तुम्हे याद हो के न याद हो - २१

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2011 - 03:39

'तुम्हे याद हो... के न याद हो' या कथानकाचे काही अंतिम भाग राहिलेले आहेत. या रखडलेल्या कथानकालाही प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार! याही कथानकाच्या प्रतिसादांमध्ये सुरुवातीला वाद उत्पन्न झाले. कोणाला कमीजास्त बोललो असल्यास क्षमस्व! आशा आहे की हे कथानक वाचकांना आवडावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

==========================================

एका महिन्यात किती उलथापालथी व्हाव्यात?

आपटेंवरचा आरोप मागे घेतला गेला. त्यांची निर्दोष सुटका झालेली असली तरीही ठपका लागला होताच. अर्थात, वरिष्ठांच्या दृष्टिकोनातून त्यांची आजवरची कारकीर्द निर्दोष असल्यामुळे हे गालबोट दुर्लक्षिले जात होते इतकेच!

आपटे कुटुंबाचे भावविश्व उद्ध्वस्त झालेले होते. पुण्यात लागोपाठ दुसर्‍यांदा बदनामी सहन करावी लागली होती. उपाय एकच होता, तो म्हणजे.....

.... पुणे सोडणे!

आणि पुणे सोडण्यासाठी, बदली करून घेण्यासाठी आपटे जीवाचे रान करत होते. आणि आजच त्यांना समजले होते की पुढचे एक प्रमोशन नाकारल्यास त्यांची बदली औरगाबादला होऊ शकत होती. वास्तविक प्रमोशन होण्यासाठी बदली घेतली जाते. पण औरंगाबादच्या त्या विशिष्ट ठाण्यावर कोणीच जायला तयार नसायचे. दोन धर्मांचे लोक राहात असल्याने त्या परिसरात तंग वातावरण असायचे. तेथे नियुक्त झालेल्या अधिकार्‍याला मनस्ताप, ताण आणि शिव्या सहन करणे ही महत्वाची जबाबदारी पार पाडायला लागायची.

पण आपटेंनी ती बदली स्वीकारली.

इकडे क्षमावर येऊ शकणारा प्रसंग टाळण्यात यशस्वी ठरल्यामुळे उमेशची प्रतिमा काहीशी सुधारली होती त्याच्याच घरात. मात्र या सर्व प्रकाराचा परिणाम फार विचित्र झालेला होता. क्षमा, आई आणि बाबा या तिघांनीही उमेशला निक्षून सांगितले होते की असले घराणे आपल्याला अजिबात नको. खरे तर उमेशचाही आपटेंवर तितकाच राग होता. पण निवेदिताला सोडून राहण्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती. मात्र आता आई वडिलांपुढे नमते घ्यावेच लागत होते कारण सख्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता.

उमेशला माहीतच नव्हते की आपटेंनी बदली स्वीकारलेली आहे. कारण निवेदिताशी आता कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता. ती कॉलेजलाही जाणे बंदच झालेले होते. त्यामुळे रस्त्यावरच्या त्या झाडामागे उभे राहून नुसती नजरानजर करणेही आता अशक्य झालेले होते. त्यांच्या घराच्या परिसरात वावरणे तर त्याहून अशक्य! त्यामुळे आपटेंकडे घडत असलेल्या घटनांबाबत तो अनभिज्ञ होता.

आणि आज सारसबागेत संध्याकाळी सहा वाजता सगळे जण जमलेले होते. आप्पा, शैलाताई, विनीत, त्याची होणारी बायको वर्षा, क्षमा आणि राहुल्या! सगळे जण उम्याशी बोलायला त्याला तिथे घेऊन आलेले होते.

शैला - उमेश, एक लक्षात घे, प्रेम वेगळे आणि आयुष्याचा प्रश्न वेगळा! तुझे तिच्यावर आणि तिचे तुझ्यावर प्रेम आहे हे ठीक आहे. पण काय काय घटना घडल्यात ते बघतोस ना? तिने वीष खाल्ले होते. तुला पुन्हा अटक झाली असती. ती कशीबशी वाचली हे तुझे नशीब! दुसरे म्हणजे क्षमावर काय आळ आला असता?? तिचे लग्न तरी झाले असते का? तुझ्या आजोबांवर त्या माणसाने हात उगारला. आपल्यासारखे लोक नाही आहेत ते! ह्यांना आणि विनीतला मार खावा लागला आणि एक रात्र चौकीवर काढायला लागली. हे केवळ तुमच्या दोघांच्या प्रेमामुळे! आणि आणखीन काय व्हायला पाहिजे आता? काकांना बीपीचा त्रास होईल, आजोबांना हार्ट अ‍ॅटॅक येईल तेव्हा तू शहाणा होणार आहेस का? क्षमाला सगळीकडून नकार येईल तेव्हा शहाणा होणार आहेस? आपल्यासारख्यांचे काम नसते प्रेम वगैरे! प्रेम करण्यासाठी मुळात खूप पैसेवाले असणे आवश्यक आहे. तरच मुलीच्या घरच्यांच्याही मनात ते स्थळ येते. मुळात खूप कर्तृत्ववान असणे आवश्यक आहे. ते सिद्ध व्हायला हवे. तुझे काय? तुला अजून नोकरी नाही. कधी लागेल आणि लागेल तरी की नाही हेही माहीत नाही. ती सुंदर आहे. तिला मागण्या येतील. तिचे वय तुझ्यापेक्षा एकच वर्षाने कमी आहे. तिचे आता लग्नाचेच वय आहे म्हंटले तरी हरकत नाही. कोणत्याही क्षणी तिचे लग्न ठरू शकते. मला माहीत आहे उम्या, की तुझ्या मनात काय उलथापालथी होत असतील! पण एक लक्षात घे, हे प्रेम वगैरे जे असते ना? ते निरर्थक असते. आत्ताची नजरानजर, एकमेकांना दिसणे, एकमेकांशी एखादा शब्द बोलायला मिळणे, सारखी आठवण येणे, एकमेकांशिवाय न राहवणे, या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात निरर्थक ठरतात. नंतर याचे काहीही वाटेनासे होते. आपल्यालाच वाटू लागते की आपण किती बावळटपणा करत होतो. तू बावळट आहेस असे मी म्हणत नाही आहे. पण वयानुसार खूप बदलतो माणूस! लहान वयातील या भावनांना नेहमीच्या वास्तव आयुष्यात स्थान राहात नाही. समजा तुझे आणि तिचे लग्न झाले तरी नव्याची नवलाई संपेल तेव्हा पोटापाण्यासाठी कष्ट असतीलच! आपण जन्माला आलो आहोत म्हंटल्यावर आयुष्याशी लढावेच लागणार! केवळ या आत्ताच्या प्रेमभावनेवर गुजारा होत नाही उमेश! पुढचे आयुष्य खूप वेगळे असते. तुला वाटेल आपल्यापेक्षा जेमतेम दिड वर्षांनी मोठी असणारी शैलाताई काय उपदेश करतीय! पण तसे नाही आहे. मी माझ्या आई वडिलांवरून बघते. माझे वडील अंथरुणाला खिळले तेव्हा हा राहुल लहान होता. आजही ते अंथरुणाला खिळून आहेत. आईने कसे कष्ट केले हे मला माहीत आहे. घर कसे चालवले हे मला माहीत आहे. जुन्या काळातला प्रेमविवाह होता त्यांचा! पण प्रेमाची त्या काळातली भावना या काळात उरलेली नव्हती. या काळात निर्माण झालेले होते ते सहवासाचे प्रेम! एकमेकांसाठी आयुष्यभर कर्तव्य करत राहण्याचे प्रेम! माझ्या बाबांना आईने कधी एका शब्दानेही जाणवून दिले नाही की कर्ता पुरुष आजारी आहे आणि तिला एकटीलाच सगळे पडत आहे. या वर्षाच्या किंवा विन्याच्या आईकडे जाऊन ती रडायची. आणि मी तुझ्या आईकडे येऊन रडायचे. पण बाबांसमोर कधीच कोणी रडलो नाहीत. राहुलही नाही. आज आमच्या घरात आई बाबांचे जे एकमेकांवर प्रेम आहे, ते तारुण्यसुलभ प्रेम नाही उमेश! अगदी स्पष्टच सांगायचे झाले तर माझे वडील कित्येक वर्षे अंथरुणाला खिळलेलेच आहेत. पण आमच्या संसाराला, घरादाराला अर्थ आहे. हा अर्थ तुझ्या आणि निवेदिताच्या आत्ताच्या प्रेमाला मुळीच नाही. आपण लहानपणापासून सगळे एकत्र वाढलेलो आहोत. राहुलची जशी मी मोठी बहिण आहे तशीच तुझीही आहे. त्या हक्काने तुला सांगतीय की निवेदिताचा नाद सोडून दे! आयुष्य पडलेले आहे आपल्या सगळ्यांचे! ज्या प्रेमाचा कोणालाही काहीही त्रास होत नाही ते खरे प्रेम असते उमेश!

शैलाताईचे बोलणे संपले तेव्हा खुद्द आप्पाही अवाक झालेला होता. ज्या शैलाला आपण लहानपणापासून 'शैले बावळट' अशी हाक मारतो ती इतकी बोलू शकते? इतके छान बोलू शकते?

सगळ्यांनाच शैलाताईची मते पटलेली होती. क्षमा तर आदरानेच पाहू लागली होती शैलाताईकडे! पण उमेश?

उमेशला हे मुद्दे असह्य वाटत होते.

उमेश - शैलाताई, तू हे जे सगळे म्हणालीस, ते मी ऐकून घेतले. आता माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर देतेस?

सगळे जण उमेशकडे पाहू लागले.

उमेश - मला फक्त एक सांग, माझे आणि निवेदिताचे एकमेकांवर प्रेम बसणे आणि काहीही प्रकार झाले तरीही आणि कोणत्याही किंमतीवर एकमेकांपासून दूर व्हायचे नाहीच असे दोघांनी ठरवणे यात काही चुकीचे आहे?

शैला - नाही. अजिबात नाही. पण कोणत्याही किंमतीवर म्हणजे कोणत्या? तिने विष खाल्ले आणि आत्महत्या केली तर तूही करणारेस? क्षमाचे लग्नच झाले नाही तरीही तुम्ही दोघे पळून जाऊन लग्न करणार आहात? तुझ्या वडिलांना बीपीचा त्रास झाला काय आणि आईची रडून रडून वाईट अवस्था झाली काय, तुम्ही एकच होणार आहात? म्हणजे आज तुमच्या ह्या प्रेमापुढे सगळे जग क्षुद्र ठरले? हे आणि विनीत त्या दिवशी चौकीवर मार खात होते तुझ्यासाठी, ती मैत्री निरर्थक ठरली? उद्या ह्या दोघांना कोणी रस्त्यात मारून टाकायची धमकी दिली तरीही तुम्ही एकच होणार आहात?

उमेश - हे असे काहीही होणार नाही. तुम्ही सगळे माझी साथ द्यायच्या ऐवजी मला कसला विरोध करताय? आत्ता खरे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवीत की निवेदिताबाबत पेपरात इतके छापून आलेले आहे की खरे तर मी तिच्याशी लग्न करणे यातच तिची सुटका होईल. आमचे कसेही का होऊना लग्न करून देणे हा तुमचा प्रयत्न असायला हवा. आम्ही एकदा पळून जाऊन लग्न केले की तिचा बापही काही म्हणू शकणार नाही. तुम्ही याचे प्रयत्न करायला हवे आहेत तर तुम्ही सगळे मला तिसरेच सांगता आहात.

आता आप्पा बोलू लागला.

आप्पा - उम्या.. तिसरेच काय सांगतोय? आम्ही तिघे गेलो होतो ना धुळ्याला?? शैलाच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आत्तेभावाकडे म्हणजे गुजरातमध्ये जाऊन तुमचे चोरून लग्न लावून देण्यासाठी? तू आलास का त्या दिवशी? तीही आली नाहि आणि तूही आला नाहीस. आम्ही यड्यासारखे तिघे धुळ्याला जाऊन रात्रभर जाग्रण करून पुण्यात लफडे झाल्याचे कळले म्हणून पुण्यात आलो. तुम्ही निवांत! आता परिस्थिती वेगळी झालेली आहे.

उमेश - काय वेगळी झाली आहे परिस्थिती?? अजूनही तिचे आणि माझे एकमेकांवर तितकेच प्रेम आहे.

आप्पा - नुसते प्रेम असून काय उपयोग आहे? तिच्या वडिलांच्या नोकरीवर गदा आलेली होती.

उमेश - हो पण ती त्यांच्याच मूर्खपणामुळे! क्षमाच्या बाबतीत ते काय करणार होते माहीत आहे ना?

आप्पा - अरे पण आअता ते तुला सोडतील का मूर्खा? आता ते तुझा तिच्याशी संपर्कही होऊ देणार नाहीत. तू नुसता दिसलास तरी ठोकून काढतील तुला...

उमेश - म्हणुन तर म्हणतो पळून जाऊन लग्न करतो आम्ही..

विनीतला तोंड फुटले.

विनीत - उम्या, पळून जायला तू कोण लागून गेलास? पळून जाऊन लग्न करणार आणि नंतर कुठे जाणार? रास्ते वाड्यातच येणार ना? ल्येका नोकरी नाही, पैसे नाहीत आणि पळून जाऊन लग्न करणार कसा तू?

क्षमाला वेगळीच काळजी होती.

क्षमा - दादा, असला काही विचार करणार असलास तर मी सरळ घरी सांगून टाकेन. माझ्या लग्नाची मला काहीच काळजी नाही आहे, पण परवा माझे लग्न होईल की नाही या विषयावरून आई जे रडली ते पाहून मी स्पष्टपणे सांगते, की मला तिला दु:खी बघता यायचे नाही. तू असे काही करणार असलास तर मि आजच घरी गेल्यावर सांगून टाकणार आहे.

क्षमाला वर्षा आणि शैला गप्प करत असताना उमेश उखडला.

उमेश - तू अजून चिमुरडी आहेस. तुझ्या लग्नाचा प्रश्न कुठे आला? तुला मी स्थळे आणेन एकसे एक! तुला त्या दिवशी मीच वाचवले आहे, नाहीतर काय झाले असते सगळ्यांना माहीत आहे. पण ते माझे उपकार नाहीयेत. मी तुझा मोठा भाऊ आहे. मला वाट्टेल तशी बोलू नकोस तू!

क्षमा - वाट्टेल तशी बोलत नाही आहे. मला आई बाबांची काळजी आहे. तू घरात नसलास की त्यांना वाटते की तू तिलाच भेटायला गेला असशील. काहीतरी नवे प्रकरण होईल. त्यांची मनस्थिती फार फार वाईट झाली आहे. आणि हे सगळे केवळ तुझ्या आणि त्या निवेदितामुळे झालेले आहे. आणि मी चिमुरडी नाही आहे. दोनच वर्शांनी लहान आहे तुझ्यापेक्षा! मुलींची लग्ने आधी होतात. सगले निट असते तर खरे तर तुझ्याआधी माझ्या लग्नाचा विषय निघाला असता.

उमेशने रागाने पाहिले तशी क्षमा शैलाताईच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली.

शैलाताई तिला थोपटू लागली. वर्षाच्याही डोळ्यात पाणी आले तसा विनीत उचकला.

विनीत - उम्या, तू बेताल बदबड करतोयस. पहिलं लग्नं क्षमाचं व्हायला हवं! तुला अजून नोकरी नाही की काही नाही.

हे वाक्य तिसर्‍यांदा ऐकून मात्र उमेश भडकलाच. घोगर्‍या आवाजात चिडून विनीतला म्हणाला.

उमेश - विन्या... नोकरी नाही नोकरी नाही दुसर्‍या तिसर्‍यांदा म्हणालास तू... नोकरी नाही म्हणजे आयुष्यभर लागणार नाही असे नाही... आणि तुला लवकर नोकरी लागली कारण तुझं क्वॉलिफिकेशन वेगळं आहे.. व्यावसायिक आहे... माझं तसं नाही आहे.. स्वतःला नोकरी आहे म्हणून खिजवू नकोस.. तुला तरी काय अशी महान नोकरी आहे रे?

आप्पाने विन्याहीपेक्षा व्यथीत होऊन उम्याकडे पाहिले.

आप्पा - उम्या... विन्याला असे बोलू नकोस..

उमेश - बोलू नकोस म्हणजे काय? सारखं आपलं नोकरी नाही नोकरी नाही... नोकरी लागली होती पण ती चुकीची नोकरी मिळाली होती... हा काय मोठा मॅनेजिंग डायरेक्टर लागून गेला मला असे म्हणायला..

उमेशने विन्यावर आगपाखड केलेली वर्षाला सहन होईना.

वर्षा - उमेशदादा.. काहीतरी बडबड करू नकोस.. तो तुझ्याच भल्याचं सांगतोय...

उमेश - तू मधे बोलू नकोस.. तुला काय?? घरबसल्या तुमची प्रेमं वाड्यातल्या वाड्यात आणि तीही सगळ्यांना मान्य! तुम्हाला काय कळणार माझी व्यथा??

विनीत - हो का?? म्हणून तुला सिंहगडावर कॅमेरा आणून दिला का??

उमेश - उपकार वाचतोयस का??

विनीत - उपकार?? उपकार हा शब्द तरी माहीत आहे का तुला???

उमेश - नाही ना! मी म्हणजे एक नंबरचा पाताळयंत्री आणि स्वार्थी माणूस आहे..

शैला - भांडू नका रे! भांडताय कसले खेळणार्‍या लहान मुलांसारखे.. हे वाड्यातलं 'हाप्पीच' क्रिकेट आहे का?

'हाप्पीच' क्रिकेटवरून उमेशला पहिला दिवस आठवला. आपटे रास्ते वाड्यात शिफ्ट होताना त्या दिवशी 'हाप्पीच' क्रिकेट बंद करावं लागलं होतं कारण सामान वगैरे फुटलं असतं! लेडीज सायकल दिसल्यावर सगळे जण 'कोणीतरी भन्नाट येणार राहायला' या स्वप्नावर चर्चा करत होते. आणि कोण आलं?? तर निवेदिता! आल्या आल्या उमेशकडे बघून 'हाय' म्हणाली आणि हासत आत गेली. पहिला दिवस! पहिली नजरानजर!

पण आत्ताची वेळ वेगळी होती. आत्ता विनीत काहीही बोलत आहे असे उमेशला वाटत होते.

वर्षा मात्र तिच्या आईवर गेलेली होती. ती सरळ फडाफडा बोलायची. उमेशदादाने टाकलेली वाक्यं तिला सहन होईनात!

वर्षा - तू काय सांगतोयस मला गप्प बस म्हणून?? तूच गप्प बस! ह्या शैलाताईचं पहिलं लग्न तुझ्या आणि तिच्यामुळे मोडलं! मोठे फिरायला निघाले होते आप्पाच्या पुतण्याला घरी सोडायला. आणि आम्ही तुमचं जुळवून द्यायचं की बाबा याच दोघांना जाऊदेत! त्या नखरेल मुलीला त्या माणसासमोर जायची काय गरज होती. समजा दारूच्या नशेत काहीतरी बरळला तो, तर सरळ वर निघून यायचं ना पळून?? आणि तू मोठा अमिताभ बच्चन! अगदी त्याला मारलंस वगैरे! ह्या विनीत आणि आप्पादादाने कशाला मार खायचा तुझ्यासाठी? त्या दिवशी विनीतच्या आईंना दवाखान्यात सोडायचं होतं तर विनीत म्हणतो की आज मोटरसायकल नाही आहे, उद्या जाऊ, उद्या सोडेन! मी विचारलं की का रे मोटरसायकल नाही आहे तर म्हणे उमेशला दिलि आहे, तो आणि निवेदिता पिकॉकबे साईडला जाणार आहेत. हे कशाला करायचं तुमच्यासाठी आम्ही? ह्या दोघांनी मार खायला? हे तिघे निघाले सरळ धुळ्याला! कोणाला काही सांगणं नाही आणि काही नाही. अर्थात शैलाताईनेच सांगितलं होत म्हणून मी गप्प बसले. पण तिकडे तुम्ही लग्न लावून दिलं असतत आणि त्या नटवीच्या बापाने या तिघांना नंतर अटक बिटक...

उमेश - गप्प बस???? गप्प बस तू! कुणाला नटवी म्हणतेस??? तुझ्यापेक्षा आणि सगळ्यांपेक्षा ती सुंदर आहे याचाच हेवा वाटतो ना?? आप्पाच्या लग्नात तू कशाला नटली होतीस मग???

विनीत - उम्या... एक ... एक सांगतो तुला... ह्यात वर्षाला.. वर्षाला काहीही बोलायचे नाही..

उमेश - तू गप रे?? वर्षा तुझी आहे म्हणजे काय आमची कोणाची कोणीच नाही का?? क्षमासारखीच वर्षा आहे मला..

विनीत - ते काही असो! पण तिला तू खूप बोललास.. आता बास कर!

उमेश - मला यायचंच नव्हतं इथे... तुम्हाला मला ढोस द्यायचे होते म्हणून आणलंत... आता सगळ्यांवर परिणाम व्हायला लागले आमच्या प्रकरणाचे तशी उपरती सुचली होय रे??

आप्पा - उम्या... काहीही काय बोलतोयस?? तुझ्यासाठी काय काय केले हे तुलाही माहीत आहे ना??

उमेश - अरे ते उपकार मान्य करायचे म्हणून मी निवेदितालाच सोडायचे का??

क्षमा - हो य.. ! सोडायचे म्हणजे सोडायचे...

उमेश - तू चूपचाप बस पहिली... मला अक्कल शिकवायची नाही..

शैला - ती लहान आहे म्हणून ना?? मग मीच आता सांगते... यापुढे आमच्या कुणाकडूनही तुला निवेदिताच्या बाबतीत कसलीही मदत मिळणार नाही... आणि जोवर तू ....

शैलाताईच्या या विधानावर आप्पा, विनीत आणि राहुलच्या माना खट्टकन खाली गेल्या... ती असे काही बोलेल याची कुणाला कल्पनाच नव्हती... आणि अजून तिचे बोलणे संपलेलेही नव्हते... 'आणि जोवर तू' हे शब्द बोलून तिनेही क्षणभर नि:श्वास सोडला... तसे सगळेच तिच्याकडे बघू लागले...

सारसबागेच्या गणपतीनेही ते वाक्य ऐकले आणि त्याच्याही डोळ्यातून दोन थेंब निघाले असतील...

शैला - आणि जोवर तू निवेदिताशी सगळा संबंध संपवत नाहीस... तोवर आमच्यापैकी कुणीही तुझ्याशी....

आप्पाने हात वर करून शैलाला थोपवण्याचा प्रयत्न करेपर्यंत शैलाने ते वाक्य उद्गारलेही होते...

शैला - आमच्यापैकी कोणीही तुझ्याशी काहीही संबंध ठेवणार नाही... अगदी... अगदी क्षमासुद्धा! आणि हे सुद्धा!

खण्ण!

उमेशने ताडकन मान वळवून आप्पाकडे पाहिले... आप्पाची मान खाली गेली...

उमेश - आप्पा... ताई काय बोलतीय बघि... त ...लंस.. ना??

आप्पा - सगळ्यांच्या... सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे ते.... मी... मीही...

आप्पाने मान विरुद्ध दिशेला फिरवली... त्यला ते वाक्य बोलवतच नव्हते... पण बोलायला लागणार होते..

उमेश - काय???? मीही काय???

आप्पा - मीही...... सहमत आहे शैलाशी...

उमेश - काय?????

उमेशला अजूनही तो सगळा वेडेपणा किंवा पोरखेळच वाटत होता. यात काही गांभीर्य आहे असे वाटतच नव्हते. उद्या काही लागले तर हक्काने या तिघांना सांगता येईल असाच त्याचा समज होता. त्यामुळे त्याने मान वळवून विन्याकडे पाहिले..

उमेश - विन्या.... अ... अरे आप्पा... अरे...

विन्या - उमेश...

कित्येक वर्षांनी त्याने 'उम्या' अशी हाक न मारता पूर्ण उमेश अशी हाक मारली होती. स्वरातल्या गांभीर्याने चकीत होऊन विन्याकडे पाहातच राहिला उम्या!

विनीत - हे ... हे खरे आहे... तुझ्यासाठी वाट्टेल ते साहसे करून जर या मुलींच्याच लग्नाचा प्रॉब्लेम होणार असेल, आम्हाला मार् खायला लागणार असेल.. तर आपल्या.... आपल्या मैत्रीसाठी आणि सगळ्यांच्या मनःशांतीसाठी... माझ्यामते तू... निवेदिताला सोडा.... सोडायलाच हवेस...

उमेश - ..............

विनीत - आणि... श... शैलाताई जे म्हणाली...

उमेश - तुलाही...... तुल...

विनीत - होय... मलाही ते पटत आहे...

उमेश - म्हणजे... आ...आपला ... आपला आता काहीही संबंध नाही....

विनीत - हे सगळं... हे सगळं तुझ्याचसाठी आहे...

उमेश - माझ्यासाठी काहीही करू नका फक्त माझ्याशी मैत्री ठेवा असे म्हणालो तर???? आप्पा???

पुन्हा वर्षा पचकली.

वर्षा - तुझ्याशी मैत्री म्हणजेच पेपरात नावे आणि चौकीवर रात्र घालवणे...

वर्षाच्या त्या शाब्दिक प्रहारावर काही एक न बोलता उमेशने वळून राहुल्याकडे पाहिले...

राहुल - मी.. मी काय बोलणार?? तायडीने आईला सांगितले तर मला ... हा...हाकलून देतील....

सहा मिनिटे!

सहा मिनिटे सर्व नजरा जमीनीवर रोखलेल्या! कोणाचीही मान वर होऊ शकत नाही. हे आज काय झाले?? कसे झाले?? हे शब्दच कसे बाहेर पडले?? शैलाताईलाही हेच प्रश्न पडलेले... सहा मिनिटे...

..... आणि सहा मिनिटांनंतर ... एक दबलेला... आणि नंतर न दबता बाहेर पडलेला...... हुंदका..

क्षमा रडलेली असणार! न सांगूनही सगळ्यांना समजू शकत होते ते... पण... पण आवाज थोडा वेगळाच वाटला..

.... तसे सगळ्यांनीच वर पाहिले... शैला ताई....

शैला ताई च्या गालांवरून सरी ओघळत होत्या... तिचा हात आप्पाने घट्ट धरून ठेवला होता... शैलाताई रडत आहे हे पाहून क्षमा हमसून हमसून रडू लागली... आणि... ते पाहून... उमेशवर विशेष प्रेम असलेला...

.... राहुल... हळूच हुंदका देऊन डोके खाली घालून बसला...

कित्तीतरी वेळ तेच हुंदके... तोच अबोला.. त्याच जमीनीवर रोखलेल्या नजरा.... आणि अचानक क्षमाने विनीतदादाच्या मांडीवर डोके ठेवले... विनीत तिला थोपटू लागला.....

आता वर्षाच्याही डोळ्यात पाणी आले... ती उठली आणि उमेशकडे आली...

उमेशकडे पाणी भरल्या डोळ्यांनी बघत म्हणाली.. ...

"मी.. मी चुकले... उमेशदादा... पण... पण माझ्या पाठची बहिण आहे... विनीतवर कसले आळ आले तर माझे लग्न होईलच त्याच्याशी... पण वनिता... वनिताचे नाही होणार लग्न... म्हणून... म्हणून... नको बोलूस यापुढे आमच्या कोणाशीच... "

उमेशला मिठी मारून वर्षा गदगदून रडत होती आणि उमेश तिला थोपटतानाच शुन्यात बघत होता...

सगळेच संपलेले होते. निवेदिताचे महत्व इतके नव्हते की ही वर्षानुवर्षांची मैत्री संपावी... पण संपली होती... कदाचित... कायमचीच..

उमेश उठून उभा राहिला.. 'जातो' म्हणण्यासाठीही जीभ उचलत नव्हती... कोणाहीकडे न बघता... आणि नंतर प्रत्येकाकडे एकदाच बघून... त्याने पाठ फिरवली... जणू स्वतःच्या आयुष्याकडेच पाठ फिरवत होता... हा अनुभव नकोसा होता... जितके स्वतःवर प्रेम केले तितकेच या सर्वांवर प्रेम केले होते... आणि.. हे निनावी नाते...

.... संपलेले होते... संपवायचेच होते....

दहा पावले... दहा बारा पावले उमेश चालून गेला तेव्हा मात्र... तेव्हा मात्र आप्पाला राहवले नाही...

पाण्याचे टच्च भारलेल्या डोळ्यांनी बसल्या बसल्याच मागे वळून पाहात तो..... उमेशला म्हणालाच...

"अग... अगदीच काही... लागले तर... सांग रे .... हक्काने... "

उम्याला शेवटचा आवाज ऐकू आल तेव्हा विन्या आप्पाला आणि राहुलला मिही मारून रडत होता...

आणि आप्पाही!

आप्पाला रडताना कधीही पाहायची इच्छा नव्हती उम्याला... म्हणूनच तो मागेहीन बघता... ताडताड पावले उचलत सारसबागेच्या... दारातून बाहेर पडला खरा... पण.. कोणालच दिसनार नाही अशा पद्धतीने.. एका झाडाला मिठी मारून खूप खूप रडला....

काही का असेना... पण अशा वेळेस त्याला जुनैद मियाँची फार फार आठवण यायची...

उंगलियाँ रखते है वो हमपे उठाने के लिये
दोस्त मिलते है यहाँ दिलको दुखाने के लिये

नाखुदा मानके बैठे थे जिनकी कश्तीमे
वो हमे मौजोंमे लाये थे डुबाने के लिये

वो हवाओंकी तरह रुखको बदल लेते है
हम नसीबोंसे लडे थे जिन्हे पाने के लिये

हम नसीबोंसे लडे थे जिन्हे पाने के लिये....

या ओळीने त्याला खट्टकन आणि बर्‍याच वेळाने निवेदिताची आठवण आली ... असे कधी झाले नव्हते गेल्या काही दिवसांत... की इतका वेळ ती आठवुच नये... मित्रांनी संबंध सोडल्यामुले निवेदिताची अनेक आवरणे मनावरून तात्पुरती निघालेली होती... आता परत तिची तीव्रतेने आठवण झाली...

तिन्हीसांजेच्या वेळेस मनात इतकी उदासी घेऊन एकटाच चालत चचालत उमेश निघाला. पाय आपोआपच डेक्कनकडे वळले. खूप लांबून तिच्या घराचे दर्शन घेतले तरी तिला पाहिल्याचा आनंद त्याला व्हायचा.

आजही तो खूप खूप लांबूनच त्या घराकडे बघत होता....

... काहीतरी... काहीतरी वेगळेच दिसत होते मात्र तेथे...

एक ट्रक.... काही जण सामान भरतायत... आणि... आपटे????

आपटे खुद्द तेथे देखरेख करत होते सामानाची...

हे काय??? काय चाललेले आहे हे??? कुठे चालली निवेदिता?? पुण्यातल्या पुण्यातच ना??? की... ????

पाऊण तास तो नुसताच एका जागी उभा होता... ट्रकमध्ये सामान भरून झालेले होते... मजूर चालत चालत एका टपरीपाशी गेलेले होते...

... झटकाच बसला उमेशला...

ताडताड चालत तो टपरीपाशी गेला आणि मुद्दाम एका मजूराला त्याने काहीसा जोरात धक्का मारला...

"अबे???"

मजूराने आश्चर्य व्यक्त करेपर्यंतच हासत हासत उमेश त्याला म्हणाला...

"काका सॉरी सॉरी... खरच सॉरी... लागलं का??"

"बघून चालता येत नाही का बे???"

"खरच माफ करा... ओ मास्तर... तीन कटिंग द्या ह्यांना..."

"च्या बी नकोय... नीट चालत जा पैला... "

"अहो... माफ केलेत असे वाटावे म्हणून तरी घ्या अर्धा अर्धा चहा..."

खरच चहाचे लहान लहान ग्लास आले तसे मजूरांनी ते हातात घेतले. उमेश अजूनही सॉरीच म्हणत होता... नंतर स्वतःची माहिती सांगु लागला... मी कॉलेजला आहे , इकडे इकडे राहतो वगैरे...

आपोआपच मजूरही काहीबाही बोलू लागले... तोवर उमेशने विचारलेच....

"इकडे कुठे काम चालू आहे का??"

"हा... शिप्टिंगे... सायबाच..."

"हो का??.... कुठे???"

काय उत्तर मिळते यावर सगळे काही.... अक्षरशः आयुष्यातले सगळे काही अवलंबून होते बिचार्‍याच्या...

आणि भयंकर उत्तर मिळाले...

"औरंगाबाद"

"औ... क...कधी चाललेत???"

"सायब आज चाल्ले जानार... फ्याम्ली उद्या.. "

"अच्छा अच्छा... ओक्के.. चला मग येऊ का???'

"हा... "

निराशा!

औदासीन्य!

पृथ्वीच्या पलीकडे गेला तरी गुलाबी किरणांनी चिडवणारा सूर्य त्या संध्याकाळला अधिक उदास करत होता...

... कशातच काही अर्थ राहिलेला नव्हता.. सगळेच संपलेले होते...

निवेदिता.. नितु..

"तुझी... फक्त तुझी.... फक्त तुझी... "

काही नाही... सगळे संपलेले होते.. आप्पा म्हणाला होता... काही लागले तर हक्काने सांग.. काय सांगू???

तिला पुण्यालाच ठेवायची शक्कल काढ??? काय करायचे???

सिगारेट! नकळत त्याने एक सिगारेट घेतली आणि सरळ फूटपाथवरच बसला मांडी घालून... येणारी जाणारी तुरळक गर्दीही आता नकोशी वाटत होती...

मगर ये दर्दका मौसम नही बदलनेका...

दर्द का मौसम...

काय असते प्रेम?? दोन मनांमधील भावना! बाकी काही नाही. व्यवहारात त्याचा अर्थ शून्य! अबोल, मुके प्रेम! सग्फल होण्यासाठी काहीही न करू शकणारे प्रेम! आपण विसरू शकू तिला??? ती विसरू शकेल आपल्याला?? येईल पुण्याला परत?? का येईल??? कशी येईल?? कोणाबरोबर येईल?? आली तरी भेटेल का, दिसेल का!

गुडघ्यात डोके खुपसून उमेशने पोटभर रडून घेतले. आजचा दिवसच तसा होता..

.....

तू जा रहा है तो तनहाईयां भी लेता जा..

एक पाऊल... एक अश्रू... एक कळ हृदयात... रात्रीचे अकरा वाजले होते... सगळा वाडा झोपलेला होता...

रास्ते वाडा कधी आला तेही कळले नाही.... चेहरा कोणालाही दाखवण्यासारखा नव्हताच... मारुती मंदिराच्या मागे गेला आणि सरळ कठड्यावर चढला...

समोर तीच खिडकी होती... कायमची लाल ओढणी गुंडाळलेली खिडकी..... पण अर्धवट उघडी...

सो गये लोग उस हवेली के....

... एक खिडकी मगर खुली है अभी..

"उघडतेस का तीच खिडकी पुन्हा?????"

उमेशने मनातच निवेदिताला प्रश्न विचारला.... एक प्रश्न ज्याचे उत्तर निवेदिताकडेच काय, कोणाकडेही नव्हते...

..... कित्तीतरी... कित्तीतरी वेळ तिथेच काढून शेवटी पुन्हा गुरखा लांबवर दिसल्यावर उमेश खाली उतरला आणि...

.... रास्ते वाड्याच्या दारात आला...

आश्चर्याचा प्रचंड धक्का..... एका कोपर्‍यात ... वर्षा उभी होती...

जिने आज वाट्टेल ते बोलून उमेशचा अपमान केला होता आणि नंतर त्यालाच बिलगून खूप रडली होती.... ती वर्षा...

क्षंणभर उमेशला वाटले तिच्याकडे दुर्लक्षच करावे... पण कोणालाच माहीत नसताना ही अशी कशी काय इथे रात्रीची उभी आहे???

कुजबुजत त्याने तिला जवळ जाऊन विचारले...

"काय गं???"

वर्षाने एक हात पुढे केला.... चुरगाळलेला एक कागद... अर हो... वर्षाची आणि नितुची एक ... कॉमन मैत्रीण होती नाही का??

चिठ्ठी... नक्कीच वर्षापुढे वाचणे योग्य नव्हते.. वर्षाही पटकन जिना चढून वर निघून गेली तेव्हा उमेशला जाणवले...

आज संध्याकाळी सारसबागेत झालेल्या संवादांनंतर खरे तर वर्षाने ही चिठ्ठी स्वीकारायलाच नको होती... पण तिने ती स्वीकारून वर आपल्याला दिलीही आहे.. याचाच अर्थ... कदाचित मैत्री कधीच संपत नसावी... किंवा तिला पश्चात्ताप झाला असावा आपल्याला असे बोलल्याचा...

अंधुक अंधारात त्याने ती चिठ्ठी उलगडली... आणि ते शब्द वाचले..

"उद्या दुपारी... कॉलेजच्या मागे नदीपाशी... तीन वाजता... शेवटची भेट.. तुझी... आणि फक्त तुझी.. नितु.. येशील ना रे??"

खळाळणार्‍या नदीसारखे डोळे वाहात होते उमेशचे... आणि कानात जुनैदमियाँचा आवाज घुमत होता...

'तेरे खुशबूमे बसे खत... मै जलाता कैसे'

==================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

___/\___

अरे भावड्या . . नादखुळा.
मैत्रिचा किस्सा वाचून डोळ्यांतून पाणी आले.
अजून किती भाग आहेत ? लवकर पूर्ण कर.

हिंदी कळत असेल तर, अगला भाग जल्दी डालो.

Kinda feel like you are loosing something ... Not sure what !
Better get back on track ... If you feel like talking to me ... I am free on weekends... Coz I dont wanna lose your literature.

ओह, अ‍ॅम आय निळूभाऊ? Happy

माझ्यामते, हा भाग वळणाचा आहे. अर्थात, मीच लिहिलेल्याबाबत माझीच अत्यंत गोंडस मते असणे यात काही नावीन्य नाहीच म्हणा!

एनीवेज, इफ आय अ‍ॅम लूझिंग समथिंग, प्रॉबेबली, आय विल गेट दॅट बॅक....... सूनर!

Happy

-'बेफिकीर'!

नविन भाग कधी येणार.....................?
लवकर लवकर टायपा बे.फि. कंटाळा आला आहे कामाचा थोडा विंरगुळा तरी मिळेल.

वैताग..वैताग..वैताग..वाट बघुन वैताग आलाय.....नवीन भाग कधी येणार???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

भलताच 'सेंटी' झाला आहे हा भाग ...... Happy

ज्या प्रेमाचा कोणालाही काहीही त्रास होत नाही ते खरे प्रेम असते .......positivo1.gif

धन्य...!!

Pages