतन्य.